उपसंहार

दमनक's picture
दमनक in जनातलं, मनातलं
11 Dec 2009 - 7:37 pm

दोन बातम्या. काल बजाज स्कूटरच्या निधनाची आणि आज दिपुंच्या. एका युगाचा अंत झाला अनेक अर्थांनी. बजाज स्कूटरीला भारतीय मध्यमवर्गीयांचे प्रतीक मानले गेले, तसे दिपु हे भारतीय मध्यमवर्गीयांचे प्रतीक असे म्हटले तर अनेकांच्या भुवया उंचावतील. रूढार्थाने दिपु हे 'एनिथिंग बट मिडलक्लास'. विश्वभान, कालभान आणि या सर्वांच्या साक्षीने आत्मभान असलेला साहित्यिक. विसाव्या शतकातला 'फार महत्त्वाचा कवी'. या माणसाला मध्यमवर्गीय विचारसरणीत बसवणे शक्यच नाही. विचारसरणी ही मोठी मजेशीर गोष्ट आहे, नाही का ? जर एक विचारसरणी 'पुढे' गेली काय किंवा 'मागे' आली काय... सत्य एकच उरते कि ती बदलली अन जर ती बदलली तर 'ती' पुढे गेली वगैरे म्हणण्यास अथवा मानण्यास अर्थ राहत नाही. पण माणसे हलतात. इथून तिथे जातात. माणसे न बदलता हलतात. भारतीय मध्यमवर्ग 'इथून' 'तिथे' जाण्यामागे बजाज स्कूटरीचा फार मोठा हात होता. इथून तिथे जाणे हे नेहमीच पुढे जाणे नसते किंवा ते मागे जाणेही नसते. बजाज स्कूटरीने माणसे हलवली, 'अ'पासून 'ब'पर्यंत नेली, 'ब'पासून 'क'पर्यंत नेली, 'क'पासून 'ड'पर्यंत... माणसे शब्दशः हलली, पण माणसे तिथेच राहिली. विशिष्ट उद्देश असूनसुद्धा एका अर्थी निर्बुद्ध हलणे... किंवा गती असूनही स्थितीस्थापकत्त्व असणे... किंवा स्थितीस्थापकत्व संगे घेऊनच हलणे... हे जगातील कुठल्याही मध्यमवर्गाचे व्यवच्छेदक लक्षण. यातला अंतर्विरोध (काँट्राडिक्शन) ठळक, ठसठशीत आहे आणि हाच अंतर्विरोध म्हणजे स्वतःच्या अस्तित्वाशी मध्यमवर्गीयांची नाळ. ही नाळ आमरण बरोबर घेऊनच मध्यमवर्ग जगतो, जगला आहे.

भारतातल्या मध्यमवर्गाच्या या नाळेचे चित्र जर कोणी रेखाटले तर ते बजाज स्कूटरीचे असेल. बजाज स्कूटर सर्वव्यापी होती. बजाज स्कूटर खूप दणकट नव्हती, पण आपण 'पुरेसे' दणकट आहोत हा विश्वास ती निर्माण करू शकत होती. तिला दणकटपणा नकोच होता, कारण खर्‍याखुर्‍या दणकटपणाचा अलंकार मिरवत जाणे तिला परवडणारे नव्हते. बजाज स्कूटरीला बेंगरुळ गोलाई होती आणि ते तिचे शक्तिस्थान होते, कारण शरीरसौष्ठव रस्त्यातून जाताना इतरांचे लक्ष आकृष्ट करून घेते. स्वतःच्या रंगरुपाने तिला इतरांचे लक्ष वेधून घ्यायचे नव्हते. रस्त्याने जाताना आपल्याला 'फारसा' त्रास होऊ नये आणि आपणही कोणाला त्रास देऊ नये, एवढीच तिची माफक अपेक्षा होती. यमाचा रेडा असतो, तद्वत भारतीय मध्यमवर्गीय समाजाला बजाज स्कूटर होती. ही सहजासहजी मिळायची नाही बरे. हिच्या दर्शनाला ही मोठी 'वेटिंग लिस्ट' असायची. महिनोन्महिने वाट पाहून बया एकदाची घरी यायची. अहो, हुंड्यामध्ये स्कूटर मागण्याचे ते दिवस. जगात सर्वात जास्त खपणारी (महिन्याला एक लाख) असा हिचा नावलौकिक होता. त्याला कारण होतं आम्ही मध्यमवर्गाच्या आयुष्यात असलेले तिचे स्थान.

