जीवाभावाचा "सोबती": सोबती सेवा फाउंडेशन

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
6 Dec 2024 - 3:23 pm

✪ रोगाकडून आरोग्याकडे नेणारी वाट
✪ अवघड जागची दुखणी आणि संवादाची सोबत
✪ "मला मरण हवंय!"
✪ देखभाल करणार्‍यांसमोरच्या अडचणी
✪ मोबाईल व्यसनमुक्ती
✪ आनंद घेण्याचा अधिकार आणि अपराधभाव
✪ योग्य वेळी थांबण्याची कला

नमस्कार. आज ५ डिसेंबर रोजी एक वेगळा शुभारंभ अनुभवता आला. माझी काकू सौ. वर्षा वेलणकर व माझा काका श्री. चंद्रशेखर वेलणकर ह्यांनी सुरू केलेली ही नवीन संस्था! खरं तर काका त्याच्या व्यवसायातून नुकताच "रिटायर" झाला आहे! पण तो आणि काकू ही नवीन इनिंग सुरू करत आहेत. हिन्दीमध्ये निवृत्त होणे ह्यासाठी "अवकाश प्राप्त" त्यामुळेच म्हणत असावेत! अगदी अनौपचारिक घरगुती कार्यक्रमामध्ये "सोबती सेवा फाउंडेशन" संस्थेचं हे लोकार्पण. अगदी स्नेही जन व कुटुंबीय आणि वडिलधार्‍यांच्या उपस्थितीमध्ये झालेला हा छोटा कार्यक्रम.

काका- काकू‌ तसे इतरांपेक्षा खूप वेगळे. विशिष्ट ध्येय समोर ठेवून व स्वत:च्या आवडीनुसार जगण्याचं सूत्र ठरवून एकमेकांचे साथीदार बनले. दोघंही तसे मुळात हाडाचे पत्रकार. काकू तर खूप संघर्ष करून समोर आलेली व बंडखोर विचारधारेची पत्रकार. खूप वेगवेगळ्या विषयांमध्ये कार्यरत असलेली. कला- चित्रकला, मंडल आर्ट ते रद्दी पेपरच्या कलाकृतींपासून पत्रकारिता, अनुवाद व कालांतराने आरोग्याच्या क्षेत्रात काम असा तिचा आवाका. काकासुद्धा तसा. नातेवाईकांसाठी व पुतण्यांसाठी विशेष जिव्हाळ्याचा. सदैव हसतमुख चेहरा आणि कोणत्याही गंभीर विषयामध्येही विनोदबुद्धी शोधणारा. ज्याचं इंग्रजी ऐकावं व वाचत राहावं असा! त्याबरोबरच खूप मोठा व्यासंग असलेला.

२०१३ पासून किडनीच्या त्रासामुळे काकूच्या आरोग्याच्या समस्या सुरू झाल्या. जो शब्द उच्चारतानासुद्धा भिती वाटते ते "डायलिसिस" होण्याची सुरूवात व त्यातील गुंतागुंती. अनेक वेळेस अक्षरश: "ढगाला हात लावून परत येण्याचा" हा प्रवास. कालांतराने किडनी ट्रान्सप्लांट व त्यापुढचा प्रवास. पण हे करत असतानाही जमेल तेव्हा, शक्य असेल तेव्हा कलेची उपासना व अनुवादासारखं काम करण्याचा काकूचा उत्साह. अनेक वेगवेगळ्या विषयांवरच्या पुस्तकांचा तिने अनुवाद केला. त्यातले काही पुस्तकं तर अति भयाण. जसं ते "ऑशविट्झचा फोटोवाला!" इतकं भयाण पुस्तक की, सामान्य वाचकालाच ते वाचताना मरण यातना होतात. नैराश्य येतं. पण तेही एक आव्हान म्हणून काकूने अनुवादित केलं. तो सगळा विषय इतर लोकांपुढे शेअर करण्याच्या ऊर्मीतून. आणि आपले अनुभव शेअर करण्याची तिची ऊर्मी तर फार प्रबळ आहे. वेळोवेळी ती ज्या ज्या यातनांमधून व मनस्थितीमधून गेली व अजूनही तिला जावं लागतं त्याचं तटस्थ- साक्षीभावाचं निवेदन ती लिहून शेअर करत असतेच.

