( याच नावाचा आधीचा लेख अपूर्ण आहे तो कृपया वाचू नये . संपूर्ण लेख इथे पुन्हा टाकत आहे . तसदीबद्दल क्षमस्व )
आवली घाटाच्या पुढे रस्ता नसल्यामुळे मोठ्या शिताफीने वरच्या एका शेतात शिरलो . शक्यतो नदीचे वळण जोपर्यंत आहे तोपर्यंत उभा कडा असतो . नंतर पुन्हा पाय ठेवण्यासारखी जागा निर्माण होते . अशी जागा दिसली रे दिसली की मी वरून खाली उडी मारत असे . कारण माझा अनुभव असा होता की अजून चांगली जागा शोधायच्या नादात आपण नर्मदेपासून हळूहळू लांब लांब निघून जातो . त्यापेक्षा जीवाला किमान धोका असलेली कुठलीही जागा उत्तम समजून खाली उतरणे श्रेयस्कर असते . जेणेकरून मैया चा काठ सुटणार नाही . लहान मुल सतत आईच्या पदराचा काठ धरून चालते पहा तसे काहीसे माझे होते ! मला इथे फार कुणाला भेटण्याची इच्छा नव्हती . म्हणून माईचा काठ धरून चालत राहायचो . आपल्या मनातल्या या सर्व इच्छा नर्मदेला वेळोवेळी कळत असतात . याची अनुभूती मला काही मिनिटातच आली ! कारण आज मी जो मार्ग पकडला होता त्याने कोणीच जात नाही . काही अंतर झाडाझुडपातून चालल्यावर थोडीफार शेती लागली . आणि अचानक एक मोठी नदी समोर आडवी आली . नंतर पार केल्यावर मला कळाले की तिचे नाव इंद्रावती होते . नदी एका सरळ रेषेमध्ये येऊन नर्मदेला काटकोनामध्ये मिळत होती . इथे नर्मदेचे पात्र देखील रुंद खोल आणि धीर गंभीर आहे . या नदीचे पात्र देखील खूप खोल आहे असे वाटत होते . हिच्या पाण्याला खूप गती होती .
आता मला ही नदी ओलांडणे क्रमप्राप्त होते . मी नदीचा अंदाज घेऊ लागलो . नदी अतिशय खोल होती आणि पाण्याला फार गती होती . पावसामुळे पाण्याची पातळी वाढली होती . आणि पाणी थोडेसे गढूळ होऊन दृश्यमानता कमी झाली होती .अशा परिस्थितीमध्ये नावे ने नदी ओलांडणे सुद्धा अवघड असते . मी पाहू लागलो की आजूबाजूला कोणी केवट , कोळी ,शेतकरी ,गुराखी किंवा गावकरी दिसतो आहे का .परंतु हा संपूर्ण परिसर अतिशय निर्मनुष्य होता . बहुतेक मला कुठलाही जनसंपर्क नको असे म्हणून मी काठाने चालत असल्याचा हा परिणाम असावा ! नर्मदा मैयाने माझी परीक्षा पाहायचे ठरविले होते ! दहा मिनिटे झाली , पंधरा मिनिटे झाली , वीस मिनिटे झाली .