उल्कावर्षाव!

असुर's picture
असुर in जनातलं, मनातलं
20 Aug 2010 - 12:33 am

लहानपणी आपण सगळेच आकाशातली एक 'स्पेशल' गोष्ट पाहून खूप खूष व्हायचो आणि लगेच डोळे बंद करून काहीतरी 'स्पेशल' मागायचो! आठवतंय का काय होती ती स्पेशल घटना? करेक्ट! आपण त्याला म्हणायचो 'तारा तुटला'. तुटणारा तारा ही इतकी विशेष घटना असायची की ते पाहिल्यावर काहीतरी बाप्पाकडे 'विशेष' मागायचं, आणि ते कधी खरं होईल याची वाट पाहत बसायचं. अर्थात असं काही व्हायच्या आधीच अजून एखादा तुटणारा तारा दिसायचा आणि अजून काहीतरी मागणं व्हायचं.

असंच नाचत बागडत मोठे झालो, जरा थोडीफार अक्कल आली आणि यातला मजेचा भाग मागे पडून काही मस्त गोष्टी समजल्या. त्यातली पहिली भ्रमनिरास करणारी गोष्ट म्हणजे तारा कधीही तुटत नाही. तो बिचारा त्याचा त्याचा आयुष्य कंठत कंठत म्हातारा होतो, आणि 'ड्वार्फ', 'सुपरनोव्हा' वगैरे बनून गप पडून राहतो. तुटाबिटायच्या भानगडीत तो काही पडत नाही. मग सहाजिकच प्रश्न पडतो की जर तारे 'तुटत' नाहीत तर मग ती तुटणारी आणि आकाशात जळत जाणारी वस्तू काय असू शकेल? आणि याचं उत्तर एका शब्दात द्यायचं झालं तर ते आहे, 'उल्का'! पण 'उल्का' म्हणजे काय? या प्रश्नाचं उत्तर मात्र आपल्या काही एकोळी धाग्यांप्रमाणे एका वाक्यात नाही देता येत. म्हणून 'उल्का म्हणजे काय' हे सांगायचा हा एक प्रयत्न.

उल्का म्हणजे अवकाशातील धूळ आणि दगड आणि अनेक छोट्या अ-ग्रहीय वस्तू (uncertain non-planetary celestial objects). अवकाशातील या वस्तू काही कारणाने पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावात येऊन पृथ्वीकडे खेचल्या जातात. पृथ्वीकडे खेचले जाताना यांचा वेग प्रचंड वाढतो. त्यातच पृथ्वीभोवती असणाऱ्या वातावरणाच्या थरामुळे या वस्तूंचे प्रचंड घर्षण होऊन त्या पेटतात. आणि याच जळणाऱ्या उल्का आपण आकाशात पाहतो. या उल्का दिसतात सुद्धा खूप छान! काही नुसत्याच जळत जातात, काही रंगीबेरंगी दिसतात, काहींचा तर चक्क धूर सुद्धा दिसतो. अर्थात अश्या विविधतेसाठी वेगवेगळ्या आकाराच्या, वस्तुमानाच्या उल्का हव्यात आणि कमीतकमी प्रकाशमात्रा असलेली मोकळी जागा हवी. घराच्या गच्चीवरून उल्का दिसल्या तरी बहार आहे.

आता अजून एक प्रश्न उभा राहतो की या वस्तू आकाशात येतात कुठून? उल्का बनवण्याचा सगळ्यात मोठा कारखाना म्हणजे धूमकेतू. गेल्या वेळी आपण येथे वाचलंच असेल की सूर्याजवळून जाताना कुठल्याही धूमकेतूला एक धूळ, दगड, वायू, बर्फ यांचे मिश्रण असणारी एक शेपटी फुटते. या शेपटीमधील द्रव्य धूमकेतू आपल्याबरोबर परत घेऊन जात नाही. हे द्रव्य धूमकेतूच्या कक्षेत तसेच पडून राहते. आणि धूमकेतू पृथ्वीची कक्षा छेदत जाऊन सूर्याभोवती स्वत:ची प्रदक्षिणा पूर्ण करीत असतो. या सगळ्या गोष्टी एकत्रितपणे पाहिल्यास आपणास एक गोष्ट लक्षात येईल की अश्या एखाद्या धूमकेतूने मागे सोडलेला हा 'कचरा' त्याच्या कक्षेत पडून राहिलाय. पृथ्वी आपल्या नेहेमीच्या कक्षेत फिरत फिरत त्या ठिकाणी आली, की हा कचरा गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीकडे ओढला जातो. या कचऱ्यातल्या धुळीचा प्रत्येक कण हा वातावरणामुळे घर्षण होऊन पेटतो आणि आपल्याला झकासपैकी उल्का दिसते.

धूमकेतूची कक्षा ही साधारणपणे पृथ्वीच्या कक्षेशी काही अंशांचा कोन करून असते. या कोनामुळे धूमकेतू पृथ्वीच्या कक्षेवर आपल्या कचऱ्यासाठी ठराविक जागा बळकावून ठेवतो. यामुळे होते काय, की जेव्हा जेव्हा पृथ्वी या धूमकेतूने कचरा केलेल्या भागात येते, तेव्हा आपल्याला आकाशात अचानक एकाच वेळी अनेक उल्का दिसतात. हाच 'उल्कावर्षाव'! हा कोन जितका काटकोनाकडे, तितका हा उल्कावर्षाव जास्त नेमका असतो. म्हणजे जर धूमकेतूचा कचरा जर मोठ्या प्रमाणात विखुरलेला असेल, तर सहाजिक आहे की हा कचरा अतिशय विरळ असणार आणि एका वेळी होणारा उल्कावर्षाव हा तितकाच कमी! पण हाच कचरा जर थोड्या जागेत पसरला असेल तर कचऱ्याची घनता जास्त असेल आणि आपल्याला एकाच वेळी अनेक उल्का दिसू शकतात.

