हा एक अगदी वेगळा प्रसंग आहे. तो घडल्यानंतर त्याचा अर्थ लावायला वेळ लागला. पण नंतर त्याचा अर्थ आणि अन्वयार्थ उलगडत गेला. ह्या प्रसंगाचा किस्सा आपल्यासोबत शेअर करत आहे. आजवर इतके रन आणि वॉक केले होते, पण ह्या प्रसंगाइतकं विचित्र आणि भयाण कधी धावलो व सैरावैरा चाललो नव्हतो! तर झालं असं होतं...
मला अनेक दिवसांपासून जाणवत आहे की, माझा मित्र मला काही सांगू इच्छित आहे. आणि तो जे सांगू इच्छित आहे ते रहस्यमय आणि गोपनीय आहे. त्याबरोबरच त्या गोष्टीवर कशाचं तरी सावटसुद्धा आहे. नक्कीच काही तरी वेगळी गोष्ट असली पाहिजे. मी काही निमित्ताने औरंगाबादला आलो आहे. बाहेरून मुक्काम केलेल्या घरी आलो तेव्हा कळालं की, माझा मित्र नुकताच येऊन गेला. मला भेट, इतकाच निरोप त्याने दिला आहे. आम्ही औरंगाबादमध्ये काही नेहमी भेटत नाही. पण तरी जवळच्या एखाद्या हॉटेलच्या परिसरात तो भेटेल असं वाटलं आणि मी नातेवाईकांना ते सांगून निघालो. शक्यतो मी कुठे जातोय हे सांगायला मला आवडत नाही. पण नकळत "सेफ्टीच्या" दृष्टीने मला हे सांगावसं वाटलं! जितेश- माझा शाळेपासूनचा अगदी जीवलग मित्र. त्याला मला काय सांगायचं असेल? आणि तेही काहीसं लपून छपून?
मी चौकात गेलो. शोधाशोध करत फिरत राहीलो. त्याबरोबर मनामध्ये विचारही सुरू राहिले की काय असेल नक्की प्रकरण? आणि मग आठवलं की, काही दिवसांपूर्वीही दिसला होता तेव्हा तो मला असा इशारा तर करत नव्हता? नक्कीच. काही तरी वेगळं असलं पाहिजे. पण काय असेल? नकळत एक अप्रिय- अशुभाचं सावट ह्यावर जाणवतंय. फिरता फिरता मला जितेश दिसला! पण त्याने फक्त हाताने खूण केली आणि आम्ही रस्त्यावर चालत राहिलो. त्याच्या चेह-यावरूनच जाणवतंय की त्याला जे सांगायचं आहे ते गोपनीय तर आहेच पण कदाचित धोकादायकसुद्धा आहे. म्हणूनच तो खूप काळजी घेतोय. आम्ही काही गल्ली बोळ ओलांडून आतल्या बाजूच्या एका छोट्या हॉटेलजवळ आलो. अगदी साधं असं हे हॉटेल आहे. शाळेत असतात तसे बेंच बसायला आहेत. तुरळक गि-हाईक आहेत. आमचं बोलणं सुरू झालं. तो मला विचारतोय की, मला काही गोष्टी गेल्या काही दिवसांमध्ये जाणवल्या का? काही खटकलं का? मी विचारात पडलो. काही तरी जाणवतंय खरं. काही तरी वाईट घडलं आहे असं वाटतंय. पण काय ते कळत नाहीय.
मग त्यानेच सांगितलं की, गावामध्ये एक अपराधी लोकांना त्रास देत सुटला आहे. लोकांना पळवणं आणि गायब करणं सुरू झालं आहे. आणि अपराधी इतका तयारीचा आहे की, लोकांना जाणीवही नाही अजून की असं काही घडलंय. त्याने मग आमच्या दूरच्या मित्रांच्या संदर्भात माहिती दिली की त्यांच्यासोबत काय घडलंय. ते ऐकून धक्का बसला. मग मीच त्याला बोललो की, हे तू पोलिसांना का सांगितलं नाहीस, इथे का सांगतोय. त्यावर तो म्हणाला की, शत्रू खूपच खतरनाक आहे. इतका की, त्याच्याही जीवाला धोका आहे. त्यामुळे अगदी जपून आणि सगळी काळजी घेऊन आपल्याला काम केलं पाहिजे. मग मी त्याला विचारलं की, हे तुला कसं कळालं? तो म्हणाला की, एका बेकरीमध्ये जाताना त्याला एका व्हॅनमधलं ओरडणं ऐकून शंका आली. आणि ज्याला गायब केलं होतं, त्याचा मित्र जितेशला त्या दिवशी भेटला. त्यामुळे त्याला कळालं की, असं काही होतं आहे. आणि मग त्याने अजून पुढचे तपशील सांगितले. ते ऐकताना भितीही वाटत होती आणि काळजीही वाटत होती.
