बाहेर भकास शांतता पसरली होती.. दूरवर एखादी घार घिरट्या घालत होती.. बाकी ऑफिसच्या बाजूचा सगळा परिसर रिकामा होता.. अगदी दुपारी बागडणारे सगळे कळबडवे ऑफिस नावाच्या खुराड्यात लपले होते. सभोवतीच काय, तर कँटिनबाहेर नेमाने टोळक्याने हिंडणार्या काही मैनादेखील गायब होत्या... याचं कारण सूर्यराज आज कडक ड्यूटीवर होते.. अश्या बोरिंग आणि गरम दुपारी माझा फोन किरकिरला..
"काय रे! जवळ बॉस आहे... टवाळक्या नकोत... बोल पटापट.." .. हो.. मी ओळखीच्या नंबरला अशीच सुरवात करतो ;)
"मिटीरिओलॉजिकल डिपार्टमेंटची साईट पाहिलीस का?"
"म्हंजे?"
"म्हंजे वेधशाळेची"
"अरे यार, काय मला दुसरे उद्योग नाहीत का?"
"अरे बघ! या विकेंडला पोचेल पाऊस!"
"तसं ते गेले पंधरवडा बोंबलतायत"
"अरे नाही!.. आता येईलच पाऊस बघ"
"बरं येईल तर येऊ दे.. तू ऑफिसात झोपायच्या वेळी का फोन केलास ते सांग"
"चल ट्रेकला जाऊ..."
मला अचानक बाहेरचं मी म्हणणारं ऊन कमी झाल्यासारखं वाटलं
"या उन्हात?" माझ्यातील उन्हाचा कंटाळा जागा झाला
"नाइट ट्रेक मारूयात....ठीक?"
"ओक्के सर.. गेल्यावेळचा कुर्डुगड राहिलाय.. चल तिथेच"
आता बाहेरचं ऊन केव्हाच चांदण्यामध्ये बदललं होतं :)
शनिवारी भरपूर झोप काढून सकाळी आरामात १२-१ला उठलो.. जेवलो.. तोपर्यंत निघायची वेळ झाली होतीच.. बांद्र्याहून कार केली होती.. फोनाफोनी करून जम(व)लेले मित्र एक एक करून पिक केले.. पनवेलच्या श्री दत्त स्नॅक्सहून वडा-कोथिंबीरवडी-दुसर्याच्या बशीतली साबुदाणा खिचडी-चहा आणि वर मित्राला न आवडलेलं ताक असा मस्त मेनू ;) रिचवून पुढे निघेपर्यंत संध्याकाळचे ५ वाजले ...
कोलाडला थांबलो.. पुन्हा एक चहा मारला.. पौर्णिमा असल्याने चंद्रोदय संध्याकाळी होता.. मात्र पश्चिमेकडून चढणार असल्याने काहीसे उशीरा चढायचे होते.. तेव्हा सगळे आरामात चालले होते. चहा घेऊन क्यामेरा काढायचा म्हणून डिकी उघडली तर आत साप पकडायचा आकडा! म्हटलं
"काय हे हे कशाला इथे?"
"मग काय साप हाताने उचलणार आहेस"
"अरे पण सापाच्या मागे कशाला जायचंय?"
"साप आला तर तुझ्या पुढ्यात?!"
मी गपगार!!
कुर्डुगडावर जनावर असण्याची व रात्रीची बाहेर पडण्याची शक्यता जास्त आहे असे तो मित्र ऐकून होता.. त्यामुळे हा इंतजाम हे कळले.. याआधीही सापाशी ट्रेकला ओळख झाली होती. ते आठवून डोळस, ओली,थंड भीती तरळून गेली.
कोलाड सोडलं आणि पुढे डाव्या फाट्यावरून जितं नावाचं पायथ्याचं गाव गाठलं (पूर्वेकडून चढायचे असल्यास, एक वाट उंबर्डे गावाहूनही आहे). छान छोटंसं गाव.. गावकरी देवळाजवळ जेवणं उरकून गावगप्पा हाणत होते. एक म्हातारबुआ आपणहून आमच्याकडे आले..
"काय पाहुणे कुठचें..." तो नाकातला "चें" ऐकून खास कोकणातला पुजारी भेटल्याची पावतीच मिळाली ;) ..."वाट चुकलात का?"
"नाही हो, कुर्डुगडावर जायचंय.. वाटाड्या मिळेल का?"
