आपण आपल्या या संस्थळावर विविध विषयावर वेगवेगळ्या बाजूनी विचार मांडीत असतो, त्यांची देवाणघेवाण करीत असतो. अशाच प्रसंगी समाजात कित्येक चालिरीतीबाबतही मत व्यक्त करतो. "लग्न" हा असाच एक महत्वाचा आणि प्रत्येक कुटुंबाचा जिव्हाळ्याचा विषय. वर्षानुवर्षे "विवाह समारंभ" म्हटले, की भोजनावळ, जोरदार स्वागत समारंभ, वाद्यांचा दणदणाट असे समीकरण झाले आहे; आहेर देणे, घेणे, रुसवे फुगवे काढणे, फोटो, व्हिडिओ, आदीची रेलचेल.
यात बदल तरी काय असणार? आपणदेखील वैयक्तिक पातळीवर यातील काही प्रथांना दूर केले तरी बहुतांशी लग्नात हेच दृश्य दिसत असते. अशावेळी काहीतरी "आगळे वेगळे" घडले तर मनाला फार हर्ष होतो. विशेषत: आपल्या संस्थळावरील सदस्यांना अशा या "आदर्शवत लग्न सोहळ्याची" बातमी देणे मला फार गरजेचे वाटते.
सांगली जिल्ह्यातील एक तालुक्याचे गाव आहे कवठेमहंकाळ !! आधुनिक काळाशी सुसंगत अशा शैक्षणिक वातावरणात येथील विद्यार्थी पदवी पर्यंतचे शिक्षण घेत आहेत. महाविद्यालयाचे नाव आहे "पद्मभूषण वसंतदादा पाटील महाविद्यालय; आणि प्राचार्य आहेत डॉ. अशोक बाबर; ज्यांनी आपल्या घराला नाव दिले आहे "भाषा"....स्वत: ग्रंथप्रेमी असणारे हे प्राचार्य इतरांना तसेच विद्यार्थांना देखील "क्रमिक पुस्तकांच्या पलीकडील पुस्तके वाचा" असा संदेश देत असतात. दोन दिवसापूर्वी त्यांची कन्या "अश्विनी" हिचा विवाह श्री आनंद पवार यांच्याशी झाला. लग्न कवठेमहंकाळ येथेच होते...... आणि आपल्या "ग्रंथ आवडीला" अनुसरून प्राचार्य अशोक बाबर यांनी आपल्या मुलीच्या विवाह समारंभात परंपरा व आधुनिकता यांचा मेळ घालीत लग्न मंडपातच एक ग्रंथ प्रदर्शन भरवले आणि आलेल्या (दोन्ही घराकडील) पैपाहुणे, मित्र मंडळीना स्पीकर वरून आवाहन केले कि, "वधु अन् वराला आहेर न देता प्रत्येकाने स्वतःसाठी या प्रदर्शनातील किमान एक तरी पुस्तक विकत घ्यावे..." सगळ्यांना खरोखरीच आनंद झाला..... आणि तासाभरात दहा हजार रुपये किमतीच्या पुस्तकांची विक्री झाली. या विवाह सोहळ्यात गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी मुलीचे मामा म्हणून लिंबू धरला होता.
विवाहाच्या निमंत्रण पत्रिकेत पाली भाषेतील सम्यक दृष्टी बाळगणे अशा आशयाचा चरण लिहिला होता. आहेर देणे आणि घेणे "समाजास अपायकारक" असल्याची नोंद केली होती. वाजंत्री, बेंजो, झांज पथक अशा बाबींना फाटा देऊन गोमेवाडी येथील कोलारबाजा वादन करीत होता. कोणत्याही कार्यक्रमाला मंत्री उशिरा येतात, हा समज खोटा ठरवित गृहमंत्री आर. आर. पाटील मुहूर्ताच्या अगोदर वीस मिनिटे दाखल झाले. स्थानिक कार्यकारी मंडळीनी भरवलेल्या ग्रंथ प्रदर्शनाला लोकांचा प्रतिसाद लाभला.
प्राचार्य बाबर हे आपल्या महाविद्यालयातदेखील परंपरा व आधुनिकता दिवस साजरा करतात त्यावेळीही ग्रंथ प्रदर्शनाच आयोजित केले जाते. विवाह समारंभात आहेर न घेता "ग्रंथ प्रदर्शन" आयोजित करून सुरू करण्यात आलेल्या नव्या प्रथेचे उपस्थितांनी मनापासून कौतुक केले. इतकेच नव्हे तर लग्न समारंभानंतर खुद्द प्राचार्य बाबर यांनी त्यातील १२ हजार रुपये किमतीची पुस्तके खरेदी करून गावातील "शिवाजी वाचानालयाला" भेट म्हणून दिली. व्वा !!
