पीए नामा: किस्सा ए साक्षर अशिक्षिताचा

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जनातलं, मनातलं
28 Sep 2023 - 10:29 am

(काल्पनिक किस्सा)

हा दहा बारा वर्षांपूर्वीचा किस्सा. आपल्या देशात बी.टेक + एमबीए केल्यावर ही जर केम्पस सिलेक्शन झाले नाही, तर उत्तम पगाराची नौकरी मिळणे अवघड. याशिवाय सप्लाय ही डिमांड पेक्षा भरपूर जास्त आहे. अधिकांश तरुणांना कमी पगारावर नौकरी करावी लागते. त्याने कमी पगाराची नौकरी करण्यापेक्षा जास्त पगाराच्या सरकारी नौकरीसाठी तैयारी सुरू केली आणि त्याला सरकारी नोकरी लागली. त्याच्या सेक्शन मध्ये साहजिकच तो सर्वात जास्त साक्षर होता. सेक्शन ऑफिसर ही त्याच्या पेक्षा कमी साक्षर होता. सेक्शन मधल्या समस्यांचे समाधान करत कार्य करणे/कर्मचाऱ्यांकडून करवून हे सेक्शन ऑफिसरचे दायित्व असते. पण आपले नंबर वाढविण्यासाठी अनेक कर्मचारी सरकारी सरळ मोठ्या साहेबांकडे धाव घेतात. त्याने ही हेच केले, परिणाम?

मी त्यावेळी एका आयएएस अधिकाराचा पीएस होतो. हा अधिकारी थोडा सनकी होता. प्रत्येक काम नियमानुसार करणारा. सकाळचे नऊ म्हणजे काम सुरू करण्याची वेळ. रोजचे काम रोज पूर्ण करा आणि घरी जा. सरकारी कार्यालयात वाढदिवस साजरे करणे, गप्पा मारणे इत्यादी त्याला चालत नव्हते. तीन वर्षांत त्याने एकदाही त्याचे व्यक्तिगत काम स्टाफला सांगितले नाही. वरून हरियाणवी असल्यामुळे, कुणाला काय बोलेल त्याचा नेम नाही. फक्त एक जमेची बाजू होती कागदावर कुणाचाही रेकॉर्ड खराब केला नाही. साहेबांचा कार्याचा उल्लेख एका प्रसिद्ध मालिकेत ही झाला होता.

