अलगद दु:ख आज डसतंय गं
मन माझं खुळं मुसमुसतंय गं
रूणझुण पाऊलात रूतलेला काटा
पूर येता मनामध्ये दिसेनाशा वाटा
कुसळ का उरामध्ये सलतंय गं..
मन माझं खुळं मुसमुसतंय गं..
वठलेल्या वेलीवरी चोरून का उभं
खाली काळी माती अन शिरावरी नभ
सुकलेलं पान असं रूसतंय गं..
मन माझं खुळं मुसमुसतंय गं..
दूर दूर कोण तिथं काळोखात फ़िरे
मला पाहूनिया करी कोणते इशारे
सुख तिथे दूर उभं हसतंय गं
मन माझं खुळं मुसमुसतंय गं..
भेगाळली धरा वाहे आसवांचा झरा
आभाळात नुसताच वाजतो नगारा
प्रखर उन्हांत रान भिजतंय गं
मन माझं खुळं मुसमुसतंय गं
कधी कानी येता काही प्रेमभरे बोल
मोह पडे जीवास नि होई घालमेल
भुलव्याला रोज असं फ़सतंय गं
मन माझं खुळं मुसमुसतंय गं..
- प्राजु
प्रतिक्रिया
12 May 2009 - 6:43 am | अवलिया
कधी कानी येता काही प्रेमभरे बोल
मोह पडे जीवास नि होई घालमेल
भुलव्याला रोज असं फ़सतंय गं
मन माझं खुळं मुसमुसतंय गं..
+१
आवडले मनाचे मुसमुसणे :)
--अवलिया
12 May 2009 - 7:09 am | सँडी
मस्तच!
-संदीप.
काय'द्याच बोला.
12 May 2009 - 7:02 am | बिपिन कार्यकर्ते
सुंदर कविता. छानच आहे.
बिपिन कार्यकर्ते
12 May 2009 - 7:11 am | समिधा
वेगळी पण खुपच छान कविता.
समिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)
12 May 2009 - 8:23 am | सायली पानसे
खुप खुप सुंदर कविता ... मनापासुन आवडली.
12 May 2009 - 8:35 am | क्रान्ति
झकास कविता. शब्द न् शब्द चपखल आणि अप्रतिम! :)
क्रान्ति
***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ
मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***
13 May 2009 - 6:27 pm | परिकथेतील राजकुमार
असेच म्हणतो.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
12 May 2009 - 9:10 am | सहज
चांगलीच हुरहुर लागलीय मनाला.
12 May 2009 - 9:33 am | दिपक
खुळं मुसमुसणारं मन आवडलं. सुंदर कविता. :)
कुणी चाल लावेल का? छान ठेक्यात गाणं तयार होईल.
12 May 2009 - 9:40 am | राघव
भेगाळली धरा वाहे आसवांचा झरा
आभाळात नुसताच वाजतो नगारा
प्रखर उन्हांत रान भिजतंय गं
कधी कानी येता काही प्रेमभरे बोल
मोह पडे जीवास नि होई घालमेल
भुलव्याला रोज असं फ़सतंय गं
हे विशेष आवडलेत.
राघव
12 May 2009 - 10:54 am | जागु
मुसमुसणार मन खुप सुंदर प्रकट झाल आहे.
12 May 2009 - 12:02 pm | पाषाणभेद
"दूर दूर कोण तिथं काळोखात फ़िरे
मला पाहूनिया करी कोणते इशारे
सुख तिथे दूर उभं हसतंय गं
मन माझं खुळं मुसमुसतंय गं.."
द्वैअर्थी लिखाण छानआहे.
कवी बींची आठवण झाली.
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)
12 May 2009 - 1:40 pm | कपिल काळे
नाद आहे कवितेत. छान!!
चाल लावीन असं वाटतंय गं
मन माझं वेडं मुसमुसतंय गं!!
12 May 2009 - 3:08 pm | जयवी
ए मस्त झालीये कविता...... छान गाणं होईल ह्याचं.
फक्त एक थोडंसं ....... "प्रखर उन्हात रान भिजतंय गं" इथलं "भिजतंय जरासं खटकतंय. " जळतंय" असं चालेल का ?
12 May 2009 - 3:10 pm | मराठमोळा
चाल लावली तर मस्त श्रवणीय गाणं तयार होईल. :)
चाल लावून स्वतःच्या आवाजात चढवा ही कविता.
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
12 May 2009 - 7:54 pm | प्राजु
:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
13 May 2009 - 6:30 am | चन्द्रशेखर गोखले
मस्त ! सुंदर गीत !!
13 May 2009 - 1:28 pm | दत्ता काळे
'रूणझुण पाऊल' - हि कल्पना फार आवडून गेली.
13 May 2009 - 2:05 pm | विसोबा खेचर
सुंदरच कविता..!
प्राजू, जियो....
तात्या.
13 May 2009 - 4:06 pm | उदय सप्रे
झकास !
तुझ्या सार्या वेदनांचा माझ्या मनात पोत
मी तुझी पडछाया , पाठी,तुझ्यावर मात्र झोत
माझ्याच स्पर्शानं जुनं दु:ख ठुसठुसतंय गं
मन माझं खुळं मुसमुसतंय गं..
13 May 2009 - 8:51 pm | प्राजु
वा उदयजी.. सुंदर!
आणि धन्यवाद सुद्धा!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
13 May 2009 - 4:12 pm | चतुरंग
सुंदर झालंय.
छानशी चाल लावून तुझ्या आवाजात टाक. मस्त वाटेल ऐकायला! :)
चतुरंग
13 May 2009 - 9:03 pm | धनंजय
वरील वाक्यांबद्दल
+१ आणि +१
13 May 2009 - 9:29 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>छानशी चाल लावून तुझ्या आवाजात टाक. मस्त वाटेल ऐकायला!
सुंदर कविता !
सलतयं ग !
मुसमुसतंय गं
डसतंय गं
रूसतंय गं..
हा जो नाद आहे, तो भन्नाट हं !!!!
13 May 2009 - 6:25 pm | लिखाळ
अरे वा ! छान झाली आहे कविता..मस्त !
अनेक वर्षे जगणार्या मोठ्या वृक्षांच्या बाबतीत सामान्यतः वठणे हा शब्द वापरला जातो. वठलेला वेल ही कल्पना वेगळी वाटली.
-- लिखाळ.
13 May 2009 - 9:01 pm | प्राजु
सर्वांचे मनापासून आभार!
:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/