शुभ्र काही जीवघेणे...

मी-दिपाली's picture
मी-दिपाली in जनातलं, मनातलं
16 Jul 2023 - 2:50 pm

Indian Ghost tree

वनस्पतीशास्त्र विषय पदवीसाठी निवडल्यामुळे फिल्ड ट्रिप्स, एक्सकर्शन्स या गोष्टी ओघाने त्याबरोबर आल्या. एरवी कॉलेजच्या पिकनिकला घरून परवानगी मिळणं, ही अशक्य कोटीतली गोष्ट होती. पण यासाठी गुण असतात, ही सत्य परिस्थिती नेटाने घरच्यांच्या मनावर बिंबवण्यात यश आलं आणि त्यामुळे परवानगी मिळत गेली. वर्षभरात जवळपासची किमान दोन आणि एक कुठेतरी लांब, अशी तीन तरी एक्सकर्शन्स असायची. तेव्हा गुगल मदतीला नसायचं. त्यामुळे सगळी भिस्त प्राध्यापकांच्या ज्ञानावर. वनस्पतींचे नमुने गोळा करत असताना तिचं स्थानिक नाव, शास्त्रीय नाव, वैशिष्ट्ये सांगितली जायची. ती उभ्या उभ्याच पटापट लिहून घ्यावी लागायची. यात एक गंमत अशी होती, की लिहून घेतलेली माहिती नेमकी कोणत्या वनस्पतीची होती, हे नंतर हरबेरीअम किंवा नोंदवही बनवताना आठवणं कठीण होऊन बसायचं. मोबाईल नसल्यामुळे शूट करणं, फोटो काढून ठेवणं या पळवाटा नव्हत्या.
एका गोष्टीच्या बाबतीत मी भाग्यवान होते, ती म्हणजे वनस्पतींची किचकट शास्त्रीय नावं लक्षात राहणं. मैत्रिणीही खुशाल सांगायच्या मला, 'लक्षात ठेव गं !' आणि स्वतः निर्धास्त व्हायच्या.
' प्रति एक झाडामाडा, त्याची त्याची रूपकळा, प्रति एक पानाफुला, त्याचा त्याचा तोंडवळा !' बोरकरांच्या या ओळी माझ्या शब्दशः मदतीस धावून यायच्या आणि त्या वनस्पतीच्या नावासकट तो तोंडवळा त्याचा ठसा उमटवून जायचा. मग लक्षात राहायचं आणि वेळेवर ते नाव आठवायचंही. आज दोन दशकांनंतरही जेव्हा अचानक एखादं झाड किंवा त्याचा संदर्भ समोर येतो आणि त्याचं शास्त्रीय नाव बिनचूक आठवतं, तेव्हा खूप धन्य झाल्यासारखं वाटतं. बरीचशी विस्मरणातही गेली अर्थात. मात्र एक अपवाद कायम राहील. ते नाव मी कधीच विसरू शकणार नाही .... 'Sterculia urens.'
त्या वर्षी आमची एक्सकर्शन टूर महाबळेश्वरला गेली होती. महाबळेश्वर म्हणजे दऱ्याखोऱ्यांचा, घनदाट सदाहरित जंगलाचा भूभाग. शिशिराच्या सावटाची टांगती तलवार नसल्यामुळे इथली बरीचशी झाडं निर्धोकपणे सावळ्या बुंध्यांवर हिरवाईचं अहेवपण मिरवतात. त्यात हे एकच जणू 'वैधव्यखुणा' घेऊन उभं असल्यासारखं दिसत होतं. 'Sterculia urens...Indian Ghost tree.'
'पांढरा शुभ्र' बुंधा आणि फांद्या असलेलं ते निष्पर्ण झाड ! बघता क्षणी मनात चर्रर्र होऊन गेलं होतं. नेमकं कोणत्या भावनेनं, हे तेव्हा सांगता आलं नसतं, आज कळतंय. इतरांपेक्षा वेगळं असणं, हे आधी मनात शंका किंवा प्रश्न निर्माण केल्याशिवाय राहत नाही. निराळेपणाचा सहज स्वीकार का होऊ शकत नाही?