आठवतंय का तिला किक मारणं ? मोटरसायकलीवर बसूनच टेचात किक मारता येते, तसला चारचौघांत अंगचटीला येण्याचा थिल्लरपणा हिच्यात नव्हता. हिला आपले थोडे अंगापासून दूर धरूनच सुरू करावे लागायचे. त्यासाठी आपले-पाय-ते-तिचे-पाय एवढाच शरीरसंपर्क पुरेसा होता... अगदी फॅमिलीरुममधल्या रोमांसइतुकाच. मोटरसायकल ही तेव्हा 'हिप' चीज होती, आतासारखी गल्लीबोळात दिसणारी गोष्ट नव्हती. मोटरसायकलीवर मर्दानी विनोद खन्नाने बसावे किंवा चष्मेबद्दूरमधल्या टवाळ पोरांनी. पण छोटीसी बातमधला अमोल पालेकर मात्र स्कूटरच चालवतो. अमोल पालेकर आमच्यातला वाटायचा. ही स्कूटरसुद्धा कधी कधी लाडात यायची आणि सुरू व्हायला चक्क नकार द्यायची, मग इकडेतिकडे पहायचं, 'हिच्या मूडचं काय सांगता येत नाही' असं थोडं कृतककोपाने, थोडं वैतागून स्वतःशीच पुटपुटत तिला आपल्या अंगावर रेलून घ्यायचं की झालीच सुरु. बजाज स्कूटर अगदी 'आपल्यातली' होती. तिने आम्हाला आमच्या ऑफिसला आम्हाला वाहून नेले, तिने आम्हाला आणि आमच्या हिला एम्प्रेस गार्डनकडे वाहून नेले, आम्हा तिघांना तुळशीबागेकडे वाहून नेले आणि नंतर इमानेइतबारे आम्हा चौघांना पेशवे पार्काकडेही वाहून नेले... एवढीशी तिची चण, पण या इथल्या या अशा रस्त्यांवरून 'हम दो हमारे दो और हमारा त्यौहार का शॉपिंग' हिने वर्षानुवर्षे वाहून नेले. स्वतःचे 'उभे' आयुष्य 'हम दो हमारे दो' या आदर्श भारतीय कुटुंबाला खरोखरच वाहिले होते. बजाज स्कूटर परिपूर्ण नव्हती... आम्हा मध्यमवर्गीयांसारखीच, पण बजाज स्कूटर आमच्यासाठी आदर्श होती. आम्हा मध्यमवर्गीयांचे जिणे एकदम चाकोरीबद्ध आणि आमच्या मार्गावरच्या चाकोर्‍या बजाज स्कूटरीच्या चाकांनी बनल्या होत्या. आता आश्चर्य वाटते, हे कसे काय जमवले बुवा हिने ? आणि मग लक्षात येते की या प्रश्नातच त्याचे उत्तर दडले आहे. तिने 'जमवले'. स्वतःमध्ये अनेक दोष असूनसुद्धा प्राप्त परिस्थितीत ती टिकून राहिली... आमच्या हजारो वर्षे जगण्याचा पाया म्हणजेच 'जुगाड जमवणे' तो बजाज स्कूटरीने जमवला. बजाज स्कूटर आमचे प्रतीक नव्हती... बजाज स्कूटर आमच्या जगण्याचा, आमच्या मध्यमवर्गीय अस्तित्वाचा निखळ अर्क होती.

