आझमचाचा. गावातील त्याच्या घरी पहिली सकाळ उजाडली तेव्हा आमचा कार्यक्रम ठरला होता. आदले दिवशी चाचा म्हणाला होता की जीप किंवा बसनं जाऊ. एम-८० वर त्रास होण्याची भीती त्याला वाटत होती. पण सकाळी त्यानंच कार्यक्रमात बदल करून एम-८० वर येण्यास मान्यता दिली होती. कार्यक्रम किमान तीन दिवसांचा होता. तो ठरण्याचं कारणही तसंच होतं.
अजिंठ्यात गाईड करण्याचं काम चाचानं थांबवलं त्याला काही वर्षं झाली होती. 'अब लोगोंको एक दिनमें सब चाहीये. अजिंठाका इतिहास एक दिनमे कैसे पुरा होगा?' चाचाचा बिनतोड सवाल होता. एका दिवसात अजिंठ्याचा इतिहास सांगणं हा त्याच्यावरच अन्याय असायचा. त्यानं ते बोलूनही दाखवलं. चाचा गाईड झाला होता तो परिस्थितीमुळं. पण त्याला मुखोद्गत असणारा इतिहास त्या विषयाच्या काही प्राध्यापकांना (मी जबाबदारीनं हा शब्द वापरतोय. खऱ्या अर्थानं प्राध्यापक. अधिव्याख्याता पदावर राहून प्राध्यापक हे बिरुद मिरवणाऱ्यांचा तर चाचाच्या संदर्भात विचारही होऊ शकत नाही) चाचानं लाजवलं असतं. इतिहासाचा असा चालता - बोलता कोश तो. एकेका दिवसात काही रुपये कमावण्यासाठी गाईडगिरी करणं शक्यच नव्हतं त्याला. पोपटपंची करीत इतिहास सांगणाऱ्यांचा त्याला संताप होता. त्यामुळं त्यानं ते काम थांबवून दिलं. आता तो गाईड म्हणून काम करायचा ते फक्त मोजक्या लोकांसाठीच. हे मोजके लोक म्हणजे कोणा-ना-कोणा तज्ज्ञाच्या शिफारशीसह आलेले चोख संशोधक. शिफारस हा शब्द चुकला. चाचानं अशा लोकांसाठी लावलेली ती चाळणी असायची. त्याचे हे सुहृदच एखाद्या संशोधकाला चाचा गाईड करेल की नाही याचा अंदाज घेऊन त्या व्यक्तीला पुढं पाठवायचे. मग त्यांच्यासाठी चाचा आठ दिवसांचा अजिंठा अभ्यासवर्ग चालवायचा. एकावेळी बहुदा एकच संशोधक. कोणी गट करून आलंच आणि तितका वेळ देणार असेल तर त्यांच्यासाठी. रोज गुंफा गाठायच्या. दिवसभर त्याचं बोलणं चालू असायचं. एकेका गुंफेत किमान अर्धा ते पाऊण तास. काही खास ठिकाणी चाचा तास ते सव्वातास घ्यायचा. संध्याकाळी घरी. दुसऱ्या दिवशी पुन्हा लेण्यांची वाट. आठ दिवसांपेक्षा कमी काळासाठी संशोधकांना गाईड करणार नाही, हा नियम त्या काळात चाचानं जीवापाड जपला होता. चाचाचं हे अजिंठाप्रेम लेण्यांपाशी आमची एम-८० आली तेव्हाच मला दिसून आलं. गाडी पार्क केली आणि मी लेण्यांच्या दिशेनं वळलो. चाचानं रोखलं. 'ऐसे नही,' त्यानं मला बाजूला नेलं. लेण्यांकडं जाणारी वाट उजव्या हाताला ठेवून तो थोडं मागं गेला. आणि म्हणाला, 'इथून उंची पाहून ठेव. बाकी रात्री सांगेन.' मग तिथंच उभं राहून त्यानं लेण्यांविषयी प्राथमिक माहिती सुरू केली.
