त्या तिथे पलिकडे तिकडे... (भाग २ / ३)

ऋषिकेश's picture
ऋषिकेश in जनातलं, मनातलं
1 Feb 2010 - 4:52 pm

या आधी: भाग-१: पोर्ट ब्लेअर, सेंट्रल जेल

पोर्ट ब्लेअर हे शेवटी एक शहर आहे. एक संपूर्ण पर्यटन स्थळ! त्यामुळे कितीही छान असलं तरी सगळीकडे पर्यटक असायचे. अस्वच्छता, दुर्गंधी, फेरीवाले, धक्काबुक्की यांचा त्रास नसला तरी जाणवण्या इतपत वर्दळ होतीच. व्यावहारीक भाषा हिंदी, त्यामुळे भारताच्या मुख्य भूमीपासून दूर आल्यासारखं वाटेना. आम्ही पोर्ट ब्लेअरला तीनच दिवस रहाणार होतो. बाकी बराचसा वेळ हॅवलॉक आयलंड ह्या अजून पूर्वेला असणार्‍या एका दूरस्थ बेटावर काढण्याचे ठरवले होते. त्यामुळे ह्या दिवसांमधे रॉस आयलंड व जॉली बॉय करावे हा एकूणच हॉटेलवाल्यांचा / तेथील रिक्षावाल्यांचा ग्रह आणि आग्रह होता.

भारतापासून दूर त्या तिथे पलिकडे तिकडे फक्त पोर्ट ब्लेअर आहे; आणि जवळ असणारे रॉस आयलंड व जॉली बॉय ह्या सुंदर जागा आहेत हा अंदमानबद्दल असणार्‍या अनेक समजांपैकी एक. त्यातील जॉली बॉय हे स्नॉर्कलिंगसाठी प्रसिद्ध आहे. आमच्या आधी अंदमानला जाऊन आलेल्यांनी जॉली बॉय बघितले होते, त्यांनी त्सुनामी नंतर जॉली बॉय आहे का ते बघ असे बजावले होते. ३-४ तासांच्या भेटीत प्रत्येक व्यक्तीवर अंदमानच्या समुद्राने त्याच्या रंगाने घातलेली मोहीनी मी त्यांच्या डोळ्यात बघितली होती आणि तेव्हाच मी अंदमानला जायचे ठरवले होते.

मात्र इथे आल्यावर जसजशी अंदमानची माहिती कळू लागली तसे मला रॉस आयलंड व जॉली बॉय बघण्यापेक्षा अंदमानच्या अंतरंगात शिरावेसे वाटू लागले. अंदमानला बरेच आदिवासी आहेत ही माहिती खरी आहे (मात्र फक्त आदीवासी नाहीत :) ). अंदमानला आदिवासींच्या एकूण ६ जमाती आहेत त्यातील दोन तर नरभक्षक आहेत. सुदैवाने भारतीय "मुलवासी जमाती संरक्षण कायदा, १९५६" (Aboriginal Tribes Regulation, 1956) मुळे ह्या सगळ्या जमाती संरक्षित आहेत.

