खरडवहीतल्या देवाणघेवाणीतून हा विषय निघाला. पूर्वी माझ्या ब्लॉगवर याबद्दल माहिती दिली होती. त्यामुळे नवीन काही न टाकता तीच माहिती इथे सर्वांच्या सोयीसाठी देत आहे -
हिंदू संस्कृतीत जन्मदिवस साजरा करण्याची प्रथा फार जुनी आहे. सांस्कृतिक देवाणघेवाणीमुळे जन्मदिवस साजरा करण्याची पाश्चात्य पद्धतही भारतात आता चांगलीच रूढ झाली आहे. तरी, निदान काही जन्मदिवस आपल्या संस्कृतीप्रमाणे साजरे करावेत अशी विचारधाराही अस्तित्वात आहे व त्यातून एकसष्ठी, पंचाहत्तरी, सहस्रचंद्रदर्शन, इत्यादि सोहळे लोकप्रिय झालेत. संस्कृतीचं जतन करणे ही बाब निश्चितच स्तुत्य आहे. पण, हल्ली प्रत्येक गोष्टीत घाई करण्याची सवय असते त्यानुसार विशेषत: सहस्रचंद्रदर्शनसोहळा लवकर साजरा केल्याचे प्रकार हल्ली अनेकदा घडले. या सोहळ्याविषयी मला काही जेष्ठ व्यक्तींकडून मिळालेली माहिती लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून हा लेखनप्रपंच. यात कोणाच्या भावना दुखवण्याचा हेतू नाही.
सर्वप्रथम आपण हिंदू कालगणनेबद्दल थोडी माहिती करून घेऊ. हिंदू कालगणना चांद्र-सौर पद्धतीची आहे. म्हणजे, चांद्रमास प्रचलित असून अमावस्येच्या वेळी सूर्याच्या राशीवरून महिन्यांचं नामकरण केलं जातं. उदा. मीन राशीत सूर्य असताना अमावस्या झाली, की त्यानंतर सुरू होणार्या महिन्याला 'चैत्र' हे नाव देण्यात आलं व याप्रमाणे पुढील महिन्यांचं नामकरण केलं गेलं. सूर्य एकाच राशीत असताना दोन अमावस्या झाल्या, तर अनुक्रमे अधिक व निज असे एकाच नावाचे दोन महिने होतात. (उदा. अधिक श्रावण, निज श्रावण.) अधिक महिना दर तीन वर्षांनी येतो. याचा अर्थ, हिंदू कालगणनेनुसार तीन वर्षांत १२X३+१ = ३७ महिने येतात. (क्षयमासाचा अपवाद वगळला आहे.) म्हणजे, ३ वर्षांत ३७ पौर्णिमा (३७ वेळा पूर्णचंद्र दिसतो) त्यानुसार ८१ वर्षांत ३७X२७ = ९९९ वेळा पूर्ण चंद्र दिसतो.
याचा अर्थ, पौर्णिमेचा जन्म असल्यास ८२व्या जन्मदिवशी (पंचागानुसार ८१ वर्षे पूर्ण होतात तो दिवस) व इतर कोणत्याही तिथीचा जन्म असल्यास ८२व्या जन्मदिवसानंतर येणार्या पहिल्या पौर्णिमेला १०००वा पूर्णचंद्र दिसेल. हाच सहस्रचंद्रदर्शनसोहळ्याचा दिवस.
प्रतिक्रिया
12 Oct 2009 - 8:59 am | आनंद घारे
तीन वर्षांनी अधिक महिना येतो हे ढोबळ विधान आहे. सौर वर्षाचा कालावधी ३६५.२५ दिवसांचा असतो. ८० सौर वर्षात असे २९२२० दिवस येतात. चांद्र मास २९.५ दिवसांचा असतो . १०० चांद्रमासात २९५०० दिवस येतात. याचाच अर्थ वयाची ८१ वर्षे पूर्ण होण्याच्या आधीच १००० महिने पूर्ण होतात, किंवा १००० पौणिमा येऊन जातात. सहस्रचंद्रदर्शनाचा दिवस ठरवतांना इतका सूक्ष्म विचार केला जातो की नाही ते मला माहीत नाही. ( मला अजून खूप वर्षे आहेत.)
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://anandghan.blogspot.com/
12 Oct 2009 - 11:13 am | प्रकाश घाटपांडे
सहस्त्रचंद्रदर्शन हे ८१ पुर्ण व्हायच्या आतच येते. त्या वेळी वयोवस्थ शांती पण करतात म्हणे
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
12 Oct 2009 - 4:02 pm | प्रशांत उदय मनोहर
याबद्दल विस्तृत माहिती वाचायला आवडेल. ज्योतिर्गणितातला हा भाग लै इंटरेष्टिंग आहे.
आपला,
(मिपाकर) प्रशांत
---------
फळाची अपेक्षा ठेवू नये...ते विकत घ्यावे किंवा घरात उगवावे.
:?
माझा ब्लॉग - लेखणीतली शाई
12 Oct 2009 - 11:53 am | आनंद घारे
१०० चांद्रमासात २९५०० दिवस येतात
हे वाक्य
१००० चांद्रमासात २९५०० दिवस येतात असे वाचावे. एक शून्य हरवले होते.
