आज अनेक नवीन शब्द घालून हा लेख मी मुळाक्षरांनुसार पुनर्रचित करून (in alphabetical order) पुन्हा लिहिला आहे. जे नवीन शब्द आहेत ते ठळक अक्षरात आहेत.
वाचा तर.....
--------------------------------------------------
मी जेंव्हा इंडोनेशियाला आलो तेंव्हां येथील एकंदरीत संस्कृतीवरील हिंदु धर्माची छाप व यांच्या भाषेतली संस्कृत भाषेतील शब्दांची रेलचेल पाहून थक्क झालो. आपल्या पूर्वजांनी प्रवासाच्या आजच्यासारख्या सोयी नसतानाही इतक्या दूर प्रवास करून इथे प्रथम बुद्ध धर्मावर (श्रीविजय) आधारित व त्यानंतर हिंदु धर्मावर (मोजोपाहित) आधारित साम्राज्ये स्थापली व पुढे इथल्या बहुसंख्य लोकांनी मुस्लिम धर्म स्वीकारल्यानंतरही हिंदु धर्माची छाप आजही इथे-विशेषत: मध्य व पूर्व जावा भागात-दिसून येते. आजही इथले मुस्लिम लोक रामायण-महाभारतावर आधारित नाटके, एकांकिका सादर करतात. आजही आपल्याला विष्णु (Wisnu) हे नाव असलेले मुस्लिम लोक भेटतात. घटोत्कच (गटोट) तर एकदम लोकप्रिय! अर्जुन, भीम (Bima), धर्म (Dharma), लक्ष्मण (इथे या शब्दाला एक नावाव्यतिरिक्त एक आणखीही अर्थ आहे, तो म्हणजे दर्यासारंग-Admiral!), सीता इथे सिंता म्हणून वावरते, श्री (Sri) हे नाव आजही तुफान लोकप्रिय आहे व ५-१० टक्के मुलींचे नाव श्री असते.
आता इंडोनेशियन भाषेतील संस्कृत शब्दांकडे वळू या. असे मी वाचले आहे कीं इंडोनेशियन भाषेने जवळ-जवळ २० टक्के शब्द संस्कृत भाषेतून घेतले आहेत,
आता खाली मी मला येत असलेले शब्द वापरायला/शोधायला सोपे जावे म्हणून मुळाक्षरांनुसार (alphabetical order) पुनर्रचित केले आहेत. वाचा पुढे! यापुढे आणखी शब्द आठवतील तसे घालेन व तेही ठळक अक्षरात असतील.
Acar (आचार): लोणचे
Angkasa अंकासा: अवकाश [Outer space]
Anugerah, Nugraha (अनुगरा, नुग्राहा): अनुग्रह
Arjuna (अर्जुना): अर्जुन, महाभारतातील नांव
Arti (आर्ती): अर्थ या शब्दावरून आलेल्या या शब्दाचा अर्थ तोच आहे meaning (आपा अर्तिन्या? म्हणजे What does it mean?)
Aryaduta (आर्यादूता) खाली ’Duta’ पहा. या नावाचे हॉटेल जकार्तात आहे.
Atau (आताउ): अथवा
Bagi (बागी) भागणे
Bahagia (बहागिया): 'भाग्य'वरून आलेला शब्द. पण अर्थ आहे "आनंदी"!
Bahagiawan-भाग्यवान
Bahasa (बाहासा): भाषा
Bahaya (बाहाया): भय.
Bahayangkara (बायांकारा): भयंकर या शब्दावरून आलेल्या या शब्दाचा अर्थ मात्र आहे पोलिस. आहे ना सार्थ शब्द?
Bahu (बाहू): बाहूवरून आलेल्या या शब्दाचा अर्थ मात्र खांदा!
Bangsa (बांग्सा): हा शब्द वंश या शब्दावरून आला असावा. अर्थ आहे "nation, people, race"! पण खाली दिलेले negara व negeri हे शब्दही पहा
Bapak (बापाक): बाप, वडील पण जास्त करून वडिलांसाठी आया (ayah) हा शब्द वापरला जातो. bapak जास्त करून आदरार्थी "श्रीयुत" म्हणून वापरतात.
Barat (बारात): भारत या शब्दावरून आलेल्या या शब्दाचा अर्थ आहे पश्चिम.
Basmi: (बास्मी) नायनाट करणे (उंदीर, डांस वगैरे), एकाद्या रोगाचे निर्मूलन करणे, एकादी गोष्ट जाळून भस्म करणे ’भस्म’वरून आलेला शब्द
Biaya (बिआया/बियाया): व्यय खर्च cost
Bijaksana: (बिजाक्साना) Wise, farsighted, prudent, tactful, discreet kebijaksanaaan=कबिजक्सनाआन= wisdom, prudence
Biji: Seed बीज, अंडाशय
Biksu (बिक्सू), Biksuni (बिक्सूनी): भिक्षू, बौद्ध भिक्षू, बौद्ध भिक्षीण (कीं भिक्षुईण, nun)
Bima (बीमा): महाभारतातील नांव. डॉ. वर्तक यांनी लिहिलेले भीम हा अतिशय बांधेसूद व चपळ पुरुष होता असे प्रतिपादन करणारे एक पुस्तक माझ्या वाचनात आलेले असले तरी आपल्या डोळ्यासमोर भीमाची प्रतिमा जरी एक स्थूल पुरुषाची असते. इंडोनेशियात मात्र तो एक चपळ पुरुष मानला जातो व इथल्या डेक्कन क्वीनला Bima Express म्हणतात.
Bisa: (बिसा) Poison (It also means 'can'; saya bisa lihat: I can see)
Buana (बुआना): अर्थ घर नव्हे पण जग, त्रिभुवन!
Budi (बुदी): बुद्धी या शब्दावरून आलेल्या या शब्दाचा अर्थ मात्र "विचार" असा आहे! पण बुदीमान म्हणजे मात्र बुद्धीवान (wise, prudent, sensible).
Bupati (बूपाती): "भूपती"वरून आलेला शब्द. अर्थ आहे जिल्हाधिकारी, District collector
Busana: (बुसाना): अर्थ कपडे, दागिने
Candra (चांद्रा): चंद्र. खूप पुरुषांचे नाव Candra/Condro असते.
Candrasangkala (चांद्रासांगकाला) Lunar calendar सांग हा शब्द आदरार्थी वापरतात. उदा. "सांग द्विवर्ना" हा शब्द दुरंगी राष्ट्रध्वजासाठी वापरतात.
Catur: (चातुर): चतुर? अर्थ आहे ’बुद्धिबळ’
Cempaka: (चंपका): चाफा
Cenderamata: चंदरामाता Souvenir (शब्दशः अर्थ चंद्राचे नेत्र!)
Cenderawasih: (चंदरावासी) Bird of paradise
Cerita (चरिता): 'चरित्र'वरून आलेल्या या शब्दाचा अर्थही तोच आहे. story, narrative, account of an event.
Cinta (चिंता): चिंता या शब्दावरून आलेल्या या शब्दाचा अर्थ मात्र प्रेम असा आहे. चिंता सायांग म्हणजे love and affection.
Cita (चिता): feelings
Citra (चित्रा): चित्र, image
Dada: (डाडा): बहुदा ’धड’ या शब्दावरून आला असावा. अर्थ आहे "छाती"
Desa: (देसा): आलाय देश या शब्दावरून, पण अर्थ खेडे!