तर मध्य अंदमानमधी बारतांग आयलंडला जाण्याच्या रस्त्यावर या जमातींपैकी जारवा जमातीमधील लोकांना बघायची संधी असते हे कळल्यावर रॉस आयलंड वगैरे ऐवजी अचानक बारतांग आयलंडला जायचं नक्की केलं. सकाळी लवकर उजाडत असल्याने पहाटे चारला ठरवलेली गाडी आली आणि त्यातून आमच्याच हॉटेलमधील ३-४ जण आणि आम्ही दोघे बारतांग आयलंडला निघालो. सूर्य उजाडायचा होता.. नीटसे फटफटलेदेखील नव्हते. परिसराचा अंदाज फिकट होत चाललेल्या आकाशाच्या काळ्या रंगामुळे येत होता.. प्रकाश वाढु लागला तोपर्यंत आमची गाडी घनदाट जंगलातून चालली होती. सुंदर निबिड अरण्य. भल्या सकाळी उठल्याने मंडळी पेंगुळलेली होती. लवकरच त्यांनी "होय होय होय - नाहि नाहि नाहि" सुरू केलं ;) . मग मी आणि ड्रायव्हर दोघेच जागे असल्याने त्याला झोप येईल या भीतीने मीच त्याच्याशी गप्पा मारू लागलो. सुरवातीला बुजत बोलणारा आमचा ड्रायव्हर हळुहळु नीट बोलु लागला.
"हा बघा.." डायवर सांगत होता...निबिड अरण्यात अचानक एक दलदलीचा पॅच लागला तिथली सगळी झाडं तुटली होती.. फक्त पाण्यातून बाहेर आलेली निष्पर्ण खोडं शिल्लक होती.."इथेही दाट जंगलच होतं.. मात्र एका लाटेने हे हाल झाले"
फक्त एका लाटेचा इतका तडाखा बघूनच हतबुद्ध झालो. पुढे त्सुनामीचे ठिकठिकणी लागलेले व्रण बघत जात होतो.

