स्थळ कोथरूड माझ्या फ्लॅटच्या डोक्यावरचा फ्लॅट म्हणजे एका अर्थाने सख्खे डोके शेजारी, आडनाव वरळीकर (मी त्यांच्या प्रायव्हसीसाठी अल्प बदललेल) . बहुधा इस्वीसन २०००च्या आसपास गुजराथेहून पुण्यात येऊन स्थायिक झालेल एक सालस पण वयस्क कुटूंब, अर्ली रिटायर्ड नवरा, बँक मॅनेजर बायको आणि त्यांची एक मुलगी आपण तीच नाव ठेऊ 'भाबडी. भाबडीचे पालक आणि भाबडी यांच्या वयातील फरक बराच मोठा असावा त्यामुळे भाबडी दत्तक घेतलेली असू शकते अशी सोसायटीतील दबल्या आवाजातील चर्चा. आता नक्की आठवत नाही पण भाबडी बिल्डिंग्मध्ये रहाण्यास आली तेव्हा सहा किंवा आठ वर्षांची असेल आणि माझी मुलगी एखाद दिड वर्षांची. भाबडीला लहान मुलांचा मोठा लळा. स्वतःच्या वजनाला न झेपताही लहान मुलांना उचलून घेऊन कवटाळण्याचा लहानपणापासूनचा अट्टाहास लहानग्यांची काळजी घेणार्यांना जरासा काळजीत पाडणारा.
भाबडीच्या वागण्याकडे बघून अभ्यासात जराशी कच्ची असू शकेल असे वाटे पण जे काही असो या Millennial मुलीच्या पालकांनी तीला जवळच्या उत्तम इंग्रजी शाळेतून शिक्षण देण्याचा अट्टाहास केला. स्वभावानी उत्साही 'भाबडी' खेळात मात्र चांगली होती. खेळांच्या क्षेत्रात चमकली असती तर..? तिचे आजुबाजूच्या मिसळण्याच्या स्किलच्या आणि स्लो लर्नींगच्या शक्यता याच समाजानी दुर्लक्षून तिला क्दाचित डोक्यावर घेतले असते. दुर्दैवाने बर्याचदा जिथे 'जरतर..' असतात तिथे पण परंतुने स्थिती बदललेली असते. शाळा संपून कॉलेजात जावयास लागलेल्या उत्साही भाबडीला एका दिवाळीत अचानक मानसीक त्रास झाला त्यात ती तिसर्या मजल्याच्या त्यांच्या गॅलरीतून पडली. भाबडी पडली तर तिची काळजी घेण्यासाठी तिच्या आईनेपण अर्ली रिटायरमेंट घेतली. त्यातून भाबडी वाचली तरी खेळ बाजूला पडला आणि तिचे कला शाखेतील शिक्षण पदव्यूत्तर पर्यंत चालू राहीले तरी मंदावलेल्या स्थितीत.
वस्तुतः अदमासे ४० टक्के स्त्रीयांना कोणत्या न कोणत्या मानसिक (सायकॉलॉजीकल) त्रासांना सामोरे जावे लागते. जगात रोबोटीक परफेक्शनचा सुपर कॉम्प्युटर माणूस अद्यापतरी कुणि पाहिलाय? एका अर्थाने सगळी मनुष्य जातच स्लो लर्नर नाही का? पण या स्लो लर्नर (?) भाबडीला आमचा समाज कंप्लिट लर्निंग डिस अॅबिलीटी असल्यासारखे वागवत जीवनातल्या महत्वाच्या संधी प्रत्येक पावला वर नाकारतो. दुसरीकडे तिचे मध्यमवर्गीय पालक तिच्या व्यक्तिमत्वातल्या कोणत्याच मर्यादा अजिबातच स्विकारत नाहीत. जर मर्यादा स्विकारल्याच नाहीत तर योग्य उपाय योजना कशा करणार? भाबडीच्या व्यक्तिमत्वाच्या मर्यादा लक्षात न घेताच सल्ले देणार्यांनी तिच्या साठी पालकांकडून संगणक शिक्षण ते माँटेसरी टिचींग शिक्षणाच्या फिसवर मोठे फसलेले खर्च करवले. असे अव्यवहार्य सल्ला देणारे आणि पाल्य आणि पालकांची दिशाभूल करून केवळ फिसच्या पाठी पडलेले खासगी शिक्षण क्षेत्र! ज्या परिस्थितीने पुर्वीच्या उत्साही भाबडीचे अंशतः एका अकार्यक्षम मुलीत रुपांतरण केले.