Deva: (देवा) देव
Dharma (dhaarmaa): महाभारतातील नांव (शिवाय duty, obligation, service, good deed पुण्य but not exactly religion)
Dhupa: (धूपा): धूप म्हणजे अगरबत्ती!
Dosa (दोसा ): ’दोष’ वरून आलेला शब्द, पण बहासा इंडोनेशियात अर्थ आहे ’पाप-sin'
Duka: (दुका): दु:ख
Dukacita (दुकाचिता): दु:खचित्त profound sorrow
Duta: (दूता): दूत, राजदूत, ambassador
Dwi: (द्वी): द्वी. द्वीवार्ना म्हणजे त्यांचा लाल-पांढरा द्विरंगी झेंडा.
Gada: (गादा) गदा
Gajah: (गाजा): गज, हत्ती
Gapura: (गापूरा): गोपूर
Garuda (गारुडा): गरुड. गंमत म्हणजे भारताला आपल्या अधिकृत एअरलाईनचे नाव "गरुड" असे ठेवायची हिंमत झाली नाहीं, पण इंडोनेशियाच्या अधिकृत एअरलाईनचे नाव आहे Garuda Indonesian Airways!
Guna (गुना): गुण, उपयोग (आपा गुना न्या=त्याचा काय उपयोग?), गुनावान हे नाव 'तुफान' लोकप्रिय आहे!
Guru: (गुरू) तोच अर्थ!
Gatot गटोट: घटोत्कच. महाभारतातील तुफान लोकप्रिय नांव
Indra: (इंद्रा) इंद्र (हे नावही खूप लोकप्रिय आहे)
Isteri: (इस्तरी): स्त्रीवरून आलेल्या या शब्दाचा अर्थ आहे पत्नी. स्त्रीला "परंपुआन (perempuan)" असा वेगळा शब्द आहे. puan (पुआन) म्हणजे "बाईसाहेब" असा आदरार्थी शब्द
Jaya (जाया): अर्थ आहे ’की जय’! "इंडोनेशिया जाया" म्हणजे "इंडोनेशियाकी जय"! १५२७ साली पोर्तुगिजांचा पराभव करून त्यांना त्यांच्या आरमारासह "कलापा सुंडा" या बंदरामार्फत हाकलून दिल्यानंतर आमच्या शहराचे "जयाकार्ता" असे पुनर्नामकरण करण्यात आले त्याचा अपभ्रंश होऊन त्याचे जकार्ता
Jelma: (जल्मा) Incarnation/जन्म, creation, transformation, assume a form
Jelamber: (जलांबर)
Jiwa (जीवा): जीव या शब्दावरून आलेल्या या शब्दाचा अर्थ मात्र आत्मा किंवा लोकसंख्या "बरापा जीवा" म्हणजे किती (सजीव) लोक!
Kaca: (काचा): कांच
Kala: (काला) Time, Era, Period
Kelahi (कलाही) भांडण. हा शब्द 'कलह' या संस्कृत शब्दावरून आलेला आहे.
Kalpataru (काल्पातारू): कल्पतरू, अर्थ तोच
Karena: (कारना)
Karunia (कारुनिया): कारुण्य या शब्दावरून आलेल्या या शब्दाचा अर्थ मात्र ’बक्षीस, भेटवस्तू’ असा खूप वेगळा आहे!
Karyawan/wati (कार्यावान.वाती): कार्यवान/वती, कामगार
Kepala: (कपाला) कपाळ, डोकं. एकाद्या खात्याचा प्रमुख असतो kepala bagian
Kirana (किराना) किरणKota: कोटा (कोट हा संस्कृत शब्द आहे का?)
Kusuma: (कुसुमा): कुसुम, फूल
Laba: (लाबा) Profit, benefit, gain ’लाभ’वरून आलेला शब्द.
Laksamana (लाक्सामाना): लक्ष्मण पण दर्यासारंग (Admiral) या अर्थाने जास्त वापरतात.
Laksana (लाक्साना): लक्षण, पण अर्थ आहे जरासा तिरकस quality, characteristic, किंवा 'सारखा' (like, resembling)
Maha esa (महा एसा): हा शब्द बहुदा महेश वरून आलेला आहे. अर्थही सर्वश्रेष्ठ असाच आहे. साधारणपणे "अल्ला" (देव) ला तुहान यांग (जो) महा एसा म्हणतात.
Malas (मालास): Lazy, not inclined to do something 'आळस' वरून आला असावा!
Mega: (मेगा): मेघ, इंडोनेशियाच्या भूतपूर्व राष्ट्राध्यक्षेचं नांव आहे "मेगावाती सुकार्नोपुत्री"
Mentri: मंत्री
Mulia (मुलिया): मूल्य या शब्दावरून आलेल्या या शब्दाचा अर्थ मात्र आहे थोर, उच्च कुळातला nobleman थोडक्यात ’मौल्यवान’.
Nada: (नादा): Intonation, tone, note, pitch of sound/voice
Nadi (नाडी): नाडी, pulse, artery
Nama: (नामा): तोच अर्थ
Negara (नगारा): देश तामू नगारा=शाही पाहुणा (state guest)
Negarawan (नगारावान): Statesman
Negeri (नगरी): country, land, village
Neraka (नराका): नरक
Paduka: पादुका पण अर्थ आहे Excellency. साधारणपणे ’श्रीपादुका’ (His Excellency)म्हणतात.
Panca (पांचा): पंच, पाच
Paramaisuri: (परामाईसुरी): त्रैलोक्यसुंदरी
Paripurna: पारिपुर्ना (अर्थ जवळ-जवळ तोचअ आहे. 'संपूर्ण'. पण विशेषकरून राष्ट्रपती आपल्या अभिभाषणाच्यावेळी जेंव्हा लोकसभा व राज्यसभा यांच्या एकत्र सत्राला (Joint session of the House) संबोधित करतात अशावेळी हा शब्द खासकरून वापरला जातो.
Pekaja: (पकाजा) Lotus ’पंकज’वरून आलेला शब्द
Pendeta: (पंडेता): पुरोहित, भटजी.
Perdana Menteri: (परदाना): प्रधानमंत्री
Peristiwa- (परिस्तीवा) incident, phenomenon , ’परिस्थिती’वरून आलेला शब्द!
Perkara: (परकारा) matter, Lawsuit 'प्रकार'वरून आलेला शब्द.
Pertama (परतामा): प्रथम अर्थ तोच. Pertama-tama (परतामातामा)-सर्वात आधी, at the outset.
Pidana: Criminal, punishment 'पीडा'वरून आलेला शब्द.
Prambanan: (प्रंबानान) परब्रह्म. या नावाचे हिंदू देव-देवतांचे प्रसिद्ध देऊळ जोगजकार्ताजवळ आहे.
Prasaran: (प्रासारान) Introductory 'प्रस्तावना'वरून आला असावा!
Prasarana: (प्रासाराना) Preparatory Work, infrastructure
Puasa (पुआसा): उपवास. रमजान महिन्याला "बुलान पुआसा" म्हणतात
Pucat (पुचाट): (अक्षरशः) भीतीमुळे वा आजारपणामुळे म्लानता आलेला, पांढराफटक पडलेला चेहरा!
