आझमचाचा!(१)

श्रावण मोडक's picture
श्रावण मोडक in जनातलं, मनातलं
22 Apr 2008 - 5:12 pm

दिवस हिवाळ्याचे होते; पण महिना ऑक्टोबर. माझे स्नेही पत्रकार रमेश दाणे आणि मी त्यांच्याच एम-८० वरून सहा-साडेसहा तासांचा प्रवास करून अजिंठा गावात पोचलो तेव्हा साडेसहा वाजून गेले होते. आमचा सगळा प्रवास पोळून काढणाऱ्या उन्हात झाला होता. घाट चढताना सूर्य डोंगराआड गेल्यानं मिळाली ती पाऊण एक तासाचीच काय ती सावली.
घाट संपला आणि गाडी उजवीकडं वळवण्यास रमेशभाईंनी सांगितलं. कधीकाळी डांबर लागलेला तो रस्ता होता. गाव अगदी छोटंच. काही अंतर गेल्यानंतर पुन्हा उजवीकडं एक वळण घेतलं. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मोकळी जागाच होती. तिथं माणसाच्या उपयोगी पडणारं रोपटंही उगवत नव्हतं हे दिसतच होतं. शंभरेक मीटर अंतर कापलं आणि पुन्हा दोन्ही बाजूंना जीवन सुरू झालं.
सूर्य अस्ताला गेला होता. संधीप्रकाश घरांवर पसरला होता. रस्त्याच्या विरुद्ध बाजूलाही घरं होती. सगळी छोटेखानी. पण लक्ष वेधून घेत होत्या त्या डाव्या बाजूला असलेल्या पाण्याच्या दोन उंच टाक्या. इतक्या छोट्या गावात दोन टाक्या कशासाठी हा प्रश्न माझ्या मनात तरळून गेला. तिथंच दोन विहिरी होत्या. रमेशभाई म्हणाले, ब्रिटिशकालीन आहेत. त्यांची नावं गंगा आणि जमुना!
गंगा - जमुना यांच्या शेजारीच एक छोटं घर होतं. अगदी ब्रिटिशांच्या काळात शोभेलशीच रचना. तिथंच गाडी थांबवायला भाईंनी सांगितलं. मी त्या घराच्या दारापाशी थोडी बाजूला गाडी लावली. रमेशभाईंनी पुढं होऊन हाक मारली. दार उघडून साडेपाच फुटांवर एखादा इंच उंची असलेली एक मूर्ती बाहेर आली. रंग काळा. उतार वयाच्या खाणाखुणा जागोजागी दिसत होत्या. डोळे बारीक, आत गेलेले; मिचमिचे म्हणावेत असे. रमेशभाईंकडं पाहता क्षणीच त्यांच्या चेहऱ्यावर आनंदमिश्रीत आश्चर्याचे भाव आले. 'अरे, आप? आईये,' म्हणत साठी ओलांडलेला तो गृहस्थ पुढं आला. हात मिळवले. माझ्याकडं पाहिलं. भाईंनी ओळख करून दिली. 'हे आझमचाचा.'
---------
आझम अली, गंगा-जमुना, पोस्ट अजिंठा, जिल्हा औरंगाबाद. हा आझमचाचाचा पत्ता. पोस्टानं संपर्क करावयाचा असेल तर लागू पडणारा. एरवी, मी जेव्हा त्याला भेटलो त्या काळात, त्याच्याशी पोस्टानंच संपर्क व्हायचा किंवा मग त्या गावात जाऊन त्याला प्रत्यक्ष गाठावं लागायचं. तिथं भेटायचा चाचा, पण त्याची हृदयभेट व्हायची ती अजिंठा आणि इतिहास, बुद्ध आणि शिवाजी महाराज अशा विषयांमध्ये. नव्हे चाचाचं राहण्याचं घर बहुदा इतिहास हेच असायचं. क्वचितच तो तिथून वर दिलेल्या पत्त्यावर येऊन रहात असावा.
भाईंनी ओळख करून दिल्यापासून चाचा माझ्याहीसाठी चाचाच झाला (आझम अली यांच्याशी हिंदीत बोलणं व्हायचं, मधूनच ते इंग्रजीची पेरणी करायचे. तो सगळा संवाद अर्थातच अनेकवचनी असायचा. पण एरवी केव्हाही मराठीत बोलताना चाचाचा उल्लेख त्याच्या सुहृदांमध्ये एकवचनी होतो. तितक्याच, किंबहुना थोड्या अधिकच, आदरानं).
