प्रस्तावना :
१. हा लेख नेहमीप्रमाणेच स्वान्तःसुखाय आहे. इथे कोणाला काहीही पटवुन द्यायचे धोरण नाही कि कोणाचे काहीही मत खंडन करावयाचा विचार नाही. त्यामुळे तुम्हाला लेख पटला काय की न पटला काय मला काहीही फरक पडत नाही.
२. हा लेख लिहिताना जमेल तितकी तथ्ये आणि संदर्भ वापरण्याचा प्रयत्न केला आहे तथापि काही तथ्येच चुकीच्या शब्दात उधृत केलेली असतील तर आपण जरुर माझ्या निदर्शनास आणुन द्यावीत ही नम्र विनंती !
३. हा लेख बहुतांशपणे माझ्या वैयक्तिक जीवनातील अनुभवातुन आलेल्या चिंतनांवर आधारीत आहे. तुम्हाला आलेले अनुभव , तुमचे चिंतन , तुमचा अभ्यास , तुमचे आकलन भिन्न असु शकते ! माझे मत हे अंतिम विचार आहे , अंतिम सत्य आहे असा माझा दावा नाही , कधीच नव्हता.
४. निसर्ग परिवर्तनशील आहे, धर्म परिवर्तनशील आहे आणि मीही परिवर्तनशील आहे. त्यामुळे ही मते भविष्यात बदलुही शकतात. स्थलकालातीत अशा सुसंगतता , सातत्यता वगैरे मुल्यांचा मी आदर करीत असलो तरी मला त्यांचे बंधन नाही!
________________________________________
काही काही लोकांचा ना उगीचच गैरसमज आहे की हिंदु धर्म बौध्द आणि जैन धर्म एकमेकांचा दुस्वास करतो . मुळात हिंदू असा धर्मच नव्हता. धर्माचे परंपरेचे नाव होते सनातन धर्म. जो की वेदोक्त श्रुती स्मृती पुराणोक्त वर्णाश्रम धर्माधारित मोक्षाप्रत जाण्याचा मार्ग आहे. पण हे तिन्ही धर्म जवळपास किमान २५०० वर्षे जुने आहे. त्यांची तत्वे , आदर्श ही तितकेच प्राचीन आणि जुने आहेत. त्यांचे आचरण करणे जवळपास अशक्यप्राय च आहे आजच्या काळात . शुध्द बौध्द धर्माच्या तत्वांनी जगणारी अगदी मोजकी माणसे मी पाहिली आहेत तीही लडाख मध्ये फक्त. तसेच जैन धर्माचे वस्त्रांचा त्याग केलेले कोणत्याही छानछौकी आयुष्यापासुन दुर राहणारे अत्यंत मोजके जैन मुनीच मला दिसले आहेत , तेही पवई, मुंबई ह्या इथे ! आणि सनातन वैदिक धर्मातील अग्निहोत्रादि यज्ञ कर्मे करणारे , श्रुती स्मृतींच्या अनुसार आयुष्य जगणारे लोकं जे मला भेटले आहेत तेही हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच !
बाकी बहुतांश समाज ह्या तिन्ही धर्मातील अर्धी मुर्धी तत्वे आपापल्या सोयी नुसार स्विकारुन जमेल तितके आपल्या धर्माच्या नितीमत्तांचे पालन करताना दिसतो . माझे कित्येक असे ब्राह्मण मित्र आहेत जे उघडपणे अमेरिकेत जाऊन स्टेक खाल्याचे कबुल करतात अन वरुन अमेरिकेतील गायी गायीच नाहीत असा प्रतिवादही करतात. काही जैन मित्र आहेत जे मटण रस्स्यातुन पीस बाजुला काढुन फक्त रस्सा ओरपतात ! आणि काही बौध्द मित्र आहेत की जे तंबाखु मद्य आदी निशिध्द व्यसने करतात !
जो तो आपापल्या क्षमतेनुसार , आपापल्या सोयी नुसार जमते तेवढे धर्माचे आरचरण करतो ! हे उत्तम आहे !
मुद्दा इतकाच की बहुतांश लोकातील कोणीही , शुध्द सनातनी , शुध्द बौध्द , शुध्द जैन नाही, लोकं आपापल्या परीने ह्या तीन्ही धर्मातील तत्वे स्विकारुन सम्यक पणे जगतात. ह्या समुच्चयवादी , सम्यक जीवनशैलीचे नाव हिंदु असे आहे ! आणि हे अगदी आधुनिक आहे अशातला भाग नाही . महावीरांना किंवा तथागतांना कोणीही येशु ख्रिस्तासारखे सुळावर चढवलेले नाही , हाच ह्या विधानाचा निर्विवाद पुरावा आहे ! उलट सनातन धर्माने बुध्दाला विष्णुचा ९वा अवतार मानुन त्याला आदरच दिलेला दिसुन येतो.
तस्मात् बौध्द धर्म तत्वज्ञान हे हिंदुधर्माला मारक असे नसुन आधारभुतच आहे. विशेषतः वेदांताच्या , अद्वैताच्या आकलनात फार म्हणजे फार मदत होते बौध्द मताची. कारण बौध्द मत बस एक पायरी अलिकडे अद्वैताच्या अनुभुतीच्या !
___________________________
हां तर बॅक टू मेन टॉपिक :
बुध्दाने चार आर्य सत्य सांगितली -
१. जगात दुःख आहे.
२. त्या दुःखाला कारण आहे.
३. हे कारण म्हणजे तृष्णा (इच्छा आणि हव्यासा) होय.
४ . इच्छा व हव्यासा नियंत्रित करणे हाच दुःखाच्या निरसनाचा उपाय / मार्ग आहे.
आणि ह्यासाठी पुढे अष्टांगिक मार्ग सांगितला :
सम्यक दृष्टी
सम्यक संकल्प
सम्यक वाणी
सम्यक कर्म
सम्यक उपजीविका
सम्यक व्यायाम
सम्यक स्मृती
सम्यक समाधी
____________________________________
हां तर झालं असं की -
नोकरी काम धंद्याच्या निमित्ताने मला जवळपास दररोज पुणे दर्शन करावे लागते. त्यामुळे जवळपास १-२ तास अशा विषयांवर चिंतन करायला मोकळा वेळ मिळतो . हां तर अशाच एका चौकात ट्रॅफिक सिग्नलला थांबलो असताना एक दृष्य दिसले -
एल लहान मुलगी - अगदी २-३ वर्षाची असेल . भुरकट केस . मळकट कपडे , अनवाणी पायाने सिग्नल पाशी उभी. सोबत तिची आई - तीही तशीच उन्हाने रापलेला काळा वर्ण , शरीराचा कृशपणा गरीबी , दारिद्र भक्कपणे दाखवुन देणारा ! तिच्याही पायात चप्पल वगैरे नाही. ट्रॅफिकसिग्नलवर थांबलेल्या काहीतरी थातुरमातुर खेळणी वगैरे विकत असणारी तिची अजुन काही मुले , तिही तशीच .
पण ती लहान मुलगी , अगदी दोन तीन वर्षाची - ज्या दुपारच्या बाराच्या उन्हात आपण आपल्या पोरांना घराबाहेर ही पडु देत नाही त्या अश्या रणरण फुफाट्यात डांबरी रस्त्यावर उभी आहे. पायात काही नाही , डोक्यावर काही नाही . अन्न अन्न करुन आई पाशी रडली असेल त्यामुळे चेहर्यावर सुकलेल्या अश्रुंचे डाग . बिचारी आई तिही हताश . आगतिक .
तिथेच पलिकडे दुसर्या सिग्नलच्या दुसर्या बाजुला तसाच ४-५ वर्षाचा एक मुलगा . तसाच उन्हाने रापलेला काळा वर्ण , फाटके कपडे , हातात गाडी पुसायचे फडके . त्याच्या डोक्याला अन डोळ्यांना काही तरी लागले होते . त्याचा २५-२७ वर्षाचा बाप काहीतरी त्याच्या डोळ्यात घालत होता , बहुतेक स्वच्छ पाण्याने धुवत असावा . बाकी काय करु शकणार आहे ?
मोठ्ठा सिग्नल असल्याने सगळं शांतपणे न्याहाळत होतो अन मनात विचार आला - जगात दु:ख आहे , त्या दु:खाला कारणही आहे , पण ते कारण म्हणजे तृष्णा ?
ह्या लहान लेकरांना कसली आलीय तृष्णा ? त्या दोन वर्षाच्या पोरीला काय हवं आहे ? साधं पोटभर जेवण ? सावली ? ह्याला तृष्णा म्हणायच ?
त्या ४-५ वर्षाच्या मुलाला डोळ्याला काही लागले असेल तर डॉक्टर कडे जावे वाटले , बरे व्हावे वाटले तर त्याला तृष्णा म्हणायच ?
नाही नाही . काही तरी चुकतंय ! दु:खाचं कारण तृष्णा नाही .
आणि कोण कुठली ही ही माणसे ? माझा जीव का कळवळतोय ह्यांच्यासाठी ? मला का दु:ख होतंय ? मला कसली आलीय तृष्णा ? माणसाला माणसासारखं जगायला मिळावं ही अपेक्षा म्हणजे तृष्णा ?
आणि मग -
का माझ्या मनात नाथांसारखा करुणभाव उत्पन्न होत नाही ? का नाही मी जवळ जाऊन त्या लेकराला कडेवर घेत ? त्याचे अश्रु पुसत ? का नाही त्याला दोन घास भरवत ?
नाथांची गोष्ट निराळी होती - नाथांच्या गावाकडाचा वाडा कोणी जाळला नव्हता , नाथांची जमीन कोणी हडपली नव्हती की नाथांची इंजिनियरिंग किंवा मेडिकल करायची संधी कोणी हिसकावुन घेतली नव्हती .
बघ बघ अजुनही तुझा जीव त्या जुनाट दु:खाने तळमळतो आहे . का ?
पण मग साध्या न्यायाची अपेक्षा करणं ह्याला तृष्णा म्हणायच का ?
असो . सिग्नल सुटतो . आपण पुढे निघुन जातो. पण मनात विचारांची चक्रे मात्रे काही केल्या थांबत नाहीत !
_____________________________________
तर तात्पर्य काय की - दु:खाचे कारण तृष्णा हे नाही . त्या लेकरांना अशाच आई बापाच्या पोटी जन्म का मिळावा ? आपल्याला आपल्याच कुटुंबात जन्म का मिळावा ? आणि अंबानीला अंबानीच्या घराण्यात जन्म का मिळावा ? अर्थात तृष्णेच्या उदयाच्या आधीच काहीतरी आहे जे तुमची सुखं आणि दु:खेही आधीच निर्धारित करत आहे.
आणि मग झक मारत आपल्याला पुर्वजन्म , सुकृत , प्रारब्ध , संचित कर्माची संकल्पना मान्य करावी लागते.