Purbakala (पुर्बाकाला): पूर्वकाल अर्थ तोच.
Purna, Purnayudha
Putra/i (पुत्रा-पुत्री): पुत्र-पुत्री. या शब्दांचा अर्थ राजपुत्र/राजकन्या असा होतो. म्हणून दुसर्यांच्या मुलांबद्दल चौकशी करताना हा शब्द आवर्जून वापरतात.
Rahasia (राहासिया): रहस्य, mystery किंवा confidential या दोन्ही अर्थाने वापरतात.
Rajah/Maharajah: अर्थ व उच्चार तोच
Raksasa (राक्सासा): राक्षस किंवा (आकाराने) प्रचंड
Rama: (रामा) राम (प्रभू रामचंद्र)
Rasa (रासा): रस या शब्दावरून आलेल्या या शब्दाचा अर्थ मात्र -फक्त चवच नाहीं तर भावनासुद्धा-रासा सायांग-प्रेमभावना! "saya rasa" म्हणजे "I feel")
Rupa (रूपा): रूप या शब्दावरून आलेल्या या शब्दाचा अर्थ मात्र सौंदर्य नव्हे तर form, shape, sort, kind! सरूपा म्हणजे एकासारखा/खी. पण रूपावान म्हणजे सुंदर, पण सुंदारी हा शब्द फक्त स्त्रियांसाठी वापरतात जणू सुंदर पुरुष नसतातच. खरं तर सुंदर दिसणारे पुरुष कमीच आहेत!
Rupiah (रुपिया): इंडोनेशियाचे चलनसुद्धा "रुपिया Rp." (not Rs)
Sahaja: (साहाजा) Simple, natural, on purpose 'सहज'वरून आलेला शब्द. आपल्या 'सहजरावां'ना आवडेल!
Samudera: (सामुदरा) Ocean, Sea,
Sangka (सांका): शंका, suspicion (Tersangka: suspect, Prasangka: Prejudice)
Santai: (सांताई) Relaxed 'शांत'वरून आलेला शब्द.
Sastra (सास्त्रा): शास्त्र, अर्थ आहे books, literature
Sastrawan/Sastrawati (सास्त्रावान/सास्त्रावाती): Man/woman of letters शास्त्रीजी किंवा शास्त्रीणबाई
Saudara/ri (सौदारा/री): सहोदर/री, पण अर्थ नातेवाईक. पण सौदारा सकांडुंग: एका गर्भाशयाचे म्हणजेच सख्खा भाऊ/बहीण (कांडुंग: गर्भाशय)
Sederhana: (सदरहाना) Simple, plain, unpretentious या नावाची उडपी टाईपच्या हॉटेल्सची चेन आहे. ही हॉटेले 'साधारण'च असतात.
Sedia: (सडिया) तय्यार! Ready साधारणपणे भेळपुरी प्रकाराच्या खाण्याच्या गाड्यांवर हा शब्द हायला मिळतो. ’सध्या’वरून आलेला असणार
Segera (सगरा): शीघ्र अर्थ तोच
Sempurna (संपुर्ना): संपूर्ण, पूर्ण अर्थ तोच.
Sendi (संदी): सांधे, hinge.
Senggama (संगामा): संगम या शब्दावरून आलेला हा शब्द मात्र फक्त शरीरसंगमासाठी किंवा संभोग या अर्थानेच वापरतात.
Sentosa (संतोसा): संतोषवरून आलेल्या या शब्दाचा अर्थ मात्र आहे शांती, peaceful, tranquil. सिंगापूरचे संतोसा बेट कांहींनी पाहिले असेल!
Serapah (सरापा): श्राप, शाप (तोच अर्थ)
Serasi (सरासी): सराशी एका राशीचे. Harmonious, matching, compatible.
Setia (सतिया): सत्य पण अर्थ मात्र loyal. Setia kawan = निष्ठावान मित्र, setiabudi (सतियाबुदी, सत्यबुद्धी)=निष्ठायुक्त विचार असणारा! budi म्हणजे बुद्धी नसून "विचार".
Singga: (सिंगा) सिंह
Sinta (सिंता): (रामाची) सीता
Sisa (सीसा): शेष, शिल्लक),
Surakarta (सुराकार्ताSolo): जावा बेटाची सांस्कृतिक राजधानी सोलो या शहराचे नाव सुराकार्ता (देवांचे शहर) याचा अपभ्रंश आहे.
Sopan (सोपान): सोपान सज्जन, well-behaved, well-mannered.
Sri (or Seri): श्री. अर्थ आहे "राणीसाहेबा" असे संबोधन! (खाली पहा पादुका, स्रीपादुका) Honorific royal title, shining splendour. ५-१० टक्के मुलींचे नाव श्री असते.
Srikandi (स्रीकांडी): कदाचित् शिखंडीवरून आलेला असेल, कारण अर्जुनाची बायको व नायिका (heroine) अर्थ दोन अर्थ आहेत.
Suami (सुआमी): स्वामी, नवरा,
Subroto (सुब्रोतो): सुव्रत. हे नांवही खूप लोकप्रिय आहे.
Suci, Buku Suci(सुची): शुची. कुराण या पवित्र ग्रंथाला "बुकु सुचि" (Holy book) म्हणतात.
Suka (सुका) सुख या शब्दावरून आलेल्या या शब्दाचा अर्थ सुख असा तर आहेच पण आवडणे असाही आहे. पण सुकाआन (sukaan) म्हणजे प्रिये, प्रियतमे असा आहे (sweetheart, darling)!
Surga (सुर्गा): स्वर्ग
Surgawi (सुर्गावी): स्वर्गीय
Surga dunia (सुर्गादुनिया): भूलोकीचा स्वर्ग
Susila/lo (सुसीला/लो): सुशील अर्थ तोच! ईडोनेशियाच्या सध्याच्या राष्ट्राध्यक्षांचे नाव आहे सुसीलो बंबांग युधोयोनो,म्हणजे तीनातले दोन शब्द संस्कृत!
Sutra (सूत्रा): सूत्र, पण अर्थ आहे रेशीम (silk)
Suwarna (सुवार्ना): सुवर्ण, अर्थ तोच.
Tapa (तापा): तप, अर्थ तोच. (Bertapa=तपश्चर्या करणे)
Teruna, taruni (तरुना, तारुनी): तरुण-तरुणी, पण खास करून लष्करी 'कॅडेटस'साठी वापरत्तत. आपण जवान म्हणतो तसेच
Telaga (तलागा): तलाव (कदाचित तमिळ भाषेवरून)
Tembaga (तंबागा): तांबे
Tetapi/Tapi (ततापी/तापी): अर्थ तोच! तथापी
Tirta: (तिर्ता) पाणी
Tirta Amerta: तिर्ता अमर्ता ('अमृत'वरून आलेला शब्द)
Tirta Kencana: (तिर्ता कंचाना) सुवर्णजल
Tri (त्री): त्रि. इथे चक्क त्रिसाक्ती-त्रिशक्ति नावाचे विद्यापीठ आहे व ९८ साली सुहार्तोसाहेबांना खाली उतरवायला इथल्या घटनाच कारणीभूत झाल्या.
