जमलं एकदाचं...

दिनेश५७'s picture
दिनेश५७ in जनातलं, मनातलं
8 Nov 2009 - 9:23 am

एका घरात दोन पाळलेले बोके मजेत राहात होते. मालकाच्या घरी समृद्धी असल्याने त्यांची चैन होती. दिवसभर मलई खायची, आणि रात्री ढेकर देत मऊशार गादीवर लोळत पडायचे... असे मजेत दिवस जात होते... थोडक्यात, सुखाचा अगदी `वर्षा'व सुरु होता. दुसरा बोकाही हुशार होता. दिवसभर डोळे मिटून `मलई’ चापायची, आणि रात्री निजण्याआधी `राम'नामाचा जप करत दिवसभरातल्या गिव्ह ऎंड `टेक'चा हिशेब माडत पहुडायचे... एकूणच, दुसरा बोकाही सुखात असल्यामुळे, दोघांच्यातही भांडणाचा मुद्दाच नव्हता. आपापल्या ताटातली मलई खायची आणि मजा करत सुस्त राहायचं... शेवटी आयुष्य म्हणजे तरी काय?... मजेत जगणं हेच ना?... मालकाचा बिचारा नोकर मात्र, बोक्यांची ही चैन बघून खंतावायचा. हे डोळे मिटून मलई चापतात, पण मालकाचे डोळे तरी उघडे हवेत ना, असं त्याला वाटायचं आणि, आपल्या घरची उपाशी पोरं आठवून तो पाणावलेले डोळे मिटून घ्यायचा. बोके एकमेकांकडे बघून हसतायत, असा त्याला भास व्हायचा. मग तो तिकडे पाहायचाच नाही. मग बोके मलईवर तुटून पडायचे, आणे पोट भरल्यावर `पंजा'ने मिशा पुसत लोळायला जायचे.
अशी दहा वर्षे सरली. पिल्लू म्हणून घरात आलेले ते बोके आता चांगलेच गलेलट्ठ झाले होते. त्यांची भूक पण वाढली होती. शरीरं वाढली म्हणजे ते होणारच ना? आता त्यांना मलईची चटकच लागली होती. चांगली मलई कुठल्या कपाटात असते, तेही दोघांनाही माहीत झाले होते. दहा वर्षे एकाच घरात दोघेही वावरत होते ना? दोघांचाही डोळा त्या कपाटातल्या मलईवर होता. ही सगळी मलई आपल्यालाच मिळाली पाहिजे, असं दोघांनाही वाटू लागलं.
... आणि इथेच बिनसलं. दोघेही समोरासमोर आले, की एकमेकांवर गुरगुरायला लागले. मालक आणि नोकरांनाहे ते जुमानेनासे झाले. आपणच मालक आहोत, अशा थाटात ते मलईच्या कपाटासमोर बसू लागले. हटकले तरी हलेनासे झाले. जिभल्या चाटत आणि आतल्या मलईच्या चवीच्या आठवणी मनात रंगवत ते सुस्तपणे पडून राहयचे.
एक दिवस मालक बाहेर कुठे गेला होता. नोकरानं आळस केला, आणि नेमकं मलईचं ते कपाट उघडं राहिल. ...आणि बोक्यांचं फावलं. सुखाच्या `वर्षा'वात लोळणा-या बोक्यानं झडप घातली, आणि कपाटातला तो मलईचा गोळा `पंजा'त पकडला. दुसरा बोका अजूनही सुस्त होता... बराच वेळ झाला, तरी दुस-या बाजूला हालचाल जाणवत नव्हती. तेव्हड्यात बाहेर घड्याळाचे ठोके पडले. घड्याळ वाजले, की त्याला मालकाची आठवण व्हायची. तो उठला. त्यानं आळस दिला, आणि मिशा फेंदारून त्यानं आजूबाजूला बघितलं. दुसरा बोका कुठेच दिसत नव्हता आणि मलईच्या कपाटाचं दार उघडं होतं... त्यानं अंदाज घेतला, आणि एकदा शरीराची कमान करून आळस झटकून उडी मारली. क्षणात तो दुस-या बोक्याच्या समोर उभा होता.
... दोघे समोरासमोर आले. आता गुरगुरण्याचा आवाजही वाढला होता. नोकरानं आत येऊन बघितलं. पण दोन्ही बोक्यांचा अवतार बघून पुढं व्हायची हिंमतच त्याला झाली नाही. आपलीच चूक आहे, आपणच कपाट उघडं ठेवून मलईचं ताट त्यांच्यासमोर वाढलं, आता करणार काय... कपाळावर सुन्नपणे हात धरून तो दोन बोक्यांचं भांडण बघत होता... आता बोके अगदी हातघाईवर आले होते. मलईचा तो गोळा काहीही करून पटकावायचाच, अश्या ईर्ष्येनेच दोघेही मैदानात उतरले होते... असा खूप वेळ गेला. मलईचा गोळा बाजूलाच पडला होता... आणि हे दोघे `हात'घाईवर आले होते. भाडून भांडून आता त्यांना थकवाही आला होता. ब-याच दिवसाच्या सुस्तीमुळे अलीकडे भांडायची ताकदही उरली नव्हती, हे दोघांच्याही लक्शात आले. आणि बाजूला जाऊन मलईच्या गोळ्यावर डोळा ठेवून ते दोघेही जरा विसावले.