वर्ष सरत आलं हळूहळू. परीक्षांच्या तारखा लागल्या. त्याआधी निरोप समारंभाचे वेध लागले. इथून पुढे साऱ्यांचे मार्ग बदलणार होते. काही हात आता सुटणार होते. पण त्याचं दुःख तेवढ्यापुरताच होतं. कसं असतं ना, मन मागे रेंगाळायला लागलं, की समजावं, म्हातारे होत चाललो. तरुणाईचं तसं नसतं. तिला पुढे बघायला आवडतं. त्यामुळे छान उत्साह ओसंडून वाहत होता. धमाल, मस्ती म्हटलं, की त्यात फिशपौंडचा खेळ ठरलेला असायचा. अगदी प्राध्यापकही यातून सुटत नसत. कुणाची उंची, वजन, लकब कोणत्याही वैगुण्यावर बोट ठेवून मजा घेण्याची यात मुभा असायची. ज्यांना फिशपौंड मिळत होते, ते स्पोर्टिंगली घेत होते. फिशपौंड देणाऱ्याचं नाव इथे कळायचं नाही. उगाच कुणाच्या मनात राग राहायला नको. श्रद्धाचं नाव घेतलं गेलं, तशी ती पुढे झाली. चिठ्ठीवर लिहिलं होतं, ' Sterculia urens.'
तिच्या शरीरावरचे कोडाचे पांढरे डाग आता आपले हातपाय पसरत होते. इतक्या वेळ असणारं हास्याचं वातावरण क्षणात मावळलं. कुणी दिला असेल हा फिशपौंड? प्रश्नार्थक नजरेने हे एक दुसऱ्याला विचारत होता. नाही रुचलं कुणालाच. “Just chill friends, that's a good one. मजा घ्या याचीही, बाकीच्यांची घेतली तशी. That will make me feel normal, ” असं म्हणत पुन्हा सगळ्यांना तिनेच मूडमध्ये आणलं, मात्र गालबोट लागून गेलंच.
पंचवीस वर्षं उलटून गेली, त्या प्रसंगास. त्यानंतर काही काळ काही जण संपर्कात होते एकमेकांच्या. हळूहळू प्रत्येक जण आपापल्या सुखदुःखात, आव्हानांत गुंतून गेल्यावर आठवणी क्षीण होत गेल्या. गेट टुगेदरच्या निमित्ताने पुन्हा एकदा सगळे भेटलो होतो. किती बदल झाला होता प्रत्येकात. कुणाचे केस जाऊन होत्याचं नव्हतं झालं होतं. कुणाची वजनं वाढून नव्हत्याचं होतं झालं होतं. कुणी मात्र अगदी काळाला हरवून तारुण्य टिकवून होतं. घोळक्यात गप्पांचे फड रंगात आले होते. श्रद्धा तोवर आली नव्हती, त्यामुळे तोही विषय निघालाच. पुन्हा एकदा तोच संतापाचा सूर, नाराजीची कळ... तोवर श्रद्धा आली. सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे वळल्या. पांढऱ्या रंगाने आता कुठेच संधी सोडली नव्हती तिच्या शरीरावर आपलं अस्तित्व दाखवण्याची. छान दिसत होती ती त्यातही. मल्टीनॅशनल कंपनीत उच्चपदावर नोकरी करत असल्याचा आत्मविश्वास होता तिच्यात.
तेवढ्यात एक विलक्षण घटना घडली. नंदिनी झपाट्याने तिच्या दिशेने धावत गेली, जणू ती तिच्याच येण्याची वाट बघत होती. कुणाला काय घडतंय कळलंच नाही क्षणभर. पण जे दिसलं, ते एवढंच होतं, श्रद्धाच्या गळ्यात पडून नंदिनी रडत होती. “ माझं चुकलं, मला माफ कर.” पुढे जे आम्ही ऐकलं, त्याने आम्ही सगळे जागच्या जागीच थिजलो. नंदिनीचे फक्त शब्द ऐकू येत होते... “ त्या दिवशी तुला फिशपौंड देणारी मी होते. तुझ्या हुशारीचा खूप हेवा वाटायचा मला. मला शिक्षा मिळाली गं माझ्या कर्माची. That 'Ghost tree' has haunted me for years. पछाडलं मला त्याने त्या दिवसापासून. पांढरे डाग निघालेत मुलीच्या अंगावर आता. ”
एरवी कोणताही डाग जराही सोसून न घेण्याची मिजास दाखवणारा शुभ्र रंग इकडे मात्र स्वतः डागाचे भोग भोगतो. दिवस सगळ्यांचे कायम सारखे राहत नाहीत, हेच खरं.
सासरच्या गावी जाताना वाटेत ते झाड लागतं. ते दिसलं, की आता मला आईचे शब्द आठवतात, “ दुखवू नकोस कुणाला. उलटून बोलली ती व्यक्ती, तर एकवेळ निभावून जाईल, पण 'न दिलेली' हाय जास्त लागते, एवढं लक्षात ठेव !”

