मदर्स डे..!!

प्राजु's picture
प्राजु in जनातलं, मनातलं
18 May 2009 - 3:11 am

२६ नोव्हेंबर २००३ हा दिवस खर्‍या अर्थाने म्हणजे अगदी शब्दशः माझ्यासाठी मदर्स डे होता.
नववा महिना लागून २-३ दिवसच झालेले .. थोडे कॉप्लिकेशन्स होऊनसुद्धा, महिनाभर आधी झालेलं माझं पिलू .. मला मिळालं. सी-सेक्शनसाठी दिलेली भूल उतरल्यावर जेव्हा मला जाग आली, तेव्हा फक्त मान वळवून पाहिलं तर शेजारच्या पलंगावर माझी आई बसली होती आणि तिच्या बाजूला, माझ्या आजीच्या नऊवारी साडीच्या मऊसूत कपड्यात गुंडाळून माझं येडू झोपलं होतं.. डोक्यालाही टोपड्यासारखा कपडा बांधला होता त्याच्या, त्यामुळे त्या कपड्याच्या कडेवरून मला फक्त त्याचं सरळसोट नाकच दिसत होतं.. इवलंस, गोरं गोरं..!

तसं पाहिलं तर , स्त्रीने बाळंत होणं ही समाजाच्या दृष्टीने एक अतिशय सामान्य बाब असली तरी, प्रत्येक स्त्री साठी हा एक सोहळा असतो. आणि का नसावा? 'त्या'ची चाहूल लागताच, 'त्या'च्या रूपाची स्वप्नं रंगवणं.. 'त्या'च्यासाठी चांगलं म्हणून आपल्याला न आवडणार्‍या गोष्टी करणं, किंवा आपल्याला न आवडणारे दूधासारखे पदार्थ सुद्धा खाणं-पिणं... आणि ते खाऊनही ते न पचणं.. उलट्या होताना पिळवटून निघणं.. चक्कर येऊ नये म्हणून सावध असणं.. सुहास शिरवळकर वाचायचे सोडून, भगवत गीता वाचणं.. , 'कजरारे कजरारे काले काले नैना ' ऐकायचे सोडून रामरक्षा, गर्भसंस्कार ऐकणं.. नेहमीची आपली धडाधड चाल सोडून अगदी जपून एकेक पाऊल टाकणं.. सटरफटर ,पाणीपुरीसारखे रोड साईड पदार्थ अगदीच जपून खाणं.. डॉक्टर विझीट ला जाणं.. हळूहळू 'त्या'ची वाढ होताना पाहून मोहरून जाणं.. इवले इवले हात्-पाय अल्ट्रासाऊंड मध्ये पाहून नकळत डोळे ओलावणं.. रात्री अपरात्री लत्ताप्रहार सहन करणं.. त्या प्रहारांनी दचकून जागं होणं.. आपली पाऊले दिसायची बंद झाल्यावर दिवस मोजणं.. आणि सगळ्यांत कठीण म्हणजे प्रचंड ताण, त्रास, धोका पत्करून प्रसंगी आपल्या जीवावर बेतायची शक्यताही असताना त्या जीवाला या जगात आणणं... हात्-पाय आणि इतर अवयव असलेला आपल्याच मांसाचा गोळा आपलं रूपडं घेऊन आलाय हे पाहणं... बाळंतपण म्हणजे स्त्रीचा पुनर्जन्म असं म्हणतात ते उगाच नाही. जीवघेणा असला तरी हा नऊ महिने चालणारा सोहळाच असतो. आणि गंमत अशी की, पहिल्या वेळी जितका उत्साह असतो या सोहळ्यांत तितकाच दुसर्‍या-तिसर्‍या वेळी असतो.. फरक इतकाच की दुसर्‍या -तिसर्‍या वेळी अनुभव गाठीशी असतो.

