त्या तिथे पलिकडे तिकडे... (भाग ३ / ३)

ऋषिकेश's picture
ऋषिकेश in जनातलं, मनातलं
9 Feb 2010 - 11:34 pm

या आधी: भाग २: बारतांग बेट व जारवा जमात

अंदमानच्या हॅवलॉक आयलंडला भारतातील सर्वोत्तम बीचेस आहेत, तिथे स्कूबा डायविंग करता येते व जगातील सर्वोत्तम साईट्स पैकी काहि डाईव्ह साईटस आहेत हे कळल्यावर आमच्या सहलीत पूर्ण ६ दिवस त्या बेटावर काढण्याचे ठरवले होते. पोर्ट-ब्लेअरहून सकाळी एक व संध्याकाळी एक अश्या दोन फेरी बोटी त्या बेटावर जातात. अंदमानच्याही पूर्वेला दोन ते अडीच तासाचा प्रवास करून जेव्हा आपली फेरी या छोट्या बेटाच्या धक्क्याला लागते तेव्हाच स्वर्ग जवळ आहे याची चाहूल लागते. इथे असणार्‍या पाण्याचा रंग शब्दांत वर्णन करणे शक्य नाहि, यांत्रिक क्यामेराने आपला डोळा कितीही वाकवला-वटारला-झुकवला तरीही तो रंग त्यालाही टिपणे शक्य नाहि. तो हिरव्या-निळ्यासारख्या रंगाचा समुद्र आणि त्याला पांढर्‍याशुभ्र रंगाची किनार या नक्कीच अनुभवण्याच्या गोष्टी आहेत.

इथे आमचे रिसॉर्टही अत्यंत मस्त जागी होते. आम्ही टेंटेड कबाना घेतले होते.आतून सुसज्ज व्यवस्था, टिव्ही सारख्या क्षुद्र गोष्टी नसलेले ते तंबु, बाहेर दोन आराम खूर्च्या, झोपाळा, खायची-प्यायची सोय, समोर पाचुचा बीच आणि सोबत बायको.. अजून काय पाहिजे बोला? ;) इथे पोचल्यावर स्वर्ग दोन बोटे उरला होता. पुढील आठवडा इथे काढणार ही कल्पनाच सुखावह होती. हा डायविंग रिसॉर्ट असल्याने भारतीय मंडळी मात्र कमी होती.

जग २/३ (~७१%) जग पाण्याने व्यापलेले आहे, हे आपण लहानपणापासून ऐकतो-शिकतो आहोत. याचा दुसरा अर्थ असा, की जरी आपण जगातील प्रत्येक भूभागात, देशात जाऊन आलो तरी फक्त १/३ पृथ्वीचा आपण आस्वाद घेऊ शकतो. बाकीचे २/३ जग हे आपल्यासाठी निषिद्ध आहे. म्हणजे खरं पाहता, २/३ भागात पाणी आहे म्हणजे तीच खरी पृथ्वी आहे. तेव्हा पृथ्वीच्या अंतरंगात शिरून तिचा आस्वाद घ्यायचा असे फार दिवस मनात होते. अमेरिकेत असताना चौकशी केली होती पण तिथे सर्टीफाईड स्कूबा डाईवर असणे गरजेचे होते आणि सर्टीफिकेशनची फी खूप जास्त होती.

मात्र आपल्याकडे भारतात स्कूबा डायविंगची मस्त सोय आहे. शिकण्याची फी (बाहेरदेशांपेक्षा स्वस्त असली तरी)थोडी जास्त आहे. मात्र मिळणारा अनुभव लक्षात घेता ही फी वसूलच नव्हे तर दामदुप्पट परतवा आहे असे समजायला हरकत नाहि. चार दिवसाचा कोर्स होता, ज्यात शास्त्रशुद्ध प्रशिक्षण व सहा डाईव्ह मिळणार होत्या. हनिमूनला जाऊन प्रशिक्षण घेणे जरी वेडगळ वाटत असले तरी बायकोने "सकाळचे ४च तास तर जायचंय, बाकीचा वेळ आहेच की आपल्यासाठी" असा समंजसपणा दाखवून केवळ पाठबळ दिलं नाहि तर स्वतःदेखील कोर्समधे सामिल होऊन सक्रिय पाठिंबाच दिला. :)

