अथ धूमकेतुपुराणं!

असुर's picture
असुर in जनातलं, मनातलं
6 Aug 2010 - 4:55 am

धूमकेतू हे नाव ऐकल्यावरच कसलं 'लै भ्भारी' वाटतं ना. धूमकेतू ही चीज आहेच मुळी त्याच्या नावाप्रमाणेच! भन्नाट वेग, आसमानात उधळलेल्या खोंडाप्रमाणे बेगुमान फिरायची हिम्मत आणि समोर येईल त्याला टक्कर देण्याचं सामर्थ्य! मग भले समोर येणारे गृहस्थ हे 'गुरु' सारखे दिग्गज ग्रह असोत, किंवा स्वत: सूर्यनारायण असोत, 'आम्हा काय त्याचे' असं गात हा धूमकेतू आसमंतात भटकत असतो.

धूमकेतू म्हटला की आपल्या डोळ्यासमोर 'हॅले'चा धूमकेतू येतो. कारण पृथ्वीच्या इतक्या जवळून जाणारा, नुसत्या डोळ्यांनी स्पष्ट आणि विलोभनीय दिसणारा आणि मनुष्याप्राण्यास आयुष्यात दोन वेळा बघता येऊ शकेल असा एकमेव धूमकेतू आहे हा!
हॅले प्रमाणेच इतर सर्व धूमकेतू हे बर्फ धूळ आणि वायू यांच्या मिश्रणाने बनलेले आहेत. ह्या सर्व गोष्टी मिळून धूमकेतूचे केंद्रक (nucleus) बनते. या केंद्रकाचा आकार साधारणपणे २०मी. (आजपर्यंत सापडलेला कमीत कमीत छोटा धूमकेतू) ते ३००कि.मी. (आजपर्यंत सापडलेला जास्तीत जास्त मोठा धूमकेतू) पर्यंत असू शकतो. हॅलेच्या धूमकेतूच्या केंद्रकाचा व्यास सुमारे १६कि.मी., तर हॅले-बॉप धूमकेतूच्या केंद्रकाचा व्यास सुमारे ५८कि.मी. आहे.
धूमकेतू हे सुद्धा सूर्यमालेचाच भाग आहेत. आता बाकी ग्रह आणि धूमकेतू यांत अनेक दृश्य फरक आहेत आणि अनेक तांत्रिक फरक देखील आहेत. त्यातलाच एक फरक असा की सूर्यमालेतील ग्रह हे साधारण वर्तुळाकार आणि पृथ्वीसापेक्ष समतल कक्षेत फिरतात, पण धूमकेतू असल्या ग्रह-कक्षेच्या नियमांचे बांधील नाहीत. ते सूर्याभोवती लंब-वर्तुळाकार कक्षेत फिरतात आणि 'समतल' वगैरे गोष्टींना फाट्यावर मारतात. असे असले तरीही धूमकेतूसुद्धा गुरुत्वाकर्षणाच्या नियमांनी बांधलेले आहेत आणि म्हणूनच आपण हॅलेचा धूमकेतू दर ७५-७६ वर्षांनी पाहू शकतो.

