नमस्कार. गेल्या अनेक दिवसांपासून सतत एक मॅसेज व्हायरल होतोय की, २५ जानेवारीला सगळे ग्रह एका रेषेमध्ये येणार आहेत, खूप अभूतपूर्व दृश्य असेल वगैरे. काही वेळेस तर त्याचे फोटोज- व्हिडिओजही व्हायरल होत आहेत. अनेक जणांना त्यावर उत्तर दिल्यानंतर शेवटी हे लिहावसं वाटलं. वस्तुस्थिती सांगण्यापूर्वी तो कंटेंट बनवणार्यांचं खरंच कौतुक! अगदी सगळीकडे तो मॅसेज गेलेला आहे. अगदी शाळेतल्या मुलांपर्यंतही! भले तो मॅसेज चुकीचा असला तरी त्या निमित्ताने लोक आकाश बघणार आहेत, ग्रह शोधणार आहेत, हेही नसे थोडके! असो!
तर आज २५ जानेवारीला सगळे ग्रह एका रेषेत अजिबात नाही आहेत. आणि जर मुळात सगळे ग्रह एका रेषेत आले असते तर पृथ्वीवरून बघताना बुध व शुक्र तर सूर्याच्या अलाईनमेंटमध्ये असल्याने दिसणारच नाहीत. पण शुक्र तर सुंदर दिसतोय आणि दुर्बिणीतून त्याची कोरही खूप छान दिसते आहे. आणि सगळे ग्रह एका रेषेत आले असते तर मंगळ- गुरू- शनि- युरेनस- नेपच्यून ह्यांची प्रतियुती (ओपोझिशन) असायला हवी होती. शनि व नेपच्यून तर आकाशात बघताना सूर्याच्या दिशेला (पलीकडच्या बाजूला) आहेत, गुरूची प्रतियुती डिसेंबरमध्ये झाली, तो आता संध्याकाळी आकाशमध्याजवळ दिसतो व मंगळाची प्रतियुती नुकतीच झाली. युरेनसही दुर्बिणीतून संध्याकाळी आकाशमध्याजवळ दिसतो. बूध तर सूर्याच्या पूर्वेला आहे, आत्ता विजिबल नाहीय. थोडक्यात सगळे ग्रह असे वेगवेगळ्या बाजूला आहेत. (२० डिसेंबर २०२० रोजी गुरू व शनि एकमेकांच्या जवळ आले होते, त्या अनुभवाबद्दल माझा ब्लॉग)
मग हा मॅसेज इतका कसा पसरला? तर त्याचं कारण इतकंच आहे की, बूध वगळता सगळे ग्रह आज रोजी संध्याकाळच्या आकाशात विजिबल आहेत. अंधार पडल्यानंतर बूध वगळता सगळे ग्रह तांत्रिकदृष्टीने विजिबल आहेत. पण ते खूप लांब आहेत. त्यात शनि थोडा अवघड आहे. युरेनस व नेपच्यून टेलिस्कोपने प्रयत्नपूर्वक दिसतील. शुक्र, गुरू व मंगळ मात्र अगदी सहजपणे न चुकता दिसतील. अंधार पडल्यावर पश्चिमेला शुक्र, पूर्वेला लालसर मंगळ व आकाशमध्याजवळ गुरू हे दिसतील. शुक्राच्या खाली किंचित दक्षिणेला अंधुक शनि दिसेल.
आणि आकाशामध्ये धुमकेतू, ग्रहण, युती, उल्कावर्षाव अशा घटना अधून मधून घडतात. पण जेव्हा त्या घडत नसतात, तेव्हाही आकाश नितांत सुंदर आणि आश्चर्यकारक असतंच! तेव्हाही अनेक गोष्टी बघण्यासारख्या असतातच. तेव्हा भले चुकीचा मॅसेज लोकांपर्यंत आला असला तरी त्या निमित्ताने मुलं आकाश बघत आहेत हे चांगलंच आहे. माहितीच्या युगामध्ये फक्त माहितीवर अवलंबून न राहता स्वत:च्या अनुभवाचा आधार मात्र घेतला पाहिजे. अजून तीन- चार महिने आकाश दर्शन चांगलं करता येईल. आकाशातल्या गमती बघता येतील. त्या आकाशातच बघण्यासाठी व मुलांनाही आकाशातच दाखवण्यासाठी मन:पूर्वक शुभेच्छा!
(वाचल्याबद्दल धन्यवाद! जवळच्यांसोबत लेख शेअर करू शकता. माझ्या ब्लॉगवर माझे आकाश दर्शनाचे अनुभव वाचता येतील. त्यासह तिथे ट्रेकिंग, सायकलिंग, रनिंग, ध्यान इ. बद्दलचे माझे लेख वाचता येतील. निरंजन वेलणकर ०९४२२१०८३७६. लेख लिहील्याचा दिनांक २५ जानेवारी २०२५.)
