सहज...

दिनेश५७'s picture
दिनेश५७ in जनातलं, मनातलं
10 Jul 2010 - 11:22 am

सहज...
मला वाटलं, म्हणून हे लिहितोय.
कदाचित तो विषय अकारण वाटेल. पण असे काही विषयही, विचार करायला लावतात.
... काल अगदी सहजपणे कानावर पडलेले ते शब्द ऐकून मलाही धक्का बसला आणि मी चमकून त्यांच्याकडे बघितलं.
ट्रेनमध्ये समोरच्या बाकावर ते मस्त गप्पा मारत होते.
एक मध्यम वयाचा माणूस, आणि एक, पोरगेलासा, कॉलेजात जाणारा, नुकती मिसरूड उमटूउमटू लागलेला मुलगा. बहुतेक तो त्या माणसाचा मुलगा असावा. चेहेरेपट्टी बरीचशी मिळतीजुळती.
आणि, बहुधा ते गुजराती असावेत.
कारण, त्यांच्यात `बिझीनेस'च्या `वार्ता' चालल्या होत्या.
बहुतेक तो माणूस भडकमकर रोडवर कॉम्पुटर पार्टसचं दुकान थाटून स्थिरावलेला असणार... बोलताबोलता तो ब्यागेतून कसलेकसले हार्डवेअर कोम्पोनन्टस काढून शर्टाच्या बाहीला पुसून पुन्हा ठेवत होता...
एकीकडे त्यांच्या गप्पा सुरू होत्या. माझे कान कुतूहलानं त्यात खुपसले गेले होते.
विषय, मुलानं बिझीनेस कोणता करावा, हा होता.
आणि त्यांच्या संभाषणातही, सेचुरेसन, केस, बेन्क असे शब्द येत होते म्हणून, ते गुजरातीच होते, हे नक्की होतं
आसपासच्या गर्दीतल्या मराठी गप्पांमध्येही मी बर्‍याचदा कान खुपसले आहेत. पण बिझिनेसच्या गोष्टी फारच कमी वेळा कानावर पडल्यात.
तर, `कोम्पुटर'च्या धंद्यात आता `सेचुरेसन’ झाल्यानं, मुलानं दुसरा काहीतरी बिझिनेस करावा, असं त्या पित्याचं म्हणणं होतं... आणि त्या दुसर्‍या धंद्यावर विचार सुरू होता.
त्याचं शिक्षण आणि त्यांच्या विचारविनिमयातून पुढे येणारे पर्याय यांचा एकमेकांशी संबंध नाही, हेही लगेच लक्षात येत होते.
`तू काँडोमकी दुकान खोल'... अचानक, चुटकी वाजवत बापानं मुलाला सुचवलं.
... इथेच मी चमकलो, आणि थेट त्यांच्यात डोळेही खुपसले...
तो मुलगा मंद हसत होता...
`लेकिन चलेगी?'... त्यानं गंभीरपणे विचारलं...
म्हणजे, हा पर्याय विचार करण्यासारखा आहे, हे त्याला पटलं असावं, हे त्याच्या सुरावरून जाणवत होतं.
`क्यू नही?... बंबईमे इतने सारे लोग है... सबको यूस तो करना पडता है'... बापानं `लोजिक' सांगितलं...
`सब तरहके, सब ब्रांडके कोंडोम बेचनेका... अलग अलह प्राईसका... हरेकको परवडना चाहिये'.. तो पुढे विस्तारानं `टिप्स' देऊ लागला...
`लेकिन'... मुलगा मात्र, अजून संभ्रमात दिसत होता... मध्येच त्यानं माझ्याकडे पाहिलं.
त्या बापाची आयडिया मला एकदम पसंत पडलीच होती... माझ्या डोळ्यातली ती पसंतीची पावती त्या मुलाला जाणवली.
`पापा, ऐसा करे?... साथमें `पिल्स'भी बेंचे?'... पोरगा बापाच्या पुढे जाऊन कल्पनाशक्ती लढवू लागला होता..
आता बापाचे डोळे चमकले. त्यानं मुलाच्या पाठीवर चक्क जोरदार थाप मारली होती...
बिझिनेसच्या गप्पांपुढे, ते दोघं बाप-मुलाचं नातं विसरून गेले, आणि त्यांचं `बिझिनेस प्लॆनिंग' सुरू झालं...
माझं स्टेशन आल्यावर मी उतरून गेलो...
पण या गप्पा मात्र, कानात घुमत राहिल्या...