साहित्यिकप्रकटनविचार

प्रतिक्रिया

चलत मुसाफिर's picture

16 Jul 2023 - 3:08 pm | चलत मुसाफिर

"आई गं" असं कळवळून निघालं तोंडातून. मतकरींच्या पठडीतला विषय. लिहिलंतही खूप चांगलं.

पण त्या बिचाऱ्या छोटीची काय चूक?

Yogesh Sawant's picture

17 Jul 2023 - 2:25 pm | Yogesh Sawant

> पण त्या बिचाऱ्या छोटीची काय चूक?
प्रालब्ध कर्म.
विषय फार फार गहन आहे.

कंजूस's picture

16 Jul 2023 - 3:10 pm | कंजूस

वाईट वाटलं.

फारच हृदयस्पर्शी. हे पांढरे डाग वास्तविक काही रोग किंवा संसर्गजन्य नसूनही केवळ दृश्य परिणामामुळे लोक त्याला रोग मानतात. दुर्दैव.

बाकी छायाचित्रातले झाड खुद्दच पाहिले आहे डहाणू रस्त्यावर ड्राईव्ह करत असताना. एकदम दचकवणारे आहे. मध्यरात्री अचानक दिसले की एखादा वाहन चालक चांगलाच सटपटू शकतो.

मुरुडनजीक कोकरी घुमट नावाने ओळखल्या जाणाऱ्या सिद्दी घराण्याच्या कबरी आहेत. ते आवार असेच प्राचीन निर्मनुष्य आणि पडझड होत गेलेले आहे. त्याच आवारात सिद्दींनी काही शतकांपूर्वी लावलेले दोन आफ्रिकेतून आणून लावलेले बाओबाब वृक्ष आहेत. ते असेच इतर झाडी झाडोऱ्यात एकदम वेगळे दिसतात. एकूणच अति गूढ असते तिथे. एका घराण्यातील अनेक वंशज एकमेकांच्या सानिध्यात चिरनिद्रा घेत असलेले. अथांग समुद्राच्या बाजूला.

चलत मुसाफिर's picture

16 Jul 2023 - 3:37 pm | चलत मुसाफिर

वरचा पहिला प्रतिसाद माझाच आहे आणि मनापासून दिलेला आहे. पण पुनर्विचार करून एक वेगळा मुद्दा मनात आला.

अंगावर पांढरे डाग असणे ही एक जीवघेणी शिक्षा आहे (खुद्द व्यक्ती व तिच्या कुटुंबासाठी) या चुकीच्या सामाजिक धारणेस या कथेमुळे बळ मिळते. मिपावरील जाणकार वैद्यांनी कृपया प्रतिसादांमधून यांचे खंडन करावे ही विनंती.

चलत मुसाफिर's picture

16 Jul 2023 - 3:38 pm | चलत मुसाफिर

गविंचा प्रतिसाद आता वाचला

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Jul 2023 - 3:49 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुंदर लिहिलंय. कोणाचं तरी दु:ख समजायला नियतीने फासे उलटे टाकले. मला दोघांबद्दलही वाईटच वाटलं. आपण सर्वसामान्य असावं असे प्रत्यकाला वाटतं. आणि म्हणून कोणतंही असं वेगळेपण कोणाच्या आयुष्यात कायम वेदना देवून जातंच. झाडाचा शुभ्रपणा बोलका. लिहिण्याची शैली सुंदर आहे, लिहिते राहावे.