प्रतिक्रिया
25 Jan 2025 - 11:19 am | गवि
उत्तम माहिती.
एक शंका. असे सर्वच्या सर्व ग्रह एकाच वेळी एका लायनीत येणे खरेच शक्य आहे का? म्हणजे केवळ तांत्रिक दृष्ट्या ती एक शक्यता असेलही पण तसे वास्तवात घडते का?
25 Jan 2025 - 11:26 am | मुक्त विहारि
माहिती बद्दल धन्यवाद
25 Jan 2025 - 1:18 pm | कर्नलतपस्वी
काल म्हणजे चोवीस जानेवारीला सुर्यास्त नंतर आकाशात पश्चिमेला एक चमकदार तारा/ग्रह दिसत होता चंद्र कोर अतिशय सुंदर दिसत होती. पहाटे चार वाजता चंद्र कोर तांबूस रंगाची पूर्वेकडे दिसली पण कुठेच चांदण्या दिसल्या नाहीत. आकाश निरभ्र होते.
वाटले आपल्याला याच विषयावर व्य नि करावा म्हणून मिपा उघडले तोच आपला माहितीपूर्ण लेख दिसला. आज पुन्हा बघण्याचा प्रयत्न करेन.
धन्यवाद.
25 Jan 2025 - 10:16 pm | कर्नलतपस्वी
आकाशात दोन मोठे एक छोटा व त्याच्या रेषेत खुप छोटा असे चार डिस्टिंक्ट न चमकणार्या चांदण्या दिसल्या. पैकी शुक्र नेहमीच दिसत असल्याने त्याची जागा माहिती आहे.एक तांबूस दिसत होता तो मंगळ असावा . आपण लिहील्या प्रमाणे आकाशाच्या मध्यावर खुपच मोठी चांदणी तो गुरू असावा.
कदाचित बरोबर कींवा चुक पण आज आकाश निरभ्र असल्याने आकराव्या मजल्याच्या छतावरून सुंदर दिसत होते. माझ्या नऊ वर्षाच्या नातीने पण आनंद घेतला.
28 Jan 2025 - 9:45 pm | अनामिक सदस्य
काही लोकान्नी मेसेज मधे वापरलेल्या app ची नावे दिली आहेतः Startracker, Stellarium,
एका मेसेज मधे तर केसरी वाड्यातील observatory मधे जाऊन ग्रह बघितले असेही वाचले.
या app वर ग्रह एका ओलीत नाहीत हे दिसायला हवे ना?
29 Jan 2025 - 6:27 am | अस्वस्थामा
तसं नसावं, मुळात ते ग्रह या वेळी आकाशात असणं आणि ते आपल्याला पहायला मिळणं इतकीच ही घटना आहे. इंग्रजीत alignment असा शब्द वापरलाय, ते एकाच वेळी जे चार पाच ग्रह एका मागे एक मिरवणुकीत सहभागी झाल्यासारखे उगवून मावळत आहेत त्या अनुषंगाने आहे. नेहमीप्रमाणे मिडिया, सोशल मिडिया या सर्वांनी मसालेदार कन्टेन्टच्या नादात लिहिलेलं लोकांनी गैरसमज करून अजून वेगवेगळं केलंय.
बहुतेक अॅप्समध्ये एका रेषेत दिसतात आणि ते इथून तसेच दिसणं अपेक्षित आहे.
हे असं आपल्याला दिसणारं आकाश,
ही त्या ग्रहांची स्थिती,
यावरुन स्पष्ट व्हावं काय आहे ते.
29 Jan 2025 - 4:46 pm | मार्गी
@ कर्नलतपस्वी जी, हो का! धन्यवाद! :) अरे वा! हो, परवापर्यंत आकाश खूप छान होतं.
@ अस्वस्थात्मा जी, लेखामध्ये चर्चा केली आहे. अलाईनमेंटही काल्पनिकच आहे. त्यातला अर्थ इतकाच की, बूध वगळता सगळे ग्रह संध्याकाळी विजिबल आहेत. आणि काही जण अलाईनमेंट म्हणजे आकाशातली आर्क अलाईनमेंट (वक्र रेषेतले ग्रह) असंही म्हणत असावेत. पण तसे ते नेहमी असतातच ना!
3 Feb 2025 - 4:46 pm | अस्वस्थामा
तुमचं बरोबरच आहे, पण बातमी जास्तीत जास्त ग्रह एकाच वेळी दृश्यमान असण्याबद्दल असावी (जे की नेहमी नसतं) आणि लोकांनी चमचमीत करायला सोईचं वापरलं इतकाच त्याचा अर्थ.