सकाळ झाली.भैरु उठला. न्याहरी करुन शेतावर गेला. माझीही अशीच तऱ्हा. तेच ते आणि तेच ते. "बाई मी दळण दळिते" हे खरं तर "बाई मी पीठ दळते." असं हवं.
माझीही सकाळ उगवली. वाॅशरुममध्ये गेले. तोच तो ब्रश घेतला. तीच ती उदासवाण्या पांढऱ्या रंगाची पेस्ट त्यावर लावली. माझी पेस्ट ना खुशबूदार,ना झाग वाली,ना असरदार. मी दात घासले. टंग क्लिनरनं जीभ साफ केली. मग त्याच त्या वासाच्या, लवकर न झिजणाऱ्या आणि न संपणाऱ्या साबणानं चेहरा धुतला. केस नीट केले. आणि अंजनीबाईंनी केलेला तोच तो पाणचट चहा प्यायले. चहा किती बेचव,पुळकवणी! किती शिकवा जाहिरातीतल्या बाईसारखा तरोताजा बनवणारा चहा काही या म्हशीला करता येत नाही.(चिडले की मी मनुष्य योनीतून पशुयोनीतलं संबोधन वापरते.) त्या चहात बुचकळून कडक टोस्ट दातांना (त्यातले अनेक कृत्रिम) टोचवून आणि जिभेला इजा करवून घेत मी खाल्ले.
आता यापुढचा दिनक्रम काय उघड करुन सांगायला पाहिजे?चतुर आणि चाणाक्ष नसलेल्या वाचकांच्याही तो लक्षात आला असेल. मग आंघोळ,बेचव ब्रेकफास्ट, बेचव जेवण.कितीतरी स्वयंपाकिण्या बदलल्या असतील,पण चवीत फरक पडेल तर रामा,शिवा, गोविंदा! जेवणानंतर टीव्हीवर सुरु असलेल्या रटाळपणाचा कळस असलेल्या मालिका. मी त्या असह्य मालिका मुर्दाडपणे का बघते? डोळ्यांसमोर काही तरी चित्रं हालतात म्हणून?बातम्यात ह्याची त्याच्यावर टीका, घणाघात, टोला हाणला. पलटवार, शेरेबाजी! आत्ताच्या सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टाचा एक वेळ निकाल सुध्दा लागेल, पण या नेत्यांचं बोलणं काही थांबणार नाही. मला तर हल्ली कोण गद्दार (किती सालचे?)कोण ढेकूण, कोण सर्प,कोण घूस, कोण डुक्कर,कोण चोर,कोणाचा खंजीर कुणाकुणाची पाठ हेच कळेनासं झालंय. म्हणजे पुन्हा तेच ते आणि तेच ते.
टीव्ही बघून आणि वाचून डोळे शिणले की झोपायचं. पुन्हा टीव्ही , पुन्हा चहा, पुन्हा जेवायचं (आता काय म्हणे रात्रीचं जेवण!) आणि मग पुssssssन्हा त्याच त्या बिछान्यावर झोपायचं. च्या.... च्या.... उतारवय किती कंटाळवाणं! काहीतरी वेगळं, छान, घडायला पाहिजे. सनसनाटी,थ्रिलिंग!