Ujar (उजार): उच्चारणे (To state, to say)
Umpama (उंपामा): उपमा
Upaya (उपाया): उपाय या शब्दावरून आलेल्या या शब्दाचा अर्थ मात्र प्रयत्न, साधने असा आहे. "याला काय उपाय (solution) असा नाहीं.
Usia (उसिया): आयुष्य या शब्दावरून आलेल्या या शब्दाचा अर्थ मात्र वय. tutup usiya म्हणजे आयुष्य बंद करणे म्हणजे मृत्यू.
Wahana: (वाहाना) Vehicle, Vehicle for conveying thoughts ('वाहन'वरून आलेला शब्द)
Wanita (वानिता): वनिता, स्त्री.
Warna (वार्ना): वर्ण, रंग. Pancawarna: पंचरंगी, पंचवर्णी
Wibava, Wibowo (विबावा, विबोवो): वैभववरून आलेला असावा, पण अर्थ मात्र Authority, power.
Wibisono (विबीसोनो): (बिभीषण माणसाचे नाव असते)
Wicoksono (विचोक्सोनो): माणसाचे नाव असते.
Widya (विदिया): विद्या
Widyakarya (विदियाकार्या): विद्याकार्य, University-level work study
Widyawisata (विदियाविसाता): विद्याविसाता, Study tour
Wijaya, Widjaja, Widjojo (विजाया, विजोयो): विजय. बर्याचदा एकाद्या नावाचे शेपूट म्हणून येते. Wijojo Nitisastro (नीतिशास्त्र) was a very eminent economist of Indonesia. (इथले धनंजयराव गाडगीळ!)
Wira (वीरा): वीर. अर्थ तोच.
Wisnu: विष्णू. देवाचे नाव. या नावाची वयस्क मुस्लिम मंडळीही भेटतात.
Yudha (युधा): युद्ध, अर्थ तोच war. महाभारताला इथे "भारातायुधा" असेही म्हणतात. "पुर्नायुधा" म्हणजे निवृत्त सेनाधिकारी/सैनिक, veteran
Samudera (समुदरा): समुद्र!
उर्दू शब्दही खूप आहेत, कदाचित अरबी किंवा फारसी शब्दावरून आले असतील: प्याला (पियाला-चषक पियाला दुनिया-World Cup), मेजा टेबल, कुर्सी-खुर्ची, पण यावर एक वेगळा लेखच होईल.
प्रतिक्रिया
7 Oct 2009 - 2:41 pm | सुनील
रोचक माहिती.
एक शंका. इंडोनेशियाने पोर्तुगिझांना हाकलले की डचांना?
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
10 Oct 2009 - 12:32 pm | सुधीर काळे
सुंडा रा़जे जे जकार्तावर राज्य करत होते त्यांनी पोर्तुगिजांशी मध्य जावामधील दमाकच्या सुलतानापासून संरक्षण मिळावे म्हणून तह केला व १५२२ साली त्यांना जकार्ताला (त्यावेळी शहराचे नाव सुंडा कलापा असे होते व या नावाचा भाग आजही जकार्तात आहे) बंदर बांधायला परवानगी दिली. पण दमाकच्या फाताहिल्लाने १५२७ साली पोर्तुगिजांचा पराभव करून त्यांना त्यांच्या आरमारासह हाकलून दिले. त्या विजयानंतर सुंडा कलापाचे जायाकार्ता असे पुनर्नामीकरण झाले व त्याचा अपभ्रंश होऊन ते जकार्ता झाले.
देवांचे गाव (सुर+कार्ता) म्हणून नाव दिले गेलेले सुराकार्ता हे शहर आज सोलो म्हणून ओळखले जाते व जावा संस्कृतीची राजधानी समजले जाते.
डच लोक इ.स.१६०० नंतर आले.
सुधीर
------------------------
देवा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!
13 Oct 2009 - 9:54 am | आनंद घारे
डचांच्या कारकीर्दीत जकार्ताचे नाव बटेव्हिया असे होते असे शाळेतल्या भूगोलाच्या धड्यात वाचल्याचे आठवते.
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://anandghan.blogspot.com/
7 Oct 2009 - 2:49 pm | सखाराम_गटणे™
सुंदर लेख
7 Oct 2009 - 2:55 pm | पर्नल नेने मराठे
छान ले़ख :D
चुचु
7 Oct 2009 - 2:59 pm | अवलिया
मस्त माहिती मिळाली.
काळे साहेब मनापासुन धन्यवाद !
फार छान वाटले लेख वाचुन ! :)
अवांतर - भीत भीत लिहायचे नाही हो.. बिनधास्त लिहायचे. काय होईल जास्तीत जास्त ? लोक टिका करतील किंवा संपादक उडवतील. येवढेच ना? फासावर तर नाही ना चढवणार ? हाणातिच्यायला ! :)
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
7 Oct 2009 - 3:43 pm | प्रभो
मस्त माहिती मिळाली.
काळेकाका मनापासुन धन्यवाद !
फार छान वाटले लेख वाचुन !
अवांतर - भीत भीत लिहायचे नाही हो.. बिनधास्त लिहायचे.आम्ही नाही का लिहित...ईकडे आल्यापासून तर लिहायला लागलोय आम्ही... :)
7 Oct 2009 - 5:01 pm | विशाल कुलकर्णी
असेच म्हणतो. खुपच रोचक आणि माहितीपुर्ण लेख ! धन्स..
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
8 Oct 2009 - 11:56 am | शक्तिमान
विडंब'णा'ची भिती वाटत असेल..
=)) =)) =))
7 Oct 2009 - 3:00 pm | सहज
>आपण बोअर नाही झालात हीच आशा
अहो साहेब!! अजुन येउ दे. :-)
7 Oct 2009 - 3:13 pm | JAGOMOHANPYARE
सुण्दरा लेका आहा... असाचा साताता लिकाणा करावा.
***************************
प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l
प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll
7 Oct 2009 - 3:16 pm | बिपिन कार्यकर्ते
माहिती चांगली आहे. पण उरकल्यासारखे वाटले ब्वॉ... एवढ्या मसाल्यावर २-३ लेख सहज क्रमशः करून टाकता आले असते. :D
नानाच्या अवांतराशी सहमत. लिहिताना घाबरू नका. पुढे काय करायचं ते करायला पब्लिक (आणि संपादक ;) ) समर्थ आहेत.
बिपिन कार्यकर्ते
7 Oct 2009 - 3:59 pm | सुधीर काळे
बिपिन-जी,
खरं सांगायचं तर हा लेख मी अजीबात आवरता घेतलेला नाहीं, असा विचारही माझ्या मनात आला नाहीं. उलट मला तर वाटलं कीं लोक या लेखाच्या या लांबीनेच कंटाळतील. 'मिपा'वरील वाचकांच्या आवडींचा मला अद्यापही अंदाजच आलेला नाहीं, त्यामुळे लिहितांना कुणाला आदर्श वाचक (model reader) म्हणून समोर ठेवायचं ते कळत नाहीं. (पुढं काय करायचं हे ठरवायला "पब्लिक" जरा जास्तच "समर्थ" आहे व म्हणूनच लिहितांना जरा वैचारिक गोंधळ होतो हे मात्र खरे.)
जे लोकांना आवडत नाहीं, ज्यामुळं एकाद्याला झोप येईल असे लेख लिहितांना जरा "भ्या" वाटतं व म्हणूनच मी कांहींसा भीत-भीतच लिहितो!