त्या दिवशी सकाळी नऊ वाजता, साहेब दिवसभराच्या कामांचा आढावा घेत मला त्याबाबत निर्देश देत होते. त्याच वेळी हा चेंबर मध्ये आला आणि साहेबांना म्हणाला, सर आपल्या एडमिन मध्ये एक एमटीएस (शिपाई) रिकामा आहे, त्याला अंग्रेजी लिहता- वाचता येते आणि टायपिंग ही येते. त्याची पोस्टिंग जर आमच्या सेक्शन मध्ये झाली तर इतर कामांत त्याची मदत होईल. सध्या जो शिपाई आहे, तो फक्त आठवी पास आहे. साहेबांनी मला विचारले, "पीएस साहेब, जरा सांगा सध्याचा शिपाई जेंव्हा नोकरीला लागला, तेंव्हा शिपाईच्या नियुक्तीची पात्रता काय होती. मी म्हणालो, तेंव्हा रोजगार कार्यालयातून सरळ भर्ती होत होती. पात्रता आठवी पास होती. साहेबांनी विचारले, "शिपाईला अंग्रेजी किंवा हिंदी विषय शिकण्याची बाध्यता होती का"? मी म्हणालो नाही, त्याने मराठीत माध्यमातून आठवी पास केली असती, तरी तो शिपाई पदावर नियुक्तीसाठी पात्र होता. साहेबांनी त्याच्या कडे पाहिले, पण त्याला साहेबांचा इशारा त्याला कळला नाही. आपल्याच नादात तो पुढे म्हणाला, सर, एक अडाणी आणि गंवार शिपाई ज्याला अंग्रेजी येत नाही, पेक्षा एक ग्रेजुएट शिक्षित शिपाई निश्चित उत्तम काम करेल. सरकारी नौकरीत जुम्मा- जुम्मा वर्ष झालेल्या कर्मचाऱ्याच्या तोंडून जुन्या अनुभवी शिपाईचा 'गंवार' शब्दाने उल्लेख करणे साहेबांना आवडले नाही, ते रागातच त्याला म्हणाले, "अच्छा तुम्ही स्वतःला शिक्षित समजतात. किती शिकले आहात"? सर, मी बी.टेक एमबीए केले आहे. साहेबांनी गुगली फेकली, "म्हणजे, तुम्ही चार-पाचशे पुस्तके वाचून पाठ केली, परीक्षा दिली आणि युनिव्हर्सिटी ने तुमच्या डिग्रीवर शिक्का मारला". नाही सर, विषय समजावा लागतो त्या शिवाय परीक्षा पास करणे शक्य नाही. साहेब म्हणाले, अच्छा, त्या आठवी पास शिपाई ने अंग्रेजी शिकली नाही म्हणून त्याला ती भाषा येत नाही. तुम्हाला तुमच्या विषयांचे ज्ञान असते तर तुम्ही आज पुणे- बंगलौर मध्ये चांगल्या पगाराची नौकरी करत असता किंवा युएस मध्ये डॉलर छापत असता". तुम्ही तर त्या शिपाई पेक्षा जास्त अडाणी आहात. आता इथून जा. वरिष्ठ कर्मचाऱ्यांकडून काम शिका. दुसऱ्यांची चुगली करणे सोडा. जास्ती त्रास होत असेल तर नौकरी सोडून जा. हां, मी बोलविल्या शिवाय इथे येऊ नका". तो गेल्यावर साहेब मला म्हणाले दोन शब्द वाचून लोक स्वत:ला शिक्षित समजतात आणि अहंकारी होतात. दुसऱ्यांना तुच्छ लेखतात. खरे अशिक्षित असेच लोक असतात. आमचा साक्षर अशिक्षित सेक्शन मध्ये गेला आणि रडू लागला. तावातावाने त्याने त्यागपत्र टंकले. सेक्शन ऑफिसरने त्या त्यागपत्राचे तुकडे करून केराच्या टोपलीत टाकले आणि त्याला चांगला समज दिला. असो.

ज्ञानार्जन करून आपण साक्षर होऊ शकतो. अर्थशास्त्रात एमए पीएचडी करून आपण साक्षर अर्थशास्त्री होऊ शकतो. उत्तम प्रबंध लिहून नोबेल पुरस्कार ही मिळवू शकतो. पण शिक्षित अर्थशास्त्री नाही होऊ शकत. ज्या व्यक्तीला अर्जित ज्ञानाचा उपयोग करता येतो, तोच शिक्षित. बाकी सर्व साक्षर अशिक्षित, हेच बहुधा साहेबांना म्हणायचे होते.

कथासमाजआस्वाद

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

28 Sep 2023 - 11:24 am | मुक्त विहारि

आमचे बाबा महाराज डोंबोलीकर म्हणतात की, जितका शिकलेला, तितका हुकलेला.

महाराञांचे वाक्य फारच भारी...

सर टोबी's picture

28 Sep 2023 - 12:50 pm | सर टोबी

तो एक मूर्ख असं काही समर्थांनी लिहून ठेवलं आहे का हो? आपल्या आवडत्या नेत्याचं गुणगान करण्यासाठी किती ती कसरत करावी लागते.

विवेकपटाईत's picture

3 Oct 2023 - 12:06 pm | विवेकपटाईत

काहींना प्रत्येक शब्दात भगवंत दिसतात.

वेगळाच लेख..मस्त लिखाण.

