सकाळी उठावे | सुसाट सुटावे |
ऑफिस गाठावे | कैसेतरी ||
इच्छा गं छाटाव्या | पोळ्या अन् लाटाव्या |
वेळाही गाठाव्या | सगळ्यांच्या ||
चढावे बशीत | गर्दीत घुशीत |
रोज या मुशीत | कुटताना ||
धक्के ते मुद्दाम | नजरा उद्दाम |
गाठण्या मुक्काम | सोस बये! ||
उशीर अटल | चुकता लोकल |
जीवही विकल | संभ्रमित ||
लागते टोचणी | भिजते पापणी |
जावे का याक्षणी | तान्ह्याकडे? ||
मस्टर धोक्यात | छकुला डोक्यात |
आयुष्य ठेक्यात | बसेचिना ||
रोजची टुकार | कामे ती भिकार |
बंड तू पुकार | बुद्धी म्हणे ||
एक तो 'वीकांत' | एरव्ही आकांत |
समय निवांत | मिळेचिना ||
तेव्हाही आराम | असतो हराम |
कामे ती तमाम | उरकावी ||
लावून झापड | शिवावे कापड |
तळावे पापड | निगुतीने ||
कामसू सचिव | सखीही रेखीव |
गृहिणी आजीव | प्रियशिष्या ||
काया रे शिणते | मनही कण्हते |
कुणी का गणते | श्रम माझे? ||
नित्याची कहाणी | मनात विराणी |
जनांत गार्हाणीं | सांगो नये ||
पेचात पडतो | प्रश्नांत बुडतो |
जीव हा कुढतो | वारंवार ||
"अशी का विरक्त? | व्हावे मी उन्मुक्त |
जीव ज्या आसक्त | ते शोधावे ||
प्रपंच सगळा | सोडूनि वेगळा |
एखादा आगळा | ध्यास घेई ||
तारा मी छेडाव्या | निराशा खुडाव्या |
काळज्या उडाव्या | दिगंतरी ||"
अंगाला टेकत | लेकरु भेकत |
आणते खेचत | भुईवर ||
उशीर जाहला | जीव हा गुंतला |
प्रपंची वेढला | चहूबाजूं ||
कल्पना सारुन | मनाला मारून |
वास्तव दारुण | स्वीकारते ||
बंधने झेलावी | चाकोरी पेलावी |
वाट ती चालावी| 'रुळ'लेली ||
विसर विचार | रोजचे आचार |
होऊनि लाचार | उरकावे ||
काही न मागणे | केवळ भोगणे |
रोजचे जगणे | विनाशल्य ||
हा जन्म बिकट | गेलासे फुकट |
हाकण्या शकट | संसाराचा ||
तरीही अखंड | आशा ही अभंग |
मनी अनिर्बंध | तेवतसे ||
ठेवा तो सुखाचा | निर्व्याज स्मिताचा |
विसर जगाचा | पाडी झणीं ||
जातील दिवस | निराश निरस |
झडेल विरस | आयुष्याचा ||
खरी की आभासी | आशा ही जिवासी |
बळ अविनाशी | देई खरे ||
पुनश्च हासून | पदर खोचून |
देई ती झोकून | हुरुपाने ||
[हीच कविता येथेही वाचता येईल. 'वीकांत' = वीक-एंड. हा शब्द एका मराठी अनुदिनीवर वाचला. त्यावरूनच ही कविता सुचली.]
प्रतिक्रिया
5 Feb 2008 - 9:03 pm | चित्रा
नंदन,
कविता सुरेख आहे. खूप आवडली.
चित्रा
5 Feb 2008 - 9:12 pm | वरदा
खूपच सुंदर अगदी मुंबईतली रोज दिसणारी स्त्री...फारच रिकलिस्टिक.....झकास जमलेय....
5 Feb 2008 - 9:13 pm | वरदा
हे सगळ्यात जास्तं आवडलं...
पुनश्च हासून | पदर खोचून |
देई ती झोकून | हुरुपाने ||
5 Feb 2008 - 9:13 pm | धनंजय
फारच छान. कल्पना चांगली आहे, आणि माध्यम उत्कृष्ट. शब्दही नेमके सापडले आहेत.
