प्रस्तावना :
१. हा लेख नेहमीप्रमाणेच स्वान्तःसुखाय आहे. इथे कोणाला काहीही पटवुन द्यायचे धोरण नाही कि कोणाचे काहीही मत खंडन करावयाचा विचार नाही. त्यामुळे तुम्हाला लेख पटला काय की न पटला काय मला काहीही फरक पडत नाही.
२. हा लेख लिहिताना जमेल तितकी तथ्ये आणि संदर्भ वापरण्याचा प्रयत्न केला आहे तथापि काही तथ्येच चुकीच्या शब्दात उधृत केलेली असतील तर आपण जरुर माझ्या निदर्शनास आणुन द्यावीत ही नम्र विनंती !
३. हा लेख बहुतांशपणे माझ्या वैयक्तिक जीवनातील अनुभवातुन आलेल्या चिंतनांवर आधारीत आहे. तुम्हाला आलेले अनुभव , तुमचे चिंतन , तुमचा अभ्यास , तुमचे आकलन भिन्न असु शकते ! माझे मत हे अंतिम विचार आहे , अंतिम सत्य आहे असा माझा दावा नाही , कधीच नव्हता.
४. निसर्ग परिवर्तनशील आहे, धर्म परिवर्तनशील आहे आणि मीही परिवर्तनशील आहे. त्यामुळे ही मते भविष्यात बदलुही शकतात. स्थलकालातीत अशा सुसंगतता , सातत्यता वगैरे मुल्यांचा मी आदर करीत असलो तरी मला त्यांचे बंधन नाही!
________________________________________
काही काही लोकांचा ना उगीचच गैरसमज आहे की हिंदु धर्म बौध्द आणि जैन धर्म एकमेकांचा दुस्वास करतो . मुळात हिंदू असा धर्मच नव्हता. धर्माचे परंपरेचे नाव होते सनातन धर्म. जो की वेदोक्त श्रुती स्मृती पुराणोक्त वर्णाश्रम धर्माधारित मोक्षाप्रत जाण्याचा मार्ग आहे. पण हे तिन्ही धर्म जवळपास किमान २५०० वर्षे जुने आहे. त्यांची तत्वे , आदर्श ही तितकेच प्राचीन आणि जुने आहेत. त्यांचे आचरण करणे जवळपास अशक्यप्राय च आहे आजच्या काळात . शुध्द बौध्द धर्माच्या तत्वांनी जगणारी अगदी मोजकी माणसे मी पाहिली आहेत तीही लडाख मध्ये फक्त. तसेच जैन धर्माचे वस्त्रांचा त्याग केलेले कोणत्याही छानछौकी आयुष्यापासुन दुर राहणारे अत्यंत मोजके जैन मुनीच मला दिसले आहेत , तेही पवई, मुंबई ह्या इथे ! आणि सनातन वैदिक धर्मातील अग्निहोत्रादि यज्ञ कर्मे करणारे , श्रुती स्मृतींच्या अनुसार आयुष्य जगणारे लोकं जे मला भेटले आहेत तेही हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच !
बाकी बहुतांश समाज ह्या तिन्ही धर्मातील अर्धी मुर्धी तत्वे आपापल्या सोयी नुसार स्विकारुन जमेल तितके आपल्या धर्माच्या नितीमत्तांचे पालन करताना दिसतो . माझे कित्येक असे ब्राह्मण मित्र आहेत जे उघडपणे अमेरिकेत जाऊन स्टेक खाल्याचे कबुल करतात अन वरुन अमेरिकेतील गायी गायीच नाहीत असा प्रतिवादही करतात. काही जैन मित्र आहेत जे मटण रस्स्यातुन पीस बाजुला काढुन फक्त रस्सा ओरपतात ! आणि काही बौध्द मित्र आहेत की जे तंबाखु मद्य आदी निशिध्द व्यसने करतात !
जो तो आपापल्या क्षमतेनुसार , आपापल्या सोयी नुसार जमते तेवढे धर्माचे आरचरण करतो ! हे उत्तम आहे !
