असा मी आसामीया...

चिगो's picture
चिगो in जनातलं, मनातलं
14 Sep 2010 - 5:06 pm

मी आसाम मध्ये कामाला आहे. इथे आल्यावर इथली भाषा व ह्या प्रांताविषजी माहिती मिळाली ती आपल्यासोबत शेयर करीत आहे..
अहोमीया भाषेत आणि मराठीत शब्दांच्या बाबतीत बरेच साम्य आहे. (बाय द वे, आसामीया/ अहोमीया माणसाला "आसामी" म्हणू नका. त्याचा इथे अर्थ wrong doer / criminal असा होतो.) अहोमीयातही आईला "आई" असे म्हणतात म्हणुन ह्या भाषेशी भावनिक नाते जुळते. (वडिलांसाठी "देवता" हा शब्द आहे.) दादा, घाम, भात (जेवण करणे म्हणजे "भात खाणे". लग्नात जायचे म्हणजे लग्नात खायचे), उदाहरण, पर्यंत, आना (आणा), तुमि (तुम्ही) आपुनी (आपण) असे बरेच शब्द मराठीसारखेच आहेत.
पण उच्चारांच्या बाबतीत मात्र तफावत आहे आणि ती गमतीशीर आहे. शब्दांचे उच्चार "ओ"कारांत करतात. "च" चा उच्चार "सो" असा होतो. म्हणजे "सोनु" म्हणायचं असेल तर "चनु" लिहा. चिटीबच = सिटीबस. "स" श" चा उच्चार "हो" "ख्हो" असा, पण त्यातही nuiances आहेत. "क्ष" चा उच्चार "ख्खो" असा होतो.पण जोडाक्षरे मात्र जशीच्या तशी उच्चारली जातात. म्हणजे चिन्मय "सिन्मॉय" झाला तरी च्यवन "च्यवन"च राहतो, आणि शिक्षक "हिख्खोक" झाला तरी अश्व तो "अश्व"च... खरंतर अहोमीयातली "स" "श" "क्ष" असलेले शब्द उच्चारले तर रामदेवबाबांचे श्वासोच्छावासाचे व्यायाम आपोआप होतील ! अवांतर: अहोमीयात "बिया" म्हणजे लग्न आणि बेया म्हणजे वाईट !! (किती सुचक असतात ना शब्द !?)
मागे उषा मंगेशकरांची मुलाखत ऐकत होतो. त्या आहोमीयात प्रसिद्ध गायिका आहेत आणि त्यांना आसाम सरकारचा राज्य पुरस्कारही मिळाला आहे. मुलाखतकार वारंवार त्यांना "उखाजी, उखाजी" करत होता. शेवटी त्याला चुक कळली आणि तो "उषाजी" वर आला.
आसाममध्ये वेगवेगळ्या जाती, जमाती, आदिवासी आहेत. इथे चातुर्वर्ण्य पद्धती फारशी रुढ नव्हती. निसर्गाच्या कृपेनी खायला-प्यायला भरपूर असल्याने लोकांमधे थोडा Laid-back attitude दिसून येतो. १३व्या शतकात येथे "अहोम" राजवटीची स्थापना झाली. "लासित बोरफुकान" हा येथील प्रसिद्ध ऐतिहासिक वीरपुरुष ! त्याने गोलाघाट येथे ब्रम्हपुत्रेच्या पात्रात युद्ध लढुन मुघलांचा पराभव केला. अहोमांच्या युध्द-क्रोर्याची एक किंवदंती आहे. त्यांच्या एका सेनापतीने नागा लोकांना (जे स्वत:च लढवय्ये म्हणून प्रसिद्ध आहेत) धडा शिकवण्यासाठी नागा सैनिकांना जिवंत भाजुन, त्यांचे तुकडे बाकीच्या बंदिस्त नागा सैनिकांना खायला लावले होते, असे म्हणतात.
नंतरच्या काळात श्री शंकरदेवांनी आसाममध्ये "वैष्णव" धर्माची स्थापना केली. इथे श्रीकृष्णाच्या निराकार रुपाची पुजा केली जाते. "होराई" वर "गामोसा" टाकुन त्यासमोर गीतापठन केल्या जाते. किर्तन-पुजेसाठी लोक "नामघरात" एकत्र येतात. एकूणच आपल्याकडील भक्ति-संप्रदायासारखे येथे वैष्णव धर्माचे अनुसरण करतात.
आसामचा निसर्ग, काझिरंगा पार्क तर प्रसिद्धच आहेत. इथल्या कलेची, नृत्याची, एकूणच टॅलेंट्ची आता रियॅलिटी शोज मुळे लोकांना आता ओळख होत आहे आणि ह्या "Not so known" भागाबद्दल उत्सुकता वाढायला लागली आहे.