धूमकेतूच्या कक्षेबद्दल सांगण्याचा हेतू हा की धूमकेतूचा नैसर्गिक अविष्कार हा त्याच्या लंब-वर्तुळाकार कक्षेत दडलाय. धूमकेतू जेव्हा सूर्यापासून दूर असतो तेव्हा त्याच्यात आणि अवकाशातील इतर अ-ग्रहीय वस्तूंमध्ये फरक करणं मुश्कील होऊन बसतं. त्यावेळी त्याची निरपेक्ष तेजस्विता (absolute magnitude) ही साधारण +१० ते +१६ असते. तेजस्विता जितकी 'मायनस' तितकी ती जास्त असते आणि जितकी 'प्लस' तितकी ती कमी असते. आपला सूर्य -२६ तेजस्वीतेचा आहे. मानवी डोळ्यांनी कमीत कमी +६ तेजस्वितेचे ऑब्जेक्टस दिसू शकतात. आता इतक्या कमी तेजस्वितेचे हे धूमकेतू तर अतिशय ताकदवान दुर्बिणी घेऊनच बघावे आणि शोधावे लागतात. पण जसजसा धूमकेतू सूर्याच्या जवळ येऊ लागतो, सौरवात आणि किरणोत्सर्ग यामुळे त्यावरील बर्फ आणि वायूचे मिश्रण वितळू लागते, धूमकेतूच्या केंद्रकाभोवती तात्पुरते वातावरण निर्माण होते आणि पृष्ठभागावरील धूळ, बर्फ आणि वायू मिळून त्याला एक अतिशय सुंदर शेपटी दिसायला लागते. त्यावर कडी म्हणजे वायूंचे आयनीभवन (ionization) होऊन धूमकेतूला अजून एक शेपटी फुटते. या दोन शेपट्यांमध्ये फरक कसा ओळखायचा? तर, वायूंचे आयनीभवन होऊन बनलेल्या शेपटीला वस्तुमान नसल्यामुळे ती शेपटी थोडीशी फिक्कट आणि सरळ दिसते, तर धूळ, बर्फ, वायू यांच्या मिश्रणातून तयार झालेली शेपटी ही किंचित वळलेली दिसते. तसेच प्रत्येक धूमकेतूची आयनीभवन झालेली शेपटी दिसेलच असे नाही, पण मुख्य शेपटी दिसतेच.

धूमकेतू हे नेहेमी स्वत:च्या लंबवर्तुळाकार कक्षेत र्‍ह्स्वसंपात बिंदू (orbital Perihelion) ते दीर्घसंपात बिंदू (orbital Aphelion) असा प्रवास करतात. धूमकेतू जेव्हा त्याच्या र्‍ह्स्वसंपात बिंदूपाशी (कक्षेतील सूर्याच्या सर्वात जवळील बिंदू) पोहोचतो, तेव्हा साहजिकच धूमकेतूची शेपटी सर्वात लांब असते आणि तो अतिशय तेजस्वी दिसतो (उदा. हॅले-बॉप धूमकेतू). काही धूमकेतूंची आणि आपली भेट या र्‍ह्स्वसंपात बिंदूपाशी होत नाही. याचे कारण म्हणजे ते सूर्याच्या पलीकडे (पृथ्वी-सापेक्ष) गेलेले असतात, किंवा पृथ्वीची आणि धूमकेतूचा र्‍ह्स्वसंपात बिंदू एकाच पातळीत असतो. त्यामुळे धूमकेतू सूर्यात बुडून गेल्यासारखा वाटतो आणि दिसत नाही. पण हाच धूमकेतू सूर्यापासून किंचित लांब आला की काय फक्कड दिसतो महाराजा. (उदा. ह्याकुताके धूमकेतू).
या धूमकेतूंचे कक्षेप्रमाणे ३ प्रकार आहेत. १. र्‍ह्स्व-कक्षीय धूमकेतू, 2. दीर्घ-कक्षीय धूमकेतू आणि ३. अतिथी धूमकेतू
र्‍ह्स्व-कक्षीय धूमकेतू हे नावाप्रमाणेच छोटी कक्षा असणारे धूमकेतू आहेत जे साधारण 200 किंवा त्यापेक्षा कमी वर्षात सूर्याभोवती एक परिभ्रमण पूर्ण करतात. गुरु ग्रह ते 'क्युपियर'च्या पट्ट्यापर्यंत यांची कक्षा असू शकते. तरीसुद्धा हे अंतर प्रचंड असल्याने धूमकेतू हे एका विलक्षण गतीमध्ये (ग्रहांच्या परिभ्रमणाच्या गतीपेक्षा कैक पटींनी अधिक) फिरत असतात हे लक्षात आले असेलच. ( क्युपियरचा पट्टा हा सूर्यमालेभोवती एका समतल कक्षेत पसरलेला अ-ग्रहीय वस्तूंचा पट्टा आहे. क्युपियर नावाच्या शास्त्रज्ञाने असा एखादा पट्टा सूर्यमालेभोवती असू शकतो याचे शास्त्राधारित भाकीत केले होते, त्यामुळे या पट्ट्याला त्याचे नाव दिले आहे.) बहुतांश र्‍ह्स्व-कक्षीय धूमकेतूंची निर्मिती ही या पट्ट्यात होत असावी असा एक निष्कर्ष आहे. पण इथेही हॅलेचा धूमकेतू त्याचे वेगळेपण दाखवून देतो. हॅलेच्या धूमकेतूचा आकार आणि वस्तुमान पाहता तो 'उर्ट'च्या ढगात निर्माण झालेला धूमकेतू असून सूर्याच्या गुरुत्वाकर्षणात अडकून र्‍ह्स्व-कक्षीय धूमकेतू झाला असावा असे मानण्यात येते. ('उर्ट' नावाच्या शास्त्रज्ञाने हा आंतरतारकीय ढग अस्तित्वात असल्याचे सुचवले होते)