जसजसं जारवा रिझर्वस जवळ येऊ लागले तसे तसे रस्ते लहान आणि शंका मोठ्या होऊ लागल्या. मंडळी उठली होती. डायवर बोलता झालेला पाहून त्यांनी शंकांना वाट मोकळी करून द्यायला सूरवात केली
"काय हो? ते जारवा गाडीतून काहि उचलणार तर नाहित ना?"....
"नाहि"
"त्यांच्याकडे शस्त्र असतात??" ...
"हो.. पण घाबरू नका मिलट्री बरोबर असेल आपल्या"
"खातात काय हो ते?"..
"रानडुकरांची वगैरे शिकार करतात.. बाकी शेती वगैरे नाहि.. त्सुनामीपासून सरकार काहि धान्यांच्या पिशव्या त्या भागात टाकते असे ऐकलंय"
"ते घरात रहातात का गुहेत?"
"घरांत.. आत जंगलात त्यांच्या बांबुच्या झोपड्या आहेत."
"आपल्याला दिसतील?"
"नाहि. मीदेखील अजून बघितलेल्या नाहित"
"त्यांना हिंदी येतं?"
"नाहि. मात्र मिलिट्रीवाल्यांनी त्यांना "बचाव" शब्द शिकवला आहे :) "
यावर अख्खी गाडी (उगाच) हसली.
"बरं आता आपल्याला परमिट मिळेल.. मग दर दोन गाड्यांच्या मागे एक आणि पुढे एक अशी मिलिट्री व्हॅन असेल... गाडीच्या काचा उघडण्यास मनाई आहे.. वाटेत फोटो काढण्यास मनाई आहे.. जारवा दिसले तर त्यांच्याशी संवाद साधायचा प्रयत्न करण्यास, त्यांना खायला देण्यास मनाई आहे.. गाडी ताशी ५०कीमीपेक्षा जास्त वेगात चालवणे सक्तीचे आहे.. तेव्हा पुढचे ४० किमीच्या पट्यात गाडी थांबणार नाहि. समोर टॉयलेट आहे "
सर्व सुचना एका दमात दिल्याने सगळ्यांना खूपच शंका होत्या मात्र शेवटच्या सुचनेमुळे त्या शंका थोपवून लोक लघुशंकांकडे लक्ष पुरवण्यास पळाले ;)
अर्ध्या तासात परमीट मिळाले व सगळ्या गाड्या एका रांगेत उभ्या राहिल्या. गाडीवानाने किल्ली फिरवली आणि स्त्रीसमुहाने का कोण जाणे देवाचे नाव वगैरे घेतले/पुटपुटले.. समोरच्या गाडीतून "शिवाजी महाराज की जय" वगैरे गर्जनाही झाल्या.. एकूणच काय, तर आमच्या डायवरप्रमाणेच इतर डायवरांनीही उत्सुकता ताणण्याचे आणि काहिसे घाबरवण्याचे व्यावसायिक कसब छान दाखवले होते.
एखाद्या मोहिमेवर निघाल्यागत आमची गाडी सुसाट निघाली. एकमार्गी रस्त्यावर ओवरटेकिंग करण्यास मनाई असल्याने एका वेगात एका रांगेत अत्यंत घनदाट अरण्यातून चाललेल्या गाड्या छान वाटत होत्या. पहिली काहि मिनीटे गाडी श्वास रोखून आणि जीव डोळ्यात आणून मंडळी परिसर बघत होती. न जाणो एखादा जारवा झाडावर दिसायचा. दहा एक मिनीटे झाली तरीही गाडीचे चालक, मिलिट्रीचे जवान आणि घाबरलेले उत्सूक वेडे पर्यटक सोडल्यास कोणत्याही जमातीचा मागमुस दिसेना. तेव्हा लोकांच्या दडलेल्या शंकांना कंठ फुटु लागला
" त्यांना खायला का द्यायचं नाहि?"
"त्यांना मिठाची सवय नाहि आहे. आजारी पडतात ते"
इतक्यात एक त्सुनामी प्याच आला
"ह्या लोकांपैकी त्सुनामीमधे बरेच गेले असतील नाहि बिचारे!"
"ह्यांच्यापैकी? एकही नाहि.. ह्यांना आधीच कळलं होतं बहुतेक .. घर सोडून संध्याकाळीच डोंगरावर चढून बसले होते"
इथे सगळ्या गाडीला आश्चर्यचकित व्हायलाही पुरेसा वेळ मिळाला नाहि .. कारण गाडीने एक वळण घेतले आणि समोरच एकही वस्त्र न पांघरलेले, हातात लाकडी काठ्या, अंगभर राख फासलेले एक कुटुंब (किंबहूना ५-६ मुलं, २ स्त्रीया आणि एक पुरुष) आमच्या गाड्यांकडे बघत हसत होते. गाडीतील सगळेजण त्या, फक्त डिस्कव्हरी चॅनेलमधेच दिसणार्‍या, आदिवासी मंडळींकडे भीती, आश्चर्य, रोमांच, कणव वगैरे अनेक भावांच्या मिश्रीत नजरेने बघत होते..
ते नजरेआड गेले आणि गाडीने रोखलेला निश्वास एकत्रच सोडला.
"ह्यांना शिक्षण दिलं पाहिजे. फक्त आपणच जगातल्या सगळ्या सोयी वापरायच्या हे काही बरोबर नाहि" इतका वेळ गप्प असणार्‍या, अन भल्यापहाटे मनसोक्त मेकअप केलेल्या एका काकुंचा सामाजिक बाणा अचानक जागृत झाला
"कशाला? किती मजेत दिसत होते ते!" गाडीतील बायकांपैकी फक्त आपल्यालाच सांसारिक विषय सोडून अश्या विषयांवर बोलता येते असा स्वतःच करून घेतलेला समज तुटल्याने दुखावलेल्या दुसर्‍या काकु फणकारल्या
"मजेत? बिचार्‍यांकडे धड कपडे देखील नव्हते. भारताने अश्या जमाती टिकवून काय फायदा? किती थंडी वाजत असेल त्यांना रात्री. काल मी तर ब्लँकेट घेऊन एसी बंद करून झोपले होते" मेकअप काकुंनी अन्न वस्त्र निवार्‍याच्या मुलभुत प्रश्नाला हात घातला
"जाऊदे, भारत अमेरिकन होत चालला आहे तितका पुरेसा नाहि का? आता ह्यांना कशाला त्या रॅटरेस मधे ओढताय?" मेकअप काकुंच्या अमेरिकन मुलाची कहाणी ऐकवुन झाली होती त्याचा वचपा असा!?
ही मजा अजून चालली असली पण डायवर अचानक "ते बघा अजून" म्हणाला आणि मंडळी दुसर्‍या जारवा मंडळींकडे बघण्यात गुंतली. इथे ह्या जारवांचे आमच्याकडे लक्षच नव्हते(तसे ते दाखवत नव्हते). एक कुठलेसे फळ सोलण्यास सगळे गर्क होते. पुढे हि मंडळी दिसत गेली, जाताना तसेच परतीच्या वाटेवरही. दिसायला आफ्रिकन वाटले तरीही ते भारतीय आहेत, माझ्याप्रमाणे तेही (त्यांना जाणीव असो नसो) याच देशाचे नागरीक आहेत आणि मला ही गोष्ट त्यांच्याशी जोडते आहे ही जाणीव फार वेगळी होती. वंश, धर्म, नीती-अनीती या सगळ्याच्या पलिकडे पोहोचलेल्या (किंवा ह्यासगळ्याच्या अलिकडे असलेल्या) आणि देश, नागरीकत्त्व वगैरे न मानणार्‍या ह्या निसर्गपुत्रांशी आपली (बळंच) नाळ जोडायला नागरीकत्त्वच वापरावं लागावं हा केवढा विरोधाभास!

