आमची मुलगी सध्या हिंदी शिकतेय. म्हणजे, तसं ती गेली दोन वर्षं शिकतेय! (शिकवायला बापच ..सॉरी...पिताश्री असल्यावर कसं व्हायचं पोरीचं?) पिताश्रींनी तिला इंग्रजी-हिंदी शिकवायचं व्रत घेतल्याला काही वर्षं लोटली. (आधी स्वतः शिका म्हणावं!) आता ती "पाच मिनिट थांबो' अशा दर्जाचं हिंदी बोलतेय. जमलं नाही, तर तोंडाला येईल ते ठोकून देते. (पिताश्रींची परीक्षेतली सवय!) काही महिन्यांपूर्वी असंच तिला कळू नये म्हणून मी आणि बायको एक विषय इंग्रजीतून बोलत होतो. ("तसलं' काहीही बोलत नव्हतो! चहाटळ कुठले! "तसलं' मराठीतून बोलायची बोंब. इंग्रजीतून काय बोलताय?) थोडा वेळ पाहिलं पाहिलं आणि पोरगी वैतागली. "ए..."मराठी'तून बोलू नका!' तिनं फर्मान सोडलं. आम्ही ज्या भाषेतून बोलतोय, ते "मराठी' असल्याचा तिचा समज झाला होता.
असो. सांगायचा विषय वेगळाच होता. सध्या लेकीचा आणि तिच्या पालकांचा (विशेषतः पिताश्रींचा) संघर्ष चालला आहे, तो उलट आणि उर्मट बोलण्यावरून! तिच्या बालसुलभ आणि निरागसता का काय म्हणतात त्या गुणांनी मीच अंतर्मुख होऊन एकूणच उर्मटपणाबद्दल विचारांच्या गर्तेत सापडलो आहे.
उदा क्र. 1.
घरात मी आणि मुलगी. मला संगणकावर काम करायचं आहे आणि तिलाही तेच "खेळणं' हवंय. काही केल्या मला काम करू देत नाहीये. झोप सांगितलं, तरी झोपायला जात नाहीये, पसारा पाडून ठेवला आहे. शेवटी कशावर तरी वैतागून मी तिला "आधी ऊठ आणि पसारा आवर' असा काहीतरी दम देतो. ती ज्या कामात गुंतली आहे, त्यात अजिबात फरक पडू न देता ती माझ्याकडे चक्क दुर्लक्ष करते. (आईवर गेलेय कार्टी!) पुन्हा मी आवाज चढवून तेच वाक्य उच्चारतो. आता माझा रुद्रावतार पाहून तरी ही कामाकडे वळेल, अशी अपेक्षा. पण ती थंडपणे ऐकवते - "बाबा, असं ओरडायचं नाही. सरळ सांगायचं - "तुझ्या हातातलं काम झालं, की आवर पसारा. हेच आवडत नाही मला तुमचं!'
मी गार!!
कधीतरी हेच आम्ही तिला ऐकवलेलं असतं. एखाद्या कामात असताना गोष्ट सांगण्यासाठी किंवा खेळण्यासाठी ती हट्टाला पेटल्यावर आम्ही तिला हेच वाक्य सुनावलेलं असतं. ते बरोब्बर लक्षात ठेवून त्याची सव्याज परतफेड ती आम्हाला अशा प्रसंगी करते.
उदा क्र. 2.
भातुकली घरभर केल्यानंतर किंवा खेळणी गावभर टाकल्यानंतर ती आवरण्याचं नाव नाहीये. मग तिला आधी समजावून, नंतर दटावून आणि शेवटी दम देऊन पाहिलं जातं. त्यावर ती "तुम्हीच आवरा तो पसारा' असं सरळ सांगून मोकळी होते. मग "तुला देवबाप्पाने हात दिलेत की नाही? मग आपला पसारा आपणच आवरायचा!' असंही कधीकधी तोंडून निघून जातं. आपल्याला हेच पुन्हा ऐकायला लागणार आहे, याची त्या वेळी सुतराम कल्पना नसते.
एखाद्या वेळी, एखादी गोष्ट तिला आणून द्यायला सांगितली, की मग "तुम्हाला देवबाप्पाने हात दिले नाहीयेत का?' हे ऐकावं लागतं. आंबे खाताना एखादी जरी साल तिच्या ताटात टाकली, तरी "तुमची साल आहे ना, तुम्हीच टाका मग डब्यात!' असंही सहन करून घ्यावं लागतं. कारण आधी कधीतरी तिला शिस्त लागावी म्हणून तिला हेच वाक्य आम्ही ऐकवलेलं असतं.
उदा क्र. 3.
"असं वागायला वेडी आहेस का?' हे वाक्य तर घरोघरच्या पिलावळीसमोरचं "टेंप्लेट' असावं. शहाण्यासारखं वागणं म्हणजे काय, हे समजावताना आपण त्याचा सर्रास उपयोग करतो. हेच वाक्य पाहुण्यांसमोर आपल्याबाबत वापरून मुलं आपली "शोभा' करतात.
---
"आपण मुलांना शिकवणं म्हणजे संस्कार. त्यांनी आपल्याला शिकवणं म्हणजे उर्मटपणा' अशी ग्राफिटी काही महिन्यांपूर्वी लिहिली होती. सध्या त्याचाच अनुभव घेतोय!
प्रतिक्रिया
5 May 2009 - 3:40 am | सुवर्णमयी
अशा अनुभवाशी नक्कीच चांगली परिचित आहे.