अखेरीस अर्धा तास मी तिथे वेड्यासारखा एकटाच उभा राहिलो ! आता मात्र माझ्या संयमाचा अंत होऊ लागला . इतका वेळ झाला तरी कोणीच तिथे येत नाही हे पाहून मला काय करावे ते सुचेना . अखेरीस मी नर्मदा मातेला म्हणालो , " हे पहा मी तुझ्या काठाने चालणार आहे हे तर निश्चित आहे . तू कितीही संकटे टाक किंवा अडथळे उभे कर . मी तुझा किनारा सोडणार नाही . मला सुरक्षित पुढे नेणे ही सर्वस्वी तुझी जबाबदारी आहे . वेळोवेळी तू माणसे पाठवून मला मार्गदर्शन करते सुद्धा आहेस . परंतु आज तुला काय झालेले आहे माहिती नाही ! " वाचकांनो मी खरोखरीच नर्मदा माते शी असा संवाद करायचो . अगदी वैखरीमध्ये म्हणजे मोठ्या आवाजात बोलायचो . कोणाला काय वाटेल ?कोण आपल्याला काय म्हणेल ? याची फिकीर मी एरवी सुद्धा करत नाही , तर तिथे करण्याचा प्रश्नच नव्हता . " मी गेले अर्धा तास इथे उभा आहे . तू मला मार्गदर्शन केलेले नाहीस . आता मी माझे स्वतःचे डोके वापरून ही नदी पार करणार आहे . माझे काय व्हायचे ते होऊ दे . ती आता सर्वस्वी तुझी जबाबदारी राहणार आहे . मला जर काही बरे वाईट झाले तर त्याची संपूर्ण जबाबदारी नर्मदा मातेची असणार आहे ! ऐकून ठेवा रे झाडांनो ! मै आ रहा हू नर्मदा मैया ! " अशी जोरात आरोळी ठोकून मी काठी टेकत-टेकत पुढे सरकू लागलो . वाळूचा एक तीव्र उतार इंद्रावती नदीमध्ये निर्माण झाला होता . खरे तर काठावरील वाळूचा उतार पाहून नदीची खोली सहजपणे काढता येते . परंतु अजून पर्यंत मला इतक्या मोठ्या नद्या फारशा लागल्याच नव्हत्या .त्यामुळे हा अंदाज मला इथे असताना आलेला नव्हता ,हे मान्य करतो . वाळूचा उतार जर तीव्र खोल असेल तर याचा अर्थ नदी खोल असते . आणि अतिशय तिरपा ,कमी कोनाचा उतार आहे म्हणजे ती नदी उथळ असते . हा उतार साधारण ६० अंश कोनाचा होता . त्यामुळे त्या वाळू ने लगेच तिचा रंग दाखवला . एका क्षणात मी भसकन गुडघाभर खोल पाण्यात गेलो . पाण्याची ओढ आता जाणवू लागली . मी काठीने पुढची जमीन चाचपत होतो .आणि हळूहळू एक एक पाऊल पुढे टाकत होतो . या नदीमध्ये प्रचंड पाण गवत आणि शेवाळे वाढलेले होते . त्याची पाती पंधरा-वीस फूट पर्यंत लांब होती . ती पायाच्या भोवती वळवळ करत होती . जणू काही साप पायाला विळखा घालतो आहे असे वाटायचे . हळूहळू पुढे सरकताना अखेरीस शेवाळ्याच्या जाळ्यांनी माझे पाय पूर्णपणे जखडून गेले . एक मन सांगत होते अजूनही मागे फिर आणि कोणाची तरी वाट बघ . एखादा नावाडी येईल . तो तुला नावेने पलीकडे सोडेल . परंतु मी जर असे केले असते तर तो नर्मदेवर दाखविलेला अविश्वास ठरला असता . तिला मी एकदा शब्द दिला होता की तुझ्या जीवावर मी आता नदी पार करणार आहे .तर ती पार करणे हे माझे कर्तव्य होते . मला तारायचे का मारायचे हा तिचा प्रश्न होता ! 'द बॉल वॉज इन हर कोर्ट नाऊ ! ' पायाखाली वाळू होती .
