आनंद - टोपालोव : सामना १
----------------------------------
पहिल्या डावात आनंदने सपाटून मार खाल्ल्यानंतर रविवार दि. २५ एप्रिलच्या दुसर्या डावात तुंबळ युद्ध बघायला मिळणार ह्याची बालंबाल खात्री होतीच! आनंद आणि टोपा दोघांनी निराश केले नाही.
मानसिक स्थितीचा विचार केला तर आनंद डिवचला गेलेला होता, दुसर्या डावात पांढरी मोहोरी घेऊन खेळायचे असल्याने त्याला इनीशिएटिव होते, दुसरीकडे टोपालोव एका गुणाने आघाडीवर होता काळी मोहोरी असल्याने पारडे थोडे डावे असले तरी कमितकमी बरोबरीत डाव सुटला तरीसुद्धा एका गुणाची आघाडी कुठे जात नव्हती अशा स्थितीत दुसरा डाव सुरु झाला. पाहूयात -
रसग्रहण समजायच्या दृष्टीने ह्या दुव्यावर दिलेला डाव एका खिडकीत उघडा. मी दिलेल्या समालोचनानुसार एकेक खेळी करुन पहा आणि संपूर्ण डावाचा आनंद घ्या!
http://www.chessgames.com/perl/chessgame?gid=1581333
आनंद सुरुवात कोणत्या खेळीने करणार ह्याची उत्सुकता होती. वजिराच्या पुढचे प्यादे सरकवून खेळ सुरु झाला.
१ - डी ४, एनएफ ६
२ - सी ४, ई६
३ - एनएफ ३, डी५
४ -जी ३, डी x सी ४ अशा खेळ्यांनी आनंदने डाव कॅटलान ओपनिंगमधे नेला.
पटाच्या मध्यभागातली डी ५ आणि ई ५ ही दोन्ही घरे अमलाखाली आणणे आणि पांढरा उंट राजाच्या बाजूच्या सर्वात मोठ्या कर्णात नेऊन बसवणे (ह्याला बुद्धीबळाच्या भाषेत फिअनचेट्टो म्हणतात) हे दोन उद्देश आनंदने साध्य केले. (फिअन्चेट्टो हा प्रकार भारतीय बुद्धीबळातून आलेला आहे. ह्याचा फायदा म्हणजे उंट डावात अगदी सुरुवातीला कार्यरत होतो आणि कर्णातले सगळे चौकोन अमलाखाली आणायची महत्त्वाकांक्षा बाळगून असतो. याचा फायदा डावाच्या मध्यात दिसेल.)
कॅटलान मध्ये सुद्धा एक ओपन आणि दुसरे क्लोज्ड वेरिएशन असते आणि काळ्याने सी४ घरातले प्यादे घेणे अथवा न घेणे ह्यावरुन ओपन/क्लोज ठरते. ओपन मध्ये पांढरा सी४ वरचे प्यादे बळी देतो आणि त्याबदल्यात पटाचा मध्य प्रभावाखाली आणतो शिवाय मोहोर्यांची प्रगती साधून घेतो. क्लोज्ड प्रकारात काळा प्यादे स्वीकारत नाही आणि वजिराच्या प्याद्याला जोर लावून मध्य धरुन ठेवतो.
हा डाव ओपन प्रकारात गेला, सहाजिक होतं कारण टोपालोव बरोबरी घेणार नव्हता!
सहाव्या खेळीत एनई ५ असा घोडा पुढे काढून आनंदने वेगळी खेळी केलीन. सर्वसाधारणपणे राजाच्या बाजूचे कॅसल, राजे प्यादे ई३ ला नेणे, दुसरा घोडा सी ३ ला काढणे अशा टप्प्याने पांढरा पुढे निघतो पण आनंदचा नूर काही निराळाच होता. एनई ५ ने आक्रमकता दिसत होती!