वेगवेगळ्या धूमकेतूंनी पृथ्वीच्या कक्षेत अनेक ठिकाणी असे 'स्पॉट' बनवून ठेवले आहेत, त्यामुळे आपणास एका वर्षात अनेक वेळा उल्कावर्षाव पाहता येतो. पृथ्वीसापेक्ष अवकाशातून हा उल्कावर्षाव ज्या तारकासमुहातून होतो असे दिसते त्या तारकासमुहाचे नाव त्या उल्कावार्षावास दिले जाते. उदाहरणार्थ, दर १० नोव्हेम्बर ते २२ नोव्हेंबर दरम्यान होणारा उल्कावर्षाव हा टेम्पल-टटल या धूमकेतूमुळे होतो. परंतु पृथ्वीसापेक्ष हा उल्कावर्षाव सिंह राशीतून होतो असे वाटते, त्यामुळे हा उल्कावर्षाव सिंह राशीचा उल्कावर्षाव (Leonids meteor shower) म्हणून प्रसिद्ध आहे. दर वर्षी अशा उल्कावार्षावांची अनेक तांत्रिक निरीक्षणे घेतली जातात आणि त्यावरून त्यांचे विश्लेषण केले जाते ज्यायोगे धूमकेतू आणि त्यांचे उल्कावर्षाव यांच्यासंबंधी अधिक बारकाईने संशोधन होऊ शकेल.

ज्याप्रमाणे धूमकेतूंमुळे उल्कावर्षाव शक्य आहे, त्याप्रमाणे अजून एका कारणामुळे उल्का दिसू शकतात. हे कारण म्हणजे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या संपर्कात येणाऱ्या अनेक अ-ग्रहीय वस्तू. यात अनेक उनाड दगड, धोंडे, लघुग्रहांच्या पट्ट्यातून सुटून आलेले छोटेमोठे लघुग्रह असतात. या असल्या उनाड वस्तू प्रेक्षणीय उल्का बनू शकतात. धूमकेतूच्या शेपटीमधली धूळ, दगड हे आकाराने काही विशेष मोठे नसतात. त्यातच पृथ्वीच्या वातावरणात सुमारे १००किमी वरून जळत येताना या उल्का वातावरणातच संपून जातात. पण काही उल्का वातावरणाचा थर पार करून पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचतात. आणि विलक्षण वेगाने पृथ्वीवर आदळून एक मस्तपैकी मोठ्ठा खड्डा बनवतात ज्याला आपण 'क्रेटर' म्हणतो. (मराठीत याला 'विवर' असे म्हणू शकतो पण 'क्रेटर' शब्द एक सहीसही इफेक्ट आणतो, म्हणून क्रेटर!) असे क्रेटर बनवून घन स्थितीत शिल्लक राहिलेल्या उल्केला आपण 'अशनी' म्हणतो. पृथ्वीवर असे अनेक क्रेटर आपणास पहावयास मिळतील. त्यापैकी 'बॅरिंजर' हे सर्वात मोठे क्रेटर आपल्या हिरव्या नोटांच्या देशात, अ‍ॅरिझोना राज्यात आहे. भारतातसुद्धा एक क्रेटर आहे, तेही आपल्या महाराष्ट्रात. बुलढाणा जिल्ह्यात 'लोणार' येथे हे क्रेटर आहे. तसेच सायबेरियाच्या जंगलात १९०८ साली उल्का पडून एक मोठे क्रेटर तयार झाले आहे.

पृथ्वीला अशा मोठ्या उल्कांचा धोका जरूर आहे. त्यासाठी अवकाश-संशोधकांचे वेगवेगळे गट अशा छोट्या आकाराच्या अ-ग्रहीय वस्तूंचे सतत निरीक्षण आणि संशोधन करून या धोक्याची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न करीत असतात. याच 'थीम'वर आधारित 'अर्मॅगडॉन' नावाचा एक इंग्रजी चित्रपट देखील आला होता. 'ब्रूस विलीस' नावाच्या अशनीसारख्या दिसणार्‍या एका टोण्याने त्यात काम केलंय.

पण, आपण धोके वगैरे सध्या बाजूला ठेवूयात, आणि ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या 'ओरीनीड्स' (मृग नक्षत्रातून होणारा उल्कावर्षाव) आणि नोव्हेंबर महिन्यातला 'लिओनीड्स' (सिंह राशीतून होणारा उल्कावर्षाव) यांचा 'लुत्फ' लुटूयात!

विज्ञानमाहिती

प्रतिक्रिया

श्रावण मोडक's picture

20 Aug 2010 - 12:46 am | श्रावण मोडक

छान.
उल्कापातामुळे मानवी वस्तीत हानी झाल्याचा दाखला आहे का? काय घडले होते, कसे घडले होते?

शिल्पा ब's picture

20 Aug 2010 - 10:19 am | शिल्पा ब

प्र.का.टा.आ.

अनुराग's picture

20 Aug 2010 - 12:18 pm | अनुराग

उल्कापातामुळे हानि झाल्याचे माहित नाहि पण बुलडाणा जिल्ह्यात लोणार येथे सरोवर तयार झाले आहे.

उल्का मनुष्यवस्तीजवळ किंवा वस्तीत पडून वित्तहानी झाल्याचे किंवा तुरळक वेळी लोक जखमी झाल्याचे माहिती आहे. परंतु जीवितहानीचे फारसे वाचल्याचे आठवत नाही. नाही म्हणायला, १५व्या शतकात चीन मध्ये उल्का पडून हजारो लोक मेले असल्याचा उल्लेख वाचला आहे. हेच शोधताना जालावर ही लिंक मिळाली. इच्छुकांनी माहितीचा लाभ घ्यावा.

मृत्युन्जय's picture

20 Aug 2010 - 12:48 am | मृत्युन्जय

झक्कास. असले काहीतरी व वाचायला खुप आवडते. दुर्दैवाने आमचे डोके या गोष्टींमध्ये चालत नाही. तु खुपच सोप्पे करुन सांगितलेस. खुपच छान. सध्या चालु असलेल्या काही बकवास कचरा धाग्यांमघ्ये तर हा झक्कास धागा नक्कीच एकदम उठुन दिसेल . अभिनंदन.

राजेश घासकडवी's picture

20 Aug 2010 - 1:15 am | राजेश घासकडवी

फोटो असते तर आणखीन बहार आली असती.

पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत. लिहिलात तर या विषयांवर अधिक वाचायला आवडेल
- साधारण किती लहान उल्का जळून जातात? आपल्याला चेंडूएवढी अशनी मिळाली तर मुळात ती किती मोठी उल्का होती याबाबत काही अंदाज आहे का?
- चंद्रावरचे खड्डे हे असेच उल्कांमुळे झालेले 'धडक-खड्डे' आहेत का?
- तसं असलं तर पृथ्वीवर ते तितके का दिसत नाहीत?
- उल्कांनी प्रचंड प्रमाणावर जीवितहानी होते, तसे आत्तापर्यंतचे महत्त्वाचे उल्कापात कोणते?
- आर्मागेडन सारख्या धोक्याची तीव्रता कमी करण्यासाठी सध्या काही उपाययोजना आहेत का? तसे योजण्याची गरज आहे का?
- उल्कांमुळे जीवनाच्या उगमाविषयी काही सांगता येतं का? पृथ्वीवरच्या जीवनाची सुरूवात उल्कांनी आणलेल्या रेणूंमुळे झाली असं वाचल्याचं आठवतं. ते कितपत खरं असेल?
- ऑक्टोबर महिन्यात नक्की कधी दर्शन होऊ शकतं?
- उल्का वर्षाव काटकोनामुळे अधिक नेमका का होतो?

वारंवार मराठीत वापरात येणारे इंग्रजी शब्द अवतरणात का टाकले आहेत कळलं नाही. एकंदरीतच अवतरणं कमी झाली तर बरं होईल असं वाटतं.

अर्थात अश्या विविधतेसाठी वेगवेगळ्या आकाराच्या, वस्तुमानाच्या उल्का हव्यात आणि कमीतकमी प्रकाशमात्रा असलेली मोकळी जागा हवी.

कमीतकमी प्रकाशमात्रा म्हणजे भरपूर अंधार का? (ह. घे.)

llपुण्याचे पेशवेll's picture

20 Aug 2010 - 11:25 am | llपुण्याचे पेशवेll

- तसं असलं तर पृथ्वीवर ते तितके का दिसत नाहीत?
मध्यंतरी डिस्कवरीवर एक कार्यक्रम पाहत होतो. त्यातल्या शास्त्रज्ञाचा असा दावा होता की 'अशा अनेक उल्का पृथ्विवर पण येऊन आदळल्या होत्या आणि त्यामुळे पडलेली विवरे युरोपात खूप मोठ्या प्रमाणात आहेत. त्या साठी त्याने जर्मनीतल्या एका शहराचे अंतराळातून पण फार दूर न जाता केलेले चित्रीकरण मिळवून अभ्यास केला होता. त्यात अनेक अशा उल्का आदळल्यामुळे पडलेली पण आता बुजत आल्यासारखी विवरे दिसत होती. मग त्या भागाचे जमिनीवरुन केलेले चित्रीकरण दाखवले तर ते शहर छान पैकी पुण्यासारखे सर्व बाजूंनी डोंगर असल्याने तयार झालेल्या बशीसारख्या आकारात वसलेले होते. पृथ्वीवरील आंतरखंडीय हालचांलींमुळे अशी विवरे बुजली किंवा उथळ झाली असावीत. अशा प्रकारची अनेक विवरे समुद्रतळाशी देखील आहेत. त्याचाही पुरावा म्हणून वापर केला होता त्या कार्यक्रमात.

उल्का वर्षाव काटकोनामुळे अधिक नेमका का होतो?

मला वाटतं धूमकेतूची कक्षा प्रुथ्वीच्या कक्षेशी छेद करताना काटकोन करेल तर उल्का वर्षाव अधिक नेमका दिसेल. पण जर धूमकेतूची कक्षाच जर प्रुथ्वीच्या कक्षेच्या प्रतलाशी काटकोन करेल तर आप्ल्याला त्याच्या कचर्‍यापासून निर्माण होणारा उल्का पात दिसणारच नाही.

जाणकार तज्ञ यावर अधिक सांगू शकतील ...

माझ्या अल्पमतीप्रमाणे उत्तरे द्यायचा प्रयत्न केला आहे.

>>>- साधारण किती लहान उल्का जळून जातात? आपल्याला चेंडूएवढी अशनी मिळाली तर मुळात ती किती मोठी उल्का होती याबाबत काही अंदाज आहे का?<<<
० ते १०मी. व्यासाच्या उल्का तर जळूनच जातात.
१० ते ३५मी. व्यासाच्या उल्का पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचू शकतात. पण हे बऱ्याच गोष्टीवर अवलंबून आहे.
१. त्यांचा वेग
२. त्यांची बांधणी- बांधणी जेवढी सुटी (किंवा ढिसाळ), तेवढे लवकर तुकडे होऊन उल्का लवकर जळते.
३. पृथ्वीच्या वातावरणाशी असलेला त्यांच्या चक्राकार (spiral) गतीचा कोन - वातावरणात प्रवेश करतेवेळी उल्केचा कोन जितका काटकोनाकडे तेवढी उल्का कमीतकमी वेळात पृष्ठभागापर्यंत पोहोचू शकते.
त्यापेक्षा मोठ्या उल्का फार कमी आहेत. त्यामुळे धोका असला तरी तो कमीच आहे.

>>>- चंद्रावरचे खड्डे हे असेच उल्कांमुळे झालेले 'धडक-खड्डे' आहेत का?<<<
होय. चंद्रावर वातावरणाचा अतिशय विरळ असा थर आहे (अगदीच नावाला आहे). त्यामुळे बहुतेक उल्का ह्या विशेष न जळता चंद्रापर्यंत पोहोचतात आणि झकासपैकी धडक-खड्डे (इंपक्ट क्रेटर) तयार करतात.

>>>- तसं असलं तर पृथ्वीवर ते तितके का दिसत नाहीत?<<<
वातावरणाच्या प्रचंड दाट थरामुळे बहुतांश छोट्या उल्का जळून जातात. आणि पृथ्वीच्या पृष्टभागाच्या ७१% भाग असलेल्या समुद्रात पडणार्‍या उल्कांचे खड्डे दिसत नाहीत.

>>>- उल्कांनी प्रचंड प्रमाणावर जीवितहानी होते, तसे आत्तापर्यंतचे महत्त्वाचे उल्कापात कोणते?<<<
अशी प्रचंड प्रमाणात जीवितहानी झाल्याचे मला तरी माहिती नाही. अपवाद एका उदाहरणाचा आहे, ते उदाहरण आणि लिंक वर श्रामोंच्या प्रतिसादात दिली आहे.

