स्ट्रेटड्राईव्ह तेंडूलकरस्य मध्ये आपण आमच्या साहेबांच्या स्ट्रेटड्राईव्हचा आस्वाद गेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा म्हटल्याप्रमाणे खेळांमध्ये असे अनेक महान कलाकार होऊन गेले आणि आहेत की ज्यांच्या कलाकृती अजरामर आहेत. आमच्यासाठी खेळांचा राजा म्हणजे क्रिकेट ! बालपणच जिथे चेंडूची एक बाजू घासून वकारसारख्या 'रिव्हर्स स्विंग'ची आराधना करण्यात गेलं (ते आयुष्यात जमलं नाही हा भाग अलाहिदा) आणि संजय मांजरेकरचं टेक्नीक ३ नंबरला कॉपी करण्यात (ह्यात हेल्मेट मध्ये त्याच्यासारखी पट्टी घालण्याचा पण समावेश आहे) गेलं, तिथे अन्य कुठल्या खेळाच्या प्रेमात पडायला खूप वेळ लागला !
आण्णांच्या यमनसारखा आमच्या साहेबांच्या स्ट्रेटड्राईव्हबद्दल बोलल्यानंतर आता अन्य काही कलाकारांच्या खासियतींबद्दल बोलुया ! अर्थात हे कलाकार मी पाहिलेलेच आहेत आणि ह्याआधी देखील जे अनेक महान कलाकार होऊन गेले त्यांच्याबद्दलच्या गोष्टी ऐकायला नक्कीच आवडेल ! तर देवाचं नाव घेऊन सुरुवात करू.. स$$$$$चिन.. स$$$$$$$चिन !
तर महाराजा आमच्या क्रिकेटच्या साम्राज्याचे अनेक रथी-महारथी आहेत ! पहिला आत्ताच्या काळातल्या अजिंक्य संघाचा झुंजार कर्णधार रिकी पाँटिंग - आणि त्याचा केवळ हेवा करावा असा हुक !
पाँटिंगचा पदन्यास एखाद्या बॅले नर्तकीसारखा (आणि हरभजनला खेळताना कोकणच्या बाल्यासारखा !). वेगवान गोलंदाजानी चेंडू शॉर्ट आपटला की गडी पुल / हुक मारायला सरसावलाच ! किंचित खाली वाकून हा माणूस झकासपैकी आपला उजवा पाय तोडा मागे अन अॅक्रॉस करून रोवतो. आणि गोलंदाजाच्याच वेगाचा पुरेपूर उपयोग करत चेंडू मिडविकेट / स्क्वेअरलेगला भिरकावून देतो ! बॅलन्स असा की आइस स्केटिंग करणार्या पोरींनी धडा घ्यावा !
नंतरचा आमचा "नजाफगढचा नवाब". ह्याच्या खेळाचं एका वाक्यात वर्णन करायचं म्हणजे "आम्हा काय त्याचे". नाजुकपणा, संयम, शांतता वगैरे गोष्टी ह्याच्या वाटेला फारश्या जात नाहीत ! मागच्या बाकावर बसणार्या, एका इयत्तेत ३ वर्ष मुकाम केलेल्या विद्यार्थ्याच्या चेहेर्यावर मास्तर "छांदोग्योपनिषद" शिकवत असताना जे भाव असतील, साधार॑ण ते भाव चेहेर्यावर. चेंडू हा सीमेबाहेर पाठवण्यासाठीच टाकण्यात येतो अशी त्याची प्रगाढ श्रद्धा ! त्याच्या स्क्वेअरकटचं खूप कौतुक होतं. पण मला विचाराल तर त्याची सर्वोत्तम कलाकृती म्हणजे "षटकार" ! मग तो कुठल्याही फटक्यानी आणि कुठेही मारलेला का असेना. "नो हाफ मेझर्स" !
वरच्या फोटोत आणि पन्हाळ्यावरच्या बाजीप्रभूंच्या पुतळ्यात मला खूप साम्य वाटतं ! आवेष तर बघा ! चेंडूची काय बिशाद सीमेच्या आत पडायची !
