छोटाच होता,काही कळायचं वय नव्हते.
तो-आई,तांदळाची खीर कर ना!
"हात मेल्या दळभद्री कुठला!"
वडील दुसर्या गावी नोकरीवर होते.सुट्टीवर येताना रातराणीचा अपघात झाला.
मोठा मुलगा म्हणून जे काही सांगितलं ते करत गेला.
"बाई,आज आमच्या घरी चौदावा आहे,मी शाळेत येवू शकणार नाही".
न सांगता घरी राहीला असता तरी कुणी काही म्हणले नसते.
तांदळाची खीर वाढताना आईचा बांध फुटला. भर पंक्तीत त्याला बदडला.
लहान होता तरी मोठे व्हावे लागले.
उद्ध्वस्त घडी बसवायला अर्धे आयुष्य गेले.
अचानक,म्हातारी आई गेली.
तेरावा झाला,कोपर्यात बसून होता.
बाजुलाच खेळत असलेला त्याचा छोटा मुलगा आपल्या बहिणीला म्हणाला उद्या आई तांदळाची खीर करणार आहे.
ते त्याने ऐकले,तिरीमिरीत उठला,पोराला बदड बदड बदडले...
छोटाच होता,काही कळायचं वय नव्हते.....
प्रतिक्रिया
15 Sep 2025 - 3:42 pm | प्रसाद गोडबोले
खूपच खतरनाक लिहिला आहे कर्नल साहेब.
श्राद्धाचा स्वयंपाक ही एक स्वतंत्र पाककलेतील कला आहे. पण दुर्दैवाने या सर्व पदार्थांना श्राद्धाचे लेबल चिकटल्यामुळे अन्यवेळीस कधीच केल्या जात नाही त्या गोष्टी. मला स्वतःला तांदळाची खीर, डाळीचे वडे हे दोन्हीही फार आवडते पण शेवटचे कधी खाल्लेले ते आठवतही नाही आता.
कथा छान आहे. मात्र पालकांनी मुलाला मारल हे वाचून वाटले. मृत्यू अंत्येष्टी श्राद्ध इत्यादी सर्व धार्मिक संकल्पनातून तत्वज्ञान पूर्णपणे विस्मरणात गेले असल्यामुळे लोकांना ह्यातील गमक कळतच नाही असो.
विषयांतर नको. लिहित रहा
15 Sep 2025 - 5:36 pm | विवेकपटाईत
उत्तर भारतात तांदूळाची खीर केंव्हाही करतात. आम्ही श्राद्ध पक्षात आणि तिथी असेल त्या दिवशी ही म्हणजे वर्षातून चार पाच वेळा तरी खीर होतेच.
15 Sep 2025 - 5:47 pm | कुमार१
कथा छान आहे.
15 Sep 2025 - 5:53 pm | कंजूस
टोचणारी कथा.
15 Sep 2025 - 6:15 pm | श्वेता व्यास
कथेचं वर्तुळ चांगलं पूर्ण झालंय, पण जे आईने केलं तेच मुलाने तरी नव्हतं करायला पाहिजे, पण राग आणि दुःखाच्या भरात कशीही वागतात माणसे.
15 Sep 2025 - 9:10 pm | राजेंद्र मेहेंदळे
धाड धाड वाचत शेवटपर्यंत आलो आणि शेवटच्या वाक्याला घशात आवंढा दाटला.
बरेचदा बाहेरचा किवा दुसरा कुठला राग घरात मुलांवर निघतो पण पुढे काही वर्षांनी ते आठवले तरी नकोसे होते. असो. कथा आवडली.
15 Sep 2025 - 9:19 pm | अभ्या..
छान तरी कशी म्हणायची कथा?
अप्रतिम लेखन
15 Sep 2025 - 10:52 pm | कर्नलतपस्वी
तोच आता मोठा झालायं. आजही मला भेटतो. त्याच्या डोळ्यात एक प्रश्न चिन्ह आजही मला दिसते. त्याची आई लहानपणीच न कळत्या वयात गेली. कशी गेली,केव्हां गेली या बद्दल कुणीच काही सांगत नाही. त्याला जाणून घ्यायची खुप इच्छा आहे.