पण मग पुर्व जन्म सुकृत संचित कोणाला ? कारण आत्मतत्वाला मृत्यु नाही कारण मुळातच जन्मच नाही -
न जायते म्रियते वा कदाचि-न्नायं भूत्वा भविता वा न भूयः ।
अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो-न हन्यते हन्यमाने शरीरे ॥ २-२० ॥
मग लोकं हे असं सञ्चित घेऊन का जन्माला येतात अन का ही दु:खे (आणि फॉर दॅट मॅटर सुखेही) भोगतात ? तर हे सगळं हे लिंगदेहाला आहे. लिंग देह अर्थात हा पंचभुतीक इंद्रियांचा समुच्चय असलेला देह म्हणजे मी , अशी जी धारणा आहे आणि ह्याचा उपयोग करुन मी निरनिराळे भोग भोगेन अशी जी वासना आहे , हे ह्या पुनर्जन्मादि गोष्टींचे कारण आहे ! मी देह आहे हे अज्ञान हेच मुळ आहे ह्या सार्या दु:खाचे ! दुखाचे , वाईट वाटुन घेण्याचे काही कारणाच नाही !
आणी हे भगवंताने पहिल्याच वाक्यात सुस्पस्ष्टपणे सांगितलं आहे आधीच !
अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे ।
गतासूनगतासूंश्च नानुशोचन्ति पण्डिताः ॥ २-११ ॥
तस्मात् दु:खाचे कारण तृष्णा हे नसुन हा लिंगदेह म्हणजे मी असे जे देहबुध्दीचे अज्ञान आहे हे दु:खाचे खरे कारण आहे !
अरे पण मग आत्ता आहेत ह्या दु:खांचे काय करायचं !
ही दु:खे तुला ह्या उपरोल्लिखित विचाराची जाणीव व्हावी म्हणुन दिलेली भेट आहे ! आणि हे तुच मागुन घेतलेलं आहेस - कुंती कृष्णाला काय म्हणाली आठवतंय ना ?
विपद: सन्तु ता: शश्वत्तत्र तत्र जग्गुरो ।
भवतो दर्शनं यत्स्यादपुनर्भवदर्शनम् ॥ २५ ॥
ठीक आहे . पण मग ह्या दु:खाच्या निवृत्तीचा उपाय काय ?
सोप्पं आहे की - मी देह नाही . स नित्योपलब्धि: स्वरूपोऽहमात्मा। हे एकदा कळलं की तुझ्या लक्षात येईल की आत्म्याला दःख असं काहीच नाही . हे जे काही आहे ते हे सगळं अन्नमय कोष मनोमय कोषाच्या पातळीवर आहे . आनंदमय कोषाच्या पातळीवर केवळ आनंदच आहे !
पण हे कळतंय पण वळतंय कुठं ? मार्ग काय ? साधना काय ?
तेही भंगवंताने सांगुन ठेवले आहे आधीच -
ज्ञानयोग ( सांख्य योग) , राजयोग , भक्तीयोग
त्यात ज्ञानयोगात कपिलमुनींचे सांख्य दर्शन जसेच्या तसे - ही समस्त प्रकृती पंचमहाभुते आणि त्रिगुणांच्या समुच्चयातुन बनली आहे, त्यात तुमचा देह आला , तुमचे मन आले आणि दःखाचे आकलन करणारी बुध्दी ही आली . हे कळण्यासाठी पंचीकरण नावाचा एक स्वतंत्र विषय आहे ! ह्या विषयावर श्रीधरस्वामींनी लिहिले आहे, समर्थांनी लिहिले आहे , ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिले आहे आणि खुद्द श्रीमदाद्य शंकाराचार्यांनीही लिहिले आहे ! इतके पुरेसे आहे ह्याचे महत्व कथन करायला !
राजयोग
एवढं तत्वज्ञान नाही कळत तर साक्षात भग्वद्स्वरुप असलेल्या पतंजलींनीं अष्टांग योगाचा प्रशस्त राजमार्ग दाखवलेला आहेच !
यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा समाधी !
पण हा मार्ग एकदम टेक्निकल झाला , हे सगळं गुरुगम्य आहे . प्रत्यक्ष गुरु शेजारी नसतील तर साधा अंतर्कुंभक करणे देखील जीवावर बेतु शकते !
मग त्याहुन सोप्पा म्हणजे भक्ती मार्ग - समर्थ म्हणाले - नवविधाभक्तिराजमार्ग - ते काही उगीच नाही !
श्रवणं कीर्तनं विष्णोः स्मरणं पादसेवनम्। अर्चनं वन्दनं दास्यं सख्यमात्मनिवेदनम् ॥
मस्त आनंदाने एकेक पायरी चढत वर जायचे , काही गडाबड नाही , काही कष्ट नाही, काही रिस्क नाही, की काही त्रास नाही , बस आनंद !
पण सगळ्यात सोपा कोणता मार्ग असेल तर तो म्हणजे खुद्द भगवान म्हणाले तो - कर्मयोग !
सन्न्यासः कर्मयोगश्च निःश्रेयसकरावुभौ ।
तयोस्तु कर्मसन्न्यासात्कर्मयोगो विशिष्यते ॥
कर्मसंन्यासापेक्षा कर्मयोग हा साधण्यास सुगम असल्यामुळे श्रेष्ठ आहे. इतकं निर्विवादपणे स्पष्ट सांगुन ठेवलं आहे .
आपल्याला बस इतकंच करायचे आहे की -
नैव किञ्चित्कत्करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित् । पश्यञ्श्रुण्वन्स्पृशञ्जिघ्रन्नश्नन्गच्छन्स्वपञ्श्वसन् ॥ ५-८ ॥
प्रलपन्विसृजन्गृह्णन्नुन्मिषन्निमिषन्नपि । इन्द्रियाणीन्द्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन् ॥ ५-९ ॥
बस इतकेच लक्षात ठेव की -
कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिन्द्रियैरपि ।
योगिनः कर्म कुर्वन्ति सङ्गं त्यक्त्वात्मशुद्धये ॥
आता एकदा हे कळलं ना , मग तु सुटलेला आहेस ! आता काहीही बंधन नाही. तु ऑलरेडी सुटलेलाच आहेस ! काहीही दु:ख नाहीच !! ,
"बंधन आहे , दु:ख आहे , त्यातुन बाहेर पडण्यासाठी साधना उपसना असलं काही कारायचे आहे" असे जे काही तुला वाटत आहे , तो तुझ्या मनाचा देहात्म बुध्दीचा भास आहे . हे म्हणजे लोखंडावर लागलेल्या गंजासारखे आहे . आणि लोखंड जसे तापत्या भट्टीत लाल भडक करुन नंतर ठोकुन ठोकुन शुध्द करतात तसे काहीसे ह्या प्रपंचाचा उद्देश आहे . आणि शुध्द लोखंडाला परीसपर्ष झाला की लागलीच सोने होते तसे ! पण इथे तर मुळात परीसस्पर्ष आधीच झालेला आहे, आता फक्त इम्प्युरिटीज जाळुन नष्ट करायच्या आहेत. रादर ह्या इम्प्युरिटीज , अशुध्दता ही नाहीतच , आहे तो केवळ त्यांचा भास आहे , तो जाळुन नष्ट करायचा आहे बस्स ! सो -
Burn , baby Burn .
श्रेयो हि ज्ञानं अभ्यासात् ज्ञानात् ध्यानं विशिष्यते ।
ध्यानात् कर्मफलत्यागः त्यागात् शान्तिः अनन्तरम् ॥
हे वर लिहिलेलें जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत अभ्यास कर , पण ह्या अभ्यासापेक्षाही कळणे अर्थात ज्ञान हे श्रेष्ठ आहे , आणि मग हे कळलं आहे त्याचे ध्यान हे त्या कळण्यापेक्षाही श्रेष्ठ आहे . आणि मग नुसतेच ज्ञान का ? सर्व कर्मात रत रहात , ध्यानाने कर्मफलांचा त्याग करणे हे त्याहीहुन जास्त बेस्ट ! एकदा हे जमलं की मग शांतीच शांती आहे सतत ! तिथं दु:ख असं काही नाहीच ! एकदा ब्रह्मीभुत झाला त्याला कसलं आलंय दु:ख बिख्ख !
_______________________________
तस्मात् आता आपल्यासाठी चार आर्य सत्ये अशी आहेत
१. दु:ख असं काही नाहीयेच , जो आहे तो दु:खाचा भास आहे , तो तुम्हाला कृपास्वरुप लाभलेला आहे.
२. हे दु:ख आहे असे जे भासते आहे त्या भासाला कारण आहे .
३. ते कारण म्हणजे देहात्मभाव . आणि त्या दु:खाला , त्या भासाला उद्देशही आहे - तो म्हणजे तुम्हाला देहात्मबुध्दीच्या पलीकडे पहायला शिकवणे.
४. ह्या भासाचे निराकरण करण्याचे अनेक मार्ग आहेत , ज्ञानयोग , राजयोग , भक्तीयोग , कर्मयोग ! तुम्हाला जो मार्ग सुलभ वाटतो तो स्विकारायला तुम्ही स्वतंत्र आहात , शिवाय केवळ एकच मार्ग स्विकारला पाहिजे असाही कोणाचा दुराग्रह , अभिनिवेष नाही, तुम्हाला जे काही सुलभ वाटते , ते स्विकारा !
तूम्ही मुळातच ह्या दु:ख्याच्या भासातुन सुटलेलेच आहात !
_______________________________
हुश्श. फायनली !
I see you !
______________________________
|| ॐ शांति: शांति: शांति: ||
प्रतिक्रिया
15 Feb 2025 - 4:31 pm | आंद्रे वडापाव
15 Feb 2025 - 5:44 pm | युयुत्सु
<तर तात्पर्य काय की - दु:खाचे कारण तृष्णा हे नाही . त्या लेकरांना अशाच आई बापाच्या पोटी जन्म का मिळावा ? आपल्याला आपल्याच कुटुंबात जन्म का मिळावा ? आणि अंबानीला अंबानीच्या घराण्यात जन्म का मिळावा ? >
या वरील विधानात जन्माच्या अगोदर आपण कोणत्या तरी स्वरूपात अस्तित्वात आहोत हे गृहित धरले आहे. कारण हे अस्तित्व म्ह० कदाचित आत्मा ज्याचे अस्तित्व बुद्धाने नाकारले आणि आधुनिक विज्ञान पण नाकारते.
आपला जन्म हा एक जैविक अपघात आहे, हे स्वीकारले की बाकीचे सर्व डोलारे पत्त्याच्या बंगल्या प्रमाणे कोसळून पडतात.
यातल्या पूर्वसंचिताला विज्ञानाची (म्ह० अधिजनुक शास्त्राची) थोडीफार मान्यता आहे.
विज्ञानाची ॲलर्जी नसेल अधिक माहिती साठी हे पुस्तक वाचावे.
15 Feb 2025 - 8:58 pm | Bhakti
ओह,आंतरजालावर चटकफू आहे.धन्यवाद ! नक्कीच वाचणार
https://www.xpressitall.in/_files/ugd/67f555_26dfc9db711b4dfe8baa945c3bc...