... खूप वेळ झाला. पुन्हा बाहेर घड्याळाचे ठोके पडले आणि दुसरा बोका ताडकन उठला. आता सोक्षमोक्ष लावलाच पाहिजे. मग अचानक त्याचे डोळे चमकले. आवाज ह्ळूवार झाला. अंगाला लडिवाळ झोका देत तो पहिल्या बोक्याजवळ गेला, आणि त्याच्या अंगाला अंग घासत त्यानं लाडिक सुरात `मियांव' केलं... पहिला बोकाही थकला होता. एकाच घरात राहायचं असेल, तर आपण असं एकमेकांशी भांडून चालणार नाही, असं त्याला बहुधा उमगलं होतं. शेवटी इतकी वर्षं एकत्र काढली होती. सुरुवातीला तर, एका ताटात जेवलो होतो... पहिल्या बोक्याला ते दिवस आठवले, आणि तो विरघळला... त्यानंही शेपटीला विळखा देत दुस-याशी लडिवाळपणा करत मियाव केलं...
पण परत दुस-याचे डोळे चमकले. काहीतरी गडबड असावी, असं त्याला वाटू लागलं. पण त्यानं तसं दाखवलंच नाही... आता मलईसाठी काहीतरी करायलाच हवं, हे त्याला जाणवायला लागलं, आणि तेव्हढ्यात पुन्हा घड्याळाचा ठोका पडला. मग तो आपल्या भाषेत पहिल्या बोक्याच्या कानात काहीतरी कुजबुजला. नोकर हे अचंबितपणे पाहात होता. पण त्याला त्यांची भाषा समजत नव्हती. बोक्यांना मात्र, माणसांच्या संगतीत राहून माणसांची भाषा कळते, हे नोकरानं ऐकलं होतं. तो उठला आणि आपल्या कामाला लागला. आता गुरगुरणंही थांबलं होतं.
... ब-याच वेळानंतर दोन्ही बोके कुटूनतरी बाहेरून घरी आले, तेव्हा त्यांच्या तोंडात मलईचे दोन लहानसे गोळे होते. पण दोघेही खूश होते... एकमेकांच्या अंगाला अंग घासत दोघेही शेजारीशेजारी बसून मलई चापत होते. मधूनच एकमेकांना चाटत होते.
... नोकराला काहीच कळेना. अचानक त्याला त्या लोण्याच्या गोळ्यासाठी भांडणा-या दोन बोक्यांच्या गोष्टीची आठवण झाली...
... ``कुणीतरी वाटण्या करून दिलेल्या दिसतायत यांना'' नोकर स्वत:शीच पुटपुटला, आणि त्यानं केरसुणी हातात घेतली. बोक्यांचं भांडण बघण्यात आपली बरीच कामं तशीच रेंगाळलीत, हे त्याच्या लक्षात आलं, आणि मालक ओरडेल या भीतीनं तो कामाला लागला...
पुन्हा घड्याळाचे ठोके पडले. मालकांची यायची वेळही झाली होती. आता मालकाला त्या मलईच्या गोळ्यांचं काय सांगायचं, या काळजीनं नोकर हैराण झाला होता. तेव्हढ्यात दरवाजाची बेल वाजली. दोन्ही बोक्यांनी कान टवकारले होते. मालक आला की ते नेहेमीच शेपटी घोळवत पुढेपुढे करायचे, आणि त्यांना कुरवाळताना मालकाचा रागही निवळायचा...
आताही तसंच व्हावं, असं नोकराला वाटत होतं.. त्यानं दरवाजा उघडला, आणि दोन्ही बोके मालकाकडे झेपावले... त्यांच्या मिशांना चिकटलेली मलई अजूनही तशीच दिसत होती...
मालकानं प्रेमान त्याच्या मिशा पुसल्या. नोकर अचंबित होऊन बघतच राहिला.
"म्हणजे, मालकानंच मलईची वाटणी करून दिली की काय?"... तो पुन्हा पुटपुटला, आणि निमूटपणे कामाला लागला.
दोघेही बोके आता `पंजा'नं मिशा पुसत नोकराकडे बघत होते.
... मिश्किलपणे!
- (सकाळ, ८ नोव्हेंबर २००९)
(http://zulelal.blogspot.com)