माझ्यासारखंच माझ्या काही मैत्रिणींना वाटत होतं. आमच्यांपैकी एका मैत्रिणीनं सुचवलं,"(बुद्धिमान आहे साली.)आपण सगळ्याजणी मस्तपैकी कुठंतरी आऊटिंगला जाऊया का?ट्रीपला? सरळ हॉटेल किंवा चांगल्याशा लाॅजवर उतरायचं. कुणाच्याही घरी नाही. मग भाजी चिरून देऊ का? पोळ्या करु का? असं मॅनर्स म्हणून विचारावं लागतं आणि करावंही लागतं. त्यापेक्षा हॉटेल बरं!आठ दिवस राहायचं हॉटेलवर. स्वयंपाकाला हा म्हणून लावायचा नाही. सिनेमे बघायचे,रोज नव्या हाॅटेलात चमचमीत जेवायचं. आजवर अजिबात न खाल्लेले पदार्थ खायचे. (बियर प्यायची,एका बिनधास्त मैत्रिणीचं प्रपोजल. नाही ग बाई.आम्ही नाही हं त्यात!"-काही उद्गार) भरपूर खरेदी करायची. आईस्क्रीम, फालुदा, कुल्फी ,मस्तानी, मिल्कशेक ओरपायचं, एसी टॅक्सी, सॉरी, कॅबमधून हिंडायचे. पैसे लावून पत्ते खेळायचे.(एक दोघी: ए,असलं काही नको हं!) म्युझिक लावून डान्स करायचा. मस्तपैकी सिगरेटही ओढून पाहायची.(सगळ्याच जणी: हे असलं तर काहीतरी अजिबात नाही हं!) बघूया तरी कसं वाटतं ते!आपण काय आता लहान मुली नाहीत बिघडायला! सगळ्या काकू, मावशी,ऑंट्या , आज्या आहोत. "त्या बुद्धिमतीनं आपलं बोलणं संपवली. आम्ही तिच्या इतके सडाफटिंग मुक्त विचारांच्या नसलो तरी तिची आयडिया एक्सायटिंग वाटली.
आम्ही पाच जणी गेलो. एका शहरात. आम्हाला खेड्यात,शांत वातावरणात, निसर्ग सौंदर्य न्याहाळत बसायचं नव्हतं. आम्हांला मज्जा करायची होती. शहरातल्या सगळ्या लक्झुरीज आम्हांला हव्या होत्या. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या लाॅजची आम्ही निवड केली होती. तिथं आम्हांला लाॅजवरुन उतरताच ओला,उबेर मिळायला हवी होती. स्वादिष्ट रेस्टॉरंट्स,माॅल्स, चकचकीत दुकानं असं सगळं हवं होतं. बुकिंग आधीच ऑनलाईन केलं होतं. आम्ही लाॅजवर पोहोचलो. रुम्स मस्तच होत्या. पायातल्या सॅंडल्स, चपला कोपऱ्यात भिरकावल्या. दार बंद केले.आता हे दोन सूटस आमचे होते. आम्ही बेडवर मस्त लोळलो, वयाला न शोभेल असे माफक किंचाळलो. वेडेवाकडे आवाज काढत गायलो. कॉलेज दिवसांची आठवण झाली. मग फ्रेश झाल्यावर काॅफी मागवली. प्यायलो.मग सगळ्याजणींनी मस्तपैकी शाॅवर घेतला. कपडे बदलले.
माझ्या बुद्धिमान मॉडर्न मैत्रिणीनं स्कर्ट आणि त्यावर फॅशनेबल टाॅप घातला. स्कर्ट म्हणजे पायघोळ बरं का.
एका उच्चारायला अवघड अशा रेस्टॉरंट मध्ये आकंठ जेवलो. तिथं मेन्यू स्कॅन करून ऑर्डर द्यायची होती. हा प्रकार मला नवाच होता. मग आम्ही लाॅजवर परतलो. खूप गप्पा मारल्या. हसलो,खिदळलो. कुणीही कोणत्याही कारणांनी कौटुंबिक विषयावर बोलायचं नाही, असं ठरवलंच होतं.
एक दिवस मूव्ही बघायला गेलो. पिक्चर बेकार होता. एरवी 'मिडल् क्लास मेंटालिटीनुसार पैसे वसूल करण्यासाठी आम्ही तो सिनेमा पूर्ण पाहिला असता. पण आज तो भिकार सिनेमा आम्ही पूर्ण पाहिला नाही. सरळ मध्येच उठून आलो. आमच्यासारख्या उच्च अभिरुची संपन्न प्रेक्षकांना बोअर करतो म्हणजे काय? पैसेही घालवायचे आणि बोअर ही व्हायचं म्हणजे काय!
अशाच रोज भटकलो. भरपूर खरेदी केली. अनेक अनावश्यक वस्तू घेतल्या. खाद्यपदार्थ घेतले. ड्रेस मटेरिअल घेतलं. एकीनं तर अमेरिकन डायमंडचा चकचकता नेकलेस घेतला.