माझी अवस्था काही याहून वेगळी नव्हती. फक्त २८ डिसेंबर दिलेली तारीख असताना, माझं येडू २६ नोव्हेंबरलाच आलं या जगात.. दोघेही सुखरूप होतो हे आमच्या घरच्यांसाठी आणि माझ्यासाठीही खूप होतं. पोटावर टाके होते.. २-३ दिवस उठून बसता येत नव्हतं.. जेव्हा पहिल्यांदा उठून बसले तेव्हा आईने त्याला माझ्या मांडीवर दिलं.. तेव्हा त्याला निरखून बघण्यातच किती वेळ गेला कोणास ठाऊक! सरळसोट नाक, अतिशय नाजूक जिवणी, लांब पापण्या, लाल गुलाबी ओठ किंचीत मुडपलेले.. मोठं कपाळ.. हनुवटिवर हट्टीपणा दाखवणारी खळी.. .. हा एक दिवस जो माझ्या अयुष्यात मी कधीही नाही विसरणार. पिलू हळूहळू एकेक लिला दाखवत होतं.. हुंकार भरत होतं.. झोपेत हसत होतं.. मध्ये रडत होतं.. कित्ती नानाप्रकार होते ते! जागं असताना, काही गप्पा मारायला लागलं त्याच्याशी तर, डोळ्यांत अनेक प्रकारचे भाव दाखवत होतं. शी-सोहळा चालू झाला की, अत्यंत आनंदीत होऊन कुठेतरी छताकडे पहात वेगवेगळे आवाज काढायचं. माझी आजी म्हणायची "हगर्‍या गप्पा चालू झाल्या का?". बघता बघता लेकरू आठ महिन्यांचं झालं.. बाबाबाबा--- मामामा.. आदलाआदला--फादलाफादला... काकालकाअका असे काहीही न समजणारे शब्द बोलू लागलं. पिलू ६ महिन्याचं असताना त्याचा बाबा अमेरिकेला गेला. ... तो त्याचा वर्षाच्या वाढदिवसालाच आला. मात्र बाबाकडे बघताना काहीदिवस पिलूला "हा माणूस कोण?" असा प्रश्न कायम पडलेला असायचा. पहिले काही दिवस बाबाकडे बघून चुकून सुद्धा हसण्याचा प्रयास त्याने केला नाही. हळूहळू पिलूला खात्री पटली की "बाबा नावाचा माणूस आपल्याच घरात राहतो आणि आपल्यातलाच आहे." पिलूनं पहिलं टाकलेलं पाऊल ... त्यात इतकं नाविन्य वाटलं त्याला की, अखंड २५ मिनिटे ते इतकं चाललं .. इतकं चाललं की, बहुधा पाय खूप दुखले असावेत. त्यामुळे पुढचा महिनाभर अजिबात चाललं नाही. अखंड बोबडी बडबड.. तुरूतुरू पळणारी पाऊलं.. आणि त्या पाऊलातून छुमछुमणारा नाद.. अख्ख घर झपाटून गेलं. देवघरातल्या देवांना बेडरूम, लिव्हिंगरूमची सैर होऊ लागली. देवघरातली घंटा, घरात - बाथरूमधल्या बादलीत कुठेही सापडू लागली. सगळ्यांना प्रमोशन मिळालं. वरची जागा! रॅकमधले कणकेचे, डाळ्-तांदळाचे डबे आपोआप वरच्या कप्प्यांमध्ये गेले. बाथरूम मधले मग्स रोज आधी शोधायचे आणि मग अंघोळ करायची हा एक उद्योगच झाला. हळूहळू हे ही कमी झालं.. मग कधी कधी टिव्हीवरची सीआयडी सारखी सिरियल ऐन रंगात आलेली असताना, अचानक फॅशन टीव्ही चालू होऊ लागलं.. खिडकीत येणार्‍या चिमण्यांना पोळीचे तुकडे, तांदूळ.. घातले जाऊ लागले, आजीनं फ्रीजमधून नुकतंच बाहेर काढून ठेवलेलं गंजभर ताक, देवघर झाडण्यासाठी असलेल्या छोट्या झाडणीने ढवळून निघालं, कधी कधी रांगोळी, देवापुढे छोट्या वाटित ठेवलेली दूध-सखर, आणि हळद कुंकू यांची लाल-पिवळी खीर होऊ लागली.