अजिंठा म्हटलं की, चित्रं, रंग, बुद्धाची कथा आणि शिल्पकला... पण नाही. चाचानं सुरवात केली तीच माझी विकेट घेत. चाचा शिरला तो थेट वास्तूरचनाशास्त्रामध्ये. "गुंफांचं वास्तूरचनाशास्त्र आणि माणूस एरवी करतो त्या बांधकामाचं वास्तूरचनाशास्त्र नेमकं उलटं असतं. एरवी तुम्ही पायापासून कळसाला जाता. इथं आधी छत आणि मग पाया असं काम होतं..." चाचा बोलू लागला. मग त्या काळच्या या शिल्पींना दगडाचं ज्ञान कसं असेल, त्यातील त्यांची प्रगती अगदी आजच्या माणसांपेक्षाही पुढची कशी आहे हे सांगून झालं. कारण स्पष्ट होतं. दगडात कोरलेली ही शिल्पं आहेत आणि गुंफांचं हे काम उलटं करावं लागतं. म्हणजे वरून खाली, पुढून मागे या क्रमानं. अर्धं काम केल्यानंतर पुढचा दगड खराब, कमी मगदुराचा निघाला तर आधीचं कामही वाया जायचं. ते जाऊ न देता ही लेणी झाली आहेत म्हणजेच ते शिल्पी 'आज हम जिसे ज्यॉलॉजी कहते है, वो ये लोग जानते थे. ऐसा लगता है की, वो हमसे भी एडव्हान्स्ड थे.' मग चाचानं सुरू केली सह्याद्रीची 'ज्यॉलॉजी'. बेसॉल्ट, लाव्हा फॉर्मेशन वगैरे सांगता सांगता देशातील सर्व प्रसिद्ध गुंफा महाराष्ट्रातच आहेत आणि त्यांची संख्या जवळपास १५०० आहे, अशी सामान्य ज्ञानात भरही टाकून तो गेला. "बिल्डींग आर्किटेक्चरमें अगर कुछ बिगड गया तो यू कॅन रिजेक्ट द ब्लॉक अँड रिप्लेस बाय अनादर वन. मगर यहां केव्ह आर्किटेक्चरमें वो सहुलियत नही है. तो इससे मालूम होता है की, ये काम डेडिकेशनका है." हे चाचाचे शब्द त्या शिल्पींविषयीच्या घनगर्द आदरातून निथळत येत.
केव्हा तरी चाचा इतिहासात शिरला त्यावेळी आमची पावलं पहिल्या गुंफेकडं निघाली होती. "बुद्धीझ्म जो है वो सनातन धरमकी शाख नही हो सकती. क्यूंकी सनातन 'रिलिजन' है. बुद्धिझ्म फिलॉसफी है. क्यूंकी इसमें गॉडका इमॅजिनेशन नही है..." बौद्ध विचारधारेची मांडणी करता करता चाचानं सांगून टाकलं, "रिलिजन इज अ वे ऑफ लाईफ विथ ब्लाईंड फेथ इन गॉड." बुद्धिझ्ममध्ये अहिंसा आहे, पण बौद्ध भिख्खू मांसाहार करायचे आणि ही विसंगती त्यामध्ये होतीच, हे सांगण्यास तो कचरायचा नाही. बुद्धानंतर या विचारधारेमध्ये फूट कशी पडत गेली आणि मग तिच्या चार वेगवेगळ्या धारा कशा झाल्या, हा इतिहास त्याला मुखोद्गत असायचा. बिडीच्या परिणामी या बोलण्यात मधूनच त खोकायचा. पंचवीस-तीस वाक्यं झाली की, हमखास एकदा तरी. संध्याकाळी लेणीदर्शन बंद होण्याच्या वेळेस आम्ही बाहेर आलो तेव्हा आमच्या दहा गुंफादेखील 'पाहून' झाल्या नसाव्यात!