दुसरं म्हणजे उगीच लेख लांबवायलाही मला आवडत नाहीं. पण येणार्या प्रतिक्रियांवरून मी एक पूरक लेख मात्र नक्की लिहीन ज्यात या शब्दांनी बनलेली वाक्यंही लिहीन, कसा वापर करतात तेही लिहीन, पण वाचकांची एक छ्बी (profile) जरा दिसू दे डोळ्यासमोर. पण आपले म्हणणे मला समजले आहे.
आता इथल्या लोकांची झुंड (exodus) दर ईदला आपापल्या गांवी आपापल्या ज्येष्ठ नातेवाइकांना भटण्यासाठी जाते त्यावरही मी एक लेख लिहिणार आहे. अनेक हाल-अपेष्टा सहन करून त्रास घेऊन इदुलफित्रीला (ईद-उल-फित्र) घरी जाण्यासाठी लोक कसे (अक्षरशः) पछाडलेले किंवा ध्यास घेऊन असतात ते पहाण्यासारखे व अनुभवण्यासारखे असते.
असो. आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार.
सुधीर
------------------------
देवा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!
7 Oct 2009 - 5:48 pm | आनंद घारे
लिहितांना कुणाला आदर्श वाचक (model reader) म्हणून समोर ठेवायचं ते कळत नाहीं.
माझेही असेच होते, कदाचित इंजिनिअर असण्यामुळे असेल. आपण लिहिलेले डॉक्युमेंट वाचणार्या व्यक्तीची गरज आणि कुवत लक्षात घेऊन त्यानुसार तांत्रिक विषयावर लिहिण्याची किंवा बोलण्याची आपल्याला सवय असते. मॉडेल रीडर म्हणण्यापेक्षा टार्गेट रीडर आपल्या डोळ्यासमोर असतो.
तुझ्या लेखात खूप माहिती आहे. ती सूत्रबद्धपणे मांडता आली असती तर लेखाच्या लांबीची चिंता वाटली नसती. ज्या क्रमाने हे शब्द दिले आहेत त्यातले सूत्र कदाचित माझ्या ध्यानात आले नसेल.
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://anandghan.blogspot.com/
7 Oct 2009 - 7:49 pm | विंजिनेर
काळे काका, स्वान्त सुखाय लिहिलेतर असे प्रश्न येऊ नयेत... राहता राहिली वाचकांची आकलन शक्ती. मिपावर आजमितीस सुमारे ६००० सभासद आहेत. येव्ह्ढ्या मोठ्या समुदायात तुमचे लेखन/विषय पाहून-पाहून तुमचा एक स्वतःचाच वाचक वर्ग तयार होऊ शकेल. राग मानू नका पण हे माझे प्रामाणिक मत आहे.
असो. मुख्य लेखावर निवांत प्रतिक्रिया देण्यासाठी जागा राखून ठेवत आहे.
---
'विंजिनेर'
8 Oct 2009 - 10:50 am | विनायक प्रभू
असेच म्हणतो.
लोक काय म्हणतील ह्याचा विचार करु नका.
ते म्हणण्या साठीच असतात.
7 Oct 2009 - 3:18 pm | गणपा
काळे काका,
मस्त लेख, अजुन वाचायला आवडेल.
7 Oct 2009 - 3:26 pm | चिरोटा
चांगली माहिती.
भेंडी
क्ष्^न + य्^न = झ्^न
7 Oct 2009 - 4:01 pm | स्वाती२
छान लेख. अजून लिहा. वाचायला नक्कीच आवडेल.
7 Oct 2009 - 4:07 pm | प्रमोद देव
काळेसाहेब,लेख आवडला.
अतिशय माहितीप्रद असा हा लेख आहे आणि संदर्भ म्हणूनही ह्यातल्या माहितीचा नक्कीच उपयोग होईल.
बिनधास्त लिहा. मिपावर 'डरना मना है!' :)
विरोधकांनो सावधान. ’चाल’ अस्त्र फेकून मारलं जाईल. ;)
7 Oct 2009 - 4:24 pm | केशवसुमार
अपा खबर?
बागुस?
छान माहिती.. १९९६ च्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या.. मी 'कामुस' घेउन हाच उद्योग करायचो..
भासा मधे डब केलेले हिंदी सिनेमे आणि रामायणावचे टिव्ही प्रोग्राम आजून केबल वर दाखवतात का? मला जाम मजा वाटायची ते प्रोग्राम बघताना..अब्दूल रहमन अॅज राम वगैरे टायटल वाचताना..
(एकेकाळी थोडी भासा समजणारा)केशवसुमार
8 Oct 2009 - 8:55 am | सुधीर काळे
खरंच! (डबिंगमुळे) अमिताभला अस्खलित भाषा बोलतांना ऐकून मजा वाटते खरी! त्यात गुलशन ग्रोवरसारखा खलनायक "दम मारता"ना ऐकला/पाहिला की तर हसूच येत!
इथे हिंदी सिनेमे खूप लोकप्रिय आहेत. पूर्वी तर दर आठवड्याला सर्व वाहिन्या मिळून जवळ-जवळ ३५ हिंदी चित्रपट दाखवत असत. आताही बरेच दाखवतात, नक्की आकडा माहीत नाहीं. शहारुख खान ("शारुक") व त्याचे "कुची-कुची होता हे" हे गाणं तर महा लोकप्रिय! एका समारंभात मी बासरीवर ते गाणं वाजवलं तर पहिली ओळ वाजवल्याबरोबर सर्वांनी सभागृह डोक्यावर घेतलं.
"कुची-कुची होता हे" चा अर्थ अगदी माझ्या सारथ्यापासून माझ्या साहेबापर्यंत सगळे आवर्जून विचारतात.
परवा एका समारंभात ज्योतिरादित्य शिंदे (सिंदिया) इथे आले होते, त्यावेळी त्या देखण्या मंत्र्याला उद्देशून इथले एक मंत्री त्या समारंभाच्या आयोजकाला म्हणाले, "तुमचे मंत्रीसाहेब असे शहारुख खान सारखे दिसतात हे मला आधी का नाहीं सांगितले? मी जरा मेक-अप करून आलो असतो".
सर्वांनी टाळ्या वाजवून मनापासून दाद दिली!
इमिग्रशन पार करताना एकादा मिस्कील अधिकारी पासपोर्टवर ठापा मारताना, "तोलोंग सांपेकान सालाम साया कपाडा पा शारुक (कृपया शहारुख खानला आमचा सलाम सांगा/पोचवा)" अशी पुस्तीही जोडतो, जणू शहारुख खान माझा जिगरी दोस्त व शेजारीच! पण त्याच्यावर सार्या इंडोनेशियाचे प्रेम आहे.
'पा शारुक' म्हणजे 'बापा (श्रीयुत) शारुक'!
सुधीर
------------------------
देवा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!
7 Oct 2009 - 4:39 pm | विजुभाऊ
बहाशा इंडोनेशिया सारखीच बहाशा मलेशिया.
बरेचसे शब्द तसेच
काही शब्द वाचून गम्मत वाटते.