आझमचाचा! आझमचाचा हा माझ्या स्मृतींतील अजिंठा-वेरूळच्या जगद् विख्यात लेण्यांची दुसरी बाजू आहे. ही लेणी अनेकांनी अनेक वेळेस पाहिली असतील, वेगवेगळ्या दृष्टींतून ते पाहणं झालं असेल. पण अगदी खास आझमचाचाच्या नजरेतून ही लेणी पाहण्याचं भाग्य लाभलेल्या मोजक्याच लोकांमध्ये माझा समावेश झाला तो थोडा अपघातानंच.
आझमचाचाच्या नजरेतून लेणी पाहण्याचं भाग्य असं मी जेव्हा म्हणतो तेव्हा अनेकांना ती अतिशयोक्ती वाटण्याची शक्यता आहे. कारण लौकिकार्थानं आझमचाचा म्हणजे अजिंठा-वेरूळचा एक गाईड. तिथं गेल्यानंतर तसे अनेक गाईड भेटतातही. पण त्या काळात केवळ संशोधकांनाच गाईड करणाऱ्या गाईडच्या नजरेतून अजिंठा पाहणं हे वेगळंच. आझमचाचाचं वैशिष्ट्य म्हणजे तो या लेण्यांचा ब्रिटिशांच्या काळापासूचा गाईड. थोडं खोदकाम केल्यानंतर असं लक्षात यावं की त्या लेण्यांमध्ये गाईडची परंपरा ब्रिटिशांनी सुरू केली ती आझमचाचापासूनच. कधी-काळी चाचा वेरूळला होता. तिथंच त्यानं त्या काळी इंग्रजी शाळेत थोडं शिक्षण घेतलं होतं, आणि इतिहासाच्या आवडीमुळं, आणि इंग्रजी येत असल्यानं, नजरेत भरला गेला आणि अजिंठ्याचा गाईड झाला, अशी काहीशी ही कहाणी. आधी एकदा रमेशभाईंनी सांगितलेली ती कहाणी चाचाच्याच तोंडून ऐकण्यासाठी मी वाट वाकडी करून अजिंठा गाव गाठलं होतं.
---
आझमचाचा. अवघ्या दोन खोल्यांच्या त्या घरात बुढा-बुढीचं आयुष्य गेलं होतं. पाणीपुरवठा खात्याच्या वसाहतींमध्ये आझमचाचा! हे एक आश्चर्यच होतं. ब्रिटिशांच्या काळालाच शोभेल असं. चाचाचा पाणीपुरवठाच काय, कोणत्याही सरकारी खात्याशी काहीही संबंध नव्हता. तो अजिंठ्याचा गाईड असला तरी सरकारच्या सेवेत रूढ पद्धतीनं नव्हता. सरकारशी त्याचं नातं बरंचसं कंत्राटी पद्धतीचं. पण त्याच्यासारखा गाईड अजिंठ्यात असावा असं सरकारला वाटत होतं आणि म्हणून सरकारनं अपवाद करून त्याची त्या क्वॉर्टरमध्ये सोय लावून ठेवली होती. मी चाचाला भेटलो तेव्हापर्यंत त्याचं सुमारे पन्नासेक वर्षांचं वास्तव्य त्या घरात झालं होतं.
दोन खोल्यांपैकी एक स्वैपाकघर असल्यानं खरं तर ते घर एकाच खोलीचं म्हणायचं. दहा बाय दहाच्या त्या बाहेरच्या खोलीत एक बाज असावी. चाचाचे पाच-सहा फोटो असावेत. काही कागदपत्रांच्या फाईल्सही दिसत होत्या. जुनाट एक-दोन पुस्तकंही होती. जाडजूड, आजच्या भाषेत ठोकळे म्हणावीत अशी. बाकी काही नाहीच. अखेर बुढा-बुढीचा व्याप किती असावा? चाची आत स्वैपाकघरात मग्न होती. रमेशभाईंनी त्यांनाही हाक घातली तेव्हा त्या बाहेर आल्या. रमेशभाईंच्या भेटीनं त्यांनाही अतीव आनंद झालेला दिसत होता. चाची चांगलीच उजळ होती. वय चाचाच्या मागचंच.
दिवस हिवाळ्याचे असल्यानं चाचींनी आमच्यासाठी लगेचच पाणी गरम करायला ठेवलं. मला कसंसंच वाटलं, त्यांच्याकडून पाणी गरम करून घ्यावं यामुळं. पण त्यांच्या आदरातिथ्यापुढं इलाज नव्हता. दहा मिनिटांनी आम्ही गरम पाण्यानं हात-पाय धुवून घेतले. तेवढ्यात भाई आणि चाचा यांचं काही बोलणं झालं असावं. त्या वेळेपर्यंत चाचींनं रोट्या टाकण्यास सुरवात केली होती. त्याची खबर बाहेर आलेल्या दरवळानं दिली होती. आम्ही तिघंही चालतच बाहेर पडलो. पावलं गावाकडं वळली. साताठ मिनिटांच्या पायपिटीनंतर आम्ही खाटकाच्या, त्या गावातील बहुदा एकमेव, दुकानापाशी आलो. मटण घेतलं आणि पावलं माघारी वळली.