एका रेस्टॉरंट मध्ये गेलो. जे पूर्वी कधीही खाल्लं नाही,ते खायचं ठरवलं. मेन्यू कार्ड पाहिलं तर काय? आम्हांला शब्दांचे उच्चारच समजेनात.
Bruschetta,
Coppino
Maskarpone
Lasagna काहीतरी विथ ricotta quesadinlla अशी काहीतरी चमत्कारिक पदार्थांची नावे दिसली.
दोनच दिवसांपूर्वी अगम्य भाषेतलं नाव मेन्यू कार्ड वर वाचून सांगितले तर समोर भेंडीची भाजी आली. आमच्या अंजनाबाई काही सुचलं नाही की भेंडीचीच भाजी करतात. तसा प्रसंग पुन्हा घडू नये यासाठी आमच्या बुद्धिमान मैत्रीणीनं(बुद्धिमान असूनही तिला चष्मा नाही.शिवाय ती दिसायलाही सुंदर आहे.) त्या अवघड नावाचा बऱ्यापैकी बरोबर उच्चार (काय माहीत? बरोबर की चूक ते) करून ऑर्डर दिली. जे वाढून आलं ते आम्ही अन्ननलिकेत ढकललं.गिळलं म्हणा ना!
आठ दिवस भुर्रकन उडून गेले. सगळ्याजणींना घरचे वेध लागले. मग परत घरी आलो. सगळ्याजणी फ्रेश,ताज्यातवान्या, टवटवीत झालो होतो.
मी घरी आले. घरच्यांना काय मजा केली ते सांगितलं. त्यात फार मजा काय केली हे त्यांना कळेना असो.रात्री घरच्या सवयीच्या बेडवर सवयीच्या उशीवर मस्त झोप लागली.
सकाळी उठल्यावर वाटलं आपण अजून लाॅजवरच आहोत. मग चहाची आठवण झाली.मी ट्रीपहून वेगवेगळ्या प्रकारचे मसाले आणले होते. त्यात चहाचा देखील होता. अंजनाबाईंच्या हातात ते देत मी म्हटले,"हा मसाला चहात टाक. ह्या सगळ्या मसाल्यांवर लिहिलेलं वाच. आजपासून भाज्यांमध्ये,मिसळीमध्ये, पावभाजीमध्ये ह्यातले मसाले घालायचे. चव बदलेल. मजा येईल जेवायला. लाईफमें कुछ नया मंगता है"
मी आणलेली कुरकुरीत, खुसखुशीत बिस्किटे तिच्या हातात देत मी म्हटले ही दे मला चहाबरोबर! मी वाॅशरुममधे गेले. दात घासताना वाटलं तीच पेस्ट आता सुगंधी, झागवाली, असरदार आहे. मेरे टूथपेस्ट में नमक है..!
मी खुळखुळून चुळा भरल्या.
एक ताजी, प्रसन्न सुखसंवेदना माझ्या शरीरभर पसरली. मी मुक्तमोकळा श्वास भरभरून घेतला..
वय कितीही असो. लाईफमे कभी कभी मसाला मंगता है..
प्रतिक्रिया
4 May 2023 - 10:50 am | वामन देशमुख
आजी, नेहमीप्रमाणे आवडलं हे तुमचं खुशखुशीत लिखाण.
---
एक नंबर!
---
लाईफमे कभी कभी मसाला मंगता है.. हे अगदी खरंच आहे हं. अर्थात, आयुष्यात जितकं उशिरा असं वाटायला लागेल तितकं दीर्घकाळ आयुष्य चविष्ट जगलेलं आहे असं म्हणता येईल का?
4 May 2023 - 1:12 pm | चांदणे संदीप
मस्तच! फर्मास लेखन.
लाईफमे मसाला मंगताच हय पण चहामंदी आलं, इलायची किंवा गवती चहा बास आहे.