पिलू २ वर्षाचं झालं .. आणि आई आणि पिलू दोघेही भुर्रर्रर उडून बाबा पाठोपाठ अमेरिकेत आले. अमेरिकेतल्या सर्कलमध्ये दोन-सव्वादोन वर्षाचं अखंड बडबड करणारं आणि अजिबात डायपर न वापरणारं पिलू म्हणून फारच कौतुक झालं.. नुकतंच बोबडं मराठी बोलायला लागलेलं पिलू तितक्याच उत्साही बोबडेपणानं अमेरेकन ऍसेंट मध्ये इंग्रजी बोलू लागलं अगदी "आय्लबी लाईत बॅक.. यू स्ते हिअल.." असं दिमाखात बोलू लागलं. २ वर्ष ९ महिन्याचं झालं आणि प्रिस्कूल ला नाव घातलं. शाळेच्या पहिल्या दिवशी घरातून उत्साहात निघालेलं पिलू, नंतर आई सोडून जाताना मात्र मोठे मोठे पाण्याचे थेंब डोळ्यांमध्ये घेऊन, "तू जाऊ नाकोशना" असं नजरेने सांगत तोंडाने मात्र हमसत हमसत हुंदका रोखून ," तू लवकल ये काय... खूप लवकर ये काय.. अगदी खूप लवकल ये काय..." असं कपर्‍या स्वराने म्हणत होतं. त्याला शिक्षकांचा स्वाधीन करून खाली आल्यावर.. का कोण जाणे माझ्या डोळ्यांतही ओल आली असल्याची जाणीव झाली. समोरच्या लायब्ररीत फक्त २ तास थांबायचं होतं मग शाळा सुटणार होती.. आणि पिलूला घेऊन घरी जायचं होतं. 'काय करत असेल, रडत असेल का?, रमला असेल का?, ' असे विचार चालू होते. .. मात्र लगेच सेलफोन वाजला.. पुन्हा शाळेत गेले. पिलू रडून लालेलाल झालेलं.. "तू इथेच बश... नको जाऊश" .. झालं !!! त्या शाळेची कोपर्‍यात बसणारी, २७ वर्षाची मी... महिनाभर विद्यार्थिनी झाले. पण रमलं पिलू. हळूहळू बोलण्यात स्पष्टपणा आला. बोबले बोल कमी झाले.. शाळेतून रोज एकेक नवनवीन क्राफ्ट घरी येऊ लागलं. पहिलावर्षीच्या कॉन्फरन्सला गेले... त्याची प्रगती, त्याचं वागणं.. त्याचं काम करणं.. याचे रिपोर्ट्स वाचून उगाचच अभिमान वाटला. एक गोष्ट टिचरनी सांगितली "ही डजन्ट लाईक टू गेट डर्टी..!" मला यात काही नविन नव्हतं. साधा वरण-भात भरवताना, एखादं शीत अंगावर पडलं.."हेऽऽऽऽऽऽअय" करून ओरडणारं माझं पिलू.. डर्टी कसं राहणार? लिबलिबित, गिळगिळीत असते म्हणून आंब्याची कोय कधीही त्याने हातात नाही घेतली. त्यामुळे 'ही डजन्ट लाई़क टू गेट डर्टी.."हे नेहमीचंच होतं माझ्यासाठी.

