पद्मश्री ना.धों.महानोर. मराठी साहित्यातील मोठं नाव. कविता, कादंबरी, नाटक, कथा. असे सर्वच वाड्मय प्रकार त्यांनी हाताळले. शिकत असताना गांधारी कादंबरी अभ्यासाला होती. ना.धों.महानोरांची ही पहिली ओळख. मग रानातल्या कविता, अजिंठा हे दीर्घ काव्य अनेकदा वाचून काढले आहे. पुढे, पावसाळी कवितांनीही वेड लावलं. शेती-मातीच्या कविता त्यांच्या वाचनात आल्या. जैत रे जैत, सर्जा, विदूषक, दोघी या चित्रपटातली गाणी कायम ओठावर रेंगाळत राहीली. आमच्या महाविद्यालया पासून त्यांचं पळसखेडा हे गाव जवळच आहे. अजिंठा डोंगर रांगा आणि जंगल सर्व हिरवेगार वनराईचा परिसर. 'मी जगतो तेच लिहितो' असे मानणारे कवी. ना.धों.महानोर यांचं व्यक्तिमत्त्व ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही संस्कृतीने घडलेले मनोहारी व्यक्तिमत्त्व. शेतकरी, गीतकार, माजी आमदार असलेले पण एक साधेपण जपलेलं व्यक्तिमत्त्व. दोन-तीन वेळेस भेटीचे योग आले. गप्पांची मैफिल जमली, एकदा गप्पा सुरू झाल्या की मग एकापाठोपाठ आठवणी सुरू व्हायच्या. साहित्य, साहित्य परिषदा, विधानपरिषदेतील अनुभव, राजकारण, साहित्य संमेलने. कितीतरी आठवणी. यशवंतराव चव्हाण, शरद पवार, माजी मंत्री बाबुरावजी काळे यांच्या सोबतच्या आठवणी. गप्पा अशा उत्तरोत्तर रंगत जायच्या.
आमच्या अजिंठा शिक्षण संस्थेचे ते संचालकही होते, त्यामुळे संबंधही होतेच पण येणा-या प्रत्येकाशी ते इतके भरभरुन बोलायचे असे वाटावे की आपली आणि त्यांची खूप ओळख आहे. आठवणी सांगतांना, आई वडील दुस-याच्या शेतावर रोजंदारीने काम करायचे, मी सगळ्यात मोठा. चार भाऊ तीन बहिणी. चार-पाच मैल शाळेत जायचो. कवितेचं आणि नाटकाचं वेड शाळेत लागलं. जळगावला कॉलेजात गेलो तर वडिलांनी बोलावून घेतलं पुरे झालं शिक्षण. वडिलांनी घेतलेली शेती कायम करीत राहिलो. जगभर फिरलो पण पळसखेड़ा सोडले नाही.
आजुबाजूच्या खेड्यात गावात राहिलो म्हणून निसर्ग शेती, याबरोबर माणसं त्यांची लोकगीतं यांची ओळख होत गेली आणि ते सगळं पाठ केलं वाचन केलं कविता वाचल्या शाहिरी, केशवसूत, मर्ढेकर समजून घेतले आणि मग आठ कविता रानातल्या लिहिल्या. आणि प्रतिष्ठाण मधे छापून आल्या. मग लिहित गेलो. 'रानातल्या कवितांनी' मोठं केलं आणि प्रसिद्धी मिळाली. यशवंतराव चव्हाण साहेबांनी कविता ऐकल्या आणि ते कवी आणि कवितेच्या प्रेमात पडले. विधानपरिषदेची संधीही मिळाली.
ब्रिटिश इष्ट इंडिया कंपनीच्या मिल्ट्रीत असलेल्या रॉबर्ट गील आणि पारोच्या परिसरातील आठवणी कायम सांगत आणि अजिंठा दीर्घकाव्य त्यामुळेच कसे लिहिते झालो. लता मंगेशकर भेटायला आल्या आणि तेव्हा त्यांना शेतातले सिताफळ आवडले आणि पुढे त्यांनी आपल्या शेतातील सीताफळाना 'लताफळ' नाव दिल्याची आठवण सांगत राहिले.
यशवंतराव चव्हाण साहेब, शरद पवार साहेब, सोयगावचे स्वांतंत्र्य सैनिक माजी मंत्री अप्पासाहेब काळे यांच्याबरोबरच्या आठवणी, या सर्व मोठ्या माणसाच्या सहवासात जीवनात नैतिकमूल्य जोपासता आली शिकता आले आणि ती माणसे मोठी का आहेत हे समजत गेले.