कोर्स सूरू होण्याच्या आदल्या दिवशी या खेळाची शास्त्रशुद्ध माहिती वर्गात शिकवली गेली. विडीयो दाखवले गेले. आणि कोर्सचा पहिला दिवस उजाडला. आमच्या नावेत नावाडी सोडून मी, माझी बायको, एक फिनीश तरूण आणि एक जर्मन तरूण असे चार विद्यार्थी आणि एक टर्की आणि एक भारतीय प्रशिक्षक असे एकून ६ जण होते. आजपर्यंत जलतरण पूलमधे, नदीमधे, तलावात अगदी विहीरीतही केले आहे. खोल समुद्रात उडी मारण्याचा योग पहिलाच. पहिला दिवस विविध उपकरणांची ओळख, आपत्कालिन प्रसंगी करावयाच्या क्रियांची प्रॅक्टीस आणि सर्वात मुख्य म्हणजे पाण्याखालच्या संवाद साधण्याच्या खाणाखूणा यांचे प्रशिक्षण मिळाले. पहिल्या दिवशी छान सूर्यप्रकाश असल्याने पाण्यात आमच्याप्रमाणेच जेलीफीश देखील डुंबायला आले होते. त्यामुळे हात आणि पायावरच्या उघड्या भागांवर त्यांनी यथेच्छ चाऊन घेतले. :(

डायविंग चे तंत्र/उपकरणे याची ओळख वाचकांची इच्छा असल्यास वेगळ्या लेखात करून देईन. इथे उल्लेख करतो तो दोन अप्रतिम डाईव्हज् चा. पहिली डाईव्ह आहे "मार्स". एक बुडालेले जहाज. ह्या डाईव्हच्या आधी कोरल्स, मासे असणार्‍या पाण्याखालील सपाट पृष्ठभूमीवर गेलो होतो. त्याची धुंदी अजून ताजी होती. आणि आमच्या प्रशिक्षकाने आम्हाला एका बुडालेल्या जहाजाजवळ डाइव्ह घ्यायचं सुचवलं आम्ही लगेच तयार झालो.

पाण्यात उडी मारली प्रशिक्षकाकडे तोंड करून त्याच्या खूणा समजाऊन घेत शास्त्रशुद्ध उतरंड (डिसेंट) चालू केली. वाढत्या खोलीनिशी कानावर येणारा दबाव, वाढत्या दबावाने रक्तात मिसळणारा नायट्रोजन आदिंची काळजी घेण्यासाठी प्रत्येक डाईव्हचा डिसेंट आणि असेंट (बुडणे आणि उभरणे) दोन्ही शास्त्रशुद्ध पद्धतीने करावे लागते. तर काहि मिनिटांनी आमच्या कंबरेचा खोलीमापक १६मी. दाखवू लागला. खाली जमिन दिसू लागली. जमिनीवर भरपूर रंगेबीरंगी कोरल्स आणि त्याभोवती बरेच मासे होते. इतक्यात प्रशिक्षकाने मागे पहा सांगितले. आम्ही वळलो मात्र दोन मिनीटे श्वास आपोआप रोखला गेला. समोरच उंचच्या उंच जहाज पाण्याखाली चिरविश्रांती घेत होते. इतक्या जवळ जहाज असेल याची कल्पना नसल्याने दोन मिनीटे खरंच श्वास घ्यायला विसरलो आणि त्यामुळे अजून खाली जाऊ लागलो :) (पाण्यास न पोहता केवळ श्वासावर पाण्यातील पातळी सांभाळावी लागते). नंतर सांभाळलो आणि मग त्या जहाजाची सैर करायला निघालो. एके काळचे चाच्यांचे जहाज, त्यांनी बोटीवर खरडलेली चित्रे तशीच्या तशी होती. त्याच बरोबर ते जहाज अनेकविध मासे आणि कोरल्सने पूर्ण भरलेले होते. इतरत्र न दिसलेले अनेक मासे इथे बघायला मिळाले. अचानक प्रकाश थरथरू लागला म्हणून वर पाहिले तर एक छोट्याशा माश्यांचा मोठ्ठा कळप प्रचंड वेगाने डोक्यावरून चालला होता. एकूणच वातावरण भयचकित आणि त्याच बरोबर विस्मयचकित करणारं होतं.

