(काल्पनिक...!)
सकाळी जाग आली ती मिक्सरच्या आवाजाने. आज रविवार सुट्टीचा दिवस ठरवलेलं चांगली झोप काढावी. पण निवांतपणे झोपून देईल ती बायको कसली. प्रेत्येक सुट्टीच्या दिवशी कशा ना कशाच्या आवाजानेच झोप मोड होते. कधी भांड्याचा आवाज, कधी कपडे धुण्याचा आवाज, तर कधी आणखी कशाचा आणि काहीच नसलं तर मोठ्या आवाजात लावलेल्या गाण्याच्या आवाजानं. तिच्या ताब्यात असणारी प्रेत्येक वस्तू जणू तिच्या इशाऱ्यावर काम करत असते.
एवढ्या सकाळ सकाळ कुणी मिक्सर लावतं का?
आज मात्र मनाशी ठरवलं, काहीही झालं तरी आपण याचा जाब विचारायलाच हवा.
बिछान्यावरून उठलो आणि बायकोला म्हणालो,
“काय सकाळ सकाळ गोंधळ चाललाय, सुट्टीच्या दिवशी तरी निवांत झोपू देशील कि नाही?”
ती काही बोलली नाही, पण डोळे मोठे करून माझ्याकडे पाहिलं, तिने असे डोळे मोठे केले कि हमखास तिचं रौद्र रूप पाहायला मिळत म्हणून मी विषय न वाढवता बाथरूमच्या दिशेने माझा मोर्चा वळवला.
सकाळचे सगळे विधी उरकत असताना मी सारखं मनाशी म्हणत होतो. उगाच आपण सकाळ सकाळ बोललो. रविवार असू दे नाहीतर सोमवार बिचारी सकाळी लवकर उठून घरातली सगळी कामं आटपून, आपल्याला वेळेवर नाश्ता तयार करते. उलट आपण तिचे आभार मानायला हवं. चला आज आपण तिची माफी मागू, ती पण जरा खुश होईल. म्हणून नाश्ता करता करता तिला म्हणालो, मला माफ कर मी मघाशी ओरडायला नको हवं होतं.
‘आज या बोक्याची मनीमाऊ कशी झाली,’ अशा अविर्भावात ती माझ्याकडं बघत राहिली.
“अगं, अशी काय बघते, मी खरं बोलतोय.” मी म्हणालो.
“उगाच मस्का मारू नका, काय काम आहे बोला.”
"अगं मी खरचं बोलतोय," मी म्हणालो.
"हो का, मी काय तुम्हाला आताच ओळखते, लग्नाच्या पूर्वीपासून मला तुमचा स्वभाव चांगला माहित आहे," ती म्हणाली.
हे खरं आहे, म्हणजे लग्नापूर्वी आम्ही दोन तीन वर्ष प्रेमात होतो. पण पूर्वी ती अशी नव्हती. एकदम साधी भोळी, म्हणजे मी एखादी न पटणारी थाप मारली, तरी ती डोळे बंद ठेऊन त्यावर विश्वास ठेवायची. हे संशयाचं भूत लग्नानंतर मागं लागलेलं. लग्नापूर्वी आम्ही रोज भेटायचो, तरी ती म्हणणार, ‘अरे बोल काहीतरी, एक दिवस उलटून गेला भेटून.’ तरी तुला काही बोलावं वाटत नाही. बरं या एका दिवसात दहा वेळातरी फोनवर बोलणं झालेलं. व्हाट्सअँपवरचे संदेश तर विचारू नका. आता एवढं सगळं बोलून झाल्यावर बोलायला काहीतरी शिल्लक राहायला हवं कि नको. त्यात मी घुम्या स्वभावाचा त्यामुळे काय बोलावं हे माझ्यासमोर नेहमी भलं मोठं प्रश्नचिन्हं. मग मी विचारण्यासाठी काही प्रश्न तयार केले. त्यात महत्वाचे काही प्रश्न म्हणजे, ‘जेवली का? काय जेवली?’ असले. पण तेही वेळ बघून विचारावे लागायचे. म्हणजे दुपारी किव्हा रात्री 'जेवली का?' आणि इतर वेळेस नास्ता झाला का? फक्त शब्द फिरवायचे.
बरं, नुसतं ‘जेवली का?’ म्हणून जरी विचारलं तरी सविस्तर माहिती मिळायची. म्हणजे जर समजा डाळ, भात भाजी असेल तर, डाळ बनवताना टॅमोटो किती घेतले, फोडणी कशी दिली हि सगळी माहिती एखाद्या विषयाच्या अभ्यासकानं द्यावी अशा अविर्भावात सांगितली जायची आणि मी सुद्धा डाळीला फोडणी कशी देतात हे माहित नसल्याप्रमाणे गंभीर मुद्रा करून ऐकत राहायचो. आता कधी कधी वाटतं तेव्हा आपण एवढे बावळटासारखे कसे काय वागत होतो. बरं हे माझ्या एकट्या बरोबरच घडलेलं नाही. माझे काही मित्र आहेत त्यांचा सुद्धा असाच अनुभव आहे.
