आमची प्रेरणा क्रांति ह्यांची ही कविता. ही कविता वाचून संध्याकाळचे माझ्या मनातले रुप नकळत लिहिले गेले.
तेज रवी क्षीण होत,वायु मंद ही सुटत
करण्या सांज स्वागता , मीच झांज वाजवली!
तुळशीपुढे लागे दिवा, मग प्रसादाचा मेवा
भारण्या घर सुरांनी, मीच झांज वाजवली!
शुभंकरोतिचे बोल, लक्ष्मीचा असेच काल
सुवासिक तोच धूप, मीच झांज वाजवली!
परवचा गुंजे नाद, दे आज्जी भजन साद
लहानगे कडेवरि , मीच झांज वाजवली!
मंजुळसा तोचि नाद, घालि अंतर्मना साद
साथ देण्या आरतीला , मीच झांज वाजवली!
जोड दिन आणि रात, भक्तिमय आसमंत
मिळवण्या देवाशिष ,मीच झांज वाजवली!
सांज देइल संस्कार, भक्तीचाच पुरस्कार
शत्रुबुद्धी विनाशाय, मीच झांज वाजवली!
प्रतिक्रिया
9 May 2009 - 12:47 pm | अवलिया
वा ! अतिशय छान!!
:)
--अवलिया
9 May 2009 - 4:01 pm | नितिन थत्ते
नाना, प्रतिसाद कवितेला की कर्काला?
(अवांतरः मिसळपाववर वावर कमी करायला हवा. झांज 'बाझवली' असे आधी वाचले)
खराटा
(रंग माझा वेगळा)
9 May 2009 - 4:23 pm | कपिल काळे
अहो, सरळ काळ्या शाईने लिहा की,
शिव्या घालायच्या त्या अश्या आडून कशाला? समोर मोकळ्या मैदानात येउन घाला की राव, फार लाजता तुम्ही खराटाभो.
माझ्या एका कवितेने तुमचा मिपावर वावर कमी होणार असेल म्हणजेमग झकास, बघू कोण मला तुमची सुपारी देतो का?
9 May 2009 - 4:47 pm | नितिन थत्ते
~X( ~X( ~X( ~X( ~X( ~X( ~X( ~X( ~X( ~X(
तुमची कविता कंसात आहे म्हणजे विडंबन आहे असे समजून हलके घेण्याचे प्रतिसाद टाकले.
प्रतिसादातील दोन्ही वाक्ये तुम्हाला उद्देशून किंवा तुमच्या कवितेविषयी नव्हतीच.
तुम्हाला तो अँगल (अरेच्च्या हा अँ बरोबर कसा टंकला गेला?) कळला नाही त्याला माझा नाइलाज आहे.
अधिक स्पष्टीकरण देतो.
या संस्थळाचे मालक श्री तात्या अभ्यंकर उर्फ विसोबा खेचर हे वारंवार बाझवला हा शब्द वापरतात. मिपावर जास्त वावर झाल्यामुळे तुम्ही लिहिलेल्या झांज वाजवली शब्दा ऐवजी बाझवली असे चुकून वाचले गेले असे मी लिहिले होते.
त्याचा अर्थ मी तुम्हाला शिव्या घातल्या असा तुम्ही घेतला याचे आश्चर्य वाटले.
पुन्हा अशी चूक न करण्याचा प्रयत्न करीन. खात्री देता येणार नाही.
खराटा
(रंग माझा वेगळा)
9 May 2009 - 4:52 pm | कपिल काळे
बरे, बरे, ठीक ठीक.
ऍ, तुम्हाला कसा काय टंकता आला हे नवल आहे.
9 May 2009 - 4:56 pm | नितिन थत्ते
अहो ती गंमतच आहे. नुसता ऍ असाच होतो. पण वर अनुस्वार असेल तर मात्र...... अँ :)
खराटा
(रंग माझा वेगळा)
9 May 2009 - 7:55 pm | अवलिया
अभिप्राय कवितेला :)
--अवलिया
9 May 2009 - 4:32 pm | राम दादा
शुभंकरोतिचे बोल, लक्ष्मीचा असेच काल
सुवासिक तोच धूप, मीच झांज वाजवली!
वा कपिल भाऊ...आवडले आपल्याला.....
