ठाण्याहून रात्री १२.०० ची महाड्-पिंपळ्वाडी एस्.टी. पकड्ली. पहाटे ५.०० ला महाड्ला आलो. महाड आणि पूणे यांना जोडणार्या वरंधा घाटातून पुढे जाणार्या एस्.टी. ने हिरडोशीला आलो. साधारण ८.३० वाजले होते. ईथूनच आमच्या ट्रेकला सुरूवात होणार होती. हिरडोशी गावातून वरंधा घाटातील लांबवर दिसणारे डोंगर फारच सुरेख दिसत होते.
हिरडोशी गावातून पुढे निरा नदी ओलांडुन कुद्ळे गावात पोहोचायचं होत. निरा नदीला काही ठिकाणी बर्यापैकी पाणी होत तर काही ठिकाणी चिखल होता. त्यातल्या त्यात कमी पाणी आणि चिखल असलेल्या जागेतून नदी ओलांडायची होती. काही ठिकाणी नदीचे पात्र अगदीच कोरडे ठाक पड्ले होते. अश्या जागा हेरत, शक्यतो पाय चिखलात न जाऊ देता नदी पार आलो.
नदी पार करुन कुद्ळे गावात जाताना
कुद्ळे गाव हिरडोशी पासुन साधारण २.३० तास आहे. वाटेतील एक्-दोन वाड्या मागे टाकून कुद्ळे गावात आलो. तोपर्यंत १०.३० वाजत आले होते. कुद्ळे गावातील लोकांनी ईकडुन कशाला जाता, चांगली जवळ्ची वाट सोडून लांबची वाट कशाला धरलीत वगैरे पकाव प्रश्ण विचारले ~X( . त्यांना काय माहित आम्हाला अंगातली रग जिरवण्यासाठी लांबुनच जायचय ते ;)
मंदिराच्या आवारातील फणस (लाईव्ह)
मंदिरातुन समोरच कुद्ळे खिंड आणि रायरेश्वरचे टोक दिसत होते. कुद्ळे गावात पाणी भरुन घेतलं, रायरेश्वरचा रस्ता विचारुन घेतला आणि निघालो.
साधारण तास भराच्या चालीने कुद्ळे खिंड चढुन आलो. आता ऊन मी म्हणायला लागलं होत. खिंडीत झाडी अशी विशेष नव्हतीच आणि होती ती सगळी खुरटी.
कुद्ळे खिंडीतुन दिसणारे कुदळे गाव
या ठिकाणापासुन रायरेश्वर मंदिरात जाण्यासाठी पुढे किमान चार तास लागणार होते. रायरेश्वरचे पठार पुर्व्-पश्चिम १६ कि.मी. पसरलेलं आहे. आता ऊनामुळे अंगाची काहिली होत होती. पठारावर सुध्दा झाडी अशी विशेष नव्हतीच. आपण चाललोय हि वाट बरोबर आहे कि नाही हे विचारायला माणुस सुध्दा कोणी भेटत नव्ह्तं. पण सलग मळलेली वाट होती हे विशेष. साधारण दोन तास चाललो आणि एकदम झांज आल्यासारख वाट्लं. बरोबरच्या गिरीषला विचारलं त्याला सुध्दा ऊनामुळे तसचं होत होतं. तसेच एका झुड्पात घुसलो. दोघांनीही मीठ,साखर पाणी प्यायलं, थोड्सं खाल्ल आणि २०-२५ मिनीटं शांत झोपलो, थोडी तरतरी आली, घड्याळ्यात बघीतलं तर २.३० वाजून गेले होते. रायरेश्वरच्या देवळाचा, अजून किती वेळ चालायचय याचा अंदाज येत नव्हता. संपूर्ण वाटेवर एक माणूस भेटेल तर शपथं.
१६ कि.मी. पसरलेलं रायरेश्वरचे पठार
तसेच चालतं राहिलो, जवळ्च पाणी संपत आल होतं. एक्-दिड तासाने झाडीत अचानक गुरांचा आवाज ऐकू आला, जोरात आवाज दिला "ओ मामा" तसा झाडीतुन एक माणूस बाहेर आलो. त्याला विचारलं रायरेश्वरचं देऊळ किती लांब आहे हो? पाणी जवळ कुठे मिळेल? तसा तो आम्हाला त्याच्या घरातच घेऊन गेला, पाणी दिलं आणी १० मिनीटातचं तुम्ही रायरेश्वरला पोहचाल असं सांगितलं. मामाशी १५-२० मिनीट गप्पा मारल्या. पोट फुटेपर्यंत पाणी प्यायलो आणि निघालो. खरोखरच १० मिनीटात देवळापाशी पोहोचलो.
