त्या तिथे पलिकडे तिकडे... (भाग १ / ३)

ऋषिकेश's picture
ऋषिकेश in जनातलं, मनातलं
24 Jan 2010 - 2:35 pm

"काय मग? लग्नानंतर कुठे जाणार फिरायला?" हा लग्नसमारंभात भेटायला येणार्‍या लोकांनी विचारायच्या टॉप १० प्रश्नांपैकी एक हे आता कळून चुकले होते. मला त्या प्रश्नांची सवय झाली असली तरी लोकांना माझ्या उत्तराची सवय नसावी बहुतेक. मी सांगायचो "अंदमान" आणि लोक मग मला तिथे काळ्यापाण्याच्या शिक्षेवर पाठविल्यासारखे "अंदमान?!?" असा प्रतिप्रश्न विचारायचे.
काहि लोकांनी अंदमान म्हटल्यावर विचारलेल्या शंकांनी तर माझं भलतंच मनोरंजन झालं
"स्वा. सावरकरांचा जन्म तिथलाच ना रे?"
"अरे तिथे फक्त आदिवसी रहातात ना.. तिथे जाणार आहेस?"
"ओह अंदमान.. मग लक्षद्वीप पण करणार का?"
"तिथे जायला सरकारची परवानगी लागते ना?"
"तिथे १० दिवस काय करणार? फक्त सेल्युलर जेल आणि १-२ बिचेस इतकच आहे ना तिथे बघायला?"
हे प्रश्न ऐकले आणि जाणवलं की भारताच्या ह्या अविभाज्य भागाबद्दल अजून बरेच समज-गैरसमज आहेत. खरंतर तेथील अनुभव, वर्णन लिहावं यासाठी स्फुर्ती लोकांच्या ह्या अशा प्रश्नांनी दिली. :)

काहि अंशी मजेचा भाग सोडला तरी अंदमान बेटे भारतातील सौंदर्याचा अविभाज्य भाग आहेत हे नक्की. केंद्रशासित असल्याने म्हणा, भारतापासून भौगोलिकदृष्ट्या दुर असल्याने म्हणा, कमी लोकसंख्येमुळे म्हणा किंवा काहि सरकारी धोरणे/नियम यामुळे म्हणा ही बेटे अजूनही केवळ आणि केवळ सौंदर्यवान आहेत. जगातील सर्वोत्तम डायविंग साईट्स पैकी एक असणारे अंदमान विदेशी पर्यटकांना मोठ्या संख्येने आकर्षित करते आहे.

असो, तर (एकदाचे) लग्न आणि अंदमानचे वेध दोन्ही एकत्रच लागले. "कोणत्या टूर बरोबर चालला आहेस?" ह्या प्रश्नकर्त्यांना "स्वतःच सगळं अरेंज केलं आहे" हे सांगून अजून चिंतेत टाकत होतो. एरवी दारातूनच निश्चिंत टाटा करणारे आई-बाबा सून आल्याबरोबर चेन्नईच्या गाडीत बसवायला थेट सीएस्टी पर्यंत आले. अगदी "गाडी सुटली रुमाल हलले.. " वगैरे सीन झाला नसला तरी त्यांना दिसेनासे होईपर्यंत अच्छा केलं आणि आमच्या प्रवासाचा श्रीगणेशा केला. ट्रेनमधील मजेशीर प्रवासी नेहमीप्रमाणे माझी करमणूक करत होते. मजल दर मजल करीत चेन्नई आलं आणि तमिळ गलक्यातून वाचवणारी "प्री पेड रिक्षा" सर्विस बघुन आनंद झाला. दुसर्‍या दिवशी सकाळी अंदमानचे विमान होते. अंदमानमधी वास्तव्याचे कन्फर्मेशन, विमानाची वेळ नक्की करून, रिक्षावाल्याला सकाळीच बोलावून लवकरच झोपलो. सकाळी वेळेवर आलेला रिक्षावाला सोडल्यास सांगण्यासारखं काहि विषेश घडलंच नाहि. आमच्या विमानाने चेन्नईहून उड्डाण केलं आणि भारताची मुख्यभूमी आम्ही त्या तिथे पलिकडे तिकडे जाण्यासाठी सोडली.