परंतु ती नदीच्या वेगवान प्रवाहामुळे पुढे पुढे सरकत होती . समुद्रामध्ये जशी पायाखालची वाळू लाटांमळे सरकून जाते तसे काहीसे होत होते . मी साधारण ४० टक्के नदी पार केली असावी . आता पाण्याला प्रचंड ओढ होती . पाणी इतके काळे होते की तळ अजिबात दिसत नव्हता .उलट हलणाऱ्या त्या पाण्यात आकाशाचे प्रतिबिंब दिसत होते . नर्मदेचे पाणी इतके शुद्ध आहे की दहा दहा फूट खोल काय आहे ते सुद्धा स्पष्ट दिसते . इथे मला दहा इंचावर देखील काय आहे कळत नव्हते . माझे मन हळूहळू कच खाऊ लागले . आणि माझ्या लक्षात आले की आपला निर्णय चुकला आहे . कारण नदीची खोली अजून वाढतच चालली होती . आणि माझ्या पाठीवर तर झोळी वगैरे सर्व होते . आता मी मुंगीच्या गतीने पावले पुढे सरकवू लागलो . परत फिरता येणे आता अशक्य होते . कारण पायांना शेवाळ्याच्या पानांचे प्रचंड विळखे पडले होते . मी मनामध्ये अचानक काही संकट आले तर काय काय करता येईल याचा विचार करू लागलो . परत फिरता येणे हा एक पर्याय होता .परंतु तो खूप कठीण होता . कारण पाण्याला प्रवाह इतका जबरदस्त होता की ते करताना मी पाण्यामध्ये पडलो असतो . शिवाय वळताना शेवाळ्याने पायाला अजून घट्ट विळखा घातला असता तो वेगळाच . विचार करता करता माझ्या लंगोटीला इंद्रावती नदीच्या थंडगार पाण्याचा स्पर्श झाला . आणि माझ्या लक्षात आले की आता माझा पाय खरोखरीच खोलात पडलेला आहे . पोहत पलीकडे जावे हा एक उपाय होता परंतु पाण्याला गती असल्यामुळे ते अवघड होते . पाण्याची गती इतकी जबरदस्त होती की पाण्याने मला थेट नर्मदेमध्ये नेले असते आणि माझी परिक्रमा खंडित झाली असती . शिवाय पाठीवर असलेल्या पिशवीचे ओझे प्रचंड होते . तशी ती पाठीवर ठेवून पोहता येणे अशक्य होते . आता काय करावे असा विचार करत मी तिथे उभा होतो . एक शेवटचा उपाय म्हणून पुढे वाळू किती खोल आहे ते तपासावे असे मी ठरवले . माझे द्विधा अवस्थेमध्ये असलेले मन स्वतःला शिव्या घालू लागले . कुणी सांगितलं होतं नसता द्रविडी प्राणायाम करायला !शांतपणे बसला असतास काठावर तर काय मेला असता का ? आता कोण वाचवणार तुला ? दुसरे मन सांगत होते .गप रे ! नर्मदा मैया आहे ना ! बिनधास्त जायचे ! जे होईल ते होईल ! फार फार तर काय होईल ? नर्मदे मध्ये बुडून मृत्यू येईल ! ह्याच्यासारखी पुण्यदायक घटना अजून काय असू शकते ! मी थोडेसे पुढे वाकून काठी खाली घुसवली ! आणि माझे डोळेच पांढरे झाले ! काठी भसा भसा भसा तीन साडेतीन फूट आत मध्ये गेली ! अगदी सरळ घुसली ! तिला कुठलाही अडथळा नाही ! विरोध नाही !काही नाही ! याचा अर्थ माझ्या पायाखालची कडक वाळू आता संपली होती आणि मऊ शार गाळमाती सुरू झाली होती ! लाखो वर्षे नद्यांनी डोंगराचे कडे घासून गोळा केलेले बारीक मातीचे कण असतात ते ! त्याची बरोबरी जगातली दुसरी कुठलीच माती करू शकत नाही ! या माती इतके सूक्ष्म काहीही नसते ! अचानक माझ्या पायाखालची वाळू ठप्प करून तुटली आणि माझे पाय गुडघाभर खोल गाळात रुतले ! एका क्षणात झालेल्या या प्रकारामुळे मी गांगरून गेलो . माझे पाठीवरील दप्तर सहा इंच पाण्यामध्ये बुडलेले होते . आणि आत मध्ये ठेवलेले सर्व काही भिजू लागले . मी काठीने आधार घ्यायचा प्रयत्न केला . परंतु कुठेही खोचली तरी काठी खोल खोल आत मध्ये जात होती . इकडे माझ्या असे लक्षात आले की हळूहळू मी खाली खाली चाललो आहे . मी एक पाय बाहेर काढण्याचा प्रयत्न केला की दुसरा पाय खोल जायचा आणि पुन्हा बाहेर नाही यायचा . इतका तो चिखल पक्का आणि मजबूत होता . अशा ठिकाणी कितीही पट्टीचा पोहणारा मनुष्य असला तरी तो काहीही करू शकत नाही .कारण जर तुम्हाला तुमचे पायच हलवता नाही आले तर काय पोहणार ! आता मात्र परिस्थिती अत्यंत गंभीर आहे हे माझ्या लक्षात आले . मघाशी पायाखाली वाळू होती तोपर्यंत परत उलटे फिरता आले असते . आता माझे दोन्ही पाय गाळात रुतले असल्यामुळे मी पुरता फसलो होतो . हा नदीचा साधारण मध्यभाग असल्यामुळे अतिशय वेगाचा प्रवाह मला उजवीकडे नर्मदे कडे ढकलत होता .सतत ढकलत होता . हातातील काठी काहीच कामाची नव्हती . पाठीवरील दप्तर आता अर्धे भिजले होते .
