जुन्नर भटकंती -२

Bhakti's picture
Bhakti in जनातलं, मनातलं
17 Aug 2023 - 7:25 pm

जुन्नर भटकंती-१

पहिल्या भटकंतीतच मी नाणेघाटला पावसाळ्यात परत येण्याचं ठरवलं होतं.
सकाळच्या शांत गारव्यात जुन्नरकडे निघालो.आता रस्ता ओळखीचा झालायं.जुन्नरच्या जवळ आल्यावर मोठमोठ्या केळीच्या बागा आणि दुरच्या हिरव्या डोंगरांवर पसरलेली धुक्याची साय आनंदाची ग्वाही देत होती.
साधारण आठ वाजता जुन्नरला पोहचलो.पोटात इंधन भरून समोर भव्यतेची साद देणार्या शिवनेरीकडे कूच केले.मोगल,सुलतानी, निजामशाही या संकटांच्या हलकळ्ळोलात रयतेचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान!
यावर जाणार्या दोन वाटांपैकी अर्थातच सात दरवाज्यांची सोपी वाट निवडली.पहिला महादरवाजा, दुसरा पीर दरवाजा, तिसरा परवानगीचा दरवाजा, चौथा हत्ती दरवाजा, पाचवा शिपाई दरवाजा, सहावा फाटक दरवाजा आणि सातवा कुलाबकर दरवाजा(विकिपीडिया).आमची कोकरं उत्साहात धावत होती.एका कैदेतून सुटून स्वतः फोटोंच्या कैदेत अडकवत निवांत चाललो होतो.एकूण दरवाज्यांपैकी काहीच दरवाजांवर व्याघ्र शिल्प होते.सातवाहन काळात नाणेघाटावर देखरेखीसाठी या गडाची निवड झाली आणि इतर राजवटीत अभेद्य किल्ला अशी वाटचाल आणि बांधणी झाली.इथले महत्त्वाचे ठिकाण 'शिवाईदेवी मंदिर' जिजाऊ मातेने शिवाईहून 'शिवाजी'‌ नाव छत्रपती यांना दिले.देवीचा गाभारा प्रसन्नतेने ओतप्रोत आहे.त्याचे बाह्य बांधकाम आणि शेजारील लेण्या पाहून कार्लाची आठवण झाली.शिवाईदेवी मंदिराच्या बाजूला पुरातन लेण्या खोदलेल्या आहेत.एक स्तुप आणि इतर भिक्खूच्या राहण्याची सोय असलेल्या दगडी खोल्या आहेत.इथे पाण्याच्या खोदलेल्या खुप टाक्या आहेत.लेण्यांचा समूह पाहून.छत्रपती जन्मस्थान पाहायला निघालो.हा गड बहू झाडांनी वेढलेला आहे त्यामुळे चालतांना जीव सुखावतो.कोकरांची एनर्जी जरा कमी झाली होती.जन्मस्थळी पोहचलो.गड राजांच्या घोषणेने दुमदुमत होता.इतर वाडा पडला होता पण एकच ती प्रसिद्ध इमारत उभी आहे.त्या पाळण्यात अंगाई गात जिजाऊ शिवरायांना निजवित असेल,माझ्या मुखातून अंगाई उमटली "गुणी बाळ असा जागसी का तू राजा निज रे निज शिवबाळा"
सध्या वाचत असलेल्या 'दास डोंगरी राहतो ' पुस्तकातल्या दोन पानांचे अभिवाचन केले ज्यात रामदास स्वामी शिवबांना शिकवण देतात
“मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा”
“आहे तितुके जतन करावे, पुढे आणिक मेळवावे”
“महाराष्ट्र राज्य करावे जिकडे तिकडे”
समोर भव्य बदामी आकाराचा तलाव आहे.त्यापुढे कडेलोट स्थान.बाजूलाच 'महादेव कोळी चौथरा' मोगलांच्या क्रूर कृत्याची, महादेव कोळींचे बंड मोडण्यासाठी त्यांचा केलेला शिरच्छेद यांची साक्ष देणारा चौथरा.परतीची वाट जराशी सोपी होती, तपासले असता जवळपास दोन्ही बाजूंनी मिळून ५ किमीची ही भटकंती-चढाई चार तासांची झाली.फुस्स झालेले कोकरू किरकोळ खरदेमुळी परत टणाटण उड्या मारु लागले.

