कोणतीही गोष्ट अभ्यास करून नाकारायची किंवा स्वीकारायची असा माझा पिंड आहे.मी बरोबरीनेच उजव्या विचारसरणीचा अभ्यास करताना त्यासंबंधी पोस्ट व्हायच्या.डायटविषयी समजून घेतांना वैज्ञानिक पोस्ट असायच्या.भारतीय तत्वज्ञानचा, पाश्चात्य तत्वज्ञान वगैरे वगैरे त्यावेळी तशा.. गंमत म्हणजे जे काही आकलन ते इथे खरडायची खोड असल्यामुळे ज्या त्या वेळी ते वाचून मी तशीच आहे असा इथे अनेकांचा गैरसमज होतो.
असो कधीही टोकाला न जाता सगळ्या विचारसरणीत मी सम्यकता शोधत असते.
मार्क्स, समाजवादी समजून घेत असताना भांडवलशाहीने माणसाला यंत्र कसे केलं.एखादी वस्तू करतांना त्यात सृजनशीलता बहरायची त्याला आनंद मिळायचा.हळू हळू नफेखोरी वाढली आणि माणसाचा कामातला आनंद संपला तो चिडचिडा झाला,जीवनाचे मूल्य मर्म हरवून बसला हे जेव्हा कळलं तेव्हा खरंच थेट काळजात दुखलं.
हे सगळं समजून घेत असल्याने एक सिनेमा चांगलाच समजला.
भांडवलशाही विरूद्ध समाजवाद यावरचा खुशखुशीत सिनेमा काल पाहिला..द स्टोरीटेलर! सत्यजित रे यांची कथा 'गोलपो बोलिये तारिणी खुरो' या बंगाली कथेवर आधारीत आहे.
तारिणी बंदोपाध्याय हा बंगाली समाजवादी आहे.जो छान कथाही सांगतो.पण या कथा तो टीकेला घाबरून कधीच लिहित नाही.आयुष्यभर विविध ठिकाणी नोकरी करून जवळच्या मित्रांना सुरस कथा सांगत तो मजेत असतो.अशात त्याला गुजरातमध्ये 'स्टोरीटेलर हवा'ही वेगळी जाहिरात पाहतो.बंगाली तारिणी गुजरातला पोहचतो.कोण्या लहान मुलांना गोष्टी सांगायच्या असतील असं त्याला वाटत.पण प्रत्यक्षात निद्रानाशा त्रास असणाऱ्या गरोडिया या थोराड कापूस उद्योजकाला त्याला झोप यावी यासाठी गोष्टी सांगायच्या असतात.तर गोष्टींचा प्रवास तारिणी सुरू करतो.तारिणीच्या गोष्टी खरोखरच सुंदर समाजवादाची झालर असणाऱ्या ऐसपैस असायच्या.पण उद्योजकाला काही झोप येत नव्हती.
तारिणी आणि उद्योजकात एक अनोखे नाते निर्माण होते.उद्योजकाच्या तूटलेल्या ह्रदयाची नाजूक गोष्ट त्याला समजते.'सरस्वतीला 'लक्ष्मी 'आवडत नाही.'असं उद्योजक सांगतो.
एकदा ग्रंथालयात एका मासिकात नवीनच छापलेल्या गोष्टी लोकप्रिय होत असतात.तेव्हा तारिणीला समजते त्या तर त्याच्याच गोष्टी आहेत जो तो उद्योजकाला सांगत असतो.उद्योजक टोपणनावाने त्या गुजरातीत तारिणीच्या परवानगी शिवाय छापत असतो.'सरस्वतीला खुश करण्यासाठी तो हा प्रताप /चोरी करत असतो.तारिणी म्हणतो 'भांडवलशाहीला हे माहिती नाही की या तारिणीच्या नावाचा अर्थ 'दुर्गा' हा आहे.