भिजून जड झाल्यामुळे दप्तराने माझे वजन वाढविले होते . आणि त्यामुळे मी अजूनच वेगाने खाली खाली रुतू लागलो होतो . एक क्षणभर असे वाटले की दप्तर प्रवाहामध्ये सोडून द्यावे . काठी सुद्धा सोडून द्यावी . आणि हाताने काही करता येते का पहावे . परंतु दप्तरामध्ये नर्मदा मैया होती . त्यामुळे प्राण गेला असता तरी तिला सोडले नसते . बहुतेक मृत्यू मृत्यू म्हणतात तो आता जवळ आलेला आहे अशी मी मनाची समजूत घालायला सुरुवात केली . कारण पाण्यामध्ये शेवाळे , पाण गवत इतके जास्त होते की काही केल्या मी या जंजाळातून सुटणे अवघड वाटत होते . त्यामुळे आता काहीही हालचाल न करता शांतपणे उभे राहायचे असे मी ठरवले . हळूहळू थोडे थोडे खचत खचत मी खोल पाण्यामध्ये चाललो होतो . आता पाणी माझ्या छातीपर्यंत आले होते . आणि पाय गुडघ्याच्याही वरपर्यंत खाली गाळामध्ये रुतले होते . हळूहळू पाणी वर सरकत होते आणि मी खाली खचत होतो . कॉम्प्युटरची 'शट डाऊन प्रोसिजर ' असते तशी मी 'प्राणा शट डाऊन प्रोसीजर ' सुरू केली . मृत्यू समयी डोक्यात जो विचार असतो तसा पुढचा जन्म येतो . त्यामुळे अंते मतिः सा गतिः । हे डोक्यात ठेवून शेवटी देवाचे स्मरण करावे असे शास्त्रात सांगितले आहे . असा विचार मी करेपर्यंत माझे संपूर्ण दप्तर पाण्यामध्ये बुडले . आणि पाणी गळ्यापर्यंत आले . पाय अजूनच खोल खोल चालले होते . मी काठी समोर खोचून दिली आणि हात जोडले . गजेंद्र मोक्षाची कथा मला मनोमन आठवली . हत्तींचा राजा असाच एकदा पाणी प्यायला जातो आणि एक मगर त्याला खोल दलदलीमध्ये खेचून नेते . आधी स्वतःच्या ताकदीवर विश्वास असलेला गजेंद्र तिचा खूप प्रतिकार करतो .परंतु जेव्हा तो खोल खोल चिखलामध्ये बुडू लागतो , तेव्हा मात्र समोर उगवलेले एक कमळ सोंडेने खुडून वैकुंठाच्या दिशेला भिरकावतो आणि विष्णूचे स्मरण करतो ! लहानपणी कीर्तनामध्ये कधीतरी ऐकलेली ही कथा बरोबर योग्य वेळी आठवली बर का ! आता माझी अवस्था त्या गजेंद्रहून काही वेगळी नव्हती . फरक फक्त इतकाच होता की मी अजूनही देवाचे स्मरण केलेले नव्हते . मी खाली खचतच होतो . हनुवटीला पाणी लागले . ओठ पाण्यात बुडाले . आता मला या संकटातून वाचवणारे कोणीही दिसत नाही असे वाटत होते आणि आता नाकात पाणी जाणार इतक्यात लक्षात आले की अरे नर्मदा मैया शेजारीच आहे की ! आपण नर्मदे हर तर म्हणालोच नाही ! म्हणून शेवटचा पुकारा करायचा असा विचार करून दोन्ही हात वेगाने आकाशाकडे उंचावले .