पुन्हा पुढच्या सातव्या खेळीत एन ए ३ अशी वेगळीच खेळी आनंदने केली. प्याद्यांच्या मारामारीनंतर ए ३ मधल्या घोड्याने सी ४ चे प्यादे खाऊन आनंदचे दोन्ही घोडे पटाच्या मध्यात सुस्थितीत बसले. एक प्यादे कमी असले तरी मोहोर्यांची प्रगती हा महत्त्वाचा मुद्दा आनंदने साधला होता.
दोघांनी कॅसलिंग केले. पुढच्या दोन खेळ्यात टोपालोवने एन डी ७ असा घोडा आनंदच्या घोड्याच्या अंगावर घातला. (पटाच्या मध्यात प्रगत झालेले मोहरे आपल्या कमी प्रगत मोहोर्याशी लढवून मारणे हाही खेळाचा एक भाग असतो. त्याने तणाव कमी होऊन पांढर्याचे वर्चस्व कमी होते.) आनंदने घोडा डी३ मधे मागे घेतला तो सी ५ मधल्या उंटावर घालायला. काळा उंट मागे घेणे भाग होते. उंट ए ७ असा मागे जाताच आनंदने थेट वजिरावर त्याचा काळा उंट नेला बी ए ५. वजीर ई ७ मधे सरकला. आनंदने त्याचा वजीर बी ३ मधे नेला, डी ५ मधल्या घोड्यावर दबाव वाढवणे हा उद्देश. काळ्याने त्याचा हत्ती बी ८ मध्ये हलवला, बी प्यादे पुढे सरकवण्याची तयारी!
आनंदची १५ वी खेळी ही खरोखरच आश्चर्यकारक आहे. वजीर ए ३!? (बुद्धीबळाच्या भाषेत '!' ह्या चिन्हाचा अर्थ चांगली खेळी आणि '?' असे म्हणजे शंकास्पद खेळी.) प्रतिस्पर्ध्याला अनपेक्षित खेळी करणे हा मानसिक द्वंद्व जिंकण्याचा उत्तम मार्ग असतो पण त्यात धोकाही असतो कारण आडाखे चुकले तर डाव हातचा जाऊ शकतो! १५ व्या खेळीने किती गोष्टी साध्य झाल्या आहेत बघा - काळ्याच्या वजिराला जोर नाहीये, वजीर मागे घेतला तर घोडा डी ६ असा उडी मारुन त्याच्या अंगावर येतो, त्याच वेळी सी स्तंभ मोकळा झाल्याने आणि वजीर वाचवणे भाग असल्याने सी ७ हे घर बिनजोर राहते आणि हत्ती थेट सी ७ मधे मुसंडी मारु शकतो! काळ्याची सगळी मोहोरी अतिशय चमत्कारिक अवस्थेत अडकून पडली आहेत.
हा सगळा तमाशा टाळण्यासाठी वजिरावजिरी करणे हा मार्ग काळा स्वीकारतो. क्यू x ए ३. आता इथे आनंदची इंट्यूशन कामी येते. काळा वजीर दोन प्रकाराने खाता येतो एकतर बी २ मधल्या प्याद्याने किंवा सी ४ मधल्या घोड्याने. प्याद्याने मारण्यातला तोटा असा की ए स्तंभात दुहेरी प्यादी होतात आणि हा एक मोठा तोटा समजला जातो. कारण पुढचे प्यादे मागच्याची वाट रोखते आणि कोणीच कोणाला जोर देऊ शकत नाही! शिवाय आनंद आधीच एक प्यादे कमी आहे. तरीही त्याने वजीर प्याद्यानेच खाल्लान! फायदे? बी आणि सी स्तंभ मोकळे मिळाले, हत्तींचा समन्वय असल्याने ते महत्त्वाचे ठरते, प्रगत झालेला घोडा वजिराला मारण्यासाठी मागे आला नाही, दोन आक्रमक अवस्थेतले उंट मोक्याच्या जागा धरुन आहेत आणि सद्यस्थितीत सी ७ ह्या घरावर हत्तीची नजर आहे. डावाच्या उत्तरार्धात आता प्रवेश होण्याच्या बेतात आहे.