ह्या नव्या (काहिशा वदग्रस्त) ट्रंक रोडने (नॅशनल हायवे) ह्या जारवांचा बाहेरच्या जगाशी संपर्क वाढला आहेच. गेल्या ७-८ वर्षांत त्यातील काहिंनी आपले शब्द शिकायला सुरवात केली आहे. सगळं जग सारखंच एका वासाचं, एका रंगांचं बनवु पहाणार्‍या तथाकथित 'आधुनिक' माणसांचा परिणाम पशुपक्षांवर दिसु लागला आहे, तर मग ह्या माणसाच्याच जमातीवर परिणाम न दिसेल तरच नवल. आता हे किती योग्य, अपरिहार्य आणि किती क्लेशकारक हे ज्याचे त्याने ठरवावे.
*१. माझे व्यक्तीशः अश्या भागांतून रहदारी / रोड जावा की नाहि याबद्दल ठाम नसलं तरी बरेचसे नकारात्मकतेकडे झुकलेले मत आहे. त्यामुळे माझे काहि एकांगी अनुभव न सांगता / टिप्पणी न करता नका इच्छुकांनी अधिक माहितीसाठी विकी आणि जालावरील इतर संदर्भ वाचावेत असे सुचवतो.
२. बाकी आता रोड आहेच, तर ह्या जमातींचे 'आधुनिकी'करण होण्याआधी भेट देऊन घ्या हा एका अर्थी स्वार्थी सल्ला!*

असो. तर पुढे बारतांग आयलंड हे मध्य अंदमान मधील बेटावरील जिवंत पत्थराच्या गुंफा(living stones) बघायला जायचे होते. अश्या गुंफा बघायला इंडोनिशिया, जपान वगैरे ठिकाणी जाणे जमत नसेल तर अश्या गुंफा भारतात आहेत. अजूनही तिथे दर क्षणाला विश्व नवनिर्माण करत आहे. एक थंड, मनमोहक, लांब गुंफा हे त्याचे वैशिष्ट्य तर आहेच पण त्याहीपेक्षा रोचक वाटते ते सृष्टीचं आपल्यापुढे घडताना पाहणं. ह्या गुंफा कशा बनल्या वगैरे गोष्टीत रस असणार्‍यांनी पुढील फलक वाचुन काढावेत

ह्या गुंफांना जायचा रस्ता देखील मोठा रोचक आहे. एका स्पीड बोटीतून बॅकवॉटर्समधून तुम्ही अर्धातास जाता आणि मग अचानक एका तिवराच्या जाळीत बोट घुसते. चारी बाजूला तिवराची जाळी आणि बोगद्यात आपली बोट हा अनुभव (नावाड्याने तिवरात मगरी असतात सांगितल्याने अधिकच) रोचक वाटला.


