जपानविषयी मला अगदी लहानपणापासूनच आपुलकी वाटत आली आहे ती चहामुळे. योगायोगाने इथेही चहाला “चा” असंच म्हणतात. कॉफी ही जरी चहाचीच श्रीमंत घरात दिलेली बहिण असली तरी चहा मात्र पहिल्यापासूनच कांदेपोहे, बटर, केक, भजी, खारी बिस्कुट ह्या सर्वांना जोडणारा; चांदीच्या किटलीत आणि मातीच्या कुल्हडमधेही “ठेविले अनंते” म्हणत सुखेनैव रहाणारा मध्यमवर्गीयच आहे असं मला नेहमी वाटतं. जपानमधे मिळणारे ओचा (green tea), ऊलॉंगटी, मुगीचा, हर्बल टी असे अनेक आचरट प्रकार मी केवळ ते चहा आहेत म्हणून सहन करते. पण अजूनही जगप्रसिद्ध टी सेरेमनी बघण्याचा योग काही आला नव्हता.
एकदा मी तसं योशिदासानना बोलून दाखवलं. योशिदासान म्हणजे जपानमधल्या माझ्या सबकुछ. इतक्या की आई त्यांना “यशोदा” सानच म्हणते. मला स्वतःला त्या छोटया केसांचा, शर्टपॅंट घालणारा, मेकअप करणारा देवच आहेत की काय असं वाटतं. कारण मी त्यांना काहीही म्हटलं की त्या तथास्तु म्हणून इच्छा लगेच पूर्ण करतात. त्यातून टी सेरेमनी म्हणजे योशिदासानचं होमपिच. बारा गावचं पाणी प्यावं तसा त्यांनी बाराशे सेरेमनीचा चहा प्यायला असेल. त्यामुळे लगेचच पुढच्या वीकांताला जपानी टी सेरेमनी पहायला त्या मला घेऊन गेल्या.
त्यादिवशी बसलेल्या धक्क्यांची सुरुवात योशिदासानला भेटल्या क्षणापासून झाली. आपली "मेहेबूबा मेहेबूबा" वाली हेलन जर अंगभर साडी, खांद्यावर पदर, आंबाडयात गजरा, कपाळावर कुंकू अशा अवतारात उभी राहिली तर साक्षात सलमानसुद्धा जसा तिला ओळखणार नाही तसं मी त्यांना ओळखलंच नाही. गुलाबी रंगाचा चेरीच्या पाकळयांचं डिझाइन असलेला किमोनो, त्यावर जांभळ्या रंगाचा चापूनचोपून बसवलेला दप्तरासारखा ओबी, त्यांच्या गोल चेह-याच्या परिघावर शिस्तीत बसलेले केस, आणि चेह-यावर पडलेलं किमोनोचं गुलाबी प्रतिबिंब…फेब्रुवारीतच पाहिला की मी वसंत!
टी सेरेमनीचं स्पेलिंग सोडल्यास आमची पाटी कोरी होती. त्यामुळे गाडीतून जाताना योशिदासानी 'धावतं'वर्णन केलं. एरवी जपानात जो हिरवा “ओचा” पितात त्याहून अधिक पौष्टिक “माच्चा” नावाचा चहा टी सेरेमनीला पितात. चहाला जमलेल्या मंडळींच्या सम्मेलनाला “चाजी” किंवा “ओचाकाई” असं म्हणतात तर प्रत्यक्षात चहा करण्याच्या कलेला “सादो” (茶道) असं म्हणतात. ह्या दोन्ही चित्रांचा अर्थ अनुक्रमे 'चहा'आणि 'मार्ग'असा आहे. चहा पिण्यातून जे पावित्र्य, साधेपणा, शांतता मिळते तोच जगण्याचा मार्ग आहे असं कदाचित ह्यातून झेन धर्माला सांगायचं असावं. आपण जसा चहा करतो, टाकतो किंवा ठेवतो तसंच जपानीत “ओचा तातेरु” (お茶 立てる) असं म्हणतात. ’'तातेरु' म्हणजे 'उभा करणे'. यजमानांनी उभा केलेला चहा पाहुण्यांनी वज्रासनात बसून प्यायचा की झाली टी सेरेमनी! हाय काय आणि नाय काय!