या चोरीला सर्वांसमोर आणण्यासाठी तारिणी याच्यापुढे उद्योजकाला चक्क टागोरांच्या गोष्टी सांगतो.कलेतला ओ का ठो न समजणाऱ्या भांडवलशाही उद्योजकाला हे कळतच नाही.तो तशाच गोष्टी छापत राहतो.शेवटी पुस्तकही छापतो.तेव्हा गोष्टींच्या चोरीच्या आरोपात त्यावर खटला तर दाखल होतोच.पण सरस्वतीही चोरा बरोबर कशी राहणार तीही कायमची जाते.
तारिणी केव्हाच बंगालला निघून आलेला असतो.पण आता त्याला भांडवलशाहीने आपला घेतलेला फायदा लक्षात येतो आणि तो गोष्टी केवळ न सांगता लिहिण्याचे ही ठरवतो.
या सिनेमाचे साधेपणातले सौंदर्य अनेक प्रसंगांतून दिसत राहतो , मोहवून टाकते.बंगाली माणसाचे मच्छी प्रेम ,गुजराती स्थापत्यकलेतील निराळ्या फ्रेम,मानवी स्वार्थी स्वभावाचे कांगोरे,कधी तळ्यात खोल कधी अनंत आकाशात झेपावणारे मानवी मन!हा चित्रपट म्हणजे खुपच सुंदर अनुभव आहे.नक्कीच पाहा..'द स्टोरीटेलर'
-भक्ती
प्रतिक्रिया
7 Mar 2025 - 10:39 pm | आग्या१९९०
सुंदर कथानक.
7 Mar 2025 - 11:01 pm | अमरेंद्र बाहुबली
छान!
8 Mar 2025 - 6:17 am | कर्नलतपस्वी
गंमत म्हणजे जे काही आकलन ते इथे खरडायची खोड असल्यामुळे ज्या त्या वेळी ते वाचून मी तशीच आहे असा इथे अनेकांचा गैरसमज होतो.
असो कधीही टोकाला न जाता सगळ्या विचारसरणीत मी सम्यकता शोधत असते.
सहमत आहे.
आपण प्रत्येक विषयाची मांडणी अतिशय व्यवस्थित करता त्यामुळेच वाचकांचा असा गैरसमज होणे सहाजिकच आहे.
कथानक आवडले .
8 Mar 2025 - 8:29 am | धर्मराजमुटके
छान ओऴख . लेख लिहिताना तो सिनेमा कुठे पाहता येईल हे देखील सांगावे म्हणजे "ढूंढो ढूंढो रे साजना" चे कष्ट कमी होतील :)
8 Mar 2025 - 10:49 am | अमरेंद्र बाहुबली
+१.
बाकी छान ओळख करून दिलीस ताई!
8 Mar 2025 - 11:01 am | Bhakti
होय होय,शोधा म्हणजे सापडेल ;)
हिंट-भांडवलशाहीवाले अंबानी यांनी या ओटीटी नुकतेच विकत घेतलय ;) हाहा.
8 Mar 2025 - 11:11 am | अमरेंद्र बाहुबली
Hotstar? पण आम्ही टेलिग्राम वाले!
8 Mar 2025 - 11:18 am | Bhakti
जिओ हॉटस्टार ;)
आमची शाखा टेलिग्रामवर नाही :)
8 Mar 2025 - 11:02 am | Bhakti
सर्वांचे खुप खुप आभार.
10 Mar 2025 - 11:36 am | कर्नलतपस्वी
तसे बघायला गेले तर प्रत्येक कथा एक घटना असते. त्या घटनेकडे बघण्याचा दृष्टीकोन मात्र वेगळा असतो. त्यानुसार पात्रे, स्थान वेळ काळ बदलून नवीन कथा तयार होऊ शकते. म्हणूनच तारीणीबाबू म्हणतात नकल करने के लिए अकल भी तो होनी चाहीये.
अप्रतिम मांडणी व सर्व कलाकार आपआपल्या भुमिकेत चपखल बसले आहे.
धन्यवाद भक्ती आपल्या मुळे एक छान चित्रपट बघायला मिळाला.
10 Mar 2025 - 2:18 pm | Bhakti