पण या आमच्या मध्यमवर्गीय जगण्याला मधूनच बंडाचा झटका यायचा. अशा वेळी आम्हाला समाजसेवेची इच्छा व्हायची; धोधो श्रीमंत होण्याची स्वप्ने बघायचो; स्वतःचा उद्योगव्यवसाय सुरू करण्याचा विचार करायचो; बजाज स्कूटर न घेता रॉयल एनफिल्ड, जावा घेण्याचा मानस मित्रमंडळी, नातेवाईकांत बोलून दाखवायचो... अशा वेळी इतरांच्या नजरेत उमटणारे अविश्वास, हेटाळणी, हेवा आणि अगदी किंचितसे कौतुक बघूनच आम्हाला तृप्तीचा ढेकर यायचा. पण कधीकधी... अगदीच कधीकधी ही स्वप्ने, ह्या इच्छा कुठेतरी आतपर्यंत जायच्या आणि माणसाच्या आतल्या आतल्या जन्मजात झर्‍याचा भाग व्हायच्या. बंडाचा झटका येण्याऐवजी बंड हेच सार्‍या आयुष्याचा स्थायीभाव व्हायचा. मग अशी माणसे बेफाम जगायची... नव्हे, माणसे जगायची. ही माणसे कधीतरी कुठल्यातरी अदृष्य दाराने एन्ट्री मारायची आणि कुठल्यातरी कधीतरी अदृष्य दाराने एक्झिटसुद्धा व्हायची. अन या मधल्या कालखंडात काय करायची ? काय नाही करायची विचारा. पत्रकारिता, चित्रपटलेखन व दिग्दर्शन, चित्रकारी, नियतकालिकनिर्मिती, शिक्षकी, साहित्यिकगिरी असं सगळं सगळं करायची. कोणी अशा माणसांना रॉय किणीकर म्हणतात, तर कोणी दिपु चित्रे नावाने ओळखले जातात. कोणीही काहीही म्हणो, पण अभिजात व अभिनव निर्मिती ही या लोकांची वैशिष्ट्ये. दिपुंनी वाटा चोखाळल्या नाहीत, दिपुंनी नवीन वाटा सुरू केल्या. केवळ एखादे मासिक काढले असे नाही, तर लघुनियतकालिकांचा प्रयोग केला. आमचे साहित्य समृद्ध होण्यासाठी इतर भाषांमधील साहित्य आमच्या भाषेत आणले पाहिजे, तसेच आमचे साहित्य इतर भाषांमध्ये गेले पाहिजे. इथे 'आदानप्रदान' पाहिजे, केवळ एकतर्फी प्रवास पुरेसा नाही. दिपुंनी हे आरपार ओळखले आणि त्यावर कृतीसुद्धा केली. अनुवादासाठी निवडले कोण ? तर तुकाराम हा श्रेष्ठ विद्रोही. अस्सल इथल्या मातीची भाषा असूनसुद्धा तुकोबांच्या कवितेचे वैश्विक परिमाण त्यांनी जाणले. असे जाणणारे ते पहिलेच असे मुळीच नाही. इये देशिये तुकोबांचे कवी म्हणून असलेले महत्त्व ओळखणारे कमी नसतील आणि त्या 'कवितां'चे देशभाषा ओलांडून जाण्याचे अद्भुत सामर्थ्य अनेकांनी जाणले असेल. पण हे सामर्थ्य खरोखरीस कसाला लावले दिपुंनी. अहो, 'अमुक कवितेस वैश्विक परिमाण आहे' असा मराठमोळा ढोल पिटून त्यातच समाधान मानायचा आप्पलपोटेपणा दिपुंनी केला नाही, तर 'घ्या, तुम्हाला वाचता येईल असे केले आहे ते वाचा आणि या कवीच्या सामर्थ्याची तुम्हीसुद्धा अनुभूती घ्या' असला खणखणीत प्रस्तावच जगासमोर मांडला. दिपुंचे विश्वभान इथे दिसले. हा निर्भीडपणा मात्र अंगभूत अस्सल, थेट तुकोबांकडून आलेला... अन् तुकोबांच्या परंपरेतली आणखी एक गोष्ट त्यांच्याकडे होती, ती म्हणजे इथल्या मातीवरील निस्सीम प्रेम. म्हणूनच हा माणूस लिहू शकला,

'जेव्हा वेडीपिशी होते इथली मराठी भाषा तेव्हा
कोट्याधी ओव्या आणि अभंगांचे प्रतिध्वनी उठतात
खोलवरून आणि इरसाल अध्यात्म इथलं भडकवतं
माणसाचं माथं, तेव्हा पुकारली जातात
स्वतंत्र प्रज्ञेची काव्यशास्त्रं माणसाचा जन्म साजरा करायला.