सोयगाव येथील श्रीराम संगीत मंडळ आणि लोटू पाटलांच्याबद्दल खूप बोलायचे. सोयगाव ला एक मोठं नाट्यगृह झालं पाहिजे असे ते म्हणायचे. संत ज्ञानेश्वर महाविद्यालयात सांस्कृतिक सभागृह आम्ही कसे आणले. तसेच मराठवाङा साहित्य परिषदेचा अध्यक्ष असतांना कसे काम केले. भरभरून बोलत असायचे. एकदा साहित्य संमेलनात हजर राहिले तर याद राखा म्हणून मिळालेली धमकी आणि आजारी असतांनाही मी गेलो ते सांगायचेच, राजकारण. साहित्य एकमेकात गुंतल्यामुळे झालेले फायदे तोटे सांगतांना कायम रमून जात असायचे.
आज सकाळी त्यांच्या निधनाची बातमी आली अविस्मरणीय भेटी गप्पांची आठवण झाली. पद्मश्री निसर्गकवी,ना.धों.महानोरांना भावपूर्ण आदरांजली.
प्रतिक्रिया
3 Aug 2023 - 3:30 pm | विवेकपटाईत
विनम्र श्रद्धांजली. त्यांच्या कविता आणि गाणे दोन्ही अप्रतिम.
3 Aug 2023 - 3:37 pm | प्रचेतस
जैत रे जैत हा त्यांच्या प्रतिभेचा सर्वोच्च अविष्कार म्हणता येईल. सह्याद्रीतल्या ठाकरांचं जीवन त्यांनी आपल्या समर्थ शब्दांद्वारे आपल्यापुढे उभं केलं.
महानोरांना भावपूर्ण आदरांजली.
3 Aug 2023 - 3:40 pm | चांदणे संदीप
निसर्गकवी, प्रगतिशील शेतकरी म्हणून ओळख असलेले जेष्ठ कवी ना. धो. महानोर (वय 81) यांचे दीर्घ आजाराने आज सकाळी 8:30 वाजता रूबी हॉस्पिटल, पुणे येथे निधन झाले.
त्यांच्या रूपाने एका प्रतिभाशाली कवी आणि भूमिपुत्र हरपला याचे अतीव दुःख आहे.
त्यांच्याबरोबर झालेल्या मागच्या भेटीतच ते खूप थकल्यासारखे जाणवत होते.
भावपूर्ण श्रद्धांजली!!
सं - दी - प
3 Aug 2023 - 4:16 pm | Bhakti
रानातल्या पाखरांचा श्वास
गर्द झाडीतली झिम्माड पाती
चिंब पावसातलं आभळ मन
वळण येड्या वाटेचा सखा
मातीमधून, रानात,नभात विहरून
धरणीच्या कुशीत निघून गेला...
डोळ्यांच्या पापण्या
आपसूकच ओलावल्या
...रानकवी ना.धों.महानोर.... अभिवादन _/\_
3 Aug 2023 - 4:17 pm | अमर विश्वास
3 Aug 2023 - 4:17 pm | अमर विश्वास
3 Aug 2023 - 4:17 pm | अमर विश्वास
3 Aug 2023 - 5:02 pm | अमर विश्वास
रानातला कवी हरपला..... खूपच वाईट वाटलं ही बातमी ऐकून.... ते माझे आवडते कवी होते... भावपूर्ण श्रद्धांजली
ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे
आणि ह्या मातीतुनी चैतन्य गावे
कोणती पुण्य अशी येती फळाला
जोंधळ्या ला चांदणे लगडून जावे
3 Aug 2023 - 5:13 pm | कर्नलतपस्वी
जैत रे जैत, सोळा गाणी,एका पेक्षा एक सरस. या गाण्यांनी महानोर यांना मराठी घराघरात पोहचवले.त्यांची एक कवीता नुकतीच वाचनात आली होती.
ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे
आणि ह्या मातीतुनी चैतन्य गावे
कोणती पुण्ये अशी येती फळाला
जोंधळ्याला चांदणे लखडून जावे
ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे
आणि माझ्या पापणीला पूर यावे
पाहता ऋतुगंध कांती सांडलेली
पाखरांशी खेळ मी मांडून जावे
गुंतलेले प्राण ह्या रानांत माझे
फाटकी ही झोपडी काळीज माझे
मी असा आनंदुनी बेहोष होता
शब्दगंधे, तू मला बाहूत घ्यावे!
रानातला कवी रानात झिरपून गेला. एवढ्या लवकर कवीची इच्छा पुर्ण होईल असे वाटले नव्हते.