हॉटेलात चहा- वडा पाव आम्ही घेत होतो, पण तरीही आपल्यावर कोणाची नजर तर नाहीय, आपल्याला काही धोका तर नाहीय हा प्रश्न सतत मनात येतोय. टेबलवर बिलाचे पैसे दिले तरी आम्ही बोलत बसलो. आजूबाजूचे तुरळक लोक त्यांच्या तंद्रीत आहेत. आमच्याकडे कोणाचंही लक्ष नाहीय. आम्ही बराच वेळ बोलत राहिलो. हळु हळु ह्यामध्ये असलेली रिस्क आणि गांभीर्य कळत गेलं. अखेर ठरवलं की, जितेशच्या घरच्यांना हे सांगायचं आणि त्यांची मदत घ्यायची. तसं थोडं हलकं वाटलं आणि निघालो. काउंटरवर गूगल पे ने पैसे देणार तितक्यात आठवलं की, पैसे तर टेबलवरच दिले आहेत. आपल्या मागावर कोणी नाहीय ना ह्याची परत परत खात्री करत निघालो. बाहेर तर सगळं नॉर्मल वाटतंय. पण नकळत एका सावटाची जाणीवही होतेय.
जितेशच्या घरी आम्ही पोहचलो. काका- काकूंना खूप वर्षांनी भेटलो. लहानपणीच्या आठवणी निघाल्या. मग सध्या काय सुरू आहे ह्यावर बोलणं झालं. ह्या गप्पांमध्ये मुख्य बोलायचा विषय मागे पडत होता. रात्र होत आल्यामुळे काका- काकूंनी त्यांच्याकडेच जेवायचा आग्रह केला. जेवण झाल्यावरच आपण बोलू असं ते म्हणाले. शेवटी जेवणानंतर शांततेत सविस्तर बोलू असं ठरवून आम्ही तिथेच थांबलो. वरवर हसत असलो व नॉर्मल दिसत असलो तरी आतून आम्ही दोघंही प्रचंड अस्वस्थ आहोत. आणि का कोण जाणे, पण मला "सेफ" वाटत नाहीय. जणू तो अपराधी आमच्याच मागावर आहे असं वाटतंय.
आम्ही जेवायला बसलो. गप्पाही सुरू आहेत. आमचं जेवण संपता संपता जितेशच्या बाबांचे एक मित्र घरी आले. तेही थोडं जेवले आणि मग आमच्यासोबत बसले. जितेशचे बाबा म्हणाले की, हे खूप अनुभवी आहेत, तुम्हांला जे सांगायचंय ते त्यांनाही सांगा. त्यांचीही मदतच होईल. मग अखेर आम्ही विषय काढला. जितेशनेे सगळे तपशील सांगितले. गायब झालेले ते लोक, त्याचा मित्र आणि कसं झालं ते सांगितलं. त्याबरोबर ह्याची कुठेच नोंद नाहीय, बातमीसुद्धा नाहीय हेही तो बोलला. त्याचे बाबा आणि ते काका शांतपणे ऐकून घेत होते. आम्ही आम्हांला वाटणारी काळजीही बोलून दाखवली. त्यांनी शांतपणे ऐकून घेतलं. त्यावर ते इतकंच बोलले की, तुम्ही काळजी करू नका. पोलिस त्यांचं काम करत असतात. आपल्याला दिसत नसलं तरी पोलिसांना सगळं कळत असतं. जितेशनेे त्यांना सांगायचा प्रयत्न केला. पण ते ठाम होते. मग ते काका म्हणाले, मुलांनो तुम्ही इतका विचार का करताय. चला माझ्यासोबत, आपण मस्त फिरून येऊ. कसं काय पण जितेश तयार झाला आणि त्याचे बाबाही तयार झाले. मला विरोध करता आला नाही.