दीर्घ-कक्षीय धूमकेतू हे २०० वर्षांपेक्षा मोठी परिभ्रमणाची कक्षा असणारे धूमकेतू आहेत. हॅले-बॉप (१९९७), ह्याकुताके (१९९६), मॅकनॉट (२००७) हे प्रसिद्ध धूमकेतू याच प्रकारात येत असल्याने आणि यांची संख्या विशेष मोठी असल्याने हे कौतुकाचा आणि चर्चेचा विषय आहेत. दीर्घ-कक्षीय धूमकेतू 'उर्ट'च्या ढगात तयार होतात असाही एक निष्कर्ष आहे.
अतिथी धूमकेतू म्हणजे ज्या धूमकेतूंची कक्षा ही लंब-वर्तुळाकार नसून पॅराबोलिक (मराठी शब्द: परावलय) असते ते धूमकेतू! या पॅराबोलाच्या केंद्रस्थानी सूर्य असतो, आणि या केंद्रानुसार आखलेल्या बिंदुमार्गावरून हे धूमकेतू प्रवास करतात. हे धूमकेतू दिशा चुकून गुरुत्वाकर्षणामुळे सूर्याकडे खेचले जातात आणि त्याला वळसा घालून निघून जातात. परंतु यांना दीर्घसंपात बिंदूच नसल्याने हे धूमकेतू सूर्याभोवती परिभ्रमण करत नाहीत.
असे हे धूमकेतू सर्वसाधारणपणे सूर्यमालेत येतात, आपले रंग-ढंग दाखवतात आणि सूर्याला प्रदक्षिणा घालून परत अंतराळात निघून जातात. पण प्रत्येक धूमकेतू हा स्वतंत्र असतो आणि प्रत्येकाची तऱ्हा निराळी असते. काही धूमकेतू हे नियमितपणे प्रदक्षिणा घालतात. काही धूमकेतूंच्या कक्षा ग्रहांच्या गुरुत्वाकर्षणामुळे बदलतात, काही धूमकेतू हजारो वर्षांची प्रदक्षिणा पूर्ण करून पुन्हा दर्शन देतात. शुमाकर-लेव्ही९ नावाचा धूमकेतू असाच भटकताना गुरूच्या कक्षेत सापडला, बरीच वर्षे त्याच्याभोवती फिरला, आणि नंतर १९९४ मध्ये गुरु वर आदळून नष्ट झाला. असे अनेक धूमकेतू सूर्याजवळून जाताना सूर्यामध्ये खेचले जातात आणि नष्ट होतात. काही धूमकेतू अनंताच्या प्रवासाला निघून जातात. 'एन्के' सारखे धूमकेतू अतिशय वेगाने आणि अतिशय कमी वेळात प्रदक्षिणा पूर्ण करतात, पण त्यांचा वेग, वस्तुमान आणि अंत:स्थ ग्रहांना छेदून जाणारी त्यांची कक्षा यामुळे ते स्वत:चीच कक्षा आणि वेग बदलत राहतात.
अगदी 'मिपा'च्याच भाषेत सांगायचं झालं तर सर्व नियम पाळूनही दंगामस्ती करणारे, कुणालाही फाट्यावर मारायला कमी न करणारे, बेगुमानपणे टकरा देणारे, अगदीच कंटाळा आला तर चपला घालून चालू पडणारे हे धूमकेतू! इतका सगळं करूनही अतिशय प्रेक्षणीय असणारे हे धूमकेतू! त्यामुळेच आमच्यासारखे आकाशाकडे डोळे लावून बसणारे बापडे लोक यांच्या दर्शनाला अगदी म्हणजे अगदीच उत्सुक असतात!