अहो नंतरचा आमचा कलाकार तर वेगवान गोलंदाजांचा शिरोमणी. हा धावत आला की फलंदाजांच्या उरात धडकी भरायची ! "खेलमें एकही गुंडा होता है और इस मॅच का गुंडा मैं हूं" हाच अॅटिट्यूड ! त्याच्या "इनकटर" फलंदाजाला भोसकायचा. इम्रान, अक्रमच्या तालमीतला हा खंदा वीर. वकारचा यॉर्कर हा त्याच्या देशाच्या "होम मेड" शस्त्रांइतकाच घातक ! रिव्हर्स होताना ह्याचा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर सुरुवात करून लेगस्टंपच्या बुंध्यावर आदळायचा. "सुलतान ऑफ स्विंग" ही उपाधी ह्याच्याइतकी कोणालाच लागू झाली नाही (माझ्या पाहाण्यात).
आता हेच बघा ना.. अश्या यॉर्करवर यष्ट्या उधळल्या गेल्यावर फलंदाजाला "धरणीमाते मला पोटात घे" वाटणार नाही तर काय?
सुलतान ऑफ स्विंग नंतर अर्थातच "शेख ऑफ ट्वीक". सर्वकाळचा वादातीत सर्वोत्कृष्ट लेगस्पिनर - शेन वॉर्न. किती वेळा असं घडलं असेल की लेगस्पिन म्हणून फलंदाज त्याला कट करायला गेला आणि वेषांतर केलेल्या हारून अल रशीदइतक्या बेमालूमपणे तो चेंडू बाहेर जाण्याऐवजी सरळच घुसला ! जादूगाराने अचानक टोपीतून ससा काढावा तसा वॉर्नचा फ्लिपर अचानक आणि अनपेक्षित यायचा आणि अजून एक वि़केट घेऊन जायचा !
बघा बरं - लांडग्यांसारखे शिकार टिपायला वखवखलेले "क्लोझ इन" क्षेत्ररक्षक... फलंदाजाच्या दिशेनी पाठमोरा धावत अपील करणारा वॉर्न आणि "आयला गंडलो परत" असा भाव असलेला आणि अंपायरच्या केवळ इशार्याची वाट पहाणारा फलंदाज.. हे दृश्य आपण कितीतरी वेळा पाहिलं आहे !
आणि ह्या लेखातला शेवटचा कलाकार म्हणजे आमचा "दादा". राहुल द्रविड त्याच्याबद्दल म्हणाला होता "When playing on the off-side first there is God and then there is Sourav Ganguly".... आणि त्यावर इयान चॅपल म्हणाला... "And God was a right-hander". आजोबांनी आपल्या नातवाच्या केसांमधून हात फिरवावा तश्या मायेने दादा ऑफस्टंपबाहेरच्या चेंडूला कुरवाळायचा... काहीतरी जादू घडायची आणि ७-७ क्षेत्ररक्षकांमधून तो चेंडू सुसाट वेगाने सीमेबाहेर जायचा !
बघा - असा कव्हर ड्राईव्ह क्रिकेटच्या कुठल्याही पुस्तकात बघायला मिळणार नाही. "कुठे तंगडं हालवायचं... त्यापेक्षा उभ्याउभ्याच खेळू". काय बॅलन्स आणि 'हेड ओव्हर द बॉल' घेऊन बसलात राव ... जा रे कोणीतरी त्या बाउंड्रीपलिकडचा बॉल घेऊन या !
आमच्या मनाच्या शोकेस मधले हे पहिले काही शोपीसेस. अजून कितीतरी आहेत... त्यांच्याबद्दल (प्रतिसादांप्रमाणे) पुन्हा कधीतरी !
प्रतिक्रिया
11 Nov 2009 - 6:15 pm | गणपा
मस्त हो मॉर्गन राव, पण लेख फार आखडता घेतला आहात. अजुन वाचयल नि फोटो पाहायला आवडतील.