लहानपणी मनावर विपरित परिणाम होईल म्हणून सांगीतले नाही,आता त्याच्याच मनाने आईची निर्माण केलेल्या प्रतिमेला धक्का लागू नये म्हणून कुणी सांगत नाही.
प्रश्नाची पुनरावृत्ती एवढाच कथेचा गाभा आहे. सत्य अनुभव,मलाही बरेच दिवस सतावत होता. आज बाहेर पडला.
सर्व वाचक ,प्रतिसादकांचे मनापासून आभार.
16 Sep 2025 - 7:50 pm | राजेंद्र मेहेंदळे
....
17 Sep 2025 - 6:42 am | कर्नलतपस्वी
प्रतिसादात लिहिलंय. दुर्दैवाने त्या गोष्टीचा साक्षीदार असल्याने तो माझ्या कडे आशेने बघतो पण न तो स्पष्ट विचारू शकतो न मी बोलू शकतो.
15 Sep 2025 - 11:20 pm | चित्रगुप्त
निशब्द.
16 Sep 2025 - 10:27 am | सौंदाळा
जबरदस्त लिखाण
16 Sep 2025 - 6:30 pm | श्वेता२४
हळवी करणारी कथा.मी जेमतेम ८ वर्षाची होते. मलाही तांदळाची खीर व उडदाचे वडे खूप आवडतात. लहानपणी भर पंक्तीत मीहि मस्त झालेत ग आजी म्हणताच आई, आजी व मोठी बहीण खाउ की गिळु नजरेनं पाहत होत्या. मला काहीच कळेना. आजोबा शांतपणे म्हणाले...श्राद्धाच्या जेवणाला छान म्हणायचं नसतं. दु:खाचे जेवण असतं ते. माझी आई व तुझी पणजी देवाघरी गेली होती आज. मग काय झाले ते कळलं. ....असो. तुमचे लेखन वाचून वाटले...मी नशीबवान निघीले.. कुणी बदडलं नाही...काळ आला होता पण...
17 Sep 2025 - 6:49 am | कर्नलतपस्वी
खरे आहे. काही चांगल्या जुन्या परंपरा माणूस विसरत चाललाय. दुखवटा काढणे एक पद्धत आहे. चौदाव्याला ज्याने अंतिम संस्कार केला त्याला नवीन कपडे,पंचा,उपरणे देत आम्ही तुझ्या दुखात सहभागी आहोत अशी भावना व्यक्त केली जायची.
लहान मुलांना कळत नसते. निरागस अबोध असतात. काहीही विचारतात. कालच माझी छोटी नात विचारत होती सावत्र म्हणजे काय?
16 Sep 2025 - 7:34 pm | अमरेंद्र बाहुबली
कथा छान आहे, मला श्राद्ध वगैरेच्या ठिकाणी जेवायला आवडत नाही. दुखी वातावरन असते त्यात जेवायचे? पण लोक तिथेही आग्रह करतात, पळूनही जाता येत नाही आणी नकारही देता येत नाही. :(
17 Sep 2025 - 6:38 am | कर्नलतपस्वी
इतर कुठल्याही वेळी गेला नाहीत तरी चालेल पण मरणदारी आणी तोरणदारी जरूर जावे.या पाठिमागे मोठा उद्देश आहे. दोन्ही ठिकाणी मानसिक, शारिरीक, भावनिक मदतीची गरज असते व समाजाचा एक घटक म्हणून व्यक्तीचे कर्तव्य समजले जायचे.
आता आशी वेळ आली आहे की स्वताचे कलेवर स्वताच खांद्यावर अंत्यसंस्कारासाठी घेऊन जावे लागेल की काय वाटते...... इतका माणूस एकटा होत चाललाय.
