हमने उनको भी छुप छुप के आते देखा इन गलियोमे..!

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
2 Jul 2009 - 3:30 pm

"तात्यासेठ, अभि ये महिनेमे मेरे बँकमे रख्खे हुए ३०००० रुपये मिलेंगे ना?"

"हा. क्यू नही मिलेंगे? जरूर मिलेंगे. डबल ढक्कनको बोल दुंगा!"

शबनम मला विचारत असते. तिला आता तिच्या मुलीकरता काही चांगले कपडे घ्यायचे असतात, ती चाहेल तो खाऊ द्यायचा असतो, कपडे घ्यायचे असतात, मायलेकींना मुंबैत जरा मजा करायची असते.

शबनम..!

मुंबैच्या कॉग्रेस हाऊस मधली एक मुजरेवाली, एक डान्सर. १९९०-९१ च्या सुमारास मी फोरास रोडवरच्या बारमध्ये जो नौकरीला लागलो त्या नौकरीतून एकाच्या ओळखीने दुसरा, दुसर्‍याच्या ओळखीने कुणी तिसरी या पद्धतीने त्या विभागातले स्त्रीपुरुष माझ्या संपर्कात आले, आजही येत आहेत. माझा धंदा विम्याचा आणि शेअरबाजार सल्लागाराचा, आणि योग असा की सभ्य सुशिक्षित पांढरपेशा समाजासोबतच मुंबैच्या रेडलाईट एरियातली काही मंडळी, काही बार डान्सर मुली, काही बारमालक शेट्टी, ही मंडळी आज माझे अशील आहेत. मी या सर्व लोकात भरपूर वावरलो, ह्यांची दुनिया जवळून पाहिली, आजही पाहतो. परंतु आपला मतलब धंद्याशी. अशील कुणी का असेना! सुदैवाने अभिजात संगीत या एकाच गोष्टीचे मनमुराद व्यसन असल्यामुळे आजतागायत कधी पाय घसरला नाही, कधी वाहवत गेलो नाही. असो..!

दोन तीन वर्षांपूर्वी बनारसी चाळीतल्या शकीलभाय या बाजेवाल्याने माझी आणि शबनमची ओळख करून दिली होती. काँग्रेस हाऊस आणि फोरासरोडवरच्या बनारसी चाळीत जिथे मुजरा होतो तिथे शकील भाय हार्मोनियम वाजवतो, चांगली वाजवतो. शकीलभाय हा शबनमचा मामू, की असाच कुणी सगेवाला.

"तात्याभाय, ये शबनम. इसको अच्छा पैसा मिलता है, अच्छा नाचती है. इसकू जरा कुछ पैसा बचानेला तरिका बताओ!"

त्या दिवशी प्रथमच मी शबनमचा मुजरा पाहिला. छान दिसत होती, नाचतही छान होती. त्या बैठकीत दोनचार अय्याश लोक बसले होते, ते पैसे उडवत होते! ती मंडळी निघून गेल्यानंतर शबनमने माझ्याकरता आणि शकीलकरता चहा मागवला. मग मी पैसा वाचवणं कसं महत्वाचं आहे, मी काय मदत करू शकतो, पैसा कुठे अन् कसा वाचवता येईल, विमा म्हणजे काय, इत्यादी सर्व सर्व गोष्टींवर तिचं भरपूर बौद्धिक घेतलं. समुपदेशनच म्हणा ना! :)

शबनम तशी अशिक्षितच. ज्या समाजात, ज्या वस्तीत, ज्या लोकात वाढली तो समाजही अशिक्षितच. तिला माझं बोलणं समजत होतं आणि नव्हतंही! शेवटी मी तिला त्या एरियाच्या, खास बंबिय्या-हिंदीत समजाऊन सांगितल्यावर तिला माझं म्हणणं पटलं असावं!

"देख, अभि साला तेरी चमडी टाईट है, थोबडा ठीक है, जवानी है तबतक तेरे मुजरेपे पैसा उडेगा. एक बार चमडी उतर गयी तो साला कुत्ताभी तेरेको पैसा नही देगा. यही सब यहा बैठे हुए ऐय्याश भडवे तब तेरेपे थुकेंगे भी नही! किसी और कच्ची कली, आयटम को पैसा देंगे. तब क्या करेगी? कहासे लाएगी पैसा? क्या खाएगी?"

इतक्या कडक आणि हेटाळणीभरल्या शब्दात सुनावल्यावर शबनम भानावर आली. तिच्या डोळ्यात पाणी आलं! त्यानंतर तिला मी विम्याच्या, पोस्टाच्या मासिक बचत योजनेच्या काही स्कीम्स समजावून सांगितल्या.