चाचा आणि भाई यांचा ऋणानुबंध खूप जुना. त्यामुळं दोघंही रमले होते जुन्या आठवणीत. विषय घुटमळत होता तो गाणं, नृत्य, शिल्पकला, चित्रकला अशा सांस्कृतिक क्षेत्रांमध्येच. मधूनच काही नावं झळकायची. ती सारी मी आधी ऐकली होती. त्यापैकी एकाशी माझा वैयक्तिक ऋणानुबंधही जुळला होता. पण माझ्या आणि भाईंच्या चर्चेत त्या नावांना जितके आयाम मिळत असत, त्यापेक्षा अधिकच आयाम आत्ता या चर्चेत मिळत होते.
घरापाशी आलो. चाचींनी मटण करायला घेतलं तेव्हा अंधार पडला होता. गाव उंचावर होतं. स्वच्छ चांदणं पसरू लागलं होतं. चाचानं एक मोठी सतरंजी काढली आणि दारासमोर टाकली. बाहेरच गारव्यात बसूया असं म्हणत. चाचा जुन्या फौजी परंपरेचा. त्यामुळं खास त्याच्यासाठी भाईंनी 'ओल्ड मंक' घेऊन ठेवली होती. मटण शिजू लागलं आणि इकडं मैफल रंगली.
---
सत्तरी ओलांडलेल्या चाचाच्या आयुष्यात वर्ज्यविषय कोणता असा प्रश्न मला त्या रात्री आम्ही दीड वाजता मैफिलीतून उठलो तेव्हा पडला. मी खरं तर तिथं गेलो होतो ते चाचाशी बोलायला. म्हणजे प्रश्न विचारण्याची भूमिका माझ्यासाठी असावी हे माझ्यादृष्टीनं गृहित होतं. प्रत्यक्षात मला प्रश्न विचारावेच लागले नाहीत. मी अनुभवलेली ती अशी पहिली मुलाखत होती, जिथं मुलाखत देणारा मुलाखत घेणाऱ्यासच प्रश्न विचारायचा आणि त्याचं अज्ञान दूर करण्याचं काम करत स्वतःचं जीवन मांडून ठेवायचा. सुरवात झाली तीच मुळी गंमतीदार. विषय भाईंच्या मूळ गावाचा निघाला. तिथली राष्ट्रीय शाळा वगैरे. गुरूजींच्याही नावाचा उल्लेख झाला. यातलं थोडं फार कानावर पडलं होतं ते मी आठवू लागलो आणि अचानक चाचानं तीरासारखा मला प्रश्न विचारला तो त्या शाळेच्या इतिहासाविषयी. माझं अज्ञान उघडं पडण्यास वेळ लागला नसताच. त्यामुळं मी ते कबूल करून टाकलं आणि सुटका करून घेतली. पण तेवढ्यात माझ्या लक्षात येऊन गेलं की भाईंनी चाचांविषयी जे सांगितलं होतं, ते पुरेसं नव्हतं. म्हणजे भाईंनी सांगितलं होतं त्यापेक्षा चाचाचा व्यासंग मोठा आहे, या अर्थानं.
चाचाची रसवंती सुरू झाली ती त्या शाळेच्या स्थापनेच्या इतिहासातून. भारतीय स्वातंत्र्याचा लढा, ब्रिटिशांचा काळ, महायुद्ध, गांधीजी, राष्ट्रीय शिक्षणाचा विचार, त्यातून काही शाळांची स्थापना, त्या शाळेचा प्रवास, स्वातंत्र्योत्तर कालखंडात त्या शाळांची झालेली स्थिती हे सगळं सांगत चाचानं भारतीय माणूस इतिहासाची हेळसांडच करतो, असं सांगून टाकलं. मी ऐकत गेलो. त्या पलीकडं काही करण्यासारखं नव्हतं. मध्ये फक्त भाईंची एखाद-दोन वाक्यं असायची. सांधेजोड म्हणावीत अशी. भाईंच्या त्या शाळेत कला या विषयाला अनन्यसाधारण महत्त्व होतं. त्या अनुषंगानं बोलताना चाचाला कलांची माहिती किती आहे हे समजलं तेव्हा मी थोडा चकीत झालो. संगीताची बऱ्यापैकी जाणकारी असणारी माणसं भेटणं तसं दुर्मिळ नसतं. चित्रकलाही कळणारी भेटतात. तसं एकेका कलेतील माहिती असणारी माणसं भेटतातच. पण एकाच वेळी अशा प्रत्येक कलेविषयीची माहिती जाणकारीनं मांडणारी माणसं विरळाच.
