प्राचीताई यांची तरल,मोरपंखी कविता वाचल्यावर एकांगी वाटली. सखीने शंका उपस्थित केली तर सखा तीचे शंका समाधान कसे करेल हा एक विचार डोक्यात आला.
काही सुचले, लिहून काढले व ताईंची परवानगी काढली. बघा केलेला शब्दच्छल आवडतो का?
-
-
जाऊ नको सखये,तशी तू
स्पर्शाने माखलेली..
म्हणतील कुठूनं आली
ही कोर डागाळलेली
धग तापल्या तनूची
जाळेल साऱ्या जगाला
म्हणतील लोक सारे
श्रावणात ग्रीष्म कोठुनी आला
तू जिथे जिथे जाशील
पसरेल गंध मोगऱ्याचा
सांगेल गुपीत आपले
नाही भरवसा चोंबड्याचा
जाऊ नको सखये,तशी तू
गंधाळेल आसमंत
गोंधळून म्हणतील सारे
का अवेळी बहरली,रातराणीची वेल
धुंद आठवणींचा ठेवा
साठव मन कुपीत
सांगू नकोस कोणा
तू कालचे गुपीत
पारोशी नकोस राहू बाई
धोका चक्रीवादळाचा
मज बोल लावतील
नाही भरवसा जगाचा.
-
-
अवघड शब्दार्थ-
पारोशी= अंघोळ न केलेली.
कोर=चंद्रकोर
प्रतिक्रिया
15 Jun 2023 - 1:30 pm | राजेंद्र मेहेंदळे
जोरदार उत्तर!! आवडली.
15 Jun 2023 - 8:24 pm | प्रचेतस
एकदम भारी.
16 Jun 2023 - 11:30 am | प्राची अश्विनी
उत्तर आवडलं.
26 Jun 2023 - 1:33 pm | तुषार काळभोर
मूळ कविता कणभर जास्त चांगली आहे, हे नमूद करू इच्छितो.
26 Jun 2023 - 2:45 pm | कर्नलतपस्वी
साजेशी म्हणलात भरून पावलो.
३६ गुण मिळणे जरूरी नाही. आम्हाला नेहमीच ३५ मिळत आले.