आयूर्विमा महामंडळाची न्यू जनरक्षा पॉलिसी तिला दिली. डबल ढक्कनला सांगून मुंबै जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या डेली रिकरींगच्या बचत योजनेत तिला पैसे गुंतवायला लावले. डबल ढक्कन हा प्राणी त्या बँकेचा दलाल आहे. हा इसम पूर्वी दिवसरात्र गांजा पिऊन फोरासरोडवर, फॉकलंडरोडवर पडलेला असायचा. मीच त्याला त्या बँकेचा दलाल बनवला. डबल ढक्कन तसा वल्ली माणूस. त्याचे व्यक्तिचित्र पुन्हा केव्हातरी! :)

दरम्यानच्या काळात विम्याच्या वगैरे कामानिमित्त माझी आणि शबनमची काही वेळा भेट झाली. एकदोन वेळेला मी तिला बाकायदा दिल्ली दरबार हाटेलात बिर्याणी खायलाही घेऊन गेलो आहे. 'हा माणूस मादरचोद नाही आणि याला आपल्यासोबत गेम वाजवण्यात काहीही इंटरेस्ट नाही!' असा कुठेतरी एक विश्वास, एक खात्री तिला होती/आहे! कारण ती ज्या दुनियेत वावरते त्या दुनियेत बाहेरच्या सभ्य, सुशिक्षित, पांढरपेशा समाजातले लोक तोंडं लपवून, कुठे काही चान्स मारायला मिळतो का, या एकाच हेतूने येतात. हो, तोंडं लपवून! घरच्या बायकोवर भडव्यांचं समाधान होत नाही. 'अमर प्रेम' मधली किशोरदाने गायलेली, 'हमने उनको भी छुप छुप के आते देखा इन गलियोमे..!' ही ओळ मी तिथे येणार्‍या काही पांढरपेशा पब्लिकच्या बाबतीत अनुभवली आहे! :)

अवांतर - आपल्या मिपाचाच एक सभासद. नाव घेत नाही. परंतु त्याचा चक्क मला एकदा फोन. "तात्या कुठे आहात? मी 'बंबई संगीत कलाकार मंडली!' अशी पाटी लिहिलेल्या इमारतीच्या बाहेर उभा आहे. इमारतीमध्ये काही टंच, उफाड्याच्या मुलींचा वावर दिसतो आहे. काय करू?"

मला बसल्या जागी दरदरून घाम फुटला! "अरे बाबा, तू काँग्रेस हाऊस समोर उभा आहेस. पहिला माघारी फिर. वाट्टेल तसे पैसे घालवायचे असतील तरच आत जा..!"

या नव्यानवख्या तरूणाला आतल्या पोरी साफ धुवून काढतील ही मला खात्री आणि म्हणूनच भितीही!

"नाही तात्या. मी आत जात नाहीये. जस्ट इथे आलो होतो म्हणून तुम्हाला फोन केला. एकदा ही सगळी दुनिया तुमच्यासोबत पाहयची आहे. माझी आत्ता ट्रेन आहे, टाईम झाला आहे, मी चाललोच आहे पुण्याला परत! घाबरू नका!" :)

असो..! :)

तर काय सांगत होतो?

आमची शब्बो तशी हुशार, व्यवहारचतूर परंतु अत्यंत अबोल. बोलेल तेही अगदी हळू आवाजात. स्वभावाने तशी खरच खूप चांगली आहे. पण नशीबाने तिला त्या बाजारात बसवली. तिची आई याच धंद्यातली. बनारसला कोठेवाली होती. काही वर्षांपूर्वी ती लहानग्या शबनमला घेऊन मुंबैत आली. शबनम १५-१६ वर्षाची झाली, जवानीत आली आणि आपसूकच या धंद्यात आली!

अहमदाबादचा पन्नाशीतला कुणी करोडपती जगनसेठ एकदा काँग्रेस हाऊस मध्ये मुजरा ऐकायला आला होता. सोळा-सतरा वर्षाच्या शब्बोरानीवर नजर गेली त्याची. पैसे उडवू लागला तिच्यावर. अडनिड्या वयातली शबनमही भाळली त्याच्यावर. आणि एकेदिवशी बाकायदा नथ-उतरणीचा कार्यक्रम ठरला. शबनमला चुरगाळण्याचे एक लाख रुपये ठरले. खुद्द आईनेच सौदा ठरवला आणि पैसे घेतले. आता बोला..!

एकदा चव घेतल्यावर तो जगनसेठ येईनासा झाला! पन्नाशीतला जगनसेठ मुलीच्या वयाला शोभेल अश्या मुलीला भोगून दुसरीकडे हुंगेगिरी करायला चालता झाला! शबनमला दिवस राहिले. नथ-उतरणीच्या संबंधातून जर दिवस राहिले तर होणारं मुल फारच मुबारक! त्यातून मुलगी झाली तर फारच छान. कारण ती जवान होऊन पुढे घराणं चालवेल अशी मुजरेवाल्या/कोठेवाल्या दुनियेची धारणा!

आता बोला मंडळी! तुम्हाला काय नी किती सांगू त्या दुनियेबद्दल?!

शबनमला मुलगी झाली. जगनसेठने दिलेले पैसे संपले. शबनम पुन्हा कोठ्यावर हजर! आता तिची मुलगी मोठी होते आहे. आईचं म्हारातपण आहे, औषधपाणी आहे. जिंदगी सुरू आहे आणि सुरूच राहणार आहे..!