>>>- आर्मागेडन सारख्या धोक्याची तीव्रता कमी करण्यासाठी सध्या काही उपाययोजना आहेत का? तसे योजण्याची गरज आहे का?<<<
'नासा' या प्रकारच्या उपाययोजना राबवण्यात अग्रगण्य आहे. सध्या शोधा, लक्ष ठेवा आणि धोक्याची तीव्रता मापून ठेवा या धर्तीवर काम चालू आहे. तसेच अतिधोकादायक उल्का/अ-ग्रहीय वस्तू नष्ट करण्यासाठी किंवा त्यांना पृथ्वीपासून दूर ढकलण्यासाठी अनेक उपाय आहेत. आण्विक अस्त्रांचा वापर करून उल्का नष्ट करणे, रॉकेट सोडून उल्केची दिशा बदलणे, उल्केचे छोटे तुकडे करून ते वातावरणातच जाळून जातील अशा प्रकारची अस्त्रे वापरणे आणि अजून काय काय. पण सध्या तरी अशा प्रकारची कोणतीही चिंता करण्याचे कारण नाहीये. आणि अर्मागडॉन मधले उपाय शक्य असले तरी अगदीच जे दाखवलंय ते तद्दन फिल्मी आहे.

>>>- उल्कांमुळे जीवनाच्या उगमाविषयी काही सांगता येतं का? पृथ्वीवरच्या जीवनाची सुरूवात उल्कांनी आणलेल्या रेणूंमुळे झाली असं वाचल्याचं आठवतं. ते कितपत खरं असेल?<<<
जीवनाच्या उगमाविषयी अनेक मतप्रवाह आहेत. पण मला त्यातले काहीच कळत नाही. माणसामुळे माणूस जन्माला येतो (आणि कर्तृत्वाने सुजाण अथवा गाढव होतो) इतपतच माहिती आहे.

>>>- ऑक्टोबर महिन्यात नक्की कधी दर्शन होऊ शकतं?<<<
१७ ते २५ ऑक्टोबर महिन्यात ओरीनीड्स उल्कापात दिसू शकेल. १० ते २२ नोव्हेंबर ह्या दरम्यान लेओनीड्स उल्कापात दिसू शकेल. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात भारतात आकाश बहुधा स्वच्छ असते, त्यामुळे उल्का दिसण्यास त्रास होणार नाही अशी अपेक्षा आहे.

>>>- उल्का वर्षाव काटकोनामुळे अधिक नेमका का होतो? <<<
धूमकेतू त्याच्या कक्षेतून जाताना कचरा सोडत जातो. हा कचरा पृथ्वीच्या कक्षेवर जिथे सांडेल त्या ठिकाणी पृथ्वी आली कि आपल्याला उल्कापात दिसतो. धूमकेतूची कक्षा तितकी काटकोनात तितका हा कचरा जास्त एके ठिकाणी पसरेल अन्यथा विखरून जाईल. हा कचरा जितका जास्त विखुरलेला असेल तितक्या जास्त दिवस उल्का पडत राहणार.
आता समजा धूमकेतू १०० दगड मागे सोडून गेला आहे. हे १०० दगड जर कमी परिसरात पसरले तर आपल्याला एका रात्रीत १०० उल्का दिसू शकतील. हाच कचरा विखुरला तर कदाचित ५-६ रात्री मिळून १०० उल्का दिसतील.
या तत्वानुसार, धूमकेतूची कक्षा जितकी काटकोनात तितका उल्कापात नेमका असे समजले जाते.

माझे मत: गुर्जी, आपले प्रश्न फार आवडले. मजा आली.

अवांतर : अवतरन चिन्हे कमि करन्यचि कल्जि पुधच्य वेलि घेइन. य वेलि सोरि. फर जस्त झलियेत असे वतत असेल तर प्लिज अवतरन चिन्हे गलुन वाचावे.
-- असुर जप्कर

अतिअवांतर : इतका मोठा प्रतिसाद पाडल्याबद्दल डान्राव, माफी द्या येक डाव.
-- गन्या ढिश्क्यांव

राजेश घासकडवी's picture

21 Aug 2010 - 5:05 am | राजेश घासकडवी

खरं तर ती प्रश्नांमध्ये दडलेली अजून एक लेख लिहिण्याची विनंती होती. :) हा लेख उल्का म्हणजे काय, याची उत्तम ओळख देणारा झाला, पण खऱ्या गमतीदार गोष्टी अजून यायच्या आहेत... तेव्हा लवकर येऊद्यात. तुम्ही सोप्या भाषेत चांगलं लिहिता.

घाटावरचे भट's picture

20 Aug 2010 - 2:29 am | घाटावरचे भट

'ब्रूस विलीस' नावाच्या अशनीसारख्या दिसणार्‍या एका टोण्याने त्यात काम केलंय.

:D

बाकी लेख छानच.

अनिल हटेला's picture

20 Aug 2010 - 3:12 am | अनिल हटेला

लेख आवडेश !!

:)

बहुगुणी's picture

20 Aug 2010 - 6:33 am | बहुगुणी

'गेल्या वेळी आपण येथे वाचलंच असेल की ..' हे वाचल्यावर आपला याआधीचा एक असाच लेख वाचायचा राहून गेलाय हे माझ्या लक्षात आलं, म्हणून असुर यांचं लिखाण शोधलं आणि हा धुमकेतूवरील लेख सापडला (माझ्यासारख्या आणखी कुणाचा चुकला असेल तर सोय म्हणून दुवा देतो आहे. पण असुर राव, मालिकेतील या पुढील लेखांमध्ये आधीच्या लेखांचे दुवे दिलेत तर सोय होईल.)

दोन्ही माहितीपूर्ण लेख आवडले, धुमकेतूंवरील लेखाप्रमाणेच या लेखातही चित्रे/छायाचित्रे टाकता आली तर पहा.

वर श्रावण मोडकांनी विचारलं आहे की उल्कावर्षावाने मानवी हानी झाल्याची काही उदाहरणं आहेत का?

६५ दशलक्ष वर्षांपूर्वी मेक्सिकोतील युकाटान प्रांतात झालेल्या उल्कापाताने (K-T Event) वनस्पतींचा समूळ नायनाट झाल्याने डायनॉसॉर्स ची अखेर झाल्याची (वादग्रस्त) माहिती वाचली होती, पण मनुष्यवस्तीत काही नुकसान झाल्याची उदाहरणं आहेत का ते माहीत नव्हतं. थोडा शोध घेतला तेंव्हा e-notes मध्ये हा लेख सापडला, हा किती authentic आहे ते अदिती आणि असुर यांच्यासारखे तज्ञच सांगू शकतील, पण तो उताराच इथे उद्धृत करतो:

Even though many thousands of meteorites fall to Earth each year it is rare for one to hit a human being. The chances of a human fatality resulting from the fall of a meteorite have been calculated as one death, somewhere in the world, every 52 years. Thankfully, no human deaths from falling meteorites have been reported this century. A woman in Sylacauga, Alabama, was injured, however, by a 8.6 lb (3.9 kg) meteorite that crashed through the roof of her house in 1954. Another close call occurred in August of 1991, when a small meteorite plunged to the ground just a few meters away from two boys in Noblesville, Indiana.