थोड्याच वेळात त्या काकांसोबत आम्ही त्यांच्या गाडीने निघालो. वाटेत कुठे तरी थांबून त्यांनी आमच्यासाठी सरबतासारखं पेय घेतलं. मी ते बाजूला ठेवून दिलं. जितेश खूप दमलेला वाटत होता. त्याने ते गटागटा पिऊन टाकलं. ते पिऊन झाल्यावर त्याला एकदम शांत वाटलं. रिलॅक्स होऊन तो बसला आणि बघता बघता त्याला डुलकी आली. माझं मन मात्र अस्वस्थ आहे. कुठे तरी मेजर घापा आहे असं वाटतंय. पण कुठे??? तेवढ्यात गाडी थांबली. कोणती तरी बेकरी दिसते आहे. इथे ते काका उतरले. दोन मिनिटांत येतो, तुम्ही थांबा म्हणाले. माझ्या मनात शंका कुशंका येत आहेत. आणि अचानक- अगदी अचानक मला जाणीव झाली! बेकरी!! आम्हांला घेऊन जाणारे ते काका! जितेशला आलेली गुंगी! आणि अचानक मला जाणीव झाली की, अपराध्यांनी मला पकडल्यात जमा आहे. आपण आत्ताच निसटलं पाहिजे! आणि मी गाडीचं दार उघडून पळत सुटलो! ते काका बेकरीमध्ये गेले असावेत, त्यांना कळालं नाही आणि मी धावत सुटलो!
जिथे पाय नेतील तिकडे धावत गेलो. थोडं दूर आल्यावर मी नक्की कुठे आहे, इथून माझं नातेवाईकांचं घर किती लांब असेल हे विचार मनात यायला लागले. पण इतकी जबरदस्त भिती वाटतेय की, कोणाला बोलायची हिंमत होत नाहीय. न जाणो माझ्यासमोर असलेली व्यक्ती नेमकी अपराध्यांची हस्तक असली तर? कसा विश्वास ठेवायचा? माझ्या नातेवाईकांचा फोन लावला. पण तोही लागत नाहीय. लोकांना रस्ता विचारावासा तर वाटतोय पण हिंमत होत नाहीय. इतकं हतबल कधीच वाटलं नव्हतं. माझी चाल अगदी वेड्यासारखी आहे. लोकांना थांबून रस्ता विचारायचा आहे पण पाय थांबत नाही आहेत. अक्षरश: सैरावैरा जातोय. आजवर इतके रन आणि वॉक केले होते, पण इतकं विचित्र आणि भयाण कधी चाललो नव्हतो! लोकही माझ्याकडे चमत्कारिक नजरेने बघत आहेत... एक भयाण हतबलतेने मला घेरलं. प्रचंड हेल्पलेस वाटलं. जणू ते अपराधी कधीही मला पकडणार अशी घनदाट भिती वाटते आहे. अतिशय भितीदायक जागी मी अडकलो आहे असं जाणवतंय...
भितीची आणि असुरक्षेची भावना खूप वाढत गेली. सगळे मार्ग बंद झाले आहेत आणि सगळीकडून डेड एंड आहे ही असुरक्षितता वाढत गेली. इतकी वाढत गेली की अखेर माझ्यातला "बघणारा" जागा झाला आणि खाडकन माझे डोळे उघडले! दृश्य इतकं विपरित होतं की, स्वप्नावरून सजगता स्वप्न बघणा-याकडे आली. रात्रीचे दोन वाजलेले आहेत! आणि हे स्वप्न होतं! पण स्वप्न तरी कसं म्हणायचं? मला वाटलेली भिती, ते सगळे प्रसंग, तेव्हा वाटलेली चिंता, काळजी, भय हे सगळं अगदी जीवंत तर वाटत होतं. मित्राचे ते काका असं काही करतात ह्यामुळे बसलेला धक्का तर किती जीवंत होता! सगळं तर समोर घडलं होतं. जणू मी अनुभवलं होतं. हे स्वप्न होतं, पण त्याच्याही पलीकडे काही होतं. जाग येऊनही शांत व्हायला काही मिनिटं लागली. थोड्या वेळाने हायसं वाटत गेलं! आणि मग हळु हळु मनात विचार सुरू झाले. एक एक गोष्ट उलगडत गेली आणि मग मन शांत होत गेलं... पण उरलेली रात्र अजिबात झोप लागली नाही!