मुद्दा इतकाच की बहुतांश लोकातील कोणीही , शुध्द सनातनी , शुध्द बौध्द , शुध्द जैन नाही, लोकं आपापल्या परीने ह्या तीन्ही धर्मातील तत्वे स्विकारुन सम्यक पणे जगतात. ह्या समुच्चयवादी , सम्यक जीवनशैलीचे नाव हिंदु असे आहे ! आणि हे अगदी आधुनिक आहे अशातला भाग नाही . महावीरांना किंवा तथागतांना कोणीही येशु ख्रिस्तासारखे सुळावर चढवलेले नाही , हाच ह्या विधानाचा निर्विवाद पुरावा आहे ! उलट सनातन धर्माने बुध्दाला विष्णुचा ९वा अवतार मानुन त्याला आदरच दिलेला दिसुन येतो.
तस्मात् बौध्द धर्म तत्वज्ञान हे हिंदुधर्माला मारक असे नसुन आधारभुतच आहे. विशेषतः वेदांताच्या , अद्वैताच्या आकलनात फार म्हणजे फार मदत होते बौध्द मताची. कारण बौध्द मत बस एक पायरी अलिकडे अद्वैताच्या अनुभुतीच्या !
___________________________
हां तर बॅक टू मेन टॉपिक :
बुध्दाने चार आर्य सत्य सांगितली -
१. जगात दुःख आहे.
२. त्या दुःखाला कारण आहे.
३. हे कारण म्हणजे तृष्णा (इच्छा आणि हव्यासा) होय.
४ . इच्छा व हव्यासा नियंत्रित करणे हाच दुःखाच्या निरसनाचा उपाय / मार्ग आहे.
आणि ह्यासाठी पुढे अष्टांगिक मार्ग सांगितला :
सम्यक दृष्टी
सम्यक संकल्प
सम्यक वाणी
सम्यक कर्म
सम्यक उपजीविका
सम्यक व्यायाम
सम्यक स्मृती
सम्यक समाधी
____________________________________
हां तर झालं असं की -
नोकरी काम धंद्याच्या निमित्ताने मला जवळपास दररोज पुणे दर्शन करावे लागते. त्यामुळे जवळपास १-२ तास अशा विषयांवर चिंतन करायला मोकळा वेळ मिळतो . हां तर अशाच एका चौकात ट्रॅफिक सिग्नलला थांबलो असताना एक दृष्य दिसले -
एल लहान मुलगी - अगदी २-३ वर्षाची असेल . भुरकट केस . मळकट कपडे , अनवाणी पायाने सिग्नल पाशी उभी. सोबत तिची आई - तीही तशीच उन्हाने रापलेला काळा वर्ण , शरीराचा कृशपणा गरीबी , दारिद्र भक्कपणे दाखवुन देणारा ! तिच्याही पायात चप्पल वगैरे नाही. ट्रॅफिकसिग्नलवर थांबलेल्या काहीतरी थातुरमातुर खेळणी वगैरे विकत असणारी तिची अजुन काही मुले , तिही तशीच .
पण ती लहान मुलगी , अगदी दोन तीन वर्षाची - ज्या दुपारच्या बाराच्या उन्हात आपण आपल्या पोरांना घराबाहेर ही पडु देत नाही त्या अश्या रणरण फुफाट्यात डांबरी रस्त्यावर उभी आहे. पायात काही नाही , डोक्यावर काही नाही . अन्न अन्न करुन आई पाशी रडली असेल त्यामुळे चेहर्यावर सुकलेल्या अश्रुंचे डाग . बिचारी आई तिही हताश . आगतिक .
तिथेच पलिकडे दुसर्या सिग्नलच्या दुसर्या बाजुला तसाच ४-५ वर्षाचा एक मुलगा . तसाच उन्हाने रापलेला काळा वर्ण , फाटके कपडे , हातात गाडी पुसायचे फडके . त्याच्या डोक्याला अन डोळ्यांना काही तरी लागले होते . त्याचा २५-२७ वर्षाचा बाप काहीतरी त्याच्या डोळ्यात घालत होता , बहुतेक स्वच्छ पाण्याने धुवत असावा . बाकी काय करु शकणार आहे ?
मोठ्ठा सिग्नल असल्याने सगळं शांतपणे न्याहाळत होतो अन मनात विचार आला - जगात दु:ख आहे , त्या दु:खाला कारणही आहे , पण ते कारण म्हणजे तृष्णा ?