... आणखी दोनचार वर्षांत मुंबैत फक्त कॊंडॊमचं दुकान सुरू झालेलं असणार, अशी माझी खात्री झाली होती.
... सरकारी योजना, स्वयंसेवी संस्था, प्रसार माध्यमे, या सर्वांनी प्रामाणिकपणे प्रसार केला, तर लोकसंख्येच्या विस्फोटाचे धोके समाजाने तोवर ओळखलेले असतील...
... म्हणजे, अशा दुकानाची गरज समाजालाच भासू लागलेली असेल.
त्या बापाच्या `द्रष्टे'पणाचे मला कौतुक वाटले...
बिझिनेसचे बाळकडू मिळवण्याचा जन्मसिद्ध हक्क त्यांनाच आहे, ह्याची मला खात्री पटली...
-------------
आणि, उद्याच `जागतिक लोकसंख्या दिन' असल्यामुळे आजच हे नोंदवून ठेवावे, असं मला वाटलं...
उद्या कुठे असं दुकान दिसलंच, तर त्या `आयडिया'च्या जन्माचा मी एकमेव साक्षीदार होतो, हे तेव्हा सांगण्यात मजा नाही...
--------------
थोडे विषयांतर :
बिझीनेस हा मराठी माणसाचा पिंड नाही, हे एकदा माझा एक गुज्जू मित्र पटवून सांगण्याचा खूप प्रयत्न करत होता... मग, मी त्याला आठवतील तेवढी नावं सांगितली...
किर्लोस्कर, गरवारे, कल्याणी, पेंढारकर, जोग, अवर्सेकर, म्हैसकर...
आणि मग विचारांना खूप ताण देऊन एखाददुसरं नाव वाढवत राहिलो...
तरी तो त्याच्या म्हणण्यावर ठाम होता.
मग त्यानं मला एक किस्सा सांगितला.
तो खराच आहे, असा त्याचा दावा होता...
... एकदा एका मराठी माणसानं काहीतरी वेगळा बिझिनेस सुरू करायचं ठरवलं... बराच विचार केला, प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केले... जगभरातल्या त्या धंद्यातल्यांच्या `यशोगाथां'चे पारायण केले, `सप्लायर्स'शी पत्रव्यवहार केला, आणि, फायद्याचे आडाखे जुळताच, ऒर्डर नोंदवली.
... कुठल्याशा वेस्टर्न कंट्रीमधून त्यानं हजारोंच्या संख्येनं `डिझायनर' ब्रा मागवल्या होत्या.
काही दिवसांतच त्याची कन्साईनमेंट आली, आणि तो भविश्याची सुंदर स्वप्ने रंगवूही लागला...
पण अंदाज फसला... वेस्टर्न साईझमुळे, इथल्या मार्केट मध्ये माल खपलाच नाही.
मग त्यानं आपली ही कहाणी एका गुजू मित्राला सांगितली, आणि त्या मित्रानं तो सगळा माल विकत घेतला...
हा मराठी माणूस, स्वत: सुटल्याच्या आणि तो फसल्याच्या आनंदात पुढे काय होणार यावर लक्ष ठेवून होता.
काही दिवसांनी पुन्हा ते भेटले... गुजू मित्रानं ह्याच्या तोंडात पेढा कोंबला, आणि याचा आ तसाच राहिला...
मग त्या मित्रानं, आपलं बिझिनेस सिक्रेटही ओपन केलं...
त्यानं तो माल घेतल्यानंतर, कुठल्यातरी मार्केटमध्ये टोप्यांच्या गाड्या सुरू केल्या... एका ईदला जोरदार विक्री झाली, आणि एक पार्ट संपून गेला... त्यातच सगळा पैसा वसूल झाला. मग ते `इंम्पोर्टेड' इलेस्टिक आणि हूक त्याच धंद्यातल्या एका लोकल उत्पादकाला विकले... ते त्याचे प्रॊफिट होते..
त्यावर त्यानं गाडी घेतेली होती...
--- ह्यातला विनोदाचा, असभ्यपणाचा भाग सोडला, तरी बिझिनेस आणि मराठी माणूस यांच्या नात्याविषयी ते काय विचार करतात, हे विचार करण्यासारखं आहे...
...काय?
----------------------------------
http://zulelal.blogspot.com