पण प्रत्यक्षात चहाचा मार्ग भलताच वळणादार होता. ही टी सेरेमनी आतापर्यंत फक्त गुळगुळीत मासिकातच पाहिलेल्या भव्य हॉटेलच्या एका हॉलमधे होती. त्या झुळझुळीत सिल्कच्या जगात आमचं कॉटन उगीचच लक्ष वेधून घेत होतं. आत शिरलो तर दारातंच घोळका करून लोक काहीतरी पहात होते. बघितलं तर एका कागदावर ब्रशने एक मोठ्ठं शून्य काढलेलं होतं. आणि ते बघून सगळे “सुगोई (सही)” “उत्सुकुशिइ (सुंदर)” असं म्हणत होती. “अरे हे तर नुसतंच शून्य आहे!” नागडया राजाच्या गोष्टीतल्या लहान मुलाच्या निरागसतेने मी म्ह्टलं. तर आजूबाजूच्या बायका फिस्सकन हसल्या. आणि योशिदासाननी माझ्याकडे “म्हणून मी तुला कुठे नेत नाही!” असं बघितलं. दहा डिक्शन-या सरसावल्या पण कुणालाही अर्थ सांगता आला नाही. चहा हे जपान्यांसाठी निसर्गाशी किंवा स्वतःशीच तादात्म पावण्याचं एक साधन आहे. टी सेरेमनीतून मिळणा-या पूर्णत्वाचं शून्य हे प्रतीक असावं असा मी अंदाज केला.
ते चित्र धरून त्या खोलीत तातामी चटया, चहाचं सामान, एका कोप-यात अगम्य जपानी कॅलिग्राफीमधे लिहिलेला तक्ता, एक आजी आणि शांतता एवढंच होतं.
त्या आजीनी सगळ्या पाहुण्यांना बसायला सांगितलं. बसण्याची जागा मनाप्रमाणे नव्हे तर मानाप्रमाणे ठरवली जाते. त्यामुळे मी इतर सगळे बसल्यावर वज्रासनात बसले. आणि सेरेमनी सुरु झाली.
काय मजा आहे बघा! आपल्याकडचा गप्पिष्ट चहा जपानात जाऊन एकदम गप्पगप्प होतो. इथे यजमानांच्या वतीने त्या आजी आणि पाहुण्यांच्या वतीने आमच्यातल्याच एक अनुभवी काकू एवढी दोनच माणसं एकमेकांशी बोलत होती. गप्पादेखील आभारप्रदर्शन, हवापाणी आणि चहा ह्याच्या पलिकडे जात नव्हत्या. बाकीचे लोक गंभीर चेहरा करून माना डोलवत होते. चहाचा पत्ताच नव्हता.
एवढयात खोलीचा दरवाजा उघडला आणि बदामी हलव्यासारखी दिसणारी गुलाबी मिठाई आली. ती खायला जाणार एवढयात...काहीतरी टोचलं…
मिठाईचा फोटो आणि पुढची श्टोरी कमिंग सून...
प्रतिक्रिया
19 Jun 2009 - 1:19 pm | विनायक प्रभू
भारी
19 Jun 2009 - 1:24 pm | विंजिनेर
सुगे...
फोटू लय भारी.
(निगोरी-झाके प्रेमी) विंजिनेर
----
कळप-मनोवृत्तीचा सूक्ष्म अभ्यास करण्यात आम्ही गढलेलो असल्यामुळे कंपूबाजी करायला आमच्याकडे वेळ नाही
19 Jun 2009 - 1:30 pm | छोटा डॉन
वाचतो आहे.
फुडचे वर्णन आणि मिठाई लवकर येऊदेत.
मी आलोच जरा चहा मारुन ... ;)
------
छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)
19 Jun 2009 - 1:53 pm | नरेंद्र गोळे
फारच उत्कंठावर्धक आहे!
(शायद... शादी का खयाल मन मे आया है इसीलिये ...)
19 Jun 2009 - 2:06 pm | बहुगुणी
...सुंदर वर्णन सुरू झालंय, उत्कंठावर्धक, पुढच्या भागांची (बरेच असावेत, कारण खूप elaborate ceremony असतो असं ऐकून आहे) वाट पहातोय.
19 Jun 2009 - 2:44 pm | घाटावरचे भट
बेष्ट!!