पटलं तर बघा.
नऊशे लोकांच्या सोसायटीत जवळचे नातेवाईक सोडून नऊ लोक सुद्धा जमा होत नाहीत.
16 Sep 2025 - 7:37 pm | प्रचेतस
किमान शब्दात कमाल आशय.
17 Sep 2025 - 5:05 am | चिखलू
एकदम भावनात्मक मांडणी.
17 Sep 2025 - 6:50 am | कर्नलतपस्वी
मनापासून धन्यवाद.
17 Sep 2025 - 4:24 pm | निनाद
या जेवणाला दु:खाचे वातावरण असू नये असे आमच्या गुरूजींनी एकदा मला व्यवस्थित पणे समजावून दिले. त्या नंतर माझे गैरसमज दूर झाले. श्राद्धाच्या वेळी पितरे येतात आणि जेवणार्यांच्या रुपाने (अन्न) ग्रहण करतात आणि वासनेतून सुटतात यावेळी पितरे आपल्याला आशिर्वाद देतात. जसे देव महत्त्वाचे तशी पितरे पण महत्त्वाची आहेत. कोणत्याही वडिलांना आणि आजोबांना आपल्या मुला नातवाचे वाईट व्हावे असे वाटत नाही. आपल्या वंशाचा विस्तार व्हावा प्रगती व्हावी हीच भावना असते.
त्यामुळे श्राद्धाच्या जेवणास नि:संकोचपणे आणि अगत्याने जावे. पितरां विषयी सुयोग्य भाव मनात आणावा त्यांना योग्य ती गति मिळावी यासाठी प्रार्थना करावी. त्यांचे आशिर्वाद मागावेत. आणि मनापासून जेवण करावे. त्यातच आपले आणि पितरांचे कल्याण आहे. आपल्या रुपाने कोण जेऊन जाईल हे आपल्याला माहित नसते. आपापल्या पूर्वजन्मीच्या कर्माच्या फलानुसार ते घडते.
असे नसते ते तर आपल्या पुर्वाजांनी या परंपरा, विधी आणलेच नसते.
17 Sep 2025 - 6:09 pm | कर्नलतपस्वी
अतिशय संतुलित आणी व्यवहार्य प्रतिसाद.
संस्कार,श्राद्ध इत्यादी समाज व्यवस्था होती काही प्रमाणात आजही आहे.
संगणकाचे उद्योग, प्रशिक्षण वर्ग काढताना सुद्धा पुजा पाठ करूनच सुरुवात करतात.
अनेक संतानी ,माउली,तुकोबाराय, एकनाथ, कबीरदास इत्यादींनी कर्मकांडावर ताशेरे ओढले असले तरी ते या पाठमागची मुळ भावनेचा आदरच करताना दिसले आहेत. उदाहरणार्थ,
बाईल सवासिण आई ।
आपण पितरांचे ठायीं ॥१॥
थोर वेच जाला नष्टा ।
अवघ्या अपसव्य चेष्टा ॥ध्रु.॥
विषयांचे चरवणीं ।
केली आयुष्याची गाळणी ॥२॥
तुका म्हणे लंडा ।
नाहीं दया देव धोंडा ॥३॥
जित्या माय बापा न घालिती अन्न |
मेल्या प्रेतावर करिती पिंडदान ||
पहा पहा संसाराचा कैसा आचारु |
जिता अबोला मा मेल्या उच्चारू ||
जित्या मायबापा न करिती नमन |
मेल्या मागे करिती मस्तक वपन ||
जित्या मायबापा धड गोड नाही |
श्राद्धी तळण-मळण परवडी पाही ||
जिंदा बाप ना पुजे,मरे बाद पुजवाय
मुठ्ठीभर चावल दे के कौवे को बाप बनवाय
वरील संत वचने आजच्या समाज व्यवहारावर टिका केली आहे .
काही विद्वान लोकांनी याचा वेगळाच अर्थ काढला.
असो,कालाय तस्मै नमा: