घर
"या, या ,हे घर तुमचच आहे
इथे पाहुण्यांच स्वागतच आहे"
अशा पाट्या लावून आता
म्हणे जागोजागी घरे आहेत
फेंग शुई नि वास्तुशास्त्र
पिऊन मोठी घरे उभे आहेत
रिमोटकंट्रोलवर चालणारे
एक जग त्यामध्ये सज्ज आहे
खा अमेरिकन बर्गर फाईन
घ्या कधी इटलीयन वाईन
जरा चघळा संस्कृतीचे किस्से
शोधा आपल्या भाषेचे हिस्से
लागला जर आसामचा चहा
होईल तयार सेकंदात दहा
सीएनएन पहा रवीशंकर ऐका
तस हे घर ग्लोबल बर का.....
ऐका इथे कशाची उणीव नाही!
दारावरच्या भिकाऱ्याला येथे
प्रवेश नाही ...कारण त्याच्याकडे
हवा तो सिक्रेटकोड नाही!
ही इथली माणस आहेत
त्या जगाच्या चार कोपऱ्यात...
संगणक मोबाईलने जोडलेली
पण मनान कधीच दूर गेलेली...
ऐका हो ऐका..घर हव आहे का?
माणसाला माणूस हवा आहे का?
(तशी प्रत्येक घराला लागली आहे
एक घर घर कायमचीच!)
-सोनाली जोशी
प्रतिक्रिया
25 Sep 2007 - 8:20 pm | राजे (not verified)
ही इथली माणस आहेत
त्या जगाच्या चार कोपऱ्यात...
संगणक मोबाईलने जोडलेली
पण मनान कधीच दूर गेलेली...
ऐका हो ऐका..घर हव आहे का?
माणसाला माणूस हवा आहे का?
(तशी प्रत्येक घराला लागली आहे
एक घर घर कायमचीच!)
क्या बात है, मस्तच.
तशी प्रत्येक घराला लागली आहे
एक घर घर कायमचीच!
उत्तमच,
अशी घरे पाहीली की खरोखर दुख: होते, शेजारी कोण आहे हे सोडाच पण आपली मुले घरी कधी आली व त्यांनी आपला आभ्यास केला की नाही केला ह्या खैर-खबर देखील नसलेली घरे {माणसे} मी पाहत आहे रोज ह्यांचे दुखः आहे की घर आपले घरपण विसरले आहे.
एकदम समयसूचक कविता.
राजे
(*हेच राज जैन आहेत)
25 Sep 2007 - 9:21 pm | प्रकाश घाटपांडे
शेजारी कोण आहे हे सोडाच पण आपली मुले घरी कधी आली व त्यांनी आपला आभ्यास केला की नाही केला ह्या खैर-खबर देखील नसलेली घरे {माणसे} मी पाहत आहे रोज ह्यांचे दुखः आहे की घर आपले घरपण विसरले आहे.
खर आहे राजे. माणसं ग्लोबली जवळ आली पण लोकली लांब गेली.
प्रकाश घाटपांडे
25 Sep 2007 - 9:48 pm | प्रियाली
शेजारी कोण आहे हे सोडाच पण आपली मुले घरी कधी आली व त्यांनी आपला आभ्यास केला की नाही केला ह्या खैर-खबर देखील नसलेली घरे {माणसे} मी पाहत आहे रोज ह्यांचे दुखः आहे की घर आपले घरपण विसरले आहे.
अगदी!!
माणसं ग्लोबली जवळ आली पण लोकली लांब गेली.
वाह!
कविता मस्तच आहे! आवडली.
25 Sep 2007 - 11:13 pm | राजे (not verified)
साहेब,
अश्या ह्या घराच्या भिंती किती कमजोर असतात हे तुम्हाला माझी सफरच्या ८ / ९ भागात लक्षात येईल असे दोन भयानक अनूभव आहेत माझ्या जवळ की आज देखील काळजाचा थरकाप उडतो विचार केला की.