सं - दी - प
4 May 2023 - 6:27 pm | टर्मीनेटर
क्या बात... क्या बात... आजी!
तुमच्यासाठी Live Life King Size मध्ये थोडा बदल करून "Live Life Queen Size" असा शुभेच्छात्मक संदेश देतो!
एन्जॉय 👍
7 May 2023 - 1:17 pm | नगरी
व्वा
4 May 2023 - 9:57 pm | सरिता बांदेकर
छान लिहीता तुम्ही.असा दंगा करून आलं कि मजा येणारच.
तुम्हाला असा दंगा करायला पुन्हा ,पुन्हा मिळो आणि आम्हाला तुमचा अनुभव वाचायला मिळो.
6 May 2023 - 8:24 am | तुषार काळभोर
अन् दंगा, मज्जा, धमाल भी मंगता हय!!
6 May 2023 - 9:29 am | आंद्रे वडापाव
बिअर ट्राय केली की नाही ?
नवख्याला / नवाखीला "बिरा" दिली तर चालते..
अजुन बरेच आहे...
7 May 2023 - 1:20 pm | नगरी
व्वा,मझा आया
7 May 2023 - 2:08 pm | अथांग आकाश
मस्त लिहिलय! मजा आली!!
8 May 2023 - 9:39 am | श्रीगणेशा
नेहमीप्रमाणे ओघवतं लिहिलंय, खूप छान!
खरं आहे,
पण चांदणे संदीप म्हणतात त्याप्रमाणे, चहात नको मसाला, असं माझंही मत आहे :-)
8 May 2023 - 8:22 pm | Nitin Palkar
खूपच छान आणि ओघवतं लेखन.
9 May 2023 - 1:16 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आजी मस्त लिहिलंय. धमाल. आयुष्यात थोडे बदल हवेच. रुटीन पेक्षा वेगळं.
आणि पुन्हा रुटीन आयुष्य नव्याने. लिहिते राहा आजी आठवणीने.
-दिलीप बिरुटे
10 May 2023 - 7:44 am | नचिकेत जवखेडकर
नेहमीप्रमाणेच छान! :)
11 May 2023 - 4:55 pm | अनिंद्य
लाईफमे कभी कभी मसाला मंगता है..
+१
झकास लेख !
४-५ दिवस स्वयंपाकघराचे तोंड बघायला न लागणे, समोर तयार आलेल्या डिशेश वर मोकळेपणाने हे चांगले - ते बोगस असे म्हणता येणे, वेटर-शेफ मंडळींना कैच्या काय कस्टमाइज्ड पदार्थ आणायला सांगणे यातही मोठी मजा आहे :-)
15 May 2023 - 1:57 pm | आजी
वामन देशमुख -"एक नंबर!"हा तुमचा अभिप्राय वाचून मलाही एक नंबरचा आनंद झाला.
चांदणे संदीप-फर्मास लेखन - धन्यवाद.
टर्मीनेटर-"Live life queen size"ह्या तुमच्या सदिच्छा लाख मोलाच्या आहेत. धन्यवाद.
नगरी-व्वा! तुमच्या या एकाक्षरी अभिप्रायात खूप अर्थ दडलेला आहे. आनंद वाटला.
सरिता बांदेकर -तुम्ही पण असा दंगा करा अधुनमधून.
तुषार काळभोर -"दंगा मज्जा, धमाल भी मंगता हैं।”खरंच!
आंद्रे वडापाव -बियर"फियर "ट्राय केली नाही.
अथांग आकाश -धन्यवाद.
श्रीगणेश -आभारी आहे.
Nitin Palkar-Thanku.
प्रा. डॉ.दिलीप बिरुटे -दिलीपजी,लिहिती राहेन. प्राॅमिस.
नचिकेत जवखेडकर-धन्यवाद.
अनिंद्य -छान अभिप्राय दिलायत. अगदी माझ्या मनातले बोललात.
सर्वांचेच मनापासून आभार.
16 May 2023 - 5:10 pm | विजुभाऊ
झकास लिहिले आहे आज्जी.
मस्त एन्जॉय करताय मज्जानी लाईफ.