राम दादा.
9 May 2009 - 8:55 pm | बिपिन कार्यकर्ते
कपिल, कविता छान आहे रे. आवडली. खूप छान आठवणी जागवल्यास.
लहानपणी, 'आठच्या आत घरात' हा नियम होता. घरी गेलं की आधी कपडे बदलून मग हात पाय धुवून देवासमोर बसावे लागायचे. रामरक्षा, मारुतिस्तोत्र, शुभंकरोति, पाढे इ. म्हणल्याशिवाय सुटका नसायची. एकीकडे आई स्वयंपाक करत असायची. उदबत्तिचा आणि भाजीचा वास मिसळून गेलेला असायचा. सगळं म्हणून झालं की घरातल्याच नव्हे तर शेजारपाजारच्या आज्यांना पण नमस्कार घडायचे. त्यावेळी टीव्ही एवढा नसायचा याचे आज बरे वाटते आहे. असो.
बिपिन कार्यकर्ते
9 May 2009 - 9:16 pm | सँडी
आवडली.
'मी कात टाकली' ची आठवण झाली.
अवांतर : पहिल्यांदा सांज बाझवली असेच वाचले.
;)
-संदीप.
काय'द्याच बोला.
11 May 2009 - 9:08 am | राघव
शुभंकरोतिचे बोल, लक्ष्मीचा असेच काल
सुवासिक तोच धूप, मीच झांज वाजवली!
मंजुळसा तोचि नाद, घालि अंतर्मना साद
साथ देण्या आरतीला , मीच झांज वाजवली!
हे विशेष आवडले.
हे विडंबन म्हणून कशाला टाकलेत.. परिपूर्ण वेगळी कविता आहे ही! :) शुभेच्छा!
राघव
12 May 2009 - 7:39 am | प्राजु
स्वतंत्र काव्य म्हणून टाकली असती तरी छान झालं असतं.
विडंबन म्हणणार नाही.. कविताच... ! कविता आवडली.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
11 May 2009 - 10:23 am | कपिल काळे
सर्वांच्या प्रतिक्रियांबद्द्ल आभारी आहे.
क्रांति ह्यांच्यी कविता वाचून संध्याकाळच कातर आणि करुण का? असा प्रश्न पडला होता. त्यामुळे सांजेचा मंगलमय कोपरा उलगडून दाखवण्यासाठी ही कविता केली.
11 May 2009 - 10:11 am | चतुरंग
सुंदर कविता आहे!
पहिल्या दोन ओळी वाचून 'प्रिये पहा' ह्या नाट्यगीतातल्या 'थंडगार वात सुटत, दीप तेज मंद होत' ह्या ओळी आठवल्या! :)
(पण हे विडंबन म्हणणे अवघड आहे कारण विडंबनात, मूळ कवितेचे शब्द बदलून अर्थाचा विपर्यास करण्याची किमया असते तशी ह्यात नाही म्हणून.
ही एक स्वतंत्रच कविता आहे. फारतर प्रेरणा असे मूळ कवितेला म्हणू शकाल.)
चतुरंग
11 May 2009 - 11:29 am | स्वाती दिनेश
सांजेचा मंगलमय कोपरा उलगडून दाखवण्यासाठी ही कविता केली.
कविता आणि तिच्यामागचे कारण दोन्ही आवडले.
स्वाती
11 May 2009 - 11:41 am | कपिल काळे
स्वाती ताइ, चतुरंग, धन्यवाद
<<पहिल्या दोन ओळी वाचून 'प्रिये पहा' ह्या नाट्यगीतातल्या 'थंडगार वात सुटत, दीप तेज मंद होत' ह्या ओळी आठवल्य>>
चतुरंगशी सहमत!
भास होतोय त्या ओळींचा खरा !! पण ते पहाटेचे वर्णन आहे
11 May 2009 - 12:23 pm | माया
छान आहे कविता.
21 May 2009 - 9:05 pm | मदनबाण
सांज देइल संस्कार, भक्तीचाच पुरस्कार
शत्रुबुद्धी विनाशाय, मीच झांज वाजवली!
कपिलराव विडंबन आणि यातील विचार दोन्ही आवडले... :)
मदनबाण.....
I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.