मुक्तकमाध्यमवेधविरंगुळा

प्रतिक्रिया

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

8 Nov 2009 - 11:45 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

हा हा हा हा ... क्लासच!

अदिती

अमोल खरे's picture

8 Nov 2009 - 11:52 am | अमोल खरे

असेच म्हणतो. दोघे खरोखरीच बोक्यासारखे गुटगुटीत आहेत. =))

प्रभो's picture

10 Nov 2009 - 6:51 am | प्रभो

हा हा हा हा ... क्लासच!

--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

सुनील's picture

8 Nov 2009 - 11:56 am | सुनील

दोघेही बोके आता `पंजा'नं मिशा पुसत नोकराकडे बघत होते.
हा हा हा!!!

कथा आवडली दिनेशराव!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

सहज's picture

9 Nov 2009 - 8:26 am | सहज

लै लै भारी लेख दिनेशराव!!

स्वाती२'s picture

9 Nov 2009 - 8:30 am | स्वाती२

बोक्यांची कथा आवडली.

मदनबाण's picture

9 Nov 2009 - 9:05 am | मदनबाण

कथा आवडली... :)

मदनबाण.....

आपण कसे दिसतो यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व आहे.

प्रकाश घाटपांडे's picture

9 Nov 2009 - 1:36 pm | प्रकाश घाटपांडे

पुनर्वसु व आश्लेषा नक्षत्रावर जन्मलेल्या लोकांची मार्जार योनी असते असे पंचांगातील अवकहडा चक्र सांगते.

ज्योतिर्प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

समंजस's picture

9 Nov 2009 - 4:17 pm | समंजस

झक्कास कथा सांगितली दिनेशराव!!! :)
बाकी नोकराला केव्हा मलाई खायला मिळेल बुवा :?

चतुरंग's picture

9 Nov 2009 - 9:40 pm | चतुरंग

जमलं जमलंच!

(घड्याळात टोले पडले की पंजाने मिशा पुसत इंजिनात बसून जाणारा)चतुरंग