डिसक्लेमर: तज्ञांना या लेखात तांत्रिक चुका आढळल्यास कळवणे, ताबडतोब दुरुस्ती करण्यात येईल! तसेच हा लेख केवळ आणि केवळ धूमकेतूंशी संबंधित आहे. कुणा मिपाकरांच्या नावांशी वा वागण्याशी यांचे साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा!

* काही छायाचित्रे:
१.हॅले-बॉप (१९९७)

----------------------------------------------------------------------
२. ह्याकुताके (१९९६) :

------------------------------------------------------

-----------------------------------------------------------------------
३. मॅकनॉट (२००७)

(छायाचित्रे आंतरजालावरून साभार )

ता.क. : 103P/हार्टली धूमकेतू सध्या पृथ्वीच्या जवळ असून 'सिग्नस' तारकासमुहात बायनाक्युलर वापरून दिसेल (तेजस्विता +९). त्याची वाटचाल अशीच चालू राहिली तर तो ऑक्टोबर महिन्यात नुसत्या डोळ्यांनी देखील पाहता येईल (अपेक्षित तेजस्विता +३ ते +४.५).

विज्ञानमाहिती

प्रतिक्रिया

या लेखातील अनेक इंग्रजी शब्दांना मराठी प्रतिशब्द हे अदितीतै आणि नाईलेश यांजकडून साभार!
आपणा दोघांच्या मदतीबद्दल धन्स!

--असुर

Nile's picture

6 Aug 2010 - 6:42 am | Nile

आमचे आभार मानल्याबद्दल मंडळ आभारी आहे, पण सदरचे श्रेय संपुर्ण लेखकाचे आहे असे नम्रपणे नमुद करु इच्छितो.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

6 Aug 2010 - 10:21 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

आमचे आभार मानल्याबद्दल मंडळ आभारी आहे, पण सदरचे श्रेय संपूर्णपणे लेखकाचे आहे असे नम्रपणे नमूद करु इच्छिते. (शुद्धलेखनाच्या चुका वगळल्यास नायल्याकडून वाक्य ढापले आहे.)

उत्तम लेख आणि मांडणी. असेच उत्तमोत्तम लेख असुर यांच्या कीबोर्डातून येऊ देत.
आता माझे दोन पैसे:
मला हॅलेच्या धूमकेतूपेक्षा हेल-बॉप आणि ह्याकुताके जास्त चांगले आठवतात. याचं कारण पुन्हा शेपटीच. सध्या असं मानलं जात आहे की हॅलेच्या धूमकेतूच्या वारंवार सूर्यभेटीमुळे त्यामधे फारसं पाणी/बर्फ, मिथेन इ. वायू उरलेले नाहीत. उरलेले आहेत ते बरेचसे दगड, ज्यांच्यामुळे फार जास्त प्रकाश परावर्तित होत नाही आणि धूमकेतू साध्या लघुग्रहासारखाच दिसू लागतो.