दोन तास विमानात काढले. विमानात अर्ध्याहून अधिक प्रवासी परदेशी होते. त्यांना अंदमानमधील विविध ठिकाणांबद्द्ल इत्यंभूत माहिती (आपल्या लोकांना नसलेली) होती हे विषेश. असो, तर विमानाने आपले नाक खाली केले आणि आम्ही खिडकीच्या काचेला लावले. समोर हिरव्या कंच वनश्रीने नटलेली बेटं, निळेशार पाणी आणि त्यांना दुभागणारी किनार्‍याची चंदरी रेघ हे तीनच रंग कलिजा खलास करत होते..

(वरील चित्र जालावरून साभार)

ते दृश्य बघूनच पुढील दहा दिवस पृथ्वीवरील एका वेगळ्या नितांत सुंदर भागात जाणार असल्याची खात्री पटली. "अहा!" या अर्थाच्या बहुभाषिक सार्वजनिक चित्कारांमधेच विमानाने जमिनीला पाय टेकले. पोर्ट ब्लेअर हा एक छोटेखानी विमानतळ. भारतातील बर्‍याचश्या शहरांप्रमाणे मुळ वायुदलाचा विमानतळ जो व्यावसायिक कारणांसाठी वापरला जातो. बाहेर आलो. टॅक्सीवाले बरेच होते पण भारतातील इतर शहरांच्या विपरीत टॅक्सीवाले भलतेच सोज्वळ निघाले. एकदा फारतर दोनदा टॅक्सी हवी आहे का विचारले आणि नको म्हटल्यावर मागे लागायचे नाहित. एखाद्या देशाचे कस्टम्सवाले त्या देशाचे आणि गावचे टॅक्सीवाले त्या गावच्या स्वभावाचे पहिले दर्शन घडवतात असे म्हणतात ते काहि खोटं नाहि. पुढे संपूर्ण ट्रीपभर आम्हाला ह्या त्रास न देण्याच्या किंबहूना मदतीसाठी तत्पर वागणूकीचा प्रत्यय येत राहिला.

तर आम्ही हॉटेलवर ब्यागा टाकल्या-जेवलो आणि तडक बाहेर पडलो. अंदमानला जायचे ठरल्यापासून "सेल्युलर जेल" - सावरकरांच्या व इतर अनेक क्रांतीकारकांच्या वास्तव्याने पावन झालेली वास्तु- बघण्याची, अनुभवण्याची प्रचंड उत्सुकता होती. त्यामुळे तिथे जास्तीत जास्त वेळ मिळावा या उद्देशाने आराम वगैरे न करता तडक निघालो. तसंही पंढरपूरला गेल्यावर आधी विठोबाचं दर्शन आणि मग इतर रिवाज करायचे असतात त्याप्रमाणे अखिल भारताच्या क्रांतीसूर्याच्या वास्तव्याचे दर्शन घेऊन पुढील बेत आखणे योग्यच होते.

रिक्षा थांबली आणि समोर "सेल्युलर जेल" लिहिलेली उंच वास्तु उभी होती. एकेकाळी असंख्या क्रांतीवीराचे भक्तीस्थानच. इथे आलो की त्या देशभक्तांच्या कार्याला नवा अर्थ प्राप्त व्हायचा.

आत शिरलो आणि समोरचीच्या प्रमाणबद्ध वास्तुकडे बघतच राहिलो. अतिशय प्रमाणबद्ध रचना आणि त्यामुळे सौंदर्याचे दर्शन करवणारी ती इमारत एकेकाळी कितीतरी जुलुम बघत होती. एकेका 'सेल' समोरून जाताना मनात भावनांचे काहूर माजले होते. एकेका क्रांतीकारकाला ह्याच सेल मधे ठेवले जायचे. त्यात जेलर हा कर्दनकाळ! मुळ भूमीपासून इतक्या दूरवरचा जेलर म्हणजे तेथील अनभिषिक्त सम्राट. त्याने इथे काहिहि केले तरी बातमी बाहेर जाणे कर्मकठीण. ह्या जेलमधे फक्त जन्मठेपेचे आणि फाशीचे कैदीच येत. अश्याच वेळी तिथे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे आगमन झाले. त्यांचा दरारा इतका की त्यांच्या साठी एका कोपर्‍यातील सेल दिला गेला आणि त्यांच्या बाजुचा सेल रिकामा ठेवला गेला. त्यांना आणले हे इतके गुप्त होते की त्यांच्या भावाला वर्षभर हे माहित नव्हते की सावरकर व ते एकाच जेलमधे आहेत.