In contrast to the situation with human beings, meteorite damage to buildings is much more common—the larger an object is the more likely it will be hit by a meteorite. A farm building, for example, was struck by a meteorite fragment in St. Robert, Quebec in June of 1994. Likewise, in August 1992, a small village in Uganda was showered by at least 50 meteorite fragments. Two of the meteorites smashed through the roof of the local railway station, one meteorite pierced the roof of a cotton factory, and another fragment hit an oil storage facility. One of the more spectacular incidents of meteorite-sustained damage in recent times is that of the Peekskill meteorite which fell in October of 1992 and hit a parked car.

इथे २००७ च्या जून महिन्यात आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाचं उल्कापाताने नुकसान झाल्याचं मात्र उदाहरण तसं ताजं आहे, (या अ-घातक नुकसानानंतर आठवड्याभरातच भारतीय वंशाची सुनीता विल्यम्स या अवकाशस्थानकावर पोहोचली होती.)

आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाचं तसंच हबल अवकाश दुर्बीणीचं असंच नुकसान पुढील वर्षाच्या उत्तरार्धात होणार्‍या उल्कावर्षावात होण्याची शक्यता नासाने वर्तवली आहे. १९९३ साली पेरेसिड (Pereseid) या दरवर्षी होणार्‍या उल्कापातानंतर ऑलिंपस या satellite चा विद्युतपुरवठा बंद पडल्याने हा satellite बंद पडला होता असं वाचल्याचं आठवतं. त्याच पेरेसिड उल्कावर्षावापासून असं नुकसान बर्‍याच बड्या satellite कंपन्याना भोगावं लागेल अशी शक्यता परवाच्याच ऑगस्ट ११ आणि १२ तारखांना वर्तवली गेली होती असं या दुव्यावर वाचलं (तसं ते खरंच झालं का हे माहीत नाही.)

या मानवनिर्मीत उपकरणांचं नुकसान हेही पर्यायाने मानवाचंच नुकसान म्हणता येईल.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

20 Aug 2010 - 10:11 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

विनंतीला मान देऊन लिहील्याबद्दल असुर याचे आभार. अभ्यासपूर्ण आणि सूचनांचे प्रतिसाद लेखात एकत्र करून एक अधिक परिपूर्ण लेख असुर लवकरच पाठवतील अशी अपेक्षा! ;-)

असुरा, तुझी लेखणी एकदम सुटसुटीत चालते. चांगलं लिहीलं आहेस.
आणखी एक सूचना: सगळ्याच महिन्यांत होणार्‍या महत्त्वाच्या उल्कावर्षावाची यादी देता येईल का? शिवाय फक्त महिन्यांची यादी न देता, उल्कावर्षाव सर्वात जास्त कधी होईल त्याच्या तारखाही??

अदिती

असुर's picture

21 Aug 2010 - 12:37 am | असुर

>>>आणखी एक सूचना: सगळ्याच महिन्यांत होणार्‍या महत्त्वाच्या उल्कावर्षावाची यादी देता येईल का? शिवाय फक्त महिन्यांची यादी न देता, उल्कावर्षाव सर्वात जास्त कधी होईल त्याच्या तारखाही??<<<
यावर एक वेगळा लेख होऊ शकेल असे वाटते आहे. सविस्तर लिहिता येईल.

--असुर

लिही की मग !
सोपे आणि सुगम लिहितोस :)

शिल्पा ब's picture

20 Aug 2010 - 10:20 am | शिल्पा ब

लेख वाचनिय आहे...छान माहीती मिळाली.

आमोद शिंदे's picture

21 Aug 2010 - 4:59 am | आमोद शिंदे

लेख आणि प्रतिक्रिया दोन्ही वाचनीय.

मनि२७'s picture

20 Aug 2010 - 10:38 am | मनि२७

भारी आहे लेख ....म्हणजे वजनदार नाही तर झक्कास.... :-) !!!!!!!
मी पण बुलढाणा जिल्ह्याचीच आहे....आणि लोणार ला पण जाऊन आली आहे...
पाहण्यासारखा आहे खरच....एवढा विशाल खड्डा पडलाय कि क्षणभर विश्वासच होत नाही.....

परिकथेतील राजकुमार's picture

20 Aug 2010 - 12:43 pm | परिकथेतील राजकुमार

असुरराज हे लेखन देखील सहज-सोपे-छान :) एकदम आवडेश.

बाकी ह्या लेखात सुद्धा फोटूंचा कंजुसपणा का बरे ?

असुर's picture

21 Aug 2010 - 12:41 am | असुर

पराशेठ,
धूमकेतूंचे किंवा उल्कापाताचे फोटो मी कधीच काढले नाहीत. धूमकेतूंच्या वेळी मी असेच आंतरजालावरून उचलून दिले होते फोटो. पण दर वेळी अशी ढापाढापी करणे प्रशस्त वाटत नाही ओ.

--असुर

अशनी दिसण्यास कशी असते . एकाद्या अशनीचे चित्र मिळेल काय बघायला?

सैबेरियातल्या तुंगुस्का इथे १९०८ साली झालेली अशनीपाताची घटना प्रसिद्ध आहे, 'तुंगुस्का इवेंट' ह्या नावाने ती ओळखली जाते. त्याचा विकीवरील दुवा.

बाकी 'तुटलेला तारा' आकाशातून पडताना दिसतो फार सुंदर. ऑक्टोबर आणि नोवेंबरमधला उल्कावर्षाव आकाशाच्या कोणत्या भागातून दिसेल ह्याबद्दल जरा सविस्तर माहिती देशील का?