"आत्ता?? गडावर? सकाळी सकाळी निघा... इथे मंदिरात राहा हवं तर"
"अहो नाही रात्रीच चढायचाय"
मित्राच्या हातातला आकडा त्यांनी बघितला "अरे तुम्ही तर तयारीने आलात.. वा वा.. मला जनावराचीच भीती होती.. आज पाऊस पडेलसं दिसतंय.. त्यात उद्या वटपौर्णिमा, जनावर लगेच बाहेर निघतं.. तेवढी काळजी घ्या"
पुजारी पुन्हा गावकर्यांत मिसळले. त्यांच्यात बरेच बोलणं झालं शेवटी एक दुसरे आजोबा आले..
"चला मी दाखवतो वाट"
"तुम्ही?.. तुम्ही कशाला दगदग करताय.. एखाद्या पोराला पाठवा.."
"पोरं.. ती कुठली यायला.. शाळेत चार पुस्तकं शिकली की रानवाटा विसरतात ती"
खरंय हल्ली हा अनुभव अनेकदा यायला लागलाय.. एकदम शाळकरी पोरं नाहीतर जुन्या पिढीतील आजोबा वाटाड्या म्हणून यायला तयार होतात. जरा मुलगा मोठा झाला की दिवसभर टपरीवर बिड्या फुंकत बसेल पण अशी जंगलात वाट दाखवणे त्याला कमीपणाचं वाटू लागलंय.. जरा शिक्षण झालं की शहरात पळायचं इतकंच त्याचं इतिकर्तव्य झालंय.. अश्याने हा गड/रानवाटांचा मौखिक ज्ञानाचा खजिना लुप्त होईल असे वाटू लागले आहे. :( :(
असो. तर नेहमीप्रमाणे आमची गाठ आजोबांशी पडलीच :).. मस्त चुणचुणीत आजोबा.. डोक्यावर गांधी टोपी.. आमच्याकडे टॉर्च होतेच.. चढायला सुरवात करण्यासाठी पहिलं पाऊल टाकणार तोच यंदाच्या मोसमातली पहिली सर आदळली!!!!!!
अहाहा! ह्या कोइंसिड्न्सने सगळ्यांची कळी खुलली...
अजून जोषात गड चढू लागलो.. आता इतकंच झालं होतं .. चंद्र योग्य जागी होता.. मात्र ढगांआड होता.. त्यामुळे जंगलात मिट्ट काळोख होता.. विजेर्यांच्या प्रकाशात, चिंब भिजलेल्या वेषात आणि भरपूर गप्पांच्या नादात गड चढत होतो.. रानवाटा जश्या एकातून एक फुटतात तसे गप्पांचे विषय फुटत होते.. जंगलची जादू रंग दाखवू लागली होती.. होय, जंगलाची जादू असते.. एरवी गप्प गप्प राहणारे पण जंगलात, ट्रेकला इतकं बोलतात की हाच का तो असा प्रश्न पडावा.. यावेळच्या ग्रुपमध्ये जवळजवळ सगळेच अनुभवी ट्रेकर्स होते.. त्यात एक जण तर यंदाच्या थंडीत चादर (चार मधील च) ट्रेक करून आला होता (लडाखमध्ये चादर नावाची नदी आहे.. ती हिवाळ्यात गोठते.. त्या गोठलेल्या नदीवरचा ट्रेक प्रचंड प्रसिद्ध, आव्हानात्मक आणि आवाहनात्मही आहे. माझीही इच्छा आहे बघू कधी पूर्ण होतेय) त्यामुळे त्याचे अनुभव, शिवाय एक अजून मित्र अरुणाचलात ट्रेक करून आला होता.. तिथल्या लोकांची मुख्य भुमी वरच्या लोकांशी बोलायची धडपड कळली.. असल्या गप्पांपासून गाडी मित्रांची ऐतिहासिक लफडी, कॉलेजातील प्रसंग, तेव्हाच्या कॉलेज-नट्यांची (शक्ती)स्थानं अशा नानाविध रसिक विषयांवर कधी आली हे कळलं देखील नाहि. अव्याहत तोंड चालू असताना अचानक पाऊस थांबला.. ढग पांगले आणि गोल गोबरा चंद्र आपला प्रकाश मनसोक्त रिता करू लागला..