मी आपणास विनंती करीत आहे की आपल्या संस्थळाचा उल्लेख करून प्रत्येकाने एका पोस्ट कार्डावर प्राचार्य डॉ. अशोक बाबर यांचे या उपक्रमाबाबत मनापासून अभिनंदन करावे.... त्यांनाही या निमित्ताने कळेल की इंटरनेटवर त्यांच्या या कृतीची समाजाने नोंद घेतली आहे. त्यांचा पत्ता :
डॉ. अशोक बाबर
प्राचार्य
पद्मभूषण वसंतदादा पाटील महाविद्यालय,
मु.पो.तालुका कवठे-महांकाळ,
जिल्हा : सांगली
प्रतिक्रिया
21 May 2010 - 1:47 pm | प्रमोद देव
पण हे सगळं अस्थानी वाटलं.
बहुतेकांनी नाईलाज म्हणून पुस्तकं खरेदी केली असतील....जी पुढे कधीच वाचली जाणार नाहीत....मधल्यामध्ये प्रकाशक इत्यादि मंडळींचे चांगभलं झालं....
21 May 2010 - 3:47 pm | इन्द्र्राज पवार
"...बहुतेकांनी नाईलाज म्हणून पुस्तकं खरेदी केली असतील..."
नाही.... मला व्यक्तीशः असे वाटत नाही... त्याला कारण असे की लग्नाला आलेली निम्म्यीहून अधिक मंडळी शिक्षण क्षेत्राशी निगडीत असल्याने त्यांना पुस्तकांचे महत्व माहित असणारच... शिवाय ५० रुपयांचा एक दिवसही न राहणारा "बुके" घेऊन जाण्यापेक्षा त्याच पैशाचे पुस्तक घेऊन स्वतःच्या घरी आणणे हे केव्हाही चांगलेच....(सुट्टीचे दिवस असल्याने मुलांसाठी मांडण्यात आलेल्या पुस्तकांच्या स्टॉलवर तर झुंबड होती, तेव्हा तेथील खरेदी ही "नाईलाजास्तव"ची म्हणवत नाही..) तसेच यजमानानी स्वतःच्या खिशातुन १२ हजार काढून सहासात पदवीधर मुलांनी चालविलेल्या छोट्याशा लायब्ररीला पुस्तके भेट देणे ही बाबदेखील स्पृहणीय नाही का?
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
21 May 2010 - 10:35 pm | डावखुरा
खरोखरच स्तुत्य उपक्रम.....
आणि अशा उपक्रमाची माहीती करुन दिल्याबद्दल धन्यु...!
प्रा.बाबर सरांना नक्किच पत्र पाठवेल..
अवांतरः पेन दादांची शंका मलाही आहेच .....
ईन्द्रराज पवार साहेब माहिती द्याल तर बरे होईल..
-----------------------------------------------------------------------
ईथे भेट दिलीत तर आनंद होईल:
http://www.misalpav.com/node/12237
----------------------------------------------------------------------
"निसर्ग संगती सदा घडो,
मंजुळ पक्षीगान कानी पडो,
कलंक प्रदुषणाचा घडो,
वृक्षतोड सर्वथा नावडो...!"
21 May 2010 - 2:19 pm | मानस्
पण यानिमीत्ताने या १० हजारांपैकी १० जणांना तरी वाचनाची गोडी नक्कीच लागेल, आणि असे झाले तर त्यानी केलेल्या उपक्रमाचे चीज झाले असे म्हणता येईल.
खरोखरच आदर्श असा उपक्रम आहे हा.डॉ. अशोक बाबरांचं मनापासून अभिनंदन.
21 May 2010 - 2:52 pm | Pain
फुले, घड्याळ किंवा तत्सम गोष्टींवर (ज्यातील बर्याचशा* पडून रहतात) खर्च झालाच असता..त्यापेक्षा पुस्तके चांगली.
----------------------------
१) मुलीचे मामा म्हणून लिंबू धरला होता
२) कोलारबाजा
या २ गोष्टी कळल्या नाहीत. कोणीतरी सांगा...
21 May 2010 - 11:16 pm | इन्द्र्राज पवार
"...२ गोष्टी कळल्या नाहीत. कोणीतरी सांगा...
खुलासा #
१. मराठा समाजातील लग्नात असा प्रघात आहे की, वधुच्या मामाने (मामा नसल्यास मुलीच्या आईकडील जवळच्या ज्येष्ठ नातेवाईकास हा मान देतात...) वधुला अक्षतासमई भटजीने पुकारा दिल्यानंतर वेदीपर्यन्त घेऊन यायचे असते आणि अक्षता सुरू झाल्यापासून होईतो तिच्या मागे कट्यारीच्या टोकाला "लिंबू" अडकवून तिचे वाईट सावलीपासून रक्षण करायचे असा समज आहे. शुभ कार्यात लिंबू हा अतृप्त आत्म्यांना दूर ठेवतो असेही म्हणतात.... (दर अमावस्येला लोक आपापल्या दुचाकी, तिचाकी, चारचाकी वाहनांना लिंबु, हिरवी मिरची बांधतात त्याचे हेच कारण आहे...)
२. कोलारबाजा ~ सांगली सातारा येथील ग्रामीण भागात "सुंदरी" हे सनईशी साधर्म्य असणारे वाद्य ढोल पथकासह वाजविणारी मागासवर्गीय जमात. परंपरेनुसार माही (गावजत्रा) आणि अशा मंगलप्रसंगी या गटाला मान देतात. "बाजा" म्हणजे ग्रुप. अर्थात इकड्च्या सर्वच भागात आता मुंबईपुण्याचे वारे फिरले असल्याने अशा पध्द्तीची "गावठी" वाजंत्री हल्लीच्या पिढीला पसंत पडत नाही...सर्वत्र "डॉल्बी" जोर धरत आहे. म्हणूनच प्राचार्य बाबर यांचे कौतुक.
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
23 May 2010 - 12:27 am | Pain
धन्यवाद :)
21 May 2010 - 11:37 pm | सुधीर काळे
तुमचे लि़खाण विपुल आहे, विविध विषयांवर आहे व मस्त आहे. सध्या एका दुसर्याच प्रकल्पात अडकल्यामुळे मी इच्छा असूनही सविस्तर प्रतिसाद देऊ शकत नाहीय्. क्षमा असावी.
पण तुमचे बहुतेक सर्व लेख मी वाळले आहेत. "लगे रहो, इंद्रराज-जी!" एवढेच सध्या म्हणेन.
मला वाटते कीं तुम्ही उल्लेखलेल्या वाद्याचे नांव सुंद्री असावे. चूकभूल द्यावी घ्यावी!
अवांतरः मी ज्या भागात मोठा झालो (जमखंडी) तिथेही हे वाद्य प्रचलित असून सांगली तर माझे आजोळ आहे. मी एक वर्ष विश्रामबाग (उर्फ कुपवाड) येथील विलिंग्डन कॉलेजमध्ये शिकलोही आहे.
------------------------
सुधीर काळे, पुन्हा विठोबाच्या पंढरीत (वॉशिंग्टन डी. सी.) परत!
'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचे दुवे: प्रकरण चौथे: http://tinyurl.com/293h432
आधीच्या प्रकरणांचे दुवे 'सकाळ'ने लेखाच्या सुरुवातीला दिले आहेत.
21 May 2010 - 11:59 pm | इन्द्र्राज पवार
"....वाद्याचे नांव सुंद्री असावे. चूकभूल द्यावी घ्यावी!....
सुधीर जी.... होय.... कोल्हापुर भागातील "मांग-व्हल्लार" जमातीत (ज्यांना या वादनाचा मान दिला जातो) ते लोक या वाद्याला तुम्ही म्हणता तसे "सुंद्री" असेच संबोधतात. पण आपल्या (नको इतक्या सुशिक्षित...) मनाला सुंद्री हा "सुंदरी"चा अपभ्रंश वाटतो व लिखाणसमयी (नकळत) तेच रूप लिहीले जाते.
मी स्वतः हे वाद्य ऐकले आहे.... खरोखरी नावाप्रमाणेच सुंदर आहे... विशेषतः ज्यावेळी त्याच्या जोडीला शेजारी "तडतम तडत्म..." ताशा तानाचा पाठलाग करतो त्यावेळी.... वेड लागते... त्यातही नदीच्या किनारी हिरव्याकंच उसाकडे पहात ऐकावे. ..... इकडे म्हातार्या बायका घरातील कर्ता पोरगा कामे टाकून एकटक अज्ञातात पाहु लागला की म्हणतात, "हम्म.... लिंबु फिरव आता त्याच्या थोबाडावर...त्येला लागलिया सुंद्रीची तंद्री.."