यापुढचं महाराष्ट्रगीत कदाचित मीही लिहीन, कोणी सांगावं ?
आणि लिहिलं तर कोणाच्याही बापाची परवानगी मागणार नाही.'

हा माज नाही. हा प्रतिभेचा प्रामाणिक उन्माद आहे. हे दिपुंचे आत्मभान होय. त्यांच्या आत्मभानाची चुणूक त्यांनीच सांगितलेल्या एका किश्श्यात दिसते. १९८० मध्ये 'इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स' या परराष्ट्र खात्यांतर्गत येणार्‍या संस्थेने ३ साहित्यिकांचे एक प्रतिनिधीमंडळ सोव्हिएट युनिअन, प. जर्मनी, फ्रान्स, हंगेरी इ. देशांमध्ये पाठवण्याचे ठरवले. उद्देश हा की परस्परांच्या साहित्याच्या अनुवादाद्वारे सांस्कृतिक देवाणघेवाण करता येईल का याची चाचपणी करणे. त्यांनी थोर हिंदी साहित्यिक निर्मल वर्मा यांना मंडळासाठी आणखी २ तत्कालिन साहित्यिक सुचवण्यास सांगितले. तेव्हा वर्मांनी यु. आर. अनंतमूर्ती आणि दिपुंची निवड केली. दिपु सांगतात की, ते तिघे खाजगीमध्ये स्वतःला त्रिदेव म्हणायचे. वर्मा हे सृजन करणारे ब्रह्मदेव, अनंतमूर्ती हे जतन करणारे श्रीविष्णू आणि दिपु म्हणजे सर्वसंहारक श्रीशंकर. दिपु पुढे सांगतात, "मी स्वतःकडे संहारक शिव या नजरेने बघत नाही. त्यापेक्षा मी स्वतःला संगीतातली 'सम' मानतो... जिथे संगीताचे एक आवर्तन संपते आणि दुसरे सुरू होते... शांतवणारा शंकर." त्या प्रवासाबद्दल बोलताना दिपु म्हणतात, "External journeys often turn into internal voyages in my case." दिपुंचा हा प्रवास शेवटपर्यंत सुरूच असणार. एवढेच नव्हे, हा अंतर्गामी प्रवास करण्यासाठी त्यांना बाहेरील, शारिरिक प्रवासाची गरज नसणारच. शेवटची काही वर्षे ते फक्त चित्रे काढत होते. काय काढत होते ? अज्ञाताच्या प्रदेशातली (की प्रदेशातले) चित्रे ?

दिपुंवर शब्दक्रीडेचा, शब्दचमत्कृतीचा आरोप झाला. त्यांच्या 'शक्तीची प्रार्थना' या दीर्घकवितेच्या सुरूवातीला ते म्हणतात -

उलथून चक्रमय रात्रीची स्तब्धता
उघड स्वर्गीय तेजस्वी थडगी
एकदा मांस दिलेल्या थंडस्तनी पोरी
मूकगुप्त पाण्यागत एकदा संपूर्णलेल्या
स्त्री,

ह्या
आत्ताच्या
अस्तंगत बाहुपाशात
पालथा कर
हा मुखस्तंभ प्रकाश.......
...........................
ह्यातल्या प्रत्येक शब्दाला सुरुवातीला अडखळायला होते. चक्रमय रात्र, मूकगुप्त पाणी, तेजस्वी थडगी, थंडस्तनी पोरगी, संपूर्णलेली स्त्री यामुळे मनात कुठल्या प्रतिमा निर्माण होत आहेत, याचा शोध घेताना अस्वस्थ व्हायला होते. पण या प्रतिमा नंतर येतील. आधी जाणवते ते अशा शब्दांची योजना. हेच शब्द त्यांनी कवितेच्या शेवटीसुद्धा वापरले आहेत -