आमच्याकडे असे प्रयोग मराठी शिकण्याकरता होतात, अ आ पासून वृत्तपत्रातील काही ठळक शब्द वाचण्यापर्यंत गेलेली गाडी आता फक्त स्वतःचे नाव वाचता येते इथवर आहे..
दिलेला प्रत्येक उपदेश, प्रत्येक वाक्य अंगावर उलटे कसे येते याचा पदोपदी अनुभव ही एक मस्त गोष्ट असते. सगळ्यांसमोर फजिती झाली तरी सुद्धा..
असे आणखी अनुभव येऊ द्या.
-
सोनाली
5 May 2009 - 8:36 am | संदीप चित्रे
अनुभवांतून जातोय रे...
माझ्या लेकाची (वय जवळपास चार वर्षे) खेळण्यातली तलवार पाच-सहा महिन्यांपूर्वी माझ्याकडून चुकून मोडली होती.
आज काहीतरी बोलताना त्या तलवारीचा विषय निघाला.. लेक म्हणाला, "ती तलवार तर मोडली.... तुझ्याकडून !"
त्याला म्हटलं, "अरे, चुकून मोडली ती... मी मुद्दाम मोडली नव्हती."
तर हा मला शांतपणे म्हणाला, 'दॅट्स ओके बाबा... ऍक्सिडंट्स हॅपन !" :)
(अवांतरः नंतर समजलं की हे मिकी माऊसने शिकवलंय !)
5 May 2009 - 10:23 am | प्रकाश घाटपांडे
मुलांकडुन शिकण्यासारख खुप काही असत. आनंद घारे सर एके ठिकाणी म्हणतात "थट्टा, मस्करी, किडिंग वगैरे करणे हा माणसाचा नैसर्गिक स्वभाव आहे. अगदी एक शब्द सुद्धा बोलू न शकणारे मूलसुद्धा आपल्याला खिजवते आणि आपण बुद्दू बनलेले पाहून मिश्किलपणाने हसते हे मी पाहिले आहे. मग आपण सुद्धा त्याला 'बदमाश', 'डँबिस', 'शैतान' वगैरे उपाध्या कौतुकाने देतो..." ते अगदी पटते.
मुले त्यांना नको असलेली गोष्ट टाळण्यासाठी / हवी असलेली गोष्ट मिळवण्यासाठी छान छान क्लुप्त्या करतात.गोड गोड बोलुन आपल्याला घोळवतात.भुभुच पिल्लु घरात आणण्यासाठी गोड बोलताना आर्जव, लाघवीपणा,मिष्किलपणा इत्यादी सर्व भावनिक प्यादी वापरुन बुद्धीबळ खेळतात.
जीवनातही असे टोमणे /कुजकटपणा/ खिल्लि ऐकावे /द्यावे लागतात पण त्यातुन आपण शिकत असतो. आपले तेच खर, आपल तेच योग्य या विचारसरणीतुन बाहेर पडायला भाग पाडतात.
आपली ती स्ट्रॅटीजी इतरांची ती लबाडी
आपला तो बाब्या इतरांच ते कार्ट
आपला तो सहभाग इतरांची ती लुडबुड
आपली ती प्रकृती इतरांची ती विकृती
अशा अनेक मालिकांचे विचार आत्मपरिक्षण करण्यास भाग पाडतात.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
5 May 2009 - 10:30 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
.... अशा अनेक मालिकांचे विचार आत्मपरिक्षण करण्यास भाग पाडतात.
घाटपांडे काकांचा प्रतिसाद आवडला. अभिजित, लेख आणि लेक भारीच आहेत. आरसा दिसला की त्रास होतो, किमान तो आपल्याच मुलांनी दाखवला आहे याचा आणि त्यांना तेवढं डोकं आहे याचा आनंद मानायचा!
आमचा शेजारी, पुरता तीन वर्षांचा नाही, पण असाच वागून नाकी नऊ आणतो. मला तो महिन्यातून दोन-तीन दिवसांच्यावर भेटत नाही त्यामुळे सध्यातरी मी त्याच्या हुशारीचं त्याच्या तोंडावर आणि मागेही कौतुक करण्याची स्ट्रॅटेजी ठेवली आहे. त्यामुळे मी काही सांगितलं की तो ऐकतो आणि त्याच्या गळी काही उतरवायचं असेल की त्याचे पालक माझं नाव बिनदिक्कत वापरतात. सध्यातरी शिस्त लावायला फार त्रास होत नाही आहे.
अदिती
स्वाक्षरीत प्रत्येक वेळी 'पंच' असावा असं थोडीच आहे?
5 May 2009 - 10:51 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अभिजित, लेख आणि लेक भारीच आहेत.
5 May 2009 - 10:41 am | स्वाती दिनेश
अभिजित, लेख आणि लेक भारीच आहेत. :)
अदितीसारखेच म्हणते.
स्वाती
5 May 2009 - 12:55 pm | श्रावण मोडक
भेटायचंय एकदा. ग्राफिटी लिहून आम्हाला कोड्यात टाकणाऱ्या अभिजितला गप्प करते म्हणजे काय? बापसे बेटी सवाईच!!! छान लिहिलंस.
5 May 2009 - 1:33 pm | ऋषिकेश
लेख, लेक दोन्हि आवडले
अदितीसारखेच म्हणतो
ऋषिकेश
5 May 2009 - 1:43 pm | परिकथेतील राजकुमार
अभिजितदाला त्याचे बालपण डोळ्यासमोर येत असेल ;)
मस्त लेखन.
संस्कारी उर्मट
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य