आमचा ह्या गुंफांमधील वाटाड्या देखील मनापासून माहिती देत होता. इतर पर्यटनस्थळी गाईड नावाचे प्राणी जो बॉलीवूडचा इतिहास सांगतात त्यापेक्षा याचे माहितीपर वर्णन निश्चितच सुखावह होते. त्यात त्याने गुहेत शेवटी काहि क्षण सगळ्यांना विजेर्‍या आणि आवाज बंद करायला सांगितले. आणि तो मिनीट डोळ्यात बोट घातले तरी दिसणार नाहि असा अंधार बर्‍याच दिवसआंनी अनुभवला. प्रकाश आणि आवाजाचा अभाव सगळ्यांनाच हवाहवासा वाटला, आवडला.

इथे आम्हाला भेटलेल्या एका आजींचा उल्लेख केल्याशिवाय रहावत नाहि. ह्या गुंफेत दुसर्‍या एका ग्रुपबरोबर एक अमरावतीच्या आजी आल्या होत्या. त्यांनी आलेपाकाच्या वड्या पुढे करून आपणहून दोस्तीचा हात (वड्या) दिल्या आणि मग आमच्या प्रश्नांची वाट न पाहता सांगु लागल्या.. "आता मी ८२ वर्षांची आहे, भारतात हे इतकंच बाकी होतं, कुठुनसं कळलं हा मुंबईचा ग्रुप चाललाय म्हटलं माझं नाव आधी घाला. हे झालं की मग काय माझा जीव अडकायला नको.." संपूर्ण भारत भ्रमण केलेल्या त्या आजींच्या इच्छाशक्ती आणि निर्धाराच्या शंभरावा हिस्सा त्यांच्या वयात आपल्यात टिकला तर किती नशिबवान असु असे वाटून गेले आणि त्यांना बोलूनही दाखवले. त्या नुसत्याच हसल्या आणि एक श्रीखंडाची गोळी मिळाली :)

अंदमानच्या सफरीवर निघताना बारतांग / जारवा रिझर्व्स ही नावे माहित होती मात्र तिथे जायचा योग येईल असे मात्र वाटले नव्हते / ठरविले नव्हते. मात्र आता ही ठिकाणे हा अनुभव घेण्याच्या निर्णयाचे समाधान वाटते. अंदमानच्याही एका दूरस्थ कोपर्‍यातील हा अनुभव खुप श्रीमंत करून गेला.

पुढील भागातः हॅवलॉक आयलंड आणि स्कुबा डायविंग

प्रवासअनुभव

प्रतिक्रिया

प्रसन्न केसकर's picture

1 Feb 2010 - 5:09 pm | प्रसन्न केसकर

जारवा प्रकरण वाचताना अभयारण्यातल्या वाघ सिंहांची आठवण झाली.

जे.पी.मॉर्गन's picture

1 Feb 2010 - 5:22 pm | जे.पी.मॉर्गन

२०१० मध्ये अंदमान - निकोबार करून यायचं हा प्लॅन पक्का होऊ लागला आहे !

येऊदे !
जे पी

बिपिन कार्यकर्ते's picture

1 Feb 2010 - 5:27 pm | बिपिन कार्यकर्ते

ऋष्या.... च्यामारी धरून फट्याक... खूप खूप दिवसांनी तुझं लेखन वाचतोय. मज्जा येते आहे. पटापट टाक रे पुढचे भाग.

बिपिन कार्यकर्ते

स्वाती२'s picture

1 Feb 2010 - 6:10 pm | स्वाती२

मस्त!