एकदोन ओळी बदलता येतात का बघा :
> तरीही अखंड | आशा ही अभंग |
> _मनी_अनिर्बंध_ | तेवतसे ||
हे "मनीअ - निर्बंध" असे वाचावे लागते. ते बरे वाटत नाही.
> खरी की आभासी | आशा ही जिवासी |
> _दिलासा_ अविनाशी_ | देई खरा ||
हे कसे झाले!!! :-)
5 Feb 2008 - 9:27 pm | मुक्तसुनीत
> तरीही अखंड | आशा ही अभंग |
> _मनी_अनिर्बंध_ | तेवतसे ||
>हे "मनीअ - निर्बंध" असे वाचावे लागते. ते बरे वाटत नाही.
हा स्टँडर्ड यतिभंग आहे. यात चूक नाही.
> खरी की आभासी | आशा ही जिवासी |
> _दिलासा_ अविनाशी_ | देई खरा ||
हे निश्चितच हुकलेले आहे. पहा आमच्या विटा चालतात का : ;-)
खरी की आभासी | आशा ही जिवासी |
शाश्वत धीरासी | देई खरी||
(धीरासी देणे मधे "स, ला , ते" हा द्वितीयेचा प्रत्यय लावला आहे. धीरासी देणे = धीर देणे. "आशा खरा , अविनाशी दिलासा देते" च्या ऐवजी "खरी आशा धीर देते " असे बनले. त्यामुळे त्याचे लिंग बदलले. )
5 Feb 2008 - 9:36 pm | नंदन
चालू शकेल. अर्थ आणि वजनाला फिट बसते आहे. तेव्हा ताजमहालाला विटाकाम नाही म्हणता येणार, तर अस्ताव्यस्त झालेले घर नीटनेटके करावे तसे काहीसे म्हणायला हवे :)
नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)
5 Feb 2008 - 9:14 pm | चतुरंग
फारच छान!
अगदी पटले, जिवाची कुतरओढ करत ह्या कसरती आयुष्यभर करणारी 'ती' खरंच अशीच आहे.
विचार अभंगाच्या ठेक्यात सुंदर गुंफले आहेत.
चतुरंग
5 Feb 2008 - 9:23 pm | नंदन
तीन मिनिटांत पाच प्रतिसाद :). धन्यवाद, मंडळी.
धनंजय, ६,६,६,४ चे सूत्र पाळायचा प्रयत्न केला पण यमक जुळवण्याच्या भानगडीत मनीअ निर्बंध हा यतिभंग काही टाळता आला नाही. तीच गोष्ट अविनाशीची. पर्यायी तीन अक्षरी शब्द शोधण्यासाठी डोकं बरंच खाजवलं, पण काही सुचलं नाही :(. [बाकी, दिलासा मिळतो तो मुलाकडे पाहून असं म्हणायचं आहे.]
नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)
5 Feb 2008 - 9:27 pm | मुक्तसुनीत
:-)
5 Feb 2008 - 10:06 pm | सहज
यथार्थ वर्णन | करी तो नंदन |
होऊ दे मंथन | आता घरोघरी ||
आवडले.
अवांतर - केशवसुमार कच्चा माल पाहून खुश होतील. :-)
5 Feb 2008 - 10:52 pm | विसोबा खेचर
अवांतर - केशवसुमार कच्चा माल पाहून खुश होतील. :-)
हेच म्हणतो!
केशवा, टेक युअर ओन टाईम पण येऊ दे एखादे फर्मास विडंबन...
आपला,
(नंदन आणि केशव, दोघांचाही क्रॉम्प्टन फ्यॅन) तात्या.
5 Feb 2008 - 10:13 pm | स्वाती दिनेश
सुंदर रचना नंदन,
पुनश्च हासून | पदर खोचून |
देई ती झोकून | हुरुपाने ||
हे विशेष आवडले.
स्वाती
5 Feb 2008 - 10:19 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नंदन,
अभंग आवडले.
(फ. मु. शिंदेंच्या फकिराच्या अभंगाची आठवण झाली )
5 Feb 2008 - 10:35 pm | केशवसुमार
नंदनशेठ,
एकदम कडक अभंग..आमचा सलाम..
केशवसुमार..
अवांतर अभियांत्रीकी महाविद्यालयात असताना आम्ही असे च ३०-४० ओव्या खरडल्या होत्या त्याची आठवण झाली..धन्यवाद
बारावीच्या वर्षास | करी कसून अभ्यास|
उत्तमगुण तयास | मिळती विश्वासे | |
उत्तम गुण मिळता | भविषाची चिंता|
डॉक्टर की अभियंता| मातापीता ठरवती | |
......