मग आठवले मला पडलेले असे किती तरी स्वप्न ज्यांना एक सूचक अर्थ होता- representative meaning होतं. किती तरी स्वप्न. ज्या ज्या ठिकाणी मी सायकलिंग, रनिंग केलं आहे त्या भागांचे सूचक स्वप्न मला पडले होते. स्वप्नामध्ये एक प्रकारे त्या जागा दिसल्या होत्या. मग ते वाईचं मंदीर असेल, मुंबई मॅरेथॉनमधला सीलिंक असेल किंवा हिमालय असेल. लदाख़च्या पहिल्या सायकलिंगच्या वेळी तर स्वप्नाने मला इतका तरल अनुभव दिला की त्यामुळेच माझा आत्मविश्वास वाढला, एक प्रकारे खात्रीच पटली. स्वप्न! स्वप्नावस्था हीसुद्धा चेतनेची एक स्थिती असते. किती तरी वैज्ञानिक शोध, कूट प्रश्न, अनेकांच्या आयुष्यातले प्रश्न ह्यावर स्वप्नावस्थेमध्ये उत्तरं मिळालेली आहेत. अतिशय दुर्गम ठिकाणी आणीबाणीत अडकलेल्या ट्रेकर्सना स्वप्नामध्ये मदतसुद्धा मिळालेली आहे. त्यामुळे स्वप्न हे असत्य असलं तरी सूचक असतं. त्याला एक अर्थ असतो, एक indicative meaning असतं. स्वप्न जरी रूढ अर्थाने खरं नसलं तरी त्यावेळी वाढलेलं बीपी, हार्ट रेट हे तर खरे असतात.
कधी कधी काही घटना ह्या प्रचंड मोठी सजगता निर्माण करणा-या असतात- एखादा अतिशय दु:खाचा किंवा आपत्तीचा प्रसंग. किंवा एखादा अगदी वेगळा- अतिशय नवीन प्रसंग. जेव्हा मी माझी पहिली हाफ मॅरेथॉन ईव्हेंट पळालो होतो, तेव्हा आदल्या रात्री झोप लागतच नव्हती. कारण पुढच्या दिवशी इतकी नवीन गोष्ट होती की, त्या गोष्टीची जाणीव- सजगता इतकी प्रखर होती की, ती झोपेचा अडसर ओलांडून जाणवत राहिली. सायकलिंग- रनिंगमधले ठिकाणं आधी स्वप्नात दिसण्याचं कारण कदाचित हे असू शकेल की, त्यावेळी तिथे राईड करताना/ ते अनुभवताना सजगता इतकी प्रखर होती की, ती खोलवर अशा स्वप्नावस्थेमध्येही डिटेक्ट झाली असेल.
आणि ज्याला आपण सत्य म्हणतो तेसुद्धा अनेकांसाठी असत्यच तर असतं. आपल्याला जे दिसतं ते आपल्या जवळच्याच व्यक्तीला कधी कधी दिसत नाही. किंवा दुस-या व्यक्तीला जे ढळढळीत दिसत असतं ते आपल्याला दिसत नाही! मग सत्य व स्वप्न हा फरक कसा करता येईल! अजून एक स्वप्न आठवतं. स्वप्न असं होतं की, औरंगाबादचेच माझे नातेवाईक व मी एका छोट्या गावात फिरतोय. काही निमित्ताने त्या गावात जमलो आहोत. स्वप्नानंतर काही महिन्यांनी माझ्या आजी गेल्या. तेव्हा आम्ही अंत्यविधीसाठी पैठणजवळच्या गावासारख्या वस्तीत गेलो. तेव्हा कळालं की, अरे "ते स्वप्न" “ह्या अनुभवाचं विजन" होतं! एक स्वप्न एका रस्त्याचं पडलं होतं. मोकळा रस्ता व पलीकडे भिंत, एक विशिष्ट लँडस्केप. एका वेळी श्रीनगरमधून सायकलसोबत जाताना जाणवलं की, अरे ते स्वप्न ह्या दृश्याचं होतं! इतकं ते ओळखीचं वाटलं. Deja vu वाटलं!