उदा: नर्स साठी शब्द आहे जरुरवात ( जरुरत)
डॉक्टर साठी शब्द आहे दुकान
काय खबरबात असे विचारायचे असेल तर विचारतात "आपा खबर"
विषय संपवायचा असेल तर शब्द असेल तुतोप
मी सध्यातरी इथेच तुतोपतो. ;)
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
7 Oct 2009 - 4:47 pm | सुधीर काळे
बहासा मलेशिया व बहासा इंडोनेशियामधील ९९.९ टक्के शब्द सारखे आहेत. फक्त कांहीं शब्द एकीकडे जास्त वापरतात तर दुसरीकडे कमी. उदा. विष. विषाला बिसा हा संस्कृत आधारित शब्द आहे, पण त्याचा अर्थ can असाही आहे. राचुन म्हणजेही विष. दोन्ही शब्द दोन्ही कामूसमध्ये आहेत, पण मलेशियात बीसा हा शब्द विषासाठी वापरतात तर राचुन हा शब्द आम्ही वापरतो. असे अनेक शब्द आहेत.
नर्स-जुरू रावात (जुरू म्हणजे expert व रावात म्हणजे शुश्रूषा)
डॉक्टरला शब्द आहे दुकुन, पण हा म्हणजे मांत्रिक टाईप डॉक्टर, खरा नव्हे.
आपा काबार मात्र बरोबर (खबर नव्हे)
तुतुप म्हणजे बंद करणे. माझ्या लेखात मी तुतुप उसिया म्हणजे वय बंद करणे म्हणजेच मृत्यू असे लिहिले आहे.
सुधीर
------------------------
देवा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!
8 Oct 2009 - 9:35 am | JAGOMOHANPYARE
डॉक्टर साठी शब्द आहे दुकान
:) ( आम्ही मित्रमंडळी एकमेकांच्या दवाखान्याना दुकानच म्हणतो... पण साक्षात डॉक्टरलाच दुकान शब्द ... :) )
***************************
प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l
प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll
7 Oct 2009 - 5:17 pm | धनंजय
धन्यवाद. मजा आली.
7 Oct 2009 - 6:28 pm | गोगट्यांचा समीर
लेख आवडला..
7 Oct 2009 - 7:23 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अजून लिहा !
वरील काही सारख्या शब्दांवरुन 'वेगवेगळ्या भाषा या कोणत्यातरी एका भाषेपासून निर्माण झाल्या असाव्यात' असे जे म्हणतात त्यांचे म्हणने पटायला लागते.
-दिलीप बिरुटे
7 Oct 2009 - 7:35 pm | भाग्यश्री कुलकर्णी
बरीच नवी माहिती मिळाली.अजुन वाचायला आवडेल.
7 Oct 2009 - 8:01 pm | धमाल मुलगा
इतकी साम्यं? मजाय की :)
भारी चाललंय. काळेकाका, येऊ द्या आणखी असाच बहासा-मराठी शब्दकोश..
हसत खेळत बहासा :)
बाकी, आवडतंय की नाही वगैरे फंदात पडु नका हो..ज्याला आवडेल तो वाचेलच ना? आता 'You can not please everyone' ह्या उक्तीप्रमाणं सगळंच सगळ्यांना आवडेल किंवा नावडेल असं थोडंच आहे? :)
पु.ले.शु. (पुढील लेखनाला शुभेच्छा)
-ध
8 Oct 2009 - 12:57 am | संदीप चित्रे
पहिल्याच आंतरराष्ट्रीय विमान प्रवासाच्या वेळी 'गरूडा' एअरवेजचे लोक पाहिले होते आणि त्या विमान कंपनीचं नावही आवडलं होतं.
तुम्ही लिहा हो काळेकाका ! लोकांनी वाचल्यावर त्यांना आवडेल / नाही आवडेल हा त्यांचा प्रश्न !!
8 Oct 2009 - 1:05 am | नंदन
लेख, बरीच नवीन माहिती मिळाली. तुम्ही अधिकही लिहावे याबद्दल वरील प्रतिक्रियांशी पूर्ण सहमत आहे.
मलेशियातले पुत्रजया, बँकॉकचा सुवर्णभूमी एअरपोर्ट, तिथल्या पंतप्रधानांचे थाकसिन (दक्षिण) हे नाव इ. गोष्टी आठवल्या. वेगळ्या भाषेतला असा संस्कृत शब्द सापडला की छान वाटतं. माझ्या दोन थाई मित्रांची नावं सुपारोक आणि सोंगक्रान अशी आहेत. सुदैवाने त्यांना त्यांच्या मूळ नावाचा अर्थ माहीत होता, त्यावरून ती सुप्रहरिक (चांगल्या मुहुर्तावर जन्मलेला) आणि संक्रांत (थाई नववर्ष) यावरून आलेली आहेत हा तर्क बांधता आला.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
8 Oct 2009 - 5:41 am | सुधीर काळे
सध्याच्या थायलंडच्या राजाचे नाव "भूमिपाल अतुल्यतेज" (भूमिबोल अदुल्यतेज-Bhumibol Adulyadej) असे आहे हे किती लोकांच्या लक्षात आले आहे? अगदी निखळ गीर्वाणवाणी, नाहीं का?
मला एका सेमिनारमध्ये एक कंचाना नावाची सरकारी नोकरी करणारी महिला भेटली होती आणि तिलाही कंचाना म्हणजे कांचन, सुवर्ण हा अर्थ माहीत होता!
सुधीर
------------------------
देवा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!
8 Oct 2009 - 6:38 am | सुनील
काही वर्षांपूर्वी सिंगापूरात असताना वाचलेली पाटी आठवली. रस्त्याच्या कडेला खणलेले होते आणि अपघात होऊ नये म्हणून एक सुचना देणारी पाटी लावली होती. त्यात इंग्रजीत DANGER असे वाचता आले. तसेच मलय भाषेत (जी रोमन लिपीत लिहिली जाते) त्यात BHAYA असे वाचलेले आठवते. बाकी तामिळ आणि मँडरीन काही वाचता आले नाही!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
8 Oct 2009 - 8:17 am | सुधीर काळे
व्युत्पत्ती "भय" याच संस्कृत शब्दापासून, पण भाषा मलेशिया/इंडोनेशियामध्ये लिहितात "BAHAYA". बहुतेक लिहिणार्याने स्पेलिंगची चूक केली असावी.
सुधीर
------------------------
देवा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!
8 Oct 2009 - 7:16 am | वैशाली हसमनीस
आपला माहितीपूर्ण लेख फारच आवडला.मीही सध्या मलेशियात असल्यामुळे बहासा भाषेचा अभ्यास करीत आहे.संस्कृत आणि त्या भाषेतबरेच साम्य आहे.येथेही हिंदू संस्कृति नांदत होती त्याचाच हा परिणाम.
8 Oct 2009 - 9:01 am | सुधीर काळे
मलेशियात कुठे असता आपण? मी कांहीं महिने "सुंगाई पतानी" येथे रहात होतो व "परवाजा स्टील संदिरियान बरहद"मध्ये काम केले म्हणून जरा माहिती आहे तिथली.
तसेच माझ्या सख्ख्या आतेबहिणीची मुलगी "क्लांग" या शहरात बर्याच वर्षांपासून डॉक्टर म्हणून प्रॅक्टीस करते.
सुधीर
------------------------
देवा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!