So if you want to escape to a serene beauty, मोइ आख्होमोत आपुनार स्वागत करि आसु | आहॉक | आदोरोनि (स्वागतम) !!

संस्कृतीदेशांतरभाषामाहिती

प्रतिक्रिया

गणेशा's picture

14 Sep 2010 - 5:24 pm | गणेशा

माहिती आवडली ..
भाषा साधर्म्याबद्दल चे पहिल्यांदाच वाचले .
धन्यवाद.

आन्खिन आसामीया बद्दल, त्यांच्या प्रथा, न्रुत्य .. वागणे .. आणि तुमचे अनुभव आल्यास आवडेल

-

मितान's picture

14 Sep 2010 - 5:34 pm | मितान

छोटासा पण चांगला लेख :)

मग आसामी भाषेत "शतायुषी भव " ला " हतायुषी भव " म्हणतात का ;) :))

कृपया तुम्ही राहाता त्या भागाबद्दल अजून लिहा ही आग्रहाची विनंती :)

चिगो's picture

14 Sep 2010 - 5:46 pm | चिगो

खरंतर मला एक खेळही सुचवायचा होता.. आपल्या नावाचे अहोमीयात रुपांतर करुन बघा.. मजा येईल..

प्रियाली's picture

14 Sep 2010 - 5:53 pm | प्रियाली

आसाम आणि तेथील संस्कृती/ भाषा यावर अधिक लिहा. फोटू वगैरेही टाका.

अवलिया's picture

14 Sep 2010 - 6:29 pm | अवलिया

असेच म्हणतो

धमाल मुलगा's picture

14 Sep 2010 - 6:28 pm | धमाल मुलगा

वा!
उपेक्षित राज्यांपैकी एका राज्याबद्दलची काहीतरी माहिती यायला सुरु झाली ह्याचा आनंद वाटला. धन्यवाद चिगो.

लेख आवडला. आणखी माहितीच्या प्रतिक्षेत. :)

>>"क्ष" चा उच्चार "ख्खो" असा होतो
बौध्द भिख्खु ह्या उच्चाराचा उगम अहोमिया किंवा त्याशी नातं सांगणार्‍या भाषेतुन असावा काय असा प्रश्न पडला.

आनंदयात्री's picture

15 Sep 2010 - 11:28 am | आनंदयात्री

हेच म्हणतो. अजुन वाचायला उत्सुक आहे !

प्रशांतकवळे's picture

14 Sep 2010 - 6:48 pm | प्रशांतकवळे

आसाम.. सुंदर राज्य

मी जवळपास १३ महीने राहलोय, धुलियाजन, शिवसागर आणी जोहराहट मध्ये. धुलियाजनला १० महीने होतो.

आसाम मध्ये जमीन फार सुपीक आहे, पावसाळ्यात भात पेरतात आणी तीन - चार महीन्यांनी कापायला येतात; मध्ये काहीही मेहनत नाही तरी भरपुर पीक येते.

इथल्या लोकांबद्दल काय लिहायचे, माणुसकी असलेली लोकं आहेत इथे; नेहमीच मदतीला तयार असतात! हसतमुखाने!!