धूमकेतूंच्या शेपट्यांमधलं द्रव्य पुन्हा धूमकेतूच्या बरोबर परत जात नाही, ते तिथेच रहातं. पृथ्वीच्या कक्षेतही असा "कचरा" आहे. पृथ्वी जेव्हा या द्रव्याच्या जवळ जाते तेव्हा गुरूत्वाकर्षणाने हे द्रव्य पृथ्वीकडे खेचलं जातं. हे कण पृथ्वीच्या वातावरणात शिरले की घर्षणातून उष्णता तयार होते आणि त्यामुळे हे कण जळतात. याच उल्का. विशिष्ट धूमकेतूंमुळे पृथ्वीच्या कक्षेत विशिष्ट ठिकाणी असा 'कचरा' आहे त्यामुळेच अमुक दिवशी अमुक दिशेने उल्कापात होईल हे सांगता येतं.

अनेक धूमकेतू ऊर्टच्या मेघातून निघताना अन्वस्ताकार वा अपस्ताकार (पॅराबोलिक अथवा हायपरबोलिक) कक्षेत असतात, पण गुरू किंवा शनी यांच्या गुरूत्वाकर्षणामुळे दीर्घवर्तुळाकार कक्षेत सूर्याभोवती फिरू लागतात. (आमच्यासारख्या टवाळांना दम दिल्यावर अवांतर प्रतिसाद कमी होतात तसंच!)
याचा पृथ्वीवरच्या जीवसृष्टीलाही फायदा होतो, झाला असावा; कारण गुरू-शनीमुळे जसे काही धूमकेतू दीर्घवर्तुळाकार कक्षेत येतात तसेच काही धूमकेतूंचे आयडी सूर्यमालेतून बॅनही होतात; आणि ते पुन्हा सूर्यमालेकडे येऊ शकत नाही. असे सूर्याच्या दिशेने झेपावणारे धूमकेतू पृथ्वीवर आदळण्याचीही शक्यता असते आणि त्यामुळे संपूर्ण जीवसृष्टी नष्ट होऊ शकते.
इकेया-सेकी नावाचा धूमकेतू १९६५ साली आला होता, तो सूर्याच्या फारच जवळून गेला (साडेचार लाख किमी). सूर्याच्या एवढ्या जवळून जाताना तो प्रचंड तेजस्वी झाला होता आणि जपानमधून तो दिवसाउजेडी बघितला गेला. पण लवकरच त्याचे तुकडे होऊन तो धूमकेतू सूर्यात समाविष्ट झाला.

मला भारतातली माझी पिढी खगोलीय घटनांच्या बाबतीत फारच नशीबवान वाटते. भारतातून दोन खग्रास सूर्यग्रहणं दिसली, दोन अतिशय तेजस्वी आणि लांब शेपटीवाले धूमकेतू दिसले, एक कंकणाकृती सूर्यग्रहण दिसलं, छायाकल्प आणि खग्रास चंद्रग्रहणं पाहिली, मंगळ पृथ्वीच्या खूप जवळ येऊन गेला, १९९९ साली प्रचंड प्रमाणात (सिंह राशीतला) उल्कापातही बघितला.

व्वा! माझ्या चाळणीमधून सुटलेले सगळे मुद्दे इथे सापडले आहेत तर!
अदितीतै, अगदीच बरोबर! इकीया-सेकीचं नाव आठवलं नाही पण ते "झगामगा, मला बघा" नक्कीच लक्षात आहे. अर्थात, वाचून आणि फोटो पाहूनच!
>>> मला भारतातली माझी पिढी खगोलीय घटनांच्या बाबतीत फारच नशीबवान वाटते
एकदम! आपण यादी बनवली त्यातली प्रत्येक गोष्ट 'याचि देही याचि डोळा' पाहून जीव धन्य झाला. त्यानंतर टेम्परवारी 'संन्यास'!!!

अवांतर: कंसातील वाक्य डिसक्लेमरला फाट्यावर मारतायेत काय? :-)
(हे कंस अश्लील तर नाहीत ना?)

--असुर

असुर यांचा लेख आणि अदितीचा प्रतिसाद आवडला.

Pain's picture

6 Aug 2010 - 5:16 am | Pain

उत्तम लेख !

Armageddon ची आठवण झाली.

Nile's picture

6 Aug 2010 - 6:45 am | Nile

धुमकेतुची ओळख आवडली. अश्याच दमदार लेखांची मेजवानी आम्हाला मिळत राहिल अशी आशा आहे. :-)

विकास's picture

6 Aug 2010 - 6:56 am | विकास

एकदम मस्त लेख! त्यात जर काही चित्रे चिकटवता आली तर पहा! असेच अजून लेख येउंदेत!

असुर's picture

6 Aug 2010 - 2:57 pm | असुर

फोटू शोधतो आहे. मिळाले की संपादकांना पाठवून डकवायची सोय करू शकेन बहुधा!

--असुर

असुर's picture

6 Aug 2010 - 6:41 pm | असुर

फोटू डकवले आहेत.

--असुर

आनंदयात्री's picture

6 Aug 2010 - 9:54 am | आनंदयात्री

धन्यवाद असुरराव. छान लेख आहे, आवडला.
विकाससारखेच म्हणतो, थोडी चित्रे अडकवयाला हवी होती.

विजुभाऊ's picture

6 Aug 2010 - 10:04 am | विजुभाऊ

धन्य. अशूर दादा. तुमी की दारूण शुंदर लिखीछे. खूब भॉलो

ईतके छान लिहिणार्‍याचे नाव 'असूर' का बरे असावे..?

मृत्युन्जय's picture

6 Aug 2010 - 11:25 am | मृत्युन्जय

असुर म्हणजे जे सुरापान करत नाहीत ते. :)

आता नाव एकाएकी निरुपद्रवी वाटायाला लागले का? ;)

अवलिया's picture

6 Aug 2010 - 11:27 am | अवलिया

मस्त लेख

निखिल देशपांडे's picture

6 Aug 2010 - 11:57 am | निखिल देशपांडे

लेख आवडला..
काही फोटो टाकता आले असते तर उत्तम

घाटावरचे भट's picture

6 Aug 2010 - 12:18 pm | घाटावरचे भट

झकास लेख.

वा क्या बात है !!
अतिशय रसाळ आणि सोप्या भाषेत धूमकेतू चे स्वरूप समजावून सांगीतले आहे
अश्या भाषेत शालेय अभ्यासक्रम का नसतो ?

परिकथेतील राजकुमार's picture

6 Aug 2010 - 12:54 pm | परिकथेतील राजकुमार

मस्त लेख हो असुरराज :) एका वेगळ्या विषयावर खुप नविन आणि छान माहिती मिळाली.
अदितीचा प्रतिसाद देखील मस्त.

भाऊ पाटील's picture

6 Aug 2010 - 3:08 pm | भाऊ पाटील

अतिशय सुंदर आणि सोप्या भाषेतला लेख!!
धुळवडीत हा लेख दुर्लक्षिला जाउ नये.

असेच लिहीत रहा.

लेख आवडला, फटु टाकता आले असते तर आमच्यासारख्या अडाण**ना काहीतरी फायदा.

डिस्क्लेमर जास्त आवडला

असुर's picture

6 Aug 2010 - 6:44 pm | असुर

अर्धवटराव,

फोटू डकवले आहेत.

डान्राव, १००% धन्स!!

--असुर

क्रेमर's picture

6 Aug 2010 - 7:16 pm | क्रेमर

ओघवत्या शैलीतील माहितीपूर्ण लेख आवडला. अदितीतैंचा प्रतिसादही माहितीपूर्ण. श्री असुर व अदितीतै दोघांचे धन्यवाद.

अनिल हटेला's picture

6 Aug 2010 - 7:19 pm | अनिल हटेला

साध्या ,सरळ,ओघवते लिखाण आवडले..
बरीच माहीती मिळाली...

अजुनही वाचायला आवडेल....

(अवांतर :- साला,धुमकेतु पैदा कसा होतो ? :-?)

नंदन's picture

14 Aug 2010 - 12:11 pm | नंदन

लेख, अतिशय आवडला. अजूनही येऊ द्या.