वा चांदणी रात्र... पहिल्या पावसांत चिंब भिजलेली गात्र... आणि अगदी जवळचे मित्र... (साला) लाईफमधे अजून हवं काय?.. हे म्हणता म्हणता.. आमच्या लाईफमधे अजून वाफाळत्या चहाची कमी होती हे आठवले.. झाले!!.. जिथे होतो तिथल्या तिथे आमचा (फेमस) कापराचा स्टोव्ह काढला.. पाणी गरम केलं.. दूध भुकटी, वाह ताज म्हणत चायपत्ती डिप-डिप केली आणि अहाहा!!!.. आमचा पहिला पाऊस आणि पहिला ट्रेक साजरा झाला..
ट्रेक अगदी सोपा आहे.. रात्री माथ्यावर पोचलो.. एक बालेकिल्ल्याचा सुळका (पिनॅकल) आहे तो मात्र सकाळी चढायचं ठरलं. इथे आकाशात ढग होते मात्र पाऊस नव्हता. सभोवतीची झाडे अक्षरशः लाखो काजव्यांनी भरून गेली होती.. इतकी की झाडांना पाने आहेत की फक्त काजवे लगडलेत हे कळू नये. त्या काळोखात काजव्यांनी सजलेली झाडे अप्रतिम दिसत होती..माथ्यावर एक चार घरांची वस्ती आहे ज्याला कुर्डुपेठ म्हणतात. गावाबाहेर कुर्डाईदेवीचं मंदिर आहे.. छोटीशी कौलारू इमारत आहे. तिथेच झोपायचं ठरलं. मंदिरात गेलो तर आत एक कोपर्यात फळा, एका कोपर्यात दावण्या आणि मधे शेंदूर फासलेले दगड दिसले.. म्हंजे ही इमारत मंदिर-कम-गोठा-कम-शाळा होती असे कळले. फळ्यावर दोन भाग होते डावीकडे १ली/२री लिहिलेले व दुसरीकडे ३री/४थी लिहिलेले. "प्रयन्ते वाळुचे कण रगडीता रगडीता तेल हीगळे" असा सपष्ट सुविचारही होता. ;)
आम्हाला भूक लागली होतीच.. ठेपले, प्याक्ड दही घरून आणलं होतं.. शिवाय कापराच्या स्टोव्ह वर मॅगीसाठी आधण ठेवलं.. ५ मिनिटांत मॅगीचा वास अखंड कुर्डूगडावर दरवळू लागला..ते आणि ठेपले चापून मग मित्राने मग पॉपकॉर्न बनवायचं पाकीट काढलं. खास "देसी" पद्धतीने ती फुलेही फुलवली. मग मात्र सगळे लगेच स्लिपिंग ब्यागांमधे घुसलो.. पडल्यापडल्या भरपूर गप्पा, टवाळक्या चालू होत्याच.. इतक्यात पुन्हा पाऊस सुरू झाला.. आणि गंमत म्हणजे.. आजूबाजूच्या झाडांवरचे काजवे झुंडीने मंदिरात शिरले :) अख्खे मंदिर काजव्यांनी उजळून निघाले होते.. अहाहा! एक तारकादळ ढगांनी झाकोळले होते तर आमच्यासमोर हे दुसरे तितकेच विलोभनीय तारकानृत्य चालू होते. काजव्यांच्या संगतीत घालवलेली ती रात्र अविस्मरणीय होती.
किंचित वाईट इतकं वाटतं की ते अत्यंत विलोभनीय काजवे एकाच्याही फोटोत आले नाहीत.. फोटोत दिसतोय तो नुसता अंधार / फ्लॅश असेल तर छत
सकाळी फटफटलं.. समोरचा सुळका पाहून तोंडातून शीळ निघाली....
सूर्य उगवायचा होता.. पेठेतील बाया सुळक्यावर असलेल्या टाक्यांतून पाणी काढायला निघाल्या होत्या, दोन चार गुरं चरत होती, पक्ष्यांना कंठ फुटले होते, आम्हाला झोपेत गुरफटवून काजवे केव्हाच गायब झाले होते.. आणि या सगळ्या शिनरीला ब्याकग्राऊंडला होती सह्याद्रीची मुख्य रांग!!!... हा गड सह्याद्री्च्या मुख्य रांगेच्या बराच जवळ आहे.. इथून (खरं तर कुठूनही) ही मुख्य रांग बघितली की सह्याद्रीच्या निधड्या छातीची कल्पना येते.. काय आब आहे सह्याद्रीचा!!! वा!