पुढच्या खेळीत एनसीई ५ असा घोडा खेळून सी स्तंभ मोकळा केला. आता काळ्या घरातल्या उंटाला तिथून हाकलले नाही तर परिस्थिती बिकट होऊ शकते हे ओळखून काळ्याने बी ६ असे प्यादे पुढे सरकवले. उंट मागे गेला पण त्या आधी आनंदने १८ व्या खेळीत सी स्तंभात हत्ती दुहेरी करण्याची पूर्वतयारी करुन ठेवली होतीन आर सी २! ई ५ मधला घोडा भलताच मोक्याच्या जागी असल्याने काळ्याच्या उंटाला बी ७ अशा कडेच्या घरात जाऊनच हत्तींचा समन्वय करावा लागला. २० व्या खेळी अखेर आनंदचे हत्ती सी पट्टीत दुहेरी झालेत.
एफ ४ आणि बी बी ८ अशा खेळ्यांनी लक्ष पुन्हा पटाच्या मध्यात सरकले आहे. एन सी ६ ह्या आनंदच्या खेळीला उंटाने घोडा मारुन टोपलोवने उत्तर दिले. आता २४ व्या खेळीत उंटाला मारण्याच्या मिषाने आनंदचा हत्ती आपसूकच सहाव्या पट्टीत सरकलाय. राजच्या बाजूचे प्यादे एच ५ असे सरकवून टोपालोवने आक्रमक धोरण स्वीकारले. घोडा जी ४ मधे नेऊन बसवायचा त्याचा उद्देश आहे! आर सी ४. आनंदने हत्ती रेटणे सुरुच ठेवले आहे. हत्तीडी ५ मधल्या प्याद्यावर आलाय हे बघताच टोपालोवने २५ वी खेळी एन ई ३(?) केली आणि इथे टोपालोव चुकला!! काय झाले बघा - पांढर्या उंटाला कर्ण मोकळा झाला, पटाच्या मध्यातला काळ्याचा चांगला घोडा आता आनंद त्याच्या उंटाने मारुन त्याच्या हत्तीला चौथी पट्टी मोकळी करुन देईल! तसंच झालं. २८ व्या खेळीला काळ्याचे बी ६ मधले प्यादे खाऊन काळा उंट अंगावर येताच हत्ती बी ३ असा शांतपणे मागे गेला. टोपालोवच्या काळ्या उंटाची अवस्था दयनीय आहे ए ७ - बी ८ अशा येरझार्या मारत बसलाय बिचारा!
आता फारसे काही करता येत नाही तेव्हा 'आक्रमण हा उत्तम बचाव' ह्या धोरणाने टोपालोवने २९ व्या खेळीत आर डी ४ असा हत्ती आत घुसवला.उद्देश हा की हत्तींची मारामारी होऊन डाव मोकळा होईल, वेळ पडली तर बरोबरी करायला सोपे!
आता आनंदची चलाखी बघा. त्याला ए ५ मधले काळ्याचे प्यादे खायचे आहे आणि त्यासाठी त्याच्या हत्तीला सी ५ मधे यावे लागेल पण ते घर उंटाने दाबून धरले आहे. मग आनंद आर सी ७ असा उंटावर चालून गेला. उंट बिचारा सी ५ घराचा दबाव सोडून पुन्हा एकदा बी बी ८ असा शेवटच्या पट्टीतल्या हत्तीच्या आसर्याला गेला (हत्ती ए ८ मधे त्याच्या मदतीला येऊ शकत नाही कारण पांढर्या कर्णातला आनंदचा उंट! आठवा फिआनचेट्टो!!) त्याबरोबर आनंदने आर सी ५ असा हत्ती माघारी वळवून एकाकी प्याद्याला लक्ष्य बनवले (त्या प्याद्याच्या मदतीला आता कोणीही नाही!)
मगाशी अडचण वाटणारी पांढर्याची दोन प्यादी आता मुक्त प्यादी झालीत आणि शेवटच्या पट्टीकडे निघायची तयारी ठेवून आहेत!
