मराठी साहित्यसंपदा ही तशी प्राचीन. इतिहासकारांच्या मते मराठीचा वापर असणारे शिलालेख इ.स.च्या १०व्या आणि ११व्या शतकातले आहेत तर मराठीतली पहिली ग्रंथरचना १३व्या शतकातली आहे असेही म्हणतात.
गेली वर्षानुवर्षे मराठीतील बहुरंगी साहित्य कथा, कादंबरी ,कविता, संतवाणी वगैरे अनेक प्रकारातून आपल्यासमोर येत आहे. संत ज्ञानेश्वरांपासून ते ना. सी. फडके, वि. स. खांडेकर, रणजित देसाई, शिवाजी सावंत, गो.नी. दांडेकर, तसेच न. चिं. केळकर, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर आणि वा. म. जोशी ते पु, ल देशपांडे, बाबूराव अर्नाळकर, नारायण धारप, वि वा शिरवाडकर, विंदा करंदीकर अशा अगणित साहित्यकारांनी आपल्या प्रतिभेने मराठीत दर्जेदार साहित्य दिले आहे.
भुर्जपत्र ते छापील पुस्तक असा प्रवास करत आजच्या काळात मराठी साहित्य आंतरजालीय लेखन स्वरूपातही उपलब्ध आहे. तसेच वेगवेगळ्या प्रकाशन संस्थांकडून हे साहित्य आपल्यापर्यंत पोहोचत आहे. मराठी भाषेतील साहित्याच्या वाढीमध्ये लोकांच्या प्रतिक्रियेचा, सहभागाचा मोठा हात असतो. भरपूर लोक ह्या साहित्यसंपदेचा आनंद घेत आहेत, त्याचा वापर करीत आहेत. पण तरीही साहित्य निर्माण होते त्या प्रमाणात वाचले जात नाही असेही म्हटले जाते.
एखादे पुस्तक छापले गेले आणि उपलब्ध झाले असले तरी ते कसे आहे हे वाचल्याशिवाय समजत नाही. एखाद्याने ते वाचले असल्यास त्याच्या परिक्षणानुसार आपण ठरवू शकतो की हे पुस्तक वाचायचे आहे की नाही, घ्यायचे आहे की नाही. त्यासाठी एक तर आपण थेट त्याच्याशी संपर्क साधू शकतो किंवा त्याने लिहिलेल्या परिक्षणावरून त्याचा आढावा घेऊ शकतो.
अशा विविध पुस्तकांची ओळख करुन देण्यास, त्यांचे परिक्षण लिहिण्यास साहित्य रसिकांना एक मंच तयार करून देणे, साहित्यकार/लेखक, प्रकाशन संस्था ह्यांच्या माहितीचे संकलन करून ठेवणे, तसेच साहित्यविश्वातील घडामोडींचा मागोवा घेणे आणि त्याची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी ह्या उद्देशाने 'साहित्य विश्व' ह्या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे.
आज दिनांक ३१ मार्च २०१० रात्री १२ वाजेपासून हे संकेतस्थळ सर्वांकरीता खुले करण्याची आम्ही घोषणा करीत आहोत.
'साहित्य विश्व' वर सध्या पुस्तक, लेखक, प्रकाशन, कार्यक्रम अशा लेखन प्रकारांची व्यवस्था करण्यात आली आहे. संपूर्ण लेखन हे सदस्य लिखित असेल. म्हणजेच एखाद्या पुस्तकाबद्दल परीक्षण, माहिती लिहिताना पुस्तकाचे लेखक व प्रकाशन ह्यांची माहिती जर आधीच उपलब्ध नसेल तर सदस्यास ते स्वतःहून लिहिण्याची मुभा आहे. त्यानंतर मग इतर सदस्य ह्या नवीन लेखक, प्रकाशनाच्या लेखनाचा उपयोग दुसर्या पुस्तकाच्या परीक्षणकरीता करू शकतो.
'साहित्य विश्व'वर मराठी साहित्यविषयक लेखनाचे आणखीही प्रकार देण्याचा मानस आहे व लवकरच ती सुविधा उपलब्ध केली जाईल.
आपला सर्वांचा सहभाग 'साहित्य विश्व' ह्या संकेतस्थळाला मिळत राहील अशी आशा आहे व 'साहित्य विश्व' वर आपणाकडील साहित्यविषयक अद्ययावत माहिती आणि पुस्तक परीक्षण लिहित राहाल अशी अपेक्षा आहे.
तसेच, शक्य असेल तेव्हा संकेतस्थळावरील त्रुटी आणि ह्यात करण्यासारखे तुम्हाला वाटत असलेले बदल निदर्शनास आणून द्यावेत ही विनंती.
दुवा: http://www.sahityavishwa.in/
धन्यवाद.
प्रतिक्रिया
1 Apr 2010 - 12:53 am | बिपिन कार्यकर्ते
शुभेच्छा !!!
बिपिन कार्यकर्ते
1 Apr 2010 - 8:06 am | प्रमोद देव
देवदत्ता मन:पूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
1 Apr 2010 - 10:03 am | विशाल कुलकर्णी
असेच म्हणतो...मन:पूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.:-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
1 Apr 2010 - 10:30 am | मेघना भुस्कुटे
शुभेच्छा! सदस्यत्व घेतले आहे.
1 Apr 2010 - 10:52 am | समंजस
अभिनंदन आणि शुभेच्छा!!! :)
1 Apr 2010 - 11:35 am | अभिरत भिरभि-या
आवडली .. सदस्य झालो आणि एक लेख टाकलाही ..
काही प्रश्न ..
१ यातील Content च्या कॉपीराईट संबधी तुमची भूमिका काय आहे ? (मला विचाराल तर हा एक प्रकारे मराठी पुस्तकांचा विकीपिडीया असल्याने विकीपिडीया जी Copyright policy तीच आपण वापरावी)
२ मला समजा महात्मा फुल्यांच्या असूड बद्दल लिहायचे आहे, मी लेखक नाव महात्मा फुले वापरले. उद्या कोणी ज्योतिराव फुले / जोतिबा फुले असेही नाव वापरू शकेल. प्रत्यक्षात व्यक्ती एकच आहे. अशा वेळेस Redirection/tagging होते का ?
1 Apr 2010 - 5:08 pm | देवदत्त
सर्वांना धन्यवाद.
अभिरत,
हे संकेतस्थळ फक्त एक मंच, माध्यम म्हणून कार्य करेल.
कॉपीराईट संबंधी म्हणायचे तर सदस्याने लिहिलेले सर्व लेखन हे त्या सदस्याच्या अधिकारात असेल
आणि त्या लेखनात एखाद्या पुस्तकातील उतारे, किंवा चित्रे, मुखपृष्ठ आंतरजालावर प्रकाशित करण्याची त्या सदस्यास परवानगी हवी आणि ती जबाबदारीही त्या सदस्याची असेल.
एकाच लेखकाचे दोन धागे बनण्याची शक्यता आहे. Redirection टाकले नाही. त्यावर काम चालू आहे. पण लेखक सूचीमधून ते लेखक शोधून किंवा पुस्तकाबद्दल लेखन करताना टंकन केलेल्या नावासारखे लेखक आपोआप शोधून दाखवले जातात, त्याचा फायदा घेऊ शकता.