मला ओशोंचीही अनेक स्वप्न पडली आहेत. त्यांना मी भेटतो आहे. आत त्यांचं व्याख्यान सुरू आहे आणि मी बाहेर बसलो आहे, जाताना ते दोन क्षण माझ्याशी बोलून जातात. किंवा पाठीवर हात फिरवतात. एका मोठ्या आलीशान इमारतीत त्यांचा एक कार्यक्रम आहे- ठिकाणसुद्धा मी स्वप्नात ओळखलं होतं की हे स्वारगेटजवळचं आहे (कदाचित गणेश कला क्रीडा मंच). त्यांना समोरून बघितल्याच्या खूप आठवणी स्वप्नात दिसतात. पूर्व जन्मातल्या असल्या तरी आठवणीच म्हणेन. त्यांचं प्रवचन ऐकून मी बसने परत जातोय असं एक स्वप्न पडलं होतं. आणि स्वप्नातला रस्ता बंडगार्डन रोड मला ओळखू आला, कारण मी वाडिया कॉलेजला असताना तिथे अनेकदा जायचो. म्हणजे भूतकाळातच नाही तर पूर्व जन्मात घडलेल्या घटनांच्याही सूक्ष्म मेमरीज/ इंप्रेशन्स असतात आणि स्वप्नावस्था खोल असली तर कधी कधी त्या मेमरीजसुद्धा वर येऊ शकतात. मी समुद्र किना-यावर आहे आणि तीन बाजूंनी समुद्र आहे. अचानक माझ्या अंगावर त्सुनामीसारखी महाकाय लाट येते आहे आणि मला पळायला जागा नाही. आणि ती लाट माझ्या अंगावर आता कोसळणारच असं अगदी स्पष्ट स्वप्न तीन वेळेस पडलं. आणि ओशोंच्या पुस्तकात त्याचा अर्थही उलगडला.
आणि स्वप्नाबरोबर इतरही अनेक प्रकारे आपल्याला irrational संवेदना होतातच ना. अचानकच एखाद्या व्यक्तीची काळजी वाटते. तीव्र आठवण येते. किंवा आपण जी गोष्ट करत नाही ती केली जाते. स्वप्नामध्ये सुप्त इच्छा- आकांक्षा जशा प्रोजेक्ट केल्या जातात, तशाच सूक्ष्म जाणीवाही पॉप अप होतात. जे सामान्यपणे आपली बुद्धी सरफेसवर येऊ देत नाही, बुद्धी जे लगेच नाकारते, ते स्वप्नाच्या खोलवरच्या शांततेत सरफेसवर येतं. असो.
बोकोजू ह्या फकिराने एक दिवस त्याच्या शिष्यांना सांगितलं की, मला रात्री स्वप्न पडलं होतं की, मी फुलपाखरू झालो आहे आणि इकडे तिकडे फिरतोय. त्याचे शिष्य हसले. तो पुढे म्हणाला, ते स्वप्न तर संपलं. पण आता मला प्रश्न पडलाय की, कशावरून मी आत्ता जे करतोय ते त्या फुलपाखराला पडलेलं स्वप्न नसेल? ज्ञानी माणसं म्हणतातच की, आपलं जीवन हे जरा जास्त वेळ चालणारं पण स्वप्नच आहे. अर्थात् आपल्या दृष्टीने. तारे- आकाशगंगांच्या संदर्भात तर आपलं जीवन क्षणार्धाचंही नसेल. असो.