खांदे पडलेले शरीर ताणून उंच करून ओठ पाण्याबाहेर आणले आणि जोरात ओरडलो नर्मदे s s s s s s हर ! हे म्हणताना सुद्धा इंद्रावती नदीचे थोडेसे पाणी माझ्या तोंडात गेले होते . माझे र अक्षर पूर्ण होत नाही तोपर्यंत समोरच्या काठावर असलेल्या मातीच्या डोंगरावर एक मुलगा मला दिसू लागला ! तो दोन्ही हात उंचावून मला आवाज देत होता ! समोर कोणीतरी मनुष्यप्राणी आहे हे पाहिल्याबरोबर माझी जगण्याची आशा पल्लवीत झाली ! आशा म्हणजे नक्की काय असते हे त्या दिवशी मला कळले ! तो ओरडून मला सांगू लागला , "बाबाजी दाए तरफ सरको ! " उजवीकडे तर नर्मदा होती म्हणजे पाणी अजून खोल असणार होते परंतु तो सांगतो आहे म्हणून मी पाय हलवायचा प्रयत्न केला . तोपर्यंत मी पुन्हा नाका तोंडात पाणी जाईल इतका बुडलो होतो . मी पटकन आधी खोचून सोडून दिलेली माझी काठी हातात घेतली . श्वास थांबवून डोळे पाण्याखाली घातले . आणि काठीने उजवीकडे चाचपले . तर तिथे वाळू आहे असे माझ्या लक्षात आले . तिथे काठी रोवून मी हळूहळू माझा एक पाय सोडवायला सुरुवात केली . आता काठीचा आधार मिळाल्यामुळे हळूहळू माझा उजवा पाय गाळातून बाहेर निघाला . पायाला विळखा मारलेल्या गवताने आणि शेवाळ्याने खरे तर माझे फार मोठे काम केले होते . पायाला तो विळखा असल्यामुळे मी पटापटा जमिनीमध्ये घुसलो नाही . उजवा पाय अजून उजवीकडे टाकल्याबरोबर मी फुटभर वर आलो आहे असे माझ्या लक्षात आले ! त्या पायावर भार देऊन हळूहळू मी माझ्या डावा पाय सोडवला ! आता मी छाती एवढया पाण्यात उभा होतो ! मी त्या मुलाकडे पाहिले . त्याने ओरडून सांगितले . "अभी तीन कदम सीधे हात की तरफ जाओ . " भाषेचा अभ्यास किती आवश्यक आहे हे तुम्हाला इथे लक्षात येईल . सिधे हात म्हणजे सरळ जा असा अर्थ नाही . तर या भागात उजव्या हाताला सिधा हात म्हणतात . उजवीकडे खोल संगम आहे हे माहिती असून देखील तो मुलगा आपल्याला तारणार आहे याची खात्री मला असल्यामुळे मी उजवीकडे तीन पावले सरकलो ! आता मी अजून फुट भर वर आलो होतो !
आता खरे तर माघारी वळावे आणि पुन्हा मागचा काठ गाठावा असे मला वाटत होते . परंतु मुलगा वरून ओरडत राहिला . अभी आठ कदम आगे आओ ! हळूहळू आठ पावले मोजून पुढे गेलो तेव्हा लक्षात आले की मी अजून बाहेर आलो आहे ! आता माझ्या भिजलेल्या सॅकमधून प्रचंड प्रमाणात पाणी बाहेर गळत होते ! आणि मी पुरेसा बाहेर आलेलो होतो ! अभी पाच कदम बाए हाथ ! त्याचे शब्द ऐकून मी अतिशय शांतपणे आणि विश्वासाने डावीकडे पाच पावले सरकलो . अशा पद्धतीने मार्ग सांगत सुमारे दहा पंधरा मिनिटात त्याने मला संपूर्णपणे नदीच्या बाहेर काढले ! मी बाहेर गेलो , पाठीवरील दप्तर जमिनीवर फेकून दिले ! काठी फेकून दिली ! आणि धावतच जाऊन नर्मदा मातेला जमिनीवर लोटांगण घातले ! नर्मदे हर ! नर्मदे हर ! नर्मदे माझे संकट हर ! असा धावा काय केला !आणि क्षणात तिने मला या संकटातून सोडवले होते ! मी विचार करू लागलो की ही धावा करण्याची बुद्धी मला आधी का नाही सुचली !आधी माझा स्वतःच्या तर्कशक्तीवर आणि तोकड्या अनुभवावर अतिशय फाजील असा अति आत्मविश्वास होता ! तो होता तोपर्यंत नर्मदेने मला काहीही सहकार्य केले नाही . आणि एकदाच धावा केल्याबरोबर मला किती सहज तारले ! हे कसे काय शक्य आहे ?