विनम्र श्रद्धांजली.
3 Aug 2023 - 5:56 pm | चौथा कोनाडा
या दिग्गज निसर्ग कविच्या जाण्याने निसर्गच फिकट वाटायला लागला आहे
विनम्र श्रद्धांजली !
4 Aug 2023 - 12:06 am | आलो आलो
वेड...., वेड लावलं होत या ओळींनी कसल तुफान लिहिलंय ...
तेव्हढंच तुफानी गायलंय दीदी आणि वाडकरांनी .
तेव्हापासून महानोर आवडले नी मग आवडतच राहिले कधीही कोणत्याही मूड मध्ये महानोर वाचता येतात यातच सर्व भावना आल्या असो ....
मातीतल्या कवीला भावपूर्ण श्रद्धांजली !
4 Aug 2023 - 8:08 am | गवि
बातमी वाचली तेव्हा ज्येष्ठ प्रसिद्ध दर्जेदार कवी निधन पावले असा पहिला विचार मनात आला होता. तो खूपच वरवरचा होता.
हा धागा आणि प्रतिसाद यांच्या निमित्ताने महानोर हे आपल्या किती जवळ आसपास सतत होते याची एकदम जाणीव झाली. अनेक गाणी आणि ओळी ज्या आपल्या मनात कायम वसतीला असतात ती मुळात कोणी जन्मास घातली होती हेच आपण जाणत नाही किंवा कधीतरी हळूहळू विसरून जातो.
या थोर व्यक्तीला मनापासून आदरांजली.
4 Aug 2023 - 8:38 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आमच्या अजिंठा शिक्षण संस्थेचे ते संचालकही होते, त्यामुळे संबंधही होतेच पण येणा-या प्रत्येकाशी ते इतके भरभरुन बोलायचे असे वाटावे की आपली आणि त्यांची खूप ओळख आहे. आठवणी सांगतांना, आई वडील दुस-याच्या शेतावर रोजंदारीने काम करायचे, मी सगळ्यात मोठा. चार भाऊ तीन बहिणी. चार-पाच मैल शाळेत जायचो. कवितेचं आणि नाटकाचं वेड शाळेत लागलं. जळगावला कॉलेजात गेलो तर वडिलांनी बोलावून घेतलं पुरे झालं शिक्षण. वडिलांनी घेतलेली शेती कायम करीत राहिलो. जगभर फिरलो पण पळसखेड़ा सोडले नाही.
आजुबाजूच्या खेड्यात गावात राहिलो म्हणून निसर्ग शेती, याबरोबर माणसं त्यांची लोकगीतं यांची ओळख होत गेली आणि ते सगळं पाठ केलं वाचन केलं कविता वाचल्या शाहिरी, केशवसूत, मर्ढेकर समजून घेतले आणि मग आठ कविता रानातल्या लिहिल्या. आणि प्रतिष्ठाण मधे छापून आल्या. मग लिहित गेलो. 'रानातल्या कवितांनी' मोठं केलं आणि प्रसिद्धी मिळाली. यशवंतराव चव्हाण साहेबांनी कविता ऐकल्या आणि ते कवी आणि कवितेच्या प्रेमात पडले. विधानपरिषदेची संधीही मिळाली.
ब्रिटिश इष्ट इंडिया कंपनीच्या मिल्ट्रीत असलेल्या रॉबर्ट गील आणि पारोच्या परिसरातील आठवणी कायम सांगत आणि अजिंठा दीर्घकाव्य त्यामुळेच कसे लिहिते झालो. लता मंगेशकर भेटायला आल्या आणि तेव्हा त्यांना शेतातले सिताफळ आवडले आणि पुढे त्यांनी आपल्या शेतातील सीताफळाना 'लताफळ' नाव दिल्याची आठवण सांगत राहिले.
यशवंतराव चव्हाण साहेब, शरद पवार साहेब, सोयगावचे स्वांतंत्र्य सैनिक माजी मंत्री अप्पासाहेब काळे यांच्याबरोबरच्या आठवणी, या सर्व मोठ्या माणसाच्या सहवासात जीवनात नैतिकमूल्य जोपासता आली शिकता आले आणि ती माणसे मोठी का आहेत हे समजत गेले.