उलथून स्तब्धता
रात्रीची चक्रमय
उघडून थडगी
थंड तेजस्वी
स्वर्गीय स्त्री
ये,
ह्या आताच्या
बाहूंच्या अस्तांत :

ही चमत्कृती नाही. सत्यसाईबाबांचे जादूचे प्रयोग व योगी अरविंदांची योगमुद्रा दोन्ही दिपवणारे. चमत्कार दोन्हींमध्ये आहे, पण एकात चलाखी आहे, दुसर्‍यात अंतर्मुख करण्याची प्रकांडशक्ती आहे. सुरूवातीचीच शब्दयोजना शेवटी करून दिपु कुठले 'आवर्तन' सुचवू पाहत आहेत ? शिवाय, दोन्ही ठिकाणचा 'आता' या शब्दाचा वापर... दिपुंच्या कालभानाची एक तरल छटा उलगडून दाखवणारा. शब्द अगदी साधा, दिवसा दहा वेळा वापरला जाणारा अन त्यामुळेच पटकन दुर्लक्षिला जाणारा... पण या कवितेच्या सामर्थ्याची कल्पना तेव्हा यायला लागते जेव्हा आपण 'आता' या शब्दाच्या वापरावर विचार करतो. तो शब्द तिथे का वापरला ? तोच शब्द का वापरला ? शब्द मुळीच वाया जाऊ न देणारा हा कवी आहे हे आपण लक्षात घेतले तर कळते की कवितेतल्या चित्तवेधक शब्दरूपांइतकेच आपण दिपुंच्या कवितेतील सर्वसामान्य शब्दांकडे लक्ष दिले पाहिजे... दिपुंच्या कविता समजून घेण्याचा, त्यांचे काव्यसामर्थ्य समजून घेण्याचा मंत्र तिथे दडला आहे.

वास्तविकतः बजाज स्कूटरीचे युग १२-१५ वर्षांपूर्वीच जवळजवळ संपले होते, कारण त्या ज्या मध्यमवर्गाचे प्रतिनिधीत्व करत, तो वर्ग त्या सुमारास बदलत चालला. पण त्याला काल अधिकृत मान्यता मिळाली, जेव्हा बजाजने त्यांच्या सर्व स्कूटरींचे उत्पादन नेहमीसाठी थांबवण्याचा निर्णय जाहीर केला. बजाज स्कूटरी आणि दिपु ह्या आमच्या इतिहासातील एका अनोख्या कालखंडाच्या साक्षीदार. त्यांनी भारतीय मध्यमवर्गाचा उदय पाहिला. शीतयुद्ध ऐन भरात असताना प्रत्यक्ष अनुभवले, शीतयुद्ध संपलेले बघितले. कमावते पुरूष ते कमावते स्त्री-पुरूष ही समाजजीवनातली उत्क्रांती पाहिली. परमिटराज ते परमिटरूमराज हे स्थित्यंतर पाहिले. एक या सगळ्याची मूक साक्षीदार होती, तर एक या सगळ्याचा क्रियाशील, स्पंदनशील भाग होते. बजाज स्कूटर आमची 'मूव्हर' होती, तर दिपु हे आमच्या 'प्राईम मूव्हर्स' पैकी एक. मूव्हरने आम्हाला 'कसे हलायचे' या प्रश्नाचे एक फार चपखल उत्तर देऊ केले, तर प्राईम मूव्हरने -

सोया हुआ आदमी जब
नींद से उठकर चलना शुरु करता है
तब सपनों का संसार उसे
दोबारा दिख ही न पायेगा

उस रोशनी में जो निर्णय की रोशनी है
सब कुछ समान होगा क्या ?