(दगडू)चतुरंग

>>>ऑक्टोबर आणि नोवेंबरमधला उल्कावर्षाव आकाशाच्या कोणत्या भागातून दिसेल ह्याबद्दल जरा सविस्तर माहिती देशील का?<<<
१७ ते २५ ऑक्टोबर महिन्यात ओरीनीड्स उल्कापात दिसू शकेल. भारतात असताना आकाशाच्या मध्यातून पूर्व-पश्चिम अशी एक काल्पनिक रेषा काढली तर या रेषेच्या जरा दक्षिणेला मृग नक्षत्र दिसते. अमेरिकेतून पाहीले तर हेच नक्षत्र अजून जास्त दक्षिणेला दिसेल. हे नक्षत्र आकाराने बरेच मोठे आणि समजायला सोपे आहे. व्याधाचा तारा, त्याने बाण मारलेले हरीण वगैरेची भारतीय गोष्ट माहितीच असेल. याच तारकासमूहाला ओरायन म्हणतात आणि यातून होणार्‍या उल्कापाताला ओरीनीड्स शॉवर! २२ तारीख ही साधारणपणे या उल्कापाताची मुख्य तारीख मानली जाते.

१० ते २२ नोव्हेंबर ह्या दरम्यान लेओनीड्स उल्कापात दिसू शकेल. हे म्हणजे सिंह रास. मृग नक्षत्राच्या जस्ट मागे (म्हणजे पूर्वेला) सिंह रास आहे. हा तारकासमूह (रास) समजायला थोडे कष्ट घ्यावे लगतील, पण एकदा लक्षात आलं की फार मजा वाटते. या राशीचा ठळक तारा म्हणजे मघा नक्षत्राचा तारा (regulus). हा तारा अतिशय तेजस्वी आणि काहीसा लालसर दिसतो. १७ तारीख ही साधारणपणे या उल्कापाताची मुख्य तारीख मानली जाते.

आपल्या निरीक्षणाच्या ठिकाणाप्रमाणे हे तारकासमूह थोडेफार वेगळे दिसतात. उदाहरणार्थ, भारतातून मृग नक्षत्र हे एखाद्या हरिणाच्या ४ पायांप्रमाणे दिसते. पण हेच मृग नक्षत्र इंग्लंड मध्ये एखाद्या माणसाच्या आकारात दिसते. याचे कारण म्हणजे आपण उत्तर गोलार्धात वेगवेगळ्या अक्षवृत्तांवरुन निरिक्षण करीत आहोत.

आपण अमेरिकेत असाल तर स्थानिक जाणकारांची किंवा नकाशांची मदत घ्या. तसेच शक्यतो अंधार्‍या आणि सुरक्षित जागी जाऊन पाहायचा प्रयत्न करा. जाताना स्लीपिंग बॅग न्यायला विसरू नका. जर आडवे होऊन पाहिलंत (आणि झोप लागली नाही) तर अधिक प्रमाणात आकाश दिसेल आणि जास्त उल्का दिसतील.
(आणि आपला हा अनुभव शेअर करायला विसरु नका.)

हॅपी उल्कावर्षाव!!!

तुंगस्काच्या लिंकबद्दल मन:पूर्वक धन्स.

--असुर

आपल्या निरीक्षणाच्या ठिकाणाप्रमाणे हे तारकासमूह थोडेफार वेगळे दिसतात. उदाहरणार्थ, भारतातून मृग नक्षत्र हे एखाद्या हरिणाच्या ४ पायांप्रमाणे दिसते. पण हेच मृग नक्षत्र इंग्लंड मध्ये एखाद्या माणसाच्या आकारात दिसते. याचे कारण म्हणजे आपण उत्तर गोलार्धात वेगवेगळ्या अक्षवृत्तांवरुन निरिक्षण करीत आहोत.

असहमत..!!

असुर तुम्ही ही माहिती पुन्हा तपासून बघा..

राजेश घासकडवी's picture

16 Sep 2010 - 6:34 pm | राजेश घासकडवी

तो परिच्छेद मी काळजीपूर्वक वाचला नव्हता. पण कित्येक प्रकाशवर्षं दूर असलेला तारकासमूह काही हजार किलोमीटर अंतरावरून बघितला तर वेगळा कसा काय दिसेल?

स्वाती दिनेश's picture

20 Aug 2010 - 3:59 pm | स्वाती दिनेश

उल्कावर्षावाची अगदी सहज सोप्या भाषेत लिहिलेली माहिती आवडली.
स्वाती

प्राजक्ता पवार's picture

20 Aug 2010 - 4:44 pm | प्राजक्ता पवार

एक अवघड विषय सहज सोप्या भाषेत छान लिहलाय. लेख आवडला. उल्कावर्षावाची तारीख दिल्यास आम्हालाही त्याचा आनंद घेता येईल.

ऋषिकेश's picture

20 Aug 2010 - 5:21 pm | ऋषिकेश

वा.. अतिशय सुटसुटीत व माहितीपूर्ण लेख!!
आवडला.
अदितीच्या सुचनेशी सहमत

बेसनलाडू's picture

21 Aug 2010 - 1:37 am | बेसनलाडू

(सहमत)बेसनलाडू

निखिल देशपांडे's picture

20 Aug 2010 - 6:19 pm | निखिल देशपांडे

माहितीपुर्ण लेखन आवडले...

ब्रिजेश दे.'s picture

20 Aug 2010 - 11:14 pm | ब्रिजेश दे.

फार छान लेख झाला आहे...
फोटो आले असते तर अजून मजा आली असती.

असुरा, लेख छान जमला आहे.
पुढे पुढे लिहिशील, तसं मागच्या लेखांच्या लिंका देत जा.

तारा कधीही तुटत नाही. तो बिचारा त्याचा त्याचा आयुष्य कंठत कंठत म्हातारा होतो, आणि 'ड्वार्फ', 'सुपरनोव्हा' वगैरे बनून गप पडून राहतो.

नीट आठवत नाही पण, काही वेळेला, शेवटी, जर त्याचे केंद्र आकुंचन पावत गेले तर कृष्णविवर तयार होते, ही माहिती बरोबर आहे का ? कृष्णविवरांबद्दल लेख किंवा लिंक्स आवडतील.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

16 Sep 2010 - 10:49 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

जर त्याचे केंद्र आकुंचन पावत गेले तर कृष्णविवर तयार होते, ही माहिती बरोबर आहे का ?