त्या रात्री चाचानं माझ्यासमोर अजिंठ्याच्या निमित्तानं भारतीय शिल्पकला, बुद्धाचं युग, प्राचीन भारतीय समाजजीवन यांचं चित्र उभं केलं. चित्र म्हणजे चित्रच. कोणतीही एक बाजू नाही की दुसरी नाही. भारतीय इतिहासाच्या संदर्भात 'पूना स्कूल' आणि 'अलीगढ स्कूल' या दोन धारा कशा आहेत, त्यांच्यात नेमका भेद कोणता वगैरे गोष्टी माझ्या कानी पहिल्यांदा पडल्या आझमचाचाकडून त्या रात्रीच. अजिंठ्याची लेणी बौद्ध परंपरेची आहेत असं मानणारा एक वर्ग आणि त्याला विरोध करणारा दुसरा वर्ग या दोन्ही बाजूही चाचाकडूनच समजल्या. इतिहासाकडं पाहण्याची चाचाची स्वतःची एक दृष्टी होतीच. ती यापैकी एका ना एका धारेचीच होती. पण चाचानं ते जाणवणारही नाही अशा पद्धतीनं दोन्ही धारांची मांडणी केली होती. अर्थात, एकदा मांडणी करून झाली की मग त्यानं आपण कोणती धारा मानतो आणि ती अधिक सयुक्तिक का, हेही सविस्तर सांगितलं होतं. अनाग्रही भूमिकेतून.
बोलता-बोलता केव्हा तरी चाचाचा प्रवेश माणसाच्या जन्माचं प्रयोजन काय हा प्रश्न घेऊन तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात झाला. या क्षेत्रात माझा त्यावेळी बालवाडीतही प्रवेश झालेला नव्हता. पण चाचाचं एक बरं होतं. तो नुसता पुस्तकी पंडित नव्हता. त्यामुळं तो जे बोलायचा ते तुमच्या-माझ्या भाषेत असायचं. त्यामुळं माझा तो बालवाडीप्रवेश कदाचित त्याचवेळी झाला असावा (मी तिथून आजही फारशा यत्ता पुढं आलेलो नाही हा भाग अलाहिदा).
चाचा अस्सल फौजी परंपरेचाच. त्यामुळं त्या रात्रीही गप्पांसोबत ओल्ड मंक होतीच. अंगावर काटे आणणारा गारठा, स्वच्छ चांदणं, वर डोळे करून पहावं तर चांदण्याच चांदण्या. डोक्यावर येणाऱ्या त्या पाण्याच्या टाक्यांच्या सावल्या. टेकायला छोटे तक्के. केव्हा तरी ओल्ड मंक संपली आणि मैफल अर्धीच असल्याची जाणीव तिघांनाही होऊन गेली. रस्ता ओलांडून मी थेट समोर गेलो. संध्याकाळी त्या दुकानाची पाटी दिसली होती. 'देशी रम' हा प्रकार त्या दिवशी आयुष्यात पहिल्यांदा चाखला. चाचाला आता थांबवणं शक्य नव्हतं इतका तो बौद्ध भिख्खुंनी आठेक शतकं खपून ही लेणी कशी कोरली असावीत हे सांगू लागला होता. दुपारी पाहिलेल्या एकेका लेण्याचं वैशिष्ट्य परत त्याच्या या कथनातून समोर उभं रहात होतं. दुपारी चाचानं लेण्यांतील रंग त्या काळात कसे बनवण्यात आले असावेत हे सांगितलेलं होतं. नैसर्गिक अशा त्या रंगांचं जतन आजच्या अतिशय प्रगत काळातही कसं अशक्य ठरत होतं हे आत्ता रात्री सांगताना त्याच्या डोळ्यांत पाणी यायचंच काय ते बाकी होतं. बहुदा त्याचवेळी त्यानं आम्हाला निसर्ग आणि माणूस यांच्या नात्याविषयीही जाता-जाता बरंच काही सांगितलं होतं. त्या काळात ग्लोबल वॉर्मिंग हा शब्दही तिथं त्याच्या कानी पडला नसावा, पण पर्यावरणाची समस्या कशी माणसाला खाऊन टाकते आहे हे सांगताना तो त्यातही कुठंही कमी नव्हता हे जाणवायचं. चाचा काही तज्ज्ञ नव्हता. केवळ कान, नाक, डोळे उघडे ठेवून वावरणारा. अभ्यासाचं महत्त्व जाणणारा. इंग्रजी वाचून समजून घेण्यासाठी कष्ट उपसलेला होता. त्यामुळं त्याची सारीच मांडणी अनाग्रही असायची. कदाचित त्यामुळंच ती अनेकांना भावत असली तरी, विद्वज्जड होत नसल्यानं अशी दुर्लक्षितही रहात असावी.