ह्या लहान लेकरांना कसली आलीय तृष्णा ? त्या दोन वर्षाच्या पोरीला काय हवं आहे ? साधं पोटभर जेवण ? सावली ? ह्याला तृष्णा म्हणायच ?
त्या ४-५ वर्षाच्या मुलाला डोळ्याला काही लागले असेल तर डॉक्टर कडे जावे वाटले , बरे व्हावे वाटले तर त्याला तृष्णा म्हणायच ?
नाही नाही . काही तरी चुकतंय ! दु:खाचं कारण तृष्णा नाही .
आणि कोण कुठली ही ही माणसे ? माझा जीव का कळवळतोय ह्यांच्यासाठी ? मला का दु:ख होतंय ? मला कसली आलीय तृष्णा ? माणसाला माणसासारखं जगायला मिळावं ही अपेक्षा म्हणजे तृष्णा ?
आणि मग -
का माझ्या मनात नाथांसारखा करुणभाव उत्पन्न होत नाही ? का नाही मी जवळ जाऊन त्या लेकराला कडेवर घेत ? त्याचे अश्रु पुसत ? का नाही त्याला दोन घास भरवत ?
नाथांची गोष्ट निराळी होती - नाथांच्या गावाकडाचा वाडा कोणी जाळला नव्हता , नाथांची जमीन कोणी हडपली नव्हती की नाथांची इंजिनियरिंग किंवा मेडिकल करायची संधी कोणी हिसकावुन घेतली नव्हती .
बघ बघ अजुनही तुझा जीव त्या जुनाट दु:खाने तळमळतो आहे . का ?
पण मग साध्या न्यायाची अपेक्षा करणं ह्याला तृष्णा म्हणायच का ?
असो . सिग्नल सुटतो . आपण पुढे निघुन जातो. पण मनात विचारांची चक्रे मात्रे काही केल्या थांबत नाहीत !
_____________________________________
तर तात्पर्य काय की - दु:खाचे कारण तृष्णा हे नाही . त्या लेकरांना अशाच आई बापाच्या पोटी जन्म का मिळावा ? आपल्याला आपल्याच कुटुंबात जन्म का मिळावा ? आणि अंबानीला अंबानीच्या घराण्यात जन्म का मिळावा ? अर्थात तृष्णेच्या उदयाच्या आधीच काहीतरी आहे जे तुमची सुखं आणि दु:खेही आधीच निर्धारित करत आहे.
आणि मग झक मारत आपल्याला पुर्वजन्म , सुकृत , प्रारब्ध , संचित कर्माची संकल्पना मान्य करावी लागते.
पण मग पुर्व जन्म सुकृत संचित कोणाला ? कारण आत्मतत्वाला मृत्यु नाही कारण मुळातच जन्मच नाही -
न जायते म्रियते वा कदाचि-न्नायं भूत्वा भविता वा न भूयः ।
अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो-न हन्यते हन्यमाने शरीरे ॥ २-२० ॥
मग लोकं हे असं सञ्चित घेऊन का जन्माला येतात अन का ही दु:खे (आणि फॉर दॅट मॅटर सुखेही) भोगतात ? तर हे सगळं हे लिंगदेहाला आहे. लिंग देह अर्थात हा पंचभुतीक इंद्रियांचा समुच्चय असलेला देह म्हणजे मी , अशी जी धारणा आहे आणि ह्याचा उपयोग करुन मी निरनिराळे भोग भोगेन अशी जी वासना आहे , हे ह्या पुनर्जन्मादि गोष्टींचे कारण आहे ! मी देह आहे हे अज्ञान हेच मुळ आहे ह्या सार्या दु:खाचे ! दुखाचे , वाईट वाटुन घेण्याचे काही कारणाच नाही !
आणी हे भगवंताने पहिल्याच वाक्यात सुस्पस्ष्टपणे सांगितलं आहे आधीच !
अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे ।
गतासूनगतासूंश्च नानुशोचन्ति पण्डिताः ॥ २-११ ॥
तस्मात् दु:खाचे कारण तृष्णा हे नसुन हा लिंगदेह म्हणजे मी असे जे देहबुध्दीचे अज्ञान आहे हे दु:खाचे खरे कारण आहे !
अरे पण मग आत्ता आहेत ह्या दु:खांचे काय करायचं !