छत्रपती शिवाजी महाराज जन्मस्थान
अ

शिवनेरीवर पावसाने साधारण दर्शन दिल्यामुळे नाणेघाटाकडे पाऊसधारांच्या आशेने निघालो.शंभू डोंगरापासून स्वर्ग अवतरू लागला.

A
पावसाची माया
न्हाऊ घाली
डोंगराची काया
सुखावली दिठी
हिरव्या डोंगरा
देता चपळ मिठी...
आ

सृष्टीचा मुक्त हस्त वरदान भाताच्या इवल्या रोपांवर,जागोजागच्या छोट्याशा झर्यांतून,डोंगरांवर लहणार्या तलम ढगांच्या पदरांवर दिसत होते.तो खळाळता गोड आवाज..रोज मेडिटेशनला 'प्ले' करते ,आज प्रत्यक्ष तृप्ती कानांना होताना रोमांच उठले.नाणेघाटला पोहचल्यावर तोच खळाळ हजारो वर्षांपासून ऐतिहासिक घाटातून आजही वाहत होता.हा काहीसा कठीण मार्ग प्रत्येक जण मोठ्या धीटाईने करतोच कसा याचे मला आश्चर्य वाटत असते.मी दुसऱ्या वेळी इथे आले हा आनंदही अवर्णनीय होता.पुढल्यावेळी पायथ्यापासून वर चढाई करणार असं ठरवलं.
नानाचा अंगठा अनेक चढत होते पण मला पाहायचा होता नाणेघाटचा प्रसिद्ध उलटा धबधबा(reverse waterfall).पण जायचं कसं?जसा विठोबा भक्ती भावाने आठवला की सामोरी येतोच अगदी तसेच एक काहीसे वृद्ध आजोबा समोर आले "जीवधनच्या पायथ्याशी उलटा धबधबा पाहायचा का?चला अमूक अमूक दक्षिणा द्या नेतो"असे म्हणाले.चला त्याच्यामागून अर्ध्या रस्त्यात वाहनाने गेलो आणि मग पायी निघालो.ओहो...हिरव्या जीवधन किल्ल्याहून धावणारे शुभ्र मऊ ढग.. स्वर्गच!
कोकरू बदकाच्या मागे धावत होतं..प्रचंड गोड व्हिडिओ आलाय.
माझी लेक 'आबा आबा' नाना प्रश्न निरसण करत त्या वृद्ध आजोबांचे बोट पकडून पुढे गेली.ज्या क्षणी उलटा धबधब्यापाशी पोहचलो ते आश्चर्यकारक दृश्य पाहिले.खालच्या दरीतील वार्याच्या प्रचंड दाबामुळे कड्यांवरून खाली पडणारे पाणी मोठ्या फोर्सने वर फेकले जाते.त्यात जो तो मनसोक्त भिजत होता.भारतात चारही उलटे धबधबे केवळ याच नाणेघाट डोंगर रांगांत आहेत ?(माहिती गुगल). त्यातील एक मी पाहत होते.परतीच्या वाटेतही आबाचे 'विठोबा'चे बोट तिने सोडले नव्हते.
नाणेघाट नेहमीप्रमाणे मन जड झाल होत.

पावसाळी नाणेघाट
ख

नानाचा अंगठा
1

जीवधन-धुक्यात हरवलेला
Q

उलटा धबधबा
अ

-भक्ती

मुक्तकप्रवासआस्वाद

प्रतिक्रिया

राजेंद्र मेहेंदळे's picture

17 Aug 2023 - 8:09 pm | राजेंद्र मेहेंदळे

अरे वा!! सुंदर भटकंती आणि फोटो. मजा आली वाचताना. नाणेघाट नेहमी मुरबाडहुन वर चढुन केला आहे त्यामुळे तो तोंडाचा (शेवटुन चौथा) व्यु कधी पाहीला नाही.
उलट्या धबधब्याचा फोटोही मस्तच आलाय. छोटीशी भटकंती आवडली.