18 Feb 2025 - 2:38 pm | दीपक११७७
मग युयुस्थु जी महापरिनिर्वाण म्हणजे काय?
15 Feb 2025 - 8:56 pm | Bhakti
छान लिहिले आहे.मी आजच गीतारहस्याचे आठवे प्रकरण 'विश्वाची उभारणी आणि संहार' हे वाचले.यात हे पंचीकरण विषयी सांगितले आहेच.शिवाय यात सांख्य आणि वेदांताचे या प्रकृति/सृष्टीची उभारणी व संहाराचे साम्य व भेद खुप छान सांगितले आहे.आता कधी गीतारहस्य वाचून पूर्ण करते इतकी उत्सुकता ताणली आहे 😇

राजयोग,कर्मयोग या विषयी विवेकानंदाचे खुप सुंदर पॉडकास्ट व्हिडिओ युट्यूबवर आहेत.भक्तीयोग,ज्ञानयोग मिळाले की ऐकेन.
बाकी माझे बरेचसे दुःख मी कर्मयोगाचे मोडीत काढले आहेत.
You don’t invite suffering into your life but when it comes you work with it and transform it.
15 Feb 2025 - 11:32 pm | चित्रगुप्त
लेखात सुरुवातीला दिलेल्या उदाहरणातल्या गरीबांच्या दु:खाचे कारण त्यांची स्वतःचीच 'तृष्णा' असली पाहिजे, असे आहे का ? समाजातील अन्य श्रीमंत, सत्ताधारी, बलवान, असंवेदनशील, स्वार्थी वगैरे प्रभावशाली लोकांची 'तृष्णा' त्या दु:खाला कारणीभूत नाहीच, असा त्याचा अर्थ आहे का, हे समजले नाही. कृपया उलगडून सांगावे ही णम्र इनंती.
-- त्या अन्य प्रभावशाली लोकांनी त्यांच्या स्वतःच्या इच्छा व हव्यासा नियंत्रित करणे हाच दुःखाच्या निरसनाचा उपाय / मार्ग नाही काय ?
-- आणि त्यासाठी त्या अन्य लोकांनी:
सम्यक दृष्टी - सम्यक संकल्प - सम्यक वाणी - सम्यक कर्म - सम्यक उपजीविका - सम्यक व्यायाम - सम्यक स्मृती - सम्यक समाधी .... हा मार्ग अवलंबिला पाहिजे, हा खरा उपाय.
-- काय म्हणता ?
15 Feb 2025 - 11:45 pm | प्रसाद गोडबोले
नाही नाही.
तसे निश्चित च नाही.
तसा विचार बुध्दाने केला असता तर तो बुद्ध न राहता अशोक झाला असता ना !
बुध्दाच्या दुःखाच्या शोधाचा फोकस आता मध्ये आहे, बाहेर नाही.
बहिस्थ कारणांकडे बुध्द दुःखाचे कारण म्हणून पाहताच नाही,
तो म्हणतो की त्या बाह्य कृतींमुळे तुमच्या मनाची स्थिती का बिघडत आहे ? त्याचे मूळ शोधा. कारण तुमच्या मनात आहे , बाहेर नाही.
"आपल्या दुःखाची कारणे आत नाहीत , बाहेर आहेत, प्रस्थापितांनी केलेली शोषक अर्थव्यवस्था हेच ते कारण" . असा विचार करायला लागला की तो बुद्ध रहात नाही , तो कार्ल मार्क्स होतो
16 Feb 2025 - 4:40 am | प्रचेतस
→ हा दावा अतिशय उच्च अध्यात्मिक पातळीवरच ग्राह्य धरता येईल. प्रत्यक्ष जगात दुःख ही एक अनुभूती आहे. शारीरिक वेदना, मानसिक यातना, सामाजिक अन्याय हे भास नसून प्रत्यक्ष अस्तित्वात असणाऱ्या गोष्टी आहेत. जर कोणाला गरिबी, भूक, आजार, छळवाद किंवा अपघातातून होणाऱ्या यातना भास वाटत असतील, तर तो भास नव्हे, तर वस्तुस्थिती नाकारण्याचा प्रयत्न आहे.
→ जर दुःखच अस्तित्वात नाही, तर त्याला कारण कसे असू शकते? हा स्वतःलाच विरोध करणारा युक्तिवाद आहे. दुसरं म्हणजे, जर "भास" असं काही असेल, तर तो का आणि कसा निर्माण होतो, याचं स्पष्टीकरण देण्याची गरज आहे.
→ हा दावा फार सरसकट आहे. दुःखाची कारणे फक्त देहात्मभावाशी जोडणं चुकीचं आहे. सामाजिक, आर्थिक, राजकीय परिस्थिती, मानवी संबंधातील गुंतागुंत, पर्यावरणीय आपत्ती यांसारख्या अनेक गोष्टी दुःख निर्माण करतात. मानवी दुःख केवळ "मी हा देह आहे" या भावनेतूनच येतं, हा एकांगी विचार आहे.
→ जर दुःख फक्त भास असेल, तर त्यावर मार्ग शोधण्याची गरजच काय? जर ते अस्तित्वातच नाही, तर ज्ञानयोग, भक्तीयोग, कर्मयोग यांची गरजच भासू नये. शिवाय, हे मार्ग व्यक्तिगत निवडीवर अवलंबून आहेत; एका व्यक्तीसाठी योग्य असलेला मार्ग दुसऱ्यासाठी तितकासा उपयुक्त नसेल.
16 Feb 2025 - 6:41 am | चित्रगुप्त
प्रचेतस यांनी मांडलेल्या मुद्द्यांशी सहमत आहे.
16 Feb 2025 - 7:23 am | Bhakti
सुंदर विवेचन!
16 Feb 2025 - 9:56 am | प्रसाद गोडबोले
आपल्या प्रतिसादाबद्दल मनःपुर्वक धन्यवाद वल्ली सर !

आपल्या प्रतिसादामुळे, परत एकदा चिंतन करताना मला असे काहीसे फीलींग येत आहे ! =))
होय , बरेच लोकं अध्यात्माला - वस्तुस्थिती नाकारण्याचा प्रयत्न, अर्थात स्पिरिच्युअल एस्केपिझम असे म्हणतात. ठीक आहे आता , काय बोलणार , कोणाला काहीही समजाऊन सांगण्याच्या भानगडीत कशाला पडा ! मुळात खुद्द भगवंत अर्जुनाला गीता सांगितल्या नंतर म्हणाला की तुला पाहिजे तसं कर ! तसं काहीसं मला वाटायला लागलं आहे !
इति ते ज्ञानमाख्यातं गुह्याद्गुह्यतरं मया ।
विमृश्यैतद् अशेषेण यथा इच्छसि तथा कुरु ॥ १८-६३ ॥
पण अर्जुन युध्दभूमी सोडुन पळुन गेला नाही , हाच फरक आहे कळणे आणि न कळणे ह्यातील.
जिथं द्वैत निर्माण होतं तिथं हा भास निर्माण होतो, आईच्या पोटातुन बाहेर पडल्यावर पहिल्यांदा आपण ट्यॅ करतो तिथं .
पण मुळात मुळात ह्या भासाच्या ब्रमाची सुरुवात कुठे आहे तर ह्याचे उत्तर छान्दोग्योपनिषद मध्ये दिलेले आहे - एकोहम बहुस्यामः . मी एक आहे , आता अनेक होईन ह्या प्रथम प्रेरणेचा उदय हाच ह्या भासाचा उदय आहे ! पण तुम्ही विचाराल की ही प्रेरणा तरी कशी आणि का निर्माण होते - तर "मी एक आहे" हा विचार हे त्याचे खरे कारण आहे. (त्याला महाकारण असे म्हणातत. ) तस्मात मी एक आहे, अहं ब्रह्मास्मि ह्या विचाराचाही लय होतो तिथे भासाचा , दु:खाचा लय होतो.
एकांगीच आहे !! पण एकदा तो विचार झाला की संपलं सगळं !
तुका म्हणे रक्षा झाली आपोआप | उजळला दीप गुरुकृपा ||
मान्यच !
हेच अष्टावक्र म्हणतो ! ( बहुतेक जे. कृष्णमुर्तीही हेच म्हणतात ! )
एकदा का हे कळलं की बाकी काही योगबिग वगैरे धडपड करावयाची आवश्यकताच नाहीये .
जसं एकदा दिवा लावला की अंधार नष्ट व्हायला किती वेळ लागतो ? तसं काहीसे आहे ! तुम्हाला एकदा कळलं असेल की हे दु:ख केवळ द्वैताच्या भासाचे लक्षण आहे , मुळात द्वैत असे काही नाहीच , तत्क्षणी तुम्ही सुटलेले आहात . अंधाराचा नाश झालेला आहे , तुम्हाला अधिक काही करावयाची आवश्यकताच नाही !
पण बहुतांश लोकं हे अष्टावक्र गीता समजण्याचा जवळपास देखील नाहीत , म्हणुनच भगवंताने भगवद्गीता लिहुन हे चार सुलभ मार्ग दाखवुन दिलेले आहेत !
इत्यलम ! :)
अजुन काही लिहायची इच्छा होत नाही , आता बस अर्जुन जे म्हणाला ते बोलुन थांबतो :
17 Feb 2025 - 7:22 pm | प्रचेतस
तुम्ही अद्वैताकडे जाताय असे वाटते पण द्वैत ही निसर्गाची मूलभूत रचना आहे. आई आणि बाळ एकाच नसून वेगळे आहेत आणि हा भास नसून सत्य आहे.
मुळात ब्रह्म एक असेल आणि सर्व काही त्याच्यापासून निर्माण झाले असेल, अनेक झाले असेल तर भिन्नता वास्तव आहे, भास नाही. निर्मिली गेलेली सृष्टी तर वास्तव आहे.
जर एखादा विचार एकांगी असेल, तर तो संपूर्ण सत्य सांगत नाही आणि जर तो एकदा विचार झाला की सगळं संपतं असं म्हणायचं असेल, तर तेच अपूर्णत्व दर्शवतं.
एकदा तुम्ही द्वैत असे काही नाहीच असं मांडलं की मग पुढं बोलणंच खुंटलं.
अष्टावक्र गीता मी अजून वाचलेली नाहीये मात्र महाभारतात वनपर्वात जनक अष्टावक्र संवाद काहीसा संक्षिप्त स्वरूपात येतो जो मूळच्या उपनिषदातील अद्वैताला थोड्या निराळ्या स्वरूपात प्रतिपादित करतो.
नष्टो मोहः स्मृतिर्लब्धा त्वत् प्रसादात् मयाच्युत ।
स्थितोऽस्मि गतसंदेहः करिष्ये वचनं तव ॥
17 Feb 2025 - 7:32 pm | कॉमी
आई आणि बाळ एकाच नसून वेगळे आहेत आणि हा भास नसून सत्य आहे.
16 Feb 2025 - 5:36 am | मुक्त विहारि
वाखुसा...