कुठून आला तो मुलगा ! ? कोण होता तो ! ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला सविस्तर सांगतो . मी साष्टांग नमस्कार घातलेल्या अवस्थेमध्ये पडून राहिलो . इतक्यात तो मुलगा खाली आला . तो अजून कोणालातरी आवाज देत होता असे माझ्या लक्षात आले . त्याच्यापेक्षा वयाने थोडासा मोठा असलेला एक मुलगा एका गीर गाईला पकडून तो देखील उतारावरून पळत खाली आला . दोन्ही मुले माझ्यासमोर येऊन उभी राहिली . माझ्या अंगातील सर्व शक्ती निघून गेली होती . मृत्यू काय असतो हे जवळून अनुभवायला मिळाले होते . गलित गात्र होणे कशाला म्हणतात आणि आशा पल्लवीत होणे कशाला म्हणतात हे पुस्तकात वाचून खरोखरीच आपल्याला शिकायला मिळत नाही . त्यासाठी असा एखादा नचिकेतानुभव यावा लागतो ! पडल्या पडल्या मी दोघांना माझ्यासमोर बोलवले . आणि दोघांच्या पायावर डोके ठेवून नमस्कार केला . "नर्मदे हर बाबाजी . आपको दंडवत . " असे म्हणून दोघांनी मला नमस्कार केला . मी उठायचा प्रयत्न करत होतो हे पाहून दोघांनी मला उठायला मदत केली . आता मी उताणा पडलो . बसण्याची शक्तीच अंगात राहिली नव्हती . मी पडल्या पडल्या त्यांना विचारू लागलो . कोण आहात तुम्ही ? कुठून आलात ? ही कुठली नदी आहे ? नर्मदे काठची मुले फार हुशार असतात . धाकटा मला म्हणाला . हिंदीमध्ये म्हणाला . मी मराठी मध्ये लिहितो आहे , बाबाजी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला देतो .पण तुमची झोळी भिजलेली आहे . त्यातले सगळे सामान काढून बाहेर ठेवू का ? म्हणजे वाळायला सुरुवात होईल . चालेल असे म्हणून अनुमोदन दिल्याबरोबर दोघा भावांनी आतील एक एक वस्तू बाहेर काढून घट्ट पिळून पसरून उन्हामध्ये वाळत टाकायला सुरुवात केली . मला पुस्तके जपून ठेवायची सवय आहे . त्यामुळे एकात एक दोन प्लास्टिकच्या पिशव्या घालून मी माझी पुस्तके आणि नर्मदा परिक्रमेचे दिनमान लिहायचो त्या वह्या जलरोधक करून ठेवत असे . त्या पिशव्यांनी त्यांचे काम चोख बजावले होते . आणि किरकोळ ओलावा वगळता माझी सर्व पुस्तके वह्या थोडक्यात वाचली होती . बाकी नर्मदा मैया आणि पूजा साहित्य मात्र पूर्ण भिजून गेले . परंतु माझ्याकडे एका दुकानदाराने पाटणच्या पुढे एका गावात , तंबाखूचा टीनचा रिकामा डबा दिला होता , त्यामध्ये मी काडीपेटी ,कापूर , फुलवाती ठेवत असल्यामुळे ते मात्र कोरडे राहिले होते . बाकी प्रत्येक गोष्ट भिजून गेली होती . अंगावरचे कपडे सुद्धा काढून पिळून ठेवा . इथे कोणी बघायला येत नाही . पोरांनी मला सांगितले . आणि मी अंगावरचे वस्त्र देखील काढून पिळून वाळत घातले . सुदैवाने डोक्यावरचा फेटा तेवढा अर्धा कोरडा होता . तो लुंगी सारखा गुंडाळून मी उन्हात बसून राहिलो .
