भूप म्हणजेच भूपाली. हा राग रात्रीच्या वेळी गायला जातो, असं म्हणतात. परंतु आपल्याकडे असंख्य भूपाळ्या आहेत. त्या याच रागातल्या. त्यामुळे हा राग रात्रीचा की पहाटेचा हा वादाचा विषय आहे.
---
उत्तर रात्र उलटून गेलीय. पक्षांचा किलबिलाटही अद्याप सुरू व्हायचा आहे. काही वेळानंतर झुंजूमुजू होणार आहे. अशा धीरगंभीर वातावरणात भूपाळ्यांचे स्वर मनप्रसन्न करतात. या वातावरणातील शांत आणि गंभीर पण प्रसन्नभाव भूपमध्ये ओतप्रोत भरलेला आहे. हीच भूपची नादप्रवृत्ती असावी. सा रे ग प ध सा हे सहा स्वर असलेला हा राग त्यामुळेच उत्तररात्रीनंतर पहाटपर्यंत गायला जात असावा, असे वाटते.
असो. चर्चा भूप रागाने सुरू केली असली, तरी ती संपणार आहे मालवून टाक दीप या गाण्यावर!
हे गाणे ऐकताना एकादा एक मित्र म्हणाला, "पटदीप ना रे हा राग.'
म्हटलं, नाहीरे पटदीप नाही. तर म्हणाला, पटदीपच आहे.
जरा दरडावून पुन्हा म्हटलं, पटदीप नाहीच. पटदीप नक्कीच नाही.
मग म्हटला, "बिभास आहे वाटतं.'
मलाही रागाचं नेमकं नाव सांगता येत नव्हता. षडज आहे. रिषभ आहे, गंधार आहे, पंचम आहे. धैवत मात्र वेगळा वाटत होता. त्यामुळं मी त्याला भूपही म्हणू शकत नव्हतो.
घरी जाऊन पेटी घेऊन बसलो. गाण्यात कोमल धैवत आपले अस्तित्व अतिशय लख्खपणे दाखवत होता.
"लाभला...निवांत संग...' यात येणारा मंद्र सप्तकातील पंचम आणि कोमल धैवत, शांत आणि गंभीरतेबरोबर हळवापणाही आणतो.
"मालवून टाक दीप'मधील पंचमावरचा ठहराव तर क्या कहने! गंधारावरून पंचम, पंचमावरून कोमल धैवत, पुन्हा पंचम... मूर्तीमंत आसक्तीच ही; पण ती व्यक्त करताना हळुवारपणा आणि उत्कटता तरी किती असावी?
' यालाच कामातुरता म्हणतात का हो? '
असो. गाण्यात कोमल धैवत आला म्हटल्यावर हा भूप नाही, हे नक्की. मग हा राग कोणता असावा. बराच विचार करत होतो. वाजवून पाहात होतो.
मध्येच कुठेतरी "अबके हम बिछडे' ही गझल वाजवत असल्यासारखे वाटायचे. तर कधी "चढता सूरच धीर धीरे' ही कव्वाली ऐकत असल्याचा भास व्हायचा.
राग कोणता हे कळत नव्हते. तो भूप नव्हता. पददीप तर नव्हताच नव्हता.
यातला कोमल धैवत काही स्वस्थ बसू देत नव्हता. एका हार्मोनियमवादक मित्राला फोन करून विचारले, तर त्यालाही रागाचे नाव सांगता येईना. मिश्र भूप असावा, ही त्याची शक्यता. आणखी एका मित्राला विचारलं, तर कृष्णरंजनी रागाचं नाव पुढे आलं.
मी हे नाव तर प्रथमच ऐकत होतो. त्यामुळे असेल बुवा हा राग, असं म्हणून मी काही थांबलो नाही.
आणखी एका विशेष जाणकार मित्राला फोन केला. तेव्हा तो म्हटला, हा राग आहे भूपेश्वरी. त्यालाच कृष्णरंजनी म्हणतात!
आता आमचं डोक जरा शांत झालं. म्हटलं हां.. आता कसं...