8 Oct 2009 - 9:18 am | प्रकाश घाटपांडे
हॅहॅहॅ काळे काका आमी बी भीत भीतच वाचला. दृष्टीदोषामुळे आम्ही नीर्वाणवाणी अस काहीस वाचल. म्हन्ल काळे काकानी धप कन नीर्वानीची भाषा काल्ढी ब्वॉ. काय झाल काय अस मिपावर? मंग आमी नीट वाचल तव्हा मंग समाजल हे गीरवानवानी म्हजी संक्रुताबद्द्ल बोलत्यात.
त्ये पु ना ओकांचे 'ताजमहल' नव्हे 'तेजोमहल' मदी बी संक्रुताचा आदार घेतलाय!बाकी तुमच्या शब्दान्नी यकदम मज्जा आन्ली ब्वॉ!
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
8 Oct 2009 - 10:47 am | सुधीर काळे
खरं तर आता "लागले नेत्र रे पैलतिरी" व्हायची व "निरवा-निरवी"ची भाषा करायची आमची वेळ केंव्हाच होऊन गेली आहे! पण अजून तोंडातून नाही निघत हो!!
अजून या मर्त्यलोकाची ओढही कमी झालेली नाहींय! मग निरवा-निरव कशी सुरू करणार?
अभी टाईम है उसके लिये.....|
सुधीर
------------------------
देवा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!
9 Oct 2009 - 8:28 am | विकास
दृष्टीदोषामुळे आम्ही नीर्वाणवाणी अस काहीस वाचल.
मोक्षाच्या आहारी गेल्याचा हा परीणाम आहे. ;)
9 Oct 2009 - 8:36 am | सुधीर काळे
वाssssssव! क्या बात है!
सुधीर
------------------------
देवा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!
8 Oct 2009 - 11:23 pm | सुधीर काळे
एक छान शब्द राहिलाच. पंतप्रधानाला इंडोनेशियन भाषेत चक्क "परदाना मंत्री" perdana mentri म्हणतात, मंत्र्यांना मंत्री हाच शब्द आहे!
नगरी म्हणजे देश! लुआर नगरी म्हणजे परदेश!
सुधीर
------------------------
देवा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!
9 Oct 2009 - 12:37 am | मिसळभोक्ता
परदाना मंत्री, म्हणजे इतरांनी पुरवलेल्या दाण्यांवर जगणारा, असा अर्थ आमच्यात होतो.
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
9 Oct 2009 - 7:50 am | सुधीर काळे
दानेदानेपे लिख्खा है खानेवालेका नाम? वाह! क्या बात है!
आज आणखी कांहीं नवीन शब्दांची भर घालतोय!
Bahagia बहागिया-'भाग्य'वरून आलेला शब्द (आनंदी)
Bahagiawan-भाग्यवान
Surga-सुर्गा-स्वर्ग
Surgawi-स्वर्गीय
Surga dunia-भूलोकीचा स्वर्ग
Neraka-नराका-नरक
Cita-चिता-feelings, dukacita-दुकाचिता-profound sorrow
Citra-citraa-image
Arti-अर्ती-meaning (आपा अर्तिन्या? म्हणजे What does it mean?)
Teruna, taaruni (तरुना, तारुनी): तरुण-तरुणी, पण खास करून लष्करी 'कॅडेटस'साठी वापरत्तत.
Cerita-चरिता-story, narrative, account of an event ('चरित्र'वरून आलेला शब्द)
आमचे चलनसुद्धा "रुपिया" (Rupiah) हेच आहे!
------------------------
आज एक व्यंगचित्र फळ्यावर चढवले आहे.
देवा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!
13 Oct 2009 - 11:23 pm | मिसळभोक्ता
मुळात मलेशिया आणि इंडोनेशिया हीच नावे "मलाशय" आणि "इंधनाशय" वरून आलेली असल्याने, तिथल्या भाषांत भारतीय शब्द असणे क्रमप्राप्त आहे.
(आता थायलंड कशावरून आले, ते विचारू नका.)
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
14 Oct 2009 - 8:36 am | सुधीर काळे
इथल्या सरकारला कळलं तर व्हिसा नाकारतील बरं का! अर्थात अमेरिकन नागरिक असल्यास ही अडचण येणार नाहीं, पण आपण ज्या हॉटेलात उतराल ते हॉटेल नूरदिन एम. टॉपचे साथीदार उडवतील हं! जरा संभालके!
सुधीर
------------------------
देवा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!
9 Oct 2009 - 8:30 am | विकास
लेख एकदम आवडला. यातील काही शब्दांबाबत कायम ऐकले होते (म्हणजे ते इंडोनेशियात वापरतात असे!) पण इतके सविस्तर आजच समजले.
बाकी धर्म आणि संस्कृती इतक्या विभिन्न असूनही एकत्र सहजतेने राहू शकतात तर आपल्याकडे घोडं कुठे पेंड खाते?
9 Oct 2009 - 8:46 am | सुधीर काळे
विकास-जी,
अगदी खरं आहे आपलं म्हणणं. मी सुरबायाला काम करत असताना माझ्या एका बालीच्या हिंदू सहकारिणीने (नाव होते 'श्री') एका बुयुंग नावाच्या मुस्लिम मुलाशी लग्न केले होते. तिच्या घरी आम्ही ३-४ वेळेला गेलो होतो व तिच्याकडे तोवेळपर्यंत हिंदू "देवघर" होते!
दुसर्या एका ख्रिश्चन सहकार्याने एका मुस्लिम मुलीशी लग्न केले होते, पण त्यांच्या घरी मी इदुलफित्री व नाताळ अशा दोन्ही सणांना गेलेलो आहे.
पण अलीकडे जर आंतरजातीय विवाह केला तर दोघांपैकी एकाने दुसर्याचा धर्म स्वीकारला पाहिजे असा कायदा झाला आहे.
८९ टक्के मुस्लिम लोकसंख्या असलेल्या या देशात secularism म्हणजे काय व कसे असले पाहिजे याचे लोभसवाणे दृश्य पहायला मिळते. शांतीपूर्ण सहजीवन (peaceful co-existence) याचा खरा अर्थ इथे कळतो!
सुधीर
------------------------
देवा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!
10 Oct 2009 - 12:53 pm | ऋषिकेश
छान माहिती.
पूर्वरंग मधे तिथे पश्चिमेला "बारत"म्हणतात ते दिलंय असं आठवतं. जिथे एक दिशाच आपला देश आहे तेथील भाषा आपल्या सारखीच बघुन नवल ते काय वाटावे?
लेख आवडला.
ऋषिकेश
------------------
10 Oct 2009 - 2:00 pm | सुधीर काळे
धन्यवाद ऋषिकेश-जी. असे अनेक सुखद धक्के मला लागतच असतात. बियाया (खर्च) हा शब्द 'व्यय'पासून आला आहे हे जेंव्हा लक्षात आले तेंव्हा शरीरावरचे केस उभे राहिले होते तसेच आज झाले.
खरंच! मला हे लक्षात आलंच नव्हतं. त्याचा उच्चार बरात नाहीं "बारात" असा करतात म्हणजे आणखीनच जवळ आहे तो शब्द! नक्कीच 'भारात'चा अपभ्रंश असावा, कारण भारत आहेच इंडोनेशियाच्या पश्चिमेला!