कंजूस's picture

17 Aug 2023 - 11:44 pm | कंजूस

सुंदर.

उलटे धबधबे सह्याद्रीच्या कड्यावर आहेत ठिकठिकाणी. पण तिथे रस्त्याने पोहोचता येईल असे आपल्याला माहीत असतात. लोणावळा -भुशी-लायन पॉईंट येथे दुसरा.
नाणेघाट हा जिन्यासारखा सोपा घाट आहे. गाढव,तट्टं किंवा बैल, यावर माल लादून नेण्यासारखा.
पावसाळी नाणेघाट फोटोतली वाट पावसात खळाळत्या ओढ्याचे भरते व त्यातूनच वर चढत येण्यात खूप मजा येते. फोटो घेतला तिथेच डावीकडे शिलालेखाची गुहा,कुंड आणि उजवीकडचा रांजण पाहिला असेलच.

रंगीला रतन's picture

18 Aug 2023 - 5:16 am | रंगीला रतन

मस्त!

प्रचेतस's picture

18 Aug 2023 - 6:43 am | प्रचेतस

भर उन्हाळ्यातही इथला परिसर विलक्षण सुंदर भासत असतो तर पावसाळ्यातले त्याचे सौंदर्य काय वर्णावे. आपटाळे पर्यन्त पर्जन्यछाया असलेल्या ह्या भागात आपटाळे सोडताच पुढे बदाबदा पाऊस कोसळत असतो. असंख्य किल्ले, लेणी, घाटवाटा या परिसरात आहेत. त्यात ती नाणेघाटाची बांधवून काढलेली वाट तर निव्वळ अद्भुत.

Bhakti's picture

18 Aug 2023 - 7:43 am | Bhakti

धन्यवाद मंडळींनो!
-कंकाका रांजण,लेणीबद्दल पहिल्या भागात लिहिलंय.
-राजेंद्र म्हणजे त्या मार्गाने वरपर्यंत येता नाही का?
-प्रचेतस हा शिलालेख किती स्पष्ट आहे बघा, शिवनेरीवर.काय लिहिलंय?
अ
(रचक्याने परवाच Arrival सिनेमा पाहिला त्यामुळे भाषा -लिपी रहस्य उलगडण्यासाठी खुप महत्त्वाची आहे हे परत पटलं:))
आणि हे माझं गोड कोकरु बदकामागे :)
https://youtube.com/shorts/xHCNqZynX6g?feature=share

प्रचेतस's picture

18 Aug 2023 - 8:45 am | प्रचेतस

ब्राह्मी अगदी मोडकी तोडकी येते.

वनसा (स्वस्तिक)
सतसा गत
भोजनमटपो
देयधम सघ

वनसा हे बहुधा यवनसा असे असावे.
सतस नामक यवनांच्या गटाने हा भोजन मंडप धर्मादाय केला असा काहीसा आशय आहे.

Bhakti's picture

18 Aug 2023 - 9:04 am | Bhakti

वाह!
धन्यवाद.

मनो's picture

19 Aug 2023 - 11:00 am | मनो

Shivneri Cave 67 Yavana inscription.

Yavaṇasa
Citasa Gatâna
bhojaṇamatapo
deyadhama saghe

"Gift of a hall
for the community (Sangha)
by the Yavana Cita
on behalf of the Gatas."

Annual Reports Of The Archaeological Survey Of India Part II

https://commons.m.wikimedia.org/wiki/File:Shivneri_Cave_67_Yavana_inscri...

आंद्रे वडापाव's picture

19 Aug 2023 - 1:38 pm | आंद्रे वडापाव

ग्रीस येथील लोकं ? यांनी का बरे दानधर्म केला ..