जेव्हा सावरकरांचा सेल जवळ येत होता तेव्हा मन धडधडत होते.. हा सेल अजूनहि तसाच जपला आहे. सावरकरांच्या पळून जाण्याच्या भीतीमुळे दोन दरवाजे असलेल्या त्या सेल मधे एकटाच आत गेलो.. थोडावे़ळ एकटाच थांबलो.. मन आणि डोळे दोन्ही भरून आले. हीच ती जागा जिथे तात्याराव वर्षानुवर्षे होते. त्यांना हे आकाश असेच दिसत असेल. (चौथा फोटो सावरकरांच्या सेल मधून दिसणारा बाहेरच्या जगातील तुकडा दाखवतो) ह्या गजांतून ह्याच परिसराच्या तुकड्याकडे बघत जेव्हा त्यांना पेन पेपर नाकारला तेव्हा भिंतीवर खंडकाव्य लिहिले असेल. शरीरावरचा रोम अन रोम पुलकित झाला होता. जड अंतकरणाने त्या सेल मधून बाहेर निघालो.

संध्याकाळ होऊन सूर्य विझेपर्यंत असाच अख्ख्या जेलभर भटकत होतो. जिथे फाशी द्यायचे ती जागा, कोलू चालवायला लावायचे ती जागा बघून अंगावर येणारा काटा घालवता जात नव्हता. संध्याकाळी होणारा लाईट अ‍ॅंड साऊंड शो हा देखील सुंदर. त्या जागेची उत्तम माहिती देणारा त्याच बरोबर स्वा. सावरकर, नेताजी बोस, योगेंद्र शुक्ला, बटुकेशवर दत्त यांच्या आठवणी जागवल्या जातात. अत्यंत धीरगंभीर आवाजात हे जेल आपल्याला त्याची कहाणी सांगते आणि आपण भारवलेल्या स्थितीत बाहेर पडतो.

हे जेल 'राष्ट्रीय स्मारक' म्हणून आपल्या स्वातंत्र्य संग्रामातील एक काळी तितकीच स्फुर्तिदाय स्मृती जागृत ठेवतच आहे त्याच बरोबर वेळच्यावेळी डागडुजी, सफाई व रंगरंगोटी होते आहे हे बघून खूप बरे वाटले. प्रत्येकाने बघावेच असे हे स्थळ.. प्रत्येकाने इतिहास शोधण्यासाठी तर बघावेच पण स्वतःला शोधाण्यासाठी जरूर बघावे!

(पुढील भागातः बारतांग बेट व 'जारवा' जमात)

प्रवासअनुभव

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

24 Jan 2010 - 2:45 pm | यशोधरा

सही आहे लेख! आवडला.

प्रभो's picture

24 Jan 2010 - 2:53 pm | प्रभो

ऋषिकेश मस्त सफर घडवलीत आमची.... :)
लेख आवडला.

--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
प्रभोवाणी

विंजिनेर's picture

24 Jan 2010 - 3:21 pm | विंजिनेर

हात्तिच्या... सुरुवातीचं "शंकानिरसन" पाहून मला वाटलं काही खुसखुशीत असेल ("कुर्यात सदा" मधल्या अंकुश चौधरीसारखं) पण असो. हेही छानच दिसतंय :( ...

प्रसन्न केसकर's picture

24 Jan 2010 - 4:03 pm | प्रसन्न केसकर

अजुन येऊ द्या.

बिपिन कार्यकर्ते's picture

24 Jan 2010 - 5:12 pm | बिपिन कार्यकर्ते

ऋष्या, सफर वृत्तांत खरंच आवडला रे !!! सेल्युलर जेलच्या नुसत्या उल्लेखानेच मनात खूप काही उमटते. तू पण छान उतरवले आहेस मनात जे आले असेल ते... अगदी संयत पण पुरेपूर इम्पॅक्ट. पुढच्या दोन्ही लेखांची वाट बघतो आहे. लवकर टाक.

अवांतर:

"तिथे १० दिवस काय करणार? फक्त सेल्युलर जेल आणि १-२ बिचेस इतकच आहे ना तिथे बघायला?"

खरोखर असं विचारलं तुला? त्यांना माझा नमस्कार कळव. ;) खरं तर लग्नानंतर जायला असंच फारसे स्पॉट्स नसलेलं स्थानच ठीक, काय? :D

बिपिन कार्यकर्ते

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

24 Jan 2010 - 5:18 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

पुढच्या भागाची वाट पहात आहे.

अदिती

आनंदयात्री's picture

24 Jan 2010 - 7:05 pm | आनंदयात्री

एक नंबर भाउ !!
पुढला भाग टाका राव !