त्यांच्या ह्या प्रवासातूनच "किडनी सपोर्ट ग्रूप" हा उपक्रम सुरू झाला. ह्या खडतर प्रवासातले त्यांचे सहप्रवासी- काकूची मोठी बहीण विजयलक्ष्मी ताई, इतर सुहृद व काकाचे ऑफीसमधील सहृदय सहकारी ह्या सगळ्यांची त्यांना साथ मिळाली. त्यांच्या "किडनी सपोर्ट ग्रूप" उपक्रमातही त्यांचे सुहृद जोडले गेले. माझ्या बाबांनी (डॉ. गिरीश वेलणकर) त्यांना जनकल्याण समितीच्या सेवा भवनसोबत काम करण्याविषयी सुचवलं. त्यातून सेवा भवनमध्ये डायलिसिस रुग्णांसाठी विशेष उपक्रम सुरू झाला. पुढे जाऊन त्यांच्यासाठी समुपदेशन, मार्गदर्शन व योगोपचार अशाही गोष्टी सुरू झाल्या.

काकूला नाजुक तब्येतीच्या अनेक मर्यादा असून आणि पत्रकार म्हणूना काकाला वेळेची बंधनं असूनही दोघांनी हे काम पुढे नेलं. किडनीच्या रुग्णांच्या पलीकडे जाऊन टोकाच्या स्थितीमध्ये असलेल्या (terminally ill) रुग्णांसोबत व कँसर रुग्णांसोबत काम सुरू केलं. ह्या सगळ्या प्रवासात त्यांच्या अनुभवातून ते इतर रुग्णांचे वाटाडे बनत गेले. आता "अवकाश प्राप्त" झालेला काका व काकू ह्या संस्थेद्वारे ह्या मार्गावर आणखी पुढे जाणार आहेत. केवळ किडनीचे रुग्ण नाही तर सर्वच शेवटच्या टप्प्यातील रुग्ण, रुग्णांची देखभाल करणार्‍यांच्या अडचणी, त्यांचे प्रश्न आणि त्याबरोबर फिटनेस व योग- ध्यान अशा अनेक आयामांनी ही संस्था काम करणार आहे.

संस्थेचं नाव "सोबती" खूप अर्थपूर्ण आहे. ते केवळ सोबत करणार आहेत. मार्गदर्शक किंवा मदत करणारा हा समान पातळीवर असेलच असं नाही. म्हणून "सोबती" हे नाव. रुग्णांना- देखभाल करणार्‍यांना सोबत करणं व सोबत करता करता त्यातून उभी राहील ती अनेक प्रकारची मदत करणं, हे ह्या संस्थेचं सूत्र आहे. रोग- आरोग्य व ध्यान- योगाच्याही पुढे जाऊन बालक- पालक नातेसंबंध, मोबाईलपासून व्यसनमुक्ती‌ (हो!), आर्थिक मदतीसाठी संसाधनं व आधार शोधून देणं, अंतिम अवस्थेतील रुग्णांसाठी पॅलिएटीव्ह (परिहारात्मक) देखभाल, आरोग्यदायी जीवनशैलीचा अवलंब असे अनेक ह्या कामाचे आयाम असतील. संस्थेच्या उद्दिष्टांची गुंफण लक्षवेधी अशा लघुरूपांनी (acronyms) केली गेलेली आहे:

सोबती सेवा फाउंडेशन- each one, reach one
सोबती- SOBATI- Service Oriented Backup to Assist the Terminally Ill
स्वwayam- Self Wellness Attainment through Yoga And Meditation
PAT (Parents and Teachers) for kids- 10 वर्षे वयाच्या मुलांच्या पालक व शिक्षकांना सोबत
CFK- Caring for Kideny
MPMB= माझा फोन- माझं बाळ = मेरा फोन- मेरा बच्चा = My Phone, My Baby! फोनच्या दुष्परिणामांची जाणीव करून देणारी व फोन कसा वापरावी हे सांगणारी ही सोबत

काका- काकूच्या मनोगतामधून व आदरणीय विनायक काकांसारख्या वडिलधार्‍यांच्या आशीर्वादातून ह्या आगामी कामाची रूपरेषा कळत गेली. स्वत:च्या तब्येतीच्या वेदनादायी कसरतीमध्ये असं काम करण्यासाठी खूप हिंमत तर असावीच लागते, पण त्याबरोबर ह्या काट्यांच्या वाटेवरचे वाटाडे आणि "सोबतीही" तितकेच हिमतीचे असावे लागतात. काका व काकूच्या आप्त जनांच्या रूपाने त्यांना ही सोबत मिळाली आहे आणि ते ह्या बाबतीमध्ये खूप नशीबवान आहेत. अगदी पुण्यातली आई जिला म्हणावी अशी मैत्रीण व असे सुहृद त्यांना लाभले आहेत. हे काम पुढे नेताना मदत करू शकतील, आणखी पुढचा मार्ग दाखवू शकतील असे वडीलधारे व वाटाडे मिळाले आहेत. जनकल्याण समितीची मंडळी, दीनानाथ रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचारी व इतर अनेक लोक त्यात आहेत.

