रौशनी.. १

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
16 Sep 2007 - 7:11 pm

रौशनी..१
रौशनी..२
रौशनी..३
रौशनी..४
रौशनी..५

राम राम मंडळी,

"तात्याभाई, रौशनीने तुमको चाय पिने को बुलाया है!"

मन्सूर हे मला सांगायला आला. मी तेव्हा मुंबईच्या फोरासरोडवरील 'झमझम' या देशी दारूच्या बारमध्ये हिशेब लिहिण्याचं काम करत असे.

फोरास रोड! मुंबईच्या रेडलाईट विभागातला एक प्रमुख विभाग. तेव्हा मुंबईमध्ये फोरास रोड, फॉकलंड रोड, कामाठीपुरा येथे मोठ्या प्रमाणावर वेश्या व्यवसाय चालायचा. आजही चालतो. रस्त्याच्या दुतर्फा अनेक छोट्यामोठ्या चाळवजा इमारती. या सर्व इमारतींमधून खुलेआम वेश्या व्यवसाय सुरू असे. १५ वर्षांपासून ते अगदी पस्तिशी चाळीशी पर्यंतच्या पोरीबाळी व बायका संध्याकाळ झाली की चेहेर्‍यावर रंगरंगोटी करून परकरब्लाऊजच्या वेषात रस्त्याच्या कडेला, इमारतींच्या दाराखिडक्यात उभ्या रहायच्या. अनोळखी तसेच ओळखीपाळखीच्या लोकांना खाणाखुणा, शुकशुक करून बोलवायच्या. अगदी २०-२५ रुपयांपासून ते १०० रुपयांपर्यंत वय, रंगरुपाप्रमाणे पैसे घेऊन आलेल्या गिर्‍हाईकाची भूक भागवायच्या. एका रात्रीत पाच पाच, सहा सहा गिर्‍हाईकं! खरंच, फार भयानक विश्व होतं ते मंडळी. अत्यंत ओंगळवाणं आणि किळस आणणारं होतं!

पण आपली रोजीरोटीच मुळी त्या सरकारमान्य देशीदारूच्या बारमध्ये हिशेब लिहायची होती. त्यामुळे त्या भागात रोज जावं लागत असे!

'बशीर मोराशी' असं काहीसं नांव असणार्‍या माणसाच्या मालकीचे तीन चार बार होते. त्या सर्व बारस् चं अकाउंटस् सेटप करण्याचं काम बशीरभाईनी मला दिलं होतं. मी तेव्हा मुंबईच्या प्रभादेवी भागात असलेल्या जी एम् ब्रेवरीज लिमिटेड या देशीदारूचं उत्पादन करणार्‍या कंपनीतं नोकरी करत होतो. मंडळी, आपल्याला आश्चर्य वाटेल, मुंबईतील सातशेहून अधिक बारमध्ये आमचा माल जायचा. अक्षरशः तुफान खप. मरण नसलेला धंदा! बर्‍याचश्या बार मालकांची आणि माझी चांगलीच ओळख. काही वेळेला त्यांची मागणी जास्त असायची, अन् माल कमी असायचा. मग जास्त मालाकरता कंपनीच्या सेल्स् मॅनेजरकडे वशिला लावण्यासाठी 'तात्यासेठ', 'तात्याभाई' अश्या उपाध्याही मला मिळायच्या! बर्‍याच बार मालकांचे बरेच अनुभव तिथे मी घेतले. बहुतेक सगळे शेट्टी! तुळू भाषा बोलणारे. त्यांचे दोन नंबरचे व्यवसायही बघितले, पण त्याविषयी पुन्हा केव्हातरी!

झमझम बार! फोरासरोडवरच्या गजबजलेल्या वस्तीत सरकारमान्य देशी दारू मिळणारा बार. तसा हा बार दिवसभरच गिर्‍हाईकांनी गजबजलेला असायचा, पण संध्याकाळी अगदी माणसंनी फुल्ल असायचा. शंभर रुपयांपर्यंत आख्खी बाटली मिळायची. तिथे येणारी बहुतेक सगळी मंडळी ही गुंड अन् मवाली. दिवसभर काहीतरी उलटेपालटे धंदे करायचे, लहानमोठ्या चोर्‍या करायच्या आणि संध्याकाळ झाली की झमझम बारमध्ये हजर! त्यातले काही इकडेतिकडे फुटकळ नोकर्‍या करणारे चतूर्थश्रेणी कामगारही असत. झमझम बारमध्ये यायचं, फुल्लटाईट व्हायचं अन् घरी जाऊन बायकाला मारझोड करायची एवढीच काय ती यांची मर्दुमकी! काही जण मर्दुमकी गाजवायला बाजुलाच असलेल्या इमारतीतल्या वेश्यांकडे जात. २०-२५ रुपयात मर्दुमकी गाजवून होई! शिवाय मारामार्‍या, चाकूवस्तर्‍याचे वार, दादा, भाई, पोलिस, त्यांचे हप्ते, या सगळ्या गोष्टी तर त्या बारमधल्या नित्याच्याच.