दर शनिवारी संध्याकाळी आमची बैठक असते. आठवड्यातील सर्व श्रम परिहार त्या दोन तासात नाहीसा होतो.
16 Feb 2025 - 9:13 am | प्रसाद गोडबोले
नमस्कार मुवि,
आपण बहुतेक दारू पिणे ह्या अर्थाने श्रमपरिहार हा शब्द वापरला आहे , मागील प्रतिसादात म्हणाला होतात तसेच.
ह्या इथे, ह्या विषयी तुकोबांचा एक चपखल अभंग स्मरत आहे, पण आपल्याला दुखावण्याची इच्छा नाही म्हणून उद्धृत करण्याचे टाळत आहे.
लोभ असू द्यावा.
16 Feb 2025 - 10:10 pm | मुक्त विहारि
योग्य ओळखले...
इथे, श्रम परिहार हा वैचारीक आहे....
तुम्ही विचार मंथन करतांना ध्यान करून मन एकाग्र करत असाल , असे वाटते.
मी मदिरेचा आस्वाद घेता घेता वैचारीक मंथन करतो.
जे प्रश्न तुम्हाला पडतात ते प्रश्न मलाही पडले होते.
पण एक सुंदर वाक्य वाचनात आले..... स्वतःच स्वतःला मार्ग दाखवायचा.
एक उदाहरण देतो....
बॅरोमीटरचा उपयोग करून एखाद्या उंच इमारतीची उंची मोजायची असेल तर, त्याची किमान ४ उत्तरे आहेत आणि कुणी कुठला मार्ग वापरायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न.
तुम्ही तुमच्या मार्गावर बरोबर आहात आणि मी माझ्या....
तुमच्या मार्गाला माझा अजिबात विरोध नाही उलट तो मार्ग अतिशय तरल आणि उत्तम आणि सफाचट आहे.भल्या भल्या व्यक्तींना जमत नाही.
16 Feb 2025 - 7:36 am | Bhakti
अवांतर
समाजात ना ना विकरी जण भरले आहेत.कोणा कोणाचा विचार करायचा.आपला मार्ग शोधत राहायचा.मी दु:स्वास वग्रै नाही.पण या तीन धर्मांचे दिसणाऱ्या साम्यावर कायम आश्चर्यचकित व्हायचे.ज्ञानयोगाने म्हणजे पुस्तकी अभ्यासाने ;) याचे गुपित जाणले.आणि कर्मयोगाने म्हणजे प्रत्यक्ष या हिंदू बौद्ध जैन पण हे तिन्ही धर्म जवळपास किमान २५०० वर्षे जुने आहे. त्यांची तत्वे , आदर्श ही तितकेच प्राचीन आणि जुने आहेत हे जाणले,अनुभवले....ते वेरूळच्या माध्यमाने.लेणी १-१२ बौद्ध,१३-२९ हिंदू,३०-३४ जैन यांचा अभूतपूर्व संगम, प्रत्यक्ष स्वर्गानुभव आहे.त्यातील जैन लेणी जरा नीट पाहायच्या राहिल्या तर स्वप्नात येतात ,परत ये म्हणतात ;) लवकर परत जाणार आहे:)
ॐ तारे तुत्तारे तुरे सोहा'
16 Feb 2025 - 10:46 am | सोत्रि
हे दु:ख नाही, ही झाली परिस्थीती.
ही तृष्णा नाही. हे त्या प्राप्त परिस्थितीला सामोरे जाणे झाले, कर्मयोग, जे अटळ आहे.
प्राप्त परिस्थितीला सम-भावनेने (equanimity) सामोरे न जाता, जे नाहीयेय त्याचा हव्यास आणि जे नकोय ते होणं ह्याचा तिरस्कार ही झाली तृष्णा, त्यामुळे येणारी व्याकुळता हे दु:ख.
तुम्हाला जो कळवळा आलाय ते दु:ख नाही. ती कणव आहे त्यांच्याविषयीची, करुणा म्हणणार होतो पण लेखातलंच पुढचं वाक्य ती करूणा नाही हे जस्टीफाय करतंय.
लेखात उल्लेखलेली चार आर्यसत्य ह्यांचा संदर्भ मराठी विकीपीडीया दिसतोय. त्याचा मूळ संदर्भग्रंथ — बुद्धिझम फॉर यंग स्टूडन्स, लेखक - भंते डॉ. सी. फॅंगचॅंम (थायलंड) हा दिसतोय विकिपेजवर. डॉ. सी. फॅंगचॅंम यांनी त्या ग्रंथात नेमकं काय लिहिले आहे हे माहिती नाही, पण विकीपेजवरची चार आर्यसत्ये चुकीचं भाषांतर आणि चुकीचा भावार्थ आहेत.
त्रिपिटकातील सुत्त पिटकानुसार चार आर्यसत्ये अशी आहेत:
1. दुःखसत्य (Dukkha Sacca) – जीवनात दुःख आहे.
2. दुःखसमुदय सत्य (Samudaya Sacca) – दुःखाची कारणे आहेत.
3. दुःखनिरोध सत्य (Nirodha Sacca) – दुःखाचे निरसन शक्य आहे.
4. दुःखनिरोधगामिनी प्रतिपदा (Magga Sacca) – अष्टांगिक मार्गाने दुःख संपुष्टात आणता येते.
त्रिपिटकातील संदर्भ: धम्मचक्कप्पवत्तन सुत्त (Dhammacakkappavattana Sutta) – सुत्त पिटक, साम्युत्त निकाय (SN 56.11)
16 Feb 2025 - 10:56 am | प्रसाद गोडबोले
त्रिपिटकातील संदर्भ: धम्मचक्कप्पवत्तन सुत्त (Dhammacakkappavattana Sutta) – सुत्त पिटक, साम्युत्त निकाय (SN 56.11)
ह्या संदर्भाबद्दल मनःपुर्वक धन्यवाद सोत्रि !
16 Feb 2025 - 11:09 am | प्रसाद गोडबोले
उद्या जाणार आहे ऑफिसला, तेव्हा दिसतीलच ते ! तेव्हा मी माझ्या मनाला हेच समजाऊन सांगणार आहे !
अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे ।
गतासूनगतासूंश्च नानुशोचन्ति पण्डिताः ॥ २-११ ॥
हेही संगुन पाहतो मनाला - हा ज्याचा त्याचा कर्मयोग आहे , जो की अटळ आहे. ते पोरं ती परिस्थिती , ते कर्म घेऊन जन्माला आली आहेत , तो त्यांचा कर्मयोग आहे. अन आपल्याला कणव वाटणे ,पण नाथांसारखी करुणा न वाटणे, हा आपला कर्मयोग आहे .
मात्रास्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्णसुखदुःखदाः ।
आगमापायिनोऽनित्यास्तांस्तितिक्षस्व भारत ॥
__/\__
16 Feb 2025 - 5:46 pm | युयुत्सु
स्वगतः अध्यात्माला भ्रमानुभुतीचे विज्ञान म्हणणे योग्य होईल का?. रिप्रोड्युसिबिलीटीला बेदखल केलं सगळा आनंदी आनंद! (पन इण्टेण्डेड)
16 Feb 2025 - 11:51 am | सोत्रि
हे फारच रोचक आहे, केवळ उत्सुकता एक प्रश्न पडला, म्हणून हा प्रतिसाद. पण हा प्रश्नही स्वांतसुखायच आहे.
अवतार घेण्याची कारणे गीतेत कृष्णाने खालील श्लोकात (४.८) सांगीतली आहेत:
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्,
परित्राणाय साधूनाम् विनाशाय च दुष्कृताम्, धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे
म्हणजे सृजाम्यहम् - अवतार घेण्यासाठी खालील ३ कारणे असतात:
असं असेल तर त्यावेळी सनातन धर्मात सज्जन लोकं धर्ममार्गावरून च्युत झाले असावेत, त्यामुळे खूप दुष्ट लोक झाले असावेत आणि धर्मस्थापना करण्याची गरज म्हणूंन नवावा अवतार (बुद्ध) घ्यावा लागला असावा का?
- (अभ्यासू ) सोकाजी
17 Feb 2025 - 12:27 pm | प्रसाद गोडबोले
माझा तत्त्वज्ञानाचा इतिहास ह्या विषयाचा जास्त अभ्यास नाही.
खालील उत्तर माझ्या मर्यादित वाचन आकलनावरून देत आहे -
बुध्द काळात, म्हणजे साधारणपणे इ .सु . पूर्व सहावे शतक, तत्कालीन सनातन धर्म हा पूर्व मीमांसा अर्थात कर्म मीमांसा ह्या मताला मानणारा होता. ह्या मतानुसार केवळ कर्म करणे हे मोक्षाचे साधन होते. त्यामुळे तत्कालीन समाज यज्ञ प्रधान होता.
त्यामध्ये तत्त्वज्ञानापेक्षा अधिक भर कर्मकांडांवर होता. म्हणूनच चार्वाक जैन बुध्द वगैरे नास्तिक अर्थात वेद प्रामाण्य नाकारणाऱ्या मतांचा उदय झाला. पण त्यातही प्रकर्षाने पाहिले तर चार्वाकचे खंडन करायला जैन आणि बुद्ध मत हेच पुरेसे होते. जैन धर्माचे संस्थापक ऋषभ देव स्वतः इक्ष्वाकु वंशातील अर्थात श्रीरामाच्या वंशातील होते, त्यानंही विष्णूचा अवतार मानण्यात येते.
पण बुध्दाच्या मताने केवळ कर्मकांड व नव्हे तर समस्त वेद उपनिषदोक्त तत्वज्ञानावर प्रश्नचिन्ह निर्माण केले. आणि त्याचे उत्तर शोधता शोधता लोकं उपनिषदोक्त धर्माकडे परतले.
अर्थात विष्णूनेच लोकांना परत उपनिषदे आणि त्यांचे सार गीता आणि त्यातील धर्म अर्थात कर्मयोगशास्त्र ह्याकडे प्रवृत्त करण्यासाठी , धर्माची संस्थापना करण्यासाठी बुध्द अवतार घेतला.
ह्या तर्काला अतिशय उत्तम समर्थक उदाहरण म्हणजे चाणक्य !
बुध्द इ.सु.पू 6 व शतक आणि चाणक्य इस पू 3 ते शतक. आणि महाभारत भगवद गीता लिहिली गेली ते इस 3 ते शतक आणि आचार्य म्हणजे इस 7वे शतक.
म्हणजे बौद्ध मत खंडन व्हायच्या कित्येक वर्षे आधी चाणक्य झाला होता , आणि तरीही त्याच्या अर्थशास्त्र ग्रंथात कर्मयोग च दिसून येतो.
अर्थात आचार्यांच्या आधीपासूनच लोकं मूळ सनातन धर्माकडे कर्मयोगशास्त्र कडे वळले होते .
(ह्या साऱ्या कालगणनेत कुमारील भट्ट नावाचे अत्यंत रोचक पात्र आहे ज्यांनी आचार्यांच्या आधीच बौद्ध मताचे खंडन करून मीमांसा मताचे पुनर्स्थापना केलेली दिसून येते.