आंद्रे वडापाव's picture

19 Aug 2023 - 1:42 pm | आंद्रे वडापाव

Two Buddhist inscriptions made by Yavanas (Indo-Greeks) were found in Shivneri.[6] They suggest the involvement of men of Greek descent with Buddhism in India, as well as the continued presence and gradual acculturation of the Greeks in India in the 1st century CE.[6]

आंद्रे वडापाव's picture

18 Aug 2023 - 6:27 pm | आंद्रे वडापाव

छान फोटो व प्रवास लेख !

उलट्या धबधब्याचा गुगल मॅप चे लोकेशन सेव्ह केले का ? असल्यास इथे देऊ शकता का ?

Bhakti's picture

19 Aug 2023 - 10:35 am | Bhakti

मी अक्टिविटी बंद करायचे विसरले, त्यामुळे १० किमी दाखवते आहे,ती तेवढी नाहीये
Check out my activity on Strava: https://strava.app.link/4YUqg4kMnCb

अथांग आकाश's picture

18 Aug 2023 - 7:38 pm | अथांग आकाश

छान भटकंती! सुन्दर फोटो!!
उलटा धबधबा खासच!!!
wf

छान फोटो, लेख. अगदी पहिल्या, 'छत्रपती शिवाजी महाराज जन्मस्थान' या फोटोत इमारतीचा खालचा भाग आणि जमीन यामधल्या भागात काय भानगड झालेली आहे ते समजले नाही. कुणीतरी उभे होते ते फोटोतून मिटवले आहे किंवा कसे ?

Bhakti's picture

18 Aug 2023 - 9:22 pm | Bhakti

हो काका एक व्यक्ती होती तिला एडिट पर्यायात जाऊन इरेझ केलं.नाणेघाट फोटोतही दोघांना इरेझ केलंय पण ते जास्त कळतं नाही.

चित्रगुप्त's picture

18 Aug 2023 - 9:57 pm | चित्रगुप्त

हा फोटो मी फोटोशॉपमधे व्यवस्थित केलाय, पण इथे चढवणे काही केल्या जमत नाहीये. तुम्ही हे फोटो आधी कश्यावर चढवलेले आहेत ?

Bhakti's picture

19 Aug 2023 - 10:23 am | Bhakti

Google drive वापरला आहे.

कर्नलतपस्वी's picture

18 Aug 2023 - 9:31 pm | कर्नलतपस्वी

असाच प्रतिसाद दिला होता. उडाला वाटते.

पुणे जुन्नर च्या मधे आमचे गाव आहे. राजगुरुनगर.

टर्मीनेटर's picture

19 Aug 2023 - 10:07 pm | टर्मीनेटर

पावसाळ्यातल्या सह्याद्रीच्या रूपाबद्दल काय बोलायचे?
ते कायम शब्दातीतच असते 🙏
छान वर्णन, छान फोटोज 👍

श्वेता व्यास's picture

21 Aug 2023 - 3:48 pm | श्वेता व्यास

मस्त भटकंती आणि फोटो :)

भारीच 'पावसाळी नाणेघाट' फोटो मस्तच आहे.
उलटा धबधबा पण सुंदर. जीवधनला वर नाही गेला का?

जीवधनची योजना नव्हती, पुढल्या वेळी जाईन.

रंगीला रतन's picture

21 Aug 2023 - 10:46 pm | रंगीला रतन

लेख आवडला

गोरगावलेकर's picture

24 Aug 2023 - 10:41 am | गोरगावलेकर

सर्व फोटो छानच तरीही तो उलट धबधब्याचा फोटो जास्त आवडला.

स्नेहा.K.'s picture

29 Aug 2023 - 8:59 pm | स्नेहा.K.

नाणेघाटातून दिसणारे ते दृश्य नेहमीच मोहवणारे वाटते. पावसाळ्यात सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये थंडगार हवा आणि धुक्याची दुलई यांचा अनुभव घेत फिरणे हा एक स्वर्गीय अनुभव असतो!