इथे "सुंद्री" ही हमखास "वारूणी" किंवा "तमाशा तरूणी"च असते.
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
22 May 2010 - 12:04 am | शिल्पा ब
तुमच्याकडे याचा एखादा व्हिडीओ असेल तर टाका...बघायला आणि ऐकायला आवडेल..
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
22 May 2010 - 8:29 am | पाषाणभेद
छान विचार.
विवाहबद्दल असलाच विचार सामुदायीक विवाह करण्याबद्दल होण्याची आता वेळ आलेली आहे.
बाकी त्या सुंद्रिचा एखादा विडीओ टाकाच. वाटल्यास पेशल अॅरेंज करा.
डायबेटीस विरुद्ध लढा
माझी जालवही
22 May 2010 - 10:38 am | इन्द्र्राज पवार
चांगली सूचना आहे.... प्रयत्न करतो.
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
22 May 2010 - 10:44 am | इन्द्र्राज पवार
"सामुदायीक विवाह करण्याबद्दल...."
होय... पण सद्या बर्याच जाती घटकात (धनगर, साळी, बुवा....आदी) ही प्रथा चांगलीच रुजली आहे. कोल्हापूर भागातील "साखर कारखाने" या बाबतीत पुढाकार घेऊन मराठा समाजातील शेकडो तरुण-तरुणींचे कारखाना आवारात सामुदायिक विवाह घडवून आणतात ही निश्चितच स्पृहणीय बाब आहे.
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
22 May 2010 - 10:51 am | प्राजु
वाह! उत्तम उपक्रम!
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/
22 May 2010 - 11:28 pm | इन्द्र्राज पवार
प्राचार्य डॉ. अशोक बाबर यांचा ई-मेल :
E-mail: ashokbaabar@rediffmail.com
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
23 May 2010 - 3:47 am | विकास
छानच उपक्रम आहे. अमेरिकेत आता बरेच भारतीय लहान मुलांच्या वाढदिवसाला जरी मुलांच्या मित्रांना बोलावले तरी गिफ्ट न घेता एखाद्या भारतातील समाजसेवी प्रकल्पासाठी देणगी गोळा करतात. लग्नात पण असा प्रकार थोडाफार झाल्याचे माहीत आहे. जास्त येथे लग्ने न पाहील्याने पूर्ण कल्पना नाही.
आहेर अथवा पुष्पगुच्छ आणू नये या मंत्राच्या पुढची अशी पायरी असावी असे वाटते...
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
23 May 2010 - 9:53 am | इन्द्र्राज पवार
"...आहेर अथवा पुष्पगुच्छ आणू नये या मंत्राच्या पुढची अशी पायरी असावी असे वाटते......"
खरंच असावी.... इथे एकदा एका स्वागत समारंभाच्यावेळी मी आजुबाजूला पडलेला "पुष्पगुच्छ" ढीग पाहिला... जो कचर्याचे कमीतकमी दोन ट्रक्स भरतील इतपत होता.... ५० रुपयाला एक असा जरी हिशोब केला तरी ५०,०००/- झाले असतील आणि त्यांचे आयुष्य ८ तासांचेदेखील नाही. शिवाय वरपक्ष तो ढीग नक्कीच कार्यालयातुन आपल्या घरी घेऊन जात नाही.
हल्लीहल्ली तर ही कार्यालये करारात "समारंभ संपल्यानंतर पार्टीने हॉल स्वच्छ करून देणेचा आहे..." अशी अट घालतात.... कारण स्पष्ट आहे.
------------------------------------------------------------------
"चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
23 May 2010 - 6:31 am | सहज
डॉ. बाबर व श्री इंद्राज पवार, पुस्तक प्रकाशन/पुस्तके/किंमत/ आदी व्यक्ती व गोष्टींची पूर्णता माहीती नसल्याने (नेटवर सांगोवांगी (??) आवाहनाला) आदर्शवत बातमी, पोस्टकार्ड इ प्रकार न करता, आहेराच्या जुन्या प्रथा टाळायचे धाडस केल्याबद्दल तूर्तास चांगली बातमी म्हणतो.
(उचक्रमी) सहज फूलपात्रे
23 May 2010 - 1:53 pm | इन्द्र्राज पवार
श्री. भिमान्ना जाधव यांचे "सुंद्री वादन..." ~~ नाद्स्वरम या वाद्यासमवेत....