एक पल्डे में नपुंसकता
एक पल्डे में पौरुष
और ठीक तराजू के कांटे पर
अर्धसत्य

- असे प्रतिपादत 'कुठे जात आहोत, का जात आहोत' हे प्रश्न आम्हाला टोचले. बजाज स्कूटर साधीसोपी सरळसोट होती. तिच्या अस्तित्वाचा आम्हाला आमच्या अस्तित्वाशी संबंध जोडता आला, परिणामी, तिचे संदर्भ आमच्या परिचयाचे झाले. तिला जनमानसात अनन्यसाधारण स्थान लाभले. ती खरोखरच 'हमारा बजाज' झाली. दिपुंना तसे स्थान लाभले नाही, त्याचे कारण त्यांच्या आवडत्या 'तुका'च्या शब्दांत सांगायचे झाले तर -

Says Tuka
We are here
To reveal.
We do not waste
Words.

रोचक बाब ही की बजाज स्कूटर ही भारताच्या एका विशिष्ट कालखंडाचा आरसा होती. या आरशात आम्हाला आमची निखळ प्रतिमा दिसते, पण अशी सत्यप्रतिमा दाखवूनसुद्धा हा आरसा एक अर्धसत्यच होता. दिपुंनी अर्धसत्य दाखवले, पण त्यात दृग्गोचर होणारी आमची प्रतिमा पूर्णसत्य होती आणि म्हणूनच खूप अस्वस्थ करणारी होती. अस्वस्थ करणारे 'रिव्हलेशन' लोकप्रिय होत नाही हे साहजिकच आहे.

या दोन बातम्या एकापाठोपाठ आल्या आणि एकाच कालखंडाचे प्रतिनिधीत्व करणार्‍या दोन अत्यंत महत्त्वाच्या, नव्हे, एकमेवाद्वितीय अशा गोष्टी अस्तंगत झाल्याची भावना निर्माण झाली. दोन चीजांनी एकमेवाद्वितीय असणे हा अंतर्विरोधसुद्धा त्या कालखंडाला साजेसाच. दोन्ही चीजा अगदी 'वन इन अ बिलिअन'... सुरूवातीस वेगळ्या वेगळ्या अर्थाने, पण शेवटी कदाचित एकच अर्थाने. भविष्यात जेव्हा या इतिहासाचे दस्तावेजीकरण होईल व विसाव्या शतकात भारताला लाभलेल्या या दोन गोष्टींविषयी सांगायचे असेल तेव्हा खुद्द दिपुंच्याच End Note नामक कवितेपेक्षा अधिक दुसरे उचित काय असेल ?

It feels
So Easy
To be
One
In a billion.
That’s just statistic
For you
And for me
Poetry.

संस्कृतीवाङ्मयप्रकटन

प्रतिक्रिया

विकास's picture

11 Dec 2009 - 7:51 pm | विकास

लेख/मनोगत एकदम उस्फुर्त आणि मनापासून लिहीलेले वाटले आणि म्हणून आवडले. वास्तवात दोन भिन्न असलेल्या घटनांचा असा सामाजीक मेळ घालण्याची कल्पना पण आवडली. अजूनही असेच लेखन येउंदेत!

कानडाऊ योगेशु's picture

11 Dec 2009 - 7:52 pm | कानडाऊ योगेशु

हेच म्हणतो..
छान सुंदर ओघवता लेख.वाचताना कुठे अडखळायला झाले नाही.!
---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.

अनामिक's picture

11 Dec 2009 - 7:56 pm | अनामिक

दोन गोष्टींची घातलेली सांगड आणि संपुर्ण मुक्तक आवडले.

-अनामिक
"बुलंद भारत की बुलंद तसबीर - हमारा बजाज"

jaypal's picture

11 Dec 2009 - 8:30 pm | jaypal

सुंदर ओघवती शैलीतल लिखाण आवडल.
अजुन येउद्यात वाट बघतोय
दि.पुं ना विनम्र आदरांजली

तुका म्हणे साठी (सेज) ईथे टिचकी मारा

यशोधरा's picture

11 Dec 2009 - 8:21 pm | यशोधरा

आवडलं लिखाण.

संजय अभ्यंकर's picture

11 Dec 2009 - 9:12 pm | संजय अभ्यंकर

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

स्वाती२'s picture

11 Dec 2009 - 9:28 pm | स्वाती२

लेख खूप आवडला.