19 Jun 2009 - 5:13 pm | सूहास (not verified)
<<<जपानमधे मिळणारे ओचा (green tea), ऊलॉंगटी, मुगीचा, हर्बल टी असे अनेक आचरट प्रकार मी केवळ ते चहा आहेत म्हणून सहन करते.>>>
ह्यॅ ह्यॅ ह्यॅ ह्यॅ ,कृपया मिपाकरा॑साठी जपान हुन परतताना आणु नये हि विन॑ती...
<<पण प्रत्यक्षात चहाचा मार्ग भलताच वळणादार होता>>
ह्यॅ ह्यॅ ह्यॅ ह्यॅ ...
<<<बसण्याची जागा मनाप्रमाणे नव्हे तर मानाप्रमाणे ठरवली जाते>>>
कशा प्रकारे,वयानुसार का ??आणी ते क्लॉक वाईज वगैरै का ??
चु॑-हा॑न्च
21 Jun 2009 - 6:38 am | सुबक ठेंगणी
आताच्या काळात वयानुसार...चहा करणा-या/रीच्या सर्वात जवळ बसलेला माणूस हा सर्वात महत्त्वाचा असतो. तोच सगळ्यांच्या वतीने यजमानांशी बोलतो.
पूर्वी सामुराईच्या काळात होणा-या टी-सेरेमनीमध्ये मानाप्रमाणे बसत असावेत.
सर्वात गमतीची गोष्ट म्हणजे टी-सेरेमनीच्या वेळी यजमानाच्या मनात सर्व पाहुण्यांविषयी समभाव असावा अशी अपेक्षा असते. पण तरीही बसताना मात्र कुणी कुठे बसायचं ह्याचे नियम! :)
"ह्यॅ ह्यॅ ह्यॅ ह्यॅ ,कृपया मिपाकरा॑साठी जपान हुन परतताना आणु नये हि विन॑ती..."
आणते कसली...माझ्यासाठीच इतरांना पाठवावा लागतो! :)
19 Jun 2009 - 5:20 pm | सूहास (not verified)
<<<दम मारो दम’वाली हेलन >>>
हेलन नसावी बहुतेक...कि॑वा मग दम मारो दम नसावा...
चु॑-हा॑न्च
19 Jun 2009 - 11:07 pm | अनामिक
हेच म्हणायचे होते... दम मारो दम वाली झिनत अमान (हेलन नाही)....
बाकी पुढचा लेख लवकर येऊ द्या!
-अनामिक
20 Jun 2009 - 3:33 am | सुबक ठेंगणी
हेलन, झीनत अमान आणि तुमच्या सगळ्यांना मनापासून स्वारी... :S लग्गेच करते बदल...
19 Jun 2009 - 5:33 pm | धमाल मुलगा
मजा येत्येय वाचायला....
चला, मिठाई आणा लवकर तोपर्यंत मीही डान्यासोबत एक पेश्शल कटींग चहा मारुन आलोच :)
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
19 Jun 2009 - 6:04 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
मी पण जाऊन एक कटींग मारून येते, पेस्शल दूधवालं! ;-)
मस्त वाटत आहे हे प्रकरण आणि लेखनतर भारीच!
19 Jun 2009 - 5:37 pm | संदीप चित्रे
सुरू व्हायची वाट बघतोय... कॅरॅक्टर्सवगैरे नीट एस्टॅब्लिश झालीयेत :)
19 Jun 2009 - 6:29 pm | लिखाळ
चहा हे जपान्यांसाठी निसर्गाशी किंवा स्वतःशीच तादात्म पावण्याचं एक साधन आहे.
दहा डिक्शन-या सरसावल्या पण कुणालाही अर्थ सांगता आला नाही.
एकदम सुगोई लेखन :)
--(बारा गावचा चहा प्यायलेला) लिखाळ.
या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)
19 Jun 2009 - 6:43 pm | क्रान्ति
वाटच पहात होते सईच्या नव्या लेखाची. मस्त वाटली सुरुवात. आता चहापार्टी लवकर येऊ दे.
:) क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा
19 Jun 2009 - 6:55 pm | रेवती
'हाय टी 'चा पहिला भाग फारच मस्त!
काही विनोदी वाक्यांमुळे मनात गुदगुल्या झाल्या.
क्रमश: आल्यानं पुन्हा चक्का टांगल्यासारखं वाटतय.
रेवती
19 Jun 2009 - 7:26 pm | प्राजु
मजा येते आहे.
