माझ्या हृदयाची स्पंदने
तुझा हळुवार श्वास
प्रणयी संगीताचा जणू
एक नवा आभास
******
वाऱ्याचा वेगही कधी
सहज मंदावतो
तुझ्या गंधाने वेडा
तोही छंदावतो
******
कधी तुझा स्पर्शही मला
मोरपिसापरी भासे
आताशा तुझे श्वासही
वाटतात जणू उसासे
प्रतिक्रिया
25 Feb 2010 - 7:41 am | राजेश घासकडवी
छंदावतो शब्द आवडला...त्याला एकाच वेळी नादमाधुर्य आहे आणि हरवून जाण्याचं वेडही आहे.
25 Feb 2010 - 10:36 pm | sur_nair
राजेशजी,
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद . मला कवितेचे पुस्तकी ज्ञान फारसे नाही म्हणून छंद, वृत्त, रूपक वगैरे फक्त ऐकूनच माहित आहे . पण वाचनात आलेल्या आणि संगीतबद्ध केलेल्या कविता व गीतांशी मात्र खूप जवळची गट्टी आहे . त्यामुळे जे लिहितो ते कुठल्या चौकटीत बसवण्याचा प्रयत्न न करता मनाला पटेल /भावेल तेच लिहितो. तुमच्यासारख्या सुज्ञांनी सकारात्मक टीका (positive criticism) केली तर काही शिकायलाच मिळेल.
पाउस कवितेतला 'विरघळावे ' हा शब्द तितकासा नीट बसत नाही हे माझ्याही ध्यानात आले होते म्हणून 'मीही त्यात मिसळावे ' असे लिहावे का विचार केला होता. पण जे सांगायचं त्याकरता 'विरघळावे ' हा शब्द मनाला जास्त भावला म्हणून तो वापरला. काही नियम तोडले असतील तर असो. लिहिण्याचा हा छंद मात्र मुक्त आहे .
25 Feb 2010 - 11:49 pm | राजेश घासकडवी
छंदांच्या बाबतीत माझंही तेच आहे - कानाला गेय, नादमय लागलं आणि म्हणताना विशिष्ट चालीवर, तालावर फारशी ओढाताण न करता म्हणता आलं की झालं.
मी विडंबन केलं त्याला तुमची कविता केवळ आधार म्हणून घेतली होती. तुमची कविता चांगली आहे, आणि खरोखरच अतिशय नादबद्ध आहे. छंदाविषयी तक्रार केली ती खरी तर इतर अनेक कविता अशा दिसतात, तुम्हालाही दिसत असतील - की त्यांच्यात गेयता शून्य असते. किंवा खूप ओढाताण करून नियमात बसवलेली असते. अशा कवितांची चेष्टा होती. तुमच्या कवितेच्या आधारावर ती केली म्हणून तुमच्याच कवितेतलं उदाहरण वापरलं. ते थोडं अन्याय्य झालं.
मुळात कविता चांगली असण्यासाठी गेय असण्याची, छंदात असण्याची गरज नाही. कोलटकरांची "अरे तुझी टोपी" मुक्तछंद आहे. कवीला भिडलेली, दिसलेली रूपकं वाचकापर्यंत पोचवण्याचा मनापासून प्रयत्न केला की झालं.
मी लहानपणी चित्रं काढायचो - मासिकांमधले फोटो बघून. मला जेव्हा नीट येत नव्हती, तेव्हा सगळेजण हमखास सांगायचे "डोळे चुकलेले आहेत" आणि खरं तर ते बरोबर नसायचं. बहुतेक वेळा प्रमाणं, ओठांचे आकार वगैरे चुकलेले असायचे. पण मी चित्रं काढत गेलो. आणि ती चांगली जमायला लागली. मुद्दा असा आहे की प्रतिसाद देणाऱ्याला सर्वच वेळी कळतंच असं नाही. तेव्हा तुम्ही प्रामाणिक राहून तुमचे स्वत:चे विचार, भावनाकल्लोळ, प्रश्न लिहीत जा. छंद वगैरे पाळायचे की नाही, असल्या दुय्यम गोष्टींवर टीका करणाऱ्याकडे लक्ष द्यायचं की नाही हे तुमच्या हातात आहे.
असो. त्यात मीही विरघळावे मधला विरघळणे शब्दात येतं ते मिसळण्यात येत नाही.
विरघळून मी जावे हे कसं वाटतं?
26 Feb 2010 - 12:49 am | sur_nair
हो. तेही छान बसेल. पण सध्या माझ्या जीभेला 'त्यात मीही विरघळावे' याचं वळण बसलं आहे तर तेच ठेवतो.
तुमच्याशी असा निखळ संवाद साधला ते चांगलं वाटलं. website ला भेट देऊन आणखी कशावर काही comments असतील तर ऐकायला जरूर आवडतील.
26 Feb 2010 - 3:42 am | प्राजु
माझ्या हृदयाची स्पंदने
तुझा हळुवार श्वास
प्रणयी संगीताचा जणू
एक नवा आभास
छान आहे.
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.com/
28 Feb 2010 - 10:49 am | मंगेशपावसकर
माझ्या माहिती नुसार 'छंदावतो' हा शब्द कुठल्या तरी कवितेत ऐकल्यासारखा वाटतो