तर ह्या स्वप्नाचा काय अर्थ असू शकेल मग? मला जाणवणारा अर्थ हा आहे की, माझ्या मित्राच्या संदर्भातील व्यक्तींसोबत कदाचित असं काही घडू शकेल. किंवा अशा स्वरूपाचा एखादा प्रश्न/ स्थिती/ समस्या त्याच्या जवळच्या एखाद्या व्यक्तीसोबत होऊ शकेल. मला स्वप्नात जे जाणवलं ते इतकं डायरेक्ट आणि प्रखर होतं, ती भितीसुद्धा इतकी प्रखर होती की, हे लिहून काढताना त्यात मला बदल करावे लागले. नाव व संदर्भ बदलून थोडं ते सौम्य करावं लागलं. इतकं ते स्वप्नात स्पेसिफिक जाणवलं होतं. ह्यावर उपाय काय मग? तर उपाय हाच की, आपण ज्या गोष्टी करतो त्या अधिक सजगपणे करायच्या. आपल्याला ज्यांची काळजी वाटते, ज्यांच्या काळजीच्या वेव्हज येतात त्यांच्याशी बोलायचं. आपल्याला न दिसणा-याही अनेक गोष्टी असतात ही जाणीव ठेवायची. असो.
हे वाचल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद! हे लेखन आपल्याला रिलेट झालं का, हे नक्की कळवाल. धन्यवाद.
निरंजन वेलणकर 09422108376
17 ऑक्टोबर 2023
प्रतिक्रिया
17 Oct 2023 - 5:46 pm | मुक्त विहारि
आवडले
18 Oct 2023 - 11:50 am | श्वेता व्यास
आवडलं.
मलाही अशी प्रखर स्वप्नं बऱ्याचदा पडतात, देजावू पण होते, पण स्वप्नात पाहिलेलं प्रत्यक्षात घडतंय असं अजून नाही वाटलं कधी.
18 Oct 2023 - 12:18 pm | राजेंद्र मेहेंदळे
बर्याच लोकांना असे होते तर!!
मला झोपेमध्ये सूचक स्वप्ने पडत नाहीत, पण दे जावु(हा शब्दही नव्याने समजला) टाईप भास होतात कधीकधी. म्हणजे ती स्वप्ने असतात की नाही माहित नाही, पण कधीतरी एकाद्या ठिकाणी गेल्यावर किवा सहज कुणाशी तरी बोलताना "अरे, हे घडुन गेलेय" असे वाटत राहते. त्या माणसाशी बोलताना "आता हा असे बोलणार, किवा अशी मान हलवणार" असे काहीतरी वाटते तोच तसेच घडते. हे मी आधी कुठे पाहीले असेल? असा विचार भुंगा घालत राहतो. हे का होत असावे? कॉलिंग कुमार सर>>
18 Oct 2023 - 2:54 pm | गवि
देजा वू (उच्चार काहीसा "व्ह्य" सारखा) हा फ्रेंच शब्दप्रयोग म्हणजे साधारणपणे आत्ता घडणारी घटना पूर्वीही अशीच घडून गेली आहे ("यापूर्वी बघितले") असे भासणे.
याच्या अगदी उलट देखील एक प्रकार आहे जो अनेकांना माहीत नसतो. Jamais vu (उच्चारी "जमे व्ह्य") म्हणजे परिचित, पूर्वी घडलेली किंवा रूटीन घटना, प्रसंग हा आत्ता अगदी नव्याने प्रथम घडतो आहे असे भासणे.
18 Oct 2023 - 11:20 pm | भीमराव
कधी कधी भविष्य स्वप्नातुन वर्तमानात डोकावतं.
23 Oct 2023 - 12:52 pm | विजुभाऊ
मला बरेचदा स्वप्नात मी ज्या लोकांषी बोलतो ते लोक अगोदर परलोकवासी झालेले असतात. कधी कधी स्वप्नातही ही जाणीव होते किंवा जागे झाल्यावर स्वप्न अटह्वते त्या वेळेस जाणीव होते की ज्यांच्याशी बोललो ते लोक या पूर्वीच मेलेले आहेत.
हे लोक माझी नातेवाईकच असतील असेही नाही. आसपासच्या समाजातील कोणी अगदी लांबचे किरकोळ परिचितही असतात.( वडीलांचे मित्र , कोणाची आत्या ,
शाळेच्या वर्गातला सहपाठी ,कोणाचा ड्रायव्हर वगैरे) मात्र ही अशी स्वप्ने पहाताना मला कधीही भीती किंवा चिंता वाटत नाही.. ते लोक माझ्या शी सहज बोलतात .
मी या स्वप्नाचा काही अर्थ लावून पाहिला. तर तो तसा काहीच लागत नाही.
स्वप्नात येणार्या "त्यांच्यांशी" माझा कधीच काही व्यवहारदेखील नसतो.