पिलू ४ वर्षाचं झालं.. आवडीनिवडी बदलल्या.. वागणंही बरंच बदललं. प्रश्नांचे भडीमार होऊ लागले.. दिलेल्या उत्तरातून पुन्हा नवनवे प्रश्न येऊ लागले. मित्र मंडळाचा विस्तार झाला. भारतवारीहून परतत असताना विमान चालू होऊन पुन्हा बंद झाले. इंजिन बंद झालं.. लाईट बंद झाले. ताबडतोब प्रश्न आला.."या विमानातले सेल संपले का?" "नाही मनू.. या विमानाला सेल लागत नाहीत.. पेट्रोल लागतं" - इति मी. लग्गेचच " मग आता पेट्रोल पंपावर जाणार का विमान?" .. हे आणि असे.. हजारो प्रश्न. संपूर्ण प्रवासात जितकावेळ पिलू जागं होतं तितका वेळ मी अखंड कसल्या ना कसल्या प्रश्नांची उत्तरं देत होतं. असेच प्रश्न -उत्तरं .. करता करता पिलू केजीला गेलं. स्कूलबसने आता शाळेत जाणार...
पहिला दिवस.. स्कूलबस आली.. कॉम्प्लेक्स मधली खूप मुलं त्या बसमधून जाणारी. बस समोर येताच.. काही जणं ताबडतोब रडू लागली. माझं पिलू रडलं नाही.. मात्र स्कूल बसच्या पायरीवरून मागे वळून.. भरलेल्या डोळ्याने .. "तू येणार आहेस ना.. आजच्या दिवस?" असं म्हणत हात हलवत आत जाऊन बसलं. आजपर्यंत मी जात होते शाळेत सोडायला. आणि आज पिलू एकटंच निघालं होतं शाळेला.. माझ्याशिवाय!!! पहिल्यादिवशी शाळेत आम्हालाही जायचंच होतं.. आम्ही बसच्या मागे जाणार होतोच शाळेत. पण तरीही बस मध्ये निट बसेल ना.. नीट उतरेल ना.. असले विचार पिच्छा सोडत नव्हते. पिलू नियमीत केजीला जाऊ लागलं. इतके दिवस फक्त २ ते अडीच तास शाळेत जाणारं पिलू आता केजीला सकाळी ९ ते ३.१५ असं जाऊ लागलं.. बस मधून ४ वाजेपर्यंत घरी येऊ लागलं. सुरूवातीचे काही दिवस घर अतिशय ओकंबोकं वाटलं.. पण हळूहळू सवय झाली.
आणि आज.. ८ मे २००९ .. म्हणजे मदर्स डे च्या आदल्यादिवशी.. हेच ताकात झाडू घुसळणारं, देवाच्या मूर्तीना अख्ख्या घराची सहल घडवणारं, रिमोटने चॅनेल बदलणारं, बोबलं इंग्रजी बोलणारं.. मला प्रिस्कूलचा पहिला महिना शाळेत एका बाजूला बसायला लावणारं, विमानातले सेल संपल्याबद्दल काळजी करणारं.. आणि मनामध्ये अखंड प्रश्नचिन्हं घेऊन हिंडणारं माझं येडू... स्कूलबस मधून उतरल्या उतरल्या.. शाळेमध्ये गेले २-३ महिने चालू असलेला प्रोजेक्ट... एका मोठ्या , वेगवेगळ्या रिबन्सनी सजवलेल्या डिस्पोजेबल ग्लास मध्ये माती घालून त्यात लावलेलं झेंडूच्या फुलाचं एक फूल आलेलं रोप हातात घेऊन... मला पाहिल्या पहिल्या वर मान करून "हॅप्पी मदर्स डे!!!!!" असं म्हणत खट्याळ भाव भरलेल्या डोळ्यांनी हसत हात वर करून मला तो ग्लास देत होतं...तो ग्लास म्हणजे ते रोप त्याच्या हातून घेऊन..माझ्याही नकळत मी त्याचा एक गोड गोड उम्म्मा (पापा, मुका ..विंग्रजीत किस्स! {मराठी भाषेला माझ्या पिलूने बहाल केलेला हा शब्द} )घेतला.

त्याचा हात धरून घरापर्यंत चालत येत असताना जी काही ५-६ मिनीटं लागली त्या ५-६ मिनीटांत मी जवळ जवळ ५-६ वर्ष मागे गेले.. आणि नुकतंच घडल्यासारखं सगळं एकदम डोळ्यापुढे तरळत राहिलं...