मुक्तकप्रकटनविचार

प्रतिक्रिया

चिरोटा's picture

10 Jul 2010 - 11:34 am | चिरोटा

चांगला किस्सा.व्य्वसाय करण्यासाठी शक्कल लढवावीच लागते.ह्यात गुजराती/सिंधी समाजातील लोक आघाडीवर असतात.
पूर्वी एकदा "adult content website developing' चे कंत्राटी काम पाहिजे का ? असे विचारणारा महाभाग ट्रेनमधे भेटला होता.!!
P = NP

विंजिनेर's picture

10 Jul 2010 - 11:36 am | विंजिनेर

तुमचे चुटके, छोटेखानी लेख नेहेमीच विचार करायला लावतात. पत्रकाराची बारीक सारीक टिपून घेण्याची निरिक्षणशक्ती लपून राहत नाही :)

प्रदीप's picture

10 Jul 2010 - 7:49 pm | प्रदीप

हेच म्हणतो. तुमचे लेख आवडतात, असेच लिहीत रहावे.

अवलिया's picture

10 Jul 2010 - 11:44 am | अवलिया

सहजरावांनी मध्यंतरी टोप्यांचा धंदा चालु केला होता ते आठवले.

आळश्यांचा राजा's picture

10 Jul 2010 - 12:26 pm | आळश्यांचा राजा

काय टायमिंग आहे राव!

आळश्यांचा राजा

आळश्यांचा राजा's picture

10 Jul 2010 - 12:28 pm | आळश्यांचा राजा

विनोदाचा, असभ्यपणाचा भाग सोडला, तरी बिझिनेस आणि मराठी माणूस यांच्या नात्याविषयी ते काय विचार करतात, हे विचार करण्यासारखं आहे..

असभ्यपणा कुठे जाणवला नाही. विनोद आहे खरा. पण त्या विनोदामुळेच सत्य ठळकपणे समोर आले आहे. फार छान सांगितलाय किस्सा.

आळश्यांचा राजा

श्रावण मोडक's picture

10 Jul 2010 - 12:44 pm | श्रावण मोडक

वा... त्या बापाची व्यवसायबुद्धी भारीच. आणि काही वर्षांत कशाला, हे दुकान लवकरच सुरू झालेलं दिसेलही कदाचित.

स्वाती२'s picture

10 Jul 2010 - 7:35 pm | स्वाती२

सॉलिड!

रेवती's picture

10 Jul 2010 - 8:32 pm | रेवती

हम्म!
मराठी माणसांनी (त्यात बायकाही आहेतच) विचार करावा असे अनुभव! तुमचे लेखन नेहमी वाचनीय असते. बापलेकातला संवाद वाचून तो प्रसंग डोळ्यासमोर आला. त्यांच्या नात्यातला मोकळेपणा दाखवून गेला.

रेवती

चतुरंग's picture

10 Jul 2010 - 10:15 pm | चतुरंग

छानच अनुभव. आउट ऑफ बॉक्स विचार करण्याची क्षमता हे गुज्जू. मारवाडी, सिंधी धंद्यातल्या यशाचे मुख्य गमक असते.
ही क्षमता निरीक्षणाने येते असे माझे मत.

माझा मामेभाऊ अशा स्वभावाचा आहे त्यामुळे अगदी लहान वयापासून धंदाच डोक्यात.
नववीत असताना दिवाळीला सोलापूरहून लहान मुलांचे कपडे घेऊन आला आणि मिरजेत विकले. तुफान फायदा झाला!
घरी म्हशी पाळल्या, बायोगॅस प्लँट चालवला, म्यूझिक सिस्टिम्स तयार करणे सगळे उद्योग केले. आता इंजिनिअरिंग कॉलेजेस साठी मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल ट्रेनिंग इक्विपमेंट करुन द्शभर विकतो.
कुठल्याही कामाची लाज न वाटणे हा त्यातला मुख्य भाग असतो.

चतुरंग