काहीच दिवसांपूर्वी शबनमच्या त्या 'मुबारक ' (?) औलादीचा जनमदिन होता म्हणून तिने मला जेवायला बोलावलं होतं. मटणकुर्मा-पराठे असा बेत होता. दोन पेगही झाले तिथे. तिची आईही होती तिथे. जनरली कुठल्याही वडिलधार्‍या माणसाला प्रथम भेटलं की वाकून नमस्कार करायची सवय आहे मला. परंतु मुलीच्या नथ-उतरणीचे लाख रुपये घेतलेल्या त्या बाईला बघितल्यावर नमस्कार तर सोडाच, उलट घृणा आली मला तिची! पण कुणाला दोष देणारा मी कोण? काय अधिकार मला? 'शबनमके मेहमान!' म्हणून त्या बाईने पाहिलं मला आणि लाचारपणे हसली. घृणेची जागा किवेने घेतली!

शबनमची पोरगी गोड आहे! कधी कधी विचार केला की वाटतं की त्या जगनसेठला का दोष द्यावा? त्याने सौदा केला होता, लाख रुपये मोजले होते! तरीही मनातल्या मनात त्या जगनसेठला शिव्याशाप देत मी त्या निष्पाप चिमुरडीच्या हातात शंभराची नोट ठेवली!

आता लौकरच शबनमचं डेली रिकरींग डिपॉझिट मॅच्युअर होणार आहे. तिला ३०००० रुपये मिळणार आहेत. मी तिला पुन्हा तशीच गुंतवणूक सुरू ठेवायला सांगणार आहे. पण सध्या नाही. कारण तिला आता तिच्या मुलीकरता काही चांगले कपडे घ्यायचे आहेत, ती चाहेल तो खाऊ घ्यायचा आहे, मायलेकींना मुंबैत जरा मजा करायची आहे!

करू देत..!

-- तात्या अभ्यंकर.

वाङ्मयअनुभवप्रतिभा

प्रतिक्रिया

श्रावण मोडक's picture

2 Jul 2009 - 3:51 pm | श्रावण मोडक

शब्द नाहीत. या मुलीच्या चेहऱ्यात एक दर्द लपलेला दिसतोय... बास्स, तीच प्रतिक्रिया समजा या लेखनावर.
एक प्रश्न आहेच - या छायाचित्राची खरंच आवश्यकता आहे का? मला नाही वाटत... ते नसल्यानं लेखनात खोट नसती आली. ते आल्यानं लेखनात भर नाही पडली. माझ्यासह चार नजरांमध्ये तो चेहरा पक्का रुतून बसणार आता. ते दुखणं सोसणं आलं. :(

विसोबा खेचर's picture

2 Jul 2009 - 3:58 pm | विसोबा खेचर

मोडकसाहेब,

याबद्दल तिला कल्पना दिली आहे. 'तेरे बारेमे लिखना है इसलिये तेरे साथ फोटू निकालना है' असं तिला सांगितलं आहे..

जबाबदारी माझी!

वाटल्यास तिला फोन करून खात्री करा. व्य नि ने तिचा मोबाईल नंबर कळवू का? :)

असो, प्रतिसादाकरता धन्यवाद मोडकगुरुजी!

तात्या.

श्रावण मोडक's picture

2 Jul 2009 - 4:09 pm | श्रावण मोडक

तात्या,
परवानगीचा मुद्दाच नाही. ती तुम्ही घेतली असावी असा अंदाज होताच. तोच बरोबर ठरला. रोशनीच्या वेळीही छायाचित्रावरून चर्चा झाली होती. अर्थात, मी ती केली नव्हती, पण तेव्हाच्या तुमच्या उत्तरावरून परवानगी हा मुद्दा नाही हे ध्यानी होते.
माझा मुद्दा वेगळा आहे - अशी छायाचित्रे टाकावीत का? या मंडळींच्या या ओळखी अशा व्यक्त कराव्यात का? तुमच्या याच लेखात मिपाच्या एका सदस्याचा उल्लेख आहे. त्याची प्रायव्हसी आपण जपतो, त्याचा तो अधिकार आहे. तसाच अधिकार याही मुलीचा आहे असे माझे मत आहे. मुलीचाच नव्हे केवळ, तिची आई, आजी, मावशी, आत्या... कोणीही असो, त्यांचाही आहे. त्या दृष्टीने मला ते छायाचित्र केवळ अवांतर वाटते. मी म्हटले तसे, त्याने लेखनात ना भर पडते, ना ते नसल्याने खोट येते. त्यांची एक विशिष्ट परिस्थिती आहे. आणि म्हणून तर त्यांची प्रायव्हसी अधिक महत्त्वाची मानली पाहिजे आपण. लेखनाची संवेदनशीलताच हरपते असे छायाचित्र आल्यानं.
या विषयावर मला वाद करायचा नाही. परवानगी वगैरे मुद्दे माझ्या डोक्यात नाहीत हेच फक्त स्पष्ट करायचं आहे.