ही दु:खे तुला ह्या उपरोल्लिखित विचाराची जाणीव व्हावी म्हणुन दिलेली भेट आहे ! आणि हे तुच मागुन घेतलेलं आहेस - कुंती कृष्णाला काय म्हणाली आठवतंय ना ?
विपद: सन्तु ता: शश्वत्तत्र तत्र जग्गुरो ।
भवतो दर्शनं यत्स्यादपुनर्भवदर्शनम् ॥ २५ ॥
ठीक आहे . पण मग ह्या दु:खाच्या निवृत्तीचा उपाय काय ?
सोप्पं आहे की - मी देह नाही . स नित्योपलब्धि: स्वरूपोऽहमात्मा। हे एकदा कळलं की तुझ्या लक्षात येईल की आत्म्याला दःख असं काहीच नाही . हे जे काही आहे ते हे सगळं अन्नमय कोष मनोमय कोषाच्या पातळीवर आहे . आनंदमय कोषाच्या पातळीवर केवळ आनंदच आहे !
पण हे कळतंय पण वळतंय कुठं ? मार्ग काय ? साधना काय ?
तेही भंगवंताने सांगुन ठेवले आहे आधीच -
ज्ञानयोग ( सांख्य योग) , राजयोग , भक्तीयोग
त्यात ज्ञानयोगात कपिलमुनींचे सांख्य दर्शन जसेच्या तसे - ही समस्त प्रकृती पंचमहाभुते आणि त्रिगुणांच्या समुच्चयातुन बनली आहे, त्यात तुमचा देह आला , तुमचे मन आले आणि दःखाचे आकलन करणारी बुध्दी ही आली . हे कळण्यासाठी पंचीकरण नावाचा एक स्वतंत्र विषय आहे ! ह्या विषयावर श्रीधरस्वामींनी लिहिले आहे, समर्थांनी लिहिले आहे , ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिले आहे आणि खुद्द श्रीमदाद्य शंकाराचार्यांनीही लिहिले आहे ! इतके पुरेसे आहे ह्याचे महत्व कथन करायला !
राजयोग
एवढं तत्वज्ञान नाही कळत तर साक्षात भग्वद्स्वरुप असलेल्या पतंजलींनीं अष्टांग योगाचा प्रशस्त राजमार्ग दाखवलेला आहेच !
यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा समाधी !
पण हा मार्ग एकदम टेक्निकल झाला , हे सगळं गुरुगम्य आहे . प्रत्यक्ष गुरु शेजारी नसतील तर साधा अंतर्कुंभक करणे देखील जीवावर बेतु शकते !
मग त्याहुन सोप्पा म्हणजे भक्ती मार्ग - समर्थ म्हणाले - नवविधाभक्तिराजमार्ग - ते काही उगीच नाही !
श्रवणं कीर्तनं विष्णोः स्मरणं पादसेवनम्। अर्चनं वन्दनं दास्यं सख्यमात्मनिवेदनम् ॥
मस्त आनंदाने एकेक पायरी चढत वर जायचे , काही गडाबड नाही , काही कष्ट नाही, काही रिस्क नाही, की काही त्रास नाही , बस आनंद !
पण सगळ्यात सोपा कोणता मार्ग असेल तर तो म्हणजे खुद्द भगवान म्हणाले तो - कर्मयोग !
सन्न्यासः कर्मयोगश्च निःश्रेयसकरावुभौ ।
तयोस्तु कर्मसन्न्यासात्कर्मयोगो विशिष्यते ॥
कर्मसंन्यासापेक्षा कर्मयोग हा साधण्यास सुगम असल्यामुळे श्रेष्ठ आहे. इतकं निर्विवादपणे स्पष्ट सांगुन ठेवलं आहे .