स्वाती दिनेश's picture

1 Feb 2010 - 6:32 pm | स्वाती दिनेश

श्रीमंत अनुभव!
स्वाती

झकासराव's picture

1 Feb 2010 - 6:44 pm | झकासराव

जबरी !!! :)

सुनील's picture

1 Feb 2010 - 8:30 pm | सुनील

हाही भाग मस्त! पुढचा भाग लवकर येऊदे!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

श्रावण मोडक's picture

1 Feb 2010 - 10:47 pm | श्रावण मोडक

छान. पण तुमच्याकडून अजून थोडे अपेक्षीत आहे!

सहज's picture

2 Feb 2010 - 5:54 am | सहज

वाचायला मजा येते आहे. पुढचा भाग लवकर येउ दे.

सन्जोप राव's picture

2 Feb 2010 - 6:15 am | सन्जोप राव

एकदम वाचले. मिळमिळीत भेंडीभोपळ्यांत रस्सा भुरकल्यासारखे वाटले. सेल्युलर जेलमध्ये भल्याभल्यांच्या डोळ्यांत पाणी येते असे ऐकून होतो, ते आता पटले. त्या पाण्यासाठी तरी आता तेथे जायला हवे.
'आभाळ म्हणाले नाही, भूमीही म्हणाली नाही,
मग विनायकाने त्यांची आळवणी केली नाही.
दगडाची पार्थिव भिंत, तो पुढे अकल्पित सरली,
मी कागद झाले आहे, चल लिही असे ती वदली'

हे आठवले की नाही?
बाकी 'अंदमानला जातो आहेस, तर लक्षद्वीपला जाणार की नाही?' असले प्रश्न विचारणार्‍यांचा काय किंवा भल्यापहाटे मनसोक्त मेकप करुन बडीशेप चघळत उत्तेजनार्थ समाजवादी बोलणार्‍यांचा काय, सुळसुळाटच आहे. या 'बाजीचा-ए-अत्फाल' मधून श्रीखंडाची गोळी देणार्‍या आजींचाच काय तो आधार वाटतो.
प्रवासवर्णन हे टूरिस्ट गाईडसारखे नसावे. फक्त माहिती आणि छायाचित्रे यांचे भरीत म्हणजे प्रवासवर्णन अशा सुमारसद्दीत या दोन लेखांचे वेगळेपण चटकन डोळ्यांत 'भरते'.
सन्जोप राव
जगण्यात मजा आहे, तोवरच मरण्यात मजा आहे.

चतुरंग's picture

2 Feb 2010 - 8:17 am | चतुरंग

अंदमान तू आसुसून उपभोगला आहेस, तिथल्या निसर्गाशी रममाण होऊन अनुभवला आहेस. काय टाळायचं आणि काय पहायचं ह्याचा विवेक अशा ठिकाणी जागा असणं हे उत्तम माणूसपण जागं असल्याची खूण आहे. जियो!!

चतुरंग

Nile's picture

2 Feb 2010 - 8:32 am | Nile

मस्त लि़खाण! काही प्रसंग तर डोळ्यांसमोर उभे राहिले.

स्कुबा डायविंग

क्या बात है! लवकर येउ द्या.

अक्षय पुर्णपात्रे's picture

2 Feb 2010 - 9:03 am | अक्षय पुर्णपात्रे

श्री ऋषिकेश, मागच्या भागाप्रमाणेच हाही भाग वाचनीय झाला आहे. श्री राव यांनी म्हटल्याप्रमाणे हे भरीत नाही तर चिकटलेल्या क्षणांचे प्रकटण आहे.