विसोबा खेचर's picture

2 Jul 2009 - 4:14 pm | विसोबा खेचर

मी म्हटले तसे, त्याने लेखनात ना भर पडते, ना ते नसल्याने खोट येते.

माझ्या मते लेखनात भर पडते. असो, तरीही आपला मुद्दा विचार करण्यासारखा आहे.. मनापासून धन्यवाद.

विचाराअंती ठरलेच तर चित्र काढून टाकीन..

तात्या.

वेताळ's picture

2 Jul 2009 - 7:36 pm | वेताळ

तात्या खरोखर तुमच्यावर सरस्वती प्रसन्न आहे. फोटो टाकला ते तर खुप उत्तम केले.देव रुप देवुन किती मोठी किंमत वसुल करतो हे तरी निदान कळाले.
वेताळ

विसोबा खेचर's picture

3 Jul 2009 - 1:25 am | विसोबा खेचर

फोटो पाहून तितका अंदाज येणार नाही, परंतु प्रत्यक्षात ती खूप रेखीव आहे, सुरेख आहे!

देव रुप देवुन किती मोठी किंमत वसुल करतो हे तरी निदान कळाले.

-----!

तात्या.

कलादालन's picture

3 Jul 2009 - 8:48 pm | कलादालन

याबाबतीत खरंच देवाचे आपल्यावर लाख लाख उपकार आहेत असे वाटते.. Thank GOD for giving us birth at right and dignified place - worth to call a HOME !
चांगल्या घरात जन्माला येणे, चांगले सुशीक्शीत, सुसंस्क्रुत अम्मी- अब्बु (ज्यांच्या साठी ईज्जत-आब्रूच सर्व काही ) देवाच्या क्रुपेने मिळणे यालाच नशीब म्हणतात की काय ?

पण हीच्या आज्जीवर खरंच चीड येत आहे अन बापावरही ...
अपने नाजायज ख्वाहीशोंकी तर्जुमानी ईतनी गिरी हुई हद् तक कोई मां कैसे कर सकती है ?? या प्रश्नांनी फक्त परेशान ही नहीं हैरान कर दिया ! ती बाई खरंच तिची सख्खी आज्जी आहे की सावत्र.. की पोरी उचलून आणून धंद्याला लावणारी ???
यह क्या जगेह हैं दोस्तों ??....
यह कौनसा दयार (घर) है ??
हठे - निगाह (Horizon) - तक जहां ..
गुबार (धुळ ) ही गुबार है !! :-(

फोटो च्या बाबतित श्रावण मोडक यांच्याशी पुर्णतः सहमत कारण ... तात्या ,सगळेच तुमच्या सारखे भावूक , संवेदनशील असते तर त्यांचे जग खरच थोडेसे सुंदर झाले असते
जाने-अनजानेमें उठेंगी कई निगाहें .. खरीदार की तरह ... :-(

~ वाहीदा

असे करणे योग्य की अयोग्य माहीत नाही.
पण त्यांचा व्यनी आला म्हणून व तो त्यांचा प्रतिसाद म्हणूनव्यक्त व्हावा हीच निव्वळ ही भावना

अश्विनि३३७९'s picture

2 Jul 2009 - 3:49 pm | अश्विनि३३७९

रोशनी नंतर आता शबनम ..
मस्त!!

भोचक's picture

2 Jul 2009 - 4:07 pm | भोचक

तात्या,त्रास झाला वाचून. काय लिहू आणखी.
(भोचक)
आमचा भोचकपणा इथेही सुरू असतो...
http://bhochak.mywebdunia.com/

स्वाती२'s picture

2 Jul 2009 - 4:13 pm | स्वाती२

तात्या सकाळी सकाळी रडवलत.

पर्नल नेने मराठे's picture

2 Jul 2009 - 4:16 pm | पर्नल नेने मराठे

ह्म्म
चुचु

आनंदयात्री's picture

2 Jul 2009 - 4:30 pm | आनंदयात्री

छानसे स्फुट. आवडले !!

(बाकी कोण रे तो पुणेकर ?? ;) )

छोटा डॉन's picture

2 Jul 2009 - 5:33 pm | छोटा डॉन

यात्रीशी सहमत ...
छोटेसे आणि छानसे स्फुट आवडले असेच म्हणतो .

मस्त लिहले आहे तुम्ही ...

------
छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

निखिल देशपांडे's picture

2 Jul 2009 - 5:59 pm | निखिल देशपांडे

मस्त लिहले आहे तुम्ही ...
स्पुट आवडले.. असेच म्हणतो

==निखिल

परिकथेतील राजकुमार's picture

2 Jul 2009 - 4:33 pm | परिकथेतील राजकुमार

नि श ब्द .....

º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

नंदन's picture

3 Jul 2009 - 1:56 am | नंदन

आहे. सुरेख म्हणण्यापलीकडचे लेखन.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

घाटावरचे भट's picture

3 Jul 2009 - 3:00 am | घाटावरचे भट

सहमत.