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://anandghan.blogspot.com/
12 Oct 2009 - 4:00 pm | प्रशांत उदय मनोहर
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
रोजच्या व्यवहारात आपण सौरवर्षाचा वापर करत असलो, तरी व्रतवैकल्यांसाठी चांद्र-सौर मासांचा उपयोग केला जातो. म्हणजे चांद्रमासाप्रमाणे मास गणना, आणि सूर्याच्या राश्यांतरानुसार पुढील मासांचं नामकरण यामुळे सुमारे तीन वर्षांनी अधिक मास आपल्या कालगणनेत येतो. (इस्लामी चांद्रमास-वर्षांमध्ये अधिक मास नसल्यामुळे दर तीन वर्षांनी त्यांचं वर्ष आपल्या वर्षापेक्षा एक महिन्याने पुढे सरकतं. उदा. तीन वर्षांपूर्वी रमजान ईद दिवाळीच्या सुमारास होती. दोन वर्षांपूर्वी अधिक मास आला होता, तेव्हापासून ती नवरात्रात येते. पुन्हा अधिक मास येईल तेव्हा रमजान ईद भाद्रपद महिन्यात हरतालिकेच्या एक-दोन दिवस अलिकडे येईल.) मराठी कालगणनेनुसार तिथ्यांचं गणित जास्त सुटसुटीत आहे जे मी वर दिलंय. अर्थात, यामध्ये क्षयमासाचा अपवाद वगळला आहे. सूर्याचं राश्यांतर न होता दोन मास येतात तेव्हा अधिक मास होतो, त्याप्रमाणे सूर्याचं एकाच चांद्रमासात दोन वेळा राश्यांतर होतं, त्यावेळी एका महिन्याचा क्षय होतो कारण नामकरण करताना अमावस्येच्या आधीच्या राश्यांतरानुसार महिन्याचं नाव येतं. क्षयमास फारच क्वचित येतो. आणि तो येतो तेव्हा सहसा त्याच्या आधी आणि नंतर असे दोन अधिक मास येतात. क्षय मासाचा विचार केल्यास अर्थातच वर सांगितलेल्या गणितापेक्षा १०००वी पौर्णिमा एक दोन महिन्यांनी अलिकडे येईल.
आपला,
(मिपाकर) प्रशांत
---------
फळाची अपेक्षा ठेवू नये...ते विकत घ्यावे किंवा घरात उगवावे.
:?
माझा ब्लॉग - लेखणीतली शाई
12 Oct 2009 - 4:09 pm | प्रशांत उदय मनोहर
सूक्ष्म अभ्यास केल्यास मी वर दिलेल्या गणितात सांगितल्यापेक्षा १०००वी पौर्णिमा आधी येत असली तरी ती ८० वर्ष पूर्ण झाल्यानंतर बर्याच महिन्यांनी येते. आनंदकाकांनी सौरवर्षांचं गणित दिलंय त्यानुसारही १०००वी पौर्णिमा यायला ८० वर्षे आणि सुमारे ९ महिन्यांनंतर येते. तात्पर्य, ८० वर्षे पूर्ण होतात तेव्हा १००० पौर्णिमा झालेल्या नसतात. त्यामुळे ८१ वर्षांच्या वाढदिवसाला (किंवा सूक्ष्म गणितानुसार काही दिवस/मास आधी) सहस्रचंद्रदर्शन सोहळा व्हायला हवा. हा सोहळा होताना १००० पेक्षा जास्त पौर्णिमा झाल्यात तर चालेल एकवेळ, पण कमी नको. :)
आपला,
(मिपाकर) प्रशांत
---------
फळाची अपेक्षा ठेवू नये...ते विकत घ्यावे किंवा घरात उगवावे.
:?
माझा ब्लॉग - लेखणीतली शाई
12 Oct 2009 - 6:13 pm | प्रसन्न केसकर
हा प्रश्न मी एकदा विचारला होता तेव्हा मला उत्तर मिळाले की चंद्रग्रहणाच्या दिवशी एक चंद्रदर्शन जास्त धरतात व त्यानुसार सहस्त्रचंद्रदर्शने ऐंशी वर्षे पुर्ण होतात तेव्हा होतात त्यामुळे समारंभ त्यानंतरच्या वर्षात म्हणजे वयाच्या एक्याऐंशीव्या वर्षात करतात. खगोलशात्र, गणित वगैरे विषयांमधे मला गती कमी असल्याने मी अधिक उठाठेव करत बसलो नाही.
12 Oct 2009 - 10:43 pm | मिसळभोक्ता
दर वर्षी एकदा कधी तरी पौर्णिमेचा चंद्र बघायचा नसतो. हे विचारात घेतले जावे.
(असो, आमच्या अती झोपेमुळे आम्हाला अद्याप सहस्त्र सूर्य दर्शन तरी झाले आहे का, या बद्दल शंकाच आहे.)
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
12 Oct 2009 - 11:00 pm | विकास
(असो, आमच्या अती झोपेमुळे आम्हाला अद्याप सहस्त्र सूर्य दर्शन तरी झाले आहे का, या बद्दल शंकाच आहे.)
एकवेळ ते चालेल... दिवसा तार्यांचे दर्शन होत नसले म्हणजे झाले.
12 Oct 2009 - 11:07 pm | मिसळभोक्ता
प्रतिसाद ४ ओळींपेक्षा जास्त झाला, तरच दिवसा तारे दिसतात :-)
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
12 Oct 2009 - 11:10 pm | विकास
प्रतिसाद ४ ओळींपेक्षा जास्त झाला, तरच दिवसा तारे दिसतात
त्याची काळजी विकीला, तुम्हाला चिंता करायचे कारण नाही... तुम्ही, "सर्व भुते जिथे जागी, ज्ञानी योग्यास रात्र ती" असे म्हणू शकता!