दूसरी एक डाईव्ह म्हणजे "द वॉल". इथे जायच्या आधीच आमचा प्रशिक्षक म्हणाला होता की तुम्ही आता जगातील सर्वोत्तम डाईव्हजपैकी एक आता करणार आहात. आणि ते खरंच होते. इथे साधारणतः ११ मीटरला एक सपाट जमिन होती ज्यावर नानाविध कोरल्स-मासे-शैवालाचे जंगल होतेच शिवाय सूर्यप्रकाश भरपूर होता. थोडे पुढे जाताच हे मैदान अचानक संपायचे आणि तिथे होती अजून ४० मीटर खोल सरळ उभी भिंत - द वॉल. ही इतकी खोल होती की इतक्या स्वच्छ सूर्पप्रकाशातही तळ दिसणे दूरापास्त होते. आपच्या उपकरणांची मर्यादा १८ मी होती. (यापेक्षा खोल डाईव्ह साठी जास्त हवेचे सिलेंडर, लांब हातांचे सूट, कानाला विषेश प्रोटेक्शन, नायट्रोजनच्या प्रादुर्भावापासून वाचण्याचे विषेश ट्रेनिंग लागते) त्यामूळे भिंतीच्या वरच्या ७ मीटरवरील जलचरसृष्टी पहता येणार होती. मात्र याच पट्ट्यात इतके बघितले की डोळ्यांचे पारणे फिटले. सप्तरंगांतीलच काय पण कोणत्याही रंगाच्या दूकानातील प्रत्येक रंगांपेक्षा वेगळे आणि नैसर्गिक रंगांचे थैमान डोळ्यापुढे होते. ब्रेन कोरल्स सारखे नजरवेधक प्रकार, श्वासोच्छवास करणारे कोरल्स, मासे खाणार्‍या वनस्पती, दगडांआड लपलेले ऑक्टोपस, काटे फेकणारे/फूगणारे मासे, घोडेमासे, स्टारफिश, इल, छोट्या माशांचे थवे, डोक्यावर मोठ्ठा टिळा लाऊन आपल्याच ऐटीत फिरणारा मोठ्ठा नेपोलियन वगैरे नानारंगी नानाढंगी माश्याचे संमेलन तिथे होते. ह्या पृथ्वीतलावरच्या ह्या निसर्गाच्या जिवंत चत्कारांपूढे मी नतमस्तक झालो. ह्या सहा दिवसात निसर्गाने आपल्या विश्वाचा चिमुकला हिस्सा माझ्यापुढे धरला होता. त्यामुळेच मी इतका भारावलो होतो.
(माझ्याकडे पाण्याखालचा कॅमेरा नसल्याने फोटो नाहि आहेत)

अजून एक सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे, ह्या हॅवलॉक गावाचे वैशिष्ट्य, की इथे प्लॅस्टिक बंदी आहे. बाटली हॉटेलात एकदाच देतात तीच नेहमी भरून देण्याची सोय आहे. अत्यंत साधी माणसे, छोटे बेट जगाला खूप मोठे काहितरी देत होते. बाकी डायविंग करायचे नसणार्‍यांसाठी स्नॉर्कलिंगची सोय आहे. याशिवाय देखील केवळ आराम करण्यासाठीही हे उत्तम स्थळ आहे. पूर्वकिनारा असल्याने उगवता चंद्र, रात्री एक वेगळेच विश्व निर्माण करतो. त्या चंदेरी लाटांवर डूलणार्‍या बोटी आणि शुभ्र वाळूमधल्या गप्पा अजूनही मनात रुंझी घालतात.

असो. तर "त्या तिथे पलिकडे तिकडे.." ही जाणीव भारतातल्याच पण भारताच्या मुख्य भूमीपासून दूर असणार्‍या पोर्ट ब्लेअरलाच संपेल असा जो अंदाज होता त्याच्या साफ फडशा उडाला होता. सार्‍या भावनांच्या पलिकडचे सेल्युलर जेल, त्या पलिकडे असणारे जारवांचे जग - बारतांग बेट, मुख्य अंदमानच्या पलिकडचे हॅवलॉक, या पृथ्वीवर जमिनीपलिकडचे- पाण्याखालचे जग आणि लग्नापलिकडील नवेकोरे विश्व या सार्‍यांनी "त्या तिथे पलिकडे तिकडे.." ही जाणीव एका समृद्ध अनुभवात परिवर्तित केली. कदाचित तिथे पुन्हा जाणे होणार नाहि, पण अलिकडच्या किनार्‍यावर बसून पलिकडील जंगलातल्या शिकारीच्या गोष्टी आठवून आठवून सांगणार्‍या आजोबांसारखे, त्या तिथले आठवणींचे कढ आयुष्यभर येत राहतील हे नक्की

समाप्त

टिपः
स्कूबा डायविंग ही शारिरिक व मानसिक परिक्षा पाहणारी क्रिडा आहे. योग्य आरोग्य नसताना/प्रशिक्षणाशिवाय/उपकरणांशिवाय/सोबतीशिवाय हा खेळ खेळणे जीवघेणे ठरू शकते

प्रवासअनुभव

प्रतिक्रिया

आताच्या आत्ता उठून तिकडे जावं असं वाटायला लागलं बघ!
तू वर्णन केलेल्या गोष्टी खरंच कॅमेर्‍यात पकडता येणार्‍या नव्हेतच, प्रत्यक्षच जायला हवं.
बुडालेलं जहाज आणि कोरल्स कसला अद्भुत थरार असेल्.....बापरे! @)
(बाकी उरलेला वेळही तू सत्कारणी लावला असशील ह्यात शंका नाही! ;) )

चतुरंग

बिपिन कार्यकर्ते's picture

10 Feb 2010 - 1:46 am | बिपिन कार्यकर्ते

सहमत.... ठळक पुसट दोन्हीशी.... :)

ऋषिकेशराव... तुम्ही च्यायला लैच्च धमाल केली ब्वॉ... आणि जबरी वर्णन... फोटू... मस्त.