दिपक's picture

3 Jul 2009 - 9:40 am | दिपक

सहमत.
के व ळ नि श ब्द..

अनंत छंदी's picture

4 Jul 2009 - 6:47 pm | अनंत छंदी

तात्या
आज बरेच दिवसांनी पुन्हा एकदा अस्वस्थ व्हायला झालं.
त्या शिवाय करू तरी काय शकतो?
सालं, कधीकधी अशावेळी स्वतःचाच राग येतो.
शक्य झालं तर तुमच्या या शबनमला सांगा तुझ्या पोरीला नको टाकू या धंद्यात शिकव, मोठी कर दुसरीकडे सेटल करण्याचा प्रयत्न कर.

लवंगी's picture

2 Jul 2009 - 5:00 pm | लवंगी

काय बोलू.. का अस आयुष्य येत काहिंच्या नशिबात! तिच बाळ मात्र या पेश्यात अडकू नये अशी देवाजवळ प्रार्थना..

बिपिन कार्यकर्ते's picture

2 Jul 2009 - 6:15 pm | बिपिन कार्यकर्ते

तात्या, या विषयावरचे तुमचे लिखाण नेहमीच थोडे अस्वस्थ करून जाते. पण मग जगात सगळेच सापेक्ष असते असेही वाटते. नेहमीप्रमाणे चांगले मुक्तक.

अवांतरः फोटो टाकायला त्या व्यक्तीची हरकत नसेल तर मनाई नसावी.

बिपिन कार्यकर्ते

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Jul 2009 - 6:17 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तात्या,
तुम्ही पाहिलेल्या दुनियादारीतली पुन्हा एका कोणाची तरी दर्दभरी कहाणी. असे लेखन वाचल्यावर काय प्रतिक्रिया लिहावी ते कळत नाही.

अनंतछंदी प्रमाणेच म्हणतो ''शक्य झालं तर तुमच्या या शबनमला सांगा तुझ्या पोरीला नको टाकू या धंद्यात शिकव, मोठी कर दुसरीकडे सेटल करण्याचा प्रयत्न कर''

-दिलीप बिरुटे

अवलिया's picture

2 Jul 2009 - 6:37 pm | अवलिया

..........!!!

--अवलिया

विनायक प्रभू's picture

2 Jul 2009 - 6:51 pm | विनायक प्रभू

भारी युनिवर्सीटीतील भारी स्पुपदेशकाचे भारी स्मुपदेशन

लिखाळ's picture

5 Jul 2009 - 4:05 pm | लिखाळ

खरे आहे.

तात्या छान लेख !
--लिखाळ.

सूहास's picture

2 Jul 2009 - 7:18 pm | सूहास (not verified)

जगातल्या बर्‍याचश्या "विदारक" आणी मनाला मनापासुन त्रास देणार्‍या "सत्यापै॑की" एकाला वाट करुन दिली आहे...

सुहास

उपास's picture

2 Jul 2009 - 7:55 pm | उपास

तात्या साला ग्रेट काम, ग्रेट काम करतोयस तू.. बाजारात जाऊन त्यांच्या समस्या समजावून घेऊन विम्याचं महत्त्व पटवून देतोयस.. त्यांना पैसा वाचवायला, पुढचा विचार करायला प्रवृत्त करतोयस.. डबल ढक्कन सारख्यांना पोटाला आणि डोक्याला काम देतोयस.. मानलं!
बाकी लेखावर प्रतिक्रीया काय देऊ, भावना पोहोचल्या रे ! !

चतुरंग's picture

2 Jul 2009 - 8:14 pm | चतुरंग

__||__ :)

चतुरंग

प्राजु's picture

2 Jul 2009 - 8:19 pm | प्राजु

लेख खूप आवडला. यु आर डुइंग ग्रेट!
पण मलाही असंच वाटलं की, फोटोची गरज नव्हती.
असो... :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

धनंजय's picture

2 Jul 2009 - 9:10 pm | धनंजय

ही अशी.

दिलदारमाणसाची दिलदार माणसाने केलेली मदत.

घृणेची जागा किवेने घेतली!

हे विशेष. जोवर नुसती घृणा आहे, तोवर असे काही चांगले करता येत नाही.
आधी कीव, मग करुणा, मग कार्य जर व्हायचे असेल, तर घृणेने बाजूला होणे आवश्यक आहे.

अनुभवकथन हृदयस्पर्शी आहे.