भाजलेल्या आणि उकडलेल्या शेंगा खात-खात ती देशी रमही कधी संपली हे कळालंही नाही. सोबत होते चाचीनं बनवलेल्या चिकनचे तुकडे. काहीसं पठाणी पद्धतीनं बनवलेलं चिकन. आमच्या त्या मैफिलीमुळं तिचा खोळंबा होऊ नये, म्हणून चाचानं तिला आधीच झोपायची परवानगी दिलेली असायची. नान म्हणता यावेत अशा खुसखुशीत रोट्या आणि चिकन संपवून आम्ही उठलो तेव्हा पहाट वेशीवरच आलेली होती.
---
अजिंठ्याचं ते अभ्याससत्र तिसऱ्या दिवशी संपलं. या तीन दिवसात बुद्धाच्या महापरिनिर्वाणाची कथा सांगताना चाचाच्या डोळ्यात पाणी आलं होतं. नंतर रमेशभाईंनी सांगितलं, त्या गुंफेपाशी चाचा आला की नेहमीच हळवा होतो. तसा तो त्या दिवशीही झाला होता. "ज्ञानेश्वरीका पाठ अगर सिखना है तो आलंदीमे भीक मांगकेही वो हो सकता है, घरका खाना खाकर नही," असं सांगताना चाचानं त्या जुन्या काळात अजिंठ्याच्या शिल्पींनी काय कष्ट उपसले असावेत याविषयीचा त्याचा एक अंदाजही मांडून ठेवला होता.
त्या रात्रीही आम्ही चाचाकडंच मुक्काम केला होता. त्या दिवशी दुपारनंतर गुंफांचं दर्शन झाल्यानंतर अजिंठा गावाच्याही पल्याड असलेल्या व्ह्यू पॉईंटवर गेलो होतो. गेले तीन दिवस चाचाकडून त्याचं कौतूक ऐकत आलो होतो. तिथं गेल्यावर सगळ्या लेणी घोड्याच्या नालेसारख्या तुमच्यासभोवती कशा येतात त्याचं. व्ह्यू पॉईंटवरून लेणी पाहिल्या तेव्हा तिथं बसून आम्ही काही काळ गप्पा केल्या होत्या. अजिंठ्याला धरून असलेल्या कविकल्पनांवर चाचा त्या दिवशी कडाडून कोसळला होता. असल्या कविकल्पनांच्या प्रमाणाबाहेरील उदात्तीकरणामुळं खऱ्याखुऱ्या इतिहासाकडं कसं दुर्लक्ष होतं ते सांगताना त्याच्यातील सच्चा इतिहासप्रेमी शब्दाशब्दांतून डोकावायचा. चाचा सांगायचा तो इतिहास सगळ्यांनाच पटेल असं नाही. पण त्याच्या इतिहासप्रेमाविषयी शंका घ्यायला तसूभरही जागा नसायची. त्याचा एकच दाखला देतो.