मुलांची गीर गाय शांतपणे चरत होती . हा आता सांगतो काय झाले ते . छोटा मुलगा सांगू लागला . आम्ही दोघे भाऊ आहोत . शेजारी आमचे गाव आहे भेला नावाचे . ही इंद्रावती नदी आहे . तिच्या काठावर इंद्रदेवाने तप केले म्हणून ही इंद्रावती . या नदीच्या काठावर पुढे थोडेसे जंगल आहे . तिथे आम्ही रोज गुरे चरायला घेऊन येतो . इथून बरोबर एक किलोमीटर अंतरावर आत्ता आमची बाकीची गुरे चरत आहेत . "मग तुम्ही इथे कसे काय आलात ? " मी आश्चर्याने विचारले . अहो बाबाजी काय सांगायचं तुम्हाला ! ही बघा ही आमची गाय ! ही सर्वात शांत गाय आहे . आणि सर्वात म्हातारी सुद्धा आहे . हिला काय झाले काय माहिती ! ही अचानक उधळली आणि इकडे पळत सुटली . आम्ही दोघे हिच्या मागे पळत सुटलो . असा वेडेपणा ती कधीच करत नाही . पण आज तिला काय झाले माहिती नाही ! ती पुढे पळते आहे आणि आम्ही मागे पळतो आहोत ! शेवटी ती इथे संगमावर येऊन थांबली . आता तिला ताब्यात घेणार , इतक्यात नर्मदे हर असा आवाज आला आणि तुम्ही पाण्यामध्ये बुडत असलेले मला दिसले . म्हणून मी ओरडून तुम्हाला रस्ता सांगायला सुरुवात केली . "पण तुला रस्ता कसा काय माहिती ? " वरती उभे राहून बघा ना बाबा ! तिथून नदीचा तळ व्यवस्थित दिसतो आम्हाला . म्हणजे खाली काळे असेल तर गाळ असतो आणि पांढरे दिसते ती वाळू असते . त्याच्यावरून अंदाज लावता येतो . आमच्या गावातले लोक ही नदी अशीच पार करतात . आधी उंचावर उभे राहून रस्ता कुठून आहे पाहून ठेवतात . आणि मग त्याप्रमाणे पावले टाकत नदी पार करतात . तुम्ही मघाशी जिथे बुडत होता तिथे खूप खोल डोह आहे . पण उजवीकडे वाळू आहे हे मला वरून दिसले . अशीच पुढची वाळू कुठे दिसते आहे ते बघून तुम्हाला मी वरून सांगत होतो . मुलगा अतिशय स्वाभाविकपणे हे सर्व मला सांगत होता . त्याचे चातुर्य आणि प्रसंगावधान पाहून मला फार कौतुक वाटले .त्याचे वय सात आठ वर्षाचे असावे . आणि भाऊ दहा वर्षाचा असेल . पाण्यामध्ये उभे राहिल्यावर खरोखरीच खाली काय आहे ते दिसत नाही .कारण तुम्हाला पाण्यामध्ये आकाशाचे प्रतिबिंब दिसत असते . परंतु तिरक्या कोनातून मात्र नदीच्या तळाशी काय आहे याचा अंदाज येतो . माझ्या लक्षात आले की ज्या क्षणी मी नर्मदा मातेला आवाज दिला की मी आता पाण्यात येतो आहे , त्या क्षणी त्या गोमातेला तिकडे कोणीतरी बुद्धी दिली ! की पळ ! कोणीतरी म्हणजे नर्मदा मातेनेच ! तिने स्कॅनर मारून पाहिले असेल की आता सर्वात जवळपास कोण आहे जो याला मदत करू शकतो ? तिला ही दोन मुले सापडली असतील . मुलांना तिने sos सिग्नल देऊन पाहिला असेल ही . परंतु मुले आपापल्या खेळामध्ये मशगुल असतात . त्यामुळे तिने गाईला धावण्याची बुद्धी दिली असे माझे स्पष्ट मत आहे . त्या क्षणी ती गाय तिथे पोहोचली नसती तर आज हा ब्लॉग वाचायची पाळी तुमच्यावर आलीच नसती . सिहोर जिल्ह्यातल्या एखाद्या बुधनी टाईम्स वगैरे स्थानिक वृत्तपत्रातील कोपऱ्यातील चार ओळीच्या बातमीने माझ्या आयुष्याची इतिकर्तव्यता झाली असती .