पण गम्मत वाटते की बहुतेकवेळा स्वप्नात येणारे लोक मृत झालेले असतात. हे अगदी लहानपणापासून होत आलेले आहे.
मला कोणीतरी सांगितले की माझ्या कुंडलीत कसलातरी योग असल्यामुळे असे होते. पण माझा यावर विश्वास नाही
23 Oct 2023 - 1:29 pm | गवि
+१ सेम हियर. नात्यातले, दूरचे अश्या अनेक मृत व्यक्ती स्वप्नात बिनधास्त वावरतात. उपस्थित असतात. कधी कधी तेव्हाही जाणवते की अरे हे असं कसं शक्य आहे? पण तरीही स्वप्नात त्याचा फारसा तार्किक विचार करणे किंवा भीती वाटणे असे होत नाही. मात्र जाग आल्यावर फार वाईट वाटू शकते. विशेषतः नजीकची पण हयात नसलेली अशी व्यक्ती स्वप्नात आलेली असेल आणि स्वप्न मोडले तर.
23 Oct 2023 - 12:55 pm | मार्गी
वाचनाबद्दल व प्रतिसादांबद्दल सर्वांना धन्यवाद!
@ गवि जी, नवीन माहितीबद्दल धन्यवाद!
@ विजूभाऊ जी, ओहहह. अशा स्वप्नांबद्दल ऐकलंय काही जणांकडून.
23 Oct 2023 - 3:59 pm | सच्चा
खरेतर मानवी भावभावना आणि मेंदूचे कार्य अजूनही पूर्णपणे उलगडलेले नाही, त्यात स्वप्नांचा विचार म्हणजे मनाच्या अथांग डोहात उतरून तळ गाठणे होईल. मानवी अंतर्मन आणि भावभावना यामुळे स्वप्ननिर्मीती होत असावी. एकंदरीत पडलेले स्वप्न आपल्या अंतर्मनाचा वर येऊ घातलेला बुडबुडा म्हणता येईल.
स्वप्नातील कालावधी हा जलद गतीने पुढे जातो त्यामुळे केवळ ५ मिनिटांच्या स्वप्नातही आपण १ ते २ तास सहजपणे रमतो. काहीजणांची हा कालावधी कमी जास्तही असू शकतो किंवा प्रत्येकवेळी स्वप्नांचा वेळ वेगवेगळा असू शकतो.
मलाही अनेकदा भीतीदायक स्वप्ने पडलेली आहेत. स्वप्नात जवळच्या व्यक्तीचे आपल्यासमोर अंत किंवा वाईट परिस्थिती, दंगल किंवा दंगल सदृश परिस्थितीत अडकलो आहे, उजाड ओसाड माळरानातून कोणीतरी मागावर आहे, निर्जन रस्त्यावरून जात आहे आणि त्यातून मार्ग सापडत नाही. The Grudge आणि राज चित्रपट बघितल्यावर रात्रभर भुतांची स्वप्ने येत होती.
मला पडणारी स्वप्ने
१) परत शाळेत/कॉलेजात जात आहे.
२) परीक्षेला बसलेलो आहे, प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका हातात आहे आणि काहीच अभ्यास झालेला नाही.
३) परत जुन्या कंपनी/ऑफिसमध्ये काम करत आहे.
४) उंचावरुन उडी मारली आहे पण जमिनीवर पाय टेकायच्या आधी हवेत हळूहळू तरंगत जात आहे.
५) हयात नसलेल्या व्यक्ती स्वप्नात येणे.
६) बसने/रेल्वेने दुसऱ्या गावी जात आहे किंवा दुसऱ्या गावाहून येत आहे, परंतु कधीही ईप्सित स्थळी पोहचलो नाही. समुद्रप्रवास आणि विमानप्रवासचा अनुभव नसल्याने त्याची स्वप्ने पडली नाहीत. फक्त विमानात बसेपर्यंत स्वप्न पडले आहे, पण विमानाने अजूनपर्यंत उड्डाण केले नाही.
७) हातातील काम अपुरे राहिल्यास स्वप्नात काम पूर्ण केले आहे. (ऑगस्ट केकुले या शाश्त्रज्ञाला स्वप्नात बेंझिनचा फॉर्मुला सापडला होता)