मे महिन्यातला दुसरा रविवार हा जरी जागतिक मदर्स डे म्हणून साजरा केला जात असला.. तरी २६ नोव्हेंबर या दिवशी मी खर्‍या अर्थाने मदर म्हणजेच आई झाले, हा दिवस सुद्धा माझ्यासाठी मदर्स डे च आहे कारण यादिवशी, आई होणं.. किंवा एका मुलाची आई असणं म्हणजे काय याची जाणीव मला झाली. माझ्या आईने मला घडवलं.. आणि शब्दश: घडवलं याचा अर्थ आता कदाचित मला समजायला लागला आहे असं वाटतं.

म्हणूनच मातृदेवो भव असं म्हणत असावेत..कारण आई म्हणजे..
श्वासाची लय असते
विश्वासाचे आलय असते
अशुभाला भय असते
वात्सल्याची सय असते
..... हो ना?

- प्राजु

(प्रत्येकाच्याच आयुष्यात या सगळ्या गोष्टी होत असतात.... यात नविन काही नाही. मात्र मला मन मोकळं करायचं होतं म्हणून लिहिलं.)

हे ठिकाणप्रकटनलेख

प्रतिक्रिया

बिपिन कार्यकर्ते's picture

18 May 2009 - 3:25 am | बिपिन कार्यकर्ते

सुंदर मुक्तक. खूप आठवणी जागवल्यास. वाचताना मजा आली.

माझ्या पहिल्या मुलीला पहिल्यांदा पाहिलं आणि स्पर्श केला तो क्षण माझ्या स्मृतीत अगदी 'फोटोग्राफिक' म्हणतात तसा बसला आहे. त्याक्षणी काय वाटले, आजूबाजूला काय होते, कोण होते, सगळे अगदी घट्ट आहे डोक्यात. तो एक विलक्षण क्षण असतो हे खरेच, विशेषतः पहिल्या अपत्यावेळी.

बाकी बाळलीला तर काय वर्णाव्या? मोठी होईपर्यंत नक्को जीव करतात कार्टी.... पण मोठी झाली की "मोठी का झालीस? अशी लहानच गोडुली का नाही राहिलीस?" असं वाटतं. खूप काही शिकवून जातात मुलं. उगाच नाही 'चाइल्ड इज फादर ऑफ मॅन' असं म्हणत.

बिपिन कार्यकर्ते

पोलिसकाका_जयहिन्द's picture

18 May 2009 - 4:37 am | पोलिसकाका_जयहिन्द

अजून अनुभव घेतला नाही पिलूचा पण वाचताना मनाला गोड स्पर्श झाला...
काय-द्याच बोला.....

पर्नल नेने मराठे's picture

18 May 2009 - 1:19 pm | पर्नल नेने मराठे

सेम हियर.... छान वाट्ले वाचताना.
चुचु

बहुगुणी's picture

18 May 2009 - 4:57 am | बहुगुणी

खूप खूप आठवणी चाळवल्या आमच्या चिरंजीवांच्या बाळपणाच्या.

आणि 'प्रत्येकाच्याच आयुष्यात या सगळ्या गोष्टी होत असतात' हे जरी खरं असलं तरीही जन्माला येणार्‍या प्रत्येक बाळाच्या बाबतीत या गोष्टी अशाच/याच क्रमाने होतात असं नव्हे, तेंव्हा यातलं नाविन्य कधी संपेल असं वाटत नाही. त्यामुळे त्यांच्या बाळलीलांची अशी बखर मधून-मधून ठेवता आली तर जरूर ठेवावी, म्हणजे मुलं भराभर वाढत जातांना ती अशी "मोठी का होतात? ..लहानच का नाही रहात" असं जेंव्हा वाटतं, ते क्षण पकडून ठेवावेसे जेंव्हा वाटतं, तेंव्हा आपल्या समाधानासाठी, आणि तितकंच महत्वाचं, ती मोठी झाल्यावर त्यांच्यावर आई-बाप व्हायची वेळ येईल तेंव्हा त्यांच्या मुलांना सांगण्यासाठी, हा ठेवा महत्वाचाच!