शिवाजी महाराज हा चाचाचा एक वीक पॉईंट. छत्रपतींचा इतिहास मिलिटरी दृष्टिकोणातून अभ्यासला जाणं कसं आवश्यक आहे हे सांगताना तो राजांच्या सुरत स्वारीची मांडणी करायचा. त्याच जोडीनं त्यानं सांगितलं होतं अफझल खानाच्या शिरकाणाचं लष्करी महत्त्व. छत्रपतींचा इतिहास सांगताना चाचा अर्थातच रूढ हिंदुत्त्ववादी धारा नाकारायचाच. पण ती नाकारतानाही तो उगाचच मोगलांचं उदात्तीकरणही करीत बसायचा नाही. त्यांचं माप त्यांच्या पदरात टाकूनच स्वारी पुढं जायची. मी चाचाला सहज विचारलं होतं देखील, 'हे सारं तुम्ही इतक्या समतानतेनं कसं करू शकता?' त्या प्रश्नावरच्या उत्तरातून चाचाची खरी मूस कळून चुकली होती. चाचा म्हणाला होता, 'इतिहास म्हणजे काय? येऊन जाऊन जे झालेलं असतं त्यालाच इतिहास म्हणायचं ना? प्रश्न येतो तो इतिहास कसा झाला याच्या आकलनात. मला कुतुहल आहे ते माणसं अशी का वागतात यात. ही लेणीच घे. ती कोरावीशी त्या काळातही त्या लोकांना का वाटलं असावं हा प्रश्न मला लेण्यांकडं खेचून नेतो. मग त्या लेण्यांचा आजच्या काळापर्यंतचा प्रवास असाच प्रत्येक ठिकाणी कुतुहल निर्माण करून जातो. ते कुतुहल माणसाच्या वर्तनाविषयीचंच असतं. मग त्या-त्या गोष्टींकडं पाहण्यासाठी मी मिळेल तिथून माहिती मिळवून माझी दृष्टी विस्तारण्याचा प्रयत्न करतो. बस्स. तुम्हे कहना हो तो इसेही कहीये... क्या कहा तुमने... हां. समतानता.' मी तो शब्द तसाच हिंदीत वापरला होता. त्याचा अर्थ हिंदीत काय असेल हे न उमजून.
---
आझमचाचा.
आझमचाचा आज नाहीये. पण त्यानं सांगितलेली एक कहाणी इथं नोंदवून ठेवावीच लागेल. ती आहे अजिंठ्याच्या चित्रांकनाच्या प्रयत्नांची. इतिहासावर पक्की मांड असणाऱ्या आझमचाचाची एरवीची दृष्टी श्रद्धेकडं झुकणारीही नव्हती. अंधश्रद्धेचा तर प्रश्नच नाही, असा माझा त्या चार दिवसातील आणि त्यानंतर एकदा झालेल्या पाच-साडेपाच तासांच्या भेटीतील अनुभव आहे. तरीही ही आठवण माझ्या मनावर कायमची कोरली गेली आहे. त्यातील कहाणी महत्त्वाची नाही. मला ती आझमचाचाकडून समजली हे महत्त्वाचं आहे.
अजिंठ्याची चित्रं जशी दिसतात तशी ती पुन्हा कागदावर उतरवण्याचे आजवर ज्ञात असे तीन प्रयत्न झाले आहेत. तिन्ही प्रयत्नांमागे एक प्रतिअजिंठा उभारण्याचा आधुनिक माणसाचा हेतू होता. एक प्रकारे ते एक आव्हानच. काही शतके टिकणारी चित्रं जतन करण्यासाठी असं काही करणं हे आव्हानच. आज पर्यटकांना म्हणून जी माहितीपुस्तकं दिली जातात, त्यासोबत येणारी छायाचित्रं अशाच शेवटच्या प्रयत्नांतील आहेत. या तीनापैकी एक प्रयत्न ब्रिटिशांच्या काळात झाला. काढलेली चित्रं बोटीनं नेली जात होती, ब्रिटनला. प्रवासात बोटीला आग लागली आणि चित्रं जळाली. दुसरा प्रयत्न ज्या चित्रकाराकडून होणार होता, त्यांचं निधन झालं ते हा प्रकल्प हाती घेताच आणि प्रकल्पही कोलमडला. तिसरा प्रयत्न स्वातंत्र्यानंतर झाला. त्यावेळी काढलेल्या चित्रांचेच फोटो बनून आजही लोकांसमोर आहेत. पण त्याही कापडावर उतरलेल्या चित्रांचं दुदैर्व असं की तीही अडगळीत पडली आहेत. चाचा म्हणायचा की, अजिंठ्याच्या या चित्रांचं दुर्दैव असं की ती तिथल्याच एका गुहेत स्टीलच्या नरसाळ्यांमध्ये गुंडाळून ठेवण्यात आली आहेत. जेव्हा झाली तेव्हापासून. आज ती कशी असतील हा आपला प्रश्न चाचाच्या पुढच्याच वाक्यात विरून गेलेला असतो. 'अजिंठ्याच्या चित्रांकनाचं - आणि चित्रांचंही - दुर्दैव म्हणजे त्यांची तशीच आवृत्ती चित्रांच्या स्वरूपात टिकूच शकलेली नाही. तुम्ही पाहता ते फक्त फोटो. कितीही केलं तरी कृत्रिमच.'
---
चाचाला वर्ज्यविषय कोणता असा प्रश्न माझ्यासमोर उभा ठाकल्याचा उल्लेख मी मघा केला होता. तीन दिवसांनंतर ते मला समजलं. राजकारण हा तो विषय असावा. त्या तीन दिवसांत त्या विषयाचा चाचाच्या बोलण्यातून एकदाही उल्लेख झाला नव्हता. किंबहुना आपल्या इतर विषयांत चाचानं इतकं गुंगवलं होतं की एरवी सकाळी पेपर नसेल तर अस्वस्थ होणारा मी, ते तीन दिवस पेपर न वाचताही निवांत काढले होते. काहीही चुकल्यासारखं झालं नव्हतं मला.
---
आजही केव्हाही कुठंही अजिंठा हा विषय निघाला की मी हळवा होतो, चाचाच्या आठवणीनं. चाचाइतकंच आठवतं ते त्याचं समरसून होऊन अजिंठ्याचा इतिहास मांडणं. त्याहून आठवतात ते त्याचे पाणावलेले डोळे... बुद्धाच्या महापरिनिर्वाणाची कथा सांगतानाचे... अजिंठ्याच्या चित्रांकनाचा इतिहास सांगतानाचे... या देशाचा हा मोठा वारसा असाच निसर्गाच्या कुशीत विरून जाणार आहे हे जाणवून पाणावलेले डोळे... मिचमिचे... खोलवर आत गेलेले...
प्रतिक्रिया
22 Apr 2008 - 5:31 pm | भोचक
अप्रतिम. हॅट्स ऑफ आझमकाका.
22 Apr 2008 - 6:54 pm | वरदा
या देशाचा हा मोठा वारसा असाच निसर्गाच्या कुशीत विरून जाणार आहे हे जाणवून पाणावलेले डोळे...
छान लिहिलय...
22 Apr 2008 - 8:33 pm | सहज
दोन्ही भाग आवडले.
पण आझमचाचा चा एखादा फोटो काढायला, निदान कुठूनतरी मिळवुन टाकायला पाहीजे होता असे वाटते.
25 Apr 2008 - 1:36 am | चित्रा
असेच म्हणते.
22 Apr 2008 - 9:10 pm | चतुरंग
फारच सुंदर. दोन्ही भाग एकदम चोख सोनं.
श्रावणसर, सुंदर लिखाणाबद्दल अभिनंदन.
चतुरंग
23 Apr 2008 - 8:22 am | विसोबा खेचर
म्हणतो!
नेहमीप्रमाणेच सुंदर लेखन...
अजूनही येऊ द्या...
आपला,
तात्याचाचा.
22 Apr 2008 - 9:23 pm | धनंजय
फार आवडले.
23 Apr 2008 - 8:39 am | प्रमोद देव
मोडकसाहेब आपण लिहिलेले हे जे काही आहे ते निव्वळ आझमचाचाचे व्यक्तिचित्र नसून जीवंत व्यक्तिशिल्पही आहे असे वाटते. अतिशय उत्कृष्ट लेखनाचा नमुना तुम्ही पेश केलाय. अभिनंदन!
मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
23 Apr 2008 - 12:46 pm | अभिज्ञ
दोन्हि लेख छान झाले आहेत.
असेच उत्तम लेख येउ द्यात.
अबब
23 Apr 2008 - 1:05 pm | विसुनाना
त्यामुळं त्याची सारीच मांडणी अनाग्रही असायची. कदाचित त्यामुळंच ती अनेकांना भावत असली तरी, विद्वज्जड होत नसल्यानं अशी दुर्लक्षितही रहात असावी.