-दिलीप बिरुटॅ

कर्नलतपस्वी's picture

16 Jul 2023 - 6:27 pm | कर्नलतपस्वी

परदुःखावर शिजले जे सुख
विटाळले जरि तेणे हे मुख
या हृदयातुनि त्या दुःखाचे उठवी शत पडसाद
-बाकीबाब

अजाणतेपणाने किंवा असुयेपोटी लहानपणी तारुण्यात अशा काही गोष्टीं घडून जातात आणी मग त्या आयुष्यभर पाठपुरावा करतात.

दर्जेदार लिहिता तुम्ही... लिहित्या रहा 👍

Bhakti's picture

17 Jul 2023 - 11:43 am | Bhakti

सुंदर लेखन.

राजेंद्र मेहेंदळे's picture

17 Jul 2023 - 1:24 pm | राजेंद्र मेहेंदळे

झाडाबद्दल काहीतरी असेल असे वाटुन वाचायला सुरुवात केली आणि लेखाने वेगळेच वळण घेतले. असो.

धागा वाचायला सुरुवात केली आणि बॉटनीसाठी केलेल्या महाबळेश्वरच्या हर्बेरियम अभ्यास सहलीच्या असंख्य आठवणी जाग्या झाल्या. स्वतः केलेले हर्बेरियम नंतर कधीच पाहायला मिळाले नाही, ते कॉलेजच्या संग्रहातच राहिले. तुम्ही उल्लेख केलेले झाड कांडोळाचे, भुत्याचे झाड असे स्थानिक नाव आहे. मात्र नंतर धाग्याने वेगळेच वळण घेतले. अर्थातच शेवट दुर्दैवी असला तरी लेखन आवडले.

सौंदाळा's picture

17 Jul 2023 - 7:56 pm | सौंदाळा

अप्रतिम लेख आणि कलाटणी.
महाश्वेताची आठवण झाली. ऐश्वर्या नारकरने खूप सुंदर अभिनय केला होता.
आमच्या नात्यातील लख्ख गोर्‍या मुलीच्या लग्नावेळी मुलाच्या वडीलांनी विचारले होते की तुमच्या घराण्यात कोणाला कोड आहे का?
मुलीला कोड अर्थातच नव्हते आणि असल्यासारखे वाटत पण नव्हते पण कदाचित नितळ गोर्‍या रंगावरुन त्यानी हा प्रश्न विचारला की काय कोण जाणे.
ऑफिसमधे पण येता जाता एक माणुस दिसायचा, कोरोनाच्या आधी त्याला थोडे डाग दिसत होते. अडीच-तीन वर्षांनी पाहिले तर पूर्ण त्वचा तशीच झाली होती.
आधीच्या कंपनीत पण लेखातील श्रद्धाप्रमाणेच एक मॅनेजर होता. अतिशय हुशार, वागयला कडक पण कार्यतत्पर. गो टू गाय.
सुलोचना चव्हाण यांना तर उतारवयात हा प्रोब्लेम झाला. कोणत्यातरी पारितोषिक वितरण कार्यक्रमाला त्यांना बघून धक्का बसला होता.

छान कथा खरी खोटी असेल‌. तरी मनात घोळत राहणारी विज्ञानातील माहिती कळली कलशाखेचा. आ अभ्यास केलयामुळे विज्ञानातले खूपसे माहिती नव्हते . व अजूनही नाही

सुबोध खरे's picture

19 Jul 2023 - 12:20 pm | सुबोध खरे

BEAUTY IS SKIN DEEP. हे कितीही सत्य असले तरी लग्नाच्या बाजारात सुंदर मुलीचीच मागणी असते हि वस्तुस्थिती आहे.

डाग पडलेला आंबा किंवा डाग पडलेलं कापड सुद्धा तुम्ही विकत घेत नाही

मग नवरा किंवा बायको जाणून बुजून कोण कशाला पत्करेल?

ती एक तडजोडच असते.

बाकी आंतरिक सौंदर्य पहा, बाह्य सौंदर्य कशाला पाहता? हे तत्व म्हणून ठीक आहे. परंतु पुरुष( किंवा स्त्रिया) काही एक्स रे नजर घेऊन आलेले नसतात त्यांना समोर दिसते तेच भावते. याला कोणी काहीही करू शकत नाही.