बाकी राहुल द्रविड च्या कॉमेंटवरची इयान चॅपल प्रतिक्रिया अत्यंत समर्पक..
जिथे सगळे फलंदाज संपतात आणि गोलंदाज गळतात....तिथे आमचा सच्या सुरु होतो
11 Nov 2009 - 6:13 pm | अमोल खरे
मजा आली वाचताना. पुढील लेख येऊद्या पटापट.
अवांतर-ह्याच वकार युनुसची अजय जाडेजा ने धुलाई केली होती ते आठवले. बहुदा वर्ल्डकपची मॅच होती.
12 Nov 2009 - 3:57 pm | मिसळभोक्ता
बंगलोर, भारत-पाकिस्तान, वर्ल्ड-कपची क्वार्टर फायनल. पण त्या म्याच मधला फक्त एक क्षण आठवतो.
वेंकटेश प्रसाद ला आमिर सोहेल ने चौकार मारला, आणि ब्याट बाऊंडरीकडे दाखवत खूण केली, की आता पुन्हा बघ ...
दुसर्या बॉल ला प्रसादने सोहेलचं फर्निचर वाजवलं...
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
12 Nov 2009 - 4:07 pm | मदनबाण
http://www.youtube.com/watch?v=y1s3aORd5Ws&feature=PlayList&p=4F4EBF36D0...
हाच तो क्षण... नेहमी लक्षात राहील असाच आहे. आमिर सोहेल चा माज मस्त उतरवला !!!
मदनबाण.....
The Greatest Gift You Can Give Someone Is Your Time,Because When You Are Giving Someone Your Time,You Are Giving Them A Portion Of Your Life That You Will Never Get Back.
11 Nov 2009 - 6:14 pm | फ्रॅक्चर बंड्या
आजोबांनी आपल्या नातवाच्या केसांमधून हात फिरवावा तश्या मायेने दादा ऑफस्टंपबाहेरच्या चेंडूला कुरवाळायचा
एवढ्यासाठीच आपण गांगुलीचे पंखे आहोत...
भारी जमलय , अजुन नविन शोपीसेस वाचायला आवडतील ....
11 Nov 2009 - 6:15 pm | मदनबाण
तुमच्या मनातल्या शोकेस मधले हे पहिले काही शोपीसेस भारी आवडले...अशीच शृंखला चालु ठेवा. :)
(सचिनचा भक्त)
मदनबाण.....
If Cricket Is A Religion, Sachin Is God
11 Nov 2009 - 8:00 pm | परिकथेतील राजकुमार
जबरदस्त हो मॉर्गन साहेब.
हा आमचा दादा, ह्याच्यावर आमचा भारी जीव (आणी त्याचा नगमावर भारी जीव). अंमळ वादविवादात सापडला पण शेवटी दादा तो दादाच.
©º°¨¨°º© परा गांगुली ©º°¨¨°º©
आमचे राज्य
11 Nov 2009 - 8:29 pm | संदीप चित्रे
खूप छान आठवणी जाग्या केल्यात.
गावसकरचा स्ट्रेट ड्राईव्ह, कपिलचा आउट स्विंगर, विश्वनाथचा स्क्वेअर कट, होल्डिंग आणि हॅडलीचा रन अप, इम्रान नावाचं देखणं वादळ आणि बोथम नावाचं वादग्रस्त वादळ, विव रिचर्डसचा बेदरकारणा..... लिहिते रहा; अजून भरपूर जणांबद्दल लिहू शकाल
12 Nov 2009 - 9:36 pm | चतुरंग
लिहिते रहा. अजून बरीच मांदियाळी आहे.