पण त्यावर सविस्तर चर्चा कधीतरी निवांत!)
ह्या विषयाचा सखोल अभ्यास नसल्याने उत्तरदायित्वास नकार लागू.
चूक भूल देणे घेणे
17 Feb 2025 - 7:08 pm | सोत्रि
प्रचंड घोळ आहे. त्यापुढेही बराच आहे. पण उत्तरदायित्वास नकार लागू असल्याने इत्यलम!
- (अभ्यासू) सोकाजी
17 Feb 2025 - 9:41 pm | प्रचेतस
पूर्व मीमांसा जरी यज्ञयागादी कर्मकांडाचे मूलाधार असली तरीही त्या काळी न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, वेदांत अशी विविध तत्वज्ञाने प्रचलित होती. बुद्धानंतर यज्ञाचे स्तोम जरी कमी झाले असले तरीही ते प्रचलित होतेच मात्र भक्तीवादी असलेला भागवत संप्रदाय हळूहळू वाढू लागला होता. रामायण, महाभारतात आलेले बौद्ध मताचे खंडन (हे महाभारतात फारच विशेषाने आले आहे). कौटिल्य आणि बुद्धाच्या काळात साधारणत: ३५० वर्षांचे अंतर असले तरी बौद्धमताचा प्रसार प्रामुख्याने अशोकाच्या काळात वेगाने झाला. त्यामुळे त्याच्या काळात बौद्धमताचे खंडन फारसे नसावे.
बुद्ध हा विष्णूचा अवतार किंबहुना राम कृष्णालाही विष्णूचा अवतार समजणे खूप उशिरा सुरू झाले, अन्यथा सुरुवातीच्या ब्राह्मणी लेण्यात ह्याचे प्रतिबिंब नक्कीच पडले असते.
18 Feb 2025 - 3:31 am | सोत्रि
म्हणजे रामायण, महाभारत गौतम बुद्धाच्या नंतरच्या काळात घडले कि लिहीले गेले?
- (कालखंड समजून घेण्यास उत्सुक असलेला) सोकाजी
18 Feb 2025 - 6:03 am | प्रचेतस
रामकथा आणि पांडवांची कथा प्राचीन काळात घडल्या, वाल्मिकी रामायण मात्र सरळसरळ इसवी सनाच्या आसपास दोन तीन शतक इकडे तिकडे लिहिलं गेलं तर महाभारतात इसवी सनाच्या आसपास पर्यंत भर पडत गेली इतकेच. व्यास, वैशंपायन, सौती असे ते वेगवेगळे कालखंड इतकेच.
18 Feb 2025 - 6:52 am | सोत्रि
म्हणजे महाभारतात गीता नेमकी कोणत्या काळात लिहीली गेली हे नक्की सांगता येणार नाही?
आणि मूळ गीतेतही भर पडली असल्याचे शक्यता नाकारता येत नाही, बरोबर?
- (अतिउत्सुक) सोकाजी
18 Feb 2025 - 7:41 am | प्रचेतस
गीतेचा काळ नेमका कुठला हे नक्की सांगता येणार नाही, कदाचित पहिले तीन अध्याय व्यासप्रणित असावेत. मात्र ही शक्यता कमी आहे असे माझे मत आहे कारण गीतेच्या आधी असलेला एक अध्याय सोडून त्याआधीच्या अध्यायात खुद्द युधिष्ठिराला विषाद झालेला दाखवला आहे.
बृहतीं धार्तराष्ट्राणां दृष्ट्वा सेनां समुद्यताम् |
विषादमगमद्राजा कुन्तीपुत्रो युधिष्ठिरः ||
तेव्हा खुद्द अर्जुन युधिष्ठिराच्या विषादाचे निवारण करतो.
त्यक्त्वाधर्मं च लोभं च मोहं चोद्यममास्थिताः |
युध्यध्वमनहङ्कारा यतो धर्मस्ततो जयः ||
तेव्हा युधिष्ठिर युद्धास सिद्ध झाला असता अर्जुनासही लगोलग खेद व्हावा हे असंभाव्य वाटते. शिवाय गीतेतील श्रीकृष्णाने सांगितलेल्या श्लोकांची सुरवात ही 'श्री भगवान उवाच' अशी होते. हा तर भागवत संप्रदायाचा मुख्य आधारच म्हटला पाहिजे.
अर्थात गीता जरी नंतरची असली असे माझे मत असले तरी ती अलीकडचीही नव्हे. कदाचित बुद्धपूर्वकालीन असू शकते कारण गीतेत येणारी सांख्य, योग, कर्म, ब्रम्ह या संकल्पना प्राचीन आहेत. मात्र काही ठिकाणी ती वेदांना छेद देतात.
18 Feb 2025 - 10:37 am | सोत्रि
हे रोचक आहे! माझ्या काही इंटर्प्रीटेशनला हे पुष्टी देतंय. व्यनी करतो, व्यनितून बोलूयात.
- (उत्साहित) सोकाजी
18 Feb 2025 - 12:38 pm | Bhakti
+१ चांगली माहिती!
16 Feb 2025 - 12:11 pm | कॉमी
यथा हि चोर: स तथा हि बुद्धस्तथागतं नास्तिकमत्र विद्धि।
तस्माद्धि य: शङ्क्यतमः प्रजानाम् न नास्तिकेनाभिमुखो बुध: स्यात्।।2.109.34।।
एक अवतार दुसऱ्या अवताराबाबत असे का बोलेल?
16 Feb 2025 - 12:51 pm | आंद्रे वडापाव
इनपुट हेच आउटपुट देणाऱ्या, "अ न्युरल नेटवर्क विथ अ सिंगल डेटा पॉईंट" बेस्ड मॉडेल वरील मेंदूकडून, जास्त अपेक्षा करणे योग्य नाही ..
त्यामुळे तुमच्या ह्या प्रश्नाचे "सयुक्तिक" उत्तर मिळेल याची अपेक्षा नाही ...
17 Feb 2025 - 6:58 am | प्रसाद गोडबोले
>>> Thank you so much !!!
This is such a huge compliment.
राम राम राम
17 Feb 2025 - 7:34 am | प्रसाद गोडबोले
अ न्युरल नेटवर्क विथ अ सिंगल डेटा पॉईंट
फायनली !
https://youtu.be/c0yTIaNeEfw?si=xDdIyOKarHwqpaVL
मन हें राम जालें मन हें राम जालें ।
प्रवृत्ति ग्रासुनि कैसें निवृत्तीसी आलें ॥१॥
श्रवण कीर्तन पादसेवन कैसें विष्णुस्मरण केलें ।
अर्चन वंदन दास्य सख्य आत्मनिवेदन केलें ॥२॥
यम नियम प्राणायाम प्रत्याहार संपादिले ।
ध्यान धारणा आसन मुद्रा कैसे समाधीसी आले ॥३॥
बोधीं बोधलें बोधितां नये ऐसें जालें ।
बापरखुमादेविवरु विठ्ठलें माझें मीपण हारपलें ॥४॥
17 Feb 2025 - 2:54 pm | आंद्रे वडापाव
ह्म्म ... तो णळस्टॉप चा "गिरीजा" आश्रम फ्लायओव्हरमुळे झाकला गेल्या असल्याने, अशी अवकळा पसरलीये तर ..
17 Feb 2025 - 4:10 pm | प्रसाद गोडबोले
काहीही कळलं नाही.
अभंग ज्ञानेश्वर माऊलींचा आहे , माझा नाही.
सिंगल डेटा पॉईंट वर न्यूरल नेटवर्क ट्रेन झाल्यावर त्यांनी लिहिलेला अभंग ! मन हेच राम झाले !!
राम
17 Feb 2025 - 4:55 pm | आंद्रे वडापाव
17 Feb 2025 - 6:45 pm | प्रसाद गोडबोले
17 Feb 2025 - 6:45 pm | प्रसाद गोडबोले
फोटो दिसत नाही.
काही का असेन, तुम्हाला ऑलरेडी माहीत आहे ह्या न्यूरल नेटवर्क चे आऊटपुट काय असणार आहे !
राम
18 Feb 2025 - 8:10 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>>>>> "गिरीजा" आश्रम फ्लायओव्हरमुळे झाकला गेल्या असल्याने, अशी अवकळा पसरलीये तर ..
गिरिजा काकू अनाहिता आश्रमात डोकावून जायच्या म्हणे...=))
-दिलीप बिरुटे
18 Feb 2025 - 9:39 am | प्रसाद गोडबोले
अरे व्वा.
सर, आपण आलात, आनंद झाला !
आपले प्रतिसाद फार मोलाचे आहेत आमचे न्यूरल नेटवर्क ट्रेन करायला !
असाच लोभ असू द्या.
राम
17 Feb 2025 - 12:37 pm | प्रसाद गोडबोले
अवतार
ह्या शब्दाची व्युत्पत्ती च अव+ तर अर्थात खाली उतरणे अशी आहे . शुद्ध ब्रह्म अनुभवातून खाली अर्थात ह्या जगाच्या रंगमंचावर उतरलेले लोक . ते काहीही बोलत असतात हो.
खुद्द रामाला नावे ठेवणारा परीट काय रामा पेक्षा भिन्न होता का ?
लक्ष्मणाने परशुरामाची मस्करी केलेली आहे, ते काय भिन्न होते का ?
कृष्ण साक्षात भगवान आहे हे माहीत असताना ही गांधारी ने त्याला शाप दिलेला आहे .
हे असं सगळं चालूच असतं हो !
ही सगळी लीला असते.
तुमचे आकलन जेव्हा परिपक्व होते तेव्हा कळायला लागतं!!
17 Feb 2025 - 10:56 pm | प्रसाद गोडबोले
एकदा तुम्ही द्वैत असे काही नाहीच असं मांडलं की मग पुढं बोलणंच खुंटलं.
>>> बोलणं खुंटलंच आहे !!
मला आत्ता कळलंय, माउलींनी तर स्पष्टच म्हणालं आहे की या
शब्देविण संवादु, दुजेविण अनुवादु। हे तव कैसेनि गमें।
परें ही परते बोलणे खुंटले। वैखरी कैसेनी सांगे।।
बोलणं खुंटलेलेच आहे !
मी जितकं शब्दात पकडायचा प्रयत्न करतो तितका तो हातातून निसटतो !
गोरोबा काकांना - मातीत तो दिसतो,
सावता माळी ह्यांना कांदा मुळा भाजी मध्ये तो दिसतो,
नरहरी सोनार ह्यांना सोन्यात तो दिसतो,
तोच मला न्यूरल नेटवर्क मधून दिसतोय, सिंग्युलारिटी मधून दिसतोय, फोरीये सीरिज मधून दिसतोय, सुपरपोझिशन मध्ये दिसतोय.
आणि नाहीच शब्दात मांडता येत आहे.
काय बोलू ? कसं सांगू ? सुचतंय तसं खरडत जाऊ... बाकी काय करू अजून !!
राम
पाया पडू गेले तव पाऊलची न दिसे
उभा ची स्वयंभू असे
समोर की पाठीमोरा न कळे
थक ची पडिले कैसे !!