स्वधर्म's picture

28 Sep 2023 - 5:38 pm | स्वधर्म

नवीन माणसाने इंग्रजी येत नसलेल्या माणसाचा केलेला उल्लेख कदाचित अपमानकारक असू शकतो, त्यावरून त्याला फायर करणे ठीक आहे. पण काम वेगाने व अधिक चांगले होण्यासाठी इंग्रजी येणार्या शिपायाची नियुक्ती करण्याची सूचना केली तर त्यात त्याचे काय चुकले? त्यामुळे कामात काहीही फरक पडणार नसेल तर ते न समजावता कनिष्ठांना व नागरिकांना अपमानास्पद वागणूक देणे ही खाकी डोक्याच्या सरकारी अधिकार्यांची चीड आणणारी गोष्ट आहे. कष्टाने शिकलेल्या माणसांचा केवळ आपण त्या व्यवस्थेत मुरलेले आहोत म्हणून असा अपमान करणे उलट तुमच्या साहेबाचीच घमेंडखोर वृत्ती दर्शवतो. सरकारी अधिकारी आणि त्यातही आय ए एस हे आपल्याकडे भयंकर ओव्हररेटेड आहेत असे वाटते. ते आपले काम करण्यासाठी पगार देऊन ठेवलेले नोकर आहेत अशा पध्दतीने सामान्य नागरीक कधी वागू लागेल कोणास ठाऊक? बाकी किस्सा चांगला आहे.

निनाद's picture

1 Oct 2023 - 6:06 am | निनाद

आय ए एस हे आपल्याकडे भयंकर ओव्हररेटेड आहेत १००% सहमत आहे. यांचे विवीध प्रकारचे माज पाहिलेले आहेत.

अहिरावण's picture

2 Oct 2023 - 1:47 pm | अहिरावण

दोन पैसे आले की सगळेच माज करतात. ऐयेएस असो की ऐटीवाले, डाक्टर की प्युन ... पैसे आले की मती भ्रष्ट होते

विवेकपटाईत's picture

3 Oct 2023 - 11:56 am | विवेकपटाईत

शिपाईच्या कामात उणीव असेल तर सेक्शन ऑफिसरला तक्रार करता येते. या शिवाय वर अवर सचिव कडे ही करता येत होती. पण इथे कर्मचारी स्वतः च्या फायद्यासाठी ( स्वतः चा गुट बनविण्यासाठी, किंवा शिपायकडून आपले काम करवून घेण्यासाठी) बिना कारण सरळ मोठया अधिकाऱ्याला तक्रार करतो. याचा अर्थ तो ज्या अधिकारी खाली तो काम करतो त्याची अवहेलना. सरळ सरळ अनुशासनहीनता. हा आयएएस अधिकारी चांगला होता म्हणून दमदाटी देऊन सोडून दिले.

विवेकपटाईत's picture

3 Oct 2023 - 12:04 pm | विवेकपटाईत

शिपाईच्या कामात उणीव असेल तर सेक्शन ऑफिसरला तक्रार करता येते. या शिवाय वर अवर सचिव कडे ही करता येत होती. पण इथे कर्मचारी स्वतः च्या फायद्यासाठी ( स्वतः चा गुट बनविण्यासाठी, किंवा शिपायकडून आपले काम करवून घेण्यासाठी) बिना कारण सरळ मोठया अधिकाऱ्याला तक्रार करतो. याचा अर्थ तो ज्या अधिकारी खाली तो काम करतो त्याची अवहेलना. सरळ सरळ अनुशासनहीनता. हा आयएएस अधिकारी चांगला होता म्हणून दमदाटी देऊन सोडून दिले.

अहिरावण's picture

29 Sep 2023 - 7:54 pm | अहिरावण

चांगले लेखन.

विवेकपटाईत's picture

3 Oct 2023 - 12:06 pm | विवेकपटाईत

प्रतिसाद देणाऱ्या सर्वांना धन्यवाद.