सनविवि's picture

24 Jan 2010 - 5:23 pm | सनविवि

पहिला फोटू अप्रतिम आहे. सेल्युलर जेल बद्दल वाचून डोळे भरून आले :(

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Jan 2010 - 5:48 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

स्सही रे....! पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

-दिलीप बिरुटे

चतुरंग's picture

24 Jan 2010 - 6:33 pm | चतुरंग

एकदम झक्कास, बोले तो क आणि ड आणि क सुरुवात!
लग्नानंतर तू अशा 'आडगावी' गेलास त्याबद्दल तुझं कौतुक वाटतं. तुझी प्रवास करण्यामागची उद्दिष्टं क्लिअर होती!! :D ;)

लोकं पण हाईट असतात रे काय काय प्रश्न विचारतात!!
'सावरकरांचा जन्म तिथलाच ना? '
ह्याचं उत्तर आहे हो सावरकरांचा 'पुनर्जन्म' तिथलाच!!

पुढचा भाग अधिक सविस्तर येऊ दे!!

(खुद के साथ बातां : रंग्या, पुढे आयुष्यभर संसाराचा कोलू पिसायचा आहे हे माहीत असल्यामुळे ऋष्यानं सुरुवात अंदमानपासून केलीन की काय? :?)

चतुरंग

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Jan 2010 - 6:43 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>लग्नानंतर तू अशा 'आडगावी' गेलास त्याबद्दल तुझं कौतुक वाटतं.
आश्चर्य वाटतं असं म्हणायचं आहे का ?

>> (खुद के साथ बातां : रंग्या, पुढे आयुष्यभर संसाराचा कोलू पिसायचा आहे हे माहीत असल्यामुळे ऋष्यानं सुरुवात अंदमानपासून केलीन की काय?

=)) लंबर एक..स्वगत.

-दिलीप बिरुटे

श्रावण मोडक's picture

24 Jan 2010 - 6:46 pm | श्रावण मोडक

वाचतो आहे!

मीनल's picture

24 Jan 2010 - 7:42 pm | मीनल

पुढील भाग वाचण्यास आतुर आहे.
मीनल.

अभिशेक गानु's picture

24 Jan 2010 - 8:50 pm | अभिशेक गानु

खुप सुन्दर.. जेल चे वर्णन फारच सुरेख्. रोमन्च उभे रहिले..

विकास's picture

24 Jan 2010 - 9:42 pm | विकास

मस्त लेख आणि छायाचित्रे देखील! पुलेशु!

बाकी लग्नानंतर जिथे जन्मठेपेच्या शिक्षा भोगायला लावल्या होत्या अशा ठिकाणी जावेसे वाटणे आणि "लग्नाची बेडी" हा वाक्प्रयोग, निव्वळ योगायोगच असावा असे समजतो. ;)

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

प्राजु's picture

24 Jan 2010 - 10:27 pm | प्राजु

ऋषी..
सर्वात आधी तुझ्यापुढे नतमस्तक झाले मी.
हनीमूनसाठि कुलू-मनाली, उटी.. इथे न जाता अंदमान सारख्या ठिकाणी तुम्हा दोघांना जावं वाटलं... इथेच तुला सलाम!!!
नुकत्यातच "माझी जन्मठेप" वाचून संपवलं. त्यामुळे सगळे संदर्भ ताजे असतानाच ही तुझी लेखमाला यावी हे म्हणजे आनंदाचं अत्युच्च शिखर आहे माझ्यासाठी.
या लेखमालेची अगदी अतुरतेने पाहीन मी. लवकर लिही.
- प्राजक्ता
http://www.praaju.com/

चित्रा's picture

24 Jan 2010 - 10:48 pm | चित्रा

सुंदर लिहीले आहे. वाचते आहे.

Nile's picture

25 Jan 2010 - 2:21 am | Nile

हनिमुन साठी अंदमानला जाउन एक छान उदाहरण (अन आमच्यासारख्यांकरता (म्हणजे भावी जोडपी हो!)मस्त कल्पना) समोर ठेवले आहेस.

अंदमानची ओळख वाचतो आहे आणि तुझ्या लेखातुन अनुभवतही आहे. :)

चतुरंग's picture

25 Jan 2010 - 3:56 am | चतुरंग

....(अन आमच्यासारख्यांकरता (म्हणजे भावी जोडपी हो!)मस्त कल्पना)....