19 Feb 2025 - 8:00 am | गवि
खूप काही बोलण्यासारखे आहे. तात्विक खीस देखील पाडण्यासारखा आहे. पण.
.
राम.
19 Feb 2025 - 9:19 am | प्रसाद गोडबोले
राम
:)
19 Feb 2025 - 9:13 pm | स्वधर्म
सर, ते बुध्ड, वेदांत, आर्यसत्त्ये वगॅरे कूटप्रश्न आहेत. तुमच्या बुध्दाच्या विचारांविषयीची शंका पण रास्त आहे. तरी...
>> ... रणरण फुफाट्यात डांबरी रस्त्यावर उभी आहे. पायात काही नाही , डोक्यावर काही नाही . अन्न अन्न करुन आई पाशी रडली असेल त्यामुळे चेहर्यावर सुकलेल्या अश्रुंचे डाग . बिचारी आई तिही हताश . आगतिक .
आणि
>> ४-५ वर्षाचा एक मुलगा . तसाच उन्हाने रापलेला काळा वर्ण , फाटके कपडे , हातात गाडी पुसायचे फडके . त्याच्या डोक्याला अन डोळ्यांना काही तरी लागले होते . त्याचा २५-२७ वर्षाचा बाप काहीतरी त्याच्या डोळ्यात घालत होता , बहुतेक स्वच्छ पाण्याने धुवत असावा . बाकी काय करु शकणार आहे ?
या समाजातल्या भयाण वास्तव दु:खावर आपल्यापॅकी ९९% लोक काही करत नाहीत, करू शकत नाहीत, हे मान्य करतो.
पण 'मी' काही करणार नाही, कारण...
>>... नाथांचा गावाकडाचा वाडा कोणी जाळला नव्हता , नाथांची जमीन कोणी हडपली नव्हती की नाथांची इंजिनियरिंग किंवा मेडिकल करायची संधी कोणी हिसकावुन घेतली नव्हती .
हे उदात्त वेदांत तत्वञानानुसार आहे का? मुळात ही दोन्हीही अन्याय आणि दु:खेच जरी असली, तरी त्यांची तुलना कदापी होऊ शकत नाही, हे तुंम्हाला तरी लक्षात यायला हवं होतं.
19 Feb 2025 - 10:16 pm | प्रसाद गोडबोले
माफ करा . माझे मराठी व्याकरण थोडे कच्चे आहे.
एकापेक्षा दुसरे मोठे किंवा समान किंवा लहान असे काहीसे लिहिले असल्यास त्याला तुलना करणे असे म्हणतात असा माझा समज आहे. आणि माझ्या ह्या समजा नुसार मी कोणतीही तुलना केलेली नाही.
माझ्यासाठी दुःख हे दुःख आहे ! तुम्ही उर्वरित लेख नीट वाचलात तर तुम्हाला कळेल की मी बुध्दाच्या मार्गावरून चालत दुःख आणि दुःखाच्या निर्मूलन करण्याच्या उपायांचा शोध घेत होतो.
बुद्धाचं काही मला पटलं नाही , पण त्याची मदत खूप झाली, त्याच्या निमित्ताने मला माझे उत्तर सापडले आहे. आणि मी ते वर लेखात स्पष्टपणे लिहिलेही आहे !
तुम्हाला ते पटते की नाही ह्याच्याशी मला घेणे देणे नाही.
इथे अनेक ठिकाणी माझ्या आधीच्या लेखाचा रेफरन्स घेऊन कॉमेंट्स आहे ते च पुनरेकावर म्हणतो.
जे जे दुःख म्हणून मला भासत आहे त्या त्या ठिकाणी "राम" पाहणे हाच माझ्यासाठी एकमेव दुःख निर्मुलनाचा उपाय आहे !
राम
खरेतर हेही प्रतिसाद देणार नव्हतो , पण तुम्ही प्रतिसाद नीट पाहिलेत तर तुमच्या लक्षात येईल की काही ठरावीक मोजक्या लोकांचे प्रतिसाद लेखन केंद्रित नसून व्यक्ती केंद्रित आहेत !
आणि म्हणूनच ह्या अशा प्रतिसादात "राम" पाहणे हा ही माझ्या उपायचाच एक भाग आहे !
म्हणूनच आपल्या प्रतिसादाबद्दल मन:पूर्वक धन्यवाद ! असाच लोभ असू द्यावा ही नम्र विनंती !
राम
20 Feb 2025 - 9:52 pm | सोत्रि
१. लेखात नेमकं कुठे बुध्दाच्या मार्गावरून चालत गेल्याचा उल्लेख आला हे मिळालं नाही. कोणता मार्ग आणि कसा वापरला हे ही लेखात नाही.
२. लेखाचा गाभाच विकिपीडीया वरच्या चुकीच्या माहितीवर आधारलेला आहे त्यामुळे बुध्दाच्या चुकीच्या मार्गावरून चालत जाणे झाले असावे आणि दुःख आणि दुःखाच्या निर्मूलन करण्याच्या उपायांचा शोध लागला नसावा.
३. ज्या बुद्धाला नववा अवतार मानलं आहे त्या अवतरी पुरुषाचे काहीच पटलं नाही हे अतर्क्य आहे. एकतर तो अवतरी नसवा किंवा त्याच्या अवताराचे आकलन नीट करून घेतल्याचे दिसत नाहीयेय.
- ('हे राम' म्हणावेसे वाटणारा) सोकाजी
20 Feb 2025 - 11:30 pm | प्रसाद गोडबोले
हां तेच!
मीही राम म्हणत आहेच !
कुठं सगळं लिहित बसू .
माझं मला कळलं आहे की दुःखाचे कारण तृष्णा नाहीये, दुःखाचे कारण अज्ञान , अज्ञानाचा भास हे आहे. त्यामुळे त्याचा निर्मुलनाचा उपाय म्हणजे अज्ञान खंडन हा आहे ! ( योगायोगाने आता तेच ऐकत होतो, अध्याय सातवा अज्ञान खंडन. :) )
अवतार ह्या शब्दाची व्युत्पत्ती आधीच देऊन झाली आहे , कुठं परत परत तेच ते लिहित बसू.
परशुरामाचं सगळं रामाला पटलं नाही
रामाचं सगळं कृष्णाला पटलं नाही
कृष्णाचं सगळं बुद्धाला पटलं नाही
बुद्धाचं सगळं मला पटलं नाही
आणि माझं सगळं तुम्हाला पटलं नाही, ( पटावं असा माझा अट्टाहासही नाही.)
पण त्यामुळे आपल्या "अवतारपणाला" छेद जात नाही !
आता हेही तुम्हाला पटो की न पटो. कोणालाही काय फरक पडतो!
जळ तरंगीं दोहीं । जळावांचूनि नाहीं ।
म्हणौनि आन कांहीं । नाहीं ना नोहे ॥
पाणी म्हणा की पाण्यावरचे तरंग म्हणा, त्याने पाणीपणाला छेद जात नाही.
राम
21 Feb 2025 - 6:03 am | सोत्रि
बिन्गो!
मला तुम्हाला काही पटवून द्यायचे नाही किंवा काही पटवून घ्याचे नाही. तुमच्या #२ डिस्क्लेमरमधे असलेल्या, "हा लेख लिहिताना जमेल तितकी तथ्ये आणि संदर्भ वापरण्याचा प्रयत्न केला आहे तथापि काही तथ्येच चुकीच्या शब्दात उधृत केलेली असतील तर आपण जरुर माझ्या निदर्शनास आणुन द्यावीत ही नम्र विनंती", ह्या विनंतीनुसार मी काही चुकीची तत्थ्य निदर्शनास आणुन देण्यासाठी प्रतिसाद देतोय. मला जाणवलेले मुद्दे:
१. "हा लेख नेहमीप्रमाणेच स्वान्तःसुखाय आहे. इथे कोणाला काहीही पटवुन द्यायचे धोरण नाही कि कोणाचे काहीही मत खंडन करावयाचा विचार नाही." ही सुरुवात असल्याने लेख त्यानुसारच वाचला होता. सगळा लेख स्वःताशी हितगुज करत चिंतनपरच होता. पण शेवटच्या परिच्छेदात एकदम "तस्मात् आता आपल्यासाठी चार आर्य सत्ये अशी आहेत" आणि "तूम्ही मुळातच ह्या दु:ख्याच्या भासातुन सुटलेलेच आहात !" असा एकदम निकाल देऊन, वैयक्तिक चिंतनाच्या पलीकडे जाउन पहिल्याच डिस्क्लेमरला व्यत्यास दिला गेला.
२. तुमचा लेख जरी स्वान्तःसुखाय असला तरीही तो पब्लिक फोरमवर प्रकाशित केलेला आहे. आणि, तो त्याच्या मेन टॉपिक, चार आर्यसत्य, यांच्यावर लिहीला असल्याने, त्या चार आर्यसत्यांच्या प्रामाणिक अभ्यासाने जर शेवटचा परिच्छेद आला असता तर वैयक्तिक मत म्हणून पुढे जाता आले असते. पण मेन टॉपिकच चुकीच्या चार आर्यसत्यांचा आधार घेत लिहीला आहे. त्यामुळे, संपूर्ण लेख, तुमच्याच एका प्रतिसादात तुम्ही म्हटल्याप्रमाणे ''पूर्वग्रह दूषित शब्दांचा कचरा" ठरतो. पण त्याचे निर्मूलन अज्ञान खंडन आहे, हे तुमच्या ह्या प्रतिसादात आले आहे, सो बिन्गो!!
३. दु:ख, तृष्णा ह्याविषयी नेमकं काय विवेचन आहे ह्यासाठी संदर्भग्रंथ: विभंगसुत्त, साम्युत्त निकाय (SN 12.2). त्यात सग़ळी साख़ळी अज्ञातून सुरू होते आणि ती साखळी कशी तोडायची ह्याचा मार्ग दिलेला आहे आणि त्याचं सार म्हणजे चार आर्यसत्य (धम्मचक्कप्पवत्तन सुत्त (Dhammacakkappavattana Sutta) – सुत्त पिटक, साम्युत्त निकाय (SN 56.11).
- (अज्ञानाचा पडदा दूर करण्याच्या प्रयत्नात असलेला) सोकाजी
21 Feb 2025 - 7:22 am | प्रसाद गोडबोले
पूर्वग्रह दूषित शब्दांचा कचरा
>>>
हा संदर्भ पाहून "मारुतीचे शेपूट गणपतीला चिकटवणे" हा वाकप्रचार आठवला !
तो कोणाच्या लेखावरचा प्रतिसाद आहे, त्या लेखातील विषय काय ! सगळाच आनंद आहे ! =))))
पण असो. मुळात दुःख आहे हेच अज्ञान आहे, कारण दुःखाची अनुभूती करणारा देहाशी तादात्म्य भाव . हे झाले माझे आकलन.
