प्रतिपश्चंद्र

विअर्ड विक्स's picture
विअर्ड विक्स in जनातलं, मनातलं
14 Mar 2025 - 7:27 pm

नमस्कार मंडळी ! ऐतिहासिक मराठी पार्श्वभूमीवर हिंदी जाल दुनियेतील मालिका बघण्याचा मनसुबा असेल तर पुढील लेख वाचून आपणास एक पर्याय मिळू शकतो.

" प्रतिपश्चंद्र " हि डॉ प्रकाश कोयंडे लिखित एक ऐतिहासिक रहस्य कादंबरी आहे. या कादंबरीवर आधारित " द सिक्रेट्स ऑफ शिलेदार " हि मालिका तप्ततारा जालदुनियेवर उपलब्ध आहे. "NATIONAL TREASURE MOVIE " पठडीतील हि मालिका आहे. हि मालिका आदित्य सरपोतदार यांनी दिग्दर्शित केली आहे. मध्यवर्ती भूमिकेत राजीव खंडेलवाल आणि सई ताम्हणकर आहेत. जोडीला दिलीप प्रभावळकर ,आशिष विद्यार्थी आणि कानन अरुणाचलम आहेत.
रहस्य कथा असल्यामुळे कथाविस्तार टाळतो. पण सई ताम्हणकर या मालिकेत मारधाड करताना दिसेल ! मालिका प्रवाही आहे कुठेही कंटाळवाणी होत नाही. ६ भाग मी एका बैठकीत संपवले ( BINGE WATCHING चा मोठा पंख नसूनही! ). मालिकेचे शीर्षक संगीत आणि पार्श्व् संगीत उत्कृष्ट दर्जाचे आहे.
६ भाग मिळून ३. ५ तासात खेळ संपतो.
अनेक दिवसांनी दिलीप प्रभावळकर पडद्यावर दिसले, लहान भूमिका असूनही त्यांनी अनेक कंगोरे दाखवले आहेत. सई ताम्हणकर चा अभिनय उत्तम आहे. "धुरळा" नंतर सईच्या लक्षवेधी भूमिकेचा विचार केला तर ह्या मालिकेचा क्रमांक प्रथम असेल. आशिष विद्यार्थी चे काम नेहमीप्रमाणे जमून आलेले आहे.
शिलेदार चा शब्दशः अर्थ हा शस्त्रसज्ज घोडेस्वार. परंतु इथे ह्या शिलेदारांची जबाबदारी हि राखणकर्त्याची आहे. ऐतिहासिक संदर्भ ऐकतांना ( भाग २ आणि ३) आणि शेवट पाहताना कहाणी बाबत त्रुटी जाणवतात हा एक दोष सोडला तर मालिका चांगली आहे . बाकी ब्रह्मानंदने अनेक चित्रपटात म्हटलेच आहे कि " लॉजिक देखोगे तो मॅजिक मिस होगा ". प्रत्येक व्यक्तिरेखेला दिग्दर्शकाने उचित न्याय दिला आहे . छायाचित्रण उत्तम आहे . बदामी व रायगडाचे अनेक दृश्ये प्रेक्षणीय आहेत . यांत एक महालाचे सुंदर चित्रीकरण आहे त्या महालचा संदर्भ सापडल्यास प्रतिसादात कळवा.
वर नमूद केल्या प्रमाणे हि कथा एका कादंबरीवर आधारित आहे . पण हि कादंबरी सत्य घटनांवर आधारित आहे कि घटनांवरून कथा सुचली हे न उमगलेले कोडे आहे. युद्धस्य कथा रम्य तसेच रहस्य कथा अगम्य !!
आपण रहस्य कथांचे पंखे असाल , तर हि मालिका आपणास निश्चितच आवडेल.

घटना संदर्भ
१. https://rajbhavan-maharashtra.gov.in/en/president-kovind-inaugurates-raj...
२. https://rajbhavan-maharashtra.gov.in/en/gallery/16-08-2020-governor-bhag...

ता. क . - मध्यवर्ती भूमिकेत एखादा उमदा मराठी अभिनेता विशेष न्याय देऊ शकला असता असे मनापासून वाटते पण मालिकेची आर्थिक गणिते पाहता कठिण वाटते. जाता जाता सध्या छावा चित्रपटाने "ब्राम" वादाला फोडणी दिली आहे हि मालिका या अश्या कुठच्याही वादात सापडली नाही हे विशेष !
अंगठीवर असलेली मुद्रा लक्षणीय आहे . डीटेलिंग आवडलेले आहे . आता हे काय जाणण्यासाठी मालिका पहा :)

कलाइतिहासविचार

प्रतिक्रिया

किसन शिंदे's picture

19 Mar 2025 - 3:22 pm | किसन शिंदे

पुस्तकाच्या तुलनेत मालिका व्यवस्थित जमून आलेली नाही हे माझे वैयक्तिक मत आहे. कथेमध्ये खुप जास्त पोंटेशियल असूनही पटकथा व्यवस्थित न लिहिल्याने मालिका गंडलीय. अभिनयाच्या बाबतीत फक्त राजीव खंडेलवाल तेवढा एकटाच पुस्तकातल्या रवि या व्यतिरेखेशी साम्य दाखवणार वाटला. आणि न्यायाधिश दिक्षित एक.