रायरेश्वरचं मंदिर - शंकराची पिंडि
रायरेश्वरचं मंदिरातील फ्रेम - महाराज शपथं घेताना -
देवळात पोचलो, साधारण ५.०० वाजत आले होते. सकाळी ८.३० ला हिरडोशीहुन निघालो होतो. जवळ जवळ ८ तासाची चाल झाली होती, ती पण मरणाच्या ऊन्हातून. तंगड्या पसरुन बसून राहिलो २०-२५ मिनीट. नंतर देवळात गेलो. शंकराच्या पिंडिचे दर्शन घेतलं आणि रायरेश्वर गडावर फेरफटका मारायला निघालो. गडावर २०-२५ घरांची वस्ती आहे. सगळ्या लोकांची आडनावं जंगम. हे सर्व लोक माळ्करी आहेत आणि त्यामुळे र्निव्यसनी सुध्दा. त्यांच्या बरोबर चहा घेतला, गप्पा मारल्या आणि पुन्हा देवळात आलो. येताना पाणी भरुन घेतलं आणि चुली करता थोड्याश्या काट्क्या जमा केल्या. घरनं निघताना पोळ्या घेतल्या होत्याच शिवाय रेडी-टू-ईट पनीर माखनवाला चं पाकीट घेतलं होतं, १० मिनीटात पनीर माखनवाला तयार. मस्तपैकी जेवलो आणि देवळातच झोपलो. दुसर्या दिवशी केंजळ्गड्ला जायच होत. दिवसभराच्या रपेटीमुळे झोप छान लागली हे सांगणे नकोच.
दुसर्या दिवशी ७.३०-८.०० ला ऊठ्लो, आवरलं. चहा प्यायला, सॅक भरली, आणि केंजळ्ला जायला निघालो. रायरेश्वर मधला एक मामा आमच्या बरोबर खिंडीपर्यंत यायला तयार झाला. त्याच्या बरोबर निघालो. २०-२५ मिनीटात केंजळचे दर्शन झाले.
रायरेश्वरहून समोर केंजळ्गड, त्यामागे कमळ्गड, त्याच्यामागील रांगेत पाचगणी व महाबळेश्वर
रायरेश्वर मधला मामा - मागे पाचगणी व महाबळेश्वर परिसर
मामाचा निरोप घेऊन निघालो, रायरेश्वरच्या शिडीहून ऊतरलो आणि केंजळ - रायरेश्वर धारेवर आलो. येथून केंजळला जाणारा रस्ता अगदी स्पष्ट दिसत होता.
तासभरातच केंजळ्च्या पायर्यांपाशी आलो. ५४ पायर्या चढुन केंजळ्च्या माथ्यावर आलो.
माथ्यावर विशेष काही नव्ह्ते. माथ्यावर एक वेगळ यंत्र होत. ते चुन्याचा घाणा असावा किंवा तोफेला ह्व्या त्या दिशेला फिरवता याव यासाठि केलेली सोय होती ते मात्र कळ्लं नाही.
केंजळ्च्या पोटातील छोटी गुहा बघीतली, थोडा आराम केला, आणि केंजळ माचीच्या दिशेने ऊतरायला सुरुवात केली.
केंजळ माचीवर पोहोचलो तर तेथील कातकरी मुलांनी आमच्या भोवती खाऊ द्या, खाऊ द्या म्हणून गलका सुरु केला. पण आमच्या जवळ त्यांना देण्यासाठी खाऊ काहीच नव्हता. परंतु त्या सग़ळ्याना एकत्र बसवून एक फोटो मात्र काढुन घेतला. त्यांच्या चेहर्यावरील निरागस भाव खरचं पहाण्यासारखे होते.
तिथून कोर्ले गावात यायला आणखी अर्धा तास लागला. कोर्ले गावात बसची वाट बघत असतान एक मजेशीर पाटी दिसली.
थोड्याच वेळात बस आली आणि आम्ही कोर्ले-भोर्-स्वारगेट्-ठाणे अशा परतीच्या प्रवासासाठी निघालो.
प्रतिक्रिया
15 Mar 2010 - 5:09 pm | गणपा
छान फोटो आणि वर्णनही..
पहिला फोटोपाहुन का कुणास ठाउक पण चॉकलेटची आठवण झाली.
शेवटच्या फोटोतली हात जोडलेली मुलगी गोड आहे:)
15 Mar 2010 - 4:52 pm | मेघवेडा
मस्त!! शेवटचा फोटो खासच!! ;)
-- मेघवेडा
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
मेघवेडा!