अक्षय पुर्णपात्रे's picture

12 Dec 2009 - 12:41 am | अक्षय पुर्णपात्रे

श्री दमनक, प्रकटन आवडले.

मध्यमवर्गात अनेक वर्ग आहेत. सगळे एका मोळीत बांधणे हे मध्यमवर्गात असलेल्या वैविध्यास (clustered diversity) योग्य न्याय देत नाही. पण तुमचा लेख मध्यमवर्गाची चौकट, संदर्भ सोडूनही वाचता आला. लेख अनेक ठिकाणी आवडला. दिपुंच्या कवितांच्या ओळींवर तुमचे भाष्य प्रगल्भ आहे तसेच वैयक्तिकही. लेख दोन भागात देता आला तर वाचकांना चांगला आस्वाद घेता येईल, असे वाटते. एका उत्तम लेखाबद्दल आभारी आहे.

मुक्तसुनीत's picture

12 Dec 2009 - 1:36 am | मुक्तसुनीत

लिखाण अतिशय रोचक वाटले.

चित्रे आणि बजाज स्कूटर यांच्या आपल्या आयुष्यातून निघून जाण्याबद्दलच्या दोन घटनांचा मेळ घालण्याच्या संदर्भात मी या लेखाला समजू शकलो नाही; मात्र एकेकट्या गोष्टींबद्दलचे निरूपण प्रसंगी मार्मिक तर प्रसंगी काहीसे भावनाना आवाहन केल्यासारखे वाटले - आणि ते रोचक होते हे नि:संशय.

विशेषतः चित्र्यांच्या कवितेचा घेतलेला वेध फार आवडला. त्यांच्या कविता आणि इतर प्रांतातल्या मुशाफरीबद्द्दल अधिक वाचायला आवडेल. साठीच्या दशकातल्या शिलेदारांपैकी ते एक. त्यांच्या कामगिरीबद्दल अजून लिहा असे सुचवतो.

पाषाणभेद's picture

12 Dec 2009 - 2:01 pm | पाषाणभेद

मुक्तक फारच आवडले.

अवांतर : जमनालाल बजाज जर राजकिय व्यक्तिंशी (म. गांधी व नेहरू) जवळ नसते तर आजची बजाज स्कुटर दिसली असती का हा प्रश्नच आहे.
------------------------
The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

पासानभेद बिहारी

आळश्यांचा राजा's picture

13 Dec 2009 - 12:06 am | आळश्यांचा राजा

संग्राह्य लेख. अप्रतिम.

आळश्यांचा राजा

प्राजु's picture

13 Dec 2009 - 1:22 am | प्राजु

खूप दिवसांनी इतका सुंदर लेख वाचला.
बजाज स्कूटर म्हणजे खरंच मध्यमवर्गिय समाजाचं प्रतिक होती. प्रत्येक घरातले चढ उतार तिने पाहिले आहेत. हमारा बजाज आणि दिपु चित्रे या दोन्ही "समाज प्रतिमांचा" उत्तम मेळ घातला आहे लेखामध्ये. अभिनंदन.. या सुंदर लेखासाठी.
- प्राजक्ता
http://www.praaju.com/

चित्रा's picture

13 Dec 2009 - 5:31 am | चित्रा

बजाजने अनेकांना कामालाही लावले. जाहिरातही खास असायची. कधी बजाज घेतली नाही, पण ती नाही म्हटल्यावर ओळखीचे कोणी तरी गेल्यासारखे वाटले.

असो.

दि. पु. चित्रेंना आदरांजली.
(दि. पु. चित्रेंची "शक्तीची प्रार्थना" मी वाचलेली नाही, पण तुमच्या लिहीण्यामुळे वाचावीशी वाटली. कोणत्या संग्रहात आहे?)

सहज's picture

13 Dec 2009 - 3:11 pm | सहज

छान!

मदनबाण's picture

13 Dec 2009 - 8:55 pm | मदनबाण

छान लेख...

मदनबाण.....

Love is life. And if you miss love, you miss life.
Leo Buscaglia