नंदन's picture

18 May 2009 - 5:05 am | नंदन

लेख, खरं तर छान/सुरेख म्हणण्यापलीकडचा.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

सहज's picture

18 May 2009 - 7:03 am | सहज

अतिशय म्हणजे अतिशयच उच्च.

फार्फार आवडला.

अवलिया's picture

18 May 2009 - 7:06 am | अवलिया

काय लिहु ? शब्दच नाहीत !

--अवलिया

रेवती's picture

18 May 2009 - 7:46 am | रेवती

आईपणाचं चांगलं वर्णन केलयस.
पुर्वीच्या काळी सात आठ मुलं असायची तेंव्हा कसं सहन करत असतील बायका असं वाटून गेलं.
एकटाकी लिहिलेलं दिसतयं....छान वाटलं वाचून.

रेवती

आनंद घारे's picture

18 May 2009 - 8:54 am | आनंद घारे

"तुझ्यामुळे मी झाले आई" यातल्या आई होण्यात काय काय आणि किती सामावलेले असते याची एक सुरेख झलक वाचायला मिळाली. अप्रतिम लेख!
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://360.yahoo.com/abghare
http://anandghan.blogspot.com/

यशोधरा's picture

18 May 2009 - 9:01 am | यशोधरा

छान लिहिलं आहे!

विसोबा खेचर's picture

18 May 2009 - 9:17 am | विसोबा खेचर

म्हणूनच मातृदेवो भव असं म्हणत असावेत..कारण आई म्हणजे..
श्वासाची लय असते
विश्वासाचे आलय असते
अशुभाला भय असते
वात्सल्याची सय असते..... हो ना?

लाख मोलाची बात अन् सुरेख लेख..

जियो..

आपला,
(मातृभक्त) तात्या.

धनंजय's picture

18 May 2009 - 9:34 am | धनंजय

खेलकर आणि आनंदी लेख.

मातृदिनाच्या शुभेच्छा तुम्हाला दररोज. :-)

समिधा's picture

18 May 2009 - 9:35 am | समिधा

खुप छान लिहीलयस.माझे अनुभव अगदी सारखे आहेतम्हणजे तिने लवकर जन्माला येण्यापासुन ते अगदी उम्म्मा सकट.... :)(ती पण उम्माच म्हणते)
मी पण लेकीला पहील्यांदा ३ दिवसांनी मांडीवर घेतल त्या वेळी काय काय वाटल नाही सांगु शकत मी शब्दात.
पण माझ्या देवघरातले देव तेवढे कधी हालले नाहीत आणि ती बाबांना सोडून कधी राहीली नाही.(४ दिवसाच्या वर बाबा दिसले नाहीत तर ५व्या दिवशी जेवण सोडतात आमच्या बाईसाहेब)
प्लेग्रुप चा अनुभव थोडा वेगळा मी शाळेत बसत होते पण दर दोन मिनीटांनी बाबा पण हवे असायचे शाळेत खुप रडली यासाठी.
पण अजुन मोठ्या शाळेचा अनुभव यायचा आहे.

समिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)

कलिका's picture

18 May 2009 - 9:46 am | कलिका

प्राजु तु नेहमिच मस्त लिहितेस,
बाकि आइ होन्यात काय धन्यता आहे ते आइ झल्यावर्च समजते!

मदनबाण's picture

18 May 2009 - 10:00 am | मदनबाण

व्वा.सुंदर लेख... :)

मदनबाण.....

I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.

भाग्यश्री's picture

18 May 2009 - 10:25 am | भाग्यश्री

वॉव..जबरी आवडला लेख...:)

www.bhagyashree.co.cc

मनिष's picture

18 May 2009 - 10:55 am | मनिष

प्राजू! तुझा लेख अगदी मनापासून भावला...खूप, खूप छान झाला आहे! :)

स्वाती दिनेश's picture

18 May 2009 - 11:17 am | स्वाती दिनेश

प्राजु, सुंदर लिहिले आहेस.
स्वाती

परिकथेतील राजकुमार's picture

18 May 2009 - 11:21 am | परिकथेतील राजकुमार

मस्त लेख.
मनापासुन लिहिलय आणी आम्हाला मनापासुन आवडलय.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

अमोल खरे's picture

18 May 2009 - 12:31 pm | अमोल खरे

असेच म्हणतो.

