काल गुरु पौर्णिमा ..मात्र काल मिपा बंद असल्याने हा लेख प्रकाशित करु शकलो नाही .. तो आज प्रकाशित करत आहे . मिपाच नव रुप अत्यंत सुंदर आहे . या नव्या रुपात हा लेख लिहायला मिळत आहे ही भाग्याची गोष्ट आहे .म्हणुनच प्रचंड कष्ट करुन हे सर्व उभे करणार्या मिपा नवनिर्माण समितीला हा लेख अर्पण ..- विनायक
गुरु पौर्णिमा आली .. ती सालाबादप्रमाणे येते .. आणि मग मीही नियमितपणे पेपरमधले लेख वाचतो … शिक्षकाना नमस्कार करतो ..विचार करतो .. ही एक नियमित प्रोसेस आहे आणि ती मला आवडते . पण यावेळची गोष्ट जरा वेगळी आहे , माझी बारावी झालेली आहे ,ऍडमिशन प्रोसेस अजुन नीटशी सुरु न झाल्याने वेळ खुप आहे ,आणि करायला विचारही ..कारण ,आयुष्यातला एक महत्त्वाचा टप्पा पुर्ण झालेला आहे ,आता मी एका नव्या जगात प्रवेश करत आहे .. आता शिक्षक असतीलही कदाचित ,पण खर्या अर्थाने अभ्यास स्वत: च करायचा आहे .मार्गदर्शक असतील पण ते पुस्तकातली कन्सेप्टस समजवायला .. जगणे समजवायला नाही .. आणि अशा जगात प्रवेश करताना काही शिक्षक ,ज्यांच्यामुळे मी इथे आलो ,ज्यानी मला जगणे समजावले ते आठवणे साहजिकच ,नाही का ?
“विनु….” अशी कधीही कुठुनही हाक मारणारे पाटणे सर .. विनु अशी हाक मारायचा अधिकार फक्त त्यांनाच.. पाचवीत शिकवायचे मला .. पण पहिल्यांदा मला गणित समजावले ते त्यांनी,त्यांच्या अंक गणितातल्या टॅक्टीज आजही मला उपयोगी पडतात .. गणित हा माझा आजही प्रचंड आवडीचा विषय आहे त्प फक्त आणि फक्त त्यांच्यामुळे ..पण त्याहुन महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला अभ्यासाची गोडी लावली ती त्यानी .. डोक्यावर टोपी , अंगारा लावलेला ,दत्त भक्त ..दैव ही असे की माझी कोणतीही परीक्षा असो , आदल्या दिवशी रस्त्यात कुठे ना कुठे ते भेटणारच .. आजही हा को – इन्सिडेंट चुकलेला नाही .. माझे सर .. आयुष्यात अनेक शिक्षक भेटले ,भेटतात आणि भेटतील ..पण सर ही कन्सेप्ट पहिल्यांदा ज्यांच्यामुळे कळाली ते पाटणे सर…
२६ जानेवारी २००५ ची गोष्ट , मला स्कॉलरशीपची बुद्धिमत्ता जमत नव्हती ,म्हणुन सर घरी आलेले ..ते म्हणाले ,मी सांगतो एवढा अभ्यास कर , तुला ९६/१०० मिळाले नाही तर माझे नाव बदल .. निकालपत्रात मार्क – ९६ … आर . एन कुंभार .. मुलानी यश मिळवावे म्हणुन स्वतःच्या गळ्यातील चेन बक्षीस म्हणुन लावणारा अवलिया .. या सरांनी मला स्वप्न बघायला शिकवलं… मोठी स्वप्न .. फक्त स्वप्न दाखवली नाहीत तर ती पुर्ण करण्यासाठी जीवापार प्रयत्न केले ,करताहेत .. योग्य ठिकाणी योग्य वेळी योग्य भुमिकेत असणारे आरएनके .. माझ्या अख्खी पर्सनॅलिटी वर त्यांचा प्रचंड प्रभाव आहे ..आपण करुया रे .. असे त्यानी म्हटले की विषय संपला ,ती गोष्ट तडीस गेलीच म्हणुन समजायचे.. ज्यांचे फक्त शब्द मला पुरेसे असतात असे आजही माझ्याबरोबर असणारे हे सर ..
वय वर्षे ६२ , पैशाची गरज नाही ,तरीही सकाळी ४ ला उठुन ६ ला मुलाना शिकवायला सुरवात करणार ते रात्री १० पर्यंत अविरत चालुच.. शिकवणे ही ज्यांना जिवंत राहण्यासाठी अत्यावश्यक गोष्ट अहे असे सी .ए . पाटील सर . आजपर्यंत हजारो मुले ज्यांच्या हाताखालुन गेली आहेत ते . विद्यार्थ्याचे पाणी जोखावे ते सरानीच . दहावीचे अवघे एक वर्ष मी त्यांच्या सानिध्यात होतो .. पण गुरु म्हणुन माझ्या मनात जी प्रतिमा आहे ,ती सरांचीच .. निष्ठा ,कष्ट ,जिद्द सगळे काही शिकायला मिळाले त्यांच्यामुळे . सचिन ने वार्न ला धु धु धुतलेले ती मॅच पुन्हा पुन्हा बघणारे आणि आम्हाला बघायला सांगणारे सर .सरानी मला अजुन एक मह्त्वाची गोष्ट दिली ,कॉन्फिडन्स .. आजही जेव्हा जेव्हा मी मेंटली कोलॅप्स होतो ,तेव्हा सरांना आठवतो आणि माझ्याही नकळत मला एक नवी उमेद मिळुन जाते .. काही करायची .त्यांच्याबद्दल किती बोलायचे ??? मी एवढेच म्हणु शकतो , A Perfect Teacher indeed …
नाट्य वाचन स्पर्धेचा निकाल .पहिला क्रमांक .. प्रचंड वेगाने मी व माझा मित्र पळत गेलो आणि एका शिक्षकांच्या पाया पडलो ..दिपक विनायक भागवत ..येस्स ,माझे भागवत सर … गेल्या दोन वर्षात किडुक मिडुक लिहायला लागलो ,नाटकाविषयी साईट काढली ..या सगळ्याचे मुळ म्हणजे ते .. लेखक ,प्रवचनकार , नाटककार , विनोदी कार्यक्रम करणारे , प्रचंड शिस्तीचे .. शिस्त मोडली म्हणुन स्वतःच्या नातेवाईकाला अख्ख्या शाळेसमोर मारणारे .. तत्त्वनिष्ट आणि सत्शील .. मोबाईल वापरणार नाहीत , कार्यक्रमासाठी पैसे घेणार नाहीत .. आपल्या तत्त्वात बसेल ते आणि तसेच करणार … मग कोणतीही भिडभाड न बाळगता मला चांगले वाचायला देणे वा बघायला चांगली नाटके देणे असो वा त्याच अधिकाराने शिव्या घालणे असो .. भल्या भल्यांशी त्यांचे पटत नाही आणि त्याची त्याना फिकिर नाही .. आंणि म्हणुनच ,ते आयुष्य जगतात संपुर्ण पणे ..माझे ते आदर्श आहेत .. आयुष्यात वाट चुकायचे प्रसंग खुप येतील ,पण तेव्हा मला योग्य वाटेवर ठेवायला त्यांचे विचार नक्कीच सोबतीला असतील .. Thanks ,Thanks alot sir.. माझी वैचारीक बैठक तयार केल्याबद्दल .. मला स्वत:ला शोधु दिल्याबद्दल ..
एच बी पाटील सर , आमच्या कॉलेजचे प्राचार्य .. एकही विषय शिकवायला नव्हते मला ते .. पण ,गेल्या २ वर्षात खर्या अर्थानी माझे शिक्षक होते ते तेच .. माझ्या प्रत्येक गोष्टीला ज्यांनी सपोर्ट केला .. माझ्याबाबतीत भले ,बुरे काय ते सांगितले असे हे सर .. एकाच वेळी वेगवेगळ्या गोष्टीना स्पर्श करत असताना ,काहीतरी नवे करायला बघत असताना माझा मोठा प्लस पॉईंट होता तो त्यांचा सपोर्ट .माझे वय वगैरे विसरुन माझ्याशी गप्पा मारणारे तेच .मी कॉलेज आयुष्यात जे काही मिळवले ते त्यंच्यामुळेच .श्याम मनोहरांवर पी एच डी केलेला माणुस . त्यांच्या केबिन मध्ये बसलेल्या प्रत्येक क्षणाला खुप काही शिकायला मिळाले मला ..पुस्तकी काही नाही ,पण कसे जगायचे आणि कसे जगु नये ते अशी सर्व गुण सपन्न ,प्रचंड नॉलेज असलेली व्यक्ती माझ्या जीवनात आली हे माझे भाग्यच म्हणायचे ..