ही ग्लोबल मंडळी देश विदेशाच्या वा-या करतात किंवा दिवस रात्र कंपनी मध्ये पैश्यासाठी राबतात पण येथे घरामध्ये त्यांच्या मुलाबाळांची काय अबाळ होते हे त्यांच्या लक्षात येण्यासाठी खुप मोठा काळ निघून जावा लागतो पण तो पर्यंत त्या भींती ढासळलेल्या असतात.
राजे
(*हेच राज जैन आहेत)
25 Sep 2007 - 11:25 pm | सर्किट (not verified)
माणसं ग्लोबली जवळ आली पण लोकली लांब गेली.
भारतात ऑर्कुट सारखी सोशल नेटवर्कस चालणार नाहीत अशी दहावर्षांपूर्वी मित्राशी पैज लावली होती. मी ती हरलो. कारण म्माणसांना ग्लोबल संबंधांचे असलेले आकर्षण. त्यासाठी लोकल संबंधांचा बळी पडतो, हे लक्षात सहसा येत नाही.
- सर्किट
26 Sep 2007 - 1:06 pm | आजानुकर्ण
माणसं ग्लोबली जवळ आली पण लोकली लांब गेली.
१०० %
25 Sep 2007 - 9:01 pm | प्राजु
ग्लोबलायझेशनच्या नावाखाली.. दुसरी काय अपेक्षा असणार?
- प्राजु.
25 Sep 2007 - 9:35 pm | धनंजय
पण हे कविता समजावून सांगणारे कडवे नसते तरीही कविता माझ्यासाठी तितकीच प्रभावी ठरली असती.
> ही इथली माणस आहेत
> त्या जगाच्या चार कोपऱ्यात...
> संगणक मोबाईलने जोडलेली
> पण मनान कधीच दूर गेलेली...
ही कलाटणी फारच आवडली :
> प्रवेश नाही ...कारण त्याच्याकडे
> हवा तो सिक्रेटकोड नाही!
26 Sep 2007 - 7:40 am | विसोबा खेचर
लागला जर आसामचा चहा
होईल तयार सेकंदात दहा
सीएनएन पहा रवीशंकर ऐका
तस हे घर ग्लोबल बर का.....
ही इथली माणस आहेत
त्या जगाच्या चार कोपऱ्यात...
संगणक मोबाईलने जोडलेली
पण मनान कधीच दूर गेलेली...
वा! छान कविता. वरील दोन कडवी जास्त आवडली..
सोनाली, मिसळपाववर तुझं स्वागत. अजूनही लिही...
तात्या.
26 Sep 2007 - 8:30 am | सहज
मला हे अस ग्लोबल घर खूपच आवडते.
बर्गर एखादे दिवशीचा मेन्यू असेलच पण वरणभात, साजूक तूप, खाराची मिरची, साबूदाणा खिचडी हद्दपार नाही केली हो. खर सांगतो खरीखूरी ढेकर तेव्हाच येते पण मला माझे ग्लोबल घर खूप आवडते.
अहो मी एकटाच नाही आलेले सगळेच म्हणतात, रेडीफवर स्वतात विमान टीकीटे वाचले की माझ्या इनबॉक्स इमेल असतो, की पुढच्या महीन्यात काय प्रोग्रम आहे का, नवीन घर घेतलेस एकले. आत योग येणार म्हणुन. सुट्यांच्या मोसमात, दहावी , बारावीच्या आद्ल्या/पुढच्या वर्षी कॉन्फरेन्सच्या वेळी घराचे कौतुक होतेच होते.
मला "भिकारी" पेशानी किंवा मनानी नाही हो खरच आलेला आवडत, पण बर्याचदा तोही म्हणतो आतून खरच ग्लोबल घर खूपच छान आहे हो. बाकी काळाचा महीमा सिक्रेटकोड लावावा लागतो.( पण गंमत सांगतो, आमच्या दुसर्या एक्विपमेंट्स वर फ्री मिळाला हो. लेटेस्ट मॉडेल सिक्रेटकोड २००७ आहे . :-))
संगणक, मोबाइल ने "जोडलीच" ना माणसे? आणी कोणाच्या मनाचे काही सांगता येते काय?