कोड हे अनुवांशिक आहे. यामुळे ते पुढच्या पिढीत उतरण्याची शक्यता असतेच. त्यातून कोड असलेला मुलगा कोड असलेली मुलगी पत्करतो ( किंवा उलटे) यामुळे हा आजार पुढच्या पिढीत येण्याची शक्यता अजूनच वाढते.

याशिवाय हा आजार AUTOIMMUNE DISEASE या श्रेणीत मोडतो यामुळे हा आजार असणाऱ्या माणसांना इतर AUTOIMMUNE DISEASES असण्याची किंवा होण्याची शक्यता वाढलेली असते. उदा संधिवात अस्थमा, सोरियासिस, थायरॉईड ग्रंथीचे आजार इ.

यामुळे माझ्या सारख्या डॉक्टरांना मित्र नातेवाईक यांच्याकडून वैद्यकीय सल्ला म्हणून विचारणा होत असते कि असा आजार असलेला मुलगा किंवा मुलगी पत्करावी काय? यासाठी कितीही कटू असले तरी सत्य बोलणे भाग पडते.

वारसाहक्काने जशी स्थावर किंवा जंगम मालमत्ता आपल्याला मिळते तसेच आजारहि मिळतात.

तेंव्हा वारसा हक्काने कुणाला गरिबी किंवा कर्ज नशिबी येतं तसेच काही आजारहि येतात उदा. थॅलॅसेमिया, अस्थमा, मधुमेह, काही तर्हेचे मूत्रपिंडाचे आजार, हृदय विकार आणि कर्करोग सुद्धा इ.

एकाच वर्गात शिकत असलेले दोन विद्यार्थी पुढे डॉक्टर झाले आणि एकाकडे वारसाहक्काने श्रीमंती (रुग्णालयाची मालकी) येते आणि दुसऱ्याकडे त्याच रुग्णालयात नोकरी करणे नशिबात येऊ शकते.याला भाग्य म्हणा कि प्राक्तन.

हि वस्तुस्थिती माझ्याच बाबतीत झालेली आहे. माझ्या बारावीतील वर्गमित्राने (तो पण रेडिओलॉजिस्टच आहे) रुग्णालयाचा क्षकिरण विभाग विकत घेतला( आउटसोर्स केला) जेथे मी नोकरी करत होतो.

त्याबद्दल असलेली "वस्तुस्थिती स्वीकारणे" हे उत्तम असते.

+१
कोणत्याही पेपरातील वधूवर जाहिराती पाहा.

वर पाहिजे:
वधू - जात, वय, उंची, गोरी, सुंदर, शिक्षण, नोकरी/व्यवसाय, उत्पन्न, अपेक्षा - उच्चशिक्षित, जातीची अट नाही

वधू पाहिजे:
वर - जात, वय, शिक्षण, नोकरी/व्यवसाय, उत्पन्न, उंची, अपेक्षा - गोरी, सुंदर, उच्चशिक्षित

अपवाद सोडून टिपिकल जाहिराती अशा असतात.
म्हणजे मुलींविषयी सांगताना आधी काय सांगितलं जातं की गोरी सुंदर.
मुलाविषयी सांगताना आधी सांगितलं जातं शिक्षण, नोकरी आणि उत्पन्न.
मुलांच्या अपेक्षेत सगळ्यात आधी गोरी सुंदर.

त्यामुळे, लग्नाच्या बाजारात सुंदर मुलीचीच मागणी असते हि वस्तुस्थिती आहे, यात शंका नाही!

मी-दिपाली's picture

22 Jul 2023 - 10:13 am | मी-दिपाली

सर्व वाचक अन आवर्जून प्रतिसाद देणाऱ्या मिपाकरांचे मनापासून आभार.

चौथा कोनाडा's picture

22 Jul 2023 - 1:29 pm | चौथा कोनाडा

व्वा, खुप सुंदर .... सखोल विचार करायला लावणारं.

शेवट वाचून गलबललो !

( अवांतरः आता नितळ सिनेमा पुन्हा पहायला हवा, ...... काही वर्षांपुर्वी अर्धवट बघितला गेला होता )