मला कुतुहल आहे ते माणसं अशी का वागतात यात. ही लेणीच घे. ती कोरावीशी त्या काळातही त्या लोकांना का वाटलं असावं हा प्रश्न मला लेण्यांकडं खेचून नेतो. मग त्या लेण्यांचा आजच्या काळापर्यंतचा प्रवास असाच प्रत्येक ठिकाणी कुतुहल निर्माण करून जातो. ते कुतुहल माणसाच्या वर्तनाविषयीचंच असतं. मग त्या-त्या गोष्टींकडं पाहण्यासाठी मी मिळेल तिथून माहिती मिळवून माझी दृष्टी विस्तारण्याचा प्रयत्न करतो.
चाचाला वर्ज्यविषय कोणता असा प्रश्न माझ्यासमोर उभा ठाकल्याचा उल्लेख मी मघा केला होता....
मोठाच मार्मिक लेख.असे लेखन सातत्याने वाचायला आवडेल.
24 Apr 2008 - 9:44 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
दोन्ही भाग सुंदर झाले आहेत. अजिंठ्याला पुन्हा गेलो तर आझमचाचाची चौकशी नक्की करेन !!!
मोडक साहेब, मस्त लेख आणि लेखन !!!
24 Apr 2008 - 10:30 pm | प्रभाकर पेठकर
श्री. श्रावण मोडक,
दोन्ही भाग वाचले अतिशय उत्कृष्ट झाले आहेत. अभिनंदन.
वाचता वाचतानाच आझमचाचांना भेटण्याची, त्यांच्या नजरेतून लेणी पाहण्याची, तो इतिहास जागवण्याची ओढ निर्माण झाली. परंतु, आझमचाचा आज हयात नाहीत हे वाचून मन विषण्ण झाले. आपण खरेच भाग्यवान आहात.
26 Jul 2012 - 12:57 am | बॅटमॅन
मोदकाच्या सौजन्याने हे अप्रतिम धागे वर काढत आहे. एक नंबर लिहिलंय!!!
26 Jul 2012 - 1:23 am | अर्धवटराव
श्रामो सारख्यांची लेखणी "तयार" कशी होते?
उत्तर मिळतय कि या लेखणीचे मूळं आझमचाचा सारख्या काळ्या मातीत रुजलेली असतात.
मला माणुस म्हणुन जगण्याचा अभिमान वाटावा असे आझमचाचा पार काळजात उतरवले श्रामो जी.
धन्यवाद.
अर्धवटराव
26 Jul 2012 - 5:23 am | वीणा३
अशी जीव ओतून काम करणारी लोक खरच खूप कमी असतात. दुर्दैवाने हे लोक फक्त आपल्या कामात उत्तम असतात. त्यामुळे त्यांचं काम मर्यादित राहत. हा धागा वर काढल्याबद्दल धन्यवाद.
26 Jul 2012 - 7:46 am | स्पंदना
अगदी कारण त्या कामाशी त्यांच भावविश्व जुळलेल असत.
व्वा श्रामो! हॅटस ऑफ!
खोदकाम करणार्यांनाही धन्स.
26 Jul 2012 - 9:34 am | प्रचेतस
हा अप्रतिम धागा वर काढल्याबद्दल आभार.
31 May 2013 - 1:39 pm | स्पा
सुंदर .....................
31 May 2013 - 8:14 pm | बाबा पाटील
एकदा अजिंठा पाहिला आहे पन या लेखाने परत एकदा जाउन पहायची इच्छा झालीय.
31 May 2013 - 8:33 pm | डॉ सुहास म्हात्रे
फारच सुंदर व्यक्तीचित्रण...
लेणी-किल्ले-मंदिरे-शिल्पे पाहताना असा जाणकार बरोबर असला तर भटकंतीचे सोने होते.
पहिला धागा पण वर काढा कृपया.
14 Jun 2013 - 4:32 pm | वेल्लाभट
अप्रतिम वर्णन केलंय तुम्ही ! व्यक्ती उभी राहिली डोळ्यासमोर ! क्या बात है!
अशी माणसं विरळाच.
12 May 2024 - 9:13 am | diggi12
वाह
24 Dec 2024 - 2:44 pm | विजुभाऊ
अरेच्चाहे कसे सुटले नजरेतून?
श्रामो . तुमच्या आठवणी अजूनही हळव्या करतात
24 Dec 2024 - 4:10 pm | मुक्त विहारि
धागा वर काढल्या बद्दल, धन्यवाद...