जाणारी व्यक्ति जेव्हा सांगते की "अगदी आपलेच घर आहे अस वाटल" तेव्हा माझ घर परमेश्वराला पण आवडल हे समजत. देवबाप्पा म्हणतो अरे घराच घरपण माणसातच असत.
मला माझ ग्लोबलघर खूपच आवडत.
--------------------------------------------------------------
सुवर्णमयी आपली कविता आवडली. मनात एकदा स्टॉकटेकींग करता आला बरे वाटले.
26 Sep 2007 - 10:45 am | सर्किट (not verified)
सहजराव,
अपल्या प्रतिसादाने काही दालनांची दारे किलकिली केली. विचार शील आहे सध्या.
ह्या विषयावर काही समग्र वगैरे लेखन व्हावे.
- (ग्लोबल आणि लोकल) सर्किट
26 Sep 2007 - 8:51 am | रंजन
तशी प्रत्येक घराला लागली आहे
एक घर घर कायमचीच!
जबर्या.
26 Sep 2007 - 8:51 am | प्रमोद देव
जाणारी व्यक्ति जेव्हा सांगते की "अगदी आपलेच घर आहे अस वाटल....
ही आपुलकी शाब्दिकच ठीक असते.मात्र प्रत्यक्षात तसे वागायचे जर कुणी ठरवले तर ती आपत्तीच ठरेल हे सांगायला नको.मग अरब आणि उंट असे व्हायचे. उंट आत आणि अरब बाहेर!
26 Sep 2007 - 10:47 am | सर्किट (not verified)
प्रमोदकाका,
आपले म्हणणे आम्हालातरी अजीबात कळले नाही.
उंट आत असला, आणि अरब बाहेर असला तर काय बिघडले ?
उलट तसेच हवे. कारण आत आलेला अरब काहीही राडे घालू शकतो.
- (बे-अरब) सर्किट
26 Sep 2007 - 12:19 pm | प्रमोद देव
पाव्हण्यासारखाच असावा. मालक म्हणून घराचा ताबा घेऊ नये.
27 Sep 2007 - 4:16 am | सुवर्णमयी
सर्वांचे आभार.
काय आवडले तसेच काय आवडले नाही, कळले नाही, पटले नाही ते सुद्धा सांगा अशी विनंती.
12 Oct 2007 - 5:20 pm | abhijit deshpande
खरच आप्रतिम. आनि कवितेतला समय सुचक पना आवदला.
14 Oct 2007 - 2:41 pm | धोंडोपंत
वा वा सोनालीताई,
अप्रतिम कवितेबद्दल सर्वप्रथम हार्दिक अभिनंदन.
बर्याच कालावधीनंतर तुमच्या कवितेला अभिप्राय लिहीण्याची संधी मिळाली.
ह्या तात्याच्या मिसळपावामुळे जुने मित्रमंडळी पुन्हा येथे भेटतील असे मानावयास हरकत नाही.
आपला,
(आशावादी) धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
16 Oct 2007 - 1:08 am | विसोबा खेचर
ह्या तात्याच्या मिसळपावामुळे जुने मित्रमंडळी पुन्हा येथे भेटतील असे मानावयास हरकत नाही.
प्रिय धोंड्या, थोडं करेक्शन करतो! मिसळपाव हे 'तात्याचं' नसून आपल्या सर्वांचं आहे आणि आपण सर्वांनी मिळूनच ते मोठं करायचं आहे, नावारुपाला आणायचं आहे! एकटा तात्या काहीच करू शकत नाही याची मला नम्र जाणीव आहे!
आपला,
('साथी हाथ बढाना...' या गाण्यावर श्रद्धा असलेला!) तात्या.