काय आटोकाट प्रयत्न करतात नै काही लोक, आम्ही 'रांगेत' आहोत हे सांगायचा? ;)

(रांगेबाहेरचा)चतुरंग

Nile's picture

25 Jan 2010 - 4:54 am | Nile

त्यात आटोकाट काय हो? 'विधि'लिखित कुणाला चुकलंय का? ;)

पण तुमचे बरे (रांगेबाहेरुन) लक्ष रांगेतल्या लोकांकडे? ;)

खुद के साथ बाता: यांचे लक्ष असते त्यामुळे पुढे मागे यांचीच मदत होणार आहे निळ्या. ;)

नंदन's picture

25 Jan 2010 - 6:11 am | नंदन

फार दिवसांनी एक चांगला लेख वाचायला मिळाला. चौथा फोटो (तुरुंगातून दिसणार्‍या आकाशाच्या तुकड्याचा) दीर्घकाळ लक्षात राहील असा.

उत्तम सुरुवात, पुढील भागांची वाट पाहतो.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

निमीत्त मात्र's picture

26 Jan 2010 - 8:48 pm | निमीत्त मात्र

फारा दिवसांनी दर्जेदार मजकुर मिपावर येत आहे.
सावरकरांच्या सेल मध्ये भिंतींवर अजूनही ती काव्ये दिसतात का हो?

मदनबाण's picture

25 Jan 2010 - 6:28 am | मदनबाण

मस्त लिहले आहे,पुढच्या भागाची वाट पाहतो आहे. :)

मदनबाण.....

At the touch of love everyone becomes a poet.
Plato

सुनील's picture

25 Jan 2010 - 6:56 am | सुनील

छान सुरुवात. पुढील भागाच्या प्रतीक्षेत.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

प्रमोद देव's picture

25 Jan 2010 - 8:44 am | प्रमोद देव

लेखन आवडलं!

**********
भले तर देऊ कासेची लंगोटी ।
नाठाळाचे माथी हाणू काठी ॥

प्रकाश घाटपांडे's picture

25 Jan 2010 - 9:19 am | प्रकाश घाटपांडे

र्‍हुशिकेष
तुप्ली अंदमून टूर लई भारी झाली म्हनायची.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

खडूस's picture

25 Jan 2010 - 11:09 am | खडूस

आम्हीसुद्धा अंदमानलाच गेलो होतो आणि तेसुद्धा ठरवून
Radhanagar Beach, Havelock Island केव़ळ अप्रतिम. अगदी शब्दात न मांडता येण्याइतके सुंदर आणि स्वच्छ.
जमल्यास माझ्याकडील फोटो टाकेन.

- आहेच मी खडूस
पटलं तर बोला नाहीतर गेलात उडत

स्वाती दिनेश's picture

25 Jan 2010 - 12:06 pm | स्वाती दिनेश

ऋषिकेश,
सुरेख सुरुवात, अंदमान बद्दल आणखी वाचायला उत्सुक आहेच
पण सध्या परत एकदा 'माझी जन्मठेप' वाचायला घेतले आहे, त्यामुळे तर आणखीच भावूक झाले.
स्वाती

बंडू बावळट's picture

26 Jan 2010 - 8:03 pm | बंडू बावळट

ऋषिकेश,
सुरेख सुरुवात,

सहमत!

बंड्या.

धनंजय's picture

26 Jan 2010 - 8:24 pm | धनंजय

वृत्तांत आवडला.
पुढच्या भागांच्या प्रतीक्षेत.

नरेश_'s picture

26 Jan 2010 - 8:25 pm | नरेश_

लेखनशैली, वर्णन एकदम झ्याक.
अंदमानसफर आवडली!
पु.आ.शु.
:)

ऋषिकेश's picture

26 Jan 2010 - 10:33 pm | ऋषिकेश

सर्व प्रतिसाद देणार्‍या प्रोत्साहनकर्त्यांचे धन्यवाद.
:)

--ऋषिकेश

स्वप्निल..'s picture

27 Jan 2010 - 2:03 am | स्वप्निल..

एकदम मस्त !! लवकर टाक पुढचे लेख :)

स्वप्निल

अक्षय पुर्णपात्रे's picture

27 Jan 2010 - 7:38 am | अक्षय पुर्णपात्रे

श्री ऋषिकेश, विवाहजीवनास सुरूवात केल्याबद्दल अभिनंदन. लेखमाला वाचत आहे. हा भाग वाचनीय झाला आहे.

............................
I was working on the proof of one of my poems all the morning, and took out a comma. In the afternoon I put it back again." --- Oscar Wilde.