......
प्रत्येक विषया | चारच दिवस |
या हिशोबे अभ्यास| पास होण्या पुरेसा | |
....
वेळेला बॉयलर सुट| इतर वेळी फॅशन|
अशी ही जीन | कधीतरी धुवावी | |
तेव्हा जाल/ संकेतस्थळे वगैरे नव्हत .. आता जुना पसारा शोधला पाहिजे..
5 Feb 2008 - 10:42 pm | विसोबा खेचर
नंदन सायबा,
अरे यार किती छान लिहिलं आहेस! वाचून खूप बरं वाटलं!
लागते टोचणी | भिजते पापणी |
जावे का याक्षणी | तान्ह्याकडे? ||
काया रे शिणते | मनही कण्हते |
कुणी का गणते | श्रम माझे? ||
समस्त मुंबईकर कष्टकरी महिलावर्गाचे विचार मांडले आहेस रे नंदनशेठ! धन्य आहे तुझी...
पुनश्च हासून | पदर खोचून |
देई ती झोकून | हुरुपाने ||
क्या बात है.. यातला मुंबईकर जिन्दादीलपणा खास वाखाणण्याजोगा!
नंदनसायबा, तुझ्या या कवितेने मिपाची उंची खूप वाढली आहे एवढेच या क्षणी म्हणावेसे वाटते!
तुझाच,
तात्या.
3 Jul 2010 - 5:49 pm | रेवती
हे फक्त मुंबईच्या तमाम कष्टकरी महिलांचे विचार नाहीत तात्या!
जगातल्या सगळ्या आया (होय हो, परदेशातल्यासुद्धा!) आपापल्या मुलांशी अश्याच जिवाभावाने बांधलेल्या असतात आणि नोकरी किंवा इतर गोष्टींपायी त्यांच्या मनाची अशीच कुतरओढ होते. मुले लहान असताना, लहान आहेत म्हणून तर मोठी झाल्यावर 'आता मोठी झालीत' म्हणून काळजी हा प्रकार कोणत्याही आईला चुकत नाही. आईच्या मायेला स्थल कालाचे बंधन नाही. व्हिसाचीही गरज नाही. भारतात बसलेली आई परदेशातल्या मुलाजवळ मनाने असतेच.
रेवती
5 Feb 2008 - 11:14 pm | सौ साधना डोंगरे
स्त्री जन्मा ही तूझी कहाणी
एकवीसाव्या शतकातील ही वीराणी.
5 Feb 2008 - 11:48 pm | ऋषिकेश
वा नंदन वा!
सगळी कविताच झकास!!
त्यातहि
मस्टर धोक्यात | छकुला डोक्यात |
आयुष्य ठेक्यात | बसेचिना ||
ठेवा तो सुखाचा | निर्व्याज स्मिताचा |
विसर जगाचा | पाडी झणीं ||
पुनश्च हासून | पदर खोचून |
देई ती झोकून | हुरुपाने ||
हे अधिक भावले आणि वीकांत ही आवडला ;) पण कवितेचे नाव तितकेसे रुचले नाहि. अधिक नेटके आणि नेमके हवे असे वाटले (पण दुसरे सुंदर नाव सुचले नाहि सुचल्यावर सांगिनच :))
खूप मस्त!
5 Feb 2008 - 11:54 pm | बेसनलाडू
उत्तम अभंगवाणी. आवडली.
(वारकरी)बेसनलाडू
6 Feb 2008 - 12:29 am | प्राजु
तेव्हाही आराम | असतो हराम |
कामे ती तमाम | उरकावी ||
सत्य स्थिती..
कामसू सचिव | सखीही रेखीव |
गृहिणी आजीव | प्रियशिष्या ||
हे हि खरंच आहे..
तरीही अखंड | आशा ही अभंग |
मनी अनिर्बंध | तेवतसे ||
आशा आहे म्हणून तर जग चालू आहे..
पुनश्च हासून | पदर खोचून |
देई ती झोकून | हुरुपाने ||
काय करणार... दुसरा पर्याय काय आहे?
अप्रतिम कविता आहे...