(जॉन्टी र्होड्सच्या अफलातून फिल्डिंगचा चाहता)चतुरंग
13 Nov 2009 - 5:21 pm | जे.पी.मॉर्गन
जाँट्याचं नाव यायलाच पाहीजे... ह्या माणसानी फील्डिंगची परिभाषाच बदलून टाकली नाय??? म्हणजे भारी फील्डर लई होते आणि आहेत.. पण "ह्यासम हाच".. सच्याची बॅटिंग तशी जाँट्याची फील्डिंग ! इंझमामचा ९२ च्या वर्ल्डकप मधला रन आऊट आणि सच्याचा आफ्रिकेत घेतलेला कॅच !!!! थरारक वगैरे विशेषणं पण कमी पडतील !
11 Nov 2009 - 8:30 pm | छोटा डॉन
मॉर्गन साहेब, एकदम जबरा लेख बॉस ...
शैली एकदम खुसखुषीत आणि अप्रतिम आहे, बर्याच वाक्यांना दाद द्याविशी वाटयेत.
पण लिखाण थोडं लांबवा बॉ.
कणेकर आणि संझगिरी यांनी जेव्हा पासुन दळण टाकायला सुरवात केली त्यानंतर क्रिकेटरवरचं एवढं सुंदर लिखाण आजच वाचतो आहे, खुपच मस्त.
अजुन येऊद्यात ...
------
छोटा डॉन
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !
11 Nov 2009 - 10:23 pm | प्रभो
मस्तच लिव्हलय भाऊ...
--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
12 Nov 2009 - 12:03 am | Nile
क्या बात है! कोपर्यावरच्या पानवाल्याच्या दुकानातील १४ इंचेस कलर टीव्ही वर क्रिकेट मॅचेस पहायचो ते दिवस आठवले!
तुम्ही सांगीतलेल्या शॉट्स शिवाय, अझर चा फ्लीक! द्रविड्चे ड्राईव्ह, सचिनचे स्क्वेर कट्स! लाराचे ड्राईव्ह, गिलक्रीस्टचे स्क्वेअर ला ने मारलेले छक्के!
बोंबला च्यायला, ह्या विकांताला जावं लागणार क्रिकेट खेळायला...
12 Nov 2009 - 10:13 am | llपुण्याचे पेशवेll
सुंदर लिखाण. आवडले.
अवांतरः "हे जीवन म्हणजे क्रिकेटराजा हुकला तो संपला" हे सुनील गावस्करांनी गायलेले आणि शांताराम नांदगावकरांनी लिहीलेले गाणे कोणाकडे आहे का? छान गाणे आहे.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984
13 Nov 2009 - 6:33 pm | अवलिया
मस्त लेख ! आवडला ! :)
--अवलिया
======
आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.
13 Nov 2009 - 6:43 pm | टारझन
नुसते फोटो पाहुनंच अंगाला काटा आला !! सगळेच फोटो भारी ...
पण गांगुली शेवाग आणि जाँटीचा फोटो .. खल्लास
14 Nov 2009 - 8:31 am | फारएन्ड
मस्त फोटो आणि लेख! सचिन, दादा आणि द्रविड हे याच क्रमाने आमचेही फेवरिट. यात ऑफ ला ड्राईव्ह मारणारा 'क्लासी' दादा आणि एरव्हीचा कप्तान दादा यातही केवढा फरक होता ना :)
अजून इतर खेळाडूंबद्दल असेच 'फीचर्स' वाचायला आवडतील.
14 Nov 2009 - 9:33 am | अमोल केळकर
क्रिकेट वरील एक सुंदर लेख
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
14 Nov 2009 - 10:56 am | प्रमोद देव
फलंदाजाच्या आसपास उभे राहून बॅटची कड लागून उडालेले झेल घेणारा अफलातून एकनाथ सोलकर...नव्हे झेलकर.
१९७१साली ओव्हलवर इंग्लंडच्या ऍलन नॉटचा झेल घेताना एकनाथ सोलकर.
स्लीपमध्ये सुनील गावस्कर आणि यष्टींच्या मागे आहे फरूक इंजिनियर. गोलंदाज(पाठमोरा) बहुदा चंद्रशेखर दिसतोय
१९७४साल.मैदान ओल्ड ट्रॅफल्ड-इंग्लंड. फलंदाज डेरेक अंडरवूड. सिली पॉईंटला सुनील गावस्कर आणि झेल घेणारा एकनाथ सोलकर!!!!!!!!!!