ऍडीजोशी's picture

18 May 2009 - 11:51 am | ऍडीजोशी (not verified)

काहिच्या काहीच भारी. अप्रतीम. अफाट.

बबलु's picture

18 May 2009 - 12:13 pm | बबलु

....अप्रतिम उतरलाय लेख.

(स्वगत -- देव पण काय एकेकाला सुंदर लिहिण्याचं Skill देतो राव).

....बबलु

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 May 2009 - 2:00 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

...अप्रतिम उतरलाय लेख.

(स्वगत -- देव पण काय एकेकाला सुंदर लिहिण्याचं Skill देतो राव).

अश्विनि३३७९'s picture

18 May 2009 - 12:51 pm | अश्विनि३३७९

खरचं तुम्ही अप्रतिम लिहिता..
धन्यवाद आठ्वणी जाग्या केल्यात ..

भिंगरि's picture

18 May 2009 - 12:54 pm | भिंगरि

लेख खुप आवडला, नुकतइच आइ झालेय त्यामुळे पहिल्या परिछ्छेद एकदम दे जा वु मध्ये घेउन गेला.

शाल्मली's picture

18 May 2009 - 1:50 pm | शाल्मली

प्राजु,
नेहमीप्रमाणेच छान लिहिले आहेस.
आवडले.

--शाल्मली.

धमाल मुलगा's picture

18 May 2009 - 2:17 pm | धमाल मुलगा

प्राजुताई,
एक नंबर लिहिलयस. लय लय खास :)

एक गंमत सांगू?
ह्या लेखाची एक प्रिंट काढ आणि ज्यावेळी लेक मराठी छान वाचायला, आणि त्याला ह्या सगळ्या गोष्टी नीट कळायला लागतील अशा वयात त्याला हे "रिटर्न गिफ्ट" दे.
बघ कसा कै च्या कै खुश होऊन जाईल :)

----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

Meghana's picture

18 May 2009 - 3:01 pm | Meghana

खरचं तुम्ही अप्रतिम लिहिता..
सध्या हाच सर्व अनुभव घेत आहोत आम्ही पण.....

अनंता's picture

18 May 2009 - 3:09 pm | अनंता

शब्दवत्सल कुटूंबवत्सल प्राजुताई!!!

वजन कमी करायचा सल्ला हवाय? - चालते व्हा!!

स्वाती राजेश's picture

18 May 2009 - 5:34 pm | स्वाती राजेश

प्राजु,
नेहमीप्रमाणे सुंदर लिखाण...:)
आठवणींचे वर्णन छान केले आहेस...
श्वासाची लय असते
विश्वासाचे आलय असते
अशुभाला भय असते
वात्सल्याची सय असते.....

मस्त ओळी आहेत..

मीनल's picture

18 May 2009 - 5:48 pm | मीनल

(प्रत्येकाच्याच आयुष्यात या सगळ्या गोष्टी होत असतात.... यात नविन काही नाही.)
म्हणूनच त्या स्वतःच्या वाटतात. आपलच मन मोकळ झाल आहे अस वाटत.
मीनल.

दशानन's picture

18 May 2009 - 6:03 pm | दशानन

मस्त !

सुंदर लिहले आहे.

थोडेसं नवीन !

अनामिक's picture

18 May 2009 - 7:03 pm | अनामिक

सुंदर, हृदयस्पर्शी लिखाण.

-अनामिक

चंद्रशेखर महामुनी's picture

18 May 2009 - 10:43 pm | चंद्रशेखर महामुनी

वा...! प्राजु...!
आई दिसलि... पुर्ण पणे....