काझिरंगामध्ये घालवलेले दोन दिवस, गॅलरीतून दिसणारा चहाचा मळा, सकाळी त्यावर पसरलेली धुक्याची शाल, रस्त्याच्या दुतर्फा असलेली हिरवीगार शेती, बांबूच्या कोवळ्या कोंबांचे लोणचे, ब्रंहपुत्रा नदी (हिला नदी म्हणावी की सागर; खुप मोठे पात्र आहे हिचे), माजोली बेटं, काझिरंगा मधले ६ सिटर, ८ सिटर हत्ती (हत्तीची माणसं वाहून नेण्याची क्षमता), शीतल मासा (वाफवलेला-केळीच्या पानात), खुप काही अनुभवलेय... खुप बाकी पण आहे.

धमाल मुलगा's picture

14 Sep 2010 - 6:51 pm | धमाल मुलगा

आणि ह्या सोनेरी चित्राला काजळाचं गालबोट म्हणुन उल्फा, बोडो... :(

चिगोराव तुम्ही दिलेली माहिती आवडली... :)

माहितीबद्दल धन्यवाद. फोटो खरच हवे होते...

चिगो's picture

14 Sep 2010 - 7:24 pm | चिगो

छान प्रतिक्रीया दिलीत.. सुंदर लिहीलयं. @ धमु, ह्या सोनेरी चित्राला लागलेलं गालबोट हे "बाहेरच्यांना फायदा होतोय आपला" ह्या भावनेतुन लागलयं. "मनसे"वादी जोडे हाणतील, पण "आमच्या जिवावर जगताहेत" चा हिंसक परिपाक शेवटी हाच असतो. (उल्फा, बोडो वगैरे)... ह्या विषयावर नंतर लिहीन. थँक्स...

धमाल मुलगा's picture

14 Sep 2010 - 7:46 pm | धमाल मुलगा

आपल्याशी सहमत.
नक्कीच ह्या विषयावर आणखी जाणुन घ्यायला आवडेल.
माझ्या माहितीतला एक एक्स-उल्फा म्हणायचा, 'Where is your government ? Are we not part of India? Why we are always neglected?"
त्याचे हे विचार होते ते शरणागतीनंतरचे....सक्रिय असताना काय असेल कोण जाणे.

शक्य झाल्यास ह्या बाजुवरही नक्की लिहा.

प्रशांतकवळे's picture

15 Sep 2010 - 11:09 am | प्रशांतकवळे

मला मिळालेली थोडीफार माहीती... एका आसामी सहकार्‍याकडुन

इंग्रजांनी आसाम मध्ये बंगाली लोकाना जास्त शक्ती (पॉवर) दिली होती. असे म्हणतात की सरकारी कार्यालयात बंगाली लोक मोठ्या पदावर होते.

स्वातंत्र्य मिळाल्यावर ह्यात बदल अपेक्षीत होता, पण झाला नाही. आसामी तरुण शिकुन पण बेरोजगार राहू लागले कारण बंगाल मधुनच नवीन भरती होऊ लागली होती.

माझ्या माहीतीप्रमाणे उल्फाची सुरूवात सुशिक्षीत बेरोजगार आसामी तरुणांनी केली. ध्येय्य होते स्थानिकांना नोकरी मिळवून देणे. पण नंतर राजकारण घुसले आणी आता आपण पहात आहोत काय चालु आहे....

llपुण्याचे पेशवेll's picture

15 Sep 2010 - 1:38 pm | llपुण्याचे पेशवेll

बिहारी मजूरांना आसामातच ठार मारले होते ना? काहीतरी २०-२२ लोकांना मारले होते.

छान नवीन माहीती. आतापर्यंत फक्त आसामात चहाचे मळे विपुल आहेत हे ऐकून होते. बरीच नवी माहीती कळली.
शुचि = खुसि की काय आसामी भाषेत?

गणेशा's picture

14 Sep 2010 - 9:04 pm | गणेशा

>> च" चा उच्चार "सो" असा होतो. "स" श" चा उच्चार "हो" "ख्हो" असा,

म्हणुन कदाचीत
शुची = ख्होसो
असे म्हणत असतील बहुतेक

उगाच आपला प्रयत्न केला आहे.

चिगो's picture

14 Sep 2010 - 11:00 pm | चिगो

@धमु, नक्की लिहीन ह्या विषयावर, पण त्याआधी मला थोडा सवीस्तर विचार आणि अभ्यास करावा लागेल.. @शुचि, तुमच्या नावाचा उच्चार "हुसि" किंवा "ख्हुसि" असा होईल. (मात्रा असलेल्या अक्षरांचा, तसेच शेवटच्या अक्षराचा उच्चार "ओ"कारांत नसतो.)

पुष्करिणी's picture

14 Sep 2010 - 11:02 pm | पुष्करिणी

लेख आवडला. अजून सविस्तर वाचायला आवडेल, फोटो हवेतच

संदीप चित्रे's picture

15 Sep 2010 - 12:56 am | संदीप चित्रे

माहिती आहेत का?
मला वाटतं हे नाव बरोबर आहे.
'लोकप्रभा'च्या अंकांमधे त्यांची आसामवरची लेखमाला वाचली होती.
ते गेली तीसेक वर्षे महराष्ट्रातून आसाममधे काही ना काही कारणाने जातायत.
लोकप्रभाच्या गेल्या वर्षातल्या वगैरे वेब एडिशन्स शोधल्यात तर त्यांचे लेख मिळतील.
---------
तुम्हीही आसामबद्दल जितकं लिहाल आणि फोटू द्याल ते वाचायला / बघायला आवडेलच.

पाषाणभेद's picture

15 Sep 2010 - 2:26 am | पाषाणभेद

छान माहिती दिलीत बरं का!

मेघवेडा's picture

15 Sep 2010 - 3:02 am | मेघवेडा

छान. खरंच अजून लिहा चिगोराव. आणि फोटो दाखवलात तर उत्तमच! :)

१३व्या शतकात येथे "अहोम" राजवटीची स्थापना झाली. "लासित बोरफुकान" हा येथील प्रसिद्ध ऐतिहासिक वीरपुरुष ! त्याने गोलाघाट येथे ब्रम्हपुत्रेच्या पात्रात युद्ध लढुन मुघलांचा पराभव केला.

भले शाबास :)

आसाम व इतर ६ राज्ये:
इतर प्रश्नांसारखीच सरकारची या बाबतीतली आजतागायत असलेली अनास्था संतापजनक आहे पण आता सुधारून काही उपयोग नाही. थोड्याच वर्षांचे सोबती :(

नंदू's picture

15 Sep 2010 - 4:36 am | नंदू

छोटा पण सुंदर लेख.

मी काही दिवसांपूर्वी एका आसामच्या मुलीला भेटलो होतो. प्रचंड दहशत आहे. लोक घरे, दुकानांवर वगैरे भारताचा झेंडाही लावायलाही घाबरतात.

चिगो's picture

15 Sep 2010 - 11:48 am | चिगो

नका इतकं टेंशन घेऊ.. इतकी वाईट परीस्थिती नाहीये. अ‍ॅक्चुअली, आसाम आणि एकूनच पुर्वोत्तर राज्यांविषयी गैरसमज भरपूर आहेत. Perceptions are stronger than reality.. आणखी थोडी माहिती साठली की लिहीतो पुढे..

परिकथेतील राजकुमार's picture

15 Sep 2010 - 1:31 pm | परिकथेतील राजकुमार

इतकी वाईट परीस्थिती नाहीये. अ‍ॅक्चुअली, आसाम आणि एकूनच पुर्वोत्तर राज्यांविषयी गैरसमज भरपूर आहेत.

ह्यासाठीच तुम्ही ह्या विषयावर थोडे सविस्तर लिहा. ह्या लेखातली माहिती आवडली. फोटु तर हवेतच.
प्रशांत ह्यांचे प्रतिसाद देखील आवडले.