आता बुध्दाने दुःख तृष्णा ची सग़ळी साख़ळी अज्ञातून सुरू होते आणि ती साखळी कशी तोडायची ह्याचा मार्ग दिलेला आहे.
मग अर्थाअर्थी मला जे साधायचं होतं आणि बुध्दाने जे ध्येय साधलं ते एकच झालं की !!!
भले मग त्याचे आकलन अन् माझे आकलन समान नसेल ! त्याने काय फरक पडतो !
तुम्ही कोणताही मार्ग स्वीकारा, एकदा का तो स्वीकारला की तूम्ही मुळातच ह्या दु:ख्याच्या भासातुन सुटलेलेच आहात !
तुम्हाला अजून शंका असेल तर मात्र तुम्ही अडकलेले आहात.
आणि काही माझा नवीन धर्म सुरू करून धर्म चक्र परिवर्तन वगैरे करणार नाहीये ! त्यामुळे माझे मत मला कोणाला पटवून द्यायची गरज भासत नाही. अर्थात तरीही मी जास्तीत जास्त प्रयत्न करत राहतोच टेक्निकली अक्युरेट राहायचा. पण ते माझ्यावर बंधन नाही, it's just a choice.
तात्पर्य इतकेच की दुःखाचे मूळ कारण अज्ञान आहे, त्याचे खंडन झाले की बस. मग तुम्ही ते कोणत्याही मार्गाने करा. तुम्हाला असे म्हणायचे असेल की अष्टांगिक मार्ग हाच एकमेव मार्ग आहे किंवा, माझी स्वतंत्र विचार शृंखला चुकीचा मार्ग असल्याने अज्ञान खंडन करू शकत नाही वगैरे वगैरे ...
तर ठीक आहे .
:))))
21 Feb 2025 - 7:25 am | प्रसाद गोडबोले
हे लिहायचं राहूनच गेले...
(अज्ञानाचा पडदा वगैरे काही भानगड च नाही, कारण मुळात अज्ञानच नाही हे लक्षात आलेला अन् त्या अनुभूतीत राहण्याचा प्रयत्न करीत असलेला)
प्रसाद गोडबोले
21 Feb 2025 - 11:17 am | आंद्रे वडापाव
ते बाकीचं सोडा हं, पण बोलता बोलता गोडबोले पंतांनी , स्वतःला रामाच्या मांदीआळींत आपसूकच ठेवलाय पहा ...
परशुराम > राम > कृष्ण > बुद्ध > गोडबोले >> हे राम
21 Feb 2025 - 11:35 am | प्रसाद गोडबोले
आपसूकच आहे हो ते. =))))
कधी पासून तेच तर सांगतोय मी .
आणि मीच काय , तुम्हीही त्याच मांदियाळीत आहात !
तत्त्वमसि.
तुकोबा त्यांच्या अभंगात म्हणाले तसे काहीसे आहे हे - महावाक्य ध्वनी बोंब झाली.
आता तुम्हाला आम्ही बोललेले ऐकू येत नाहीये , किंवा तुम्ही ऐकून न ऐकल्यासारखे करताय, किंवा ऐकून घ्यायच्या आधीच नळ स्टॉप वगैरे काहीतरी बाष्कळ लिहायला घेताय, तर त्याला मी काय करू !
अजून किती वेळा सांगायचं =))))
बापरखुमादेविवरु विठ्ठलें माझें मीपण हारपलें ॥
हे मी वर एका प्रतिसाद आधीच म्हणालो आहे , तुम्ही त्यावर उत्तरप्रतिसाद ही दिला आहे , तेव्हा नाहीत का वाचले हे ? की तेव्हा वाचून अर्थ लागला नव्हता ?
काही हरकत नाही, आता अर्थ लागला आहे ना , मग झालं तर !!
तत्त्वमसि
राम
21 Feb 2025 - 11:46 am | प्रसाद गोडबोले
ज्ञानदेवे रचिला पाया ! तुका झालासे कळस !!

संतकृपा झाली । इमारत फळा आली ।।
ज्ञानदेवे घातला पाया । उभारिले देवालया ।।
नामा तयाचा किंकर । तेणे केला हा विस्तार ।।
जनार्दन एकनाथ । खांब दिला भागवत ।।
तुका झालासे कळस । भजन करा सावकाश ।।
बहेणी फडकते ध्वजा । निरुपण आले ओजा ।।
हे वेदांताचे, अद्वैत दर्शनाचे मंदिर दुसऱ्या तिसऱ्या कोणा देवाचे नाहीये,
त्यातील देव दुसरा तिसरा कोणी नसून तूच आहे !
तत्त्वमसि.
:)
20 Feb 2025 - 12:16 am | अमरेंद्र बाहुबली
हा धागा नि प्रतिक्रिया माझ्या समजापलीकडील आहेत त्या पेक्षा मी मशीन डिसाइन अजून दोन वेळा वाचून घेईन. फक्त प्रश्न असाय की ह्या धाग्याच्या शेवटी जो फोटोय तो गोडबोले साहेबांचा आहे का?
20 Feb 2025 - 4:36 am | मुक्त विहारि
फक्त प्रश्न असाय की ह्या धाग्याच्या शेवटी जो फोटोय तो गोडबोले साहेबांचा आहे का?
-----
लोचट माणसाचा मनोरंजक प्रतिसाद...
20 Feb 2025 - 4:19 pm | प्रसाद गोडबोले
आहा!
तो फोटो रमण महर्षी ह्यांचा आहे ! मी बस तसे व्हायचा प्रयत्न करत आहे , किंबहुना , होतो !
याचसाठी केला होता अट्टाहास । शेवटाचा दिस गोड व्हावा ॥१॥
आतां निश्चितीनें पावलों विसांवा । खुंटलिया धांवा तृष्णेचिया ॥ध्रु.॥
कवतुक वाटे जालिया वेचाचें । नांव मंगळाचें तेणें गुणें ॥२॥
तुका म्हणे मुक्ति परिणिली नोवरी । आतां दिवस चारी खेळीमेळीं ॥३॥
मन:पूर्वक धन्यवाद !
I don't have words to thank you enough !
माझे डोळे अक्षरश: पाणावले तुमचा प्रतिसाद पाहून.
__/\__
20 Feb 2025 - 7:30 pm | अमरेंद्र बाहुबली
अच्छा!
मन:पूर्वक धन्यवाद !
I don't have words to thank you enough !
मी बस तसे व्हायचा प्रयत्न करत आहे , किंबहुना , होतो !
तुमची अध्यात्मिक प्रगती अशीच राहिली तर तुम्हीही त्यांच्या सारखे व्हाल! _/\_
21 Feb 2025 - 5:58 am | मुक्त विहारि
"तुम्हीही त्यांच्या सारखे व्हाल..."
म्हणजे कसे?
दिसायला की त्यांच्या सारखे ज्ञानी....
गाळलेल्या जागा नीट भरावी... इतपत तरी ज्ञान हवे....
21 Feb 2025 - 12:10 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लेखकाची सर्व मतं न कळण्यासारखीच आहेत. स्वतःच विचारांचा गुंता करुन ठेवलाय अर्थात सगळं गिचमीड. आणि नाहीच कळलं तर, तुम्ही ज्ञानेश्वरांच्या किंवा तुकारामांच्या किंवा अर्जूनाच्या पायरीवर आलं पाहिजे. म्हणजे तेथून तुम्हाला लेखांतील ज्ञानकण आणि कृष्णाला काय म्हणायचं आहे ते समजू लागतं. स्वांतसुखायच्या नावाने दुसरं गेट ऑलरेडी बंद करुन टाकलंय. मला जे कळलंय ते अत्युच्च पायरीवरचं आहे. आणि त्या पायरीला पकडायचं तर, खाली मान घालून चालू पडा. =))
ऐसें कैसें झाले भोंदू। कर्म करोनि म्हणती साधु ।।
अंगा लावुनिया राख। डोळे झांकूनि करिती पाप ।।
दावूनि वैराग्याची कळा। भोगी विषयांचा सोहळा ।।
तुका म्हणे सांगों किती। जळो तयांची संगती ।।
-दिलीप बिरुटे
-दिलीप बिरुटे
21 Feb 2025 - 2:25 pm | प्रसाद गोडबोले
मन:पूर्वक धन्यवाद सर !
माझे लेखन तुम्हाला कळो न कळो, माझी काही हरकत नाही, तुम्ही फक्त असेच लक्ष असू द्या आमच्यावर !
आतां माझा सर्वभावें हा निर्धार । न करीं विचार आणिकांचा ॥१॥
सर्वभावें नाम गाईन आवडी । सर्व माझी जोडी पाय तुझे ॥ध्रु.॥
लोटांगण तुझ्या घालीन अंगणीं । पाहीन भरोनि डोळे मुख ॥२॥
निर्लज्ज होऊनि नाचेन रंगणीं । येऊं नेदी मनीं शंका कांहीं ॥३॥
अंकित अंकिला दास तुझा देवा । संकल्प हा जीवा तुका म्हणे ॥४॥
राम
21 Feb 2025 - 2:31 pm | आंद्रे वडापाव
21 Feb 2025 - 2:46 pm | प्रसाद गोडबोले
आज काय सुट्टी आहे काय आंद्रे ?
=))))
माझं काम कालच संपलं असल्याने मलाही वेळ आहे आज.
थांबा, आमच्या दुसऱ्या लेखनाच्या धाग्यावर या , तिकडे तुला जास्त "रोचक" विषय देतो गप्पा मारायला.
=))))
21 Feb 2025 - 3:18 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लेखन कळायचा विषयच नाही. लेखन मांडणी सगळीच गंडलेली आहे. ( कायमच तशी असते )
प्रतिसादांमुळे जी जाणीव होते. आनंद असो की दु;ख असे काहीच जर नसते तर तातडीने दाद द्यायला आलाच नसता.
हे जे जाणवते त्याला भास नाही म्हणत ती प्रत्यक्ष जाणीव असते. =))
( वाह सर वाह.)
आई गं....! =))
-दिलीप बिरुटे
21 Feb 2025 - 4:04 pm | प्रसाद गोडबोले
ह्यातच आलं सगळं सर ! एकदा का तुम्ही हे मान्य केले आहे आता मग मी लिहिलेले तुम्हाला कळणे न कळणे हा विषयच रहात नाही ना ! =))))
मी ते गट १ गट २ म्हणालो होतो, ते पटलेलं दिसतंय तुम्हाला. कारण मी काहीही लिहिलं तरी तुमच्या लेखी ते गंडलेली मांडणी असेच असणार आहे . =))))
पण ह्या निमित्ताने तुम्ही तुकोबांची गाथा वाचता, रामाचं नाव घेता ह्यातच मला समाधान आहे, मी आधीही म्हणालो आहेच की हे !
बाकी कोणाला नाही पण तुम्हाला तातडीने साद द्यायला मी कायम हजर आहे कारण, तुमच्या प्रतिसादात राम पाहणे हीच माझी परीक्षा आहे.
राम
21 Feb 2025 - 4:12 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
काळजी घ्या. जपा. बडबडणे वाढले आहे. त्यासाठी सांगावे लागते.