चर्चेमध्ये काही लक्षात राहतील अशा गोष्टी कानावर आल्या. काकाने एका रुग्णाचा अनुभव सांगितला. त्यांचं वय ७५ वर्षे. डायलिसिसचा उपचार ते घेत आहेत. त्यांच्या पत्नीचं निधन झालं व मुलगी विदेशात. श्रीमंत व्यक्ती आहेत. पण त्यांना आता इतरांवर अवलंबून राहावं लागतंय. प्रोटीन पावडर दुधात टाकून देईल अशी व्यक्ती नाही, त्यामुळे द्रव प्रोटीनची ते चौकशी करतात. इतकं समृद्ध जगलेला माणूस, पण आता हतबल. मनाने अतिशय समाधानी व शांत. पण ही हतबलता त्यांना नकोशी वाटते. ते काकाला म्हणतात, "मला मरण हवं रे, मला मरण कसं मिळेल सांग ना." त्यावर काकाचं मार्मिक उत्तर की, "हो, मला कळतंय व पटतंय तुम्ही काय म्हणता व का म्हणता. पण मी फक्त तुमच्या मरणासाठी प्रार्थनाच करू शकतो हो, मला आणखी काही करता येणार नाही." पण "इच्छा मरण" हा एक किती नाजुक विषय आहे, ही कल्पना त्यातून येते.

आपल्या समाजात तसंही आनंदी असणं व सुखी असणं हे पापासमानच मानलं जातं! त्यात एखादी व्यक्ती खूप गंभीर रुग्णाची केअरटेकर असेल तर? तिने मग कधी आनंदी‌ होणं, सुखी होणं, आपल्या आवडीच्या दोन गोष्टी करणं ह्याला काय समजलं जाईल? समाजाचा पगडा इतका प्रचंड की, ती व्यक्ती स्वत:ही ह्या आनंदाबद्दल अपराधभाव बाळगते. देखभाल करणार्‍यांच्याही अशा अवघड जागच्या समस्या असतात. त्यांनाही सोबतीची व संवादाची गरज असते. जिथे आर्थिक अडचणींमुळे व्यावसायिक देखभाल घेणारे ठेवता येत नाहीत, तिथे घरच्यांना प्रशिक्षण देण्याची गरज असते. त्याबरोबर मदत करणार्‍याने एक व्यवहार म्हणून ती करायची नसते. त्यामध्ये जिव्हाळा व आत्मीयता लागते. विनायक काकांनी डोंगर चढणार्‍या एका मुलीचं उदाहरण सांगितलं. तिलाच चढायला दम लागत असूनही ती तिच्या लहान भावाला घेऊन चढली. कारण तो "ओझं" नसून तिचा भाऊ होता.

चर्चेमध्ये कानावर आलं की, आज अगदी २०- २५ वर्षांच्या तरुणांनाही डायलिसिस करावं लागत आहे. डायबेटीस व इतर विकार त्यांना होत आहेत. पुढे जाऊन तर संसाधनांच्या कमतरतेमुळे ७०+ रुग्णांच्या ऐवजी तरूण व जवाबदारी असलेल्या रुग्णांनाच उपचार देण्याची जीवघेणी निवड करण्याची वेळ आपल्यावर येणार आहे. हे सर्व ऐकताना सतत जाणवतं की, फिटनेस किती महत्त्वाचा आहे. निसर्गाने जे शरीर दिलं आहे, ते टिकवून ठेवणं किती महत्त्वाचं आहे. ज्यांच्यामध्ये रोगाची स्थिती निर्माण झाली आहे, त्यांच्यासाठी उपचाराचे काही पर्याय आहेत. पण ते किती बिकट आहेत- किती ताण निर्माण करणारे आहेत! त्याउलट जर फिटनेस टिकवून ठेवला, आरोग्यदायी जीवनशैलीचा अंगीकार केला तर किती सहज हे टाळताही येऊ शकतात. त्यासाठी जागरूकता होण्याची मात्र मोठी गरज आहे. त्यामुळे ही सोबत व हा संवाद फार आवश्यक आहे.