रिषभ तोच, गंधार तोच.. पंचम तोच... फक्त धैवत कोमल झालाय.
भूपमधला "पुरुषार्थ' जाऊन स्त्रीत्वातला हळूवारपणा इथे आलाय... एवढेच!
प्रतिक्रिया
17 Sep 2009 - 7:10 pm | श्रावण मोडक
छान. असे प्रवास आणखी येऊ द्या. अजून थोडं सविस्तरही होऊ द्या.
17 Sep 2009 - 8:24 pm | अन्वय
सविस्तर लिहिण्याचे मुद्दाम टाळले आहे.
कारण गाण्याचा भावार्थच असा आहे की प्रत्येकाची अनुभूती वेगळी असेल.
त्यात आपली अनुभूती लादून कुणाचा रसभंग करावासा वाटला नाही.
17 Sep 2009 - 7:14 pm | प्राजु
छान लिहिले आहे.
आवडले लेखन.
अशाच सुंदर गाण्यांबद्दल आणि रागांबद्दल लिहित रहावे ही विनंती.
तात्यांना ,बघू तुमच्या पासून स्फुरण घेऊन बसंताचं लग्न पूर्ण करण्याची बुद्धी होते का? :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
17 Sep 2009 - 7:31 pm | क्रान्ति
काय सुरेख नाव आहे कृष्णरंजनी! भूपेश्वरी पण मस्तच. नवीन रागाची माहिती झाली. अशीच मोलाची नवनवीन माहिती आपल्या लेखातून मिळत राहो!
क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखा
रूह की शायरी
17 Sep 2009 - 8:11 pm | अन्वय
घ्या आस्वाद घ्या गाण्याचा
http://www.esnips.com/doc/167afb80-8b4e-4b33-aa87-b2886f19d6c6/Malvun%20...
17 Sep 2009 - 8:36 pm | sujay
छान लिहीलय.
सोप्या शब्दात वर्णन केल्याने माझ्या सारख्या सामान्य श्रोत्यालाही थोडफार समजल.
अशीच अजून माहिती येऊ द्या.
आणी हे गाणं तर केवळ महान आहे.
this is undoubtedly the most sensuous song in the world.
सुजय
17 Sep 2009 - 9:51 pm | संदीप चित्रे
ही छान माहिती मिळाली.
सोप्या भाषेत लिहिल्यामुळे समजलीही (असं वाटतंय तरी !)
17 Sep 2009 - 11:31 pm | अन्वय
ऐका आणखी एक भूपेश्वरी
http://www.esnips.com/doc/d8f78378-e743-4eb7-ac6c-f60972354b42/Ab-Ke-Hum...
17 Sep 2009 - 11:48 pm | विसोबा खेचर
छोटेखानी परंतु छान प्रकटन..
या गाण्याबद्दल आणि याच रागातले 'चढता सूरज धीरे..', या दोन्ही गाण्याबद्दल मी एकदा मिपाच्या मुखपृष्ठावर लिहिले होते! :)
तात्या.
17 Sep 2009 - 11:55 pm | अन्वय
तात्या आम्हाला ते वाचायला मिळाले नाही
ते वाचायला मिळाले असते तर एवढे डोकेफोड करावी लागली नसती
आणि या रागाची माहिती कुणाकडेच मिळाली नसती तर आपल्यालाच विचारणार होतो याबाबतो
असो
आपण लिहिलेल्या लेखा दुवा मिळेल काय
17 Sep 2009 - 11:58 pm | विसोबा खेचर
मी ते जतन करायला विसरलो. पुन्हा ते मुपृ बनवून टाकीन केव्हातरी. ...
तात्या.
18 Sep 2009 - 12:01 am | नंदा
खर्जातल्या पंचमापासून वरच्या गांधारापर्यंत या गाण्यात लताबाईंचा सूर किती सहज फिरतो! साधारणपणे सलग सूर घेत जाणारे हे गाणे, 'दूर दूर तारकात, बैसली पहाट नहात' या ओळीत जरा निराळी स्वरसंगती घेते. 'बैसली' मधल्या 'बै' वरची तार 'रे' ते कोमल 'ध' ही मींड गाण्यात वैचित्र्य निर्माण करते. बाळासाहेबांना हे गाणे करतांना ही ओळ या मींडेसह अशी का घ्यावी वाटली हे त्यांची प्रतिभाच जाणो.