गोलंदाजाच्या जादूपेक्षा सोलकरचे चापल्य आणि घारीची नजर ह्या दोन गुणांमुळेच गोलंदाजाच्या खात्यातल्या बळींची संख्या वाढलेली आहे.
कुणी निंदा,कुणी वंदा!
आम्ही जोपासतो
चाली लावण्याच्या छंदा!!
14 Nov 2009 - 3:07 pm | जे.पी.मॉर्गन
वेड फोटो आहेत ! च्यायला.. खूप काही बघायचे राहिले हो. आजोबा आम्हाला हॉल, ग्रिफिथ, अमरनाथ, नायडूंच्या गोष्टी सांगायचे... बाबा गावसकर, विश्वनाथ, रिचर्ड्स, गार्नर, ग्रॅहॅम पोलॉक च्या... आम्ही आमच्या पोरांना तेंडल्याच्या कथा सांगणार...हे असंच चालायचं !
15 Nov 2009 - 9:13 am | चतुरंग
इथे दिल्याबद्दल धन्यवाद!!
एक्की बद्दल खूप ऐकून होतो पण हे फोटो पाहून खरंच खूप बरं वाटलं.
काय एकेक खेळाडू होऊन गेले राव! जबरा!!
चतुरंग
17 Nov 2009 - 3:26 pm | सुमीत भातखंडे
I will out you bloody
- एकनाथ सोलकर टू जेफ बॉयकॉट
पण फोटू दिसत नाहीत.
17 Nov 2009 - 4:07 pm | जे.पी.मॉर्गन
कमाल ! शब्दच नाहीत ! बॉयकॉट हे इंग्लिश ऐकूनच आउट झाला असेल !
17 Nov 2009 - 4:36 pm | प्रमोद देव
बॉयकॉट हा सोलकरचा 'गिर्हाईक' होता.
सोलकर हा अष्टपैलू होता. तो एक उपयुक्त फलंदाज होता. फलंदाजी करताना तो तासंतास खेळपट्टीवर नांगर टाकून बसायचा. धावा फारशा करत नसे तरी भागीदार्या मात्र बर्याच केल्या आहेत. तसेच तो मध्यमगती आणि फिरकी अशा दोन्ही प्रकारची गोलंदाजी करत असे. सोलकरची मध्यमगती बॉयकॉटला नेहमीच भारी पडलेय. बॉयकॉटला तो सांगून हमखास बाद करायचा. :D
पण त्याचे खरे क्षेत्र म्हणायचे म्हणजे फलंदाजाजवळचे क्षेत्ररक्षण. फॉर्वर्ड शॉर्ट-लेग ही त्याची खास ठरलेली जागा होती. ह्या जागेवर त्याने घेतलेल्या अफलातून झेलांमुळे गोलंदाजांच्या खात्यात आयतीच वाढ झाली. कैक वेळेला फॉशॉले पेक्षाही जवळ तो उभा राहात असे. भिती हा शब्द त्याच्या शब्दकोशात नव्हता.
सोलकरच्या वेळी त्याच्या बरोबरीनेच अबीद अली,अजित वाडेकर, वेंकटराघवन् असे काही फलंदाजाच्या आसपास क्षेत्ररक्षण करणारे उत्कृष्ठ खेळाडू होते...पण ह्या सगळ्यांच्यात सोलकर प्रथम क्रमांकावर होता.
सोलकरनंतर त्याची जागा घेणारा एकही क्षेत्ररक्षक आपल्याला मिळाला नाही. :(
कुणी निंदा,कुणी वंदा!
आम्ही जोपासतो
चाली लावण्याच्या छंदा!!
16 Nov 2009 - 11:54 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मस्त लेख.....!
अजून येऊ दे...
16 Nov 2009 - 7:17 pm | मेघवेडा
मस्तच एकदम! झकास!!