- प्राजु
6 Feb 2008 - 2:33 am | बेसनलाडू
आशा आहे म्हणून तर जग चालू आहे..
यावरून एक सुभाषित आठवले. ते येथे उधृत करण्याचा मोह आवरत नाही. विशेष म्हणाजे हे सुभाषित आशा भोसलेला कुणीतरी तिच्याच वाढदिवसादिवशी भेट म्हणूनही ऐकवले होते; आणि ते आशाताईंना शोभूनही दिसते -
आशा नाम मनुष्याणाम् काचिदाश्चर्यशृंखला
यया बद्धा: प्रधावन्ति मुक्तास्तिष्ठन्ति पंगुवत्
अर्थ - आशा ही माणसांना बांधून ठेवणारी अशी शृंखला आहे की जिने बांधले असता (जिच्या प्रभावाखाली) सगळे (कसल्यातरी आशेने, आसेने) पळत राहतात आणि जिच्यापासून मुक्त असलेले पांगळ्याप्रमाणे एका जागी अडकून पडतात/राहतात.
(स्मरणशील)बेसनलाडू
6 Feb 2008 - 12:55 am | मुक्तसुनीत
करंदीकरांची आठवण करून दिलीत :-)
6 Feb 2008 - 3:01 am | प्राजु
बेसन लाडू,
छान आहे सुभाषित. मला रेडिओवरील कार्यक्रमाला कुठेतरी उपयोगी पडेल हे... धन्यवाद.
- प्राजु
6 Feb 2008 - 9:01 am | प्रमोद देव
आता नंदन खर्या अर्थाने कवि म्हणून प्रस्थापित झाला.
रचना सोपी,सुटसुटीत आहे. आवडली.
6 Feb 2008 - 9:54 am | आजानुकर्ण
अभंग आवडले. अप्रतिम!
(वारकरी) आजानुकर्ण
6 Feb 2008 - 10:18 am | आनंदयात्री
सुंदर अभंग .. आवडले.
7 Feb 2008 - 4:22 am | llपुण्याचे पेशवेll
आपल्याला तर बुवा आवडली फार....
पुण्याचे पेशवे
7 Feb 2008 - 3:10 pm | ॐकार
लावून झापड | शिवावे कापड |
तळावे पापड | निगुतीने ||
मोजके आणि परिणामकारक शब्द असल्याने थेट संवादाच्या रूपात येणारे अभंग आवडले. शेवटच्या पदात अभंग प्रथमपुरुषातून बाहेर पडतात तेव्हा कवीचा वेगळेपणा एकदम जाणवतो.
कविता आवडली.
7 Feb 2008 - 10:11 pm | अनिला
स्त्रीसूक्त या नावाचे आष्विनी धोगडे यान्चे पुस्तक १९८८ ल प्रसिध्ध झाले होते. त्यात अशाच पुश्कळ कविता आहेत, मिळल्यास वाचाव्या.
धन्यवाद.
8 Feb 2008 - 2:31 pm | नंदन
मंडळी. तुम्ही दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल आभारी आहे.
केशवराव, तुमच्या जुन्या ओव्या वाचायला नक्कीच आवडतील.
अनिला, सुचवणीबद्दल आभार. स्त्रीसूक्त नक्कीच मिळवून वाचायचा प्रयत्न करेन.
नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)
8 Feb 2008 - 10:33 pm | सुवर्णमयी
मस्त! कविता आवडली. शेवट सुद्धा.
24 Nov 2008 - 4:01 pm | बिपिन कार्यकर्ते
मस्त कविता...
तेव्हा वाचायची राहून गेली होती बहुतेक. खूपच सुंदर. आधुनिक गृहिणीचे यथार्थ वर्णन.
बिपिन कार्यकर्ते
24 Nov 2008 - 5:39 pm | घाशीराम कोतवाल १.२
प्राजु ,तात्या अनिल बिपिन भो याच्याशी अगदी सहमत आहे
आजच्या धावपळिच्या युगात किति कष्ट घेते स्त्री
मागोवा - आमच्या काही उचापत्याचा...
24 Nov 2008 - 7:38 pm | शितल
स्त्री गाथा आवडली.
:)
24 Nov 2008 - 7:51 pm | यशोधरा
मस्तच रे नंदन :)
24 Nov 2008 - 8:56 pm | संदीप चित्रे
खूपच सुरेख कविता... खूप खूप आवडली रे मित्रा...