तारा मरायला येतो (केंद्रात ऊर्जा बनणं कमी कमी होत संपतं) तोपर्यंत बाहेरचे थर खूप प्रसरण पावले असतात आणि केंद्र आकुंचन पावत असतं. अशा स्थितीत तार्‍याच्या पृष्ठभागाचं तापमान बरंच कमी झालेलं असतं म्हणून रंग लाल होत जातो. या स्थितीचं वर्णन राक्षसी रक्तवर्णी असं करता येईल. सध्या आकाशात काक्षी (मृग), स्वाती, antares (वृश्चिक), eta karinae हे तारे असेच आहेत. सूर्याचा आकार मंगळाच्या कक्षेपर्यंत असेल आणि ग्रहमाला वाचली असेल तर त्यांच्याही कक्षा कदाचित मोठ्या झाल्या असतील आणि बुध-शुक्र-पृथ्वी सूर्याने गिळून टाकले असतील.

तार्‍याचं केंद्र आकुंचित होत जातं आणि जास्तीत जास्त लोखंडापर्यंत जड मूलद्रव्य बनून ऊर्जा निर्मिती थांबते. यापुढे अणूकेंद्र एकत्र येऊन ऊर्जा निर्मीती होऊ शकत नाही. गुरूत्वाकर्षण भारी पडतं आणि केंद्राचं आकुंचन सुरू होतं. आकुंचन थांबू शकतं ते electron degeneracy pressure मुळे.
एका अणूच्या दोन इलेक्ट्रॉन्सची ऊर्जा सारखी असू शकत नाही - हे तत्त्व पॉलीचे exclusion principle म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामुळे गुरूत्त्वाकर्षणाच्या दाबामुळे जेव्हा एका अणूतल्या दोन इलेक्ट्रॉन्सची ऊर्जा सारखीच होऊ पहाते त्याला इलेक्ट्रॉन विरोध करतात हेच ते degeneracy pressure! जर या degeneracy pressure ने गुरूत्वाकर्षणाला तोलून धरलं तर तार्‍याचा होतो श्वेतबटू / पांढरा खुजा / white dwarf! (सूर्याचं मरण असंच असेल.)

पण जर गुरूत्वाकर्षण degeneracy pressure ला भारी पडलं तर मग इलेक्ट्रॉन्स अणूच्या केंद्रकाशी धडकू लागतात आणि शेवटी इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन्स एकत्र येऊन न्यूट्रॉन्स तयार होतात. तार्‍याच्या केंद्राचं वस्तूमान सूर्याच्या एकूण वस्तूमानाच्या १.४ पटीपेक्षा जास्त असेल तरच अशा पद्धतीने न्यूट्रॉन्स तयार होऊ शकतात. हा आकडा शोधून काढला सुब्रमण्यम चंद्रशेखर यांनी! (याच संशोधनासाठी त्यांना नोबेल पुरस्कारही मिळाला.) पुन्हा एकदा न्यूट्रॉन degeneracy pressure गुरूत्वाकर्षणाला रोखून धरतं.
न्यूट्रॉन तार्‍यापैकीच काही पल्सार्सच्या स्वरूपात दिसतात.

यातही तार्‍याचं वस्तूमान जास्त असेल तर तार्‍याच्या आतल्या बाजूला होणार्‍या पडझडीमुळे केंद्रात स्फोट होतो ज्याला अतिनवतारा किंवा supernova म्हणतात. यातही स्फोटानंतर तार्‍याचं वस्तूमान सूर्याच्या एकूण वस्तूमानाच्या १.४ पटीपेक्षा कमी असेल तर तार्‍याचा श्वेतबटू होतो, जास्त असेल तर न्यूट्रॉन तारा.

आणि जर तार्‍याचं केंद्र आणखी जास्त जड असेल तर न्यूट्रॉन degeneracy pressure ही गुरूत्वाकर्षणाला रोखून धरू शकत नाही आणि मग तार्‍यांचं कृष्णविवर तयार होतं. न्यूट्रॉन तारा आणि कृष्णविवर होण्यासाठी तार्‍याचं वस्तूमान किती असायला हवं याचं नेमकं उत्तर आज माहित नाही. कारण कृष्णविवराच्या आत पदार्थाची स्थिती काय असते हे अजून आपल्याला माहित नाही.

आता माझी टैम्प्लिस! असुर पुढची गोष्ट सांगेल! ;-)

पैसा's picture

17 Sep 2010 - 9:16 am | पैसा

बरीच माहिती मिळाली. असूर आणि अदिती, टैमप्लीज रद्द करण्यात येत आहे!

एवढे सगळे टंकण्याबद्दल धन्यवाद!

काही शंका आहेत-

तार्‍याचं केंद्र आकुंचित होत जातं आणि जास्तीत जास्त लोखंडापर्यंत जड मूलद्रव्य बनून ऊर्जा निर्मिती थांबते

आपल्या सूर्यात हायडोजनचे अणू एकत्र येउन हेलियमचा अणू बनण्याची प्रक्रिया (fusion reaction) सुरु असते. मोठे अणू म्हणजे फार तर म्हणजे बेरिलियम, लिथियम पर्यंत. त्या तुलनेत लो़खंडाचा अणू खूपच मोठा आहे. अस का? (वेगवेगळ्या तार्‍यांमधे वेगवेगळ्या प्रक्रिया म्हणून का आपण त्याच्या नेहमीच्या आयुष्यातील गोष्टी न पाहता तो संपुष्टात येण्याचा कालावधी पाहतोय म्हणून? की इतर काही?

एका अणूच्या दोन इलेक्ट्रॉन्सची ऊर्जा सारखी असू शकत नाही
येथे उर्जा म्हणजे नक्की कुठली उर्जा अपे़क्षित आहे ?
१) त्यांच्यावरचा ऋण भार (negative charge) समान असतो.
आणि
२) अणूची रचना आपल्या सूर्यमालेप्रमाणे धरल्यास त्यांची गुरुत्त्वाकर्षणामुळे असलेली ( F=Gm1m2/r*r) स्थितीज उर्जा (potential energy) ही प्रत्येक इलेक्ट्रॉनची समान असणार:
इलेक्ट्रॉनचे वस्तुमान प्रोटॉन, न्यूट्रॉनच्या तुलनेत नगण्य असते आणि वरच्या सूत्रात घालायचेच असेल तर जे आहे ते प्रत्येक इलेक्ट्रॉनसाठी सारखेच असणार. बाकी G,m1 सारखेच. आणि r (त्रिज्या) ही त्या कक्षेतील सर्व इलेक्ट्रॉनसाठी समान.