विकि's picture

2 Jul 2009 - 9:18 pm | विकि

तेरा जबाब नही तु तर ग्रेट !! काय लिहीले आहेस तुला एकदा भेटायलाच हवे असे आता वाटू लागले आहे.काँग्रेस हाऊस म्हणजेच बंबई संगीत मंडळ (ती पाटी आम्ही पाहून आहोतच) समोरच कॉंग्रेस हाऊस नावाचा बार आहे थोडे पुढे केनेडी पुलापाशी बरेच कुंटण खाने आहेत (जहा हर रात जिस्म का सौदा होता है)
बरे तो मिपा सदस्य कोण होता ते नाव सांगितले असतेत तर बरे झाले असते.तो तिथे का गेला? कारण काय? त्याला तरुणाला सांगा एकटा दुकटा तेथे जाऊ नकोस म्हणून .
आपला
थोडीफार मुंबई माहीत असलेला
विकि

नितिन थत्ते's picture

2 Jul 2009 - 11:06 pm | नितिन थत्ते

हृदयस्पर्शी लेखन.

नितिन थत्ते (खराटा)
(रंग माझा वेगळा)

अंतु बर्वा's picture

2 Jul 2009 - 11:19 pm | अंतु बर्वा

हृदयस्पर्शी लेखन तात्या... मनाला एक प्रकारची बोच लावुन जातं तुमचं लिखाण...

नि३'s picture

3 Jul 2009 - 3:11 am | नि३

साला काही ही म्हणा पण पोरगी आहे नैचरल ब्युटी....
कोण म्हणणार तिला पाहुन कि ती वैश्या आहे ते...
तात्या तुम्हाला पाहुन खरच वाट्ते की खरच आयुष्य जगणे ईतके सोपे असु शकते काय?? साला ना जास्त पैश्याचे लालच ना काय??
जे आहे ते समोर उघड्या पुस्तकाप्रमाणे....

--(रोशनी ची आतुरत्तेने वाट पाहणारा)नि३.
अवांतर : लिहा आरामान तात्या लागु द्या तुमचा मुड काहि फीकीर नाही
ईतके दिवस वाट पाहीली काही दिवस आणखी सही...

मदनबाण's picture

3 Jul 2009 - 5:33 am | मदनबाण

शब्द तोकडे पडतात...कोणावरही अशी परिस्थिती येऊ नये !!! :(
सुंदर लेखन...

मदनबाण.....

Success is never permanent, and failure is never final.
Mike Ditka

llपुण्याचे पेशवेll's picture

3 Jul 2009 - 5:57 am | llपुण्याचे पेशवेll

नथ उतरवणे वगैरे शब्द ऐकून 'किशोर शांताबाई काळे' यांच्या कोल्हाट्याचे पोर याची आठवण झाली. त्यात पण चिरा उतरवणे वगैरे शब्द आहेत.
सुंदर लेखन तात्या..
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

चित्रादेव's picture

3 Jul 2009 - 6:45 am | चित्रादेव

निशब्दः ,

तात्या, सुन्न झाले. खरेच बरेच प्रश्ण पडले. तुम्हाला ह्या विषयची माहीती आहे वाचून एक प्रश्ण विचारल्याशिवाय रहावत नाही,
ह्या 'बायकांनी' स्वताचे असे आयुष्य काढले असते तरीही त्यांना स्वताच्या मुलींना तेच करायला भाग कसे पाडतात? निव्वळ पैसा म्हणून?
का काहीच मार्ग नाही म्हणून?
शबनम ला कधी विचारले का की, तिला तिच्या मुलीने काय करावेसे वाटते?

खूपच प्रश्ण पडलेत.....
तात्या, हा भाग वाचून मग रौशनी पण अगदी पटापट वाचून काढली. पाच नंतर इतर भाग कुठे आहेत रौशनीचे.

सहज's picture

3 Jul 2009 - 7:06 am | सहज

हमने उनको भी छुप छुप के आते देखा इन गलियोमे..! ह्या गाण्याबद्दल लेख असेल असे वाटले होते.

पण असे काही वाचले की वाईट वाटते.

जितक्या काही अश्या मुलींच्या सहवासात तात्या तुम्ही आहात त्यांना आर्थीकसाक्षरता, गुंतवणूक, पैशाचे नियोजन शिकवून, चांगली मदत/ मोठे काम करत आहात.

क्रान्ति's picture

3 Jul 2009 - 7:56 am | क्रान्ति

तुमच्या कार्याबद्दल बोलणं आमच्यासारख्या 'मी आणि माझं' या मर्यादित वर्तुळात रहाणा-यांना अशक्य आहे!
ती सुंदर निष्पाप पोर तिच्या आईच्या मार्गावर जाऊ नये, एवढीच देवाजवळ प्रार्थना!

क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा

ऋषिकेश's picture

3 Jul 2009 - 10:28 am | ऋषिकेश

छान हृद्य व्यक्तीचित्र.. अस्वस्थ करणारं!!

मलाही फोटो अनावश्यक वाटला..
विषेशतः तुम्ही जेव्हा व्यक्तीचित्र लिहिता तेव्हा ते थेट डोळ्यासमोर उभं असतं अश्यावेळी वेगळ्या चित्राची गरज नाही असे मला वाटते.

ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे

स्मिता श्रीपाद's picture

3 Jul 2009 - 10:54 am | स्मिता श्रीपाद

तात्या,

तुमचा हा लेख वाचुन अस्वस्थ झाले..