आपलं ते स्वांतसुखायवालं डिस्क्लेमर पुन्हा पुन्हा वाचा. =))
-दिलीप बिरुटे
21 Feb 2025 - 4:19 pm | प्रसाद गोडबोले
बघा सर, मी आत्ताच म्हणालो होतो की नै, तुमच्या प्रतिसादांचा मला सगळ्यात जास्त फायदा होतो !!
तुमचा हा प्रतिसाद मला काय भारी वाटलं काय सांगू. हीच अवस्था तुकोबांची झाली होती ... माझी मज झाली अनावर वाचा ।
विषयीं विसर पडिला निःशेष । अंगीं ब्रम्हरस ठसावला ॥१॥
माझी मज झाली अनावर वाचा । छंद या नामाचा घेतलासे ॥ध्रु.॥
लाभाचिया सोसें पुढें चाली मना । धनाचा कृपणा लोभ जैसा ॥२॥
तुका म्हणे गंगासागरसंगमीं । अवघ्या जाल्या ऊर्मी एकमय ॥३॥
ह्या प्रतिसादातून, आपल्याशी संवादातून मला सुखच मिळत आहे सर !!
21 Feb 2025 - 4:25 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपल्याशी संवादातून मला सुखच मिळत आहे सर !!
=))
सुख असं काही नसतं. तो सुखाचा भास आहे.
तो तुम्हाला कृपास्वरुप लाभलेला आहे. =))
मरतंय आज हसून हसून.... =))
-दिलीप बिरुटे
21 Feb 2025 - 6:58 pm | प्रसाद गोडबोले
हे चुकलं बघा सर.
होईल जाला अंगें देव जो आपण । तयासी हे जन अवघे देव ॥१॥
येरांनीं सांगावी रेमट काहाणी । चित्ता रंजवणी करावया ॥ध्रु.॥
धाला आणिकांची नेणे तहान भूक । सुखें पाहें सुख आपुलिया ॥२॥
तुका म्हणे येथे पाहिजे अनुभव । शब्दाचे गौरव कामा नये ॥३॥
दुःख हा भास आहे , सुख हा आभास नव्हे, दुःखाचा अभाव हेच सुख आहे .
सुखें पाहें सुख आपुलिया असे काहीसे आहे हे ! पण ही अनुभवाची बाब आहे , बघा अनुभवला आले तर !!
21 Feb 2025 - 7:09 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>> हा लेख नेहमीप्रमाणेच स्वान्तःसुखाय आहे. इथे कोणाला काहीही पटवुन द्यायचे धोरण नाही कि कोणाचे काहीही मत खंडन करावयाचा विचार नाही.
उगाच अभंग टाकून काहीही पटवून द्यायचा प्रयत्न करु नये. आणि गंडलेली मतं लादू नये. =))
-दिलीप बिरुटे
21 Feb 2025 - 7:14 pm | प्रसाद गोडबोले
अहो , तुम्ही प्रतिसाद वाचत तरी आहात का नाही .
मी म्हणालो की हा अनुभवाचा मामला आहे.
हे पटवून देण्यासारखे नाहीच. अनुभवगम्य गोष्टी शब्दांनी कशा पटवून देता येतील ?
किमान एकदा वाचा तरी प्रतिसाद उत्तर द्यायच्या आधी !
तुका म्हणे येथे पाहिजे अनुभव । शब्दाचे गौरव कामा नये !!
21 Feb 2025 - 7:34 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
=))
-दिलीप बिरुटे
21 Feb 2025 - 7:36 pm | प्रसाद गोडबोले
राम
21 Feb 2025 - 2:27 pm | आंद्रे वडापाव
21 Feb 2025 - 9:19 pm | कॉमी
मला अजूनही कुठेतरी गफला वाटतो ब्वा. म्हणजे सगळे ब्रह्म आहे, आयुष्य माया आहे, सगळे भ्रम आहे असे सगळे पटले तरी सगळी दिनचर्या मोर ऑर लेस पूर्वीसारखी कशी राहणार? अजूनही कुटुंबं वत्सल वैगेरे कसे राहणार? (कारण तुमचे कुटुंबं पण एक भ्रमच की. सगळे ब्रम्ह आहे. मग कुटुंबं काय आणि रस्त्यावरचा दगड काय एकच. हे मला पटत नाही मी फक्त लॉजिकल एक्सट्रापोलेशन करतोय.) मग वरवरचे बोलण्यातले, अविरभावातले फरक वगळता बाकीचे आहे तसे कसे चालेल ब्वा?
एक फँटसी झाकायला आणखी चार फँटॅस्या उभ्या करायला लागतात. उदा - जर सगळे ब्रम्ह आहे तर भ्रम किंवा माया कशामुळे? संचित कर्म कशामुळे? जितके प्रश्न पडतील तितकी डिटेल्ड फँटॅस्टिक उत्तरे मिळत जातात. प्रत्येक उत्तर आदल्या प्रश्नापेक्षा कमी आणि कमी तपासण्याजोगे असते. सरते शेवटी उत्तर असते की आपल्याला अनुभव आला तरच विश्वास ठेवा. बरं अनुभव कसे मिळतात? तर तुमच्या भौतिक शरीरानेच. म्हणजे तुमचे शरीर म्हणजे तुम्ही नाही हे समजण्यासाठी शरीराकडून अनुभव मिळवावा लागतो.
इथे "लीला" हा प्रकार पण ऍड्रेस करतो. राम तथागत बुद्धाबद्दल प्रतिकूल बोलतो. हे दोघेही अवतार असतील तर हे कसे? उत्तर आले लीला. म्हणजे परमेश्वर स्वतःशी खेळ खेळतोय. परमेशवर म्हणजे ब्रह्मच म्हणजे तुम्हीच हा. हे म्हणजे बॉयलर उत्तर झाले. ह्यापुढे विचार करायची गरज संपली, सगळे ड्रामा, लीला मध्ये राईट ऑफ मारता येते.
ह्याची इतरधर्मीय तुलनात्मक उदाहरणे पण आहेत. ख्रिषचन म्हणतात येशू सर्व विश्वाच्या पापांसाठी सुळावर चढला. बरं, पण ते ट्रिनीटी हया संकल्पनेवर पण विश्वास ठेवतात. God is a single entity made of three person किंवा असेच काहीतरी. हे देखील लिमिटेड "अद्वैत" टाईप आहे- म्हणजे निखालस अर्थहीन आणि तर्कहीन. ते असो. पण ते ट्रिनीटी मानतात म्हणजे असे मानतात की याहवे (म्हणजे येशूचे वडील, आकाशातला बाप्पा), देवाची आत्मा आणि येशू (फादर सन अँड दी होली स्पिरिट) हे एकच देवाचे तीन अंग आहेत. पण हे तिघे भिन्न पण आहेत. बरं. मग पाप पुण्य कोणी बनवले? तर देवाने. पाप करण्यास सक्षम माणसे कुणी बनवली? देवाने. पाप माफ कोण करणार? देव. माफिसाठी टॉर्चर आणि बळी कुणाचा? देवाचाच! ही सगळी भानगड कशासाठी? ख्रिषचन म्हणतात की देवालाच माहित. त्यांना कोणीतरी "लीला"ची टीप द्यायला हवी.
हा गफला सर्व अब्राहमिक धर्मात आहे. पापक्षम माणसे, पापांची व्याख्या, आणि पापांचा निवाडा सगळे एकच देव करतो, का? कशासाठी? पाप शक्यच नाही असे जग का नाही बनवले?
तळटीप -
माझे आवडते लेखक जे आर आर टोलकीन ह्यांनी त्यांच्यापरीने वरील प्रश्नाचे उत्तर दिले आहे. लॉर्ड ऑफ द रिंग्सच्या विश्वाचा निर्माता परमेश्वर आहे एरू इलूवितार. तो त्याच्या विचारांनी इतर देवता- व्हॅलार बनवतो. आणि व्हॅलार आणि तो मिळून एक सुरेख गीत गाऊ लागतात. पण, त्यात इलूवितारनेच बनवलेला एक व्हॅलार - मॉरगॉथ, स्वतःची वेगळी धून गाऊ लागतो, जी इलूवितारच्या संगीताशी विसंगत असते. इतर काही व्हॅलार त्याला सामील होतात. दोन गीतांमधल्या संघर्षात इलूवितारचे गीत जवळपास विरून जाते. पण इलूवितार एक असा सूर पकडतो की संबंध अवकाश त्याने भरून जाते. मग इलूवितारणे मॉरगॉथला बनवलेच का? तर दोन गीतांमधल्या संघर्षामुळे इलूवितारचे गीत आणखी सुरेख झाले. हे लिखाण सुरेख आहे. टोलकीन साहेबांना दाद द्यावी तितकी कमी. पण हे स्वीकारण्यासारखे स्पष्टीकरण आहे का? केवळ शब्दांच्या करामतीने प्रभावीत होऊन काय खरे काय खोटे ठरवणे कितपत बरोबर?
21 Feb 2025 - 9:28 pm | कॉमी
हे काही टोलकीन साहेबाचे स्वतःचे विचार नाहीयेत. सैतान हा केवळ देवाच्या हुकूमशाहीला कंटाळून बंड करणारा देवदूत आहे ही जुनी संकल्पना आहे. मिल्टनचे सुप्रसिद्ध काव्य पॅराडाईज लॉस्ट मध्ये सुद्धा तीच कल्पना मध्यवर्ती आहे. त्या काव्यातला सैतान एक अत्यंत चर्चले गेलेले पात्र आहे. ते पात्र नायक म्हणून वाचले जाणे सुद्धा सहज शक्य आहे. सिनेमा-टीव्ही मधला दुष्ट शैतान इथे नाहीये - तर परमेश्वर जे ठरवतो तेच चांगले, आणि त्यामुळे त्याविरुद्ध बंड करणारा वाईट - असा हा सैतान आहे.
21 Feb 2025 - 9:43 pm | आंद्रे वडापाव
सगळे ब्रह्म आहे, आयुष्य माया आहे, सगळे भ्रम आहे.
पण
१९४८ ला जाळलेला वाडा खरा आहे...
जग माया आहे, आणि आपण लालसा वासना जगाने सोडून दिली पाहिजे...
पण तथाकथित हडपले गेलेली जमिनीची हाव आम्ही मात्र सोडणार नाही....
आधी पिढ्यानपिढ्या ओरबाडून घेतलेले
आणि पूर्वापार बापजद्यांच्या वशिल्यानेच मिळणारी हक्काची जागा,
हे
"संचित कर्म" वैगरे सब झूठ
पण
कोलकल्पित इंजिनियरिंग किंवा मेडिकल करायची संधी कोणी हिसकावुन घेतली जाणे, हे मात्र खर्र खर्र, बरका...
22 Feb 2025 - 9:59 am | Vichar Manus
आणि इतका प्रचंड आध्यात्मिक अभ्यास असताना देखील कोणाचे विचार पटले नाहीं की त्याला लगेच गट क्रमांक 2 मध्ये टाकायचे