आपल्या सूर्यात हायडोजनचे अणू एकत्र येउन हेलियमचा अणू बनण्याची प्रक्रिया (fusion reaction) सुरु असते. मोठे अणू म्हणजे फार तर म्हणजे बेरिलियम, लिथियम पर्यंत. त्या तुलनेत लो़खंडाचा अणू खूपच मोठा आहे.

अगदी बरोबर.

तार्‍याच्या जीवनक्रमातला जिवंतपणीचा बराचसा काळ तारा हायड्रोजनचं हेलियममधे रूपांतर करतो आणि त्यात जी वस्तूमानाची घट येते ती ऊर्जेत रूपांतरीत होते. (आईनस्टाईनचं समीकरण: E=m×c×c) जेव्हा केंद्रातला हायड्रोजन संपत येतो तेव्हा हेलियमचं लिथियम (अणूक्रमांक* ३), बेरियम (अणूक्रमांक ४) अशा पद्धतीने रूपांतर व्हायला सुरूवात होते. हलक्या किंवा अणूक्रमांक कमी असलेल्या अणूंची केंद्रकं एकत्र येऊन (nuclear fusion) जड अणूंची केंद्रकं तयार होतात. या प्रक्रियेत ऊर्जा बाहेर पडण्याची क्रिया (exothermic) फक्त लोखंडाचं केंद्र (अणूक्रमांक २६) बनेपर्यंतच होते. पुढची जड मूलद्रव्य (उदा: कोबॉल्ट, निकल, तांबं, सोनं, चांदी, युरेनियम, इ.) बनवण्यासाठी बाहेरून ऊर्जा द्यावी (endothermic) लागते. त्यामुळे तार्‍याच्या अंतर्भागात लोखंडाचा गाभा बनला की पुढची ऊर्जा अणूकेंद्रकं एकत्र येऊन मिळवता येत नाही.
सूर्याच्या बाबतीत, सूर्याचं वस्तूमान बरंच कमी असल्यामुळे केंद्रकात कार्बन (अणूक्रमांक ६) पर्यंतच जड मूलद्रव्य बनू शकतील. त्यापुढची मूलद्रव्य बनण्याच्या आधीच सूर्याचा "मृत्यु" होईल.

येथे उर्जा म्हणजे नक्की कुठली उर्जा अपे़क्षित आहे ?
१) त्यांच्यावरचा ऋण भार (negative charge) समान असतो.
२) अणूची रचना आपल्या सूर्यमालेप्रमाणे धरल्यास त्यांची गुरुत्त्वाकर्षणामुळे असलेली ( F=Gm1m2/r*r) स्थितीज उर्जा (potential energy) ही प्रत्येक इलेक्ट्रॉनची समान असणार:

एका अणूचा विचार करता ... (हायड्रोजनचा विचार करू कारण तो सगळ्यात साधा अणू आहे) ...

इलेक्ट्रॉन अणूकेंद्राभोवती फिरतो त्यामुळे त्यावर विविध बलं काम करत असतातः
पैकी सगळ्यात जे अशक्त बल, गुरूत्वाकर्षण त्याचा तुम्ही उल्लेख केला आहेच. पण गुरूत्वाकर्षण इतर दोन बलांपेक्षा एवढं कमी असतं की त्याचा विचार करण्यात फारसा अर्थ नाही. अणूकेंद्राचा धनभार आणि इलेक्ट्रॉनचा ऋणभार यांच्यातही आकर्षण असतं ते दुसरं बल झालं. यामुळे इलेक्ट्रॉनला स्थितीक उर्जा (potential energy) असते.

१. इलेक्ट्रॉन एका "ठराविक आकारा"च्या कक्षेत (shell) अणूकेंद्रकाभोवती फिरत असतो. (हे खरंतर अर्धसत्य आहे, पण ते प्रश्न असल्यास सविस्तर नंतर लिहेन.)
२. शिवाय या एका कक्षेत उपकक्षा (subshell) असतात.
क्वांटम थिअरीप्रमाणे या प्रत्येक कक्षा आणि उपकक्षेसाठी ठराविक उर्जा असते त्याहून निराळी उर्जा इलेक्ट्रॉनकडे असू शकत नाही. किंवा प्रत्येक कक्षा आणि उपकक्षेसाठी क्वांटम नंबर्स असतात. किंवा एका ठराविक एककाच्या पटीतच इलेक्ट्रॉनची उर्जा असू शकते. उदा: ए हे एकक ठरवलं, तर इलेक्ट्रॉनची उर्जा १×ए, २×ए, ३×ए ... एवढीच असू शकते.
३. या उपकक्षेचा आकार गोलाकार असतोच असं नाही. तेव्हा उपकक्षेच्या ओरिएंटेशन (मराठी शब्द?) प्रमाणे इलेक्ट्रॉनची उर्जा बदलू शकते.
४. शेवटी, इलेक्ट्रॉन स्वतःभोवती 'स्पिन' होतो. या स्पिनमधेही इलेक्ट्रॉनची उर्जा साठवलेली असते. आणि इथेही उर्जेचं क्वांटायझेशन होतं.

या चार प्रकारच्या क्वांटम नंबर्समुळे एका अणू केंद्रकासाठी इलेक्ट्रॉनसाठी ठराविक कक्षा, उपकक्षा इ. असू शकतात. बाहेरून बलप्रयोग न झाल्यास यातल्या अनेक उर्जास्थिती इलेक्ट्रॉनसाठी उपलब्ध असतात. पण जेव्हा श्वेत बटू स्थिती येते तेव्हा बाहेरून गुरूत्वाकर्षण इलेक्ट्रॉन्सना अणूकेंद्राकडे ढकलू लागतं तेव्हा मात्र इलेक्ट्रॉन्सच्या गर्दीत 'पॉलीचे एक्सक्लूजन प्रिन्सीपल', किंवा एका सिस्टममधे एका उर्जास्थितीसाठी एक इलेक्ट्रॉन या न्यायाने इलेक्ट्रॉन्सचा दाब (डिजनरसी प्रेशर) गुरूत्वाकर्षणाला रोखू शकतं.

*अणूक्रमांक = अणूकेंद्रात असणार्‍या प्रोटॉन्सची संख्या

(हे सगळं मराठीत लिहिण्याचा प्रयत्न केला आहे, पण काही अगम्य भाषेत, अगम्य विज्ञान लिहीलेलं आहे अशी मलाच शंका येते आहे.)

सुनील's picture

17 Sep 2010 - 7:17 am | सुनील

सुरेख. माहितीपूर्ण लेख. लोणारबद्दल वाचले होते.