बाहेरच जग किती भयानक आहे आणि आपण किती सुरक्षित वातावरणात वाढलो आहोत याची जाणीव झाली...

बाकी लेख खुप छान झाला आहे..
आणि तुम्हाला मनापासुन __/\__

-स्मिता

सुनील's picture

3 Jul 2009 - 10:56 am | सुनील

उत्तम सल्ला आणि चांगला लेख.

सुदैवाने अभिजात संगीत या एकाच गोष्टीचे मनमुराद व्यसन असल्यामुळे आजतागायत कधी पाय घसरला नाही, कधी वाहवत गेलो नाही. असो..!
जियो!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

स्वाती दिनेश's picture

3 Jul 2009 - 12:02 pm | स्वाती दिनेश

तात्या,
रौशनीसारखेच शबनमही अस्वस्थ करुन गेली, तिची मुलगी तरी ह्या धंद्यात न यावी अशी प्रार्थना पण प्रत्यक्षात काय परिस्थिती असेल ..
मलाही फोटो अनावश्यक वाटला, फोटो असल्या किवा नसल्यामुळे तिच्या कहाणीतला दर्द कमी ,जास्त होत नाही. लागायची ती ठेच लागतेच.
स्वाती

अ-मोल's picture

3 Jul 2009 - 12:30 pm | अ-मोल

अनुभवांची डायरी...
__/\__

शाल्मली's picture

4 Jul 2009 - 1:50 am | शाल्मली

तात्या,
अस्वस्थ करणारा लेख..
तिची मुलगी तरी निदान या अवस्थेतून न जावी असे वाटते..

--शाल्मली.

पक्या's picture

4 Jul 2009 - 5:50 am | पक्या

छान लेख, तात्या. अस्वस्थ करून गेला. फोटो पाहिल्यावर तर अजूनच काळजात चर्र झालं . ह्या सुंदरतेला शापित सौदर्य म्हणावे का?पैश्याचं महत्व पटवून देण्याचं आणि पैसा कशाप्रकारे गुंतवावा ह्याची माहिती देण्याचं उत्तम काम आपण करीत आहात.

एखादी सत्यघटना वाचल्यावर त्यातील व्यक्तीरेखा प्रत्यक्षात कशा दिसत असतील , कथा वाचताना आपल्या डोळयासमोर एक चित्र उभे राहते ते तसेच वास्तवात असेल का? असे प्रश्न उभे राहतात. चित्रामुळे त्यांची उत्तरे मिळाली.

सँडी's picture

4 Jul 2009 - 6:52 am | सँडी

मस्तच!
'बाहेर'?च्या या जगात नि:स्वार्थीपणे वावरणारा देवमाणुसच म्हणावा!

वाटाड्या...'s picture

4 Jul 2009 - 7:10 am | वाटाड्या...

साला...

आपली दुनीयाच बरी आहे. "कॉग्रेस हाऊस " म्हट्ल्यावर मला वाट्लं तुम्ही राजकीय पक्षाच्या आरामगृहाबद्दल लिहीलय , आणि राजकारणी लोक हे करतातच...असही वाटून गेलं....

आपली पोहोच इतकीच...तरीही तात्यांच कौतुक करायला पाहीजे...अशा दुनीयेत राहुन शील सांभाळणे काय खायचं काम नाय...

तरीही अशी वेळ दुश्मनावर पण येऊ नये....तिच्यामारी आमचं पापभीरू मन....

वाटाड्या...

डॉ.प्रसाद दाढे's picture

5 Jul 2009 - 7:54 am | डॉ.प्रसाद दाढे

तरीही अशी वेळ दुश्मनावर पण येऊ नये....तिच्यामारी आमचं पापभीरू मन....

असेच म्हणतो..

अनंता's picture

5 Jul 2009 - 10:22 am | अनंता

शब्द शब्द काळजात खोलवर रुतले, आणखी काय बोलू...?

एखादी गोष्ट गुप्त ठेवायची असेल तर सर्वप्रथम आपल्या पत्नीला सांगा ;)

विसोबा खेचर's picture

5 Jul 2009 - 3:51 pm | विसोबा खेचर

प्रतिसाद देणार्‍या सर्व संवेदनशील वाचकांचा मी ऋणी आहे..

तात्या.

सुधीर काळे's picture

20 Jul 2009 - 9:44 am | सुधीर काळे

तात्यासाहेब,
नमस्कार.
झकास लेख. अगदी हृदयाला भिडला.
तुम्ही खरंच जगावेगळे आहात. अनेक गांवचं पाणी प्यालेले, अनेक अनुभव घेतलेले आणि "परंतु या सम हा" असलेले एकमेव व्यक्तिमत्व.
त्याखेरीज व्यवहारातील सचोटी व एक तर्‍हेचा परस्परविश्वास क्षणात जतविण्याची आपली हातोटीही वाखाणण्यासारखी आहे. आपल्याला मनापासून शुभेच्छा.
कालच जकार्ताला पोचलो.
असो.
सुधीर काळे

विसोबा खेचर's picture

20 Jul 2009 - 11:22 am | विसोबा खेचर

धन्यवाद काळे साहेब,

या वेळेस जमल नाही, परंतु पुढच्या वेळेला याल तेव्हा नक्की भेटू...