काय चमत्कार आहे या आपल्या गीर्वाणवाणीचा! अभिमानास्पद आहे ही भाषा!
सुधीर
------------------------
देवा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!
12 Oct 2009 - 10:10 am | सुधीर काळे
उत्तर दिशेला.....होय, उतारा (utara) हा शब्द आहे. पण पूर्व (तिमूर) व सलातान (दक्षिण) या शब्दांची व्युत्पत्ती अजून कळली नाहीय!
शिवाय बाहू (bahu) म्हणजे खांदा!
सुधीर
------------------------
देवा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!
12 Oct 2009 - 10:26 am | नंदन
जसा पश्चिमेला भारत असल्याने 'बारात/बारत' आले तसेच पूर्वेचे (ईस्ट तिमोरमुळे) नाव पडले असल्याचे पूर्वरंगमध्ये वाचल्याचे आठवते.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
12 Oct 2009 - 1:44 pm | सुधीर काळे
नंदन-जी,
मला हे नव्हतं माहीत. धन्यवाद!
चिंता या शब्दाबद्दल खाली लिहिलेलं वाचून तुम्हाला खूप हसू येईल, पण संस्कृतमधील चिंता ('आयसीआयसीआय'च्या जाहिरातीतला कायम 'मनी' (पैसे)च्या चिंतेत असलेला "चिंतामणी" आठवतोय?) या शब्दाला भाषा इंडोनेशियामधे वेगळाच अर्थ आहे आणि तो म्हणजे "प्रेम"! Cinta sayaanang (चिंता सायांग) म्हणजे love and affection. मलेशियात तर चिंतासायांग असे नाव असलेली बरीच हॉटेल्स आहेत. वैशालीताईंनी हसमनीसांनी पाहिली असतील!
पण चिंता (प्रेम) आणि चिंता (काळजी) यांच्यात तशी खूपच जवळीक आहे, नाहीं का?
सुधीर
------------------------
देवा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!
13 Oct 2009 - 4:50 pm | सुधीर काळे
इथे देवाला "तुहान यांग महा एसा" (Tuhan yang maha esa) म्हणजेच "देव जो सर्वश्रेष्ठ" म्हणतात (यांग म्हणजे 'जो'). महा एसा हा शब्द 'महेश'वरून आला आहे असे मला वाटते. महेशचा अर्थ आपणही सर्वश्रेष्ठ असाच करतो.
वीरा Wira हा शब्द आपल्या 'वीर'वरून आलेला आहे. प्रोटॉन या मलेशियन गाडीचे "वीरा" या नावाचे मॉडेलपण आहे (होते तरी). वैशालीताई हसमनीस खात्रीने सांगू शकतील.
चंद्र (चांद्रा-Candra) हे तर सर्रास वापरातले नाव आहे.
सुधीर
------------------------
देवा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!
13 Oct 2009 - 4:51 pm | सुधीर काळे
इथे देवाला "तुहान यांग महा एसा" (Tuhan yang maha esa) म्हणजेच "देव जो सर्वश्रेष्ठ" म्हणतात (यांग म्हणजे 'जो'). महा एसा हा शब्द 'महेश'वरून आला आहे असे मला वाटते. महेशचा अर्थ आपणही सर्वश्रेष्ठ असाच करतो.
वीरा Wira हा शब्द आपल्या 'वीर'वरून आलेला आहे. प्रोटॉन या मलेशियन गाडीचे "वीरा" या नावाचे मॉडेलपण आहे (होते तरी). वैशालीताई हसमनीस खात्रीने सांगू शकतील.
चंद्र (चांद्रा-Candra) हे तर सर्रास वापरातले नाव आहे.
सुधीर
------------------------
देवा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!
20 Oct 2009 - 10:55 pm | सुधीर काळे
अगरबत्तीला काय म्हणतात? अगदी धूपच (धूपा-dhupa)!
------------------------
हे भगवंता, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!
21 Oct 2009 - 7:08 am | एकलव्य
लेख आवडला!
अवांतर - माझे तिघे शाळामित्र (बी-स्कूल) इन्डोनेशिआचे आहेत. त्यांच्याशी या आणि अशा रोमांचकारी गप्पा खूप रंगायच्या.
आपला लेख वाचून पुन्हा एकदा तसाच फड जमल्यासारखे वाटले. धन्यवाद.
21 Oct 2009 - 8:23 am | सुधीर काळे
बी-स्कूल म्हणजे बिझनेस स्कूल असेल तर तिथले मित्र हे शाळामित्र तर खरेच, पण या संदर्भात हा शब्द वापरलेला प्रथमच पाहिला! जास्त करून शाळामित्र (किंवा शाळूसोबती) म्हणजे बिगारी (किंवा किंडरगार्टन) पासून १०वी (आमच्यावेळी ११वी) पर्यंतच्या मित्रांसाठीच मी वापरला आहे म्हणून शाळेतले मित्र इंडोनेशियन वाचल्यावर जरासा थबकलो, मग "ट्यूब" पेटली.
असो. पर्वा इल्ला! कुठे असता तुम्ही सध्या?
सुधीर
------------------------
हे भगवंता, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!
3 Nov 2009 - 2:09 pm | सुधीर काळे
भाषा इंडोनेशियातील संस्कृत शब्द या विषयावरील माझा लेख नवीन शब्द घालून व मुळाक्षरांनुसार पुनर्रचित करून लिहिला आहे. ज्यांना त्यात रस असेल त्यांनी पुन्हा पहावा ही विनंती!
------------------------
कटी रात सारी मेरी मयकदेमें, खुदा याद आया सवेरे सवेरे! (मयकदा=दारूचा गुत्ता)
3 Nov 2009 - 3:14 pm | पारंबीचा भापू
सुधीरभाऊ,
हे लई ब्येस केलसा तुमी! आता करतो अब्यास तुमच्या भासेचा!
भापू
11 Nov 2009 - 4:28 pm | सुधीर काळे
आजचे नवे शब्दः (१) गुण व (२) पुचाट (मुळाक्षरानुसार योग्य जागी टाकले आहेत).
सुधीर
------------------------
ही लिंक वाचा: http://tinyurl.com/yf7l59q
17 Feb 2010 - 11:43 am | सुधीर काळे
आजचे नवे शब्दः चांद्रासांगकाला (Lunar calendar), कलाही (कलह) व किराना (किरण).
------------------------
सुधीर काळे (कृपया वाचा: http://tinyurl.com/ybwvk7j)
12 Mar 2010 - 5:25 pm | सुधीर काळे
आज Jelma, sangka व sendi हे तीन नवे शब्द घातले आहेत!
------------------------
सुधीर काळे
राष्ट्रपतींना निरोप लिहा presidentofindia@rb.nic.in या ई-मेल पत्त्यावर, प्रधानमंत्र्यांना निरोप लिहा pmosb@pmo.nic.in या ई-मेल पत्त्यावर)
29 Apr 2011 - 2:07 pm | सुधीर काळे
आज अनेक नवीन शब्द घातले आणि पूर्ण लेख मुळाक्षरांनुसार मी पुनर्रचित करून (in alphabetical order) पुन्हा लिहिला आहे. जे नवीन शब्द घातले आहेत ते ठळक अक्षरात आहेत. वाचा तर.....
29 Apr 2011 - 3:13 pm | यशोधरा
मस्त लेख. खूप आवडला.