प्यादे जातेच आहे तर निदान उंटाला मोकळे करुन घेऊ म्हणून बी डी ५ असा खेळला टोपालोव. आनंदने प्यादे घेताच रिकाम्या सी स्तंभाचा ताबा टोपालोवने घेतला आर सी ८. संभाव्य शह टाळण्यासाठी राजा जी २ मधे सरकवला आनंदने. मग आर सी २ असा ए २ मधल्या प्याद्यावर हल्ला केला टोपाने. ए ३ प्यादे एक घर पुढे नेले.
दुहेरी प्याद्यांच्या तथाकथित दुबळेपणासह कसे खेळावे हा वस्तुपाठच आनंदने दिलाय इथे. काळ्याचा हत्ती ए २ मधे आला प्याद्यांच्या मागून हल्ला चढवून! एन बी ४ असा घोडा घातलान अंगावर आनंदने. आता ज्या कारणासाठी हत्ती तिथे आणला ते सोडून हत्ती काढून घेण्यात मतलब नव्हता म्हणून उंटाने घोडा मारलान टोपालोवने. आनंदला तेच हवे होते त्याने तातडीने प्याद्याने उंट मारुन जोड प्यादी सोडवून घेतली! आता डावाने शेवटाच्या टप्प्यात प्रवेश केला आहे. दोघेही खेळाडू वेळेच्या दबावात नाहीत. (२ तासात किमान ४० खेळ्या).
आता ३६ व्या खेळीला पांढर्याच्या दोन हत्तीच्या जोरात आणि काळ्याच्या दोन हत्तींच्या मार्यात दोन पांढरी प्यादी आहेत. एन डी ५ असा घोडा बी ४ मधल्या प्याद्यावर येतो. इथे डावाच्या शेवटाचा आनंदचा विचार बघा. आता घोडा जर पांढर्या उंटाने मारला तर ई २ प्याद्याचा जोर जातो आणि काळा हत्ती ते प्यादे खाऊन राजाला शह देतो. दोन उड्यात काळं प्यादं वजीर होतंय! (कोणत्याही क्षणी डावाचा तोल कसा जाऊ शकतो ह्याचं उत्तम उदाहरण - प्रत्येक चाल समतोल बुद्धीने खेळावी लागते ती ह्याकरताच!) आनंदने बी ५ असे प्यादे सरकवले. आता ए ४ हे प्यादे पडते. ३९ व्या खेळी अखेर हत्ती, उंट आणि घोडा अशी मारामारी होऊन बी ३ मधल्या हत्तीच्या जोरात बी ५ मधे खुले प्यादे अशी अवस्था येते! (आठवते का २९ व्या खेळीत ए ५ मधले प्यादे खाण्यासाठी केलेली चाल? तेव्हापासून ही आत्ताची ३९ व्या चालीनंतरची स्थिती कशी असेल हे विज्युअलायझेशन आनंदने केले होते!!!)
आता गंमत बघा, पांढरं प्यादं वजीर होण्यापासून फक्त ३ घरं दूर आहे. काळा राजा त्याला अडवायला पोहचू शकत नाही कारण तो कोपर्यात आहे. राहिला हत्ती, त्याला पाय लावून पळायलाच हवे! ४१ व्या चाली अखेर बी ७ मधे प्यादे आणि त्याला कसेबसे रोखून धरलेला बी ८ मधला हत्ती अशी स्थिती आली!
के एफ ३, आता निर्णायक अवस्थेत पांढरा राजा पुढे सरसावला. डी ४ काळ्या प्याद्याने एक घर सरकून त्याला जोर दिला. के ई ४!! आता ते डी ४ मधले प्यादे पडतेच पडते. त्याला वाचवण्यासाठी हत्तीने आपले ठाणे सोडले की बी ७ प्याद्याचा वजीर होतोय!! खलास!! डाव संपला. टोपालोवने हात मिळवला.