पुढे अख्खा दिवस सुळक्यावर फिरत होतो.. पावसाने रजा घेतली असली तरी ढग असल्याने किती फिरायची तयारी होती.. आता फक्त एक कठीण सुळका राहिला होता.. तिथे एक नेढं होतं .. तिथ पर्यंत पायी जाता येते.. पुढे प्रस्तरारोहण करावे लागते. हा टप्पा थोडा कठीण आहे.. मात्र वर गेल्यावर त्या नेढ्यातून जो वारा त्याला तोड नाही. शिवाय सुळक्यावर एक पाण्याचे टाकं, ३ गुहा आहेत. शिवाय बरीचशी पडलेली तटबंदी आपले जुने वैभव वेचू पाहते आहे. इथून आग्नेयेला "धामणव्हळ" नावाच्या गावा पर्यंत एक दिवसाचा ट्रेल आहे. इच्छुकांनी जरूर करावा, स्मरणीय असेल हे नक्की कारण समोर अप्रतिम सह्याद्री पसरला आहे.
सुळक्यावरून खाली उतरलो. मस्त भूक लागत होती. घड्याळ आपले दोन्ही हात नाचवत ११ वाजल्याचे खिजवत होता.. आता खाली निघायचे होते. खाणे संपले होते.. उकडायलाही लागले होते. त्यामुळे उकाडा आणि भूक या भावनांनी गड सोडायला लावला.. मात्रकाय सुदैव! पुन्हा एकदा ढगांना गळती लागली.. अतिशय मस्त पाऊस कोसळू लागला.. बरं वाटलं!१
गड बहुदा कोणालाही भुकेलं बघू शकत नाहीत. कुर्डुपेठेत एका माउलीने आपणहून थांबवून सगळ्यांना मस्त ग्लासभर निरसं दूध दिलं आणि मग मर्द मराठ्यांमध्ये तरतरी आली :) शिवाय पुढे उतरू लागलो आणि कळलं की काल आपण करवंदाच्या जाळीतून वर चढलो होतो. आणि पानोपानी टप्पोरी करवंद लगडलेली होती.. मग काय विचारता.. दे दणादण!!! आता मात्र अख्खा गड सहज उतरू शकू इतकं खाणं पोटात गेलं होतं. ;)
खाली गावात आदल्या दिवशीच पुजारी आजोबांच्या घरी जेवणाचं करायला सांगितलं होतंच.. खाली पोचलो, पाऊस थांबला नव्हताच.. कपडे बदलले. तासभर ओलेचिंब झालेले थंडगार अंग-बोटे मस्त केळीच्या पानावरच्या वाफाळत्या आंबेमोहोरात घालून शहारली. साधं वरण-आंबेमोहोर भात, नंतर एकदा मेतकूट भात आणि शेवटचा ताक भात हे सगळं विथ लोणचं आणि पापड असा फक्कड मेनू होता
समोर अंगणातील लालबुंद माती पडलेला प्रत्येक थेंब पीत होती.. मातीत अदृश्य होणारा प्रत्येक थेंब तिला अधिकच देखणे करीत होता.. आम्ही यंदाच्या पावसाळ्याची आणि ट्रेकच्या मोसमाची सुरवात इतकी मस्त झाली या आनंदात होतो.. कोकणातील आडगावात, पहिल्या पावसाचा पहिला स्पर्श, नारळीवरून गळणारा प्रत्येक थेंब, पागोळ्यांतून वाहणारे पाणी, पहिल्या पावसाच्या ओल्या मातीच्या गंध मनाला तृप्ती म्हणजे काय हे समजावतो नाही का?
प्रतिक्रिया
28 Jun 2009 - 10:40 pm | टारझन
के व ळ अ प्र ति म !!!
फोटू ही आणि लेख ही ... मस्त रे ऋष्या
- टारझन ट्रेकर
28 Jun 2009 - 10:41 pm | बिपिन कार्यकर्ते
छान ट्रेक रे... सह्याद्रीचा फोटो छाती दडपवून टाकतो.
या लेखातलं बेष्ट वाक्य. :)
बिपिन कार्यकर्ते
29 Jun 2009 - 12:11 am | यशोधरा
काय झकास लिहिलं आहेस ऋषिकेश! एकदम सुरेख!
29 Jun 2009 - 12:14 am | विसोबा खेचर
ऋष्या,
सचित्र लेख क्लास रे!
जियो..!
29 Jun 2009 - 12:19 am | घाटावरचे भट
क आणि ड आणि क!!!
- भट
29 Jun 2009 - 6:16 am | रेवती
मस्त वर्णन!
गड बहुदा कोणालाही भुकेलं बघू शकत पासून शेवटापर्यंत तर असं लिहिलय की बास्स!