">
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
23 May 2010 - 8:07 pm | शिल्पा ब
मस्तच!!! आवडले...
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
24 May 2010 - 12:49 am | सुधीर काळे
धन्यवाद, इंद्रराज-जी! जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.
------------------------
सुधीर काळे, पुन्हा विठोबाच्या पंढरीत (वॉशिंग्टन डी. सी.) परत!
'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचे दुवे: प्रकरण चौथे: http://tinyurl.com/293h432
आधीच्या प्रकरणांचे दुवे 'सकाळ'ने लेखाच्या सुरुवातीला दिले आहेत.
24 May 2010 - 1:57 am | पाषाणभेद
श्री. भिमान्ना जाधव नंतरचे का? झब्बा घातलेले? नाही म्हणजे मोठी पिपाणी म्हणजे नादस्वरम ना? अन छोटी पिपाणी म्हणजे सुंद्री ना?
डायबेटीस विरुद्ध लढा
माझी जालवही
24 May 2010 - 9:24 am | इन्द्र्राज पवार
बरोबर.... आणि मी देखील मुद्दाम तीच फ्रेम इथे "पेस्ट" होईल या पध्द्तीने घेतली होती. तसा दोन्ही वाद्याच्या लयीत आणि परिणामात धूसर फरक आहे... आहे तो सादरीकरणात आणि उघड्या डोळ्यांना दिसून येणारा आकारातील फरक.
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
23 May 2010 - 11:29 pm | डावखुरा
धन्यु..
अशी चांगली बातमी (शंकांच्या निरसनासहीत दिल्याबद्दल)
इन्द्र्राज पवार साहेब दोन्ही गोष्टी कळाल्या....
विडेओ बद्दल विशेष धन्यवाद...पण
(विशेषतः ज्यावेळी त्याच्या जोडीला शेजारी "तडतम तडत्म..." ताशा तानाचा पाठलाग करतो त्यावेळी.... वेड लागते... त्यातही नदीच्या किनारी हिरव्याकंच उसाकडे पहात ऐकावे. ..... इकडे म्हातार्या बायका घरातील कर्ता पोरगा कामे टाकून एकटक अज्ञातात पाहु लागला की म्हणतात, "हम्म.... लिंबु फिरव आता त्याच्या थोबाडावर...त्येला लागलिया सुंद्रीची तंद्री.." )
ही मजा आली नाही..कारण स्टेज शो चा विडेओ दिला....
अशी चांगली बातमी (शंकांच्या निरसनासहीत दिल्याबद्दल) ----------------------------------------------------------------------
"निसर्ग संगती सदा घडो,
मंजुळ पक्षीगान कानी पडो,
कलंक प्रदुषणाचा घडो,
वृक्षतोड सर्वथा नावडो...!"
24 May 2010 - 12:25 am | इन्द्र्राज पवार
"...ही मजा आली नाही..कारण स्टेज शो चा विडेओ दिला...."
आपले म्हणणे मला पटते. पण हे वाजंत्री लोक फार बुजरे असतात. समाजरचनेच्या उतरंडीत अगदी तळटप्प्यावर स्वतःला ते लेखत असल्याने एखादा आपल्यासारखा "व्हॉईट कॉलर" त्यांच्याजवळ गेला तर बोलायलादेखील कचरतात. हां, आता शिक्षणाच्या सर्वदूर प्रसारामुळे यांची आताची पिढी बर्यापैकी पुढे येऊन शहरी चळवळीशी निगडीत आहे... पण तो "सुधारणे"चा शाप या नव्या दमाच्या सैनिकांना लागल्याने मूळ नाडीशी आपले काही नाते नाही अशा पध्दतीनेच यांचे वर्तन असते. त्यामुळे मागील पिढीतील जी काय पाचपन्नास झाडे तग धरून आहेत त्यांच्यातच ही कला अस्तित्वात आहे. पण वर म्ह्टल्याप्रमाणे त्यांच्यातीलच एखादा मध्यस्थ घेऊन गेलो तरच हे आपले तोंड उघडतात. अगोदरच्या प्रतिसादात वर्णन केलेल्या प्रसंगी शेतात मी त्या "तडतम.." सह सुंद्रीवादन ऐकले त्यावेळी माझ्या तीन मित्रांसह मोजुन सात लोक होते... ते देखील त्या सुन्द्रीवाल्याच्या भावकीतले.
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"