कुठल्या ओळी इथे देऊ, सगळी कविताच आवडलीय !!
--------
अवांतरः तुझ्या वडिलांना स्टार माझाच्या ऑफिसमधे भेटून आनंद झाला. त्यांना नमस्कार कळव.
25 Nov 2008 - 12:15 am | चकली
छान कविता... खूप आवडली
चकली
http://chakali.blogspot.com
25 Nov 2008 - 1:46 pm | अन्वय
ज॒बरदस्त रे भाऊ! लगे रहो...
25 Nov 2008 - 9:31 pm | शाल्मली
नंदन,
छान झाली आहे कविता.
खूप आवडली.
--शाल्मली.
25 Nov 2008 - 10:16 pm | अनंत छंदी
नंदनजी
ही कविता वाचून महानगरात घड्याळाच्या काट्याबरोबर धावणार्या, आनि परिस्थितीसमोर काहीशा अगतिक बनलेल्या आजच्या स्त्रीचे मूर्तिमंत चित्र डोळ्यासमोर उभे राहते.त्या स्त्रीचा हा सल तुम्ही नेमका शब्दात पकडला आहे. तिच्या भूमिकेशी तद्रुप झाल्याशिवाय हा नेमकेपणा अशक्य आहे. तुमचे मनापासून अभिनंदन!!!
26 Nov 2008 - 11:54 am | नंदन
आपल्या सर्वांच्या प्रतिक्रियांबद्दल मनःपूर्वक आभार.
(शेवटून दुसर्या चरणातला यतिभंग दुरूस्त केला आहे.)
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
3 Jul 2010 - 12:05 am | आनंदयात्री
किती सुंदर रे कविता !
पुन्हा वाचली .. फार छान वाटले.
3 Jul 2010 - 11:26 am | जयवी
नंदन....खूप दिवसांनी तुझी कविता वाचली.
उच्च !!
नोकरी करणार्या स्त्रीचं वर्णन फार सुरेख केलं आहेस. शेवट तर जबरी !!
खूप खूप आवडेश :)
3 Jul 2010 - 1:00 pm | आनंद
सुंदर कविता !
कुसुमाग्रजांची आगगाडी आणि जमीन
आठ्वली..
3 Jul 2010 - 1:19 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
मस्तच ...
नंदन, किती दिवस आणखी लेखणी म्यान करून ठेवणार?
अदिती
3 Jul 2010 - 6:09 pm | सहज
नंदनशेठ किती भाव खाल अजुन? तुमच्यासारखे लिहत नाहीत वर तिकडे लोक नाव ठेवतात दर्जा नाय.
3 Jul 2010 - 6:34 pm | मस्त कलंदर
लवकर लिही रे नंदन...
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
4 Jul 2010 - 12:11 pm | ऋषिकेश
वाट किती बघायला लावायची लोकांना!
ऋषिकेश
------------------
माझे आवडते ब्लॉग या सदरात वाचूया या आठवड्याचा ब्लॉग: अक्षरधूळ, लेखकः चंद्रशेखर
4 Jul 2010 - 9:03 pm | बिपिन कार्यकर्ते
कोण नंदन?
धन्यवाद.
बिपिन कार्यकर्ते
3 Jul 2010 - 5:24 pm | राजेश घासकडवी
उशीर जाहला | जीव हा गुंतला |
प्रपंची वेढला | चहूबाजूं ||
या कवितेत शहरी स्त्रीच्या कुतरओढीचं चित्रण केलं असलं तरी वरच्या ओवीमुळे (व इतरही काही पंक्तींमुळे) ही कविता ध्येय न सापडलेल्या, कुठे जातोय याचा निवार न करता प्रवाहात पडलेल्या, व तरण्यासाठी अविरत केविलवाणे हातपाय मारणार्या व्यक्तीची वाटते.
राजेश
3 Jul 2010 - 5:52 pm | रेवती
हा धागा वाचायचा कसा राहून गेला असे वाटले.
अभंग छान जमलेत.
रेवती
4 Jul 2010 - 11:40 am | यशोधरा
:)
4 Jul 2010 - 9:40 pm | अभिज्ञ
मस्त कविता.
अभिज्ञ.
4 Jul 2010 - 8:31 pm | स्मिता चावरे
आवडली..