याच सर्वांमध्ये सुशिक्षित, सुसंस्कृत, पांढरपेशा समाजातला एक तात्या अभ्यंकरही 'अपनेको क्या? अपने कामसे मतलब!' या भावनेने त्या बारमध्ये हिशेब लिहीत बसलेला असायचा!;)

मन्सूर हा आमच्या बारमधला एक हरकाम्या पोर्‍या. दहापंधरा रुपयांच्या रोजीवर पडेल ती कामं करायचा. राहायचाही तिथेच. शिवाय दिवसाकाठी कुणाकुणाकडून पाचदहा रुपयांची टीपही मिळायची. बारमध्ये अजून तीनचार जण कामाला होते. त्या सगळ्यांकरता दोन टाईम डाळभाताचं जेवण त्या बारमध्येच शिजायचं. डाळभात, लिंबाची फोड अन् पापड! वरतून तुपाबिपाची धार नाही हो. ते सगळे लाड आपल्या दुनियेत! ;) मन्सूरसोबत मीही कधी मूड आला अन् रात्री घरी परतायला उशीर होणार असेल तर तिथेच डाळभात जेवायचा. मजा यायची! ;)

आमच्या बारच्या बाजूलाच एक एकमजली चाळ होती. त्या संपूर्ण चाळीत वेश्याव्यवसाय चालायचा. दिवसभरातल्या फावल्या वेळात मन्सूर तिथल्या वेश्यांचीही काही फुटकळ कामं दोनपाच रुपयांच्या टीपेवर करायचा. त्या काळात माधुरी आणि संजूबाबाचा 'साजन' हा चित्रपट नुकताचा प्रदर्शित झाला होता. मन्सूरने माझ्याकडून तिकिटाकरता उधार पैशे घेऊन तो चित्रपट पाहिला होता. "तात्याभाय, माधुरी बाकी क्या मस्त दिखती है. अपनेको उसे एक बार मिलनेकाईच है! आपुन उसको बोलेगा के तू भोत चिकनी दिखती है";) मला हसू आवरेना. माधुरीचे जे असंख्य चाहते होते त्यात एक आमचा मन्सूरही होता, हे त्या बिचार्‍या माधुरीला माहीत नसावं! ;) हा लेख लिहिताना आत्ता सहजच हा किस्सा आठवला. असो..!

"तात्याभाई, तुमको रौशनीने चाय पिनेकू बुलाया है!" मन्सूर.

"कौन रौशनी?"

"वो बाजुके बिल्डिंगमे नही रहती क्या? वोईच! एक-दो बार उसने तुमको यहा आतेजाते हुए देखा है. तुमारे बारेमे मेरेसे भोत पुछती है. तुम साला अच्छा शर्टपॅन्ट पेहेनता है ना! चिकना दिखता है, शरीफ दिखता है! बाजुके बिल्डिंगमे जो लडकीलोग है ना, ये रौशनी उन लडकीलोगकी मौसी है. तुमको उसने एक बार मिलनेको बुलाया है!"

क्रमशः...

-- तात्या अभ्यंकर.

वाङ्मयअनुभवप्रतिभा

प्रतिक्रिया

घाशीराम कोतवाल १.२'s picture

2 Jul 2009 - 3:53 pm | घाशीराम कोतवाल १.२

एक पण प्रतिक्रिया नाहि
कारण काय बरे ? :?
ते जाउ दे ओ तात्या रोशनी चे पुढचे भाग दिवाळी नंतर म्हणालात आता गणपती येतील काय करता राव लिहा ना लवकर ;)
**************************************************************
नकार देण ही कला असेल पण
होकार देऊन काम न करण हिच खरी कला !!! ;)

विसोबा खेचर's picture

2 Jul 2009 - 4:01 pm | विसोबा खेचर

माफ करा साहेब, सध्या मूड नाही..

पुन्हा मूड लागला की लिहीन आणि रौशनी पूर्ण करीन..

तात्या.

यन्ना _रास्कला's picture

3 Jul 2009 - 9:28 am | यन्ना _रास्कला

तुम साला अच्छा शर्टपॅन्ट पेहेनता है ना! चिकना दिखता है

आभिनन्दन तात्यानु

बहुतेक सगळे शेट्टी! तुळू भाषा बोलणारे.

हाल्ली बाग्लादेशी मुस्ल्मान चिकार आहेत या लाय्नीत आस एकुन आहे.

*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
मेंदु गेला वाया,
फ़िदीफ़िदी हसती बाया,
शिनल्या मेंदुला चाळे नवे,
जुन्या घराला टाळे नवे!