आज हे सगळे जण आठवत आहेत , .खुप सुचतय ,खुप सांगाव वाटतय .. पण प्रत्यक्षात काही उतरत नाही आहे, कारण माझ्या आयुष्यात त्यांनी जे काही दिलय ते शब्दात मांडण्यासारखे नाहीच आहे .. खुप काही मिळालय मला .. तसे बघायला गेले तर गुरु खुप आहेत, साध्या साध्या गोष्टी ही शिकवतातच,निसर्ग असो वा आणखी काही ..पण हे माझे शिक्षक .. जे खर्या अर्थाने माझे गुरु होते .. आजकालच्या व्यावसायिक जगात जिथे शिक्षक हा प्रोफेशनल झाला आहे ,तिथे यांनी मला घडवले . . अभ्यासाचे तर सगळे शिकवतात ..पण कसे जगायचे हे त्यानी शिकवले ..कळत ,नकळत ..आणि म्हणुनच माझ्यासाठी ते स्पेशल आहेत …
थोडे सेंटी भाषेत बोलायचे तर असे म्हणतात की आयुष्याची वाट वळणावळणाची असते ..अशा कोणत्या ना कोणत्या वळणावर हे सगळे जण मला भेटत गेले,हे माझे भाग्य ,माझ्या बोटाला धरुन त्यानी मला त्या वाटेवरुन पुढे नेले .. आता मात्र माझी वाट मलाच चालायची आहे .. आणि मी ती चालीन , प्रत्यक्षात जरी ते माझ्या जवळ वा आसपास नसले तरी त्यांचे संस्कार बरोबर असतीलच ना , ती संस्काररुपी बोटेच मला दिशादर्शकाचे काम करतील.. अशा सगळ्या ज्ञात अज्ञात गुरुंचे असंख्य उपकार माझ्यावर आहेत , त्यांच्यातुन मी उतराई होऊ शकत नाही .. मला स्वतःला ही या ऋणातच रहायला आवडेल .कोणत्या गुरुदक्षिणेने ते ॠण फिटणार नाही याची पुर्ण जाणीव मला आहे . पण फुल ना फुलाची पाकळी म्हणुन या वाटेवर माझा पाय कधीही घसरणार नाही एवढी खात्री मी गुरुदक्षिणा म्हणुन नक्कीच देऊ शकतो …
प्रतिक्रिया
26 Jul 2010 - 10:59 am | स्पंदना
विनायक छान लिहिल आहेस.
या वयात कुणी चांगला शिक्षक भेटण ही खरोखरच अतिशय भाग्याची गोष्ट!!
26 Jul 2010 - 12:39 pm | अमोल केळकर
सहमत
अमोल
26 Jul 2010 - 11:06 am | विनायक पाचलग
मनापासुन धन्यवाद
26 Jul 2010 - 12:04 pm | संजय अभ्यंकर
आपल्या गुरूंबद्दल कृतज्ञता फार चांगल्या प्रकारे मांडली आहेस.
26 Jul 2010 - 12:07 pm | परिकथेतील राजकुमार
च्यायला आमच्या मास्तरनी आम्हाला टूरवर गेल्यावर दारवा ढोसायला आणि तिन पत्ती खेळायला शिकवले होते :(
असो.. पण काही का असेना आमच्या मास्तरवर आमचा भारी जीव आहे अजुन पण :)
26 Jul 2010 - 12:37 pm | विनायक पाचलग
दॅट्स इट .. नाही का ?
26 Jul 2010 - 12:40 pm | निखिल देशपांडे
छान लेख रे विनायका
26 Jul 2010 - 9:00 pm | सूर्यपुत्र
गुरु पौर्णिमा येते .. ती सालाबादप्रमाणे येतेच .. पण मी पेपरमधले लेख वाचत नाही … शिक्षकाना नमस्कार करत नाही ..विचार करत नाही .. ही एक नियमित प्रोसेस आहे आणि ती मलाच आवडते .....
26 Jul 2010 - 9:10 pm | गणपा
विन्या लेख आवडला रे.
26 Jul 2010 - 9:13 pm | चतुरंग
गुरुपौर्णिमेला साजेसा छान लेख रे! :)
26 Jul 2010 - 9:14 pm | अरुंधती
आपल्या शिक्षकांविषयी तुम्हाला वाटणारे प्रेम, आदर आणि कृतज्ञता लेखात चांगली प्रकट होत आहे. हाच कृतज्ञभाव तुम्हाला आयुष्यात अजून पुढे नेवो ही शुभेच्छा! :-)
--अरुंधती
26 Jul 2010 - 10:17 pm | विनायक पाचलग
सर्वांचे मनापासुन धन्यवाद ..