भूपातला गांधार कोमल झाला तर जसा 'शिवरंजनी' होतो, तसा 'धैवत' कोमल केल्यास 'कृष्णरंजनी'. तो कृष्णरंजनी या गाण्यात येतो.
18 Sep 2009 - 12:26 am | अन्वय
हेच म्हणतो
चांगली माहिती
18 Sep 2009 - 6:05 am | घाटावरचे भट
छान लेख. या गाण्यावरून स्फूर्ती घेऊन पं. शंकर अभ्यंकरांनी 'प्रतीक्षा' नावाचा राग तयार केला. कृष्णरंजनीबद्दल अधिक माहिती कोणी देऊ शकेल काय?
19 Sep 2009 - 7:18 pm | अन्वय
भूपेश्वरी रागालाच प्रतीक्षा किंवा क्रुष्णरंजनी म्हणतात़, असे जागोमोहन प्यारे यांनी म्हटले आहे.
असे असेल तर प्रतीक्षा राग शंकर अभ्यंकर यांनी शोधला़, असे कसे म्हणता येईल.
20 Sep 2009 - 5:09 am | घाटावरचे भट
मालक, आपण जाणकार आहात. कृपया भूपात कोमल ध घेतला की भूपकली/प्रतीक्षा होतो असं जनरलायझेशन करू नका. विशेषतः ज्याला आपण 'लाईट' संगीत म्हणतो त्याच्यावरून तर मुळीच करू नका. राग ही संकल्पना याच्यापेक्षा बरीच मोठी आहे. जरी स्वर सारखे असले तरी भूपकली/प्रतीक्षा सारखेच असायला हवेत असं नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे दोन्ही राग मूळ भूप रागापेक्षा नुसते अंगापिंडानेच नव्हे तर रंगानेही बरेच वेगळे आहेत.
20 Sep 2009 - 10:18 pm | अन्वय
तुम्हाला छेडणाचा इरादा नाही.
केवळ प्रतीक्षा रागाविषयी औत्सुक्य आहे इतकेच.
या रागाची ध्वनीफित ऐकवल्यास माझ्या ज्ञानात भर पडेल.
राग नसावा.
-अन्वय
18 Sep 2009 - 12:24 pm | केशवराव
अन्वय'
हे ह्रदयाचे थोके चुकविणारे गाणे म्हणजे बाळासाहेबांची अगाध निर्मिती आहे. तरीपण मला सतावणारा एक प्रश्न ह्या गाण्याच्या वेळेस आणखी त्रास देतो; अफाट प्रतिभेच्या संगीत काराच्या डोक्यातून प्रसवलेली चाल जर 'लता ' नांवाचा स्वर पृथ्वीवर नसता तर त्या चालीचे काय झाले असते ?
ह्या गाण्याच्या रागाबद्दल मी ही अतिशय उत्सूक होतो. सुरेख माहिती ,आणि छान शब्दात दिलीत , खुश !
20 Sep 2009 - 12:02 am | अन्वय
केशवराव,
अबके हम बिछडे या गझलेची लिंक सोबत दिली आहे
ही गझल ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की
ती मालवून टाक दीप या गाण्यासारखीच आहे.
त्यामुळे या गाण्याची चाल मालवून टाकच्या संगीतकाराला सूचली, असे म्हणता येणार नाही.
या चालीचे श्रेयच द्यायचे असेल, तर मेहेदी हसन यांना द्यावे लागेल, असे मला वाटते.
20 Sep 2009 - 10:28 am | भडकमकर मास्तर
त्यामुळे या गाण्याची चाल मालवून टाकच्या संगीतकाराला सूचली, असे म्हणता येणार नाही.
तसं तर या संगीतकाराच्या बर्याच गाण्यांबद्दल म्हणता येईल...