डावाच्या प्रत्येक भागात आनंदने अतिशय निश्चयाने खेळ केला. प्रत्येक चालीपूर्वी पुढच्या अनेक शक्यतांवरती बर्याच चालींनंतरचे अतिशय अचूक आडाखे आणि विज्युअलायझेशन हे थक्क करणारे आहे. एका अप्रतिम डावाने आनंदने १-१ अशी गुणांची बरोबरी साधली आणि माझ्यासारख्या लाखो रसिकांनी सुटकेचा निश्वास सोडला!!
-चतुरंग
प्रतिक्रिया
29 Apr 2010 - 1:03 am | भडकमकर मास्तर
खेळाचा उत्तम आढावा...
वाचून मजा आली..
असाच आनंद जिंकत राहूदे... :)
29 Apr 2010 - 1:23 am | टारझन
+१ टू भडकमकर मास्तर :)
चियर्स आनंद ... चियर्स रंगा :)
29 Apr 2010 - 1:26 am | जे.पी.मॉर्गन
तुमचं हे समालोचन वाचताना बोर्ड मांडून बसलं पाहिजे. तुमच्या समालोचनामुळे त्या खेळातल्या गमती कळतील आणि खेळ आवडायला लागेल ! एरवी आनंदचे आपण एरवीच फ्यान आहोत हो... पण त्या खेळातलं काय कळत असेल तर शप्पथ. पण हा तुमचा लेख वाचून बुद्धिबळ पण इंटरेस्टिंग असू शकतो असं वाटायला लागलंय. तुमचा लेख समोर ठेऊन बसायलाच पाहिजे. असं प्रत्येक डावाचं येऊद्या प्लीज. माझ्यासारखा अडाणी कन्व्हर्ट झाला तरी ते तुमचं प्रचंड मोठं यश असेल :)
29 Apr 2010 - 1:39 am | चतुरंग
मी प्रयत्न करतोय. तसे जमले तर सोन्याहून पिवळे अन्यथा मी लेखात अधोरेखित केलेल्या वाक्यानुसार करुन पहा.
चतुरंग
29 Apr 2010 - 2:00 am | एक
पहिला डावच (गृनफिल्ड एक्सचेंज) दिसतो आहे.
http://www.chessgames.com/perl/chessgame?gid=1581333
ही लिंक बरोबर वाटते आहे..
-(खेळून बघायला उत्सूक) एक
29 Apr 2010 - 2:01 am | चतुरंग
दुरुस्ती केली आहे!!
चतुरंग
29 Apr 2010 - 1:54 am | संदीप चित्रे
आनंदच्या खेळासारखंच तू लेखनही वेगवान ठेवलं आहेस त्यामुळे मजा येतेय. विशेषत: >>तरीही त्याने वजीर प्याद्यानेच खाल्ल>>>> अशा वाक्यांमुळे एक प्रकारचा जिवंतपणा येतोय लेखात.
>> प्रत्येक चालीपूर्वी पुढच्या अनेक शक्यतांवरती बर्याच चालींनंतरचे अतिशय अचूक आडाखे आणि विज्युअलायझेशन हे थक्क करणारे आहे.
ह्या विज्यअलायझेशनमुळेच उत्तम खेळाडू 'महान खेळाडू' होतात मग भले तो खेळ कुठलाही असो.
एक सूचना: प्रत्येक नवीन भागाच्या सुरूवातीला आधीच्या भागांचे दुवे देशील का?
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com
29 Apr 2010 - 2:07 am | चतुरंग
अगदी खरं आहे.
सच्याला तू रनर का घेत नाहीस असं विचारल्यावर त्यानं काय सांगावं?
"कोणीही रनर असला तरी तो माझ्यापेक्षा दोन यार्ड मागंच रहाणार कारण मी चेंडू मारल्यानंतर तो ठरवणार की रन घ्यायचा की नाही आणि प्रत्यक्षात बॉलरच्या हातातून चेंडू सुटताक्षणीच माझ्या डोक्यात पक्कं असतं की रन कुठे काढायचा आहे!!" खलास, विषय संपला!!!
