गूढ कथा: अक्कल दाढ

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जनातलं, मनातलं
23 Feb 2024 - 11:00 am

(काल्पनिक कथा)

काल दुपारी कार्यालयात एक विशिष्ट फाईल वाचत होतो. फाईल वाचताना दाढ दुखत आहे, असे वाटू लागले. काही वेळातच दाढेचे दुखणे वाढू लागले आणि त्या बरोबर डोक्यात वेदनाही. अखेर वैतागून मी फाईल वाचणे थांबविले. दाढेच्या दुखण्यामुळे रात्री व्यवस्थित जेवता ही आले नाही. गरम पाण्यात मीठ टाकून गुळणे केले, लवंग ही तोंडात ठेवली. पण काही फायदा झाला नाही. सारी रात्र दाढेच्या दुखण्यामुळे तळमळत काढली.

सकाळी उठून ओळखीच्या दातांच्या डॉक्टरकडे गेलो. पेशंटसाठी असलेल्या खुर्ची वर बसलो. डॉक्टरांनी दात तपासले आणि लगेच निर्णय ही सुनावला. दाढेला किडा लागला आहे, दाढ काढावी लागेल. मी विचारले, डॉक्टर, दाढ न काढता, किड्याचा इलाज करता येईल का? डॉक्टर मिस्कील पणे हसले आणि म्हणाले, तुमच्या दाढेला साधा-सुद्धा नाही, जीव घेऊ अकलेचा किडा लागला आहे. त्वरित नाही काढला तर हा किडा मेंदूत शिरेल. तिथे जाऊन अकलेचे तारे तोडेल. त्याच्या परिणाम तुम्हाला भोगावा लागेल. तुमच्या पांढर्या शुभ्र वस्त्रांवर चिखलाचे डाग दिसू लागतील. काही दिवसांतच तुमचा चेहरा ही काळा ठिक्कर पडेल. अवेळी सरकारी सेवेतून निवृत्त व्हावे लागेल. पेन्शन ही मिळणार नाही. मुले ही तुम्हाला बाहेरचा रस्ता दाखवतील. भिक्षा मागत दारी-दारी फिरावे लागेल. माझ्या डोळ्यांसमोर काजवे चमकले, खरोखरंच असे घडले तर? ओम भिक्षां देही शब्द कानात घुमू लागले. घाबरून मी ओरडलोच, डॉक्टर, काढून टाका ती दाढ, अकलेच्या किड्या सकट. डॉक्टरांनी दाढेला सुन्न करण्यासाठी इंजेक्शन दिले आणि पकडीने एका झटक्यात दाढ उपटली. दाढ निघाल्यावर दुखणे ही थांबले. शरीर आणि मन शांत झाले. कार्यालयात पोहचल्यावर ती फाईल लाल फितीत व्यवस्थित बांधून अलमिरात ठेऊन दिली. संध्याकाळी घरी आल्यावर मस्त पैकी थंडगार पाण्याने स्नान केले. पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून, आरश्यासमोर उभा राहिलो. आरश्यात मला माझा चेहरा काळा ठिक्कर पडलेला का दिसत होता, हे मात्र मला समजले नाही.

कथासमाजआस्वाद

प्रतिक्रिया

अहिरावण's picture

23 Feb 2024 - 11:26 am | अहिरावण

चेहरा अजुनही काळाच आहे की थोडा उजळ झाला?

विवेकपटाईत's picture

23 Feb 2024 - 12:26 pm | विवेकपटाईत

प्रतिसाद आवडला. बाकी देवाने चेहरा उजळ दिला आहे. अजून ही स्मार्ट दिसतो.

अहिरावण's picture

23 Feb 2024 - 12:28 pm | अहिरावण

म्हणजे आजूबाजुच्या बायका खालिल गाणे नक्की म्हणत असतील...

https://www.youtube.com/watch?v=BZl2JWzfemM

अमरेंद्र बाहुबली's picture

23 Feb 2024 - 1:56 pm | अमरेंद्र बाहुबली

खिक्क.

विवेकपटाईत's picture

23 Feb 2024 - 5:05 pm | विवेकपटाईत

माझे आवडते नाटक. बाकी हिंदीत म्हण आहे "जब साठा तब पाठा".

श्वेता व्यास's picture

23 Feb 2024 - 3:35 pm | श्वेता व्यास

गूढ कथा नाही समजली.

विवेकपटाईत's picture

23 Feb 2024 - 5:12 pm | विवेकपटाईत

काही फाईल्स लाल फितीत नेहमीसाठी बंद ठेवणे योग्य असते. त्या उघडल्या तर उघडणाऱ्यालाच त्रास होण्याची शक्यता असते. कथेचा आशय सरकारी बाबू व्यवस्थित समजावून देऊ शकतो.

श्वेता व्यास's picture

23 Feb 2024 - 6:23 pm | श्वेता व्यास

अच्छा, आता समजली थोडी!

कॉमी's picture

23 Feb 2024 - 7:54 pm | कॉमी

खाली स्पष्टीकरण दिले आहे ते वाचल्यावरच समजली.