तुमच्या कुठल्या कुठल्या वाक्यांचा इथे उल्लेख करू असं झालंय! बरीच वाक्ये दाद देण्याजोगी आहेत हो साहेब!!
वर्णनाची जरा लांबी वाढवाल का? प्लीज!
राहून राहून रिचर्डस चा उल्लेख करावासा वाटतो! वीरेंदर सेहवागच्या "आम्हा काय त्याचे" शाळेचा तो गुणवत्ता यादीतील मानकरी! नव्हे मुख्याध्यापकच कदाचित!!! त्याचे ते बेफिकिर चालणे, तीन बाद दहा असा धावफलक असतानाही बिनधास्त चौकाराने खाते उघडणे, "It's red, round and weighs about five ounces, in case you were wondering!" असे मोठ्या आवेशाने आणि मग्रुरीने सांगणर्या ग्रेग थॉमसला पुढच्या चेंडूवर षटकार खेचून (चेंडू गेला मैदानाबाहेरील नदीत!!) त्याला "Greg, you know what it looks like. Now go and find it." असे तितक्याच, नव्हे थोड्या जास्तच आवेशाने आणि मग्रुरीने सांगणारा रिचर्डस म्हणजे खरंच गोलंदाजांचा कर्दनकाळ!!!
आपल्या १९७४ ते १९९१ या १७ वर्षांच्या कारकिर्दीत एकदाही हेल्मेट न घालता खेळणं म्हणजे खरोखरीच दैदिप्यमान कामगिरी नाही का?
आपला लेख मात्र खरोखरीच सुंदर आहे! येत राहू दे अजून साहेब!!
वाट पाहू!!
17 Nov 2009 - 2:09 am | नंदन
मस्त, खुसखुशीत लेख.
=)) परफेक्ट!
बाकी मार्क वॉचे नबाबी फटके, खासकरून लेग ग्लान्स आणि स्टीव्ह वॉचा डावा गुडघा टेकवून ऑफस्पिनर्सना मिड-ऑनवरून भिरकावून देणारा षटकार हेही फटके लाजवाब.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
17 Nov 2009 - 10:37 am | जे.पी.मॉर्गन
"मार्क वॉचे नबाबी फटके, खासकरून लेग ग्लान्स आणि स्टीव्ह वॉचा डावा गुडघा टेकवून ऑफस्पिनर्सना मिड-ऑनवरून भिरकावून देणारा षटकार हेही फटके लाजवाब"
एकदम परफेक्ट नंदन! पुढच्या लेखात येतच आहेत ! :)
17 Nov 2009 - 11:20 am | दिपक
सही लेख... झकास वर्णन. सेहवागचं तर डिट्टो.. :)
आम्हाला आवडणारे काही..
![](http://images.orkut.com/orkut/photos/OQAAADt0sIYeVd4fxURXrYrEUK4KmOjLE8ytigrw342nBF7NoUsulVucX55f-fWicP-Bn-lbn9qk3bds7MGvYdwgRewAm1T1UJxHlJ5Q-7K0RktE31sFYD8kufGl.jpg)
द्रवीड चा कव्हर ड्राईव्ह
दादा जेव्हा पुढे येऊन सिक्सर खेचतो तेव्हा...
![](http://www.cricinfo.com/db/PICTURES/DB/032003/043553.jpg)
पॉन्टीग चा कव्हर ड्राईव्ह
![](http://www.cricket.org/db/PICTURES/CMS/57000/57091.jpg)
17 Nov 2009 - 3:12 pm | सुमीत भातखंडे
जबराच. बाकी शब्दच नाहीत.
18 Nov 2009 - 1:41 am | विसोबा खेचर
वा वा! सुरेख चित्रयात्रा.. खूप जुन्या आठवणींना उजाळा मिळाला..
(ब्रायन लारा प्रेमी) तात्या.
18 Nov 2009 - 4:06 am | संदीप चित्रे
हा त्याचा यॉर्कर !!