नोट
रात्र झालेली . बाहेर पावसाला उजाडलेलं .
अंधाराच्या आडोशाने रात्र मनसोक्त नहात होती. तिच्या आठवणीत तोही मनसोक्त नहात होता . माहौलच तसा होता . जीवघेणा !
हवेत पावसाचा गारवा भरून राहिलेला . घरातही . गोधडीच्या आतही . तो त्याच्या बेडवर होता . अंधारात . टक्क जागा . गोधडीत गुरफटून . कुशीमध्ये उशी घेऊन . बाहेरच्या सरी कधी हळुवार तर कधी जोरदार . मनातही तसंच .
किती आठवणी ...
त्याला कॉलेजमध्ये असताना थिएटरचं वेड लागलेलं .खरं तर तो त्याचा प्रांत नव्हता ; पण त्या वेड्या वयातलं असतं काही वेड .
तिथे त्याला ती भेटली होती .
तो तिच्याकडे ओढला गेला. त्यावेळेस तिची सुरुवात होती. त्यामुळे ती हवेत. हा तर नवाच. हा आपला सतत तिच्या अवतीभवती .एके दिवशी त्याने त्याचं ,मन तिच्याजवळ मोकळं केलं. ती काही बोलली नाही ; पण तिने तिचे हसरे डोळे आश्चर्याने उडवले . त्या नजरेत अन हास्यात घायाळ करण्याचं सामर्थ्य होतं .
ती त्याच्याशी प्रेमाने बोलू लागली खरी.
एके दिवशी ती म्हणाली ,’अरे, कधी एखादं गिफ्ट द्यायचं असतं रे जीएफला !’
‘ ओह सॉरी ! माझ्या लक्षातच आलं नाही गं. काय देऊ तुला ? ‘असं म्हणत त्या सरळ पोराने पाकिटातून दोन हजाराची एक नोट काढली आणि तिला दिली .
‘हे माझं गिफ्ट ! पण जपून ठेव, खर्च करू नकोस ... जपून ठेवशील ?’
ते गिफ्ट अन त्याच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून तिने डोक्यालाच हात लावला . पण तिने ती नोट घेतली,
पुढे तिच्या अभिनयाची चर्चा होऊ लागली, तसं तिने याला अलगद बाजूला केलं आणि याने थिएटरला .
आठवणींचा सिनेमा पाहत त्याने डोळे मिटले.
झोपेने त्याला आईच्या मायेने कुशीत घेतलं .तेव्हा बाहेर सरी मंदावून अंगाई म्हणत होत्या.
-------
त्यानंतर काही दिवस मध्ये गेले . त्याला तिची आठवण रोजच असायची . पण अलीकडे प्रकर्षाने . त्याने बालगंधर्वला चक्कर टाकायची ठरवली . तिथे नाटकवाल्या मंडळींची चक्कर असतेच . पंढरीच ती त्यांची .
भेटली तर भेटली...बाकी ती त्याच्या मेसेजला रिप्लायसुद्धा करत नसे...
त्या दिवशी पाऊस उघडला होता . जंगली महाराज रस्ता फुललेला होता .संध्याकाळ भरात आलेली .
तो बालगंधर्वच्या कट्ट्यावर पोचला . योगायोगाने त्यादिवशी ती तिथे आलेली होती .
ती भेटली याला .तिने ओळखही दाखवली याला. पण तिच्या नजरेत ‘ती ‘ओळख नव्हती.
' कॉफी घेऊ या ? ‘ याने विचारलं .
‘येस्स !चालेल ,’ ती म्हणाली .
ते दोघे मागे कॅफेटेरियामध्ये गेले.
ती बोलत होती - नवीन नाटक ,भूमिका , तयारी ,धावपळ अन कौतुक . तिने, तू कसा आहेस ? एवढंही विचारलं नाही .
तिला थांबवण्यासाठी त्याने मध्येच विचारलं , ' मी दिलेली ती दोन हजाराची नोट ठेवली आहेस का गं तू ? .. जपून ? '
'येडायंस का तू ? तिचा काय उपयोग ? नोटबंदीमध्ये ती नोट बँकेत भरली मी ! ' तिने आताही तिचे डोळे उडवले होते ; पण त्यामध्ये ती आधीची कातिल अदा नव्हती .
तिची बडबड संपल्यावर ती निघाली . तोही निघाला .
निर्जीव नोटेला मन कुठलं ? नाही तर नोटबंदी केल्यावर त्या नोटेला किती वाईट वाटलं असतं .
जायबंदी मनाने तो पाय ओढत चालू लागला .
-----------------------------------------------------------------------------------------------------
प्रतिक्रिया
18 Jul 2024 - 8:28 pm | कर्नलतपस्वी
भावनेचे आडनाव व्यवहारे कधीच होऊ शकत नाही.
22 Jul 2024 - 1:04 pm | चित्रगुप्त
मुकेशच्या गाण्यांसाठी एकदम फिट
-- मेरे टूटे हुए दिल से कोई तो आज ये पूछे के तेरा हाल क्या है ....
छोट्या छोट्या कथा छान असतात तुमच्या.
22 Jul 2024 - 1:22 pm | गवि
नोटाबंदी होईपर्यंत तरी खर्च न करता जपून ठेवली होती असे दिसते. हेही नसे थोडके. नंतर तिची किंमतच उरली नाही असे होऊ नये म्हणून शहाणपणा दाखवून बँकेत जमा केली. मुलगी नॉर्मल आहे. मुलगा आजन्म दुखभरी आत्मा राहणारे लोक असतात तसा वाटतो.
22 Jul 2024 - 2:31 pm | Bhakti
आत्ताच एक प्रेमभंगाची, डिप्रेशन ची खरीखुरी रिल पाहत होते..हा नायकपण तसाच दिसतो, हल्ली असे नायक वाढत आहे?नायिका पण बरोबर मार्गी लागली ;)नायकाला मार्गी लावा ;)
22 Jul 2024 - 2:26 pm | प्रसाद गोडबोले
कथा पोहचली.
बोचली,
मनाला टोचली.
दुःख पैशाचं वाटतं नाही, समोरच्या माणसाला आपली कदर नाही हा विचार मनाला लागून जातो.
एका बलापणीपासूनाच्या मित्राला एकदम टोकाच्या इमार्जन्सीच्या वेळेस केवळ एका फोन कॉल वर तब्बल ५२००० रुपये ट्रान्स्फर केले.
त्यातले २००० ची एक नोट त्याने नोटाबंदीचे आधी आणून दिली अन् बाकीचे नंतर देतो म्हणाला.
अजून दिले नाहीयेत, ८वर्ष झाली. :(
ती नोट मी नोटाबंदीचे धांदलीत बँकेत जमा करून टाकली , पण आता खंत वाटते. मस्त फ्रेम करून घरात लावायला पाहिजे होती.
काही दिवसांपूर्वी त्या मित्राला फोन केला तेव्हा त्याने माझा नंबर ब्लॉक केला आहे हे लक्षात आले. त्यादिवशी मला #सत्तर_रुपये_वारले ह्या जगप्रसिद्ध वाक्प्रचाराचा अर्थ कळला.
31 Aug 2024 - 10:41 pm | बिपीन सुरेश सांगळे
वाचक मंडळी खूप आभारी आहे .
31 Aug 2024 - 10:42 pm | बिपीन सुरेश सांगळे
दोन दिवसांपूर्वी सकाळ / मटा मध्ये आलेली बातमी - अजूनही २००० च्या नोटा बदलून मिळतील .