सोयगाव येथील श्रीराम संगीत मंडळ आणि लोटू पाटलांच्याबद्दल खूप बोलायचे. सोयगाव ला एक मोठं नाट्यगृह झालं पाहिजे असे ते म्हणायचे. संत ज्ञानेश्वर महाविद्यालयात सांस्कृतिक सभागृह आम्ही कसे आणले. तसेच मराठवाङा साहित्य परिषदेचा अध्यक्ष असतांना कसे काम केले. भरभरून बोलत असायचे. एकदा साहित्य संमेलनात हजर राहिले तर याद राखा म्हणून मिळालेली धमकी आणि आजारी असतांनाही मी गेलो ते सांगायचेच, राजकारण. साहित्य एकमेकात गुंतल्यामुळे झालेले फायदे तोटे सांगतांना कायम रमून जात असायचे. आता केवळ आठवणी.
-दिलीप बिरुटे
4 Aug 2023 - 9:47 am | टर्मीनेटर
'रानकवी' ना.धों.महानोर ह्यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
जैत रे जैत मधली सगळी गाणी छान आहेत पण त्यातली हि चार माझ्या विशेष आवडीची...
असं एखादं पाखरू वेल्हाळ
जांभुळपिकल्या झाडाखाली
नभ उतरू आलं
मी रात टाकली
बाकी 'सर्जा' मधल्या
"चिंब पावसानं रान झालं आबादानी
झाकू कशी पाठीवरली चांदणं गोंदणी"
ह्या गाण्याबद्दल काय बोलायचं? निव्वळ अप्रतिम. हे गाणं एका अमराठी मित्राने मला ऐकवलं होतं आणि पहिल्यांदा ऐकताक्षणीच प्रचंड आवडलं होतं!
पं. हृदयनाथ मंगेशकर हे माझे आवडते संगीतकार त्यांच्या गाण्यांच्या संग्रहात असलेली वरील गाणी मी गेली कैक वर्षे ऐकत आलोय पण हि ना.धों.महानोरांच्या लेखणीतून उतरली आहेत हे आज हा धागा आणि त्यावरचे प्रतिसाद वाचल्यावर समजले.
4 Aug 2023 - 10:17 am | सौंदाळा
ना.धों ना श्रध्दांजली
त्यांची कविता खरोखरच निसर्गाचे स्पंदन होती.
बिरुटे सर तुम्ही मराठीचे प्राध्यापक आणि महानोरांच्याच परिसरातले म्हटल्यावर हा लेख दिसेल याची खात्री होती. लेख थोडा छोटा वाटला.
संपादक मंडळाला विनंती की हा धागा 'शिफारस' सदरात दिसावा.
4 Aug 2023 - 10:47 am | उग्रसेन
महाकवी महानोरांची गाणी.
महानोरांना भावपूर्ण आदरांजली.
4 Aug 2023 - 10:50 am | उग्रसेन
राधे यमुनेच्या काठावर दोरवा
ग बाई बाई जाळीमंदी झोंबतो गारवा.
लय भारीय.
4 Aug 2023 - 11:36 am | कंजूस
अल्प परिचय आवडला.
पुस्तकं वाचेन.
4 Aug 2023 - 12:56 pm | मित्रहो
रानकवी ना. धो. महानोर यांना विनम्र श्रद्धांजली
7 Aug 2023 - 3:25 am | चित्रगुप्त
खालील विडियोत १६:३४ पासून ना. धो. महानोर यांची स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कवितांविषयक एक आठवण ऐका:
https://www.youtube.com/watch?v=l4TkGag7iMw
तसा हा विडियो भिडे गुरुजी यांच्या संबधातील असून तोही रोचक, मननीय आहे.
13 Aug 2023 - 4:08 pm | धर्मराजमुटके
मस्त चलाखी दाखविली महानोर यांनी. सावरकरांची निसर्गकविता म्हणून आग्रह करणार्याचा पण मान राखला आणि ज्यांना सावरकरांच्या परिचित कविता ऐकवत नाहित त्यांना पण समाधान दिले. एका दगडात दोन पक्षी. चलचित्र आपण सांगीतल्याप्रमाणे १६.३४ पासूनच पुढे पाहिले. अगोदरच्या भागात सत्य / असत्य काहिही असले तरी त्याच्याशी आमचा संबंध नाही. कोणाचे पिताश्री हिंदू असो वा मुस्लीम , त्याने पुत्राच्या कार्याची महती कमी होत नाही.
ऋषीचे मुळ आणि नदीचे कुळ शोधू नये असे म्हणतात ते अगदी सत्य आहे.
13 Aug 2023 - 2:41 pm | निमी
अशा कवी लेखकांना केवळ भेटताच नाही अनुभवता आले हे खूप मोठे संचित आहे..ना. धो. ना अभीवादन.