कोविडच्या काळानंतर भाबडीचे वयस्क झालेले वडील गेले, आईपण प्रकृतीमुळे बाहेर पडू शकत नव्हती ती आता आजारपणाने अंथरूणाला टेकली तसे भाबडीचे ठाण्याचे मामा भेटून गेले. भेटून कसले गेले आता विभक्त कुटूंबांच्या काळात आम्ही त्यांची जबाबदारी घेऊ शकत नाही हे सांगूनच गेले.
काळ बदलतोय भारतीय संस्कृतीचे आमेरीकीकरणाच्या ओघात एकत्र कुटंब पद्धती आणि कुटूंबियाची जबाबदारी घेणे या गोष्टी मागे पडत आहेत. जिथे सख्खे नातेवाईक हात वर करतात तर शेजारी कुठे पर्यंत पुरे पडणार - खरे म्हणजे आजच्या काळातल्या शेजार्यानाही एवढा विचार करण्यास वेळ नाही. दुसरीकडे आईच्या पाठीमागे सपोर्टची गरज असलेल्या भाबडी सारख्या मुला मुलींची व्यवस्थित काळजी घेणारी पर्यायी समाज व्यवस्था अजून आकारास येणे बाकी आहे.
मला खरेच माहित नाही काय पर्याय आहेत? पुर्वी कुटूंब अवघड परिस्थितींना सामोरे गेले तर जात समुहातील व्यक्ति सांभाळून घेत. यांच्या सिकेपी समाजाचेही मदत करणारे धुरीण असतील पण आमच्या माहितीत तुर्तास तरी कुणी नाही तसेही जात संस्थाही अस्तास जावयास लागली आहे. अशा मुलांच्या पालकांच्या पश्चात माहेरपणाची जबाबदारी त्यांच्या त्यांच्या शाळांच्या अॅलुम्नी अॅसोसिएशन्सनी घ्यावी का? असा एक विचार मनात येऊन गेला. समस्या तेथे काही ना काही मार्गही असतील आणि भविष्यात निघतील नाही असे नाही.
जे काही असेल भाबडीचे भले होवो. आणि तिच्या निमीत्ताने एक विषय कदाचित तुमच्यातील कांहींना कधीतरी जाणवलेला तुमच्या मनांना पुन्हा स्पर्ष करून जावो हिच इच्छा.
प्रतिक्रिया
27 Mar 2025 - 2:29 pm | चित्रगुप्त
वाचून हळहळ वाटली.
माझे एक सीकेपी मित्र - समाजकार्य करणारे - आहेत, त्यांना विचारू शकतो.
एका दिवंगत (पुणेकर) मिपाकराच्या बाबतीतही असेच काहीसे झालेले आहे की काय असे वाटते. नक्की माहिती मिळू शकलेली नाही. मदत करण्याची इच्छा असूनही संपर्क कसा साधावा हे ठाऊक नाही. कुणाला या बाबतीत काही करावेसे वाटत असेल तर व्यनि करावा.
27 Mar 2025 - 3:41 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
भाबडीबद्दल वाचून वाईट वाटलं. भाबडीचं भलं व्हावं.
-दिलीप बिरुटे
27 Mar 2025 - 8:00 pm | कंजूस
जबाबदारी कोण घेणार.
यात अमेरिका कुठून आली? कुटंब पद्धतीच शहराशहरांतून बदलत चालली आहे. आमेरिकेसारखी म्हणायचं का?
28 Mar 2025 - 9:45 pm | चौथा कोनाडा
दुर्दवी !
भाबडीला योग्य ते मार्गदर्शन आणि मदत मिळो याच सदिच्छा !
10 Apr 2025 - 1:52 pm | अदित्य सिंग
माहितगार सर - व्यनि केला आहे...
10 Apr 2025 - 4:16 pm | प्रसाद गोडबोले
अशा अनेक भाबड्या व्यक्ती मी खूप जवळून पाहिल्या आहेत.
यातील एक व्यक्ती खूपच अफलातून होती. होती म्हणजे काही वर्षांपूर्वी त्यांनी देह ठेवला , तेव्हा बहुतेक 55 च्या आसपास वय होते त्याचे.