जारवा लोक अजुनही नरभक्षक आहेत का? विकिपानावर तसा उल्लेख आढळला नाही. पर्यटकांना जसे जारवा लोकांना पाहता येते तसेच जारवांनाही पर्यटकांना पाहता येत असावे. त्यांना या पर्यटकांचा हेवा वाटत असेल का? माझ्याकडे वारंवार कुतूहलाने पाहणार्‍या लोकांचा मला राग येतो. त्यांना तसाच राग (ही एक मानवी प्रेरणा आहे, असे गृहीत धरून ) येत असेल का? अनेक प्रश्न उभे राहीले. पण मला त्यांच्या माणूसपणाचाच (दुर्लक्ष करत असल्यासारखे दाखवणे, हसणे) धागा (भारतीयत्वाचा नाही) जास्त महत्त्वाचा आणि त्यांना माझ्यापासून अधिक जवळ आणणारा वाटला.

.............................
मला सदोष वस्तु मिळाल्यास मी (उत्पादकास दोष न देता) समाजाच्या नैतिक अधोगतीकडे पाहून शांत बसतो. ----एक जालीय मत

प्रकाश घाटपांडे's picture

2 Feb 2010 - 9:16 am | प्रकाश घाटपांडे

वा वा! यकदा अंदमानला जायला पाहिजे ब्वॉ!

सर्व सुचना एका दमात दिल्याने सगळ्यांना खूपच शंका होत्या मात्र शेवटच्या सुचनेमुळे त्या शंका थोपवून लोक लघुशंकांकडे लक्ष पुरवण्यास पळाले

हॅहॅहॅ पन संशयवादी मान्सांना ल्वॉक शंकेखोर म्हंतात. शंका आल्यास जागेवर विचारा म्हंजे ज्ञानमार्गातील अडथळा दुर होतो असे म्हंतात. /:) /:-)
बाकी अमरावतीच्या आजींकडुन स्फुर्ती घेतली पाहिजे.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

ऋषिकेश's picture

3 Feb 2010 - 10:22 am | ऋषिकेश

सर्व वाचकांचे प्रोत्साहनाबद्दल अनेक आभार.

श्री. सन्जोप राव,

दगडाची पार्थिव भिंत, तो पुढे अकल्पित सरली,
मी कागद झाले आहे, चल लिही असे ती वदली

काय योगायोग आहे, पहिल्या भागातील प्रवासवर्णन लिहिताना तुम्ही वर लिहिलेल्या ओळीच मनात होत्या. अर्थात हे सगळं वर्णन लिहिताना.. प्रत्यक्ष तिथे जेलमधे मात्र खरं सांगायचं तर काहिच मनात नव्हतं.. कोणताही विचार मनात येण्याच्या पलिकडे असणारी ती जागा आहे.

ऋषिकेश
------------------
इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

चित्रा's picture

4 Feb 2010 - 9:16 am | चित्रा

छान लेख, बराच काळ लक्षात राहील असा.

अश्विनीका's picture

5 Feb 2010 - 3:40 am | अश्विनीका

दोन्ही भाग वाचनीय झाले आहेत.
जारवांबद्द्ल लिहीलेले इन्टरेस्टिंग वाटले.
- अश्विनी

धनंजय's picture

5 Feb 2010 - 5:38 am | धनंजय

चांगले वर्णन आणि (पांढर्‍या ठशातले पांढर्‍या ठशातच सोडूनही) विचारप्रवर्तक लेखन. दोन काकवांचा वाद विनोदबुद्धीने टिपला असून गंभीरही आहे.

साधारण अशीच चलबिचल अगदी पुणे जिल्ह्यातल्या मावळातील ठाकर जमातीबद्दल माझ्या मनात होत असे. राज्य सरकारने आरोग्य सेवा, आश्रमशाळा वगैरे प्रकल्प राबवले आहेत, त्यांच्यापैकी कुठला भाग हा नागरिकांशी समान वर्तणूक मानावा, आणि कुठला भाग जमातीचा विनाश मानावा? अगदी सरकारी नोकरीत ते कार्य करतानाही मन कुठल्याही निष्कर्षपाशी स्थिर होत नसे.

पुढच्या भागाची वाट बघतो आहे.