त्या दिवशी एक मित्र म्हणत होता, अरे, बायको मुकी असती तर किती बरं झालं असतं. बरं या मित्राच्या प्रेमकहाणीवर तर एखादा चित्रपट तयार होईल अशी. म्हणजे पहिली तीन चार वर्ष तर ती त्याला भावच देत नव्हती. पण हा काही हार मानायला तयार नव्हता. सारखा तिच्या पाठी पाठी, ती आज तरी आपल्याजवळ बोलेल या आशेवर त्याचे दिवस चालले होते. शेवटी तिला याची कीव आली आणि एकदाचा होकार दिला. त्यानंतर घरातले तयार नव्हते. म्हणजे याच्या प्रेमाच्या वाटेवर नुसते काटे नव्हते तर मोठमोठाले डोंगर पार करून शेवटी लग्न झालेलं. जो माणूस तिनं एक शब्द तरी आपल्याजवळ बोलावं म्हणून दिवसभर झुरत राहायचा तोच आज म्हणतोय "बायको मुकी असती तर किती बरं झालं असतं."
“अरे, असं झालं तरी काय?” मी त्याला विचारलं.
तसा तो सांगू लागला. बायको म्हणाली, “काल मी जो ड्रेस घातला होता ना! त्या रंगाचा एक टॉप घेऊन या,” मी आपलं सहज ‘काल कोणत्या रंगाचा ड्रेस घातला होतास’ म्हणून विचारलं, आता कलर सांगितला असता तर मी घेऊन आलो असतो, पण प्रश्नाचं सरळ उत्तर देईल ती बायको कसली!
तर म्हणते कशी, काल कोणता ड्रेस घातलेला आज तुम्हाला आठवत नाही. लग्नाच्या पूर्वीतर मागच्या आठवड्यात कोणत्या वारी कोणता ड्रेस घातला बरोबर लक्षात असायचं आणि आता? म्हणतात ना गरज सरो आणि वैद्य मरो. बरोबर लागू होतंय तुम्हाला.
मी आपलं मस्करीत म्हटलं, “तेव्हा मला काही कामधंदा नव्हता.” मग काय गप्प राहायचं नावच घेत नव्हती. असं डोकं फिरलं होतं म्हणून सांगू. हे नेहमीचंच झालंय मी बोलणार एक आणि ती दुसराच अर्थ काढणार.” तो एखाद्या गहण विचारात गढून गेल्यासारखा कुठेतरी शून्यात पाहून मला विचारतं होता, "लग्नापूर्वी एवढ्या भोळ्या असणाऱ्या मुली, लग्नानंतर एवढ्या कशा काय बदलतात." खरं तर मला सुद्धा बरेच दिवस हाच प्रश्न भेडसावत होता.
प्रतिक्रिया
8 Apr 2023 - 6:11 am | तुषार काळभोर
कपड्यांच्या बाबतीत कापडाचा पोत, रंग, छटा, डिझाईन, लांबी, आठवणी, शेजारणी, मैत्रिणी, नातेवाईक इतके variables असतात की तो प्रकार बायकोने नवऱ्याला सांगणे, ही बायकोची चूक असते!
8 Apr 2023 - 9:21 am | Deepak Pawar
तुषार काळभोर सर बरोबर आहे तुमचं म्हणणं.
एका मित्राने एक प्रसंग सांगितला होता. लग्नापूर्वी गेल्या आठवड्यात कोणत्या वारी कोणता ड्रेस परिधान केला होता. हे सांगणारा प्रियकर नवरा होतो आणि त्याला काल कोणत्या रंगाचा ड्रेस परिधान केला हे सांगता न आल्यानं झालेला वाद. त्यावरून लिहिलं.
धन्यवाद.
8 Apr 2023 - 10:32 am | कर्नलतपस्वी
नवरदेवास एक चारोळी पाठवून संभावित धोक्याची सुचना देऊन शुभेच्छा देतो.
झुकी हुई पलके और सुरत भोली
ए जी,ओ जी की मिठी बोली
ये सब महज नजरोंका धोका है
सोच ले अब भी एक मौका है
पता चल जायेगा आटे दाल का भाव
जब सेहरा उतर जायेगा
पैनी नजर और मीजाज होंगे सख्त
तब ना रहेगा ताज ना रहेगा तख्त l
8 Apr 2023 - 12:11 pm | तुषार काळभोर
का हो होतकरू वरांना 'नारायण' बनवताय? 😂
8 Apr 2023 - 6:44 pm | Deepak Pawar
कर्नलतपस्वी सर कविता छान आहे.
8 Apr 2023 - 1:44 pm | Bhakti
"लग्नापूर्वी एवढ्या भोळ्या असणाऱ्या मुली, लग्नानंतर एवढ्या कशा काय बदलतात."
भोळ्याच असतात हो मुली.छे आपण किती भोळे होतो हे समजल्यावर जरा लग्नानंतर धीट होतात.
बाकी मुलगा आधी भोळा असेल तर ते नंतर धीट होतात.
म्हणजे दोघांपैकी जे भोळे असेल ते धीट होऊन सामना बरोबरीचा होतो :)
बाकी काही "ती किती सुंदर दिसतेस" हा जप दिवसातून दोनदा तरी करावा नक्की फरक पडेल ;)
8 Apr 2023 - 6:42 pm | Deepak Pawar
Bhakti मॅडम मनःपूर्वक धन्यवाद.
बाकी काही "ती किती सुंदर दिसतेस" हा जप दिवसातून दोनदा तरी करावा.... नक्की :)