ते अखंड "श्रीराम जय राम जय जय राम" म्हणत असत. त्यांच्या चेहऱ्यावर कायम लहान बाळासारखे हास्य असायचे. मला भेटले की नेहमी चौकशी करायचे : "काय प्रसाद , सर्व उत्तम ना , श्रीराम समर्थ !"
त्यांना लोकांचे व्यवहार अजिबात कळायचे नाहीत. ते पहाटे उठून बागेतून फुले तोडून लोकांना घरी जाऊन वाटायचे, कोणाकडून पैसे घ्यायचे नाहीत. कोणी दिलेच पैसे तर त्याचे अगरबत्ती , गुळ खोबरे वगैरे देवाला दाखवायचे अन् उरलेले पैसे पेटीत टाकायचे. पैसे साठवावेत, आपल्यासाठी काहीतरी घ्यावं हा विचार त्यांच्या मनातच यायचा नाही.
देवाच्या कृपेने त्यांची आई जिवंत होती, इतर भाऊ आणि बहिणी ह्यांना त्यांच्या हा भोळेपणा ( आणि काही लोकांच्या मते वेडेपणा ) माहित होता त्यामुळे ते आर्थिक मदत करत असावेत. त्यामुळे त्यांना अन्न वस्त्र निवारा आधी मूलभूत चिंता कधी भेडसावल्या नसाव्यात. किंवा असल्या तरी त्यांनी त्या रामनामाचा अखंड प्रवाहात वाहून टाकलेल्या होत्या.
किंवा कदाचित मुळात त्यांना चिंता म्हणजे काय हेच माहीत नसावे.
"ज्याने चोच दिली, तो दाणा ही देईल" असा ठाम विश्वास होता त्यांना. (हेही माझे शब्दांकन झाले, ते इतका विचारही करत नसावेत. ) त्यांच्या साठी फक्त "राम" हाच आधार होता.
आता मागे वळून पाहिलं तर अशी, सहजस्थिती मध्ये जगणारी, कोणीतरी व्यक्ती माझ्या जवळपास होती, ह्यावर माझाच विश्वास बसत नाही. ते गेले तेही अचानक. शेवटी भेटायचा योग ही आला नाही.
त्यांना अजून एकदा तरी वाकून नमस्कार करायला हवा होता असे मनात परत परत वाटत राहते.
लहानपणी त्यांना वाकून नमस्कार केल्यावर त्याचा तो सहज उत्स्फूर्तपणे दिलेला आशीर्वाद अजूनही कानात घुमत आहे ...
"श्रीराम समर्थ".
10 Apr 2025 - 9:47 pm | स्वधर्म
आणि उत्तर सोपे नाही. एक खरे की पूर्वी एकत्र कुटुंब पध्दतीत अशा व्यक्तींची काळजी घरातले कोणी ना कोणी तरी घ्यायचे. दहा पंधरा माणसात असे एखादे माणूस खपून जायचे. आता मात्र तसे सोपे नाही. काही दिवसांपूर्वी प्रसन्न जोशी यांनी घेतलेली अतुल कुलकर्णी यांची मुलाखत पाहिली. त्यात ते म्हणतात की आपण सर्व जण मरणार आहोत आणी क्षमता कमी होत होत मरणार आहोत. मोठे दु:खद सत्य! प्रत्येकाचे रूपांतर अशा एका 'भाबड्या' माणसात होणार आहे, ज्याला कुणाचा तरी आधार लागणारच आहे. सध्या तर आईवडीलही जड होण्याचा काळ आहे.
एक लंडनमध्ये राहणारे कुटुंब माहितीत आहे. त्यांच्या मुलीची अवस्था आणखीणच बिकट आहे. ७-८ वर्षे वय पण चालता व बोलता येत नाही. त्यांनी मुलीला स्पेशल मुलांच्या शाळेत घातले आहे. त्यांच्या मते ते काही झाले तरी इथेच रहाणार आहेत, कारण त्यांच्या मुलीची काळजी घेण्याची जी व्यवस्था युकेत आहे, तशी भारतात अजिबात नाही. सांगायचा मुद्दा हा की 'अमेरिकेच्या' / पाश्चात्य संस्कतीच्या प्रभावाने आपल्याकडे हा प्रश्न उग्र झाला म्हणावे तर त्या देशांमधे अशा व्यक्तींचे आयुष्य अधिक चांगले आहे, ही वस्तुस्थिती आहे.
असो. 'भाबडी'ला आधार लाभो हीच इच्छा.