चाचानं तो विषय संपवताना पुन्हा मलाच प्रश्न केला. ब्रिटिशांच्या काळच्या कोणा कलेक्टरचा उल्लेख त्यानं केला. 'माहिती आहे का?' त्यानं विचारलं होतं. मी अज्ञानीच. 'तुम जहां काम करते हो उस जिलेका कलेक्टर था ये.' मग सुरू झाली त्या कलेक्टरनं केलेल्या कामाची माहिती. आणि त्यानिमित्तानं चाचानं मला फिरवून आणलं त्या काळाच्या, म्हणजे साधारण विसाव्या शतकाच्या पहाट-सकाळीच्या, प्रहरांमध्ये. अगदी लीलया चाचा जुन्या पिढीतल्या आणि समकालीन इतिहासलेखकांची नावं घ्यायचा. तो जे सांगत होता, त्यात ब्रिटिशांचं गुणगान नव्हतं. किंबहुना कोणताही आविर्भाव किंवा पवित्रा त्यात नव्हता. चाचा सांगत होता ते फक्त त्या-त्या काळात काय घडलं आणि कसं घडलं हेच. त्यात रंगभरणी नव्हती. इतिहास, इतिहास म्हणतात तो हाच हाही आविर्भाव नव्हता हे आणखी एक विशेष.
हे एक बरं झालं होतं. चाचाकडं इतिहासाचा आरंभ एकदम काही शतकं मागं झाला नव्हता. अगदी आपल्यापासूनच सुरवात करत चाचा हळुवार मागं गेला होता. मग मागं जाता-जाता त्यानं त्याचीही कहाणी मध्येच पेरून सांगून टाकली होती. बहुदा त्यानं सांगितली नसावी, ती त्याच ओघात आली असावी. कारण त्याच्या काळात चाचा स्वतःला वेगळं ठेवून विचारच करू शकत नसावा. पण तो स्वतःचाच विचार करतोय, असंही नव्हतं. 'उस वक्त हम फलाणा-फलाणा काम करते थे... फलाणे जगह थे... फलाणा स्थिती थी...' असलाच काय तो त्याचा स्वतःचा तपशील असायचा. (फलाणा हा त्याचा आवडीचा शब्द असावा, असं वाटावं इतक्या वेळा तो संवादात यायचा.) मग त्याही पलीकडं त्यानं जावं यासाठी आपल्यालाच एखादा प्रश्न विचारावा लागायचा. त्यातून तो बोलला तर बोलला.
मध्ये केव्हा तरी रोट्या झाकून ठेवल्या आहेत, असं सांगून चाची झोपी गेली होती. आम्ही उठलो तेव्हा चंद्र माथ्याकडं सरकू लागला होता. चांदण्यांचा प्रकाश आणखी स्वच्छ झाला होता. माझ्याही डोक्यात पुढच्या सकाळपासून आपल्या पदरी काय पडणार आहे याचा प्रकाश पडू लागला होता.
---
चाचा बिडी प्यायचा. ती पिण्याचीही एक पद्धत होती. चाचा अनामिका आणि अंगठ्यानं बिडी ओठात धरायचा. झुरका घेऊन झाला की, मग बिडी एरवी सिगरेट पकडली जाते तशी त्या दोन्ही बोटांच्या बेचक्यात यायची. त्याच्यासमोर मी माझं सिगरेटचं पाकीट केलं तेव्हा त्यानं ते हलकेच बाजूला सारलं. उलट आपलं बिडीचं बंडल आमच्यासमोर केलं. मग पाचेक मिनिटं त्यानं बिडी आणि सिगरेट यांचे (नसलेलेच) फायदे आणि खूप तोटे याविषयीही बोलून घेतलं होतं. दुसऱ्या दिवशी आम्ही सिगरेट बॅगेत ठेवल्या आणि बिडीलाच जवळ केलं.

वाङ्मयअनुभव

प्रतिक्रिया

शैलेन्द्र's picture

22 Apr 2008 - 7:41 pm | शैलेन्द्र

मस्तच......

भुमन्यु's picture

1 Jun 2013 - 4:25 pm | भुमन्यु

सापडला...भाग २ वाचला आणि भाग एक वाचायची तिव्र ईच्छा झाली... अखेर सापडला

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 Jun 2013 - 6:16 pm | डॉ सुहास म्हात्रे

भाग १ शोधल्याबद्दल धन्यवाद ! मलाही तो वाचायची खूप इच्छा झाली होती. तुमच्या उत्खननामुळे ती पुरी झाली !

बिपिन कार्यकर्ते's picture

2 Jun 2013 - 10:33 am | बिपिन कार्यकर्ते

श्रावणचे समग्र साहित्य http://www.misalpav.com/user/640/authored इथे वाचायला मिळेल.