बिपिन कार्यकर्ते

अनामिक's picture

10 Feb 2010 - 2:48 am | अनामिक

हेवा वाटावा अशी भ्रमंती केलीस की तू.... सगळे भाग एकादमात वाचले... खूप सुंदर लिहिलं आहे.

-अनामिक

चित्रा's picture

10 Feb 2010 - 5:02 am | चित्रा

छानच वर्णन, सहल आणि पाणी.

परवाच आमच्या इथल्या म्युझियम ऑफ सायन्समध्ये कोरल रीफवर एक लघुपट पाहिला. त्यामुळे ह्या वर्णनामुळे जास्तच पाण्याखालचे जग पहावेसे वाटायला लागले.

शुचि's picture

10 Feb 2010 - 5:10 am | शुचि

वेधक अनुभववर्णन
छान लिहीला आहे लेख. वाचायला खूप मजा आली.
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

वात्रट's picture

10 Feb 2010 - 5:20 am | वात्रट

पुढची ट्रीप अंदमानच ....
खुप हेवा वाटतोय तुमचा ... :)

सुनील's picture

10 Feb 2010 - 7:01 am | सुनील

खूपच सुंदर. आत्ता उठावे आणि अंदमानला जावे असे वाटू लागले आहे!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

अक्षय पुर्णपात्रे's picture

10 Feb 2010 - 7:37 am | अक्षय पुर्णपात्रे

श्री ऋषिकेश, लेखमाला मस्त.

सहज's picture

10 Feb 2010 - 7:16 am | सहज

जबरदस्त सांगता. तीनही भाग उत्तम!

प्रमोद देव's picture

10 Feb 2010 - 3:53 pm | प्रमोद देव

सहजरावांशी सहमत!

**********
भले तर देऊ कासेची लंगोटी ।
नाठाळाचे माथी हाणू काठी ॥

विसोबा खेचर's picture

10 Feb 2010 - 8:00 am | विसोबा खेचर

सुंदर चित्रदर्शी लेखन. वाचायला मजा आली.

तात्या.

समंजस's picture

10 Feb 2010 - 11:25 am | समंजस

खुपच सुंदर!! :)

अंदमान बद्दल फार कमी माहीती असल्यामुळे, हा लेख चांगली माहीती देणारा ठरला(आणि हेवा वाटणारा सुद्धा :) ).

टुकुल's picture

10 Feb 2010 - 11:51 am | टुकुल

ऋष्या, एकदम जबरदस्त.
तुझ्यासारखेच माझे पण विचार आहेत अंदमान ला जायचे आणी सेम टु सेम कारणासाठी ;-)
बाकी, तिन्ही भाग आवडले

--टुकुल

स्वाती दिनेश's picture

10 Feb 2010 - 12:34 pm | स्वाती दिनेश

अप्रतिम रे ऋषीकेश,
खरचच वरच्या सगळ्यांप्रमाणे आत्ताच्या आत्ता तिथे जावसं वाटतय..
स्वाती

यशोधरा's picture

10 Feb 2010 - 12:45 pm | यशोधरा

हाही भाग आवडला. मस्त!

स्वाती२'s picture

10 Feb 2010 - 7:43 pm | स्वाती२

सुरेख!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Feb 2010 - 8:57 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ऋषी, सफर आवडली. हेवा वाटावी अशीच सफर...!

-दिलीप बिरुटे

ऋषिकेश's picture

12 Feb 2010 - 12:07 am | ऋषिकेश

सर्व वाचकांचे व आवर्जून प्रतिसाद देणार्‍यांचे अनेक आभार!

ऋषिकेश
------------------
इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

प्रियाजी's picture

27 Nov 2015 - 3:09 pm | प्रियाजी

ऋषिकेश, अंदमान सहलीसाठी तिमांचे लेख वाचत असताना तुमच्या लेखांची लिन्क मिळाली. अन पहिला लेख वाचल्यावर उरलेले दोन लेखही आधाश्यासारखे वाचून काढ्ले. तुमच्या खुसखुशीत लेखनशैलीतील अंदमानचे वर्णन अन बरोबरचे फोटो यामुळे या स्वर्गासम स्थळी आजपर्यंत न गेल्याने खरोखर फार वाईट वाटले. यावेळी जमेल तसे अंदमानला जाण्याचा निश्चय केला आहे. लेखाची साठवणीतील लेखात नोंद केली आहे.