तात्या.

हर्षद आनंदी's picture

20 Jul 2009 - 10:20 am | हर्षद आनंदी

समाजातील १का दुर्लक्षित, अत्यंत तिरस्कृत, पण तेवढ्याच आवश्यक (जर हा गट नसेल तर शेटजींसारखे अनेक लांडगे रस्त्यावर फिरु लागतील) भागाकडे अत्यंत स्वच्छ, परोपकारी दॄष्टीने पहाण्याची आपली पध्दत खरोखरच जगावेगळी !! हे एक धाडसच आहे, त्यास आमचा मुजरा.. (नाचुन नाही)
त्यातुनही त्या लोकांना तुम्ही लावत असलेली बचतची सवय, चांगल्या मार्गाला लाऊन सभ्य जीवन जगण्याची दिलेली संधी ... याला म्हणतात खरी समाजसेवा. हो समाजसेवाच .. जरी तुमचे अशील असले तरी !! :)

"देख, अभि साला तेरी चमडी टाईट है, थोबडा ठीक है, जवानी है तबतक तेरे मुजरेपे पैसा उडेगा. एक बार चमडी उतर गयी तो साला कुत्ताभी तेरेको पैसा नही देगा. यही सब यहा बैठे हुए ऐय्याश भडवे तब तेरेपे थुकेंगे भी नही! किसी और कच्ची कली, आयटम को पैसा देंगे. तब क्या करेगी? कहासे लाएगी पैसा? क्या खाएगी?"
हे झणझणीत अंजन भले भल्यांचे डोळे उघडुन जाईल.

बेसनलाडू's picture

20 Jul 2009 - 11:31 pm | बेसनलाडू

हळहळलो.
(व्यथित)बेसनलाडू

सुधीर काळे's picture

22 Jul 2009 - 4:21 pm | सुधीर काळे

पासवर्ड कसा बदलायचा?
(अनाडी) सुधीर काळे
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

दत्ता काळे's picture

22 Jul 2009 - 5:55 pm | दत्ता काळे

"देख, अभि साला तेरी चमडी टाईट है, थोबडा ठीक है, जवानी है तबतक तेरे मुजरेपे पैसा उडेगा. एक बार चमडी उतर गयी तो साला कुत्ताभी तेरेको पैसा नही देगा. यही सब यहा बैठे हुए ऐय्याश भडवे तब तेरेपे थुकेंगे भी नही! किसी और कच्ची कली, आयटम को पैसा देंगे. तब क्या करेगी? कहासे लाएगी पैसा? क्या खाएगी?"

. . ह्या समुपदेशनाच्या ष्टाईलला सलाम !

एकलव्य's picture

23 Jul 2009 - 5:24 am | एकलव्य

तरीही मनातल्या मनात त्या जगनसेठला शिव्याशाप देत मी त्या निष्पाप चिमुरडीच्या हातात शंभराची नोट ठेवली!

किती अगतिक वाटले असेल हा विचार मनात रेंगाळत राहिला.

आपला अनुभव येथे उतरविल्याबद्दल तात्याचे आभार.

योगायोगाने आज हा 2009 चा धागा नजरेस पडला. तात्यांच्या 'रोशनी' एवढाच जबरदस्त.

--- "देख, अभि साला तेरी चमडी टाईट है, थोबडा ठीक है, जवानी है तबतक तेरे मुजरेपे पैसा उडेगा. एक बार चमडी उतर गयी तो साला कुत्ताभी तेरेको पैसा नही देगा. यही सब यहा बैठे हुए ऐय्याश भडवे तब तेरेपे थुकेंगे भी नही! किसी और कच्ची कली, आयटम को पैसा देंगे. तब क्या करेगी? कहासे लाएगी पैसा? क्या खाएगी?"

'हा माणूस मादरचोद नाही आणि याला आपल्यासोबत गेम वाजवण्यात काहीही इंटरेस्ट नाही!' असा कुठेतरी एक विश्वास, एक खात्री तिला होती/आहे!

--- असे अस्सल लिखाण तात्याच करू जाणोत.
लेखात उल्लेखिलेला फोटो इथे प्रकाशित करणे त्या काळी काहीजणांना अनिष्ट वाटले असले, तरी आज एक ऐतिहासिक दस्तावेज म्हणून तो इथे बघायला मिळाला असता तर चांगले होते. आता तात्याही नाहीत, श्रामोही नाहीत, आणि बहुतेक सगळे प्रतिसादकर्तेही हल्ली मिपावर दिसत नाहीत.
--- असे जुने लेख अधून मधून वर येत रहावेत.

साधारणपणे अशाच विषयावरील माझी एक जुनी कथा :
दाराआडची चमेलीबाई ( आणि ती सटवी रोहिंगीण)
http://misalpav.com/node/44357