चतुरंग
29 Apr 2010 - 2:31 am | राघव
रंगदा,
तुमच्या विडंबनाइतक्याच खुसखुशीत लेखनानं मजा आणली.
मी लिंक उघडून एकेक चाल बघत बघत अन् तुमचं त्यावरचं लेखन वाचत वाचत पुढं गेलो. वेगळाच "आनंद" मिळाला! :)
खूप खूप धन्यवाद! आनंदला खूप खूप शुभेच्छा!
बाकी सचिनचा किस्सा भारी. :)
म्हणून तर आपण सचिन अन् आनंद या दोघांनाही सलाम ठोकत दिवस काढायला तयार असतो. दोघेही कधी कोणत्या वादात पडत नाहीत. देशासाठी खेळणं हे ते जबाबदारी म्हणून खेळतात ते सतत दिसत असतं.
राघव
29 Apr 2010 - 2:33 am | बेसनलाडू
रंगदा,तुमच्या विडंबनाइतक्याच खुसखुशीत लेखनानं मजा आणली. खूप खूप धन्यवाद! आनंदला खूप खूप शुभेच्छा! बाकी सचिनचा किस्सा भारी. म्हणून तर आपण सचिन अन् आनंद या दोघांनाही सलाम ठोकत दिवस काढायला तयार असतो. दोघेही कधी कोणत्या वादात पडत नाहीत. देशासाठी खेळणं हे ते जबाबदारी म्हणून खेळतात ते सतत दिसत असतं.
असेच म्हणतो.
(सहमत)बेसनलाडू
29 Apr 2010 - 3:30 am | राजेश घासकडवी
तुमचं वर्णन वाचून निर्जीव खेळी जिवंत होतात. नेमक्या मोक्याच्या खेळी कुठच्या हे तुम्ही छान दाखवलं आहे. डी५ मधला घोडा हलवावा लागला तिथेच टोपालोव्ह संपला. त्यात ते डबलपॉन सोडवून घेण्याची नजाकत सुद्धा छान वर्णन करून सांगितलीत.
धन्यवाद.
29 Apr 2010 - 7:36 am | प्रभो
मस्त!!!
29 Apr 2010 - 11:10 am | निखिल देशपांडे
रंगाकाका..
मस्त वर्णण..
त्या दुव्या वरच्या एक एक चाली आणि तुमचे समालोचन एकत्रित रित्या वाचले...
पुढच्या भागाचेही असेच वर्णण येउ द्या..
निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
29 Apr 2010 - 12:27 pm | बिपिन कार्यकर्ते
छान... आत्ता नुसतेच वाचले... सवडीने खेळून बघेन.
रंगा, मस्त रंगवून सांगतो आहेस रे...
बिपिन कार्यकर्ते
29 Apr 2010 - 12:39 pm | विशाल कुलकर्णी
जबरा विश्लेषण... ! धंकू हो देवा :-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
29 Apr 2010 - 1:35 pm | महेश हतोळकर
बाकी बुद्धीबळाच्याबाबतीत मी धर्मराज. खेळाची आवड भरपूर पण खेळता येत नाही.
पुन्हा एकदा धन्यवाद.
29 Apr 2010 - 4:05 pm | ऋषिकेश
मस्त. यावेळी लेख यायच्या आधीच गृहपाठ करूनच बसलो होतो.. त्यामुळे लेख आल्यावर सारखी दुव्यावरची खिडकी उघडायला लागली नाहि.
मस्त चाली आणि लेखन मस्त चालु आहे..
पुढले दोन्ही सामने बघितले आहेतच.. तुमच्या लिखाणाची वाट बघतोय
ऋषिकेश
------------------
इथे दुसर्यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.
29 Apr 2010 - 5:18 pm | परिकथेतील राजकुमार
मालक वाचनाचा आणी वाचता वाचता खेळुन बघायचा दुहेरी आनंद घेत आहे.
खुप खुप धन्यवाद.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य