प्राजु's picture

18 May 2009 - 10:55 pm | प्राजु

सर्वांचे मनापासून आभार. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

क्रान्ति's picture

19 May 2009 - 8:47 am | क्रान्ति

जुन्या स्मृतींना उजाळा मिळाला तुझा लेख वाचून. सगळे शब्द कमी पडतील प्रतिसादासाठी इतका अप्रतिम लेख! शेवटची चारोळी तर आईपणाचं सार!
क्रान्ति
***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ
मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***

मिसळभोक्ता's picture

19 May 2009 - 2:40 pm | मिसळभोक्ता

मला मदर्स डेला टी शर्ट मिळाला. तुला काय मिळाल?

-- मिसळभोक्ता
(अधिक माहितीसाठी प्रभूमास्तरांना भेटा.)

काजुकतली's picture

19 May 2009 - 11:02 pm | काजुकतली

सगळ्यांना त्या पहिल्या क्षणाच्या सुखद आठवणी आहेत. पण माझी आठवण थोडी वेगळी आहे. मुलीच्या वेळी डॉक्टरांना वाटलेले हेल्दी बेबी असणार. पण ऑपरेशनच्या वेळी 'वाटलं त्या मानाने बा़ळ बरेच बारीक आहे' हे वाक्य शेवटचे ऐकले. मग जाग आली ती थेट बेडवर. थोड्या वेळाने नर्सने बाळाला आणुन कुशीत ठेवलं. मी त्याआधी कधीच नुकतंच जन्मलेलं मुल पाहिलं नव्हतं. शेजा-यापाजा-यांची मुले ५-६ महिन्यांची होईपर्यंत मी चार हात दुरुनच त्यांना पहायचे. माझ्या फॅमिलीत मीच सगळ्यात मोठी. त्यामुळे नुकतेच जन्मलेले मुल पाहायचा चान्स माझ्याच मुलीने मला दिला. तिला पाहताच पहिला विचार मनात आला - देवा, हे माकडाचं पोर कुठुन माझ्या पदरात टाकलंस?' तिच्या अंगावर आणि चेह-यावर काळी लव होती, शिवाय जन्मताच मुलाचे डोळे, नाक वगैरेचा शेपही ठिक नसतो. मी ५-६ महिन्यांची मोठी मुले पाहिलेली, जी अगदी व्यवस्थित असतात, त्यामुळे हिला पाहुन मला थोडाफार धक्का बसला. पण तिचे डोळे एकदम चमकत होते. मला तर चक्क ती माझ्याकडे पाहुन हसल्याचाही भास झाला. मी हरखुनच गेले. मग नंतर तासनतास पहात बसायचे तिच्याकडे. मालीशने अंगावरची लवही हळुहळु गेली. नाक, डोळे व्यवस्थित झाले. आणि मग ३-४ महिन्यात माझ्या मुलीपेक्षा जास्त छान बेबी कोणाची असेल यावर माझा विश्वास बसेनासा झाला.

साधना

वात्रट's picture

20 May 2009 - 4:35 am | वात्रट

प्राजु ताई ..

शेवटच्या चार ओळी तर खुपच सुरेख..

डोळ्यातुन पाणी आल अलगदपणे.....

चित्रा's picture

20 May 2009 - 7:46 am | चित्रा

आठवणी छानच. मुलांसोबत असताना आपल्याला आपलीच एक ओळख नव्याने होते, नाही?
मुलगी जवळजवळ तीन-सव्वातीन वर्षांची होईपर्यंत मी एकीकडे शिकत होते, त्यामुळे दिवसारात्री जमेल तेव्हा माझे काम करत असे. ती बाळ असतानाचा आनंद घेतला पण शांतपणे घेता आला नाही असे आता वाटते. ती तीन वर्षांची होऊन शाळेला गेली की आपल्याला आपले काम छान करता येईल असे कधीतरी वाटे. प्रत्यक्षात ती शाळेला गेली आणि मला काही सुचेना. इतक्या शांततेची सवय राहिली नव्हती.

या तुझ्या लेखाने परत तिचे खूप लहान असतानाचे दिवस आठवले.