आपल्याला बस इतकंच करायचे आहे की -
नैव किञ्चित्कत्करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित् । पश्यञ्श्रुण्वन्स्पृशञ्जिघ्रन्नश्नन्गच्छन्स्वपञ्श्वसन् ॥ ५-८ ॥
प्रलपन्विसृजन्गृह्णन्नुन्मिषन्निमिषन्नपि । इन्द्रियाणीन्द्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन् ॥ ५-९ ॥
बस इतकेच लक्षात ठेव की -
कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिन्द्रियैरपि ।
योगिनः कर्म कुर्वन्ति सङ्गं त्यक्त्वात्मशुद्धये ॥
आता एकदा हे कळलं ना , मग तु सुटलेला आहेस ! आता काहीही बंधन नाही. तु ऑलरेडी सुटलेलाच आहेस ! काहीही दु:ख नाहीच !! ,
"बंधन आहे , दु:ख आहे , त्यातुन बाहेर पडण्यासाठी साधना उपसना असलं काही कारायचे आहे" असे जे काही तुला वाटत आहे , तो तुझ्या मनाचा देहात्म बुध्दीचा भास आहे . हे म्हणजे लोखंडावर लागलेल्या गंजासारखे आहे . आणि लोखंड जसे तापत्या भट्टीत लाल भडक करुन नंतर ठोकुन ठोकुन शुध्द करतात तसे काहीसे ह्या प्रपंचाचा उद्देश आहे . आणि शुध्द लोखंडाला परीसपर्ष झाला की लागलीच सोने होते तसे ! पण इथे तर मुळात परीसस्पर्ष आधीच झालेला आहे, आता फक्त इम्प्युरिटीज जाळुन नष्ट करायच्या आहेत. रादर ह्या इम्प्युरिटीज , अशुध्दता ही नाहीतच , आहे तो केवळ त्यांचा भास आहे , तो जाळुन नष्ट करायचा आहे बस्स ! सो -
Burn , baby Burn .
श्रेयो हि ज्ञानं अभ्यासात् ज्ञानात् ध्यानं विशिष्यते ।
ध्यानात् कर्मफलत्यागः त्यागात् शान्तिः अनन्तरम् ॥
हे वर लिहिलेलें जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत अभ्यास कर , पण ह्या अभ्यासापेक्षाही कळणे अर्थात ज्ञान हे श्रेष्ठ आहे , आणि मग हे कळलं आहे त्याचे ध्यान हे त्या कळण्यापेक्षाही श्रेष्ठ आहे . आणि मग नुसतेच ज्ञान का ? सर्व कर्मात रत रहात , ध्यानाने कर्मफलांचा त्याग करणे हे त्याहीहुन जास्त बेस्ट ! एकदा हे जमलं की मग शांतीच शांती आहे सतत ! तिथं दु:ख असं काही नाहीच ! एकदा ब्रह्मीभुत झाला त्याला कसलं आलंय दु:ख बिख्ख !
_______________________________
तस्मात् आता आपल्यासाठी चार आर्य सत्ये अशी आहेत
१. दु:ख असं काही नाहीयेच , जो आहे तो दु:खाचा भास आहे , तो तुम्हाला कृपास्वरुप लाभलेला आहे.
२. हे दु:ख आहे असे जे भासते आहे त्या भासाला कारण आहे .
३. ते कारण म्हणजे देहात्मभाव . आणि त्या दु:खाला , त्या भासाला उद्देशही आहे - तो म्हणजे तुम्हाला देहात्मबुध्दीच्या पलीकडे पहायला शिकवणे.
४. ह्या भासाचे निराकरण करण्याचे अनेक मार्ग आहेत , ज्ञानयोग , राजयोग , भक्तीयोग , कर्मयोग ! तुम्हाला जो मार्ग सुलभ वाटतो तो स्विकारायला तुम्ही स्वतंत्र आहात , शिवाय केवळ एकच मार्ग स्विकारला पाहिजे असाही कोणाचा दुराग्रह , अभिनिवेष नाही, तुम्हाला जे काही सुलभ वाटते , ते स्विकारा !
तूम्ही मुळातच ह्या दु:ख्याच्या भासातुन सुटलेलेच आहात !
_______________________________
हुश्श. फायनली !
I see you !
______________________________
|| ॐ शांति: शांति: शांति: ||
प्रतिक्रिया
25 Feb 2025 - 7:22 pm | सुबोध खरे
हायला
अशा अध्यात्माच्या धाग्यावर सुद्धा (त्यातले मला ओ कि ठो कळत नाही) लोक आपले राजकीय पूर्वग्रह आणि ठसठस बाहेर काढतात हे पाहून थोडंसं आश्चर्य आणि गम्मत वाटली.
लोकांच्या मोदीद्वेषाची गळवं कुठे कुठे फुटतील ते सांगता येत नाही हेच खरं
बाकी चालू द्या.