लवकर लिही. वाट पहाते आहे. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
19 Jun 2009 - 10:25 pm | वर्षा
मस्त गं! लवकर लवकर लिही...ओनेगाई शिमास!:)
20 Jun 2009 - 12:51 am | पक्या
"एक गरम चाय की प्याली हो
कोई उसको पिलानेवाली हो".
वा मस्त झालाय लेख.
बाकी सुहासशी सहमत. हेलन साठी हवे तर मोनिका माय डार्लिंग ह्या गाण्याचा उल्लेख करा. इतक्या छान लेखात अशी चूक नको.
20 Jun 2009 - 2:15 am | Nile
काय एकेक वाक्य टाकली आहेत यार! बेष्ट! चहाचीत कमाल असणार, ;)
बाकी असंच हाय टीच नुसतंच नाव हाय, बाकी काय नाय तिथे! आपला कट्ट्या वरचा कटिंगच खरा हाय! :)
(टी-टोटल-र) ;)
नाईल.
20 Jun 2009 - 8:22 am | विसोबा खेचर
लेखन अंमळ मजेशीरच! :)
आवडले!
तात्या.
20 Jun 2009 - 12:39 pm | जागु
पुढचे लवकर टाक.
20 Jun 2009 - 12:47 pm | स्वाती दिनेश
मस्त .. कोबेमधल्या दिवसात घेऊन गेलीस ग मला तू...
स्वाती
20 Jun 2009 - 12:53 pm | मराठमोळा
लेख अगदी चहासारखा कडक, स्वादपुर्ण आणी तरतरी आणणारा झाला आहे. :)
पुढचा भाग लवकर येऊ द्या.
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
20 Jun 2009 - 6:13 pm | मस्त कलंदर
त्या आजीबाईंचा फोटो नाहियेका किमोनोमधला??? मला भेटलेल्या जपानी मुलीला मी एकदा विचारलं तेव्हा तो एकसंध एक पोषाख नाही तर बरेचसे कपड्यावर कपडे असतात नि सहसा कुणी ते वापरत नाही असेही तिने सांगितले...
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
21 Jun 2009 - 6:46 am | सुबक ठेंगणी
अहो व्हिडिओच आहे...मी जागेवर बसून घेतलेला...पुढच्या लेखात टाकते.
नुसता किमोनो हा एकच अंगरख्यासारखा असतो. पण बरोबरचे उपकपडे बरेच असतात. किमोचेही खूप प्रकार आहेत्..त्याबद्दल पण लिहीन केव्हातरी...
किमोनो नेसायला किचकट आणि वावरायला गैरसोयीचा असतो. त्यामुळे नाही वापरत कुणी रोज.
20 Jun 2009 - 8:41 pm | अनिल हटेला
चाय ,आजी आणी मिठाइच्या प्रतीक्षेत आहोत..
(चायबाज)
बैलोबा चायनीजकर !!!
I drink only days ,which starts from 'T'...
Tuesday
Thursday
Today ;-)
20 Jun 2009 - 8:41 pm | अनिल हटेला
चाय ,आजी आणी मिठाइच्या प्रतीक्षेत आहोत..
(चायबाज)
बैलोबा चायनीजकर !!!
I drink only days ,which starts from 'T'...
Tuesday
Thursday
Today ;-)
20 Jun 2009 - 10:31 pm | मदनबाण
पुढचा भाग लवकर टंका. :)
मदनबाण.....
Success is never permanent, and failure is never final.
Mike Ditka
21 Jun 2009 - 3:53 am | पक्या
हेलन च्या गाण्याचा बदल केलेला पाहिला. पण या गाण्यात (मुंगडा) हेलन तुम्ही वर्णिलेल्याच वेषात आहे...म्हणजे नऊवारी साडी, केसांचा अंबाडा, त्यावर गजरा वगैरे. (म्हणजे आता नटीचा उल्लेख बरोबर आहे पण गाण्याचा चुकला.)
21 Jun 2009 - 4:28 am | सुबक ठेंगणी
माझं हिंदी चित्रपटांविषयीचं ज्ञान अगाध आहेच! पण मिपाकर मला मोठ्या मनाने माफ करतील ही खात्री असल्याने अनेकदा चुकायची हिंमत करत्येय... :)
आज "हेलन दिवस"साजरा करावा लागणार आहे...