अवांतर : (शिवाय एका टीव्हीवरील कार्यक्रमात त्यांच्या मानलेल्या भाच्याने त्यांचे एका वेगळ्या गाण्याबद्दल कौतुक करताना असेही म्हटले होते की ," बघा, स्पष्टपणे सांगितले यांनी की या गाण्यात त्यांना कोणत्या संगीतकारांची मदत झाली .. काय हा प्रामाणिकपणा"...)
...कोण रे तिकडे म्हणतोय की इतरांना श्रेय द्यायला थोडा उशीर झाला म्हणून...
_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी
18 Sep 2009 - 12:54 pm | मनीषा
"मालवून टाक दीप.." , आणि "अब के हम बिछडे ... " सुंदर
फारच छान लेख ...
18 Sep 2009 - 6:52 pm | अन्वय
सर्व प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद
जमेल तसे आपल्या आस्वादासाठी
आणखी रसग्रहण देत राहील
धन्यवाद
18 Sep 2009 - 9:47 pm | JAGOMOHANPYARE
अब के बिछडे ( अमिताभ बच्चनचे गाणे.. पिक्चर कुठला?) बरोबर मी कन्फ्युज झालो... ते शिव रन्जनीत आहे.... तुम्ही सान्गताय ते अब के हम बिछडे वेगळे :)
कोमल ध भूप रागालाच प्रतिक्षा, कृष्णरन्जिनी, भूपकली ही नावे आहेत.... मालवून टाक आणि चढता सूरज ही याच रागात आहेत.. आणखी एक सुन्दर गाणे..... श्रीधर फडकेन्ची सुरवरदा रामा या राम्दास स्वामीन्च्या रचनाच्या अल्बम मध्ये आहे..... स्वर रन्गवावा, ताने स्वर रन्गवावा.. आरती टिकेकर.... अप्रतिम गाणे... ऐकाच ! :)
पूर्वीच्या काळी उत्तर भारतात दोन राग होते... सुबह की भूपाली आणि शाम की भूपाली... या दोन्ही रागानाच सुबह/ शाम की भूप असेही म्हणत.... सुबह की भूपाली मध्ये आरोही सूर प्रामुख्याने असतात.... प ध प ध प ग रे सा... असा अवरोह मध्य ष्ड्जावरच थाम्बतो.. खालचे ध आणि प शक्यतो येत नाहीत....... हा राग म्हणजेच देशकार राग.... खरे तर सगळ्या भूपाळ्या याच रागात असतात... त्यामुळे चढत्या सूर्याचा भास होतो... शरयू तीरावरी अयोध्या, ज्योति कलश छलके मध्ये हे जाणवेल...
श्याम की भूपाली ( भूप) मध्ये अवरोही सूर प्रामुख्याने असतात... मध्य ष्डजाला जोडून मन्द्र ध आणि प घेणे हा याचा गुण.... त्यामुळे उतरत्या सूर्याचा भास होतो.... सायोनारा आणि इन आखो की मस्ती के मध्ये हे जाणवेल... याच रागाला आज आपण भूप म्हणतो.... खरे तर हा सन्ध्याकाळचा राग आहे....
बर्याचश्या भूपाळ्या यान्च्या मध्येच कुठे तरी रेन्गाळतात... त्याना आपण भूप रागातच आहेत असे म्हणतो , पण वेळ मात्र सकाळची सान्गतो....
18 Sep 2009 - 9:47 pm | अन्वय
धन्यवाद
माहितीत भर टाकली
18 Sep 2009 - 9:52 pm | अन्वय
बरे झाले सुधारणा केली
कारण मेहेदी हसनचे अबके हम बिछडे वाजविताना
त्यातील शुद्ध गंधार ठळकपणे जाणवतो
मीही जरा गोंधळलो होतो
हे गाणे भूपेश्वरीतच आहे
बरे झाले सुधारणा केली
नाहीतर मीही हा शिवरंजनी असल्याचे समजून चाललौ असतो
धन्यवाद
19 Sep 2009 - 1:00 pm | पर्नल नेने मराठे
सारेगपधसा......साधपगरेसा
चुचु