फारच छान!
रेवती
29 Jun 2009 - 6:40 am | सुनील
मस्त वर्णन. मागे एका धनगराचा फोटो दिला होता तसा ह्या म्हातार्या वाटाड्याचाही द्यायचा की!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
29 Jun 2009 - 2:12 pm | यशोधरा
>>मागे एका धनगराचा फोटो दिला होता तसा ह्या म्हातार्या वाटाड्याचाही द्यायचा की!
अगदी हेच माझ्याही मनात आलं होतं!
29 Jun 2009 - 6:59 am | अवलिया
ज ब र द स्त !
--अवलिया
29 Jun 2009 - 7:12 am | सहज
फोटो, वर्णन दोन्हीही अत्यंत अप्रतिम!!!!
जबरदस्त!!
29 Jun 2009 - 7:38 am | भाग्यश्री
फार सही लिहीलंयस ऋषिकेश..! फार आवडला ट्रेक! :)
http://www.bhagyashree.co.cc/
29 Jun 2009 - 7:51 am | क्रान्ति
प्रतिसादाला शब्द अपुरे आहेत! प्रत्यक्षात गड चढतोय, असा भास झाला वाचताना. =D> खूप खास!
क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा
29 Jun 2009 - 10:27 am | प्रमोद देव
सुंदर लेखनशैली .
हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!
29 Jun 2009 - 12:42 pm | स्वाती दिनेश
मस्त रे.. आत्ता ट्रेक करायची इच्छा उफाळून आली तुझा हा कुर्डूगड वाचल्यावर.
स्वाती
29 Jun 2009 - 1:54 pm | नंदन
ट्रेकचा अनुभव आवडला. चांदण्या रात्री ट्रेक, काजवे, पहिला पाऊस आणि परतल्यावरचं सात्विक जेवण -- क्या बात है. निधड्या छातीच्या सह्याद्रीचा फोटो मस्तच.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
29 Jun 2009 - 3:36 pm | पाषाणभेद
ऋषिदा मस्त झाला रे ट्रेक!
अजुन बाकीचे ट्रेक्स पण टाक की मग.
मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते.
- मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)
29 Jun 2009 - 3:36 pm | पाषाणभेद
ऋषिदा मस्त झाला रे ट्रेक!
अजुन बाकीचे ट्रेक्स पण टाक की मग.
मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते.
- मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)
29 Jun 2009 - 3:38 pm | पाषाणभेद
ऋषिदा मस्त झाला रे ट्रेक!
अजुन बाकीचे ट्रेक्स पण टाक की मग.
मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते.
- मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)
29 Jun 2009 - 3:46 pm | धमाल मुलगा
वारलो! खपलो!! निवर्तलो!!!
ॠष्या, कुठं रे फेडशील ही पापं? असे सुमडीत करतोस काय रे ट्रेक्स?
मस्त वर्णन. मजा आली...
देवा, कधी आम्हालाही सोबत घेऊन चला की गिरीभ्रमणाला :)
मी आहे, सुमीत आहे, आणखीही हौसे-गवसे-नवसे भेटतील आपल्याला... काय म्हणता?
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
29 Jun 2009 - 5:59 pm | मनिष
हेच म्हणतो!
29 Jun 2009 - 4:01 pm | श्रावण मोडक
ओघवते, थेट मनात घुसणारे लेखन. अभिनंदन.
29 Jun 2009 - 4:21 pm | स्वाती२
अप्रतिम लेख. फोटो खासच.
29 Jun 2009 - 6:09 pm | सूहास (not verified)
सुहास
30 Jun 2009 - 3:16 am | मृदुला
मस्त लेख. आवडला. सह्याद्रीचे चित्र एकदम दडपवणारे. बाकी चित्रांनी सातार्याची आठवण झाली.
30 Jun 2009 - 3:43 am | Nile
आयचा घो! हेवा वाटला राव! काजव्यांचा अनुभव सही आहे!
लई भारी लिहीलं आहे मर्द मराठ्या! :)
30 Jun 2009 - 4:34 am | टुकुल
झक्कास..
30 Jun 2009 - 6:44 am | शाहरुख
छान लिहिले आहे..
30 Jun 2009 - 9:33 am | ऋषिकेश
:)
सगळ्यांचे मस्त प्रतिक्रियांबद्दल मनापासून आभार! :)
ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
30 Jun 2009 - 7:48 pm | शुभान्कर
अप्रतिम .. दुसरा शब्द नाही.