15 Mar 2010 - 6:24 pm | बिपिन कार्यकर्ते
झ का स ! ! ! सगळेच फोटो आवडले.
पुण्याच्या आसपास फार अवघड नसलेले ट्रेक्स करायला आवडेल.
बिपिन कार्यकर्ते
15 Mar 2010 - 6:25 pm | बिपिन कार्यकर्ते
झ का स ! ! ! सगळेच फोटो आवडले.
पुण्याच्या आसपास फार अवघड नसलेले ट्रेक्स करायला आवडेल.
बिपिन कार्यकर्ते
15 Mar 2010 - 6:55 pm | झकासराव
मस्त आहे भाउ :)
15 Mar 2010 - 6:58 pm | प्रभो
सुंदर....
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
प्रभोवाणी
15 Mar 2010 - 7:14 pm | नितिनकरमरकर
याच यात्रेला पुढे कमळ्गड आणि केट्स पॉइंट वरून म्.श्वर असा ट्रेक जोडता येतो.
15 Mar 2010 - 8:04 pm | आशिष सुर्वे
आपला हेवा वाटतो आणि कवतिकही..
असेच भटकंती करत रहा आणि आम्हाला तुमच्या डोळ्यांनी गडा-किल्ल्यांचे दर्शन करवित रहा..
धन्यवाद..
======================
कोकणी फणस
Sachhu.. God of 22 Yards, King of Indian Hearts..
17 Mar 2010 - 1:21 am | भडकमकर मास्तर
मस्त फोटो..
ट्रेक करून आल्यासारखे वाटते....
अवांतर : कोर्ले गावात तुमची "ती " वेळ आली नाही ते बरे झाले...
17 Mar 2010 - 3:01 pm | विमुक्त
सुंदर...
कुद्ळे खिंड म्हणजे अस्वल खिंड नाही ना?... नसेल तर कुद्ळे गावातून अस्वल खिंड ला जायला वाट आहे का?... आणि अस्वल खिंडीतून रायरेश्वर वर जायला वाट आहे का?...
तुम्हाला वाटेत रायरेश्वरचं नाखिंद टोक लागलं का?... जास्तीत जास्त माहिती द्या...
17 Mar 2010 - 4:09 pm | बज्जु
नमस्कार विमुक्त,
कुद्ळे खिंड म्हणजे अस्वल खिंड नाही ना?...
कुद्ळे खिंड म्हणजे अस्वल खिंड नाही.
कुद्ळे गावातून अस्वल खिंड ला जायला वाट आहे का?...
कुद्ळे गावातून अस्वल खिंड ला जायला वाट नाही. ढवळे गावातून एक वाट अस्वल खिंड, नाखिंद टोक याच्या बाजूने रायरेश्वरला जाते. पण त्या साठी ढवळे गावातून माहितगार माणूस घेणं आवश्यक आहे. त्याबाजूने दिवसभराची चाल तर आहेच पण जावळीचे दाट जंगलही आहे. या वर्षी नोव्हेंबर ला आम्ही त्या ट्रेकला जाणार आहोत.
आणि अस्वल खिंडीतून रायरेश्वर वर जायला वाट आहे का?...
अस्वल खिंडीतून रायरेश्वर वर जायला वाट आहे, पण जवळ्च्या आणि सोप्या वाटेने जायचे असेल तर कोर्ले गावातून आता थेट गाडी रस्ता रायरेश्वर, केंजळ्गड यांच्या खिंडीत जातो. तिथून साधारण एक तासात आपण रायरेश्वर च्या देवळात पोहोचू शकतो.
अधीक माहितीसाठी हा मॅप पहा. यात मधोमध जो ऊंचवट्यासारखा भाग आहे, तेच नाखिंदा टोक.
![Map of Raireshwar](http://inlinethumb01.webshots.com/47488/2461691140103194589S600x600Q85.jpg)
19 Mar 2010 - 4:02 pm | विमुक्त
मी दोनदा जाऊन आलोय रायरेश्वरला... एकदा नाखिंदा टोकापर्यंत पण जाऊन आलोय... मला ह्या वेळेस नाखिंदा टोकाच्या इथून कुद्ळे गावात उतरायचयं... म्हणून विचारलं... ह्या route बद्दल काही माहिती आहे का?
18 Mar 2010 - 11:39 am | सचिनमुसळे
पुढच्या वेळी मला नक्की कळवा, आपण रोहिडेश्वरला जाउ.
19 Mar 2010 - 6:02 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सर्वच फोटो क्लास..!
-दिलीप बिरुटे