विअर्ड विक्स's picture

22 Mar 2025 - 7:41 pm | विअर्ड विक्स

प्रतिसादाबद्दल आभार .
पुस्तक वाचलेलं नाही . पण एखाद्या पुस्तकावरून आधारित चित्रपट व मालिका पहाताना एक दोष जाणवतो तो म्हणजे कथासार अगोदरच माहित असते आणि संदर्भ माहित असल्यामुळे रंजकता नाहीशी होते .

या लेखात मी दोन घटना संदर्भ दिले आहेत. कथा त्यावरून सुचली का काही सत्यता दडलेली आहे ह्याचा पुस्तकात उल्लेख केला असल्यास कळवावे.

सस्नेह's picture

20 Mar 2025 - 9:48 pm | सस्नेह

मालिकेचे माहिती नाही.
पुस्तक वाचले. मध्ये मध्ये जरा पाल्हाळिक वर्णन आहे तेवढे सोडले तर कथानक लक्षणीयरीत्या उत्कंठावर्धक आणि वेधक आहे. कादंबरी आवडली. मालिका बघेन जमल्यास.

विअर्ड विक्स's picture

22 Mar 2025 - 10:33 pm | विअर्ड विक्स

प्रतिसादाबद्दल आभार .

जरूर पहा . या लेखाचा उद्देशच हा आहे कि का आदित्य सरपोतदार सारख्या मराठी माणसास हि मालिका हिंदीत बनवावी लागली हे आपण जाणणे फार गरजेचे आहे. मराठी चित्रपट कोणी पाहत नाही आणि OTT वर कोणी विचारत नाही. मराठी भाषा अभिजात म्हणून घोषित केले तरी आजकालच्या जगात पुस्तकांपेक्षा द्रुकश्राव्य हे भाषा प्रसाराचे प्रभावी माध्यम ठरू शकते आणि इथेच आपण मागे पडतोय असे माझे प्रांजळ मत आहे.

अमरेंद्र बाहुबली's picture

22 Mar 2025 - 10:46 pm | अमरेंद्र बाहुबली

बऱ्याच दिवसानी तुमचा प्रतिसाद पाहून आनंद वाटला! कश्या आहात
ह्या मालिकेबद्दल ऐकून आहे. पाहीन लवकरच!

कानडाऊ योगेशु's picture

20 Mar 2025 - 10:31 pm | कानडाऊ योगेशु

खरेतर दा विन्ची कोड नंतर अश्या साच्यावर बर्याच जणांनी कादंबर्या/मालिका/चित्रपट बनवुन हात धुवुन घेतले. एखादा पुरातन खजिना/रहस्य आणि त्याचा सांभाळ करणारे
अथवा रहस्यातला एखादा भाग माहीती असणारे सध्याचे जमान्यातले वंशज वगैरे.बरेच क्रिप्टीक संदेश/श्लोक वगैरे आणि त्याची उकल करताना करावा लागणारा संघर्ष,त्यातले थ्रिल वगैरे वगैरे. ही मालिकाही त्याच पठडीतली आहे पण खजिना एकदम मिळतो ते थोडे अतर्क्य वाटले. तशी बरी आहे मालिका. वन टाईम वॉच.

विअर्ड विक्स's picture

22 Mar 2025 - 10:26 pm | विअर्ड विक्स

प्रतिसादाबद्दल आभार .

या लेखात मी दोन घटना संदर्भ दिले आहेत. आपले त्याविषयी काय मत आहे ? कारण त्या घटना संदर्भ कुठेतरी गुप्ततेस वाव देतात.

१. इतके वर्षात का कोणी राज्यपाल इतिहास संशोधकाप्रमाणे आपल्याच घरात भुयार शोधू शकला नाही ?
२. उत्तराखंड ची एक व्यक्ती का कोणताही विशेष दिवस नसताना शिवनेरी दर्शनास वयाच्या ७५ नंतर स्वतः चढत गेले ?

स्वराजित's picture

28 Mar 2025 - 4:50 pm | स्वराजित

या सारखेच अजुन एक पुस्तक आहे. खैरनार लिखित " शोध " नावाचे.
खुप छान पुस्तक आहे.
https://mr.wikipedia.org/wiki/मुरलीधर_खैरनार