प्रत्येक जण व्यक्तिगत उद्दिष्टांच्या दिशेने धावत आहे. ते बरोबरसुद्धा आहे. पण व्यक्तिगत उद्दिष्टांकडे धावण्याबरोबर समाजाच्या उद्दिष्टांचाही विचार केला पाहिजे. स्वत:चा विस्तार केला पाहिजे. चर्चेमध्ये एकांनी कौन बनेगा करोड़पतीमधला एक प्रसंग सांगितला. एक डॉक्टर तिथे स्पर्धेमध्ये आला. चांगला खेळला व त्याने ३ लाख २० हजार रूपये जिंकले. तेव्हा त्याने अमिताभला थांबवलं. आणि तो म्हणाला की, माझी जी अपेक्षा होती, जी इच्छा होती, ती पूर्ण झाली. माझी गरज पूर्ण झाली. आता मी पुढे खेळणार नाहीत. माझ्या मागे जे थांबलेले स्पर्धक आहेत, त्यांचा वेळ मी अडवणार नाही. आता त्यांना संधी द्यावी! अशी ही दुर्मिळ थांबण्याची कला! अचूक वेळ पकडण्याची‌ कला!

अशा ह्या घरगुती कार्यक्रमातून बाहेर पडताना खूप ऊर्जा मिळाली. "सोबती सेवा फाउंडेशनबद्दल" अधिक माहितीसाठी संपर्क- श्री चंद्रशेखर वेलणकर- 9404727345. लेखन- निरंजन वेलणकर 09422108376.

समाजजीवनमानमदतआरोग्य

प्रतिक्रिया

रीडर's picture

7 Dec 2024 - 11:00 am | रीडर

परवडणारी palliative care खूप महत्वाची सेवा आहे.

मुक्त विहारि's picture

7 Dec 2024 - 11:34 am | मुक्त विहारि

मस्त.

वाखुसा.

मार्गी's picture

9 Dec 2024 - 11:07 am | मार्गी

वाचनाबद्दल व प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद!

कर्नलतपस्वी's picture

13 Dec 2024 - 7:27 am | कर्नलतपस्वी

चाळीस वर्ष वैद्यकीय सेवेशी निगडित कार्यरत असल्यामुळे आदरणीय काका काकू किती मोलाचे कार्य करत आहेत त्याची पुरेपूर जाणीव आहे.

त्यांच्या कार्याला शुभेच्छा.

विलासराव's picture

14 Dec 2024 - 11:19 pm | विलासराव

खूप छान.... ध्यान कोणते करतात. त्यासाठी काही मदत हवी असेल तर मला कळवा.

चौथा कोनाडा's picture

20 Dec 2024 - 11:24 am | चौथा कोनाडा

काका- काकू‌ तसे इतरांपेक्षा खूप वेगळे. विशिष्ट ध्येय समोर ठेवून व स्वत:च्या आवडीनुसार जगण्याचं सूत्र ठरवून एकमेकांचे साथीदार बनले. दोघंही तसे मुळात हाडाचे पत्रकार. काकू तर खूप संघर्ष करून समोर आलेली व बंडखोर विचारधारेची पत्रकार. खूप वेगवेगळ्या विषयांमध्ये कार्यरत असलेली. कला- चित्रकला, मंडल आर्ट ते रद्दी पेपरच्या कलाकृतींपासून पत्रकारिता, अनुवाद व कालांतराने आरोग्याच्या क्षेत्रात काम असा तिचा आवाका. काकासुद्धा तसा. नातेवाईकांसाठी व पुतण्यांसाठी विशेष जिव्हाळ्याचा. सदैव हसतमुख चेहरा आणि कोणत्याही गंभीर विषयामध्येही विनोदबुद्धी शोधणारा. ज्याचं इंग्रजी ऐकावं व वाचत राहावं असा! त्याबरोबरच खूप मोठा व्यासंग असलेला.

काकूला नाजुक तब्येतीच्या अनेक मर्यादा असून आणि पत्रकार म्हणूना काकाला वेळेची बंधनं असूनही दोघांनी हे काम पुढे नेलं. किडनीच्या रुग्णांच्या पलीकडे जाऊन टोकाच्या स्थितीमध्ये असलेल्या (terminally ill) रुग्णांसोबत व कँसर रुग्णांसोबत काम सुरू केलं. ह्या सगळ्या प्रवासात त्यांच्या अनुभवातून ते इतर रुग्णांचे वाटाडे बनत गेले.

खरंच...

दिव्यत्वाची जेथ प्रचिति,
तेथे कर माझे जुळती _/\_

त्यांच्या या सत्कर्माला मनःपुर्वक शुभेच्छा !