इंद्रावती नदीमे एक परिकम्मावासी की मौत ! बास !खेळ खल्लास ! परंतु नर्मदा जागृत आहे . नर्मदा तत्व अतिशय जागृत आहे ! स्वयम कार्यरत आहे ! एक हजार एक टक्के कार्यरत आहे ! नर्मदा माता आहे म्हणून आज मी आहे ! बरेचदा तुम्हाला हा ब्लॉग वाचून असे वाटत असेल की हा मूर्ख मनुष्य सतत मैया ,मैया ,नर्मदा , नर्मदा असे का करतो आहे ? त्याचे कारण हे असे काही अनुभव आहेत !की जे मला तिचा गुलाम बनवतात ! होय तिचा गुलाम बनून राहणे मला प्राणांपेक्षाही प्रिय आहे ! ती आहेच अशी की तिच्यासाठी काहीही करायला कोणीही तयार होईल ! नर्मदे हर !नर्मदे हर !नर्मदे हर !
संपूर्ण ब्लॉग इथे वाचावा : mazinarmadaparikrama.blogspot.com
प्रतिक्रिया
6 May 2024 - 6:17 pm | Narmade Har
लेख कॉपी पेस्ट करताना अर्धा मुर्धा पेस्ट झाल्यामुळे आधीचा लेख चुकीचा छापला गेला आहे . तो एडिट किंवा डिलीट करता येत नाही .मी ऍडमिशन संपर्क साधलेला आहे . तरी कृपया तो लेख न वाचता हा लेख वाचावा ही नम्र प्रार्थना . तसदीबद्दल क्षमस्व ! मिसळपाव चे लेखनाचे नियम अजून या मूढमतीस लक्षात येत नाहीत .
7 May 2024 - 9:59 am | अहिरावण
>>मूढमतीस लक्षात येत नाहीत
पुनरपि लेखनं पुनरपि प्रतिसादम् ,
पुनरपि वाचनम् रिफ्रेश करणम्।
इह मिपा बहुदुस्तारे,
कृपयाऽपारे पाहि संपादक
अत्र लिखतु अत्र लिखतु ,
अत्र लिखतु मूढमते।
7 May 2024 - 8:03 pm | Narmade Har
भो अहिरावण नमस्तुभ्यं ।
बुद्धोहम् त्वत्प्रसादतः ॥
वाचयामि मिपां सर्वं ।
न मे वाचति कश्चन ॥
Jokes apart, धन्यवाद . बहुतेक एडमिन महोदयांनी काहीतरी कृती केलेली दिसते .
7 May 2024 - 10:56 am | diggi12
नर्मदे हर !!
9 May 2024 - 4:16 am | nutanm
खरोखर जीवघेणा अनुभव आहे आपल्याला आलेला. पण नर्मदा मैया तिच्या भकतांना व परीक्रमावासींना तारतेच तारते ,तसेच जेवण ,आश्रयाचया सर्व गोष्टी पूर्ण करतेच करते हे अनेक लेख परिक्रमेचे वर्णनातून वाचले आहे तसेच आपली श्रदधा व विश्वास वाचवतोच है पक्के लक्षात ठेवावे लागते .
9 May 2024 - 12:15 pm | यश राज
नर्मदे हर
रोचक अनुभव
9 May 2024 - 2:28 pm | विअर्ड विक्स
नर्मदे हर बाबाजी ..... आवली घाटाजवळ डोह खोल असल्यामुळेच आम्ही तेथे गेलो असता शिवालयात आन्हिके उरकली होती. तेथे दक्षिण घाटावरील शिवमूर्ती मनमोहक आहे . आवली घाटाच्या माझ्याही काही आठवणी आहेत ... कारेन नमूद कधी वेळ मिळेल तेव्हा
बाकी तुमचा अनुभव ऐकून डोळयात पाणी तरळले . नर्मदे हर !!!
9 May 2024 - 3:16 pm | Narmade Har
तिथं तशी पाटी च लावली आहे की इथे खोल पाणी आहे .
तिथली शिवमुर्ती नंदीची मूर्ती खूप सुंदर आहे . या घाटावर कायम गर्दी असते . परंतु किनाऱ्याच्या मार्गाने मात्र कोणीच नसते . खूप सुंदर किनारा आहे हा .
9 May 2024 - 3:18 pm | Narmade Har
नर्मदे हर !
16 Jun 2024 - 10:54 pm | आलो आलो
मैय्यालाच काळजी
धन्य ती गोमाता
धन्य ती मुले
धन्य धन्य मैय्या नर्मदा !